व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १७

दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा

दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा

“आपली लढाई . . . आकाशांतील दुष्ट आत्मिक शक्‍तींबरोबर आहे.”​—इफिस. ६:१२.

गीत ३३ वैऱ्‍यांना भिऊ नको!

सारांश *

१. इफिसकर ६:१०-१३ या वचनांनुसार यहोवा कोणत्या एका मार्गाने आपल्याबद्दल काळजी व्यक्‍त करतो? स्पष्ट करा.

यहोवा त्याच्या सेवकांप्रती असलेली काळजी वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्‍त करतो. त्यांपैकी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तो आपल्याला शत्रूंचा प्रतिकार करण्यासाठी मदत करतो. सैतान आणि त्याचे दुष्टात्मे हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. यहोवा या शत्रूंबद्दल आपल्याला सावध करतो आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला हवी ती मदत पुरवतो. (इफिसकर ६:१०-१३ वाचा.) आपण जेव्हा यहोवाची मदत स्वीकारतो आणि त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहतो, तेव्हा आपण सैतानाचा प्रतिकार करण्यात यशस्वी होतो. आपणदेखील प्रेषित पौलसारखाच भरवसा बाळगू शकतो. त्याने म्हटलं: “जर देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभा राहू शकेल?”​—रोम. ८:३१.

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

खरे ख्रिस्ती असल्यामुळे आपण सैतान आणि दुष्टात्म्यांवर जास्त लक्ष केंद्रित करत नाही. याउलट आपण यहोवाबद्दल शिकण्यावर आणि त्याची सेवा करण्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो. (स्तो. २५:५) असं असलं तरी, सैतान कोणते डावपेच वापरतो ते जाणून घेणं गरजेचं आहे. असं का? कारण ते जाणून घेतल्यामुळे तो आपल्याला फसवू शकणार नाही. (२ करिंथ. २:११) या लेखात आपण अशा एका मुख्य मार्गावर चर्चा करणार आहोत ज्याद्वारे सैतान आणि दुष्टात्मे लोकांची दिशाभूल करतात. आपण त्यांचा यशस्वीपणे प्रतिकार कसा करू शकतो याबद्दलही आपण चर्चा करू या.

दुष्टात्मे लोकांची दिशाभूल कशी करतात?

३-४. (क) भूतविद्या म्हणजे काय? (ख) भूतविद्या किती प्रचलित आहे?

सैतान आणि दुष्टात्मे लोकांची दिशाभूल करण्यासाठी मुख्यतः भूतविद्येचा उपयोग करतात. जे लोक यात सहभाग घेतात त्यांना असं वाटतं की देवाने त्यांना अलौकिक शक्‍ती दिली आहे. पण त्यांच्या कार्यांना पाठिंबा देणारा देव नसून, सैतान आणि त्याचे दुष्टात्मे असतात. उदाहरणार्थ, काही लोक दावा करतात की ते ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून भविष्य पाहू शकतात. इतर काही लोक असं भासवतात की ते मृत लोकांशी बोलू शकतात. तर काही जण जादूटोण्याचा उपयोग करून इतरांवर करणी करतात. *

भूतविद्या प्रचलित आहे का? लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन इथल्या १८ देशांमध्ये घेतलेल्या एका सर्वेनुसार प्रत्येकी ३ पैकी १ जण जादूटोणा, भूतविद्या किंवा वशीकरण यांवर भरवसा ठेवतो. तसंच, तितक्याच लोकांचा असादेखील भरवसा आहे की मृत लोकांच्या आत्म्यासोबत संवाद साधणं शक्य आहे. आफ्रिका खंडातल्या १८ देशांमध्ये अशा प्रकारचाच एक सर्वे घेण्यात आला होता. त्यात असं दिसून आलं की अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचा भूतविद्येवर भरवसा आहे. आपण कोणत्याही देशात राहत असलो तरी आपण भूतविद्येपासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे. कारण सैतान “सबंध पृथ्वीवरील लोकांना” फसवण्याचा प्रयत्न करत आहे.​—प्रकटी. १२:९.

५. भूतविद्येबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे?

यहोवा “सत्यस्वरूप” देव आहे. (स्तो. ३१:५) त्यामुळे भूतविद्येबद्दल त्याला कसं वाटतं? त्याला भूतविद्येची घृणा वाटते. यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं: “आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” (अनु. १८:१०-१२) आज ख्रिस्ती यहोवाने दिलेल्या नियमशास्त्राच्या अधीन नाहीत. पण भूतविद्येबद्दल यहोवाच्या भावना बदलेल्या नाहीत हे आपल्याला माहीत आहे.​—मला. ३:६.

६. (क) भूतविद्येचा वापर करून सैतान लोकांचं नुकसान कसं करतो? (ख) उपदेशक ९:५ या वचनानुसार मृत लोकांच्या स्थितीबद्दल सत्य काय आहे?

सैतान भूतविद्येचा उपयोग करून लोकांचं नुकसान करतो, त्यामुळे यहोवा त्याबद्दल आपल्याला सावध करतो. सैतान भूतविद्येचा उपयोग करून खोट्या शिकवणी पसरवतो. त्यातलीच एक शिकवण म्हणजे मृत लोक दुसऱ्‍या एका ठिकाणी जिवंत आहेत. (उपदेशक ९:५ वाचा.) भूतविद्येचा वापर करून सैतान लोकांना धाकात ठेवतो आणि त्यांना यहोवापासून दूर नेतो. सैतानाचं मुख्य ध्येय हेच आहे की भूतविद्या करणाऱ्‍या लोकांनी यहोवावर नाही, तर दुष्टात्म्यांवर भरवसा ठेवावा.

आपण दुष्टात्म्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?

७. यहोवा आपल्याला कशी मदत करतो?

आधी सांगितल्याप्रमाणे, सैतान आणि दुष्टात्मे यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवा आपल्याला गरज असलेली माहिती पुरवतो. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतो त्याबद्दल आता आपण चर्चा करू या.

८. (क) दुष्टात्म्यांचा विरोध करण्याचा मुख्य मार्ग कोणता आहे? (ख) सैतान मृत लोकांबद्दल पसरवत असलेल्या खोट्या शिकवणीचं स्तोत्र १४६:४ कसं पर्दाफाश करतं?

देवाचं वचन वाचा आणि त्यावर मनन करा. दुष्टात्मे पसरवत असलेल्या खोट्या शिकवणींना नाकारण्याचा हा सर्वात मुख्य मार्ग आहे. देवाचं वचन धारदार तलवारीप्रमाणे आहे. ते सैतानाच्या खोट्या शिकवणींचा पर्दाफाश करतं. (इफिस. ६:१७) उदाहरणार्थ, मृत व्यक्‍ती जिवंत लोकांशी संभाषण करू शकते ही शिकवण खोटी आहे असं देवाचं वचन दाखवून देतं. (स्तोत्र १४६:४ वाचा.) तसंच, फक्‍त यहोवाच आपल्याला भरवशालायक भविष्य सांगू शकतो हेही त्यात सांगितलं आहे. (यश. ४५:२१; ४६:१०) देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास केल्याने आणि त्यावर मनन केल्याने, दुष्टात्मे पसरवत असलेल्या गोष्टींचा द्वेष करायला आणि त्या नाकारायला आपल्याला सोपं जाईल.

९. आपण भूतविद्येचे कोणकोणते प्रकार टाळले पाहिजेत?

भूतविद्येशी संबंधित कोणतंही कार्य करू नका. खरे ख्रिस्ती या नात्याने आपण कधीच भूतविद्येच्या कोणत्याही प्रकारात सहभाग घेणार नाही. उदाहरणार्थ, आपण भूतविद्या करणाऱ्‍या लोकांकडे जाणार नाही किंवा इतर मार्गांनी मृत लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, मृत लोक कुठेतरी जिवंत आहेत अशा विश्‍वासावर आधारित असलेल्या अंत्यविधीच्या कोणत्याही प्रथा पाळण्याचं आपण पूर्णपणे टाळतो. तसंच, आपण भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषविद्येचा उपयोग करत नाही. (यश. ८:१९) अशा सर्व गोष्टी खूप हानीकारक आहेत कारण यामुळे आपण थेट सैतान आणि दुष्टात्म्यांच्या संपर्कात येऊ शकतो.

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचं अनुकरण करून आपल्याजवळ भूतविद्येशी संबंधित असलेली कोणतीही वस्तू नष्ट करा आणि भूतविद्या असलेलं मनोरंजन टाळा (परिच्छेद १०-१२ पाहा)

१०-११. (क) पहिल्या शतकातील काही लोकांनी सत्य शिकल्यावर काय केलं? (ख) १ करिंथकर १०:२१ या वचनानुसार आपण पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचं अनुकरण का आणि कसं करू शकतो?

१० जादूटोण्याशी संबंधित असलेल्या वस्तू नष्ट करा. पहिल्या शतकातील इफिस शहरात राहणारे काही लोक भूतविद्या करणारे होते. पण सत्य शिकल्यानंतर त्यांनी निर्णायक पावलं उचलली. बायबल सांगतं: “जादूटोणा करणाऱ्‍या पुष्कळ लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांसमोर जाळून टाकली.” (प्रे. कार्ये १९:१९) या लोकांनी भूतविद्येचा प्रतिकार करण्यासाठी शक्य ते केलं. त्यांच्या पुस्तकांची किंमत खूप जास्त होती. पण तरी ती पुस्तकं दुसऱ्‍या कोणाला देण्याचा किंवा विकण्याचा विचार त्यांच्या मनात आला नाही. तर त्यांनी ती पुस्तकं नष्ट केली. त्यांच्या नजरेत यहोवाचं मन आनंदित करण्याचं मोल, हे त्या पुस्तकांच्या किमतीपेक्षा जास्त होतं.

११ पहिल्या शतकातील या ख्रिश्‍चनांचं आपण कसं अनुकरण करू शकतो? जादूटोण्याशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्याकडे असेल तर आपण ती नष्ट केली पाहिजे. यात गंडेदोरे, ताईत किंवा इतर वस्तू सामील असू शकतात. सहसा लोक दुष्टात्म्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अशा गोष्टी घालतात किंवा त्या घरात ठेवतात.​—१ करिंथकर १०:२१ वाचा.

१२. मनोरंजनाबद्दल आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारणं गरजेचं आहे?

१२ तुम्ही करत असलेल्या मनोरंजनाचं काळजीपूर्वक परीक्षण करा. स्वतःला पुढील प्रश्‍न विचारा: ‘मी जादूटोण्याशी संबंधित पुस्तकं, मासिकं, किंवा इंटरनेटवरील लेख वाचतो का? मी ज्या प्रकारची गाणी ऐकतो, जे चित्रपट किंवा टीव्ही कार्यक्रम पाहतो किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो त्यात जादूटोणा असतो का? मी जे मनोरंजन करतो त्याचा भूतविद्येशी संबंध आहे का? त्यात वॅम्पायर्स, झॉम्बी यांसारख्या भूताटकीचे प्रकार सामील असतात का? त्यात फक्‍त मजा म्हणून जादूटोणा, करणी करणं किंवा शाप देणं या गोष्टी दाखवल्या जातात का?’ हे खरं आहे की प्रत्येक काल्पनिक कथा ही भूतविद्येशी संबंधित नसते. पण मनोरंजनाची निवड करताना यहोवाला ज्या गोष्टीची घृणा वाटते अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याचा पक्का निर्धार करा. देवासमोर “शुद्ध विवेक राखण्याचा” आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे.​—प्रे. कार्ये २४:१६. *

१३. आपण काय करण्याचं टाळलं पाहिजे?

१३ दुष्टात्म्यांबद्दल गोष्टी सांगण्याचं टाळा. याबाबतीत आपण येशूचं अनुकरण केलं पाहिजे. (१ पेत्र २:२१) पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता आणि त्याला सैतान व दुष्टात्मे यांबद्दल बरीच माहिती होती. पण पृथ्वीवर आल्यावर त्याने दुष्टात्म्यांनी केलेल्या कार्यांबद्दल लोकांना सांगितलं नाही. येशू लोकांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी आला होता, सैतानाबद्दल नाही. येशूचं अनुकरण करून आपणही इतरांना दुष्टात्म्यांबद्दल गोष्टी सांगण्याचं टाळलं पाहिजे. याऐवजी आपण आपल्या मनात चांगल्या विचारांना, म्हणजेच सत्याला जागा दिली पाहिजे.​—स्तो. ४५:१.

आपल्याला दुष्टात्म्यांना घाबरण्याची गरज नाही. यहोवा, येशू आणि स्वर्गदूत त्यांच्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली आहेत (परिच्छेद १४-१५ पाहा) *

१४-१५. (क) आपण दुष्टात्म्यांना घाबरण्याची गरज का नाही? (ख) यहोवा आज त्याच्या लोकांचं संरक्षण करत आहे याचे कोणते पुरावे आहेत?

१४ दुष्टात्म्यांना घाबरू नका. आजच्या जगात आपल्यासोबत वाईट गोष्टी घडू शकतात. अपघात, आजारपण किंवा मृत्यू या गोष्टी आपल्यावर अचानक येऊ शकतात. पण या सर्व गोष्टींसाठी दुष्टात्मे जबाबदार आहेत असा आपण विचार करू नये. बायबल आपल्याला सांगतं की “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (उप. ९:११, पं.र.भा.) यहोवाने वेळोवेळी दाखवून दिलं आहे की तो दुष्टात्म्यांपेक्षा खूप जास्त शक्‍तिशाली आहे. उदाहरणार्थ, यहोवाने सैतानाला ईयोबचा जीव घेऊ दिला नाही. (ईयो. २:६) तसंच, मोशेच्या दिवसांत यहोवाने इजिप्तच्या जादूटोणा करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांना दाखवून दिलं की तो त्यांच्यापेक्षा खूप जास्त शक्‍तिशाली आहे. (निर्ग. ८:१८; ९:११) नंतर, येशू राजा बनल्यावर यहोवाने त्याला सैतान आणि दुष्टात्मे यांच्यावर अधिकार दिला. त्यामुळेच येशूने त्यांना स्वर्गातून पृथ्वीवर फेकून दिलं. आणि भविष्यात लवकरच त्यांना अथांग डोहात टाकून देण्यात येईल. तिथून ते कोणालाही इजा पोचवू शकणार नाहीत.​—प्रकटी. १२:९; २०:२, ३.

१५ यहोवा त्याच्या लोकांचं आजदेखील संरक्षण करत आहे याचे अनेक पुरावे आपल्याजवळ आहेत. जरा विचार करा: आपण पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत प्रचारकार्य करतो आणि लोकांना सत्याबद्दल शिकवतो. (मत्त. २८:१९, २०) प्रचारामुळे आपण सैतानाच्या दुष्ट कार्यांचा पर्दाफाश करतो. यामुळे साहजिकच सैतानाने आपलं प्रचारकार्य पूर्णपणे थांबवलं पाहिजे. पण आजपर्यंत त्याला तसं करणं जमलं नाही, यावरूनच कळतं की यहोवा आपलं संरक्षण करत आहे. म्हणून आपल्याला दुष्टात्म्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. आपल्याला माहीत आहे की “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.” (२ इति. १६:९) आपण जर यहोवाला विश्‍वासू राहिलो, तर दुष्टात्मे आपलं कायमचं नुकसान कधीच करू शकणार नाहीत.

यहोवाची मदत स्वीकारणाऱ्‍या लोकांना आशीर्वाद मिळतात

१६-१७. दुष्टात्म्यांचा विरोध करण्यासाठी धैर्याची गरज आहे याचं एक उदाहरण द्या.

१६ दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी धैर्य लागतं. खासकरून आपले जवळचे मित्र किंवा नातेवाईक आपला विरोध करतात तेव्हा. पण जे लोक असं धैर्य दाखवतात त्यांना यहोवा आशीर्वाद देतो. घाना देशात राहणाऱ्‍या एरिका नावाच्या बहिणीचं उदाहरण लक्षात घ्या. एरिकाने बायबल अभ्यास सुरू केला तेव्हा ती २१ वर्षांची होती. तिचे वडील जादूटोणा करणारे पुजारी होते. तिने त्यांच्या प्रथांमध्ये भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. यातील एका प्रथेत मृत नातेवाइकांच्या आत्म्यांना वाहिलेलं अन्‍न सेवन करणं सामील होतं. एरिकाने जेव्हा यात सहभाग घेण्यासाठी नकार दिला तेव्हा तिच्या घरचे खूप रागावले. ती त्यांच्या देवांचा अपमान करत आहे असं त्यांना वाटलं. तसंच, तिच्या कुटुंबाचा असा विश्‍वास होता की त्यांचे देव आता त्यांना मानसिक व शारीरिक रीत्या छळतील.

१७ एरिकाच्या कुटुंबीयांनी या प्रथेत भाग घेण्यासाठी तिच्यावर खूप दबाव आणला. पण तिने मात्र ठामपणे नकार दिला आणि यामुळे तिला घर सोडावं लागलं. साक्षीदार बंधुभगिनींनी तिला आपल्या घरी राहू दिलं. हे बंधुभगिनी एरिकासाठी कुटुंबातले सदस्य बनले. हा एरिकासाठी यहोवाकडून मिळालेला एक आशीर्वादच होता. (मार्क १०:२९, ३०) एरिकाच्या नातेवाइकांनी तिला घरातून काढून टाकलं आणि तिच्या वस्तूही जाळून टाकल्या. पण एरिका यहोवाला विश्‍वासू राहिली, तिने बाप्तिस्मा घेतला आणि आज ती एक पायनियर म्हणून सेवा करत आहे. तिला दुष्टात्म्यांची भीती वाटत नाही. आपल्या कुटुंबाबद्दल एरिका म्हणते: “मी दररोज मनापासून प्रार्थना करते की माझ्या घरच्या लोकांना यहोवाला जाणून घेण्याचे आशीर्वाद अनुभवायला मिळावेत. आपल्या जिवंत देवाची उपासना केल्यामुळे मिळणारं स्वातंत्र्य त्यांनादेखील मिळावं.”

१८. यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

१८ अर्थात आपल्यापैकी फार कमी लोकांना विश्‍वासाच्या अशा परीक्षेला तोंड द्यावं लागेल. पण आपण सर्वांनीच दुष्टात्म्यांचा प्रतिकार केला पाहिजे आणि यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. आपण असं केलं, तर आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील आणि सैतान आपली दिशाभूल करू शकणार नाही. तसंच, दुष्टात्म्यांच्या भीतीमुळे यहोवाची सेवा करण्याचं आपण सोडून देणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घनिष्ठ करता येईल. शिष्य याकोबने म्हटलं: “देवाच्या अधीन व्हा; पण, सैतानाचा विरोध करा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल. देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”​—याको. ४:७, ८.

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

^ परि. 5 दुष्टात्मे आणि त्यांचा वाईट प्रभाव यांबद्दल यहोवाने आपल्याला सावध केलं आहे. पण दुष्टात्मे लोकांची दिशाभूल कशी करतात? त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण कोणती पावलं उचलू शकतो? या लेखात आपण शिकणार आहोत की दुष्ट आत्म्यांच्या प्रभावापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करतो.

^ परि. 3 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: भूतविद्या करणं म्हणजे दुष्टात्म्यांशी संबंधित विश्‍वास आणि प्रथा पाळणं. यात सहभाग घेणाऱ्‍या लोकांचा असा विश्‍वास असतो की मेल्यानंतर शरीरातून आत्मा बाहेर पडतो आणि मग तो आत्मा एका माध्यमाद्वारे, सहसा एका व्यक्‍तीद्वारे लोकांशी बोलतो. भूतविद्येत जादूटोणा आणि भविष्य सांगणं यांचा समावेश होतो. या लेखात जादू हा जो शब्द वापरण्यात आला आहे, तो अलौकिक शक्‍ती किंवा भूतविद्या याच्याशी संबंधित आहे. जादू करण्यात एखाद्याला शाप देणं, करणी करणं किंवा त्यापासून मुक्‍ती मिळवणं सामील असू शकतं. पण यात मनोरंजनासाठी दाखवले जाणारे हातचलाखीचे खेळ सामील नाहीत.

^ परि. 12 वडिलांनी मनोरंजनाबद्दल इतरांसाठी नियम बनवू नये. काय वाचावं, पाहावं किंवा कोणते गेम्स खेळावे याचा निर्णय प्रत्येक ख्रिश्‍चनाने आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाच्या आधारे घ्यावा. कुटुंब प्रमुखांनी या गोष्टीची खात्री करावी की मनोरंजनाच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबातील सदस्य बायबल तत्त्वांच्या आधारित निर्णय घेत आहेत.—jw.org® वेबसाईटवर, आमच्याविषयी > सहसा विचारले जाणारे प्रश्‍न यात यासंबंधित असलेला पुढील लेख पाहा: “विशिष्ट चित्रपट, पुस्तके किंवा गीते यांवर तुम्ही बंदी घालता का?

^ परि. 54 चित्राचं वर्णन: शक्‍तिशाली स्वर्गीय राजा येशू आपल्या स्वर्गीय सैन्याचं नेतृत्व करत आहे. यहोवाचं राजासन त्याच्या वर आहे.