व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १६

मृत्यूबद्दलच्या सत्याचं समर्थन करा

मृत्यूबद्दलच्या सत्याचं समर्थन करा

“सत्याचा संदेश आणि खोटेपणाचा संदेश यांतला फरक आपण ओळखू शकतो.”​—१ योहा. ४:६.

गीत ३३ वैऱ्‍यांना भिऊ नको!

सारांश *

देवाला नापसंत असलेल्या रितीरिवाजात भाग घेण्याऐवजी शोक करत असलेल्या नातेवाइकाचं सांत्वन करा (परिच्छेद १-२ पाहा) *

१-२. (क) सैतानाने लोकांना कशा प्रकारे फसवलं आहे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

“खोटेपणाचा बाप” म्हणजे सैतान याने आदाम आणि हव्वाच्या काळापासूनच लोकांना फसवलं आहे. (योहा. ८:४४) त्याने अनेक खोट्या शिकवणी पसरवल्या आहेत. त्यांपैकी काही म्हणजे मृत्यूबद्दल आणि मृत्यूनंतरच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या खोट्या शिकवणी. आणि या शिकवणींवर अनेक प्रचलित प्रथा आणि अंधविश्‍वास आधारलेले आहेत. कुटुंबात किंवा समाजात एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपल्या बऱ्‍याचशा बंधुभगिनींना त्यांच्या ‘विश्‍वासाचे रक्षण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा’ लागला आहे.​—यहू. ३.

आपल्यासमोर जर अशी परीक्षा आली, तर बायबल मृत्यूबद्दल जे शिकवतं त्यानुसार तटस्थ भूमिका घेण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? (इफिस. ६:११) बंधुभगिनींवर देवाला न आवडणाऱ्‍या प्रथांमध्ये भाग घेण्याचा दबाव आल्यावर आपण त्यांना सांत्वन आणि बळ कसं देऊ शकतो? या लेखात आपण यहोवाने दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल चर्चा करणार आहोत. सर्वातआधी आपण बायबल मृत्यूबद्दल काय म्हणतं हे पाहू या.

मृत जणांच्या अवस्थेबद्दल सत्य

३. पहिलं खोटं बोलण्यात आलं तेव्हा त्याचा काय परिणाम झाला?

मानवांनी मरावं अशी देवाची इच्छा नव्हती. कायमस्वरूपी जगण्यासाठी आदाम आणि हव्वाने यहोवाची आज्ञा पाळणं गरजेचं होतं. त्याने दोघांना खूप सोपी आज्ञा दिली होती. त्याने म्हटलं होतं: “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्प. २:१६, १७) मग सैतानाने समस्या निर्माण केली. त्याने सर्पाद्वारे हव्वाला म्हटलं: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” दुःखाची गोष्ट म्हणजे सैतानाने सांगितलेल्या खोट्या गोष्टीवर तिने विश्‍वास ठेवला आणि फळ खाल्लं. मग तिच्या पतीनेही ते फळ खाल्लं. (उत्प. ३:४, ६) या प्रकारे, पाप आणि मृत्यू सर्व मानवांमध्ये पसरला.​—रोम. ५:१२.

४-५. सैतान आजही मानवांना कसं फसवत आहे?

देवाने सांगितल्याप्रमाणे आदाम आणि हव्वा यांचा मृत्यू झाला. पण सैतान एवढ्यावरच थांबला का? त्याने त्यानंतर मृत्यूबद्दल आणखी खोट्या गोष्टी पसरवल्या. त्यांपैकी एक खोटं म्हणजे, एखाद्याचा मृत्यू झाला की त्याचं शरीर नष्ट होतं पण आत्मा जिवंत राहतो. यांसारख्या खोट्या शिकवणींमुळे पुष्कळ लोकांची दिशाभूल झाली आहे.​—१ तीम. ४:१.

मृत्यूबद्दल सैतान पसरवत असलेल्या खोट्या शिकवणींवर अनेक लोक का विश्‍वास ठेवतात? कारण मृत्यूबद्दल लोकांच्या काय भावना आहेत हे सैतान जाणतो आणि त्याचाच तो फायदा उचलतो. आपल्याला सर्वकाळ जगता यावं अशी आपली रचना करण्यात आली होती आणि आपल्यापैकी कोणालाच मरण नको असतं. (उप. ३:११) आपण मृत्यूला आपला शत्रू समजतो.​—१ करिंथ. १५:२६.

६-७. (क) मृत्यूबद्दल असलेलं सत्य सैतान लपवू शकला का? स्पष्ट करा. (ख) बायबलमध्ये दिलेलं सत्य आपल्याला भीती बाळगण्यापासून दूर राहायला कशी मदत करतं?

सैतानाने कितीही हातपाय मारले तरी मृत्यूबद्दलचं सत्य काही लपलेलं नाही. खरंतर, कधी नव्हे इतक्या लोकांना आज बायबलमध्ये दिलेल्या मृत जणांच्या स्थितीबद्दल आणि त्यांच्यासाठी असलेल्या आशेबद्दल माहीत झालं आहे. आणि ते याबद्दल इतरांना सांगतही आहेत. (उप. ९:५, १०; प्रे. कार्ये २४:१५) या खऱ्‍या शिकवणींमुळे आपल्याला सांत्वन मिळतं आणि नको त्या भीतींपासून आणि शंकांपासून दूर राहायला मदत होते. उदाहरणार्थ, आपल्याला मेलेल्या लोकांची किंवा त्यांना काहीतरी सोसावं लागत असेल अशी भीती वाटत नाही. ते जिवंत नाहीत आणि ते कोणालाही इजा करू शकत नाहीत ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्यांची स्थिती एखाद्या गाढ झोपेत असलेल्या व्यक्‍तीसारखीच असते. (योहा. ११:११-१४) तसंच, वर्षं सरत चालली आहेत याचीही त्यांना काहीच जाणीव नाही हेही आपल्याला माहीत आहे. म्हणूनच मृत जणांना जेव्हा पुन्हा जिवंत केलं जाईल, तेव्हा ते खूप शतकांआधी जरी मरण पावले असतील तरी त्यांना वाटेल की फक्‍त काही क्षणच सरले आहेत.

मृत जणांच्या स्थितीबद्दल असलेलं सत्य हे अगदी साधं, सोपं आणि तर्कशुद्ध आहे. पण याउलट सैतानाचं खोटं किती किचकट आहे! यामुळे लोकांची दिशाभूल तर झालीच आहे पण त्यासोबतच आपल्या निर्माणकर्त्याच्या नावावर कलंकदेखील लागला आहे. सैतानाने जे नुकसान केलं आहे हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी आता आपण तीन प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. सैतान पसरवत असलेल्या खोट्या शिकवणीमुळे यहोवाच्या नावावर कलंक कसा लागला आहे? या खोट्या शिकवणीमुळे ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याची गरज नाही असा विचार सैतानाने अनेकांना करायला कसा लावला आहे? या खोट्या शिकवणीमुळे मानवांच्या दुःख-त्रासात आणखी भर कशी पडली आहे?

सैतानाच्या खोट्या शिकवणींमुळे झालेलं नुकसान

८. यिर्मया १९:५ या वचनानुसार सैतानाच्या खोट्या शिकवणीमुळे यहोवाच्या नावावर कलंक कसा लागला आहे?

सैतानाच्या खोट्या शिकवणीमुळे यहोवाच्या नावावर कलंक लागला आहे. मृत जणांचा अग्नीत छळ होतो हेदेखील खोट्या शिकवणींपैकी एक आहे. यामुळे देवाचा अनादर होतो. तो कसा? देव प्रेम आहे आणि अशा खोट्या शिकवणीमुळे त्याचं व्यक्‍तिमत्त्व सैतानासारखं क्रूर आहे असं भासवलं जातं. (१ योहा. ४:८) हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं? आणि विचार करा यहोवाला कसं वाटत असेल? त्याला नक्कीच वाईट वाटत असेल, कारण तो सर्व प्रकारच्या क्रूरपणाचा द्वेष करतो.​—यिर्मया १९:५ वाचा.

९. योहान ३:१६; १५:१३ या वचनांत सांगितल्याप्रमाणे मृत्यूबद्दल असलेल्या खोट्या शिकवणीमुळे येशूच्या बलिदानावरच्या विश्‍वासावर कसा परिणाम होतो?

मृत्यूबद्दल असलेल्या खोट्या शिकवणींमुळे येशूच्या खंडणी बलिदानावरचा विश्‍वास कमी होतो. (मत्त. २०:२८) मानवांमध्ये अमर आत्मा नावाचा प्रकार आहे हे सैतान पसरवत असलेली आणखी एक खोटी गोष्ट आहे. जर हे खरं असतं, तर सर्व जण नेहमीसाठी जगले असते. आणि आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी ख्रिस्ताला त्याचं जीवन खंडणी म्हणून देण्याची गरजच पडली नसती. ख्रिस्ताने दिलेलं बलिदान हे त्याने मानवी कुटुंबासाठी दाखवलेल्या प्रेमाचा उत्कृष्ठ पुरावा आहे. (योहान ३:१६; १५:१३ वाचा.) जरा विचार करा, अशा शिकवणींमुळे जेव्हा खंडणीच्या मौल्यवान भेटीला कमी लेखलं जातं, तेव्हा यहोवाला आणि येशूला कसं वाटत असेल.

१०. सैतान मृत्यूबद्दल सांगत असलेल्या खोट्या गोष्टींमुळे मानवांच्या दुःख-त्रासात आणखी भर कशी पडली आहे?

१० सैतानाच्या खोट्या शिकवणींमुळे दुःख-त्रासात आणखी भर पडते. ज्या पालकांनी आपल्या मुलांना मृत्यूत गमावलं आहे त्यांना सांगितलं जातं, की देवाने तुमच्या मुलांना स्वर्गात राहायला बोलवलं आहे आणि ते देवदूत झाले आहेत. विचार करा, सैतानाच्या या खोट्या शिकवणीमुळे त्यांचं दुःख कमी होत असेल की आणखी वाढत असेल? तसंच, नरकाग्नीच्या शिकवणीचा आधार घेऊन क्रूरपणे छळ करण्यालाही योग्य ठरवण्यात आलं आहे. पूर्वी चर्चच्या शिकवणींचा विरोध करणाऱ्‍यांना स्तंभावर लटकवून जाळण्यात यायचं. “द स्पॅनीश इन्क्वीसीशन” यावर असलेल्या एका पुस्तकानुसार, खूप वर्षांआधी द स्पॅनीश इन्क्वीसीशन या न्यायालयाने कॅथलीक चर्चच्या विरोधात असलेल्यांचा खूप निष्ठुरपणे छळ केला. ज्या लोकांनी चर्चच्या शिकवणी स्वीकारल्या नाहीत अशांना या न्यायालयाच्या काही न्यायाधीशांनी जिवंतच जाळलं. त्यांच्या मते, लोकांनी आपल्या मृत्यूआधी पश्‍चात्ताप करणं गरजेचं आहे नाहीतर त्यांना कायमस्वरूपी नरकाग्नीत जळत राहावं लागेल. आजही बऱ्‍याचशा देशात लोकांकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी पूर्वजांची उपासना करावी. पूर्वजांकडून आशीर्वाद मिळवण्याच्या किंवा त्यांचा आदर करण्याच्या हेतूने ते असं करतात. इतर काही लोक मानतात की पूर्वजांना शांती मिळाली तर ते जिवंत लोकांना शिक्षा करणार नाहीत. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे सैतानाच्या खोट्या शिकवणीवर आधारलेल्या या गोष्टींमुळे खरं सांत्वन मिळत नाही. याउलट, विनाकारण नैराश्‍य येतं आणि इतकंच काय तर भीतीची भावनाही मनावर पगडा धरून बसते.

आपण बायबल सत्याचं समर्थन कसं करू शकतो?

११. चांगला हेतू बाळगणारे नातेवाईक आणि मित्र आपल्याला देवाच्या वचनाविरुद्ध जायला कसं प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतील?

११ आपले नातेवाईक किंवा मित्र आपल्यावर बायबलच्या विरोधात असलेल्या मृत्यूशी संबंधित प्रथांमध्ये भाग घेण्याचा दबाव टाकतील. पण अशा प्रसंगाचा सामना करण्यासाठी यहोवा आणि त्याच्या वचनावर असलेलं आपलं प्रेम आपल्याला त्याची आज्ञा मानण्यासाठी बळ देईल. आपल्याला स्वतःविषयी लाज वाटावी म्हणून ते म्हणतील की तुम्हाला मृत व्यक्‍तीबद्दल आपुलकी आणि आदर नाही. आपल्या अशा वागण्यामुळे मृत व्यक्‍ती कोणत्या न्‌ कोणत्या प्रकारे त्यांना त्रास देईल असंही कदाचित ते म्हणतील. मग अशा प्रसंगी आपण बायबल सत्याचं समर्थन कसं करू शकतो? पुढे दिलेली बायबल तत्त्वं आपण कशी लागू करू शकतो यावर आता चर्चा करू या.

१२. मृत लोकांबद्दल कोणत्या प्रथा बायबलवर आधारलेल्या नाहीत?

१२ बायबलवर आधारित नसलेले विश्‍वास आणि प्रथा यांपासून स्वतःला “वेगळे” ठेवण्याचा पक्का निर्धार करा. (२ करिंथ. ६:१७) कॅरिबियन देशात पुष्कळ लोक मानतात, की मृत्यूनंतर त्या व्यक्‍तीचा “आत्मा” तिथेच राहतो आणि जिवंत असताना ज्या लोकांनी त्या व्यक्‍तीला छळलं असेल त्यांना तो शिक्षा करतो. एका संदर्भानुसार तो “‘आत्मा’ पूर्ण समाजावरही संकट आणू शकतो.” तसंच, आफ्रिकामध्ये एका ठिकाणी असलेल्या प्रथेनुसार, जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या घरचे आरसे झाकण्यात येतात आणि भिंतीवर त्या मृत व्यक्‍तीचा फोटो असेल तर तोदेखील भिंतीकडे फिरवण्यात येतो. यामागचं कारण म्हणजे काही लोक मानतात की त्या मृत व्यक्‍तीने स्वतःला पाहू नये. यहोवाचे सेवक या नात्याने आपण अशा काल्पनिक गोष्टींवर विश्‍वास ठेवणार नाही किंवा सैतान बढावा देत असलेल्या प्रथांमध्ये मुळीच भाग घेणार नाही!​—१ करिंथ. १०:२१, २२.

खोलवर बायबल आधारित संशोधन केल्यामुळे आणि सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांसोबत चांगल्या संभाषणामुळे आपल्याला समस्या टाळायला मदत होऊ शकते (परिच्छेद १३-१४ पाहा) *

१३. याकोब १:५ या वचनात सांगितल्याप्रमाणे एखाद्या प्रथेत आपण भाग घेऊ शकतो का याबद्दल शंका वाटत असल्यास आपण काय केलं पाहिजे?

१३ एखाद्या प्रथेत किंवा रितीरिवाजात आपण भाग घेऊ शकतो का याबद्दल आपल्याला शंका वाटत असेल, तर आपण बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (याकोब १:५ वाचा.) त्यानंतर, आपण आपल्या साहित्यात संशोधन केलं पाहिजे आणि गरज वाटल्यास मंडळीतल्या वडिलांचा सल्लाही घेतला पाहिजे. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे हे ते आपल्याला सांगणार नाहीत, पण योग्य ती बायबल तत्त्वं आपल्याला दाखवतील. या लेखात काही तत्त्वांवर चर्चा करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी केल्याने आपण आपल्या ‘समजशक्‍तीला’ प्रशिक्षण देत असतो आणि या समजशक्‍तीमुळे आपल्याला “चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी” मदत होते.​—इब्री ५:१४.

१४. लोकांना अडखळण बनण्याचं आपण कसं टाळू शकतो?

१४ “सर्व देवाच्या गौरवासाठी करा. . . अडखळण बनू नका.” (१ करिंथ. १०:३१, ३२) एखाद्या प्रथेत किंवा रितीरिवाजात भाग घेण्याआधी आपण हादेखील विचार करणं गरजेचं आहे, की आपल्या निर्णयाचा इतरांवर आणि खासकरून सहविश्‍वासू बांधवांवर कसा प्रभाव पडेल. आपण कोणासाठीच अडखळण बनू नये! (मार्क ९:४२) तसंच, आपण साक्षीदार नसलेल्याचंही मन विनाकारण दुखवणार नाही. तर प्रेमामुळे प्रेरित होऊन आपण त्यांच्याशी आदाराने बोलू आणि यामुळे देवाचा गौरव होईल. आपण लोकांशी वाद घालणार नाही किंवा त्यांच्या प्रथांना नावं ठेवणार नाही. प्रेमात खूप बळ आहे हे नेहमी लक्षात असू द्या! आपण जेव्हा विचारपूर्वक आणि आदरपूर्वक वागतो तेव्हा आपल्या विरोधकांचा राग नाहीसा होण्याचीही शक्यता असते.

१५-१६. (क) तुमच्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगणं का सुज्ञपणाचं आहे? एक उदाहरण द्या. (ख) रोमकर १:१६ मध्ये दिलेले पौलचे शब्द आपल्यावर कसे लागू होतात?

१५ तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात हे आपल्या नातेवाइकांना आणि शेजाऱ्‍यांना सांगा. (यश. ४३:१०) तुमच्या कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यावर तुम्ही विशिष्ट रितीरिवाजात भाग घेत नाही म्हणून तुमचे नातेवाईक आणि शेजारी कदाचित खूप चिडतील. पण तुम्ही यहोवाचे उपासक आहात हे जर तुम्ही त्यांना आधीच सांगितलं असेल तर अशी नाजूक परिस्थिती उद्‌भवल्यास ती हाताळणं सोपं जाईल. मोझंबिकमध्ये राहणारे फ्रांसीसको म्हणतात: “मला आणि माझ्या पत्नीला सत्य मिळालं, तेव्हा मृत जणांची आम्ही पूजा करणार नाही असं आम्ही आमच्या नातेवाइकांना सांगितलं. मग माझी पत्नी कॅरोलीना हिच्या बहिणीचा मृत्यू झाला तेव्हा आमच्यावर परीक्षा आली. स्थानिक प्रथेनुसार मृत व्यक्‍तीला रितीरिवानुसार आंघोळ घालण्यात येते. मग अंघोळीचं पाणी जिथे ओतण्यात येतं त्या जागी मृत व्यक्‍तीच्या जवळच्या नातेवाइकाने तिथे तीन रात्री झोपलं पाहिजे. असं केल्यामुळे म्हणतात की मृत व्यक्‍तीच्या आत्म्याला शांती मिळते. कॅरोलीनाच्या नातेवाइकांची अपेक्षा होती की तिने त्या जागी झोपावं.”

१६ मग फ्रांसीसको आणि कॅरोलीना यांनी काय केलं? फ्रांसीसको म्हणतात: “आमचं यहोवावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्याचं मन आनंदित करायचं होतं. म्हणून आम्ही अशा प्रथेत भाग घेण्याचं नाकारलं. कॅरोलीनाच्या घरच्या लोकांना खूप राग आला. आम्ही मृत बहिणीचा अनादर करत आहोत आणि यापुढे ते आमच्याकडे येणार नाहीत किंवा आम्हाला मदत करणार नाहीत असं ते म्हणाले. आम्ही आमच्या विश्‍वासाबद्दल आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते रागात असताना आम्ही त्यांच्यासोबत यावर चर्चा केली नाही. पण काही नातेवाइकांनी आमची बाजू घेतली. ते म्हणाले की आम्ही आधीच आपल्या विश्‍वासाबद्दल स्पष्टपणे सांगितलं होतं. मग कालांतराने कॅरोलीनाचे नातेवाईक शांत झाले आणि आमच्यात भांडण राहिलं नाही. इतकंच काय तर काहींनी आमच्या घरी येऊन बायबल साहित्यंही मागितली.” यावरून आपल्याला समजतं, की मृत्यूबद्दल जे सत्य आहे त्याचं समर्थन करण्याची आपल्याला कधीच लाज वाटू नये आणि आपण खंबीरपणे आपल्या विश्‍वासाबद्दल सांगितलं पाहिजे.​—रोमकर १:१६ वाचा.

शोक करणाऱ्‍यांना सांत्वन आणि साहाय्य

शोक करणाऱ्‍यांना खरे मित्र सांत्वन देतात आणि त्यांना साहाय्य करतात (परिच्छेद १७-१९ पाहा) *

१७. शोक करत असलेल्या आपल्या बंधुभगिनींना आपण खऱ्‍या मित्रासारखं कसं मदत करू शकतो?

१७ आपल्या बंधुभगिनींच्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा आपण खरे मित्र बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. आपण बायबलमध्ये दिलेल्या मित्रासारखं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात म्हटलं आहे: “विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीति. १७:१७) बायबलच्या विरोधात असलेल्या प्रथेत भाग घेण्याचा दबाव एखाद्या बांधवावर किंवा बहिणीवर टाकला जात असेल तेव्हा खासकरून आपण एक ‘खरा मित्र’ कसा बनू शकतो? आता आपण बायबलमध्ये दिलेल्या अशा दोन तत्त्वांचं परीक्षण करू या, ज्यामुळे आपण शोक करणाऱ्‍याला सांत्वन देऊ शकतो.

१८. येशूला का रडला आणि आपण त्याच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

१८ “रडणाऱ्‍यांसोबत रडा.” (रोम. १२:१५) शोक करत असलेल्या लोकांना बरं वाटावं यासाठी आपण त्यांच्याशी काय बोलावं हे आपल्याला कदाचित सुचत नसेल. कधीकधी आपले अश्रू शब्दांपेक्षा जास्त बोलके असतात. येशूच्या मित्राचा, लाजरचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मरीया, मार्था आणि इतर जण आपल्या भावासाठी आणि मित्रासाठी रडले. चार दिवसानंतर जेव्हा येशू तिथे आला तेव्हा तो लाजरला पुन्हा जिवंत करणार हे माहीत असूनही तो “रडू लागला.” (योहा. ११:१७, ३३-३५) लाजरचा मृत्यू झाला तेव्हा यहोवाला कसं वाटलं असेल हे येशूच्या अश्रूंवरून स्पष्टपणे कळलं. तसंच, यावरून येशूचं या कुटुंबावर असलेलं प्रेमदेखील दिसून आलं. यामुळे मरीया आणि मार्था यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. त्याच प्रकारे, आपण आपल्या बंधुभगिनींना प्रेम आणि काळजी दाखवतो तेव्हा त्यांनाही आपल्या प्रेमाचा अनुभव होतो. त्यांना जाणीव होते की ते एकटे नाहीत आणि त्यांची काळजी घेणारे प्रेमळ मित्र त्यांच्यासोबत आहेत.

१९. शोक करणाऱ्‍या सहविश्‍वासू व्यक्‍तीचं सांत्वन करताना आपण उपदेशक ३:७ या वचनात दिलेलं तत्त्व कसं लागू करू शकतो?

१९ “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उप. ३:७) शोक करणाऱ्‍या आपल्या बंधुभगिनींना सांत्वन देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यांचं लक्षपूर्वक ऐकणं. आपला एखादा बांधव आपलं मन मोकळं करत असेल, तेव्हा त्याचं ऐका आणि जरी तो “मर्यादेबाहेर” म्हणजे अविचारीपणे बोलत असला तरी वाईट वाटून घेऊ नका. (ईयो. ६:२, ३) सत्यात नसलेल्या त्याच्या नातेवाइकांच्या दबावामुळे तो आणखीच खचला असेल आणि निराश झाला असेल. त्यामुळे त्याच्यासोबत प्रार्थना करा. त्याला बळ मिळावं आणि त्याला योग्य विचार करता यावा म्हणून ‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याकडे’ विनवणी करा. (स्तो. ६५:२) जर परिस्थिती अनुकूल असेल तर सोबत बायबल वाचा, नाहीतर आपल्या साहित्यांतून संबंधित लेख, जसं की एखादी जीवन कथा तुम्ही वाचू शकता.

२०. आपण पुढच्या लेखात काय चर्चा करणार आहोत?

२० आपण यहोवाचे खूप आभारी आहोत कारण त्याने आपल्याला मृत जणांबद्दल सत्य आणि भविष्यात त्यांच्यासाठी असलेल्या आशेबद्दल सांगितलं आहे. (योहा. ५:२८, २९) तेव्हा, आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून आपण बायबल सत्याचं धैर्याने समर्थन करू या आणि त्याबद्दल इतरांना सांगण्यासाठी प्रत्येक योग्य संधीचा उपयोग करू या. पुढच्या लेखात आपण पाहू की सैतानाने कसं आणखी एका मार्गाने लोकांना आध्यात्मिक रीत्या अंधकारात ठेवलं आहे. तो मार्ग म्हणजे भूतविद्या. तसंच, याच्याशी संबंधित असलेलं मनोरंजन आणि कार्यं आपण कशी टाळू शकतो हेही आपण पाहू या.

गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!

^ परि. 5 मृत लोकांच्या स्थितीबद्दल सैतान आणि दुरात्म्यांनी खोटं पसरवून लोकांना फसवलं आहे. या खोट्या गोष्टींमुळे अनेक अशास्त्रीय प्रथा सुरू झाल्या आहेत. अशा प्रथा किंवा रितीरिवाजांमध्ये भाग घेण्यासाठी इतर जण जेव्हा तुमच्यावर दबाव टाकतात तेव्हा यहोवाला विश्‍वासू राहायला तुम्हाला या लेखामुळे मदत होईल.

^ परि. 55 चित्राचं वर्णन: एका स्त्रीच्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर साक्षीदार असलेले तिचे कुटुंबातले सदस्य तिला सांत्वन देतात.

^ परि. 57 चित्राचं वर्णन: अंत्यविधीशी संबंधित असलेल्या प्रथांवर संशोधन केल्यावर एक साक्षीदार आपल्या नातेवाइकांना प्रेमळपणे आपल्या विश्‍वासाबद्दल समजवतो.

^ परि. 59 चित्राचं वर्णन: एका साक्षीदार बांधवाने आपल्या प्रिय जणाला गमावल्यावर मंडळीतले दोन वडील त्याचं सांत्वन करतात.