व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १८

जीवनाची शर्यत पूर्ण करा

जीवनाची शर्यत पूर्ण करा

“मी धाव पूर्ण केली आहे.”—२ तीम. ४:७.

गीत ५१ यहोवाला जडून राहू!

सारांश *

१. सर्व ख्रिश्‍चनांनी काय करणं गरजेचं आहे?

विचार करा, की तुम्ही आजारी किंवा थकलेले आहात. अशा वेळी एखाद्या अवघड शर्यतीत धावण्याची तुमची इच्छा असेल का? नक्कीच नाही. पण प्रेषित पौलने सांगितल्याप्रमाणे सर्व खरे ख्रिस्ती एका शर्यतीत धावत आहेत. (इब्री १२:१) आपण तरुण असो किंवा वयस्कर, आपलं आरोग्य चांगलं असो किंवा नसो, आपल्या सर्वांना धीराने धावून ही शर्यत पूर्ण करणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे यहोवाने आपल्यासाठी ठेवलेलं बक्षीस आपल्याला मिळवता येईल.—मत्त. २४:१३.

२. दुसरं तीमथ्य ४:७, ८ या वचनांत दिलेला सल्ला पौल का देऊ शकला?

पौलने स्वतः यशस्वीपणे ही “धाव पूर्ण केली.” म्हणूनच, तो धाव पूर्ण करण्याबद्दल आत्मविश्‍वासाने बोलू शकला. (२ तीमथ्य ४:७, ८ वाचा.) पण पौल नेमकं कोणत्या धावेबद्दल किंवा शर्यतीबद्दल बोलत होता?

ही शर्यत काय आहे?

३. पौल ज्या शर्यतीबद्दल बोलला ती नेमकी काय आहे?

प्रेषित पौल कधीकधी महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्यासाठी प्राचीन ग्रीसमध्ये होणाऱ्‍या खेळांचं उदाहरण द्यायचा. (१ करिंथ. ९:२५-२७; २ तीम. २:५) बऱ्‍याचदा त्याने ख्रिस्ती जीवनाची तुलना धावण्याच्या शर्यतीशी केली. (१ करिंथ. ९:२४; फिलिप्पै. २:१६) एखादी व्यक्‍ती आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेते तेव्हा ती या शर्यतीत धावायला सुरुवात करते. (१ पेत्र ३:२१) आणि जेव्हा यहोवा त्या व्यक्‍तीला सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस देईल, तेव्हा तिने या शर्यतीची अंतिम रेषा पार केली आहे असं म्हणता येईल.—मत्त. २५:३१-३४, ४६; २ तीम. ४:८.

४. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

लांब अंतराच्या शर्यतीत धावणं आणि ख्रिस्ती म्हणून जीवन जगणं यांत बऱ्‍याच गोष्टी सारख्या आहेत. त्यांपैकी तीन गोष्टींबद्दल आपण चर्चा करू या. पहिली गोष्ट म्हणजे, आपण योग्य मार्गावर धावलं पाहिजे; दुसरी म्हणजे, आपण अंतिम रेषा सतत डोळ्यांपुढे ठेवली पाहिजे; आणि तिसरी म्हणजे, आपण धावताना येणाऱ्‍या बऱ्‍याच आव्हानांचा सामना केला पाहिजे.

योग्य मार्गावर धावा

आपण सर्वांनीच ख्रिस्ताने दाखवलेल्या जीवनाच्या मार्गावर धावत राहिलं पाहिजे (परिच्छेद ५-७ पाहा) *

५. आपण कोणत्या मार्गावर धावलं पाहिजे आणि का?

खरोखरच्या शर्यतीत बक्षीस मिळवण्यासाठी, शर्यतीच्या आयोजकांनी ठरवलेल्या मार्गावर धावकांना धावावं लागतं. तसंच, सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस मिळवायचं असेल, तर आपण ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावर धावलं पाहिजे किंवा ख्रिस्ती जीवनशैलीप्रमाणे जगलं पाहिजे. (प्रे. कार्ये २०:२४; १ पेत्र २:२१) पण, आपण ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावर धावू नये अशी सैतानाची आणि त्याचं अनुकरण करणाऱ्‍यांची इच्छा आहे. त्यांना वाटतं, की आपण त्यांच्यासोबत आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीप्रमाणे जगावं. (१ पेत्र ४:४) आपण ज्या प्रकारे जीवन जगतो, त्याची ते टिंगल करतात. तसंच, ते ज्या मार्गावर चालत आहेत तोच जास्त चांगला आहे आणि त्यावर चालल्याने स्वातंत्र्य मिळतं असं ते म्हणतात. पण हे साफ खोटं आहे!—२ पेत्र २:१९.

६. ब्रायनच्या उदाहरणावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

जे सैतानाच्या जगात असलेल्या लोकांप्रमाणे जगतात, त्यांना लवकरच दिसून येतं की त्यांनी निवडलेल्या मार्गामुळे स्वातंत्र्य मिळत नाही; उलट, ते सैतानाच्या आणि स्वतःच्या इच्छांचे गुलाम बनतात. (रोम. ६:१६) ब्रायन नावाच्या एका बांधवाच्या उदाहरणावर विचार करा. त्याच्या आईवडिलांनी त्याला ख्रिस्ती मार्गावर चालायला शिकवलं. पण किशोरवयात आल्यावर, त्याला शंका वाटू लागली की ‘ख्रिस्ती म्हणून जगल्यामुळे मला खरंच आनंद मिळेल का?’ म्हणून त्याने सैतानाच्या स्तरांप्रमाणे जगणाऱ्‍या लोकांसारखंच जीवन जगायचा निर्णय घेतला. तो सांगतो, “मला हव्या असलेल्या स्वातंत्र्याच्या मागे लागून मी वाईट गोष्टींच्या आहारी जाईन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पुढे मी ड्रग्स घेऊ लागलो, दारू पिऊ लागलो आणि अनैतिक कामं करू लागलो. पुढच्या बऱ्‍याच वर्षांपर्यंत मी जास्त घातक ड्रग्स घेऊ लागलो आणि मला त्यांचं व्यसन लागलं. . . . माझे शौक पूर्ण करण्यासाठी मी ड्रग्स विकू लागलो.” शेवटी ब्रायनने यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगायचा निर्णय घेतला. त्याने जीवनाचा मार्ग बदलला आणि २००१ मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला. आज तो ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावर धावत आहे, याचं त्याला मनापासून समाधान वाटतं. *

७. मत्तय ७:१३, १४ यात सांगितल्याप्रमाणे आपल्यासमोर कोणते दोन रस्ते आहेत?

खरंच, जीवनात योग्य मार्ग निवडणं खूप महत्त्वाचं आहे! पण सैतानाची इच्छा आहे, की आपण सर्वांनी “जीवनाकडे” नेणाऱ्‍या अडचणीच्या रस्त्यावर धावायचं सोडून द्यावं. आज जगातल्या बहुतेक लोकांप्रमाणे आपणही पसरट रस्त्यावर जावं असं त्याला वाटतं. या रस्त्यावर बरेच लोक आहेत आणि त्यावर चालणं सोपं आहे. पण शेवटी तो “नाशाकडे” नेतो. (मत्तय ७:१३, १४ वाचा.) म्हणून, योग्य मार्गावरून न भरकटता त्यावर धावत राहण्यासाठी आपण यहोवावर भरवसा ठेवून त्याचं ऐकलं पाहिजे.

धावताना विचलित होऊ नका

आपण ध्येयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि दुसऱ्‍यांना अडखळण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे (परिच्छेद ८-१२ पाहा) *

८. शर्यतीत धावणारा पडला तरी तो काय करतो?

लांब अंतराच्या शर्यतीत भाग घेणारे, अडखळून पडू नये म्हणून धावत असताना नेहमी समोर लक्ष ठेवतात. तरीसुद्धा, दुसऱ्‍या एखाद्या धावकाचा चुकून धक्का लागल्यामुळे किंवा खड्ड्यात पाय गेल्यामुळे ते पडू शकतात. पण असं झालं, तरी ते लगेच उठून पुन्हा धावू लागतात. कारण आपण कशामुळे पडलो याकडे लक्ष देण्याऐवजी, त्यांचं अंतिम रेषेकडे आणि बक्षिसाकडे लक्ष असतं.

९. आपण अडखळून पडलो तर आपण काय केलं पाहिजे?

जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपण बऱ्‍याच वेळा चुकीच्या गोष्टी बोलतो किंवा करतो. या चुकांमुळे आपण अडखळून पडू शकतो. किंवा आपल्यासोबत धावणाऱ्‍या इतरांच्या चुकांमुळे आपल्याला वाईट वाटू शकतं आणि यामुळे आपण अडखळू शकतो. असं होणं साहजिक आहे. आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत आणि आपण जीवनाकडे नेणाऱ्‍या अडचणीच्या रस्त्यावर धावत आहोत. त्यामुळे कधीकधी आपल्याला एकमेकांचा धक्का लागू शकतो. पौलनेही सांगितलं होतं की कधीकधी आपल्याला एकमेकांविरुद्ध “तक्रार” असू शकते. (कलस्सै. ३:१३) पण आपण कशामुळे अडखळलो यावर लक्ष देण्याऐवजी आपली नजर बक्षिसावर असली पाहिजे. जरी आपण खाली पडलो, तरी लगेच उठून पुन्हा धावायला सुरुवात केली पाहिजे. कारण जर आपण मनात राग धरून तिथेच बसून राहिलो, तर आपल्याला शर्यत पूर्ण करता येणार नाही आणि बक्षीसही मिळवता येणार नाही. शिवाय, जीवनाकडे नेणाऱ्‍या अडचणीच्या रस्त्यावर जे धावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीही आपण अडथळा बनू.

१०. दुसऱ्‍यांना आपल्यामुळे “अडखळण” होऊ नये म्हणून आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे?

१० आपल्यासोबत धावणाऱ्‍या भाऊबहिणींना आपल्यामुळे “अडखळण” होऊ नये म्हणून आपण आणखी एक गोष्ट करू शकतो. नेहमी आपल्याच इच्छेप्रमाणे झालं पाहिजे असा हट्ट धरण्याऐवजी, शक्य असेल तेव्हा आपण त्यांच्या आवडीनिवडींना मान दिला पाहिजे. (रोम. १४:१३, १९-२१; १ करिंथ. ८:९, १३) खरोखरच्या शर्यतीत धावणाऱ्‍यांमध्ये आणि आपल्यामध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. आपण असं का म्हणू शकतो? कारण त्या शर्यतीत धावणारे एकमेकांशी स्पर्धा करत असतात आणि सगळे जण फक्‍त स्वतःसाठी बक्षीस मिळवायचा प्रयत्न करत असतात. ते फक्‍त स्वतःचाच विचार करतात. त्यामुळे ते इतर धावकांना धक्का मारून पुढे जायचा प्रयत्न करतात. पण आपण मात्र आपल्या भाऊबहिणींशी स्पर्धा करत नाही. (गलती. ५:२६; ६:४) उलट, जास्तीत जास्त लोकांना आपल्यासोबत अंतिम रेषा पार करून जीवनाचं बक्षीस मिळवायला मदत करणं हे आपलं ध्येय आहे. म्हणून पौलने देवाच्या प्रेरणेने दिलेल्या सल्ल्याचं आपण पालन करायचा प्रयत्न करतो. त्याने म्हटलं, “फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पै. २:४.

११. धावक कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो आणि का?

११ शर्यतीत धावणारे समोर असलेल्या रस्त्याकडे लक्ष देण्यासोबतच अंतिम रेषाही सतत डोळ्यांपुढे ठेवतात. त्यांना ती खरोखर दिसत नसली, तरी आपण अंतिम रेषा पार केली आहे आणि आपल्याला बक्षीस मिळालं आहे अशी कल्पना ते करतात. बक्षीस नेहमी डोळ्यांपुढे ठेवल्यामुळे त्यांना उत्साहाने धावत राहणं शक्य होतं.

१२. यहोवाने आपल्याला कोणती प्रेमळ भेट देण्याचं आश्‍वासन दिलं आहे?

१२ आपली शर्यत पूर्ण केल्यावर आपल्याला एक बक्षीस नक्कीच मिळेल असं यहोवाने आश्‍वासन दिलं आहे. ते बक्षीस म्हणजे स्वर्गात किंवा पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन. ही यहोवाची एक प्रेमळ भेट आहे. बायबलच्या बऱ्‍याच वचनांतून आपल्याला त्या जीवनाची झलक मिळते. या वचनांमुळे आपण कल्पना करू शकतो, की तेव्हा आपलं जीवन किती सुंदर असेल. आपल्या आशेबद्दल नेहमी विचार करत राहिल्यामुळे आपल्याला धीराने धावत राहायला मदत होईल. आणि असं केल्यामुळे आपण कधीही कायमचं अडखळून पडणार नाही.

आव्हानं आली तरीही धावत राहा

आपल्याला समस्या असल्या तरीही आपण जीवनाच्या शर्यतीत धावत राहिलं पाहिजे (परिच्छेद १३-२० पाहा) *

१३. आपल्याकडे असं काय आहे जे खरोखरच्या शर्यतीत धावणाऱ्‍यांकडे नाही?

१३ खरोखरच्या शर्यतीत धावणाऱ्‍यांना थकवा आणि शारीरिक वेदना यांसारख्या आव्हानांवर मात करावी लागते. पण यासाठी त्यांना फक्‍त आपल्या प्रशिक्षणावर आणि ताकदीवर अवलंबून राहावं लागतं. खरंतर, त्या धावकांप्रमाणेच आपल्यालाही जीवनाच्या शर्यतीत धावण्यासाठी प्रशिक्षण मिळतं. पण आपल्याजवळ आणखीन एक अशी गोष्ट आहे जी त्यांच्याकडे नाही. ती म्हणजे, यहोवाकडून मिळणारं अमर्याद सामर्थ्य. आपण यहोवावर अवलंबून राहिलो, तर तो वचन देतो की तो आपल्याला प्रशिक्षणासोबतच ताकदही देईल!—१ पेत्र ५:१०.

१४. २ करिंथकर १२:९, १० ही वचनं आपल्याला आव्हानांचा सामना करायला कशी मदत करतात?

१४ पौललाही पुष्कळ आव्हानांचा सामना करावा लागला. जसं की, त्याला बऱ्‍याच वेळा अपमान आणि छळ सहन करावा लागला. यासोबतच, आपण कमजोर आहोत असं कधीकधी त्याला वाटायचं. शिवाय, त्याला अशा एका समस्येचा सामना करावा लागला, जिला त्याने ‘शरीरातला काटा’ म्हटलं. (२ करिंथ. १२:७) पण अशा प्रकारची आव्हानं आली, तेव्हा हार मानण्याऐवजी, ही यहोवावर अवलंबून राहण्याची संधी आहे असा त्याने विचार केला. (२ करिंथकर १२:९, १० वाचा.) अशी मनोवृत्ती ठेवल्यामुळे यहोवाने त्याला सगळ्या परीक्षांचा यशस्वीपणे सामना करायला मदत केली.

१५. आपण पौलचं अनुकरण केलं तर आपल्याला काय अनुभवता येईल?

१५ पौलप्रमाणेच आपल्यालाही आपल्या विश्‍वासामुळे अपमान किंवा छळ सहन करावा लागू शकतो. तसंच, आजारपण किंवा थकवा या समस्याही आपल्याला असू शकतात. पण यांपैकी कोणतीही समस्या आली, तरी पौलचं अनुकरण करून ही यहोवाची प्रेमळ मदत अनुभवण्याची एक संधी आहे असा आपण विचार करू.

१६. तुमचं आरोग्य चांगलं नसलं, तरी तुम्ही काय करू शकता?

१६ तुम्ही अंथरुणाला खिळले आहात का किंवा तुम्हाला व्हीलचेअर वापरावी लागते का? तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे का किंवा तुमची नजर कमजोर झाली आहे का? तुम्हाला या समस्या असतील, तर तुमच्या मनात प्रश्‍न येईल, की ‘मी तरुण आणि निरोगी धावकांसोबत धावू शकेन का?’ पण हिंमत हारू नका, तुम्ही नक्कीच धावू शकाल! आज कित्येक वयस्क आणि आजारी भाऊबहीण जीवनाकडे नेणाऱ्‍या मार्गावर धावत आहेत. पण ते स्वतःच्या बळावर असं करू शकत नाहीत. तर, ते यहोवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहतात; ते फोनवर ख्रिस्ती सभा ऐकतात किंवा सभांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहतात. तसंच ते डॉक्टर, नर्स किंवा नातेवाईक यांना आनंदाचा संदेश सांगून शिष्य बनवण्याच्या कामात सहभाग घेतात.

१७. ज्यांना शारीरिक समस्या आहेत त्यांच्याबद्दल यहोवाला काय वाटतं?

१७ तुमची इच्छा असूनही जर तुम्ही जास्त प्रमाणात यहोवाची सेवा करू शकत नसाल, तर निराश होऊ नका. तसंच, जीवनाची शर्यत तुम्हाला पूर्ण करता येणार नाही असाही विचार करू नका. कारण तुम्ही यहोवावर दाखवलेला विश्‍वास आणि आतापर्यंत केलेली त्याची सेवा तो कधीच विसरणार नाही. त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. खरंतर, आज तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज आहे, त्यामुळे तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. (स्तो. ९:१०) उलट तो तुमच्या अगदी जवळ राहील. बऱ्‍याच शारीरिक समस्या असलेली एक बहीण म्हणते: “मला एकापाठोपाठ एक शारीरिक समस्या येत असल्यामुळे, आजकाल मला साक्ष द्यायच्या फार कमी संधी मिळतात. पण मला माहीत आहे की मी जे थोडेफार प्रयत्न करते त्यांमुळे यहोवा खूश होतो आणि यहोवाला खूश केल्यामुळे मलाही आनंद होतो.” म्हणून, जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा कधीच असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. पौलच्या उदाहरणाचा विचार करा आणि त्याचे हे दिलासा देणारे शब्द आठवा: “दुर्बलता . . . आणि कठीण परिस्थिती यांना तोंड देताना मी आनंद मानतो. कारण जेव्हा मी दुर्बळ असतो, तेव्हाच सामर्थ्यशाली होतो.”—२ करिंथ. १२:१०.

१८. काही जणांना कोणत्या एका आव्हानाला तोंड द्यावं लागतं?

१८ जीवनाच्या शर्यतीत धावणाऱ्‍या काही जणांना एका वेगळ्याच आव्हानाला तोंड द्यावं लागतं. त्यांच्या जीवनात अशा काही समस्या आहेत, ज्या इतरांना दिसत नाहीत आणि कदाचित कोणी त्या समजूही शकणार नाही. उदाहरणार्थ, त्यांना नैराश्‍याचा किंवा तीव्र चिंतेचा सामना करावा लागत असेल. यहोवाच्या या सेवकांसमोर असलेलं आव्हान खासकरून कठीण का आहे? कारण समजा एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला किंवा तो व्हीलचेअरवर असेल, तर सगळ्यांना ते दिसून येतं आणि त्यांना त्याला मदत करावीशी वाटते. पण, ज्यांना भावनिक किंवा मानसिक समस्या असते, त्यांना होत असलेला त्रास कदाचित कोणाच्याही लक्षात येणार नाही. खरंतर, ज्याचा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला आहे, त्याच्याइतकाच त्यांनाही त्रास होत असतो. पण, त्यांचं दुखणं दिसून येत नसल्यामुळे लोक सहसा त्यांना सहानुभूती दाखवत नाहीत.

१९. मफीबोशेथच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१९ जर तुम्ही शारीरिक समस्यांचा सामना करत असाल आणि इतर जण तुमची परिस्थिती समजून घेत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल, तर मफीबोशेथच्या उदाहरणामुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकतं. (२ शमु. ४:४) तो अपंग होता आणि दावीद राजाने त्याच्याबद्दल चुकीचं मत बनवून त्याच्यावर अन्याय केला. यात खरंतर मफीबोशेथची काहीही चूक नव्हती. तरी त्याने चुकीचा विचार केला नाही; उलट, त्याच्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यांबद्दल त्याला कदर होती. आधी दावीद त्याच्याशी किती दयाळूपणे वागला होता, हे तो विसरला नाही. (२ शमु. ९:६-१०) त्यामुळे, जेव्हा दावीदने त्याच्यावर अन्याय केला तेव्हा त्याने परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करायचा प्रयत्न केला. दावीदच्या चुकीमुळे त्याने मनात राग बाळगला नाही आणि त्यासाठी यहोवाला दोष दिला नाही. यहोवाने नियुक्‍त केलेल्या राजाला पाठिंबा कसा देता येईल यावर त्याने लक्ष केंद्रित केलं. (२ शमु. १६:१-४; १९:२४-३०) मफीबोशेथच्या चांगल्या उदाहरणातून आपण शिकावं म्हणून यहोवाने त्याच्याबद्दल आपल्या वचनात लिहून ठेवलं.—रोम. १५:४.

२०. चिंतेमुळे काहींवर कसा परिणाम होऊ शकतो, पण ते कोणती खातरी बाळगू शकतात?

२० तीव्र चिंतेमुळे काही भाऊबहिणींना चारचौघांमध्ये असताना भीती आणि संकोच वाटतो. भरपूर लोकांमध्ये वावरणं त्यांना कठीण वाटू शकतं. पण तरीही ते मंडळीच्या सभांना, संमेलनांना आणि अधिवेशनांना जायचं सोडत नाहीत. तसंच, अनोळखी लोकांशी बोलणं त्यांना अवघड वाटतं, तरीही ते सेवाकार्यात इतरांशी बोलतात. तुम्हीही अशा परिस्थितीत असाल, तर धीर धरा. तुम्ही एकटे नाही. बऱ्‍याच भाऊबहिणींना अशा समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्ही मनापासून जे प्रयत्न करता त्यांमुळे यहोवाला आनंद होतो. तुम्ही हार मानली नाही यावरूनच कळतं, की त्याचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुम्हाला लागणारी ताकद तो देत आहे. * (फिलिप्पै. ४:६, ७; १ पेत्र ५:७) शारीरिक किंवा भावनिक समस्या असूनही तुम्ही यहोवाची सेवा करत असाल, तर तुम्ही खातरी बाळगू शकता की यहोवा तुमच्यावर नक्कीच खूश आहे.

२१. यहोवाच्या मदतीने आपण सर्व जण काय करू शकतो?

२१ खरोखरच्या आणि पौलने सांगितलेल्या शर्यतीत काही फरकसुद्धा आहेत. बायबलच्या काळात खरोखरच्या शर्यतीत फक्‍त एकाच व्यक्‍तीला बक्षीस मिळायचं. याउलट, ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावर विश्‍वासूपणे धावत राहणाऱ्‍या प्रत्येकाला सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस मिळेल. (योहा. ३:१६) तसंच, खरोखरच्या शर्यतीत प्रत्येक धावकाला सुदृढ असणं गरजेचं असतं. नाहीतर, तो जिंकू शकणार नाही. पण, आपल्या बाबतीत पाहिलं तर बऱ्‍याच जणांना शारीरिक समस्या आहेत. पण तरीही ते जीवनाच्या शर्यतीत धीराने धावत आहेत. (२ करिंथ. ४:१६) यहोवाच्या मदतीने आपण सर्व जण नक्कीच ही शर्यत पूर्ण करू!

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

^ परि. 5 आज यहोवाच्या सेवकांपैकी बऱ्‍याच जणांना वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच, आपण सर्वच कधीकधी पार थकून जातो. यामुळे, एखाद्या शर्यतीत धावण्याच्या विचारानेही कदाचित आपल्याला भीती वाटेल. पण पौलने सांगितलेल्या जीवनाच्या शर्यतीत आपण सर्व जण धीराने कसं धावू शकतो आणि ती कशी पूर्ण करू शकतो यावर आता आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

^ परि. 6 टेहळणी बुरूज जानेवारी १, २०१३ अंकातला “बायबलने बदललं जीवन” हा लेख पाहा.

^ परि. 20 चिंतेचा सामना कसा करावा याबद्दल व्यावहारिक सल्ले आणि या समस्येवर यशस्वीपणे मात केलेल्यांचे अनुभव jw.org® वर मे २०१९ च्या ब्रॉडकास्टिंग कार्यक्रमात पाहा. LIBRARY > JW BROADCASTING® इथे पाहा.

^ परि. 63 चित्रांचं वर्णन: सेवाकार्यात व्यस्त राहिल्यामुळे एका वयस्क बांधवाला ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावर टिकून राहणं शक्य होतं.

^ परि. 65 चित्रांचं वर्णन: आपण इतरांना जास्त मद्य पिण्याचा आग्रह केला किंवा स्वतः प्रमाणाबाहेर प्यायलो तर आपण त्यांच्यासाठी अडखळण ठरू शकतो.

^ परि. 67 चित्रांचं वर्णन: हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळलेले असतानाही एक बांधव साक्ष देण्याद्वारे जीवनाच्या शर्यतीत टिकून राहतात.