जीवन कथा
“आता मला प्रचार करायला खूप आवडतं!”
मी न्यूझीलंडच्या बालक्लुथा शहरात लहानाची मोठी झाले. लहानपणी यहोवावर माझं खूप प्रेम होतं आणि सत्यात असल्याचा मला अभिमान होता. मला सभांना जायला आणि भाऊबहिणींना भेटायला फार आवडायचं. मी थोडी लाजाळू स्वभावाची होते. पण तरी मी दर आठवड्याला प्रचाराला जायचे. शाळेतल्या मित्रमैत्रिणींना आणि इतरांना प्रचार करायला मी घाबरत नव्हते. यहोवाची साक्षीदार असणं ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट होती. आणि म्हणून वयाच्या ११ व्या वर्षी मी यहोवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला.
माझा आवेश कमी होऊ लागला
पण दुःखाची गोष्ट म्हणजे, मी मोठी होत गेले तसं यहोवावरचं माझं प्रेम कमी होऊ लागलं. तेव्हा मी जवळपास १३ वर्षांची होते. शाळेतल्या इतर मुलामुलींना पाहून वाटायचं, की त्यांना कोणतीही बंधनं नाहीएत. ते काहीही करू शकतात. मलाही त्यांच्यासारखंच जगायचं होतं. मला वाटत होतं, की मम्मी- पप्पांनी लावून दिलेल्या नियमांमुळे आणि ख्रिस्ती स्तरांमुळे मला काहीच करता येत नाही. त्यामुळे यहोवाची सेवा करणंसुद्धा मला अवघड वाटू लागलं. हे खरंय की यहोवाच्या अस्तित्वाबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नव्हती. पण मी हळूहळू त्याच्यापासून दूर जात होते.
मी प्रचाराला जायचं पूर्णपणे बंद केलं नाही. मी जायचे. पण तेसुद्धा नावापुरतं. घरमालकाशी कसं बोलायचं याची तयारी नसल्यामुळे मला चर्चा सुरू करायला आणि ती चालू ठेवायला खूप अवघड जायचं. त्यामुळे माझ्याकडे एकही पुनर्भेट किंवा बायबल अभ्यास नव्हता. हळूहळू प्रचारातला माझा आवेश कमी होऊ लागला आणि मला ते कंटाळवाणं वाटू लागलं. मी विचार करायचे, “दर आठवडी कोण जाणार प्रचाराला?”
मी १७ वर्षांची झाले तेव्हा स्वतंत्र जगण्याच्या इच्छेने माझ्या मनात घर केलं. त्यामुळे मी माझं सामानसुमान भरलं आणि ऑस्ट्रेलियाला राहायला गेले. मी घर सोडून जातेय हे पाहून
मम्मी-पप्पांना खूप वाईट वाटलं. त्यांना माझी चिंता वाटत होती. पण त्यांना असंही वाटत होतं, की तिथे मी यहोवाची सेवा करत राहीन.पण ऑस्ट्रेलियामध्ये झालं असं, की यहोवाच्या सेवेकडे माझं आणखीनच जास्त दुर्लक्ष होऊ लागलं. तिथे मी कधीकधीच सभांना जायचे. आणि मंडळीत माझ्यासारख्या तरुणांसोबतच मी मैत्री केली. ते सभांना तर यायचे, पण दुसऱ्या दिवशी नाईट-कल्बलासुद्धा जायचे. तिथे खाणं-पिणं, नाचणं या सगळ्या गोष्टी असायच्या. मी एकाच वेळी दोन नावांवर पाय ठेवले होते. एक पाय सत्यात, तर दुसरा जगात. त्यामुळे मी कुठेही खूश नव्हते.
मी एक महत्त्वाचा धडा शिकले
मग जवळजवळ दोन वर्षांनंतर माझ्या जीवनात एक वेगळं वळण आलं. झालं असं, की मी मंडीळतल्या पाच तरुण बहिणींसोबत राहत होते. एकदा आम्ही विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या बायकोला आमच्या घरी एका आठवड्यासाठी राहायला बोलवलं होतं. त्यांच्या बायकोचं नाव तमारा होतं. भाऊ मंडळीच्या कामात व्यस्त असायचे, तेव्हा तमारा आम्हा मुलींसोबत वेळ घालवाची. ती आमच्यासोबत गप्पा मारायची, मौजमजा करायची आणि मनमोकळेपणे हसायची. ते मला खूप आवडलं. ती खूप नम्र आणि मनमिळाऊ होती. कोणीही तिच्यासोबत बोलेल असा तिचा स्वभाव होता. मला हे पाहून खूप आश्चर्य वाटलं, की यहोवाच्या सेवेत इतकी व्यस्त असणारी व्यक्ती आनंदी राहू शकते. तिच्या नकळत तिने मला हा महत्त्वाचा धडा शिकवला.
तमारा यहोवाच्या सेवेत खूप उत्साही होती. प्रचारकार्यात ती खूप मेहनत घ्यायची. आणि त्यामुळे ती खूशपण होती. मी मात्र हे सगळं नावापुरतं करत होते. त्यामुळे मला हवा तसा आनंद मिळत नव्हता. पण तमाराचा उत्साह पाहून माझ्यातसुद्धा तो उत्साह निर्माण झाला. तिच्या चांगल्या उदाहरणामुळे मला बायबलमधली एक महत्त्वाची गोष्ट आठवली. ती म्हणजे, यहोवाची अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी “आनंदाने” आणि ‘जल्लोषाने’ त्याची सेवा करावी.—स्तो. १००:२.
प्रचारकार्याबद्दल पुन्हा आवेश निर्माण झाला
मला तमारासारखंच आनंदी राहायचं होतं. पण त्यासाठी मला बरेच मोठमोठे बदल करावे लागणार होते. थोडा वेळ लागला, पण मी हळूहळू ते बदल केले. मी तयारी करून प्रचाराला जाऊ लागले. अधूनमधून मी सहायक पायनियरिंग करायचे. त्यामुळे प्रचाराबद्दलची माझी भीती कमी झाली आणि मी धैर्याने बोलू लागले. प्रचारकार्यात जास्तीत जास्त
बायबल वापरल्यामुळे मला आनंद मिळू लागला. मग मी दर महिन्याला सहायक पायनियरिंग करू लागले.त्यामुळे मी मंडळीत लहान-मोठ्या अशा सगळ्यांशी मैत्री करू शकले. हे भाऊबहीण यहोवाच्या सेवेत खूप मेहनत घेत होते आणि आनंदी होते. त्यांच्याकडून मी शिकले, की मी माझ्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व कोणत्या गोष्टींना दिलं पाहिजे. आणि हेसुद्धा शिकले, की मी रोज बायबल वाचलं पाहिजे. तेव्हापासून मला प्रचारात आणखी आनंद मिळू लागला. आणि शेवटी मी पायनियरिंग सुरू केली. इतक्या वर्षांनंतर मी पहिल्यांदा खरा आनंद अनुभवला. आणि मंडळीत मला आपलेपणा जाणवला.
मला एक कायमचा जोडीदार मिळाला
एका वर्षानंतर माझी भेट ऍलेक्स नावाच्या भावाशी झाली. ऍलेक्स खूप प्रेमळ आणि प्रामाणिक आहे. यहोवावर त्याचं प्रेम आहे आणि त्याला प्रचारकार्य खूप आवडतं. तो मंडळीत सहायक सेवक होता आणि सहा वर्षांपासून पायनियरींग करत होता. काही काळासाठी तो मलावीमध्येही गेला होता. कारण तिथे प्रचारकांची जास्त गरज होती. तिथे त्याने मिशनरी भाऊबहिणींसोबत सेवा केली. त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे यहोवाच्या सेवेला महत्त्वाचं स्थान द्यायचं प्रोत्साहन त्याला मिळालं.
२००३ मध्ये आमचं लग्न झालं. तेव्हापासून आम्ही दोघं पूर्ण-वेळच्या सेवेत आहोत. एकत्र मिळून सेवा करताना आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आणि यहोवाकडून अनेक आशीर्वादही मिळाले.
आणखी बरेच आशीर्वाद
२००९ मध्ये आम्हाला तिमोर-लेस्ते या ठिकाणी मिशनरी सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं. हा इंडोनेशियातल्या द्विपसमूहांमधला एक छोटा देश आहे. आम्हाला ही नेमणूक मिळाली तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. आम्ही खूश होतो. पण आम्हाला भीतीसुद्धा वाटत होती. याच्या पाच महिन्यांनंतर आम्ही तिथली राजधानी दिली इथे पोहचलो.
इथे आमच्यासाठी सगळंकाही नवीन होतं. इथली संसकृती, भाषा, जेवण, रहाणीमान सगळंच. या सगळ्याशी आम्हाला जुळवून घ्यावं लागलं. प्रचारात आम्हाला बरेच गरीब आणि कमी शिकलेले लोक भेटायचे. आणि काहींवर तर अत्याचारही *
झाले होते. बऱ्याच वर्षांआधी झालेल्या युद्धांमुळे आणि हिंसेमुळे त्यांना खूप दुःखं सोसावी लागली होती.पण इथे प्रचाराचं काम खूप छान होतं. मी असं का म्हणते, त्यासाठी मी एक अनुभव सांगते. एकदा मी मरिया * नावाच्या मुलीला भेटले. ती १३ वर्षांची होती. काही वर्षांआधी तिच्या आईचा मृत्यू झाला होता आणि तिच्या वडिलांसोबतसुद्धा तिची क्वचितच भेट व्हायची. तिच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे आपल्याला जीवनात पुढे काय करायचं आहे हेच तिला माहीत नव्हतं. मला आठवतं, एकदा ती माझ्याकडे आपलं मन मोकळं करत होती आणि बोलता-बोलता ती रडायलाच लागली. पण ती काय बोलत होती ते मला कळतंच नव्हतं. कारण मला तिची भाषा नीट येत नव्हती. मी लगेच यहोवाला प्रार्थना केली आणि तिला धीर देता यावा म्हणून मला मदत कर अशी विनंती केली. आणि मी तिला दिलासा देणारी काही वचनं वाचून दाखवली. काही वर्षांनंतर मी पाहिलं सत्यामुळेच मरियाच्या जीवनात बरेच बदल झाले. तिचं वागणं, तिचं राहणं, तिचं जीवन, सगळं बदललं. मग तिने बाप्तिस्मा घेतला. आज तीसुद्धा इतरांचा बायबल अभ्यास घेते. आता मरिया यहोवाच्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहे आणि तिथे सगळे तिच्यावर प्रेम करतात.
यहोवाच्या आशीर्वादांमुळे तिमोर-लेस्तेमध्ये चांगली प्रगती होत आहे. तिथले बरेच प्रचारक गेल्या दहाएक वर्षांतच सत्यात आले आहेत. पण त्यांच्यापैकी अनेक जण पायनियर, सहायक सेवक किंवा वडील म्हणून सेवा करत आहेत. तर काही जण आरटीओमध्ये सेवा करत आहेत. तिथे ते भाषांतराच्या कामात मदत करतात. त्यांना सभांमध्ये गाताना पाहून, त्यांचे हसरे चेहरे पाहून आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती पाहून खरंच मला खूप आनंद होतो.
असा आनंद आणखी कुठेच मिळणार नाही
तिमोर-लेस्तेमधलं आमचं जीवन ऑस्ट्रेलियासारखं आरामदायी नव्हतं. पण आम्हाला इथे जो आनंद मिळाला तो कुठेच मिळाला नसता. आम्हाला खचाखच भरलेल्या गाड्यांमधून प्रवास करावा लागायचा. त्यात सुक्या माशांची आणि भाज्यांची बोचकीही असायची. तिथलं वातावरण उष्ण आणि दमट असायचं. घरं लहान होती आणि त्यांना मातीच्या जमिनी असायच्या. कोंबड्या तर इथून तिथे फिरायच्या. अशा परिस्थितीत आम्हाला बायबल अभ्यास घ्यावा लागायचा. ते सगळं असूनसुद्धा सेवाकार्यात “आम्हाला खूप मजा यायची.”
पूर्वीच्या गोष्टी आठवते तेव्हा मला वाटतं मम्मी-पप्पांनी मला यहोवाबद्दल शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली. मी यहोवाच्या सेवेत थंडं पडले होते अगदी तेव्हासुद्धा त्यांनी माझी साथ सोडली नाही, तर मला आधार दिला. या सगळ्या गोष्टींसाठी मी त्यांचे खूप आभार मानते. नीतिवचनं २२:६ मध्ये सांगितलेली गोष्ट माझ्या बाबतीत खरी ठरली आहे. मी आणि ॲलेक्स यहोवाच्या सेवेत आहोत, हे पाहून मम्मी-पप्पांना खूप आनंद होतो. त्यांना आमचा अभिमान वाटतो. २०१६ पासून आम्ही ऑस्ट्रेलेशियाच्या शाखेच्या क्षेत्रात प्रवासी कार्य करत आहोत.
मला खरंच वाटत नाही, की एकेकाळी प्रचाराला जायचा मला कंटाळा यायचा. पण आता मला प्रचार करायला खूप आवडतं! मी हे अनुभवलंय, की जीवनात कितीही चढउतार आले, तरी खरा आनंद यहोवाची मनापासून सेवा केल्यामुळेच मिळतो. गेल्या १८ वर्षांपासून मी आणि ॲलेक्स यहोवाची सेवा करत आहोत. खरंच, ही वर्षं माझ्या जीवनातली सगळ्यात आनंदाची वर्षं होती. दावीदने यहोवाला जे म्हटलं ते किती खरंय ते आज मला समजतंय. त्याने म्हटलं: “तुझा आश्रय घेणारे सर्व आनंदी होतील; ते सतत जल्लोष करतील. . . . तुझ्या नावावर प्रेम करणारे तुझ्यामुळे हर्षित होतील.”—स्तो. ५:११.