व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १४

येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करा

येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करा

“[ख्रिस्ताने] दुःख सोसलं आणि असं करून त्याने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला. हे यासाठी, की तुम्ही त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करावं.”—१ पेत्र २:२१.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

सारांश *

आपल्याला येशूचं जवळून अनुकरण करता यावं म्हणून येशूने त्याच्या पावलांचे ठसे मागे सोडले आहेत (परिच्छेद १-२ पाहा)

१-२. १ पेत्र २:२१ हे वचन समजण्यासाठी कोणतं उदाहरण आपल्याला मदत करतं?

कल्पना करा, की तुम्ही एका गटासोबत अशा ठिकाणावरून जात आहात जे खूप धोकादायक आहे आणि बर्फाने झाकलेलं आहे. पण एक अनुभवी गाईड तुमच्यासोबत आहे. तो तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी पुढे चालत आहे आणि तुम्ही त्याच्या मागेमागे चालत आहात. मग तुमच्या लक्षात येतं, की तो खूप पुढे निघून गेला आहे आणि आता दिसेनासा झाला आहे. पण तुम्ही घाबरत नाही. कारण तो जरी दिसत नसला तरी त्याच्या पावलांचे ठसे तुम्हाला बर्फावर दिसतात. ते पाहूनच तुम्ही आणि तुमच्या सोबतचे लोक पुढे चालत राहता.

आज खरे ख्रिस्तीसुद्धा अशा दुष्ट जगात राहत आहेत जे खूप धोकादायक आहे. पण आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कारण यहोवाने आपल्याला सर्वात चांगला गाईड दिला आहे. तो म्हणजे येशू ख्रिस्त. आणि आपण त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करू शकतो. (१ पेत्र २:२१) बायबलची माहिती देणाऱ्‍या एका पुस्तकात असं म्हटलं आहे, की १ पेत्र २:२१ या वचनात पेत्रने येशूची तुलना एका गाईडशी केली आहे. एका गाईडप्रमाणे येशूनेसुद्धा एकाअर्थी त्याच्या पायांचे ठसे मागे सोडले आहेत. त्यामुळे त्याच्या पावलांचं आपण जवळून अनुकरण करू शकतो. चला आता आपण पुढे दिलेल्या तीन प्रश्‍नांवर चर्चा करू या. येशूच्या पावलांचं अनुकरण करणं म्हणजे काय? आपण हे का केलं पाहिजे आणि हे आपण कसं करू शकतो?

येशूच्या पावलांचं अनुकरण करणं म्हणजे काय?

३. एखाद्या व्यक्‍तीच्या पावलांचं अनुकरण करणं म्हणजे काय?

एखाद्या व्यक्‍तीच्या पावलांचं अनुकरण करण्याचा काय अर्थ होतो? एखादी व्यक्‍ती आपलं जीवन कसं जगते हे दाखवण्यासाठी काही वेळा बायबलमध्ये ‘चालंणं’ किंवा ‘पावलं’ हे शब्द वापरले आहेत. (उत्प. ६:९; नीति. ४:२६) आपण जेव्हा त्या व्यक्‍तीप्रमाणे जीवन जगतो तेव्हा आपण हेच दाखवतो, की आपण तिच्या पावलांचं अनुकरण करत आहोत.

४. येशूच्या पावलांचं अनुकरण करणं म्हणजे काय?

तर मग, येशूच्या पावलांचं अनुकरण करणं म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं झालं तर, येशूने जे केलं तेच आपणसुद्धा केलं पाहिजे. आपल्या लेखाच्या मुख्य वचनात प्रेषित पेत्र, खासकरून दुःख सोसण्याच्या बाबतीत येशूने जे चांगलं उदाहरण मांडलं त्याबद्दल सांगतो. पण याशिवाय येशूने अशा बऱ्‍याच गोष्टी केल्या, ज्यांचं आपण अनुकरण करू शकतो. (१ पेत्र २:१८-२५) खरंच, पृथ्वीवर असताना येशूने जे काही म्हटलं आणि केलं, त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं.

५. अपरिपूर्ण मानव येशूच्या पावलांचं जसंच्या तसं अनुकरण करू शकतात का? समजावून सांगा.

आपण तर अपरिपूर्ण आहोत, मग आपल्याला खरंच येशूच्या पावलांचं अनुकरण करता येईल का? हो नक्की करता येईल! कारण पेत्रने असं म्हटलं नाही, की येशूच्या पावलांचं जसंच्या तसं अनुकरण करा, तर त्याने म्हटलं, “[येशूच्या] पावलांचं जवळून अनुकरण” करा. आपण अपरिपूर्ण असूनही येशूच्या पावलांचं अनुकरण करण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला, तर आपण प्रेषित योहानच्या शब्दांचं पालन करत असू. त्याने म्हटलं, ‘जसा येशू चालला, तसंच आपणही चालावं.’—१ योहा. २:६, तळटीप.

येशूच्या पावलांचं अनुकरण का केलं पाहिजे?

६-७. आपण असं का म्हणू शकतो, की येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण केल्याने आपण यहोवाचे आणखी चांगले मित्र बनू?

येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण केल्यामुळे आपण यहोवाचे आणखी चांगले मित्र बनू.  असं आपण का म्हणू शकतो? याचं एक कारण म्हणजे, यहोवाचं मन आनंदी करण्यासाठी जीवन कसं जगायचं, हे येशूने स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं. (योहा. ८:२९) त्यामुळे आपण जर येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण केलं, तर आपल्याही यहोवाचं मन आनंदी करता येईल. जेव्हा आपण यहोवाशी जवळची मैत्री करण्याचा मनापासून प्रयत्न करतो, तेव्हा तोही आपल्या जवळ येईल अशी खातरी आपण बाळगू शकतो.—याको. ४:८.

दुसरं कारण म्हणजे, येशूने आपल्या पित्याचं हुबेहूब अनुकरण केलं. म्हणूनच तो असं म्हणू शकला, “ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.” (योहा. १४:९) त्यामुळे यहोवाचं अनुकरण करण्यासाठी आपण येशूचं अनुकरण केलं पाहिजे. एका कुष्ठरोग्याला पाहून येशूला त्याचा कळवळा आला. गंभीर आजार असलेल्या एका स्त्रीबद्दल त्याला खूप सहानुभूती वाटली. आणि ज्यांच्या जवळच्या माणसांचा मृत्यू झाला होता, त्यांच्याबद्दल त्याला खूप दया वाटली. येशूच्या या गुणांचं आणि तो ज्या प्रकारे इतरांशी वागला त्याचं आपण अनुकरण तेव्हा एकाअर्थी आपण यहोवाचंच अनुकरण करत असतो. (मार्क १:४०, ४१; ५:२५-३४; योहा. ११:३३-३५) आपण जितकं जास्त यहोवाच्या गुणांचं अनुकरण करू, तितकी जास्त यहोवासोबतची आपली मैत्री घट्ट होईल.

८. येशूच्या पावलांचं अनुकरण केल्यामुळे आपल्याला जगावर विजय कसा मिळवता येईल, हे समजावून सांगा.

येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण केल्यामुळे आपलं लक्ष नेहमी यहोवाच्या सेवेवर राहील; या दुष्ट जगामुळे ते भरकटणार नाही.  आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री येशूने म्हटलं: “मी जगाला जिंकलंय.” (योहा. १६:३३) येशूला नेमकं काय म्हणायचं होतं? हेच, की त्याने जगातल्या लोकांच्या विचारांचा, त्यांच्या ध्येयांचा आणि कामांचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. आपल्याला यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं आहे, ही गोष्ट तो कधीच विसरला नाही. आपल्या बाबतीत काय म्हणता येईल? या जगात अशा बऱ्‍याच गोष्टी आहेत, ज्यांमुळे आपलं लक्ष यहोवाच्या सेवेपासून भरकटू शकतं. येशूसारखंच, आपणसुद्धा आपलं सगळं लक्ष यहोवाची इच्छा पूर्ण करण्यावर लावलं, तर आपल्यालासुद्धा या जगावर “विजय” मिळवता येईल.—१ योहा. ५:५.

९. सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

येशूच्या पावलांचं अनुकरण केल्याने आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.  ‘सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे,’ असं एका तरूण माणसाने येशूला विचारलं. तेव्हा येशू त्याला म्हणाला: “ये, माझा शिष्य हो.” (मत्त. १९:१६-२१) येशू हाच ख्रिस्त आहे यावर काही यहुदी लोक विश्‍वास ठेवत नव्हते. त्यांना तो म्हणाला: “माझी मेढरं . . . माझ्यामागे चालतात. मी त्यांना सर्वकाळाचं जीवन देतो.” (योहा. १०:२४-२९) यहुदी उच्च न्यायालयाचा सदस्य, निकदेम याला येशूच्या शिकवणींबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा होती. त्याच्याशी बोलताना येशू म्हणाला: ‘जे माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल.’ (योहा. ३:१६) येशूने शिकवलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करण्याद्वारे आणि त्याचं अनुकरण करण्याद्वारे आपण त्याच्यावर विश्‍वास असल्याचं दाखवतो. आणि त्यामुळे आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.—मत्त. ७:१४.

आपण येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण कसं करू शकतो?

१०. येशूला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (योहान १७:३)

१० येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करण्याआधी त्याला ओळखणं गरजेचं आहे. (योहान १७:३ वाचा.) पण आपण एकदाच येशूबद्दलची माहिती घेऊन त्याला ओळखू शकत नाही. त्याला चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आपण सतत मेहनत घेतली पाहिजे. म्हणजेच आपण त्याचे गुण, त्याचे विचार आणि त्याचे स्तर यांबद्दल सतत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कितीही वर्षांपासून सत्यात असलो तरीही यहोवाला आणि येशूला ओळखण्याचा आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे.

११. शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांमध्ये कोणती माहिती दिली आहे?

११ येशूला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी यहोवाने शुभवर्तमानाची चार पुस्तकं बायबलमध्ये दिली आहेत. त्यांमध्ये येशूच्या जीवनाबद्दल आणि सेवाकार्याबद्दल माहिती दिली आहे. येशू काय बोलला, त्याने काय केलं आणि त्याला कसं वाटलं, या सगळ्या गोष्टी त्यांत सांगितल्या आहेत. शुभवर्तमानाची ही चार पुस्तकं येशूच्या उदाहरणाकडे बारकाईने लक्ष द्यायला आपल्याला मदत करतात. (इब्री १२:३) आपण जितका जास्त या पुस्तकांचा अभ्यास करू तितकं जास्त आपण येशूला ओळखू. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करता येईल.

१२. शुभवर्तमानाच्या पुस्तकांतून येशूला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१२ येशूला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी शुभवर्तमानाच्या पुस्तकांचं फक्‍त वाचन करणं पुरेसं नाही; तर त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणं आणि त्यांवर खोलवर मनन करणंही खूप महत्त्वाचं आहे. (यहोशवा १:८ तळटीप, पडताळून पाहा.) त्या पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीवर मनन कसं करता येईल, आणि ती माहिती लागू कशी करता येईल हे शिकण्यासाठी आता आपण दोन गोष्टी पाहू या.

१३. आपण शुभवर्तमानातल्या घटनांचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर कसं उभं करू शकतो?

१३ पहिली गोष्ट म्हणजे, शुभवर्तमानाच्या पुस्तकांमधल्या घटनांचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करा.  एखादा अहवाल वाचताना त्यातल्या घटना पाहण्याचा, ऐकण्याचा आणि तुम्ही तिथे असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं, याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्या संघटनेच्या प्रकाशनांमध्ये संशोधन करा. तुम्ही जो अहवाल वाचत आहात त्याच्या आधी आणि नंतर ज्या घटना घडल्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अहवालात दिलेल्या लोकांची आणि ठिकाणांची आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच अहवालाबद्दल शुभवर्तमानाच्या दुसऱ्‍या पुस्तकांत काय लिहिलं आहे याची तुलना करून पाहा. कदाचित शुभवर्तमानाच्या दुसऱ्‍या पुस्तकांत तुम्हाला अशी एखादी माहिती मिळेल जी या अहवालात दिलेली नाही.

१४-१५. शुभवर्तमानातून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१४ दुसरी गोष्ट म्हणजे, शुभवर्तमानातून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करा.  (योहा. १३:१७) त्यासाठी त्यातला एखादा अहवाल वाचल्यानंतर स्वतःला प्रश्‍न विचारा: ‘या अहवालात अशी एखादी गोष्ट आहे का, जी मी माझ्या जीवनात लागू करू शकतो? एखाद्याला मदत करण्यासाठी मी या अहवालाचा कसा उपयोग करू शकतो?’ मग, या माहितीचा कोणाला फायदा होऊ शकतो याचा विचार करा. आणि वेळ पाहून विचारपूर्वक आणि प्रेमाने ती माहिती त्या व्यक्‍तीला सांगा.

१५ आता या दोन्ही गोष्टी कशा लागू करता येतील हे शिकण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. येशूने मंदिरात पाहिलेल्या एका गरीब विधवेच्या अहवालाचं आपण परीक्षण करू या.

गरीब विधवेचा अहवाल

१६. मार्क १२:४१ वाचल्यावर कोणतं चित्र डोळ्यांसमोर येतं त्याचं वर्णन करा.

१६ त्या घटनेचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करा.  (मार्क १२:४१ वाचा.) या वचनात दिलेल्या घटनेची कल्पना करा. इ.स. ३३ निसान ११ चा तो दिवस आहे. येशूचा मृत्यू झाला त्याच्या काही दिवसांआधीची ही घटना. जवळजवळ संपूर्ण दिवस तो मंदिरात लोकांना शिकवतो. पण धर्मगुरू त्याचा विरोध करतात. त्यांच्यापैकी काहींनी तर त्याला असंही विचारलं होतं, की तो हे सगळं कोणाच्या अधिकाराने करत आहे. तर इतर काहींनी त्याला कठीण प्रश्‍न विचारून बोलण्यात पकडण्याचा प्रयत्न केला. (मार्क ११:२७-३३; १२:१३-३४) आता येशू मंदिरातल्या दुसऱ्‍या एका ठिकाणी गेला आहे. कदाचित ते स्त्रियांचं अंगण असावं, जिथे दानपात्रं ठेवली जायची. येशू तिथे बसतो आणि लोक दानपात्रांत दान टाकत असताना पाहू लागतो. तो पाहतो, की अनेक श्रीमंत लोक दानपात्रांमध्ये भरपूर नाणी टाकत आहेत. येशू कदाचित इतक्या जवळ बसला आहे, की दानपात्रांत टाकल्या जाणाऱ्‍या नाण्यांचा खणखणाटसुद्धा त्याला ऐकू येतो.

१७. मार्क १२:४२ मध्ये ज्या विधवेबद्दल सांगितलं आहे तिने काय केलं?

१७ मार्क १२:४२ वाचा. काही वेळानंतर येशूचं लक्ष एका स्त्रीकडे जातं. ती एक गरीब विधवा आहे. तिची परिस्थिती इतकी वाईट आहे, की रोजच्या गरजा भागवण्याइतके पैसेही तिच्याकडे नाहीत. तरी ती एका दानपात्राकडे जाते आणि तिच्याकडे असलेली दोन छोटी नाणी हळूच त्यात टाकते. ती नाणी टाकल्यावर कदाचित त्यांचा आवाजही आला नसेल. तिने किती दान दिलं आहे, हे येशूला माहीत आहे. तिने दानपात्रात दोन लेप्टा नाणी टाकली आहेत. त्या काळात या नाण्यांचं मोल सगळ्यात कमी होतं. तितक्या पैशात तर सर्वात कमी किमतीची एक चिमणीसुद्धा विकत घेता येत नव्हती.

१८. मार्क १२:४३, ४४ या वचनांप्रमाणे विधवेने दिलेल्या दानाबद्दल येशूने काय म्हटलं?

१८ मार्क १२:४३, ४४ वाचा. त्या विधवेने केलेली ही गोष्ट येशूच्या मनाला खूप भिडते. त्यामुळे तो आपल्या शिष्यांना बोलवतो आणि तिच्याकडे त्यांचं लक्ष वेधतो. तो त्यांना म्हणतो: “दानपात्रांत पैसे टाकणाऱ्‍या सगळ्यांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले.” पुढे तो असंही म्हणतो: “त्या सगळ्यांनी [खासकरून श्रीमंतांनी] त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून टाकलं. पण ती इतकी गरीब असूनही तिने पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं टाकलं.” त्या दिवशी आपल्याकडचे सगळे पैसे दानपात्रात टाकून त्या गरीब विधवेने हेच दाखवलं, की यहोवा आपली काळजी घेईल यावर तिचा पूर्ण भरवसा आहे.—स्तो. २६:३.

आपल्या परिस्थितीप्रमाणे यहोवाची मनापासून सेवा करणाऱ्‍या भाऊबहिणींची येशूसारखीच प्रशंसा करा (परिच्छेद १९-२० पाहा) *

१९. गरीब विधवेबद्दल येशूने जे काही म्हटलं त्यातून आपल्याला कोणता महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो?

१९ या अहवालातून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करा. स्वतःला विचारा: ‘त्या गरीब विधवेबद्दल येशूने जे काही म्हटलं त्यातून मला काय शिकायला मिळालं?’ त्या विधवेचा विचार करा. तिलासुद्धा इतरांप्रमाणे जास्त दान द्यायची इच्छा होती यात काही शंका नाही. पण आपल्या परिस्थितीप्रमाणे तिला जे काही देता आलं ते तिने यहोवाला दिलं. तिचं हे दान यहोवाच्या नजरेत खूप मोलाचं आहे, हे येशूला माहीत होतं. यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो हा, की आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने यहोवाची सेवा करतो, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. (मत्त. २२:३७; कलस्सै. ३:२३) हे तत्त्व आपल्या उपासनेच्या बाबतीतही लागू होतं. सभांसाठी आणि प्रचारकार्यासाठी आपण जमेल तितका वेळ आणि शक्‍ती खर्च करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो.

२०. गरीब विधवेच्या अहवालातून शिकलेला धडा तुम्ही कसा लागू शकता याचं एक उदाहरण द्या.

२० गरीब विधवेच्या अहवालातून शिकलेला धडा तुम्ही कसा लागू शकता? त्यासाठी मंडळीतल्या विशिष्ट भाऊबहिणींचा विचार करा. उदाहरणार्थ, तुमच्या मंडळीत कदाचित अशी एखादी वयस्कर बहीण असेल जिला आपल्या तब्येतीमुळे पूर्वीइतकी सेवा करता येत नसेल. आणि या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असेल. आपण काहीच कामाचे नाही, असाही ती विचार करत असेल. किंवा तुमच्या मंडळीत कदाचित असा एखादा भाऊ असेल जो बऱ्‍याच काळापासून आजारी असल्यामुळे प्रत्येक सभेला जाऊ शकत नसेल. आणि त्यामुळे तो खूप निराश होत असेल. अशा भाऊबहिणींना मदत करण्यासाठी त्यांना ‘प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी बोला.’ (इफिस. ४:२९) गरीब विधवेच्या अहवालातून तुम्ही जो धडा शिकलात त्याबद्दल सांगून तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ शकता. यामुळे त्यांना याचं आश्‍वासन मिळू शकतं, की आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण यहोवासाठी जे काही करतो, ते पाहून त्याला खूप आनंद होतो. (नीति. १५:२३; १ थेस्सलनी. ५:११) अशा प्रकारे जेव्हा तुम्ही इतरांना प्रोत्साहन देता, तेव्हा तुम्ही येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करता.

२१. तुम्ही काय करायचं ठरवलं आहे?

२१ शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये येशूच्या जीवनाबद्दल भरपूर माहिती दिली आहे. त्यासाठी आपण यहोवाचे खूप आभारी आहोत. कारण त्यामुळे आपल्याला येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करता येतं. तर मग, तुमच्या वैयक्‍तिक अभ्यासामध्ये किंवा कौटुंबिक उपासनेमध्ये या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास कराल का? पण येशूच्या उदाहरणातून जास्तीत जास्त शिकण्यासाठी आपण त्या पुस्तकांत दिलेले अहवाल डोळ्यांसमोर उभे केले पाहिजेत आणि शिकलेल्या गोष्टी लागू केल्या पाहिजेत. येशूने जे केलं  त्याचं तर आपण अनुकरण केलंच पाहिजे, पण त्याने जे म्हटलं  तेसुद्धा आपण ऐकलं पाहिजे. तर मग, येशूच्या शेवटच्या शब्दांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं, हे आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

^ परि. 5 खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी ‘येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण’ केलं पाहिजे. पण येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करण्याचा काय अर्थ होतो? आपण ते का केलं पाहिजे? आणि आपण ते कसं करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं या लेखात मिळतील.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: गरीब विधवेबद्दल येशूने जे काही म्हटलं त्यावर एक बहीण मनन करते. मग, प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्‍या एका वयस्कर बहिणीची ती प्रशंसा करते.