व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १५

येशूच्या शेवटच्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो?

येशूच्या शेवटच्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो?

“हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय. तुम्ही त्याचं ऐका.”—मत्त. १७:५.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

सारांश *

१-२. येशूने शेवटचे शब्द म्हटले त्याआधी त्याच्यासोबत कायकाय घडलं?

इ.स. ३३ निसान १४ चा दिवस आहे. येशूवर खोटे आरोप लावून आणि त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला दोषी ठरवून त्याची थट्टा केली जात आहे. त्याचा क्रूरपणे छळ केला जात आहे. आणि मग, त्याला वधस्तंभावर खिळलं जात आहे. खिळे त्याच्या हातापायांच्या अगदी आरपार गेले आहेत. एकेक श्‍वास घेताना, एकेक शब्द बोलताना त्याला खूप त्रास होत आहे. पण तरीसुद्धा तो बोलतो, कारण त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत.

पण वधस्तंभावर असताना येशूचे शेवटचे शब्द कोणते होते? आणि त्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो, म्हणजे आपण त्याचं कसं ऐकू शकतो? याची चर्चा आता आपण करू या.—मत्त. १७:५.

“बापा, यांना क्षमा कर”

३. “बापा, यांना क्षमा कर,” असं येशू कोणाबद्दल बोलत असावा?

येशू काय बोलला?  वधस्तंभावर खिळल्यावर येशूने अशी प्रार्थना केली: “बापा, यांना क्षमा कर.” इथे तो कोणाला क्षमा करण्याबद्दल बोलत होता? याचं उत्तर त्याच्या पुढच्या शब्दांवरून आपल्याला मिळतं. त्याने पुढे म्हटलं: “ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.” (लूक २३:३३, ३४) येशू कदाचित त्या रोमी सैनिकांबद्दल बोलत असावा ज्यांनी त्याच्या हातापायांना खिळे ठोकले होते. कारण येशू कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं. किंवा मग येशू जमावामधल्या अशा काही लोकांबद्दलही बोलत असावा ज्यांनी मोठमोठ्याने ओरडून त्याला ठार मारण्याची मागणी केली होती; पण जे नंतर त्याच्यावर विश्‍वास ठेवणार होते. (प्रे. कार्यं २:३६-३८) त्यांनी त्याच्यावर खूप अन्याय केला होता. पण तरीसुद्धा त्याने त्यांच्याबद्दल मनात राग बाळगला नाही. (१ पेत्र २:२३) उलट, त्याला मारून टाकणाऱ्‍या लोकांना यहोवाने क्षमा करावी अशी त्याने विनंती केली.

४. आपला विरोध करणाऱ्‍यांना माफ करण्याच्या बाबतीत आपण येशूकडून काय शिकू शकतो?

येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?  हेच, की आपणसुद्धा येशूसारखं इतरांना क्षमा करायला तयार असलं पाहिजे. (कलस्सै. ३:१३) आपले नातेवाईक किंवा इतर जण कदाचित आपला विरोध करतील. कारण आपण काय मानतो आणि आपण त्यांच्यासारखं जीवन का जगत नाही हे त्यांना समजत नसेल. त्यामुळे कदाचित ते आपल्याबद्दल खोटं बोलतील, इतरांसमोर आपला अपमान करतील, आपली प्रकाशनं फाडून टाकतील किंवा आपलं काही बरंवाईट करायची धमकीही देतील. पण अशा वेळी त्यांच्याबद्दल मनात राग बाळगण्याऐवजी आपण त्यांच्यासाठी यहोवाला प्रार्थना करू शकतो. आणि त्याने त्यांना सत्य स्वीकारायला मदत करावी अशी त्याला विनंती करू शकतो. (मत्त. ५:४४, ४५) पण काही वेळा त्यांना माफ करण आपल्याला कठीण वाटू शकतं; खासकरून त्यांनी आपल्याला फार वाईट वागणूक दिली असेल तर. पण आपण जर त्यांच्याबद्दल मनात राग धरला आणि त्यांना क्षमा केली नाही, तर आपल्यालाच त्रास होऊ शकतो. याबद्दल एक बहीण म्हणते: “इतरांना क्षमा करण्याचा अर्थ असा होत नाही, की त्यांनी आपल्यासोबत जे काही केलं ते बरोबर आहे असं मानणं किंवा त्यांना आपल्यासोबत वाटेल तसं वागू देणं; तर त्याचा अर्थ असा होतो, की आपण त्यांच्याबद्दल मनात राग धरत नाही.” (स्तो. ३७:८) खरंच, आपण जेव्हा इतरांना मोठ्या मनाने क्षमा करतो, तेव्हा आपल्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टींचा आपण स्वतःवर परिणाम होऊ देत नाही.—इफिस. ४:३१, ३२.

“तू माझ्यासोबत नंदनवनात असशील”

५. येशूने एका चोराला काय अभिवचन दिलं, आणि तो हे अभिवचन का देऊ शकला?

येशू काय बोलला?  येशूसोबत दोन चोरांना वधस्तंभावर खिळण्यात आलं होतं. सुरुवातीला दोघंही येशूची निंदा करत होते. (मत्त. २७:४४) पण नंतर त्यांच्यापैकी एकाचं मन बदललं. त्याने हे मान्य केलं, की येशूने काहीच गुन्हा केला नव्हता. (लूक २३:४०, ४१) इतकंच नाही, तर त्याने या गोष्टीवर विश्‍वास ठेवला, की येशूचं पुनरुत्थान होईल आणि तो एक दिवस राजा बनेल. तो त्याला म्हणाला: “येशू, तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.” (लूक २३:४२) खरंच, येशूवर त्याचा किती विश्‍वास होता! त्याचा विश्‍वास पाहून येशू त्याला म्हणाला: “आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.” (लूक २३:४३) तुम्ही लक्ष दिलं का, इथे येशूने “मी,” “तू,” “माझ्यासोबत” असे शब्द वापरले. यावरून दिसून येतं, की येशू स्वतः त्याला हे अभिवचन देत होता. तो हे अभिवचन यासाठी देऊ शकला कारण त्याला माहीत होतं, की आपला पिता खूप दयाळू आहे आणि तो या अपराध्याला नक्की माफ करेल.—स्तो. १०३:८.

६. येशूने एका चोराला जे अभिवचन दिलं त्यातून आपण काय शिकू शकतो?

येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?  येशू अगदी आपल्या पित्यासारखा आहे. (इब्री १:३) येशूच्या शब्दांवरून दिसून येतं, की यहोवा खूप दयाळू आहे आणि आपल्याला माफ करायची त्याची मनापासून इच्छा आहे. पण केलेल्या चुकांबद्दल आपण पश्‍चात्ताप केला आणि येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला, तरच तो आपल्याला माफ करेल. (१ योहा. १:७) काहींना मात्र असं वाटतं, की आपण केलेल्या चुकांबद्दल यहोवा आपल्याला कधीच माफ करणार नाही. तुम्हालाही कधीकधी असंच वाटतं का? असेल, तर याचा विचार करा: नुकताच विश्‍वास दाखवायला सुरुवात करणाऱ्‍या अपराध्याला जर येशूने दया दाखवली, तर अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे आपली सेवा करणाऱ्‍या सेवकांना यहोवा दया दाखवणार नाही का?—स्तो. ५१:१; १ योहा. २:१, २.

“पाहा! तुझा मुलगा! . . . पाहा! तुझी आई!”

७. योहान १९:२६, २७ यांत सांगितल्याप्रमाणे येशू मरीया आणि योहानला काय म्हणाला, आणि का?

येशू काय बोलला?  (योहान १९:२६, २७ वाचा.) येशूच्या मृत्यूच्या वेळी त्याची आई मरीया ही कदाचित विधवा असावी. त्यामुळे येशूला तिची खूप काळजी होती. त्याची भावंडं तिच्या रोजच्या गरजा तर पूर्ण करू शकले असते, पण तिच्या आध्यात्मिक गरजांबद्दल काय? कारण तोपर्यंत त्याचे भाऊ कदाचित शिष्य बनले नव्हते. पण योहान हा एक विश्‍वासू प्रेषित आणि येशूचा सगळ्यात जवळचा मित्र होता. आणि जे लोक आपल्यासोबत यहोवाची सेवा करतात, ते आपल्या कुटुंबातलेच आहेत असं येशू मानायचा. (मत्त. १२:४६-५०) त्यामुळे तो मरीयाला म्हणाला: “पाहा! तुझा मुलगा!” आणि योहानला म्हणाला: “पाहा! तुझी आई!” अशा प्रकारे येशूने आपल्या आईची जबाबदारी योहानवर सोपवली. कारण योहान तिच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करेल याची त्याला पूर्ण खातरी होती. त्या दिवसापासून योहानने आपल्या आईसारखीच तिची काळजी घेतली. ज्या आईने येशूला जन्म दिला होता आणि त्याच्या मृत्यूच्या वेळीही जी त्याच्या सोबत होती, तिच्याबद्दल खरंच येशूला किती प्रेम होतं!

८. येशूने मरीया आणि योहानला जे म्हटलं त्यातून आपण काय शिकतो?

येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?  हेच, की भाऊबहिणींसोबतचं आपलं नातं रक्‍ताच्या नात्यांपेक्षा घट्ट असू शकतं. आपले नातेवाईक कदाचित आपला विरोध करतील, आपल्यासोबतचं नातं तोडूनही देतील; पण आपण जर यहोवाच्या आणि त्याच्या संघटनेच्या जवळ राहिलो, तर आपण जे काही गमावलं आहे त्याच्या ‘शंभरपट’ आपल्याला मिळेल असं अभिवचन येशूने आपल्याला दिलं आहे. यहोवाच्या संघटनेत आपल्याला अनेक प्रेमळ आईवडील आणि मुलंबाळं मिळतील. (मार्क १०:२९, ३०) ज्या कुटुंबातल्या सदस्यांचा विश्‍वास एक आहे, ज्यांचं यहोवावर आणि एकमेकांवर खूप प्रेम आहे, अशा आध्यात्मिक कुटुंबात असल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?—कलस्सै. ३:१४; १ पेत्र २:१७.

“माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?”

९. मत्तय २७:४६ या वचनात दिलेल्या येशूच्या शब्दांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

येशू काय बोलला?  अखेरचा श्‍वास घेण्याआधी येशू म्हणाला: “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?” (मत्त. २७:४६) येशू असं का बोलला ते बायबलमध्ये सांगितलेलं नाही. पण त्या शब्दांतून काय शिकायला मिळतं त्याचा विचार करा. एक म्हणजे, येशू स्तोत्र २२:१ मध्ये दिलेली भविष्यवाणी पूर्ण करत होता. * शिवाय, येशूच्या त्या शब्दांवरून दिसून आलं, की यहोवाने आपल्या मुलाला ‘सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्याभोवती कुंपण घातलं नव्हतं.’ (ईयो. १:१०) येशूला हे समजलं होतं, की आपल्या विश्‍वासाची पूर्णपणे परीक्षा होण्यासाठी आपल्या पित्याने आपल्याला शत्रूंच्या हाती सोपवलं आहे. त्याच्या विश्‍वासाची जितकी परीक्षा झाली, तितकी आजपर्यंत कोणत्याही मानवाची झाली नाही. शिवाय, येशूच्या शब्दांवरून हे सिद्ध झालं, की तो निरपराध होता. मृत्यूची शिक्षा मिळावी असा कोणताही गुन्हा त्याने केला नव्हता.

१०. येशूने आपल्या पित्याला जे म्हटलं त्यातून आपण काय शिकू शकतो?

१० येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?  एक म्हणजे, ज्या समस्यांमुळे आपल्या विश्‍वासाची परीक्षा होते, त्यांपासून यहोवाने आपलं संरक्षण करावं अशी अपेक्षा आपण करू नये. उलट, येशूप्रमाणे आपल्या विश्‍वासाची पूर्णपणे परीक्षा होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. आपल्याला कदाचित मृत्यूचाही सामना करावा लागेल. (मत्त. १६:२४, २५) पण आपण सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा यहोवा आपल्यावर येऊ देणार नाही हा भरवसा आपण ठेवू शकतो. (१ करिंथ. १०:१३) दुसरं म्हणजे, येशूसारखाच आपल्यावरही अन्याय होऊ शकतो. (१ पेत्र २:१९, २०) आपण काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून लोक आपला विरोध करत नाहीत, तर आपण या जगाचे भाग नाही आणि आपण इतरांना सत्याबद्दल सांगतो म्हणून ते आपला विरोध करतात. (योहा. १७:१४; १ पेत्र ४:१५, १६) यहोवाने आपल्याला दुःख का सोसू दिलं याचं कारण येशूला समजलं होतं. पण परीक्षांचा सामना करणाऱ्‍या यहोवाच्या काही विश्‍वासू सेवकांना कधीकधी असा प्रश्‍न पडू शकतो, की यहोवाने ही संकटं आपल्यावर का येऊ दिली? (हब. १:३) पण म्हणून त्यांच्याबद्दल यहोवा कधीच असा विचार करत नाही, की त्यांच्यात विश्‍वासाची कमी आहे. त्यांना फक्‍त सांत्वनाची गरज आहे, हे त्याला माहीत आहे. आणि म्हणून तो त्यांच्याशी खूप दयाळूपणे आणि धीराने वागतो.—२ करिंथ. १:३, ४.

“मला तहान लागली आहे”

११. योहान १९:२८ मध्ये दिलेले शब्द येशू का बोलला?

११ येशू काय बोलला?  (योहान १९:२८ वाचा.) “मला तहान लागली आहे,” असं येशू का म्हणाला? “शास्त्रवचनात जे सांगितलं आहे ते पूर्ण होण्यासाठी तो असं म्हणाला.” म्हणजेच, स्तोत्र २२:१५ मध्ये दिलेली भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी. तिथे म्हटलं आहे: “एखाद्या खापरीसारखी माझी शक्‍ती सुकून गेली आहे; माझी जीभ टाळूला चिकटली आहे.” या शिवाय, येशूने खूप काही सोसलं होतं; अगदी वधस्तंभावर होणाऱ्‍या वेदनाही. त्यामुळे साहजिकच त्याला खूप तहान लागली असेल. आणि ती भागवण्यासाठी तो हे शब्द बोलला.

१२. “मला तहान लागली आहे,” असं जे येशू म्हणाला त्यातून आपण काय शिकू शकतो?

१२ येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?  आपल्याला कशाची गरज आहे, हे इतरांना सांगणं चुकीचं आहे, असा येशूने कधीच विचार केला नाही. आपणही कधीच तसा विचार करू नये. आपण आत्तापर्यंत कदाचित कोणालाही मदत मागितली नसेल. पण जर आपल्याच्याने होत नसेल आणि आपल्याला इतरांच्या मदतीची गरज असेल, तर ती मागायला आपण मागेपुढे पाहू नये. उदाहरणार्थ, आपण जर वयस्कर किंवा आजारी असू, तर आपल्याला बाजारात किंवा डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी आपण आपल्या भाऊबहिणींना मदत मागू शकतो. किंवा मग, आपण जर दुःखी किंवा निराश असू, तर आपण मंडळीतल्या एखाद्या वडिलाशी किंवा एखाद्या प्रौढ भावाशी किंवा बहिणीशी बोलू शकतो. त्यांच्या “दिलासा देणाऱ्‍या शब्दांमुळे” आपल्याला खूप धीर मिळू शकतो. (नीति. १२:२५) हे कधीही विसरू नका, की आपले भाऊबहीण आपल्यावर खूप प्रेम करतात. आणि “दुःखाच्या प्रसंगी” आपल्याला मदत करायची त्यांची इच्छा असते. (नीति. १७:१७) पण ते आपलं मन पाहू शकत नाहीत. म्हणून जोपर्यंत आपण स्वतःहून त्यांना मदत मागणार नाही, तोपर्यंत त्यांना कळणार नाही की आपल्याला मदतीची गरज आहे.

“पूर्ण झालंय!”

१३. अखेरच्या श्‍वासापर्यंत विश्‍वासू राहिल्यामुळे येशूने कोणत्या गोष्टी साध्य केल्या?

१३ येशू काय बोलला?  मग निसान १४ च्या दिवशी, दुपारी जवळपास तीन वाजता येशू मोठ्याने म्हणाला: “पूर्ण झालंय!” (योहा. १९:३०) या शब्दांवरून दिसून येतं, की यहोवाने दिलेलं काम त्याने पूर्ण केलं होतं. अखेरच्या श्‍वासापर्यंत विश्‍वासू राहिल्यामुळे येशूने अनेक गोष्टी साध्य केल्या. पहिली गोष्ट म्हणजे, त्याने सैतानाला खोटं ठरवलं. येशूने हे दाखवून दिलं, की सैतानाने कितीही काही केलं, तरी एक परिपूर्ण मानव यहोवाला पूर्णपणे विश्‍वासू राहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, येशूने आपलं जीवन खंडणी बलिदान म्हणून दिलं. या बलिदानामुळे अपरिपूर्ण मानव देवासोबत जवळचं नातं जोडू शकले आणि त्यांना सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळू शकली. तिसरी गोष्ट म्हणजे, येशूने हे सिद्ध केलं, की या विश्‍वावर राज्य करण्याचा अधिकार फक्‍त यहोवालाच आहे. आणि सैतानाने यहोवाच्या नावाला लावलेला कलंक त्याने दूर केला.

१४. आपण प्रत्येक दिवस कशा प्रकारे जगायचा प्रयत्न केला पाहिजे? समजावून सांगा.

१४ येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?  आपण प्रत्येक दिवस यहोवाला विश्‍वासू राहायचा ठाम निश्‍चय केला पाहिजे. गिलियड प्रशालेचे प्रशिक्षक बंधू मॅक्सवेल फ्रेंड यांनी काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात विश्‍वासू राहण्यावर भाषण देताना त्यांनी असं म्हटलं: “आजचं काम उद्यावर ढकलू नका. कारण उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल की नाही, हे आपल्याला माहीत नाही. म्हणून प्रत्येक दिवस यहोवाला विश्‍वासू राहा आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल असं जगा.” तर भाऊबहिणींनो, उगवणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून आपण दररोज यहोवाला विश्‍वासू राहू या. मग मृत्यू जरी समोर आला तरी आपण असं म्हणू शकू: “यहोवा, मी तुला विश्‍वासू राहण्याचा, सैतानाला खोटं ठरवण्याचा, तुझ्या नावावरचा कलंक दूर करण्याचा आणि विश्‍वावर राज्य करण्याचा तुलाच अधिकार आहे याला पाठिंबा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.”

“मी आपलं जीवन तुझ्या हाती सोपवतो”

१५. लूक २३:४६ या वचनाप्रमाणे येशूला कोणती खातरी होती?

१५ येशू काय बोलला?  (लूक २३:४६ वाचा.) येशू पूर्ण खातरीने असं म्हणाला: “बापा, मी आपलं जीवन तुझ्या हाती सोपवतो.” आपलं भविष्य यहोवाच्या हातात आहे, हे यशूला माहीत होतं. आणि तो आपल्याला जिवंत करेल, याची त्याला पक्की खातरी होती.

१६. पंधरा वर्षांच्या जोशुआकडून आपण काय शिकू शकतो?

१६ येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?  हेच, की आपल्या जिवाला कितीही धोका असला, तरीही आपण नेहमी यहोवाला विश्‍वासू राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण “यहोवावर अगदी मनापासून भरवसा” ठेवला पाहिजे. (नीति. ३:५) १५ वर्षांच्या जोशुआचाच विचार करा. त्याला एक गंभीर आजार झाला होता. पण तरीही देवाच्या नियमाविरुद्ध असलेले उपचार घ्यायला त्याने नकार दिला. मृत्यूच्या काही वेळाआधी तो आपल्या आईला म्हणाला: “आई, तू मुळीच माझी काळजी करू नकोस. आता यहोवा माझी काळजी घेईल. मी पूर्ण खातरीने सांगू शकतो, की यहोवा मला नक्की जिवंत करेल. त्याने माझं मन पाहिलंय आणि माझं त्याच्यावर किती प्रेमए, हे त्याला माहितय.” * आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला असं विचारलं पाहिजे, की ‘एखादा जीवघेणा प्रसंग माझ्या जीवनात आला आणि माझ्या विश्‍वासाची परीक्षा झाली, तर मी शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहीन का? आणि यहोवा मला जिवंत करेल असा भरवसा मी ठेवीन का?’

१७-१८. आपल्याला कोणते मोलाचे धडे शिकायला मिळाले? (“ येशूच्या शेवटच्या शब्दांवरून आपण काय शिकतो?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१७ येशूच्या शेवटच्या शब्दांतून आपल्याला खरंच किती मोलाचे धडे शिकायला मिळाले! आपण शिकलो, की आपण इतरांना क्षमा केली पाहिजे आणि यहोवाही आपल्याला क्षमा करेल असा भरवसा ठेवला पाहिजे. तसंच आपण हेसुद्धा पाहिलं, की मंडळीतले भाऊबहीण आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतात. पण आपल्याला मदत हवी असते तेव्हा आपण स्वतःहून ती मागितली पाहिजे. आपल्याला हेपण शिकायला मिळालं, की आपल्यासमोर येणारी कोणतीही परीक्षा सहन करायला यहोवा आपल्याला मदत करेल. आणि शेवटी आपण हे पाहिलं, की आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून आपण प्रत्येक दिवस यहोवाला विश्‍वासू राहिलं पाहिजे. आणि आपला मृत्यू जरी झाला तरी यहोवा आपल्याला पुन्हा जिवंत करेल असा पूर्ण भरवसा आपण ठेवला पाहिजे.

१८ खरंच, वधस्तंभावर असताना येशूने शेवटी जे शब्द म्हटले त्यांतून आपल्याला किती काही शिकायला मिळालं. या गोष्टी आपण जीवनात लागू केल्या, तर यहोवाने आपल्या मुलाचं ऐकण्याबद्दल जी आज्ञा दिली आहे, तिचं आपण पालन करत असू.—मत्त. १७:५.

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

^ परि. 5 मत्तय १७:५ यात असं सांगितलं आहे, की आपण येशूचं ऐकावं अशी यहोवाची इच्छा आहे. वधस्तंभावर असताना येशूने जे शेवटचे शब्द म्हटले त्यांतून आपण काय शिकू शकतो, म्हणजेच आपण त्याचं कसं ऐकू शकतो? याची चर्चा आता या लेखात आपण करणार आहोत.

^ परि. 9 येशूने स्तोत्र २२:१ यातल्या शब्दांचा उल्लेख का केला असेल, याची काही कारणं याच अंकात “वाचकांचे प्रश्‍न” यामध्ये दिली आहेत.

^ परि. 16 जोशुआचा अनुभव वाचण्यासाठी २२ जानेवारी १९९५ च्या सावध राहा!  (इंग्रज्री) अंकातले पृष्ठं ११-१५ पाहा.