व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १६

येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कदर दाखवत राहा

येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कदर दाखवत राहा

‘मनुष्याचा मुलगा बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.’—मार्क १०:४५.

गीत १४९ खंडणीसाठी कृतज्ञ

सारांश *

१-२. खंडणी म्हणजे काय, आणि आपल्याला तिची गरज का आहे?

परिपूर्ण मानव आदाम याने पाप केलं तेव्हा तो सर्वकाळाचं जीवन गमावून बसला, आणि त्यामुळे त्याच्यापासून होणाऱ्‍या मुलाबाळांनीही ते गमावलं. त्याने जाणूनबुजून हे पाप केलं होतं. त्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा मिळाली. पण त्याच्या मुलांबद्दल काय? त्यांनी तर कोणतीच चूक केली नव्हती. (रोम. ५:१२, १४) मग, मृत्यूपासून त्यांना सोडवण्यासाठी यहोवा काही करू शकत होता का? नक्कीच! आणि त्याने ते केलंही. आदामने पाप केल्यानंतर त्याच्या मुलाबाळांना पाप आणि मृत्यूतून सोडवण्यासाठी यहोवाने लगेच एक व्यवस्था केली. ती व्यवस्था काय असणार होती, ते त्याने टप्प्याटप्प्याने सांगितलं. (उत्प. ३:१५) मग, ठरलेल्या वेळी “बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात” येशूला “आपलं जीवन खंडणी म्हणून” देता यावं म्हणून यहोवा त्याला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवणार होता.—मार्क १०:४५; योहा. ६:५१.

पण खंडणी म्हणजे नेमकं काय? आदामने जे गमावलं होतं ते परत मिळवण्यासाठी येशूने आपल्या जीवनाची किंमत दिली. यालाच ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत खंडणी म्हटलं आहे. (१ करिंथ. १५:२२) पण आपल्याला खंडणीची गरज का आहे? कारण न्यायाच्या बाबतीत यहोवाचं जे स्तर आहे त्याप्रमाणे जिवाबद्दल जीव द्यायची गरज होती. (निर्ग. २१:२३, २४) आदामने एक परिपूर्ण मानवी जीवन गमावलं होतं आणि ते परत मिळवण्यासाठी यहोवाच्या न्यायानुसार एका परिपूर्ण मानवी जीवनाची गरज होती. आणि त्यासाठीच येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. (रोम. ५:१७) म्हणूनच येशू त्या सर्वांसाठी “सर्वकाळचा पिता” बनतो जे त्याच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतात.—यश. ९:६; रोम. ३:२३, २४.

३. योहान १४:३१ आणि १५:१३ या वचनांनुसार येशू आपल्या जीवनाचं बलिदान द्यायला तयार का होता?

येशू आपल्या जीवनाचं बलिदान द्यायला तयार होता, कारण त्याचं आपल्या पित्यावर आणि आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. (योहान १४:३१; १५:१३ वाचा.) या प्रेमापोटी त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली आणि शेवटपर्यंत विश्‍वासू राहिला. त्यामुळेच मानवांसाठी आणि पृथ्वीसाठी यहोवाचा जो उद्देश होता तो पूर्ण होईल. तर या लेखात आपण पाहू, की देवाने येशूला इतकं वेदनादायक मरण का सोसू दिलं. तसंच, प्रेषित योहानने खंडणीसाठी आपली कदर कशी दाखवली हेसुद्धा आपण थोडक्यात पाहू. शेवटी आपण यावर चर्चा करू, की खंडणीबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो आणि ती वाढवत कशी राहू शकतो.

येशूला इतक्या यातना का सहन कराव्या लागल्या?

आपल्यासाठी खंडणी बलिदान देण्याकरता येशूला काय-काय सहन करावं लागलं याचा विचार करा! (परिच्छेद ४ पाहा)

४. येशूचा मृत्यू कसा झाला त्याचं वर्णन करा.

येशूच्या मृत्यूचा शेवटचा दिवस कसा होता याचा विचार करा. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो स्वर्गदूतांचं सैन्य बोलवू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. त्याने रोमी सैनिकांना स्वतःला अटक करू दिलं. त्या सैनिकांनी त्याला खूप निर्दयीपणे मारलं. (मत्त. २६:५२-५४; योहा. १८:३; १९:१) त्यांनी त्याला ज्या चाबकाने मारलं त्यामुळे त्याच्या पाठीची चामडी सोलून निघाली. मग भयंकर जखमा झालेल्या त्याच्या पाठीवर त्यांनी एक जड खांब लादला. जिथे त्याला मारून टाकलं जाणार होतं, तिथे येशू तो खांब ओढून नेत होता. पण तिथपर्यंत नेण्याची त्याच्यात ताकद उरली नव्हती. त्यामुळे सैनिकांनी एका माणसाला तो खांब उचलून न्यायला सांगितलं. (मत्त. २७:३२) तिथे पोचल्यावर सैनिकांनी त्याच खांबावर येशूच्या हातापायांना खिळे ठोकून तो खांब उभा केला. तो उभा करताच येशूच्या शरीराचं वजन त्याच्या हातापायांवर पडू लागलं. आणि त्यामुळे जिथे खिळे ठोकले होते तिथल्या जखमा आणखीनच वाढल्या. हे सगळं पाहून तिथे उभी असलेली त्याची आई खूप रडत होती आणि त्याच्या मित्रांनाही फार दुःख होत होतं. पण यहुदी अधिकारी मात्र त्याची थट्टा करत होते. (लूक २३:३२-३८; योहा. १९:२५) कितीतरी तास त्याचा जीव तळमळत होता. वधस्तंभावर असल्यामुळे एकेक श्‍वास घेताना त्याला खूप त्रास होत होता. मग शेवटचा श्‍वास घेण्याआधी त्याने मोठ्याने प्रार्थना केली आणि मान टाकून प्राण सोडला. (मार्क १५:३७; लूक २३:४६; योहा. १०:१७, १८; १९:३०) खरंच, येशूने किती अपमान आणि वेदनादायक मरण सोसलं!

५. येशूला सगळ्यात जास्त दुःख कोणत्या गोष्टीचं होतं?

येशूला ज्या प्रकारे मारलं जाणार होतं त्याचं त्याला जास्त दुःख नव्हतं. पण जो आरोप लावून त्याला मारलं जाणार होतं त्याचं त्याला सगळ्यात जास्त दुःख होतं. तो देवाची निंदा करणारा आहे असा खोटा आरोप त्याच्यावर लावला जाणार होता. (मत्त. २६:६४-६६) याचा नुसता विचार करूनसुद्धा येशूला इतका त्रास होत होता, की या आरोपावरून आपल्याला मारलं जाऊ नये, अशी विनंती त्याने देवाला केली. (मत्त. २६:३८, ३९, ४२) पण तरीसुद्धा यहोवाने आपल्या प्रिय मुलाला इतकं वेदनादायक मरण का सोसू दिलं, याची तीन कारणं आता आपण पाहू या.

६. येशूला वधस्तंभावरचं मरण का सोसावं लागलं?

पहिलं कारण म्हणजे, यहुद्यांना शापापासून मुक्‍त करण्यासाठी येशूला वधस्तंभावरचं मरण सोसावं लागलं. (गलती. ३:१०, १३) हा शाप त्यांच्यावर यासाठी होता, कारण त्यांनी वचन दिलं होतं की ते देवाचे नियम पाळतील. पण त्यांनी तसं केलं. आदामची मुलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये पाप आणि मरण तर होतंच; पण देवाचे नियम न पाळल्यामुळे ते शापितसुद्धा होते. (रोम. ५:१२) नियमशास्त्रानुसार जर एखाद्या माणसाने मृत्युदंड मिळेल असं पाप केलं, तर त्याला ठार मारलं जायचं. आणि काही वेळा तर त्याचा मृतदेह वधस्तंभावर लटकवला जायचा. * नियमशास्त्रात असंही म्हटलं होतं, की “ज्याला वधस्तंभावर लटकवण्यात आलं आहे, तो देवाकडून शापित आहे.” (अनु. २१:२२, २३; २७:२६) तर वधस्तंभावरचं मरण स्वीकारून येशूने यहुद्यांवर असलेला शाप स्वतःवर घेतला आणि त्यांना त्या शापापासून मुक्‍त केलं. आणि त्यांनी जरी त्याला नाकारलं तरी त्याच्या बलिदानामुळे त्यांना फायदा होणार होता.

७. यहोवाने आपल्या मुलाला वधस्तंभावरचं मरण सोसू दिलं याचं दुसरं कारण काय आहे?

देवाने आपल्या मुलाला वधस्तंभावरचं मरण का सोसू दिलं, याचं दुसरं कारण आता आपण पाहू या. ते म्हणजे, भविष्यात येशू एका महायाजकाची भूमिका पार पाडणार आहे. आणि त्याचंच प्रशिक्षण यहोवा त्याला देत होता. टोकाची परीक्षा आल्यावर यहोवाच्या आज्ञांचं पालन करणं किती कठीण आहे हे येशूने स्वतः अनुभवलं होतं. म्हणूनच त्याने “आक्रोश करून आणि अश्रू गाळून” यहोवाला मदत मागितली. स्वतः दुःख सोसल्यामुळे येशू आपलं दुःख समजू शकतो आणि आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा तो आपल्याला मदत करू शकतो. खरंच, “जो आपल्या दुर्बलतांबद्दल सहानुभूती दाखवू” शकतो असा दयाळू महायाजक यहोवाने आपल्यावर नेमला आहे, त्यासाठी आपण त्याचे किती आभारी आहोत!—इब्री २:१७, १८; ४:१४-१६; ५:७-१०.

८. यहोवाने येशूला वेदनादायक मृत्यू का सहन करू दिला याचं तिसरं कारण सांगा.

यहोवाने येशूला वेदनादायक मृत्यू का सहन करू दिला याचं तिसरं म्हणजे, त्यामुळे एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचं उत्तर मिळणार होतं. तो प्रश्‍न असा आहे, की कठीणातली कठीण परीक्षा आली तरी मानव यहोवाला विश्‍वासू राहू शकतात का? सैतानाला वाटतं नाही राहू शकत. उलट तो असा दावा करतो, की मानव फक्‍त स्वार्थापोटी देवाची उपासना करतात, आणि आदामसारखंच ते यहोवावर प्रेम करत नाहीत. (ईयो. १:९-११; २:४, ५) पण आपला मुलगा शेवटपर्यंत आपल्याला विश्‍वासू राहील याची यहोवाला पूर्ण खातरी होती. म्हणून एक मानव सहन करू शकतो अगदी त्या टोकापर्यंत यहोवाने त्याची परीक्षा होऊ दिली. आणि येशूनेही यहोवाला विश्‍वासू राहून सैतानाला खोटं ठरवलं.

प्रेषित योहानला खंडणीबद्दल खूप कदर होती

९. योहानने कशा प्रकारे एक चांगलं उदाहरण मांडलं?

खंडणीच्या शिकवणीमुळेच अनेक ख्रिश्‍चनांचा विश्‍वास मजबूत झाला आहे. त्यामुळे विरोध होत असतानाही ते प्रचार करत राहतात आणि वेगवेगळ्या परीक्षा असतानाही आयुष्यभर विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करतात. प्रेषित योहानच्या उदाहरणाचाच विचार करा. ६० पेक्षा जास्त वर्षं त्याने ख्रिस्ताबद्दल आणि खंडणीबद्दल लोकांना प्रचार केला. तो जवळपास १०० वर्षांचा होता तेव्हा रोमी सरकारने त्याला पात्म बेटावर कैद केलं. कारण त्यांना वाटत होतं, की त्याच्यापासून त्यांना धोका आहे. तो ‘देवाबद्दल आणि येशूबद्दल साक्ष देत होता’ एवढाच काय त्याचा गुन्हा होता. (प्रकटी. १:९) विश्‍वास आणि धीराच्या बाबतीत योहानने खरंच खूप चांगलं उदाहरण मांडलं.

१०. योहानला खंडणीबद्दल खूप कदर होती हे कसं दिसून येतं?

१० योहानचं येशूवर किती प्रेम होतं आणि खंडणीबद्दल त्याला किती कदर होती, हे त्याने आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलं. त्या पुस्तकांमध्ये त्याने खंडणीचा किंवा तिच्यामुळे होणाऱ्‍या फायद्यांचा १०० पेक्षा जास्त वेळा उल्लेख केला. उदाहरणार्थ, त्याने असं लिहिलं: “एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक आहे, म्हणजे येशू ख्रिस्त, जो नीतिमान आहे.” (१ योहा. २:१, २) तसंच, येशूबद्दल साक्ष देणं किती महत्त्वाचं आहे हेसुद्धा तो आपल्या पुस्तकांमध्ये सांगतो. (प्रकटी. १९:१०) यावरून हेच दिसून येतं, की योहानला खंडणीबद्दल खूप कदर होती. खंडणीबद्दल आपल्यालासुद्धा तितकीच कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

खंडणीबद्दल कदर कशी दाखवता येईल?

खंडणीबद्दल आपल्याला खरंच कदर असेल, तर चुकीच्या कामांना आपण ‘नाही’ म्हणू (परिच्छेद ११ पाहा) *

११. चुकीच्या गोष्टींना ‘नाही’ म्हणायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

११ चुकीच्या कामांना ‘नाही’ म्हणा.  खंडणीबद्दल आपल्याला खरंच कदर असेल, तर आपण कधीच असा विचार करणार करू नये, की ‘चुकीचं काम करण्याचा मला मोह होतो, किंवा ते करण्याचा माझ्यावर दबाव येतो, तेव्हा स्वतःवर इतका आवर घालायची काही गरज नाही. कारण ते केल्यानंतर माफी तर मागताच येते.’ उलट अशा वेळी आपण स्वतःला असं सांगितलं पाहिजे: ‘नाही! मी हे करणार नाही. यहोवा आणि येशूने माझ्यासाठी किती काही केलंय, मग मी हे कसं करू शकतो? त्यांचं मन कसं काय दुखवू शकतो?’ त्यासाठी आपण यहोवाला शक्‍ती मागू शकतो आणि ‘मला मोहात पडू देऊ नकोस,’ अशी त्याला विनंती करू शकतो.—मत्त. ६:१३.

१२. १ योहान ३:१६-१८ यामध्ये दिलेला सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

१२ आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करा.  आपण असं करतो तेव्हासुद्धा खंडणीबद्दल कदर असल्याचं दाखवतो. असं का म्हणता येईल? कारण येशूने फक्‍त आपल्यासाठीच नाही, तर आपल्या भाऊबहिणींसाठीही स्वतःचं जीवन बलिदान केलं. याचाच अर्थ येशूचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. (१ योहान ३:१६-१८ वाचा.) भाऊबहिणींशी आपण ज्या प्रकारे वागतो त्यावरून दिसून येतं, की आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे. (इफिस. ४:२९, ३१-५:२) उदाहरणार्थ, ते आजारी असतात, परीक्षांचा सामना करत असतात किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा आपण त्यांना मदत करू शकतो. पण जर एखाद्या भावाने किंवा बहिणीने आपल्या मनाला लागेल असं काहीतरी बोललं किंवा केलं तर काय?

१३. आपण भाऊबहिणींना माफ का केलं पाहिजे?

१३ एखाद्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल तुमच्या मनात राग आहे का? त्यांना माफ करणं तुम्हाला कठीण जातं का? (लेवी. १९:१८) असेल, तर पुढे दिलेला सल्ला पाळा: “कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा. यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.” (कलस्सै. ३:१३) अशा प्रकारे आपण भाऊबहिणींना मोठ्या मनाने माफ करतो, तेव्हा हेच दाखवून देतो की खंडणीबद्दल आपल्याला खरंच कदर आहे. पण आपली ही कदर आपण आणखी कशी वाढवू शकतो?

खंडणीबद्दलची कदर आणखी कशी वाढवता येईल?

१४. खंडणीबद्दलची आपली कदर आणखी वाढवण्याचा एक मार्ग कोणता आहे?

१४ खंडणीबद्दल यहोवाचे आभार माना.  भारतात राहणारी ८३ वर्षांची जोॲना नावाची एक बहीण म्हणते: “मला वाटतं, दररोज यहोवाला प्रार्थना करताना अगदी न चुकता खंडणीसाठी त्याचे आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे.” या बहिणीने म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक दिवशी प्रार्थना करताना दिवसभरात आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या आपण यहोवाला सांगितल्या पाहिजेत, आणि त्यांबद्दल त्याला माफी मागितली पाहिजे. पण जर आपल्या हातून एखादं गंभीर पाप घडलं असेल, तर यहोवाला प्रार्थना करण्यासोबतच आपण वडिलांची मदतही घेतली पाहिजे. ते आपली समस्या समजून घेतील आणि आपल्याला बायबलमधून प्रेमळ सल्ला देतील. तसंच, यहोवासोबत आपल्याला पुन्हा जवळचं नातं जोडता यावं म्हणून ते आपल्यासोबत प्रार्थना करतील आणि आपल्याला क्षमा करण्याची विनंती यहोवाला करतील.—याको. ५:१४-१६.

१५. खंडणीबद्दल जास्तीत जास्त वाचणं आणि त्यावर मनन करणं का महत्त्वाचं आहे?

१५ खंडणीबद्दल मनन करा.  ७३ वर्षांची राजमणी नावाची बहीण म्हणते: “येशूने किती काही सोसलं याबद्दल मी जेव्हा जेव्हा वाचते, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी येतं.” तुम्हालाही कदाचित असंच वाटेल. पण येशूने दिलेल्या बलिदानाचा तुम्ही जितका जास्त विचार कराल, त्यावर जितकं जास्त मनन कराल, तितकंच त्याच्यावरचं आणि त्याच्या पित्यावरचं तुमचं प्रेम वाढेल. खंडणीवर मनन करण्यासाठी तुमच्या वैयक्‍तिक अभ्यासात तुम्ही या विषयाचा सखोल अभ्यास करू शकता.

आपण दिलेल्या बलिदानाची आठवण कशी करावी हे शिष्यांना दाखवण्यासाठी येशूने एका साध्याशा भोजनाचा उपयोग केला (परिच्छेद १६ पाहा)

१६. खंडणीबद्दल इतरांना शिकवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१६ खंडणीबद्दल इतरांना शिकवा.  खंडणीबद्दल आपण इतरांना जितकं शिकवू तितकीच त्याबद्दलची आपली कदर वाढेल. येशूला का मरावं लागलं याबद्दल माहिती देणारी बरीच प्रकाशनं आणि व्हिडिओ आपल्याकडे आहेत. जसं की, देवाकडून आनंदाची बातमी!  या माहितीपत्रकातला चौथा पाठ. त्याचा विषय आहे: “येशू ख्रिस्त कोण आहे?” किंवा, बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?  या पुस्तकातला पाचवा अध्याय. त्याचा विषय आहे: “खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट.” याशिवाय, दरवर्षी येशूच्या स्मारकविधीला उपस्थित राहून आणि इतरांनाही त्याचं आमंत्रण देऊन खंडणीबद्दलची आपली कदर आपण आणखी वाढवू शकतो. खरंच, यहोवाने त्याच्या मुलाबद्दल इतरांना शिकवण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला दिला आहे!

१७. खंडणी ही देवाकडून मिळालेली एक मौल्यवान भेट का आहे?

१७ खरंच, खंडणीबद्दल कदर दाखवायची आणि ती वाढवत राहायची कितीतरी कारणं आपल्याकडे आहेत. खंडणीमुळेच, अपरिपूर्ण असतानाही आपल्याला यहोवासोबत जवळची मैत्री करणं शक्य झालं आहे. खंडणीमुळेच, सैतानाच्या सगळ्या कार्यांचा नाश केला जाईल. (१ योहा. ३:८) आणि खंडणीमुळेच, पृथ्वीसाठी असलेला यहोवाचा मूळ उद्देश पूर्ण होईल, संपूर्ण पृथ्वी नंदनवन बनेल आणि तिथे असलेला प्रत्येक जण यहोवावर प्रेम करणारा आणि त्याची उपासना करणारा असेल. तर मग, यहोवाकडून मिळालेल्या खंडणीच्या अनमोल भेटीबद्दल आपण दररोज कदर दाखवत राहू या.

गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो

^ परि. 5 येशूला इतका क्रूर आणि वेदनादायक मृत्यू का सहन करावा लागला? या प्रश्‍नाचं उत्तर या लेखात दिलं आहे. तसंच, खंडणीसाठी असलेली आपली कदर आपण आणखी कशी वाढवू शकतो हेसुद्धा आपण या लेखात पाहू.

^ परि. 6 एक अपराधी जिवंत असतानाच रोमी लोक त्याला वधस्तंभाला खिळायचे किंवा बांधायचे. आणि यहोवाने आपल्या मुलाला अशा प्रकारचं मरण सोसू दिलं.

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: तीन भाऊ चुकीच्या कामांना ‘नाही’ म्हणत आहेत. पहिला अश्‍लील चित्रं पाहायला, दुसरा सिगारेट ओढायला आणि तिसरा लाच घ्यायला ‘नाही’ म्हणत आहे.