वाचकांचे प्रश्न
येशूने आपल्या मृत्यूच्या काही वेळाआधी स्तोत्र २२:१ मधल्या शब्दांचा उल्लेख का केला?
आपल्या मृत्यूच्या काही वेळाआधी येशूने म्हटलं: “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?” (मत्त. २७:४६; मार्क १५:३४) असं म्हणून त्याने स्तोत्र २२:१ मधले दावीदचे शब्द पूर्ण केले. पण येशू हे शब्द का बोलला? तो निराश झाला होता का? काही काळासाठी त्याचा विश्वास कमी झाला होता का? नाही. आपल्याला का मरावं लागेल हे येशूला माहीत होतं, आणि त्यासाठी तो तयारही होता. (मत्त. १६:२१; २०:२८) त्याला हेसुद्धा माहीत होतं, की आपल्या मृत्यूच्या वेळी यहोवाला आपल्यावरचं ‘संरक्षण’ काढून घ्यावं लागेल. (ईयो. १:१०) यामुळे येशू हे सिद्ध करू शकणार होता, की आपल्याला कितीही वेदनादायक मरण आलं, तरी आपण शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू राहू.—मार्क १४:३५, ३६.
तर मग, येशूने २२ व्या स्तोत्रातल्या त्या शब्दांचा उल्लेख का केला? याचं नेमकं कारण आपल्याला माहीत नाही. पण त्याची कोणती काही कारणं असू शकतात त्याबद्दल आता आपण चर्चा करू या. *
या शब्दांचा उल्लेख करून येशू कदाचित हे सांगत असावा, की यहोवा त्याला मृत्यूपासून वाचवणार नाही. येशूला यहोवाच्या मदतीशिवाय खंडणीची किंमत द्यावी लागणार होती. तो एक मानव होता, आणि ‘सर्वांसाठी मृत्यूचा अनुभव’ घेण्याकरता त्याला मरणं आवश्यक होतं.—इब्री २:९.
त्या स्तोत्रातल्या काही शब्दांचा उल्लेख करून येशू कदाचित लोकांना त्या संपूर्ण स्तोत्राचा विचार करायला स्तो. २२:७, ८, १५, १६, १८, २४) इतकंच नाही, तर त्या स्तोत्रातल्या शेवटच्या काही वचनांमध्ये यहोवाची स्तुती करण्यात आली आहे आणि तो संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे असं सांगितलं आहे. तर या सगळ्या गोष्टी लोकांच्या आठवणीत आणून देण्यासाठी येशू कदाचित ते शब्द बोलला असेल.—स्तो. २२:२७-३१.
लावत असावा. त्या काळात यहुदी लोक सहसा बरीच स्तोत्रं तोंडपाठ करायचे. त्यामुळे एखाद्या स्तोत्रातलं एक जरी वचन कोणी लक्षात आणून दिलं, तर संपूर्ण स्तोत्र त्यांना आठवायचं. येशूला कदाचित हेच करायचं असेल. आणि म्हणून त्याने २२ व्या स्तोत्रातल्या काही शब्दांचा उल्लेख केला असावा. कारण त्या स्तोत्रात येशूच्या मृत्यूच्या वेळी कोणकोणत्या घटना घडतील हे सांगितलं होतं. (त्या शब्दांचा उल्लेख करून येशू कदाचित हेच सांगत असावा, की तो निर्दोष आहे. येशूच्या मृत्यूच्याआधी त्याच्यावर बेकायदेशीरपणे खटला चालवण्यात आला होता. आणि देवाची निंदा करण्याचा खोटा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. (मत्त. २६:६५, ६६) हा खटला रात्री उशिरा, अगदी घाईघाईने चालवण्यात आला. आणि हे कायद्याच्या साफ विरोधात होतं. (मत्त. २६:५९; मार्क १४: ५६-५९) येशू जेव्हा बोलला “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?” तेव्हा कदाचित तो हेच सांगत असावा, की आपल्याला अशा प्रकारची शिक्षा मिळावी असा कोणताच गुन्हा आपण केलेला नाही.
दावीदच्या शब्दांचा उल्लेख करून येशू कदाचित हेच सांगत असावा, की दावीदप्रमाणेच आपणसुद्धा यहोवाची पसंती गमावलेली नाही. दावीदला आपल्या जीवनात अनेक दुःखं सोसावी लागली. पण त्याचा अर्थ असा नव्हता, की त्याने यहोवाची पसंती गमावली होती. कारण “माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?” असा प्रश्न विचारल्यानंतर, यहोवा आपल्या सेवकांना वाचवणारा देव आहे, असा भरवसा त्याने आपल्या शब्दांतून व्यक्त केला. आणि खरंच, यहोवाने त्याला वाचवलं आणि अनेक आशीर्वादही दिले. (स्तो. २२:२३, २४, २७) त्याचप्रमाणे ‘दावीदच्या मुलाला,’ येशूलाही वधस्तंभावर अनेक दुःखं सोसावी लागली. पण त्याचा अर्थ असा होत नाही, की त्याने यहोवाची पसंती गमावली आहे. आणि हेच कदाचित येशूला सांगायचं होतं.—मत्त. २१:९.
आपल्याला आपली एकनिष्ठता सिद्ध करता यावी म्हणून यहोवाला आपल्यावरचं संरक्षण काढून घ्यावं लागत आहे, याचं दुःख कदाचित येशू व्यक्त करत असावा. आपल्या मुलाने दुःख आणि मरण सोसावं या उद्देशाने यहोवाने त्याला निर्माण केलं नव्हतं. आदाम आणि हव्वाने पाप केल्यानंतरच ही गरज निर्माण झाली. येशूने खरंतर कोणताही गुन्हा केला नव्हता. सैतानाने एदेन बागेत जो वादविषय निर्माण केला होता तो मिटवण्यासाठी, आणि आदामने जे गमावलं होतं ते परत मिळवण्याकरता खंडणीची किंमत देण्यासाठी, येशूला दुःख आणि मरण सोसणं गरजेचं होतं. (मार्क ८:३१; १ पेत्र २:२१-२४) यहोवाने काही वेळासाठी येशूवर असलेलं आपलं संरक्षण काढून घेतल्यावरच हे शक्य होणार होतं. यहोवाने आपल्या मुलाचं संरक्षण केलं नाही असं पहिल्यांदाच येशूच्या जीवनात घडणार होतं.
यहोवाने आपल्याला वधस्तंभावरचं मरण का सोसू दिलं याकडे कदाचित येशू लोकांचं लक्ष वेधत असावा. * येशूला माहीत होतं, की आपल्याला एखाद्या अपराध्यासारखं वधस्तंभावर मारलं जात आहे हे पाहून अनेक जण अडखळतील, त्यांचा विश्वास कमजोर होईल. (१ करिंथ. १:२३) पण आपल्या मृत्यूमागचं खरं कारण जर त्यांना समजलं, तर ते आपल्याला अपराधी नाही, तर तारण करणारा समजतील.—गलती. ३:१३, १४.
येशूने त्या स्तोत्रातले शब्द का म्हटले त्याचं कारण कोणतंही असो, एक गोष्ट मात्र त्याला नक्की माहीत होती. ती म्हणजे, अशा प्रकारचं मरण सोसून खरंतर तो यहोवाचीच इच्छा पूर्ण करत होता. म्हणूनच त्या स्तोत्रातले शब्द म्हटल्यानंतर येशू म्हणाला: “पूर्ण झालंय!” (योहा. १९:३०; लूक २२:३७) यहोवाने काही वेळासाठी येशूवरचं संरक्षण काढून घेतल्यामुळे येशूला ते सगळं पूर्ण करता आलं ज्यासाठी त्याला या पृथ्वीवर पाठवण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर “मोशेच्या नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांत आणि स्तोत्रांत जे काही लिहिलंय” ते सगळंही त्याला पूर्ण करता आलं.—लूक २४:४४.
^ परि. 2 याच अंकात, “येशूच्या शेवटच्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो?” हा लेख दिला आहे. त्यातले ९ आणि १० परिच्छेदसुद्धा पाहा.
^ परि. 8 येशू कधीकधी असं काहीतरी बोलायचा किंवा असे काही प्रश्न विचारायचा ज्यांमुळे लोकांच्या मनात काय आहे हे त्याला समजायचं. त्याला स्वतःला हे प्रश्न पडायचे असं नाही.—मार्क ७:२४-२७; योहा. ६:१-५; १५ ऑक्टोबर २०१० च्या टेहळणी बुरूज अंकातले पृष्ठं ४-५ पाहा.