वाचकांचे प्रश्न
शपथ घेण्याबद्दल बायबल काय म्हणतं?
शपथ म्हणजे, “सहसा देवाला साक्षीदार मानून . . . एखादी गोष्ट करण्याबद्दल केलेली अतिशय गंभीर आणि औपचारिक घोषणा किंवा जाहीरपणे केलेलं विधान किंवा दिलेलं वचन.” शपथ लेखी स्वरुपात असते किंवा बोलून घेतली जाते.
काही जणांना कदाचित शपथ घेणं चुकीचं आहे असं वाटेल. कारण येशूने म्हटलं होतं: “शपथच घेऊ नका . . . तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं. कारण यापेक्षा जे काही जास्त, ते त्या दुष्टाकडून आहे.” (मत्त. ५:३३-३७) येशूला माहीत होतं, की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे इस्राएली लोकांना काही बाबतीत शपथ घ्यावी लागायची आणि देवाच्या काही विश्वासू सेवकांनीही शपथ घेतली होती. (उत्प. १४:२२, २३; निर्ग. २२:१०, ११) तसंच, यहोवा देवानेसुद्धा शपथ घेतली होती, हेसुद्धा त्याला माहीत होतं. (इब्री ६:१३-१७) त्यामुळे साहजिकच आपण कधीच शपथ घेऊ नये असं येशूला या ठिकाणी नक्कीच म्हणायचं नव्हतं. उलट, क्षुल्लक गोष्टींसाठी किंवा विनाकारण शपथ न घेण्याबद्दल तो या ठिकाणी लोकांना सांगत होता. म्हणून दिलेला शब्द पाळणं ही एक पवित्र गोष्ट आहे असं आपण समजलं पाहिजे आणि दिलेलं वचन पाळलं पाहिजे.
मग तुम्हाला जेव्हा शपथ घ्यायला लावली जाते, तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? सर्वात आधी तुम्ही ज्या गोष्टीसाठी शपथ घेणार आहात, ती गोष्ट तुम्हाला पूर्ण करता येईल का याचा विचार करा. जर तुम्हाला खातरी नसेल तर तुम्ही शपथ न घेतलेलीच बरी. कारण देवाचं वचन आपल्याला अशी ताकीद देतं, की “नवस करून तो न फेडण्यापेक्षा, नवस न केलेलाच बरा.” (उप. ५:५) दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही ज्या गोष्टीसाठी शपथ घेणार आहात, त्याबद्दल शास्त्रवचनात कोणती तत्त्वं दिली आहेत ते विचारात घ्या आणि मग आपल्या प्रशिक्षित विवेकानुसार शपथ घ्यायची की नाही ते ठरवा. ही तत्त्वं कोणती आहेत बरं?
काही शपथा देवाच्या इच्छेनुसार असतात. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार लग्नाच्या वेळी शपथा घेतात. ज्यांचं लग्न होत आहे, ते देवासमोर आणि इतर उपस्थित लोकांसमोर अशी शपथ घेतात, की ते दोघंही जोपर्यंत ‘पृथ्वीवर एकत्र राहतील तोपर्यंत’ एकमेकांना प्रेम आणि आदर दाखवतील आणि एकमेकांचा सांभाळ करतील. (काही ठिकाणी हे शब्द थोडे वेगळे जरी असले तरी लग्न करणारं जोडपं देवासमोर शपथ घेत असतं.) आणि यानंतर त्यांना पती-पत्नी म्हणून घोषित केलं जातं. आणि त्यांचं वैवाहिक नातं आयुष्यभर राहील असं समजलं जातं. (उत्प. २:२४; १ करिंथ. ७:३९) अशा प्रकारे शपथ घेणं योग्य आणि देवाच्या इच्छेनुसार आहे.
काही शपथा देवाच्या इच्छेनुसार नसतात. काही देशांमध्ये देशाच्या संरक्षणासाठी शस्त्र हातात घेऊन लढण्याची शपथ घ्यायला सांगितली जाऊ शकते. किंवा ‘इथून पुढे मी यहोवा देवाला मानणार नाही,’ असं लेखी किंवा तोंडी स्वरूपात मागितलं जाऊ शकतं. पण एक ख्रिस्ती व्यक्ती अशी शपथ कधीच घेणार नाही. असं करणं म्हणजे देवाची आज्ञा मोडणं आहे. कारण ख्रिस्ती लोक ‘जगाचा भाग नसल्यामुळे,’ ते राजनैतिक वादविवादांमध्ये आणि युद्धांमध्ये सहभाग घेत नाहीत.—योहा. १५:१९; यश. २:४; याको. १:२७.
काही शपथा विवेकानुसार घेतल्या जातात. काही वेळा शपथ घ्यायची की नाही हे ठरवण्याआधी आपण “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या,” या येशूच्या सल्ल्याचा विचार करणं गरजेचं आहे.—उदाहरणार्थ, असं समजा की एका ख्रिस्ती व्यक्तीने नागरिकत्व मिळवण्यासाठी किंवा पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. आणि तेव्हा तिला कळतं, की त्यासाठी देशाला एकनिष्ठ राहायची शपथ तिला घ्यावी लागणार आहे. अशा वेळी जर ती शपथ देवाच्या नियमांविरुद्ध असेल, तर त्या ख्रिस्ती व्यक्तीचा बायबल प्रशिक्षित विवेक तिला ती शपथ घेऊ देणार नाही. पण काही वेळा त्या देशाची न्याय व्यवस्था तिला त्या शपथेत आपल्या विवेकानुसार योग्य तो बदल करण्याची अनुमती देते. अशा वेळी, कदाचित तिचा विवेक तिला शपथ घेण्याची अनुमती देईल.
अशा प्रकारे योग्य तो बदल करून घेतलेली शपथ रोमकर १३:१ मध्ये सांगितलेल्या तत्त्वानुसार असेल. या वचनात म्हटलं आहे, की “प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावं.” त्यामुळे एखादी ख्रिस्ती व्यक्ती असा विचार करेल, की ‘जर देवानेच अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहायला सांगितलं आहे आणि तसं केल्यामुळे देवाचा दुसरा कोणताही नियम मोडला जाणार नाहीए तर शपथ घेण्यात काय हरकत आहे?’
शपथ घेताना एखाद्या चिन्हाचा वापर केला जात असेल किंवा हात पुढे करून किंवा छातीवर ठेवून शपथ घेतली जाणार असेल, तर अशा वेळीही आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाच्या आधारावर निर्णय घेणं गरजेचं आहे. प्राचीन काळातले रोमी आणि स्कुथी लोक चिन्ह म्हणून तलवारीचा वापर करायचे आणि शपथ घ्यायचे. युद्ध देवतेला साक्षीदार मानून आपण शपथ घेत आहोत, हे दाखवण्यासाठी ते असं करायचे. तसंच, ग्रीक लोक स्वर्गाकडे हात वर करून शपथ घ्यायचे. कारण ते असं मानायचे, की स्वर्गात असलेला देव आपण काय शपथ घेत आहोत आणि आपण ती पूर्ण करत आहोत की नाही, ते पाहत आहे. शिवाय, आपण ती पूर्ण केली नाही तर तो आपल्याला जाब विचारेल असंही ते मानायचे.
पण एक यहोवाचा साक्षीदार कधीच कोणत्याही राष्ट्रीय चिन्हाचा वापर करून शपथ घेणार नाही. कारण ते खोट्या उपासनेशी संबंधित आहे. पण समजा तुम्हाला कोर्टात बायबलवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली तर काय? अशा वेळी, कदाचित तुम्ही या प्रकारे शपथ घ्यायला तयार व्हाल. कारण बायबल काळातल्या काही विश्वासू सेवकांनीही काहीतरी कृती करून शपथ घेतली होती. (उत्प. २४:२, ३, ९; ४७:२९-३१) पण असं करताना तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, की तुम्ही देवासमोर शपथ घेत आहात. म्हणून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना खरं बोललं पाहिजे.
यहोवासोबत असलेलं आपलं नातं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला शपथ घ्यायला सांगितली जाते तेव्हा आपण प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. तसंच आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाला त्यामुळे कोणतंही अडखळण होणार नाही किंवा बायबलच्या कोणत्याही तत्त्वाविरुद्ध आपण जाणार नाही याची खातरी केली पाहिजे. जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली पाहिजे हे कधीही विसरू नका.—१ पेत्र २:१२.