वाचकांचे प्रश्न
एक ख्रिस्ती पती घटस्फोटासाठी शास्त्रवचनीय कारण नसताना आपल्या पत्नीला घटस्फोट देतो आणि दुसरं लग्न करतो तर त्या लग्नाबद्दल आणि आधीच्या लग्नाबद्दल मंडळीचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे?
अशा परिस्थितीत मंडळीने, आधीचा विवाह संपुष्टात आला आहे आणि नवीन विवाह आता अधिकृत आहे असं समजावं. असं मानण्याचं काय कारण आहे, हे समजून घेण्यासाठी येशूने घटस्फोटाबद्दल आणि पुन्हा विवाह करण्याबद्दल काय म्हटलं ते आपण पाहू या.
घटस्फोटासाठी एकमेव कारण देताना येशूने मत्तय १९:९ मध्ये असं म्हटलं: “जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या बायकोला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.” येशूच्या या शब्दांवरून आपल्याला दोन गोष्टी कळतात. (१) लैंगिक अनैतिकता हे घटस्फोट घेण्यासाठी एकमेव शास्त्रवचनीय कारण आहे. आणि (२) जो पुरूष आपल्या पत्नीला या शास्त्रवचनीय कारणाशिवाय घटस्फोट देऊन दुसरं लग्न करतो तो व्यभिचार करतो. a
पण येशूच्या या शब्दांचा असा अर्थ होतो का, की ज्या व्यक्तीने व्यभिचार केला आहे आणि आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे, त्याला शास्त्रवचनाच्या आधारावर पुन्हा लग्न करण्याची सूट आहे? प्रत्येक बाबतीतच असं म्हणता येणार नाही. जेव्हा पती व्यभिचार करतो तेव्हा त्याची पत्नी म्हणजे निर्दोष जोडीदार त्याला माफ करायचा किंवा त्याला सोडून द्यायचा निर्णय घेऊ शकते. जर ती त्याला सोडून द्यायचा निर्णय घेते आणि त्यासाठी कायदेशीर घटस्फोट घेते, तेव्हा ते दोघंही घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहेत.
याउलट, निर्दोष जोडीदाराला तिचा विवाह टिकवून ठेवायची प्रामाणिक इच्छा असल्यामुळे कदाचित ती आपल्या पतीला माफ करायला तयार असेल. पण अशा वेळी, व्यभिचार केलेला तिचा पती जर ते स्वीकारायला तयार नसेल आणि पत्नीच्या संमतीशिवाय घटस्फोट घेत असेल, तर काय? पत्नी तिच्या पतीला माफ करायला आणि आपला विवाह टिकवून ठेवायला तयार असल्यामुळे, या परिस्थितीत पतीला दुसरं लग्न करण्यासाठी कोणताही शास्त्रवचनीय आधार उरत नाही. तरीसुद्धा जर तो दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करून शास्त्रवचनांच्या विरोधात जातो तेव्हा तो पुन्हा एकदा व्यभिचार करतो. त्यामुळे मंडळीद्वारे त्याच्यावर पुन्हा एकदा न्यायिक कारवाई केली जाते.—१ करिंथ. ५:१, २; ६:९, १०.
जेव्हा पती अशा प्रकारे कोणतंही शास्त्रवचनीय कारण नसताना पुन्हा लग्न करतो, तेव्हा मंडळीने आधीच्या विवाहाला आणि त्याच्या नवीन विवाहाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? शास्त्रवचनाच्या दृष्टीने पहिला विवाह अजूनही अधिकृत आहे असं म्हणता येईल का? निर्दोष जोडीदार म्हणजे त्याची पत्नी अजूनही आपल्या पतीला माफ करायचा किंवा त्याला सोडून द्यायचा निर्णय घेऊ शकते का? तसंच, पतीने केलेलं नवीन लग्न व्यभिचार आहे असं समजलं जावं का?
पूर्वी आपण असं मानायचो, की जोपर्यंत निर्दोष जोडीदार म्हणजे पत्नी जिवंत आहे, अविवाहित आहे आणि तिच्यावर लैंगिक अनैतिकतेचा दोष नाही, तोपर्यंत पतीने केलेला नवीन विवाह व्यभिचार आहे. पण येशू जेव्हा घटस्फोटाबद्दल आणि पुन्हा लग्न करण्याबद्दल बोलत होता तेव्हा त्याने निर्दोष जोडीदाराबद्दल काहीही सांगितलं नाही. उलट, त्याने सांगितलं, की जी व्यक्ती शास्त्रवचनीय कारण नसताना घटस्फोट घेते आणि दुसरं लग्न करते, ती व्यभिचार करते.
अशा परिस्थितीत, घटस्फोट घेणं आणि दुसरं लग्न करणं हे व्यभिचार करण्यासारखंच आहे असं येशूने सांगितल्यामुळे, आधीचा विवाह संपुष्टात येईल.“जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या बायकोला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”—मत्त. १९:९
जेव्हा पती घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करतो तेव्हा त्याच्या निर्दोष जोडीदाराला म्हणजे पत्नीला त्याला माफ करायची किंवा सोडून द्यायची शक्यताच उरत नाही. कारण तो विवाह आता संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे आपल्या पतीला माफ करायचा किंवा सोडून द्यायचा कठीण निर्णय तिला घ्यायची गरज पडणार नाही. म्हणून पतीने केलेल्या नवीन विवाहाला मंडळी कोणत्या दृष्टीने पाहील, हे निर्दोष जोडीदार अजून जिवंत आहे का, तिने दुसरं लग्न केलं आहे का किंवा तिच्या हातून व्यभिचार झाला आहे का, या गोष्टींवर अवलंबून नसेल. b
आतापर्यंत चर्चा केलेल्या उदाहरणात, पतीने व्यभिचार केला होता आणि त्याने घटस्फोट घेतला होता. पण पतीने व्यभिचार केला नसेल आणि तरीही घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं असेल, तर काय? किंवा घटस्फोट घेण्याआधी त्याने व्यभिचार केला नसेल पण घटस्फोटानंतर त्याने व्यभिचार करून त्याची पत्नी त्याला माफ करायला तयार असतानासुद्धा दुसरं लग्न केलं असेल तर काय? तर या सगळ्या परिस्थितींमध्ये पतीने घेतलेला घटस्फोट आणि दुसरं लग्न व्यभिचार असल्यामुळे त्याचा पूर्वीचा विवाह संपुष्टात येतो. आणि त्याने केलेला नवीन विवाह आता कायदेशीर आहे असं मानलं जाईल. १५ नोव्हेंबर १९७९ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकात, पान ३२ वर असं म्हटलं होतं, की “आता पतीने नवीन लग्न केलं असल्यामुळे तो हे लग्न मोडू शकत नाही आणि परत पूर्वीसारखं आपल्या आधीच्या पत्नीसोबत राहू शकत नाही. कारण त्याचा पहिला विवाह घटस्फोट, व्यभिचार आणि दुसरं लग्न केल्यामुळे संपुष्टात आला आहे.”
ही सुधारित समज मिळाल्यामुळे विवाहाचं पावित्र्य किंवा व्यभिचाराची गंभीरता कमी होत नाही. जो पती आपल्या पत्नीला शास्त्रवचनीय कारणाशिवाय घटस्फोट देतो आणि दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करतो, त्याच्यावर व्यभिचाराच्या कृत्यामुळे मंडळीत न्यायिक कारवाई केली जाईल. (त्याने ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे, तीसुद्धा ख्रिस्ती असेल तर तिने अनैतिक लैंगिक कृत्य केल्यामुळे तिच्यावरही मंडळीत न्यायिक कारवाई केली जाईल.) त्याने केलेल्या दुसऱ्या लग्नाला आता व्यभिचार समजलं जाणार नसलं, तरी मंडळीत बरीच वर्षं त्याला कोणत्याही खास जबाबदाऱ्या दिल्या जाणार नाहीत. तसंच कोणतीही खास जबाबदारी देण्याआधी, मंडळीतले वडील अशा काही प्रश्नांवर विचार करतील. जसं की, ‘मंडळीतले भाऊबहीण आणि त्याला ओळखणारे लोक त्याने केलेल्या वाईट गोष्टीमुळे अजूनही दुखावलेले आहेत का? झालेल्या गोष्टी मागे सोडून आता ते त्याचा आदर करतात का? सध्या त्याच्या पहिल्या पत्नीच्या भावना आणि तिची परिस्थिती कशी आहे? पहिलं लग्न मोडण्यासाठी त्याने धूर्तपणे वागून तिला घटस्फोट दिला होता का?’ तसंच, पहिल्या लग्नातून झालेलं मूल त्याने सोडून दिलं असेल आणि ते अजूनही अल्पवयीन असेल तर या गोष्टीचाही वडील विचार करतील.—मला. २:१४-१६.
शास्त्रवचनीय कारण नसताना घेतलेल्या घटस्फोटामुळे आणि दुसरं लग्न केल्यामुळे होणारे परिणाम खूप गंभीर असू शकतात. म्हणून ख्रिस्ती लोक विवाहाच्या व्यवस्थेबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगून त्याचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतात.—उप. ५:४, ५; इब्री १३:४.
a समजायला सोपं जावं म्हणून आपण व्यभिचार करणारी व्यक्ती पुरुष आहे आणि निर्दोष विवाहसोबती स्त्री आहे असं समजू या. पण मार्क १०:११, १२ मध्ये येशूने हे स्पष्ट केलं आहे, की त्याने दिलेला हा सल्ला स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही लागू होतो.
b यामुळे निर्दोष जोडीदार जोपर्यंत जिवंत आहे, दुसरं लग्न करत नाही किंवा तिच्या हातून व्यभिचार होत नाही तोपर्यंत नवीन विवाह व्यभिचारच आहे, अशी आपली जी आधीची समज होती, ती आता बदलली आहे.