व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १७

जीवनातल्या अनपेक्षित समस्यांना तोंड द्यायला यहोवा तुम्हाला मदत करेल

जीवनातल्या अनपेक्षित समस्यांना तोंड द्यायला यहोवा तुम्हाला मदत करेल

“नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग येतात, पण त्या सर्वांतून यहोवा त्याला वाचवतो.”​—स्तो. ३४:१९.

गीत ४४ दीन माणसाची प्रार्थना

सारांश a

१. आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी आहे?

 यहोवाचे लोक असल्यामुळे आपल्याला माहीत आहे, की त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण सगळ्यात चांगलं जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. (रोम. ८:३५-३९) शिवाय, बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला फायदाच होतो हेही आपल्याला चांगलं माहीत आहे. (यश. ४८:१७, १८) पण आपण अपेक्षा केलेली नसते अशा समस्या आपल्यावर येतात, तेव्हा काय?

२. आपल्यावर कोणकोणत्या समस्या येऊ शकतात, आणि त्यामुळे आपल्याला कसं वाटू शकतं?

यहोवाच्या सगळ्याच सेवकांना कुठल्या ना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, कुटुंबातली एखादी व्यक्‍ती आपलं मन दुखावू शकते. किंवा आपल्याला एखाद्या गंभीर आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. आणि त्यामुळे आपल्याला यहोवाची सेवा म्हणावी तशी करता येत नसेल. किंवा मग आपल्याला नैसर्गिक विपत्तीचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपलं बरंच नुकसान होऊ शकतं. किंवा आपल्या विश्‍वासामुळे आपला छळ होऊ शकतो. जेव्हा आपण अशा प्रकारच्या परिस्थितींचा सामना करतो तेव्हा आपल्याला कदाचित वाटेल, ‘हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? मी काही चुकीचं तर केलं नाही ना? यहोवा माझ्यावर नाराज तर नाही ना?’ तुम्हालाही असं कधी वाटलंय का? जर वाटलं असेल तर निराश होऊ नका. यहोवाच्या बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांना अशाच प्रकारच्या परिस्थितींमधून जावं लागलं आणि त्यांच्यासुद्धा अशाच भावना होत्या.​—स्तो. २२:१, २; हब. १:२, ३.

३. स्तोत्र ३४:१९ मधून आपल्याला काय शिकायला मिळतं?

स्तोत्र ३४:१९ वाचा. या स्तोत्रात दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत: (१) नीतिमान लोकांना संकटांचा सामना करावा लागतो. आणि (२) यहोवा आपल्याला त्या संकटांमधून सोडवतो. पण यहोवा हे कसं करतो? एक मार्ग म्हणजे, या जगात जगत असताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य ठेवण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. त्याची सेवा करत असताना आपल्याला आनंद मिळेल असं वचन यहोवा आपल्याला देतो. पण आपल्या जीवनात समस्या येणारच नाहीत असं त्याने कधीच म्हटलेलं नाही. (यश. ६६:१४) यहोवाची इच्छा आहे, की आपण भविष्याचा, म्हणजे अशा काळाचा विचार करावा जेव्हा आपल्याला आनंदाने कायमचं जीवन जगता येईल. (२ करिंथ. ४:१६-१८) पण तोपर्यंत त्याची सेवा करत राहण्यासाठी तो आपल्याला दररोज मदत करतो.​—विलाप. ३:२२-२४.

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

तर चला, आपण बायबल काळातल्या आणि आपल्या काळातल्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांवरून काय शिकायला मिळतं त्यावर चर्चा करू या. आणि अनपेक्षित समस्यांचा सामना करत असतानाही आपण यहोवावर भरवसा ठेवतो, तेव्हा तो आपल्याला टिकून राहायला कशी मदत करतो हेही पाहू या. (स्तो. ५५:२२) तसंच, ही चर्चा करत असताना तुम्हाला या प्रश्‍नांवरही विचार करता येईल: ‘माझ्यावरही अशीच परिस्थिती आली असती तर मी कसं वागलो असतो? या उदाहरणांमुळे यहोवावरचा माझा भरवसा कसा मजबूत होतो? यातून शिकायला मिळणारे कोणते धडे मी माझ्या जीवनात लागू करू शकतो?’

बायबल काळात

याकोब २० वर्षं आपल्या मामासाठी, लाबानसाठी कष्ट करत होता. त्या काळात लाबान त्याला फसवत राहिला, पण यहोवा त्याला आशीर्वाद देत राहिला (परिच्छेद ५ पाहा)

५. लाबानमुळे याकोबला कोणकोणत्या गोष्टी सहन कराव्या लागल्या? (सुरवातीचं चित्र पाहा.)

बायबल काळात यहोवाच्या सेवकांना अशा समस्यांचा सामना करावा लागला, ज्यांची त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती. याकोबचाच  विचार करा. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं, की त्याने यहोवाची सेवा करणाऱ्‍या त्याच्या नातेवाइकाकडे, लाबानकडे जावं आणि त्याच्या मुलींपैकी एकीशी लग्न करावं, म्हणजे मग यहोवा त्याला भरभरून आशीर्वाद देईल. (उत्प. २८:१-४) आणि याकोबनेही तसंच केलं. त्याने कनान देश सोडला आणि तो लाबानच्या घरी गेला. लाबानला दोन मुली होत्या, लेआ आणि राहेल. याकोब लाबानची लहान मुलगी राहेल हिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करता यावं म्हणून तो लाबानसाठी सात वर्षं काम करायला तयार झाला. (उत्प. २९:१८) पण याकोबने अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडलं. लाबानने याकोबला फसवलं आणि त्याच्या मोठ्या मुलीशी, म्हणजे लेआशी त्याचं लग्न लावून दिलं. मग त्याने याकोबला सांगितलं, की पुढच्या आठवड्यात तो राहेलशीही त्याचं लग्न लावून देईल, पण त्यासाठी त्याला आणखी सात वर्षं काम करावं लागेल. (उत्प. २९:२५-२७) इतकंच नाही, तर पुढे जेव्हा याकोब त्याच्यासाठी काम करत होता तेव्हासुद्धा त्याने त्याला फसवलं. तर असं म्हणता येईल की एकूण वीस वर्षं लाबान याकोबसोबत चुकीचं वागत राहिला.​—उत्प. ३१:४१, ४२.

६. याकोबला आणखी कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं?

याकोबला त्याच्या आयुष्यात पुढे आणखी समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्याचं एक मोठं कुटुंब होतं, पण त्याच्या मुलांचं एकमेकांशी पटत नव्हतं. एकदा तर त्यांनी त्यांच्या भावाला, म्हणजे योसेफला दास म्हणून विकलं. त्याची दोन मुलं शिमोन आणि लेवी यांनी त्याच्या घराण्याची बदनामी केली आणि यहोवाच्या नावाला कलंक लावला. तसंच, याकोबचं जिच्यावर प्रेम होतं, त्या राहेलचाही दुसऱ्‍या मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. आणि जेव्हा अतिशय भयानक दुष्काळ पडला होता, तेव्हा त्याला त्याच्या म्हातारपणी स्वतःचा देश सोडून जावं लागलं.​—उत्प. ३४:३०; ३५:१६-१९; ३७:२८; ४५:९-११, २८.

७. यहोवा नेहमी याकोबसोबत होता हे त्याने कसं दाखवून दिलं?

या सबंध काळात याकोबने यहोवावरचा आणि त्याच्या अभिवचनावरचा विश्‍वास जराही कमी होऊ दिला नाही. आणि यहोवानेही याकोबवर त्याची कृपा असल्याचं दाखवून दिलं. उदाहरणार्थ, लाबानने याकोबला व्यवहारात फसवलं, पण यहोवाने याकोबला आशीर्वाद दिला आणि त्याची भरभराट झाली. शिवाय याकोबला वाटत होतं, की आपला मुलगा योसेफ मेलाय. पण विचार करा की जेव्हा योसेफशी त्याची पुन्हा भेट झाली असेल, तेव्हा त्याने यहोवाचे किती आभार मानले असतील! खरंच, यहोवाशी याकोबचं जवळचं नातं असल्यामुळे त्याला सगळ्या समस्यांचा यशस्वीपणे सामना करता आला. (उत्प. ३०:४३; ३२:९, १०; ४६:२८-३०) आपणसुद्धा यहोवासोबत असलेलं आपलं जवळचं नातं टिकवून ठेवलं, तर जीवनात येणाऱ्‍या अनपेक्षित समस्यांना आपल्यालाही यशस्वीपणे तोंड देता येईल.

८. दावीद राजाला काय करायची इच्छा होती?

दावीद राजाने  यहोवाच्या सेवेत जे काही करायचं ठरवलं होतं ते सगळंच त्याला करता आलं नाही. उदाहरणार्थ, यहोवासाठी मंदिर बांधायची त्याची मनापासून इच्छा होती. त्याच्या या इच्छेबद्दल त्याने नाथान संदेष्ट्यालासुद्धा सांगितलं होतं. यावर नाथान त्याला म्हणाला: “तुझ्या मनात आहे तसं कर. कारण खरा देव तुझ्याबरोबर आहे.” (१ इति. १७:१, २) विचार करा या शब्दांमुळे दावीदला किती प्रोत्साहन मिळालं असेल! त्याने लगेचच मंदिर बांधायच्या मोठ्या कामाची योजना करायला सुरवात केली असेल.

९. दावीदने अपेक्षा केली नव्हती अशी बातमी त्याला ऐकायला मिळते तेव्हा तो काय करतो?

पण लवकरच नाथान संदेष्टा दावीदकडे येतो आणि दावीदने अपेक्षा केली नव्हती अशी एक गोष्ट त्याला सांगतो. “त्याच रात्री” यहोवाने नाथानला सांगितलं की दावीद नाही, तर त्याच्या जागी त्याचा मुलगा मंदिर बांधेल. (१ इति. १७:३, ४, ११, १२) दावीदने हे ऐकलं तेव्हा त्याने काय केलं? तो निराश झाला नाही, तर त्याने लगेच त्याच्या योजनेत बदल केला. त्याने आपला मुलगा शलमोन याला मंदिर बांधण्यासाठी जे साहित्य आणि पैसे लागणार होते ते जमा करायला सुरवात केली.​—१ इति. २९:१-५.

१०. यहोवाने दावीदला कशा प्रकारे आशीर्वाद दिला?

१० दावीदला मंदिर बांधता येणार नाही हे सांगितल्यानंतर लगेचच यहोवाने त्याच्यासोबत एक करार केला. यहोवाने दावीदला वचन दिलं, की त्याच्या वंशातून असा एक जण येईल जो कायम राज्य करेल. (२ शमु. ७:१६) नवीन जगात हजार वर्षांच्या राज्यादरम्यान जेव्हा दावीदला उठवलं जाईल आणि त्याला कळेल की येशू आपल्याच वंशातला होता, तेव्हा त्याला किती आनंद होईल! या अहवालातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे, यहोवाच्या सेवेत आपल्याला जे काही करायची इच्छा आहे ते सगळं जरी आपल्याला करता येत नसलं, तरी आपल्याला निराश व्हायची गरज नाही. कारण आपण कल्पनाही केली नसेल, असे आशीर्वाद कदाचित यहोवा आपल्याला देईल.

११. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी अपेक्षा केल्याप्रमाणे देवाचं राज्य आलं नाही, तरी त्यांना कशा प्रकारे यहोवाचा आशीर्वाद पाहायला मिळाला? (प्रेषितांची कार्यं ६:७)

११ पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनासुद्धा  अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागला. उदाहरणार्थ, ते देवाच्या राज्याची आतुरतेने वाट पाहत होते, पण ते राज्य कधी येईल हे त्यांना माहीत नव्हतं. (प्रे. कार्यं १:६, ७) मग त्यांनी काय केलं? ते प्रचारकार्य करण्यात व्यस्त राहिले. आणि राज्याचा संदेश जसजसा पसरत गेला तसतसं यहोवा आपल्याला कसं आशीर्वादित करत आहे याचे पुरावे त्यांना पाहायला मिळाले.​—प्रेषितांची कार्यं ६:७ वाचा.

१२. दुष्काळ पडला तेव्हा पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी काय केलं?

१२ एक वेळ अशी आली जेव्हा “संपूर्ण पृथ्वीवर” मोठा दुष्काळ पडला होता. (प्रे. कार्यं ११:२८) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनाही त्याची झळ बसली. या दुष्काळामुळे झालेल्या अन्‍नटंचाईने त्यांचे किती हाल झाले असतील याची तुम्ही कल्पना करू शकता का? आपल्या कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या याची चिंता कुटुंबप्रमुखांना पडली असेल. शिवाय ज्या तरुणांना यहोवाची आणखी सेवा करायची इच्छा होती त्यांच्यावरसुद्धा या परिस्थितीचा प्रभाव पडला असेल. त्यांनी कदाचित असा विचार केला असेल, की हा दुष्काळ संपल्याशिवाय आपल्याला सेवा पुढे वाढवता येणार नाही. पण परिस्थिती कशीही असली तरी या ख्रिश्‍चनांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं. ते जमेल त्या मार्गाने प्रचार करत राहिले आणि त्यांच्याकडे जे काही होतं ते त्यांनी आपसात वाटून घेतलं​—प्रे. कार्यं ११:२९, ३०.

१३. दुष्काळाच्या काळात पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी कोणते आशीर्वाद अनुभवले?

१३ दुष्काळाच्या या सबंध काळात ख्रिश्‍चनांना कशा प्रकारे यहोवाचे आशीर्वाद मिळाले? ज्या भाऊबहिणींना मदतकार्य पुरवण्यात आलं त्यांनी स्वतः हे अनुभवलं, की यहोवा त्यांना कशा प्रकारे मदत करत आहे. (मत्त. ६:३१-३३) त्यांना मदत करणाऱ्‍या भाऊबहिणींसोबत त्यांचं नातं नक्कीच घट्ट झालं असेल. आणि ज्या भाऊबहिणींनी त्यांच्यासाठी दान दिलं किंवा इतर मार्गांनी मदत केली, त्यांनासुद्धा ‘देण्यात जास्त आनंद आहे’ या गोष्टीचा अनुभव आला असेल. (प्रे. कार्यं २०:३५) खरंच, कठीण परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्‍या या सगळ्या भाऊबहिणांना यहोवाने भरपूर आशीर्वाद दिले.

१४. बर्णबा आणि पौल यांच्यासोबत काय घडलं, आणि त्याचे काय परिणाम झाले? (प्रे. कार्यं १४:२१, २२)

१४ पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना बऱ्‍याच वेळा छळाचासुद्धा सामना करावा लागला, आणि तेही त्यांनी अपेक्षा केली नव्हती तेव्हा. बर्णबा आणि प्रेषित पौल जेव्हा लुस्त्रमध्ये प्रचार करत होते तेव्हा काय घडलं त्याचा विचार करा. सुरवातीला लोकांनी त्यांचं ऐकलं आणि त्यांचं स्वागतही केलं. पण नंतर विरोधकांनी “लोकांना भडकवलं” आणि ज्या लोकांनी त्यांचं आधी ऐकलं होतं त्यांनी प्रेषित पौलला दगडमार केला आणि तो मेला आहे असं समजून ते त्याला सोडून गेले. (प्रे. कार्यं १४:१९) असं असलं तरी बर्णबा आणि प्रेषित पौल दुसऱ्‍या ठिकाणी प्रचार करत राहिले. याचा काय परिणाम झाला? त्यांनी “पुष्कळ जणांना शिष्य” बनवलं आणि त्यांच्या शब्दांमुळे आणि उदाहरणामुळे बऱ्‍याच भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत झाला. (प्रेषितांची कार्यं १४:२१, २२ वाचा.) बर्णबा आणि प्रेषित पौल यांनी अचानक आलेल्या छळामुळेसुद्धा हार मानली नाही. आणि त्यामुळे बऱ्‍याच भाऊबहिणांना फायदा झाला. आज आपणही हार न मानता यहोवाने जे सांगितलंय ते करत राहिलो, तर तो आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल.

आजच्या काळात

१५. ब्रदर मॅकमिलन यांच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?

१५ १९१४ च्या आधीच्या वर्षांमध्ये, काही गोष्टींच्या बाबतींत यहोवाच्या लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. उदाहरणार्थ, ब्रदर ए. एच. मॅकमिलन यांचाच विचार करा. इतर जणांप्रमाणे ब्रदर मॅकमिलन यांनासुद्धा असंच वाटत होतं, की आता आपल्यालाही स्वर्गात घेतलं जाईल. सप्टेंबर १९१४ मध्ये त्यांनी दिलेल्या एका भाषणात असं म्हटलं, “हे कदाचित माझं शेवटचं भाषण असेल.” पण साहजिकच ते त्यांचं शेवटचं भाषण नव्हतं. याबद्दल ब्रदर मॅकमिलन यांनी नंतर लिहिलं: “आमच्यापैकी काही जणांनी आपण लगेचच स्वर्गात जाणार आहोत असा निष्कर्ष काढायला खूपच घाई केली होती. खरंतर असे निष्कर्ष काढण्याऐवजी आम्ही प्रभूच्या कामात व्यस्त असण्याची गरज होती.” ब्रदर मॅकमिलन यांनी तसंच केलं. ते आवेशाने प्रचार करत राहिले आणि जे भाऊबहीण युद्धात भाग न घेतल्यामुळे तुरुंगात होते त्यांना प्रोत्साहन देण्याची खास संधी त्यांना मिळाली. त्यांचं वय झालं होतं, तरीसुद्धा ते मंडळीच्या सभांना येत राहिले. आपली आशा पूर्ण होण्याची वाट पाहण्यासोबतच ब्रदर मॅकमिलन प्रचारकार्याचं काम आवेशाने करत राहिले. यामुळे त्यांना कसा फायदा झाला? १९६६ मध्ये आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी त्यांनी असं लिहिलं: “माझा विश्‍वास आजही तितकाच भक्कम आहे जितका आधी होता.” खरंच, आपल्याही आशा लांबणीवर पडतात तेव्हा ब्रदर मॅकमिलन यांच्या मनोवृत्तीचं आपण अनुकरण करू शकतो.​—इब्री १३:७.

१६. ब्रदर जेनिंग्सना आणि त्यांच्या पत्नीला कोणत्या अनपेक्षित परिस्थितीला तोंड द्यावं लागलं? (याकोब ४:१४)

१६ यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांना अचानक आलेल्या समस्यांनासुद्धा तोंड द्यावं लागतं. ब्रदर हर्बर्ट जेनिंग्स b यांच्या बाबतीत काय घडलं याचा विचार करा. ब्रदर हर्बर्ट आणि त्यांच्या पत्नीने घाना इथे मिशनरी सेवा केली होती. आणि त्यामुळे त्यांना किती आनंद झाला याबद्दल त्यांनी त्यांच्या जीवनकथेत सांगितलंय. पण काही काळानंतर त्यांना एक गंभीर मानसिक आजार असल्याचं समजलं. याकोब ४:१४ चा संदर्भ घेऊन ब्रदर जेनिंग्स यांनी आपल्या या परिस्थितीला “अपेक्षा न केलेला ‘उद्याचा दिवस’” असं म्हटलं. (वाचा.) ते पुढे लिहितात, “आहे ती परिस्थिती स्वीकारून आम्ही घानामधली आमची नेमणूक आणि जवळच्या मित्रांना सोडून उपचारासाठी कॅनडाला गेलो.” अशा परिस्थितीचा सामना करत असतानासुद्धा यहोवाने ब्रदर जेनिंग्सना आणि त्यांच्या पत्नीला विश्‍वासूपणे सेवा करत राहायला मदत केली.

१७. ब्रदर जेनिंग्सच्या उदाहरणामुळे काही भाऊबहिणींना कसा फायदा झाला?

१७ ब्रदर जेनिंग्स यांनी त्यांच्या जीवन कथेत मोकळ्या मनाने जे म्हटलं त्याचा इतरांवर खूप चांगला प्रभाव पडला. याबद्दल एक बहीण म्हणते: “या लेखाची माझ्या मनावर खूपच जबरदस्त छाप पडली. ब्रदर जेनिंग्सना त्यांच्या आजारपणामुळे त्यांची नेमणूक सोडावी लागली. हे वाचून मलाही माझ्या परिस्थितीबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला मदत झाली.” आणखी एका बांधवाने असं लिहिलं: “मंडळीत दहा वर्षं वडील म्हणून सेवा केल्यानंतर मला ती जबाबदारी माझ्या मानसिक आजारामुळे सोडावी लागली. आणि त्यामुळे कमीपणाची भावना मला इतकी सतावत होती आणि मी इतक निराश झालो होतो, की मी जीवन कथा वाचायचंच सोडून दिलं होतं. पण ब्रदर जेनिंग्स त्यांच्या परिस्थितीत ज्या प्रकारे टिकून राहिले त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं.” यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे, जेव्हा आपल्याला अनपेक्षित प्रसंगांचा सामना करावा लागतो तेव्हासुद्धा आपण इतरांना उत्तेजन देऊ शकतो. आपल्या जीवनाला अनपेक्षित असं एखादं वळण लागतं तेव्हासुद्धा आपण विश्‍वासाचं आणि धीराचं एक चांगलं उदाहरण इतरांसमोर ठेवू शकतो.​—१ पेत्र ५:९.

आपण यहोवावर विसंबून राहतो तेव्हा जीवनातल्या अनपेक्षित समस्यासुद्धा आपल्याला त्याच्या आणखी जवळ नेतात (परिच्छेद १८ पाहा)

१८. चित्रात दाखवल्याप्रमाणे नायजेरियातल्या बहिणीच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१८ कोव्हिड माहामारीच्या काळातसुद्धा यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागला. उदाहरणार्थ, नायजेरियातल्या एका बहिणीचा विचार करा. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि तिची परिस्थिती खूप हालाखीची झाली होती. एक दिवस सकाळी तिची मुलगी तिच्याकडे येऊन म्हणाली, की “आता आपल्याकडे फक्‍त वाटीभर तांदूळ उरलाय. मग त्यानंतर आपण काय खायचं?” त्या बहिणीने आपल्या मुलीला सांगितलं, की “आता आपल्याकडे खायला काही नाही आणि विकत घ्यायला काही पैसेही उरलेले नाहीत. पण आपण सारफथच्या विधवेसारखा विश्‍वास दाखवू या. जितकं आहे तितकं बनवू या आणि बाकीचं यहोवावर सोपवून देऊ या.” (१ राजे १७:८-१६) आता दुपारी काय खायचं याचा विचारही त्यांनी केला नव्हता, इतक्यात भाऊबहिणींकडून त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू असलेली एक बॅग मिळाली. त्यात दोनचार आठवडे पुरेल इतकं सामान होतं. त्या बहिणीने सकाळी आपल्या मुलीला जे सांगितलं होतं ते यहोवा किती लक्ष देऊन ऐकत होता या गोष्टीचा त्या बहिणीला जराही अंदाज नव्हता. खरंच, आपण यहोवावर विसंबून राहतो तेव्हा जीवनातल्या अनपेक्षित समस्यासुद्धा आपल्याला त्याच्या आणखी जवळ नेतात.​—१ पेत्र ५:६, ७.

१९. ब्रदर एलेक्सी येरशोव यांना कोणत्या छळाचा सामना करावा लागला?

१९ अलीकडच्या काळात आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींना अशा छळाचा सामना करावा लागला आहे ज्याची त्यांनी कधी अपेक्षाही केली नसेल. रशियामध्ये राहणारे एलेक्सी येरशोव या बांधवाच्या बाबतीत काय घडलं याकडे लक्ष द्या. १९९४ मध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला त्या काळात आपल्या कार्यावर पूर्णपणे बंदी नव्हती. पण पुढच्या काही वर्षांमध्ये रशियामधली परिस्थिती बदलली. २०२० मध्ये या बांधवाच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्यांच्या बऱ्‍याचशा गोष्टी जप्त केल्या गेल्या. काही महिन्यांनंतर सरकारने त्यांच्यावर खोटे आरोपसुद्धा लावले. झालं असं होतं, की हा बांधव ज्या व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास करत होता ती व्यक्‍ती अभ्यास घ्यायचं फक्‍त नाटक करत होती. त्या व्यक्‍तीने जे व्हिडिओ काढले होते त्यांच्या आधारावर या बांधवावर आरोप लावण्यात आले. खरंच, त्या व्यक्‍तीने आपल्या या बांधवाला किती मोठा धोका दिला होता!

२०. ब्रदर येरशोव यांना यहोवासोबतचं त्यांचं नातं घट्ट करायला कशामुळे मदत झाली?

२० ब्रदर येरशोव यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? यहोवासोबतचं त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. ते म्हणतात, की “मी आणि माझी पत्नी आता यहोवाला आधीपेक्षाही जास्त प्रार्थना करतो. यहोवाची मदत नसती तर या परिस्थितीला तोंड देणं मला शक्यच झालं नसतं हे मला समजलंय. वैयक्‍तिक अभ्यासामुळे मला निराशेवर मात करायला मदत झाली. मी आता पूर्वी होऊन गेलेल्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहणांवर मनन करतो. बायबलमध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत जी दाखवून देतात की आपण शांत राहून यहोवावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं आहे.”

२१. या लेखात आपल्याला काय शिकायला मिळालं?

२१ या संपूर्ण लेखातून आपण काय शिकलो? या जगात राहत असताना आपल्या जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही. पण जेव्हा आपण यहोवावर विसंबून राहतो तेव्हा तो आपल्याला नेहमी मदत करतो. या लेखाच्या आधार वचनात सांगितल्याप्रमाणे, “नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग येतात, पण त्या सर्वांतून यहोवा त्याला वाचवतो.” (स्तो. ३४:१९) तर चला, आपण आपल्यावर येणाऱ्‍या समस्यांवर नाही, तर यहोवाच्या सामर्थ्यावर लक्ष देऊ या. म्हणजे प्रेषित पौलप्रमाणे आपल्यालाही म्हणता येईल: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.”​—फिलिप्पै. ४:१३.

गीत ३८ तो तुला बळ देईल

a या जगात राहत असताना आपल्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. पण आपण याची खातरी बाळगू शकतो, की यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांना नक्कीच मदत करेल. पूर्वीच्या काळात त्याने हे कसं केलं, आणि आज तो हे कसं करत आहे याबद्दल आपण पाहू या. आणि त्यासाठी बायबल काळातल्या आणि आजच्या काळातल्या काही उदाहरणांवर आपण चर्चा करू या. त्यामुळे आपण जर यहोवावर भरवसा ठेवला, तर तो नक्की आपल्याला मदत करेल या गोष्टीबद्दलची आपली खातरी आणखी पक्की होईल.