व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १६

“तुझा भाऊ उठेल!”

“तुझा भाऊ उठेल!”

“येशू [मार्थाला] म्हणाला: ‘तुझा भाऊ उठेल.’”​—योहा. ११:२३.

गीत १५१ देईन मी आवाज त्यांना!

सारांश a

१. एका मुलाने पुनरुत्थानाच्या आशेवरचा आपला विश्‍वास कसा दाखवून दिला?

 मॅथ्यू नावाच्या एका मुलाला एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि त्यासाठी त्याला बरेच ऑपरेशन करावे लागले. तो सात वर्षांचा होता तेव्हा आपल्या कुटुंबासोबत ब्रॉडकास्टिंगचा कार्यक्रम पाहत होता. कार्यक्रमाच्या शेवटी एक संगीत व्हिडिओ होता, ज्यात पुनरुत्थान झालेल्या लोकांचं स्वागत केलं जात आहे असं दाखवलं होतं. b कार्यक्रम झाल्यानंतर मॅथ्यू आपल्या आईवडिलांकडे गेला आणि त्यांचा हात धरून म्हणाला: “मम्मी-पप्पा, तुम्ही काळजी करू नका. मी जरी मेलो तरी मी नक्की उठेन. तुम्ही माझी वाट बघा!” पुनरुत्थानाच्या आशेवर आपल्या मुलाचा किती पक्का विश्‍वास आहे हे पाहून त्या आईवडिलांना किती गहिवरून आलं असेल याचा विचार करा.

२-३. पुनरुत्थानाच्या अभिवचनावर आपण वेळोवेळी मनन का केलं पाहिजे?

बायबलमध्ये दिलेल्या पुनरुत्थानाच्या अहवालांवर आपण सगळ्यांनीच वेळोवेळी मनन केलं पाहिजे. (योहा. ५:२८, २९) का बरं? कारण कधी कोणता जीवघेणा आजार आपल्याला होऊ शकतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. (उप. ९:११; याको. ४:१३, १४) आणि अशा वेळी पुनरुत्थानाची आशाच आपल्याला धीराने त्याचा सामना करायला मदत करू शकते. (१ थेस्सलनी. ४:१३) बायबल आपल्याला सांगतं, की यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. (लूक १२:७) आणि यहोवा जेव्हा आपलं पुनरुत्थान करेल तेव्हा आपला स्वभाव आणि आपल्या सगळ्या आठवणी जशाच्या तशाच असतील. त्यामुळे विचार करा, यहोवा आपल्याला किती चांगल्या प्रकारे ओळखत असेल. शिवाय त्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे, की त्याने आपल्याला सर्वकाळ जगण्याची आशाही दिली आहे. आणि आता जरी आपला मृत्यू झाला तरी तो आपल्याला पुन्हा जिवंत करेल.

या लेखात सर्वात आधी आपण हे पाहू की पुनरुत्थानाच्या आशेवर आपण विश्‍वास का ठेवला पाहिजे. मग बायबलमधल्या त्या अहवालाचं आपण परीक्षण करू या ज्यात येशूने म्हटलं: “तुझा भाऊ उठेल.” त्यामुळे पुनरुत्थानावरचा आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल. (योहा. ११:२३) आणि शेवटी आपण हे पाहू, की पुनरुत्थानाची आशा आपण आणखी पक्की कशी करू शकतो.

पुनरुत्थानाच्या आशेवर आपण विश्‍वास का ठेवू शकतो?

४. एखाद्याने दिलेल्या अभिवचनावर विश्‍वास ठेवण्यासाठी कशाची गरज आहे? समजावून सांगा.

एखाद्याने दिलेल्या अभिवचनावर आपल्याला भरवसा ठेवायचा असेल तर ते पूर्ण करण्याची इच्छा  आणि ताकदही  त्या व्यक्‍तीमध्ये असली पाहिजे, तरच आपण त्यावर भरवसा ठेवू शकतो. हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. असं समजा की एका मोठ्या वादळामध्ये तुमच्या घराचं बरंच नुकसान झालंय. मग तुमचा एक मित्र येतो आणि तुम्हाला म्हणतो, की ‘घर नीट करायला मी नक्की तुम्हाला मदत करीन.’ तो खूप प्रामाणिक आहे आणि तुम्हाला माहीत आहे, की तुम्हाला मदत करायची त्याची मनापासून इच्छा आहे. त्यातल्या त्यात त्याला जर बांधकामाचं चांगलं ज्ञान असेल आणि त्यासाठी लागणारी सगळी साहित्यं त्याच्याकडे असतील, तर त्याच्या क्षमतेवर तुम्ही नक्कीच शंका घेणार नाही. मग देवाने दिलेल्या पुनरुत्थानाच्या अभिवचनाबद्दल काय? ते पूर्ण करण्याची इच्छा आणि ताकद किंवा क्षमता खरोखर त्याच्यामध्ये आहे का?

५-६. यहोवाला मृत लोकांचं पुनरुत्थान करण्याची इच्छा  आहे असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

मृत लोकांचं पुनरुत्थान करायची यहोवाची खरंच इच्छा  आहे का? हो नक्कीच आहे. म्हणूनच तर बायबलच्या कितीतरी लेखकांना त्याने पुनरुत्थानाच्या आशेबद्दल लिहिण्याची प्रेरणा दिली. (यश. २६:१९; होशे. १३:१४; प्रकटी. २०:११-१३) आणि जेव्हा यहोवा एखादं अभिवचन देतो तेव्हा तो ते नक्की पूर्ण करतो. (यहो. २३:१४) खरंतर मृत लोकांचं पुनरुत्थान करण्यासाठी यहोवा स्वतः खूप आतुर आहे. असं आपण का म्हणू शकतो?

ईयोबने काय म्हटलं होतं त्याचा विचार करा. त्याला खातरी होती, की त्याचा मृत्यू जरी झाला तरी यहोवा त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी आतुर असेल. (ईयो. १४:१४, १५, तळटीप) यहोवाच्या ज्या उपासकांचा मृत्यू झाला आहे त्यांना पुन्हा उठवण्यासाठी यहोवा तितकाच आतुर आहे. तो लवकरच त्यांना पुन्हा जिवंत करेल. आणि तेव्हा ते आनंदी आणि निरोगी जीवन जगतील. पण त्या लाखो लोकांबद्दल काय ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांना यहोवाबद्दल शिकण्याची संधी मिळाली नाही? आपल्या प्रेमळ देवाला त्यांनाही जिवंत करायची इच्छा आहे. (प्रे. कार्यं २४:१५) त्यांनाही त्याचे मित्र बनता यावं आणि या पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची संधी मिळावी अशी त्याची इच्छा आहे. (योहा. ३:१६) यावरून स्पष्ट होतं की यहोवाला मृत लोकांचं पुनरुत्थान करण्याची इच्छा आहे.

७-८. मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद  यहोवाकडे आहे असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

यहोवाकडे मृत लोकांना जिवंत करण्याची ताकदसुद्धा  आहे का? नक्कीच. बायबल म्हणतं की तो “सर्वशक्‍तिमान” आहे. (प्रकटी. १:८) त्यामुळे तो कोणत्याही शत्रूला, अगदी मृत्यूलासुद्धा हरवू शकतो. (१ करिंथ. १५:२६) हे जाणून आपल्याला किती बळ आणि सांत्वन मिळतं, नाही का? एम्मा आर्नल्ड नावाच्या एका बहिणीचाच विचार करा. दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात तिला आणि तिच्या कुटुंबाला विश्‍वासाच्या बऱ्‍याच परीक्षांचा सामना करावा लागला. त्या काळात नात्झी छळछावण्यांमध्ये त्यांच्या बऱ्‍याच जवळच्या लोकांचा मृत्यू झाला होता. त्याबद्दल आपल्या मुलीचं सांत्वन करताना ती म्हणाली: “जर मृत्यूने लोकांना कायम त्याच्या बंधनात जखडून ठेवलं तर याचा अर्थ असा होईल, की मृत्यू देवापेक्षा शक्‍तिशाली आहे. पण असं कधी होऊ शकतं का?” खरंच, यहोवापेक्षा शक्‍तिशाली कोणतीही गोष्ट नाही. ज्या सर्वशक्‍तिमान देवाने आपल्याला जीवन दिलंय  त्याच्याकडे मृत लोकांना जिवंत करण्याची  क्षमतासुद्धा आहे.

यहोवा मृत लोकांना जिवंत करू शकतो यावर भरवसा ठेवण्याचं आणखी एक कारण म्हणजे, यहोवाची स्मरणशक्‍ती अमर्याद आहे. बायबलमध्ये म्हटलंय की तो प्रत्येक ताऱ्‍याला त्याच्या नावाने हाक मारतो. (यश. ४०:२६) शिवाय आत्तापर्यंत जितके लोक मेले आहेत ते सगळे त्याच्या आठवणीत आहेत. (ईयो. १४:१३; लूक २०:३७, ३८) तो ज्यांचं पुनरुत्थान करणार आहे त्यांच्याबद्दलच्या बारीकसारीक गोष्टीही तो सहज लक्षात ठेवू शकतो; अगदी त्यांचं स्वरूप, त्यांचं व्यक्‍तिमत्व, त्यांच्या जीवनातले अनुभव आणि त्यांच्या सगळ्या आठवणी.

९. यहोवाने दिलेल्या पुनरुत्थानाच्या अभिवचनावर तुमचा भरवसा का आहे?

तर आत्तापर्यंत आपण पाहिलं, की यहोवाकडे मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद आणि इच्छा या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे त्याने दिलेल्या पुनरुत्थानाच्या अभिवचनावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. या अभिवचनावर भरवसा ठेवायचं आणखी एक कारण म्हणजे, यहोवाने हे आधीच करून दाखवलंय. बायबल काळात त्याने बऱ्‍याच विश्‍वासू माणसांना आणि येशूलासुद्धा मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद दिली. चला आता आपण येशूने केलेल्या पुनरुत्थानाच्या एका अहवालाचं परीक्षण करू या. तो अहवाल आपल्याला योहानच्या ११ व्या अध्यायात वाचायला मिळतो.

येशूच्या जिवलग मित्राचा मृत्यू

१०. येशू बेथानीपासून दूर यार्देनच्या पलीकडे प्रचार करत होता तेव्हा काय घडतं, आणि तो काय करतो? (योहान ११:१-३)

१० योहान ११:१-३ वाचा. इ.स. ३२ च्या शेवटी बेथानीमध्ये घडलेल्या एका घटनेचं चित्र डोळ्यांपुढे आणा. या गावात येशूचे काही जवळचे मित्र राहतात. म्हणजे लाजर आणि त्याच्या दोन बहिणी, मरीया आणि मार्था. (लूक १०:३८-४२) पण लाजर अचानक आजारी पडतो आणि त्यामुळे त्याच्या बहिणींना खूप काळजी वाटू लागते. त्या वेळी येशू यार्देनच्या पलीकडे, म्हणजे दोन दिवस पायी प्रवास करावा लागेल इतक्या अंतरावर होता. (योहा. १०:४०) त्यामुळे लाजरच्या बहिणी येशूला लाजरबद्दल निरोप पाठवतात. पण येशूला निरोप मिळेपर्यंत लाजरचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे, आपला मित्र लाजर गेलाय हे समजल्यावरसुद्धा येशू आणखी दोन दिवस आहे तिथेच थांबतो आणि त्यानंतर बेथानीला यायला निघतो. याचा अर्थ, येशू पोचेपर्यंत लाजरला जाऊन चार दिवस उलटतात. येशूच्या मनात असं काहीतरी करायचा विचार होता ज्यामुळे त्याच्या मित्रांचा फायदा होईल आणि देवाचा गौरव होईल.​—योहा. ११:४, ६, ११, १७.

११. या अहवालातून मैत्रीबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?

११ या अहवालातून मैत्रीबद्दल आपल्याला खूप चांगला धडा शिकायला मिळतो. याकडे लक्ष द्या, मरीया आणि मार्थाने येशूला निरोप पाठवला तेव्हा त्यांनी त्याला ‘बेथानीला ये’ असं म्हटलं नव्हतं, तर फक्‍त इतकंच म्हटलं होतं की त्याचा जिवलग मित्र आजारी आहे. (योहा. ११:३) नंतर लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशू खरंतर जिथे होता तिथूनच त्याला पुन्हा जिवंत करू शकला असता. पण तरीसुद्धा येशू मरीया आणि मार्थाला भेटण्यासाठी बेथानीला जायचं ठरवतो. तुमचा असा कोणी मित्र आहे का जो तुम्ही विचारण्याआधीच तुमची मदत करायला हजर असतो? असेल तर “दुःखाच्या प्रसंगी” तो नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईल अशी खातरी तुम्ही ठेवू शकता. (नीति. १७:१७) आपणसुद्धा इतरांसाठी असेच मित्र असलं पाहिजे. आता पुन्हा एकदा या अहवालाकडे वळू या आणि पुढे काय घडतं ते पाहू या.

१२. येशूने मार्थाला काय म्हटलं, आणि ती त्यावर विश्‍वास का ठेवू शकत होती? (योहान ११:२३-२६)

१२ योहान ११:२३-२६ वाचा. येशू बेथानीजवळ आलाय हे समजताच मार्था लगेचच त्याला भेटायला जाते आणि म्हणते: “प्रभू, तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता.” (योहा. ११:२१) हे खरंय की येशू लाजरला बरं करू शकला असता. पण येशूला याहून विशेष असं काहीतरी करायचं होतं. तो मार्थाला म्हणाला: “तुझा भाऊ उठेल.” आणि या अभिवचनावर विश्‍वास ठेवायचं कारणही तो तिला देतो. तो म्हणतो: “पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे.” कारण यहोवाने त्याला जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींवर अधिकार दिला आहे. याआधी येशूने एका लहान मुलीला तिचा मृत्यू झाल्याच्या काही वेळानंतरच जिवंत केलं होतं. आणि एका तरुण माणसाला त्याचा मृत्यू झाल्यानंतर बहुतेक त्याच दिवशी पुन्हा जिवंत केलं होतं. (लूक ७:११-१५; ८:४९-५५) पण ज्या व्यक्‍तीला मरून चार दिवस झाले होते आणि ज्याचं शरीर कुजायला सुरवात झाली होती, त्या व्यक्‍तीलासुद्धा येशू जिवंत करू शकणार होता का?

“लाजर, बाहेर ये!”

आपल्या मित्रांना रडताना पाहून येशूला त्यांचा खूप कळवळा आला (परिच्छेद १३-१४ पाहा)

१३. मरीया आणि इतर लोकांना रडताना पाहून येशूला कसं वाटतं? (योहान ११:३२-३५) (चित्रसुद्धा पाहा.)

१३ योहान ११:३२-३५ वाचा. पुढे काय होतं याची कल्पना करा. लाजरची दुसरी बहीण मरीया हीसुद्धा येशूला भेटायला जाते आणि आपल्या बहिणीप्रमाणेच येशूला म्हणते: “प्रभू, तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता.” ती आणि तिच्यासोबतचे इतर जण खूप दुःखी आहेत. त्यांना रडताना पाहून येशूलाही खूप दुःख होतं. आपल्या या मित्रांना बघून त्याला खूप भरून येतं आणि तो रडू लागतो. जवळच्या व्यक्‍तीला गमावण्याचं दुःख किती वाईट असतं हे त्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्या मित्रांचं दुःख दूर करायला तो खूप आतुर आहे.

१४. मरीयाला रडताना पाहून येशूलाही रडू आलं. यावरून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?

१४ मरीयाला रडताना पाहून येशूलाही रडू आलं. त्यावरून यहोवाला आपल्याबद्दल किती कळवळा आहे हे आपल्याला शिकायला मिळतं. ते कसं? आधीच्या लेखात आपण पाहिलं होतं, की येशूचे विचार आणि त्याच्या भावना अगदी त्याच्या पित्यासारख्याच आहेत. (योहा. १२:४५) त्यामुळे बायबलमध्ये जेव्हा आपण असं वाचतो की दुःखात बुडालेल्या आपल्या मित्रांना बघून येशूला गहिवरून आलं आणि तो रडू लागला, तेव्हा आपण खातरीने म्हणू शकतो की आपले अश्रू, आपलं दुःख पाहून यहोवालासुद्धा तसंच वाटतं. (स्तो. ५६:८) आपल्याबद्दल इतकी दया, इतका कळवळा वाटणाऱ्‍या देवाच्या जवळ जायला कोणाला आवडणार नाही?

येशूने दाखवून दिलं की त्याला मृत्यूवरसुद्धा अधिकार आहे (परिच्छेद १५-१६ पाहा)

१५. योहान ११:४१-४४ प्रमाणे लाजरला ज्या गुहेत ठेवलं होतं तिथे काय घडतं? (चित्रसुद्धा पाहा.)

१५ योहान ११:४१-४४ वाचा. लाजरला जिथे ठेवलं होतं त्या गुहेजवळ येशू येतो आणि गुहेच्या तोंडावर लावलेला दगड बाजूला करायला सांगतो. पण मार्था त्याला म्हणते की “प्रभू, आता तर त्याच्या शरीराला दुर्गंधी सुटली असेल.” तेव्हा येशू तिला म्हणतो: “मी तुला सांगितलं नव्हतं का, की तू विश्‍वास ठेवशील तर देवाचं गौरवी सामर्थ्य पाहशील?” (योहा. ११:३९, ४०) मग येशू वर स्वर्गाकडे पाहून सगळ्यांसमोर प्रार्थना करतो. कारण लवकरच जे घडणार आहे त्याचं सगळं श्रेय त्याला यहोवाला द्यायचं आहे. त्यानंतर येशू मोठ्याने ओरडून म्हणतो: “लाजर, बाहेर ये!” तेव्हा लाजर गुहेतून चालत बाहेर येतो. काहींना वाटत होतं, की ही गोष्ट होणं अशक्य आहे. पण येशूने नेमकं तेच शक्य करून दाखवलं होतं.​—१ जानेवारी २००८ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “लाजराच्या कबरेजवळ यायला येशूला चार दिवस का लागले?” हा लेख पाहा.

१६. योहानच्या ११ व्या अध्यायात दिलेल्या अहवालामुळे पुनरुत्थानाच्या आशेवरचा आपला विश्‍वास आणखी पक्का कसा होतो?

१६ योहानच्या ११ व्या अध्यायात दिलेल्या या अहवालामुळे पुनरुत्थानाच्या आशेवरचा आपला विश्‍वास आणखी पक्का होतो. तो कसा? येशूने मार्थाला काय म्हटलं होतं ते आठवा. त्याने म्हटलं: “तुझा भाऊ उठेल.” (योहा. ११:२३) आपल्या पित्याप्रमाणेच हे अभिवचन पूर्ण करायची येशूला इच्छा आहे आणि तसं करायची ताकदही त्याच्याकडे आहे. त्याच्या अश्रूंवरून दिसून आलं, की मरण आणि त्यामुळे होणारं दुःख कायमचं नाहीसं करायची त्याची मनापासून इच्छा आहे. आणि लाजर जेव्हा गुहेतून चालत बाहेर आला तेव्हा येशूने पुन्हा एकदा सिद्ध केलं, की मृत लोकांना जिवंत करण्याची ताकदही त्याच्याकडे आहे. शिवाय मार्थाला त्याने कोणत्या गोष्टीची आठवण करून दिली त्याचाही विचार करा. त्याने म्हटलं: “मी तुला सांगितलं नव्हतं का, की तू विश्‍वास  ठेवशील तर देवाचं गौरवी सामर्थ्य पाहशील?”  (योहा. ११:४०) खरंच, देवाने दिलेलं पुनरुत्थानाचं अभिवचन तो नक्की पूर्ण करेल असा भरवसा ठेवायची कितीतरी कारणं आपल्याकडे आहेत. पण पुनरुत्थानाची ही आशा आणखी पक्की करण्यासाठी आपण काय करू शकतो?

पुनरुत्थानाची आशा आणखी पक्की करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१७. बायबलमधले पुनरुत्थानाचे अहवाल वाचताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

१७ बायबलमधले पुनरुत्थानावरचे अहवाल वाचा आणि त्यांवर मनन करा.  बायबलमध्ये अशा आठ पुनरुत्थानांबद्दल सांगितलंय ज्यांमध्ये मृत लोकांना याच पृथ्वीवर पुन्हा जिवंत करण्यात आलं. c या प्रत्येक अहवालाचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. आणि असं करत असताना पुनरुत्थान झालेले हे पुरुष, स्त्रिया, आणि मुलं ही खरोखरची माणसं होती हे लक्षात घ्या. या अहवालातून काय शिकायला मिळतं ते पाहा. तसंच पुनरुत्थानाच्या प्रत्येक घटनेतून मृत लोकांना पुन्हा जिवंत करायची यहोवाची इच्छा आणि ताकद कशी दिसून येते यावरही विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाच्या पुनरुत्थानावर, म्हणजे येशूच्या पुनरुत्थानावर मनन करा. त्याचं पुनरुत्थान झालं तेव्हा शेकडो लोकांनी त्याला पाहिलं. यामुळे आपल्याला खातरी मिळते, की ज्यांचा मृत्यू झाला आहे तेसुद्धा नक्की जिवंत होतील.​—१ करिंथ. १५:३-६, २०-२२.

१८. पुनरुत्थानाच्या आशेबद्दल असलेल्या गीतांचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग कसा करू शकता? (तळटीपसुद्धा पाहा.)

१८ पुनरुत्थानाच्या आशेबद्दल असलेल्या उपासना गीतांचा चांगला उपयोग करा.  d (इफिस. ५:१९) यामुळे पुनरुत्थानाच्या आशेवरचा आपला विश्‍वास आणखी वाढेल. म्हणून ही गीतं ऐका, ती गायचा सराव करा आणि या गीतांच्या बोलांचा काय अर्थ होतो याची आपल्या कौटुंबिक उपासनेत चर्चा करा. म्हणजे त्यांचे बोल तुमच्या मनावर आणि हृदयावर कोरले जातील. मग जर जिवाला धोका निर्माण करणारी एखादी परिस्थिती तुमच्यावर आली किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला, तर यहोवाची पवित्र शक्‍ती तुम्हाला ही गीतं आठवायला आणि त्यांतून सांत्वन आणि बळ मिळवायला मदत करेल.

१९. पुनरुत्थानाबद्दल आपण कोणत्या गोष्टीची कल्पना करू शकतो? (“ तुम्ही त्यांना काय विचाराल?” ही चौकट पाहा.)

१९ आपल्या कल्पनाशक्‍तीचा उपयोग करा.  यहोवाने आपल्याला कल्पनाशक्‍ती दिली आहे आणि त्यामुळे आपण नवीन जगात असल्याची कल्पना करू शकतो. याबद्दल एक बहीण म्हणते: “मी प्रत्यक्ष नवीन जगात असल्याची इतक्या वेळा कल्पना केली आहे, की आता तर मी तिथल्या गुलाबाच्या फुलांचा सुगंधसुद्धा घेऊ शकते.” तुम्हीसुद्धा नवीन जगात बायबल काळातल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांना भेटायची कल्पना करू शकता का? तुम्हाला कोणाकोणाला भेटावंसं वाटतं? त्यांना भेटल्यावर तुम्ही कोणते प्रश्‍न विचाराल? नवीन जगात आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा भेटायचीही कल्पना करा. त्यांना भेटल्या-भेटल्या तुमच्या तोंडून निघालेले पहिले शब्द, तसंच त्यांना कडकडून मिठी मारताना तुमच्या डोळ्यांतून निघणारे आनंदाचे अश्रू, अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींची कल्पना करा.

२०. आपण काय करायचा निर्धार केला पाहिजे?

२० यहोवाने आपल्याला पुनरुत्थानाचं अभिवचन दिलंय याबद्दल आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत! हे अभिवचन तो नक्की पूर्ण करेल अशी खातरी आपण ठेवू शकतो. कारण ते पूर्ण करण्याची इच्छा आणि ताकद या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. त्यामुळे पुनरुत्थानाच्या या सुंदर आशेवरचा आपला विश्‍वास आपण आणखी भक्कम करत राहू या. असं केल्यामुळे आपण यहोवा देवाच्या आणखी जवळ जाऊ, ज्याने आपल्याला असं वचन दिलंय की ‘तुमचे प्रिय जन उठतील!

गीत १४७ सर्वकाळाच्या जीवनाचं वचन

a तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल तर पुनरुत्थानाबद्दल देवाने दिलेल्या अभिवचनामुळे तुम्हाला नक्कीच खूप सांत्वन मिळालं असेल. पण या अभिवचनावर तुमचा इतका विश्‍वास का आहे हे तुम्ही इतरांना कसं समजावून सांगाल? आणि पुनरुत्थानावरच्या आशेवरचा तुमचा विश्‍वास तुम्ही आणखी पक्का कसा करू शकता? आपला हा विश्‍वास वाढावा हाच या लेखाचा मुख्य उद्देश आहे.

b हिंदीमध्ये या संगीत व्हिडिओचं शीर्षक आहे बस चार कदम आगे  आणि हा संगीत व्हिडिओ नोव्हेंबर २०१६ च्या ब्रॉडकास्टिंगमध्ये दाखवण्यात आला होता.

d गीत गाकर यहोवा की “जयजयकार करें”  या पुस्तकातली ही गाणी पाहा: “जब होंगे नयी दुनिया में!” (गीत १३९), “रखो तुम इनाम पे नज़र!” (गीत १४४), आणि “वह उन्हें पुकारेगा” (गीत १५१). तसंच jw.org वर हे खास गीतसुद्धा पाहा: “बस चार कदम आगे,” “जब दुनिया होगी नयी,” आणि “पाहू या सोबत.”