अभ्यास लेख १९
नवीन जगाच्या अभिवचनावरचा आपला विश्वास आपण मजबूत कसा करू शकतो?
“[यहोवा] जे बोलेल, ते तो पूर्ण करणार नाही का?”—गण. २३:१९.
गीत १४४ नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!
सारांश a
१-२. नवीन जगाची वाट पाहत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे?
सध्याच्या या दुष्ट जगाचं रूपांतर एका नीतिमान नवीन जगात करायचं जे अभिवचन यहोवाने आपल्याला दिलंय, ते आपल्यासाठी खूप मोलाचं आहे. (२ पेत्र ३:१३) हे नवीन जग नेमकं केव्हा येईल ते आपल्याला माहीत नसलं तरी पुरावे दाखवून देतात की त्यासाठी आपल्याला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.—मत्त. २४:३२-३४, ३६; प्रे. कार्यं १:७.
२ तरी या अभिवचनावरचा आपला विश्वास मजबूत करणं खूप गरजेचं आहे. कारण आपला विश्वास जरी भक्कम असला, तरी काळाच्या ओघात तो कमजोर होऊ शकतो. खरंतर, प्रेषित पौलने विश्वासाच्या कमतरतेला “सहज अडकवणारं पाप” असं म्हटलंय. (इब्री १२:१) आपला विश्वास कमकुवत होऊ नये म्हणून नवीन जग लवकरच येणार आहे, हे दाखवून देणारे पुरावे आपण वेळोवेळी तपासून पाहिले पाहिजेत.—इब्री ११:१.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ नवीन जगाबद्दल देवाने दिलेल्या अभिवचनावरचा आपला विश्वास कोणत्या तीन मार्गांनी आपल्याला भक्कम करता येईल, ते या लेखात आपण पाहू या. ते तीन मार्ग म्हणजे: (१) खंडणी बलिदानावर मनन करणं, (२) यहोवा किती शक्तिशाली आहे यावर खोलवर विचार करणं आणि (३) आध्यात्मिक गोष्टींमध्ये व्यस्त राहणं. आणि मग यहोवाने हबक्कूक संदेष्ट्याला जो संदेश दिला होता त्यातून आपला विश्वास कसा मजबूत होतो, तेही पाहू या. पण त्याआधी आपण अशा परिस्थितींचा विचार करू या ज्यांचा सामना करत असताना नवीन जगावरचा आपला विश्वास भक्कम असण्याची गरज आहे. कदाचित अशाच काही परिस्थितींचा सध्या आपण सामना करत असू.
अशा परिस्थिती ज्यांसाठी आपल्याला भक्कम विश्वासाची गरज आहे
४. कोणत्या बाबतींत निर्णय घ्यायला आपल्याला भक्कम विश्वासाची गरज आहे?
४ दररोज आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या बाबतींत निर्णय घ्यावे लागतात. जसं की, कोणाशी मैत्री करावी, कोणतं मनोरंजन पाहावं, किती शिक्षण घ्यावं. तसंच विवाह, मुलं आणि नोकरी यांसारख्या गोष्टींबद्दल निर्णय घेतानाही आपल्याला भक्कम विश्वासाची गरज असते. हे निर्णय घेत असताना आपण या प्रश्नांवर विचार करू शकतो: ‘मी जे निर्णय घेतो, त्यांवरून सध्याचं हे जग काही काळापुरतंच आहे आणि देवाचं नवीन जग लवकरच येणार आहे, हे दिसून येतं का? की आजच्यापुरतंच जगणाऱ्या लोकांच्या विचारसरणीचा माझ्या निर्णयांवर प्रभाव होत आहे, हे दिसून येतं?’ (मत्त. ६:१९, २०; लूक १२:१६-२१) नवीन जग लवकरच येणार आहे, या गोष्टीवरचा आपला विश्वास जर आपण भक्कम केला तर आपल्याला चांगले निर्णय घेता येतील.
५-६. कठीण परिस्थितीत आपल्याला मजबूत विश्वासाची गरज का असते? उदाहरण द्या.
५ आपल्यावर अशाही काही परीक्षा येऊ शकतात ज्यांसाठी आपल्याला भक्कम विश्वासाची गरज पडू शकते. जसं की, आपला छळ होऊ शकतो, आपल्याला गंभीर आजार होऊ शकतो, किंवा मग इतर कोणत्या तरी कारणामुळे आपण निराश होऊ शकतो. सुरवातीला कदाचित आपल्यासमोर आलेल्या परीक्षांचा आपण ठामपणे सामना करू. पण सहसा होतं त्याप्रमाणे ही समस्या वाढतंच गेली तर तिचा धीराने सामना करण्यासाठी आणि आनंदाने यहोवाची सेवा करत राहण्यासाठी आपल्याला भक्कम विश्वासाची गरज आहे.—रोम. १२:१२; १ पेत्र १:६, ७.
६ एखाद्या परीक्षेचा सामना करत असताना कदाचित आपल्याला असं वाटेल, की ‘कधी एकदाचं नवीन जग येतंय काय माहीत.’ पण याचा अर्थ आपला विश्वास कमजोर झालाय असा होतो का? नाही, असं नेहमीच म्हणता येणार नाही. एक उदाहरण घ्या. ऐन कडाक्याच्या थंडीत आपल्याला कधी एकदाचा उन्हाळा सुरू होतोय असं वाटतं. पण ठरलेल्या वेळी ऊन्हाळा येतोच. त्याचप्रमाणे आपण जेव्हा खूप निराश असतो, तेव्हा नवीन जग कधी एकदाचं येतंय असं आपल्याला वाटेल. पण आपला विश्वास जर मजबूत असेल, तर देवाने दिलेली अभिवचनं तो नक्की पूर्ण करेल या गोष्टीचा भरवसा आपल्याला असेल. (स्तो. ९४:३, १४, १५; इब्री ६:१७-१९) आणि या भरवशामुळेच मग आपण आपल्या जीवनात यहोवाच्या उपासनेला सगळ्यात पहिलं स्थान देत राहू.
७. आपण कोणत्या मनोवृत्तीपासून सावध असलं पाहिजे?
७ आणखी एका गोष्टीमध्ये, म्हणजे प्रचारकार्य करत असतानासुद्धा आपल्याला मजबूत विश्वासाची गरज आहे. प्रचारकार्यात भेटणाऱ्या बऱ्याच लोकांना असं वाटतं, की नवीन जगाबद्दलचा “आनंदाचा संदेश” फक्त एक कल्पना आहे, असं खरोखर कधीच होऊ शकत नाही. (मत्त. २४:१४; यहे. ३३:३२) पण त्यांच्या अशा मनोवृत्तीचा आपल्यावर परिणाम होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपला विश्वास मजबूत करत राहिलं पाहिजे. तर चला, आता आपण याचे तीन मार्ग पाहू या.
खंडणी बलिदानावर मनन करा
८-९. खंडणी बलिदानावर मनन केल्यामुळे आपला विश्वास कसा मजबूत होतो?
८ आपला विश्वास मजबूत करण्याचा एक मार्ग म्हणजे खंडणी बलिदानावर मनन करणं. कारण खंडणी बलिदानामुळेच आपल्याला याची खातरी मिळते, की यहोवा त्याची सगळी अभिवचनं नक्की पूर्ण करेल. खंडणी बलिदानाची गरज का पडली, आणि त्यासाठी देवाला किती मोठी किंमत चुकवावी लागली या गोष्टींवर आपण सखोल विचार करतो, तेव्हा नवीन जगात कायमचं जीवन देण्याचं जे अभिवचन देवाने आपल्याला दिलं आहे त्यावरचा आपला विश्वास आणखी वाढतो. आपण असं का म्हणू शकतो?
९ विचार करा, यहोवाने खंडणी बलिदान देण्यासाठी आपल्या एकुलत्या एका मुलाला, आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला स्वर्गातून पृथ्वीवर परिपूर्ण मानव म्हणून पाठवलं. आणि मग पृथ्वीवर असताना येशूला वेगवेगळ्या कठीण परीक्षांचा सामना करावा लागला. आणि शेवटी त्याचा छळ करण्यात आला आणि त्याला वेदनादायक मृत्यू सहन करावा लागला. खरंच, खंडणी बलिदान देण्यासाठी यहोवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली! आपल्याला फक्त काही वर्षांसाठी एक चांगलं जीवन जगता यावं म्हणून आपल्या प्रेमळ देवाने त्याच्या एकुलत्या एका मुलाचा इतका छळ आणि वेदनादायक मृत्यू होऊ दिला असता का? नक्कीच नाही. (योहा. ३:१६; १ पेत्र १:१८, १९) पण ज्याअर्थी त्याने आपल्यासाठी इतकी मोठी किंमत दिली त्याअर्थी नवीन जगात कायमचं जीवन देण्याचं जे अभिवचन त्याने दिलं आहे ते तो नक्की पूर्ण करेल.
यहोवा किती शक्तिशाली आहे यावर खोलवर विचार करा
१०. इफिसकर ३:२० मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाकडे काय करण्याची ताकद आहे?
१० आपला विश्वास वाढवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, यहोवा किती शक्तिशाली आहे यावर खोलवर विचार करणं. दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. हे खरंय की एका नवीन जगात कायमचं जीवन जगणं हे अशक्य आहे असं बऱ्याच लोकांना वाटेल. पण माणसांना ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या पूर्ण करण्याचं अभिवचन यहोवा देतो. कारण तोच सर्वशक्तिमान देव आहे. (ईयो. ४२:२; मार्क १०:२७) साहजिकच जेव्हा यहोवा अद्भुत गोष्टींची अभिवचनं देतो तेव्हा त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.—इफिसकर ३:२० वाचा.
११. देवाने दिलेल्या काही अद्भुत अभिवचनांची उदाहरणं द्या. (“ पूर्ण झालेली काही असाधारण अभिवचनं” ही चौकट पाहा.)
११ मानवांसाठी अशक्य असलेल्या काही गोष्टी पूर्ण करण्याची जी अभिवचनं यहोवाने प्राचीन काळात दिली होती त्यांचाच विचार करा. उदाहरणार्थ, अब्राहाम आणि सारा वयोवृद्ध असताना यहोवाने त्यांना असं अभिवचन दिलं, की त्यांना मुलगा होईल. (उत्प. १७:१५-१७) त्याने अब्राहामला असंही अभिवचन दिलं होतं, की त्याच्या वंशजांना कनान देश वारसा म्हणून मिळेल. पण अब्राहामचे वंशज, म्हणजे इस्राएली लोक बऱ्याच काळापर्यंत इजिप्तमध्ये गुलामगिरीत होते. त्यामुळे यहोवाने दिलेलं अभिवचन कधीच पूर्ण होणार नाही असं अनेकांना वाटलं असेल. पण यहोवाने ते पूर्ण केलं. पुढे हजारो वर्षांनंतर यहोवाने वयोवृद्ध झालेल्या अलीशिबालाही सांगितलं की तिला मूल होईल. तसंच त्याने मरीयाला जेव्हा तिचं लग्नही झालं नव्हतं तेव्हा असं सांगितलं, की ती त्याच्या मुलाला जन्म देईल. आणि हेही पूर्ण झालं. खरंतर, या संततीच्या येण्याबद्दल यहोवाने हजारो वर्षांआधी एदेन बागेत अभिवचन दिलं होतं.—उत्प. ३:१५.
१२. यहोशवा २३:१४ आणि यशया ५५:१०, ११ मधून यहोवा शक्तिशाली आहे हे आपल्याला कसं कळतं?
१२ यहोवाने कोणकोणती अभिवचनं दिली आणि ती कशी पूर्ण केली याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा यहोवा किती शक्तिशाली आहे ते आपल्याला समजतं, आणि त्यामुळे नवीन जगाच्या अभिवचनावरचा आपला विश्वास आणखी मजबूत होतो. (यहोशवा २३:१४; यशया ५५:१०, ११ वाचा.) शिवाय नवीन जगाचं अभिवचन एक स्वप्न किंवा एक कल्पना नाही हे समजायला आपण इतरांना आणखी चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. यहोवाने स्वतः नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीबद्दल असं म्हटलं आहे, की हे सगळं ‘विश्वसनीय आणि खरं आहे.’—प्रकटी. २१:१, ५.
आध्यात्मिक गोष्टी करण्यात व्यस्त राहा
१३. मंडळीच्या सभांमुळे आपला विश्वास कसा मजबूत होतो? समजावून सांगा.
१३ आपला विश्वास मजबूत करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे, आध्यात्मिक कार्यांमध्ये व्यस्त राहणं. उदाहरणार्थ, मंडळीच्या सभांमधून आपल्याला कसा फायदा होतो त्याचा विचार करा. बरीच दशकं वेगवेगळ्या मार्गांनी पूर्ण वेळेची सेवा करणारी ॲना नावाची एक बहीण म्हणते: “सभांमुळे माझा विश्वास मजबूत राहतो. एखाद्या वक्त्याला जरी चांगलं शिकवता येत नसलं किंवा त्याच्याकडून मला नवीन असं काहीतरी ऐकायला मिळत नसलं, तरी मला असं काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं ज्यामुळे बायबलच्या एखाद्या शिकवणीबद्दलची माझी समज आणखी वाढते. आणि त्यामुळे माझा विश्वास मजबूत होतो.” b शिवाय, सभेत येणाऱ्या भाऊबहिणींची उत्तरं ऐकूनसुद्धा आपला विश्वास मजबूत होतो.—रोम. १:११, १२; १०:१७.
१४. सेवाकार्यामुळे आपला विश्वास कसा मजबूत होतो?
१४ सेवाकार्यात सहभाग घेतल्यामुळेसुद्धा आपला विश्वास मजबूत होतो. (इब्री १०:२३) ७० पेक्षा जास्त वर्षं यहोवाची सेवा करत असलेली बार्बरा म्हणते: “मला नेहमी असं जाणवलंय, की प्रचारकार्यात सहभाग घेतल्यामुळे आपला विश्वास मजबूत होतो. यहोवाच्या अद्भुत अभिवचनांबद्दल मी जितकं जास्त इतरांशी बोलते तितका माझा विश्वास मजबूत होतो.”
१५. व्यक्तिगत अभ्यासामुळे आपला विश्वास कसा मजबूत होतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१५ व्यक्तिगत अभ्यासामुळेसुद्धा आपला विश्वास कसा मजबूत होतो त्याचा विचार करा. सूझन नावाच्या एक बहिणीने व्यक्तिगत अभ्यासासाठी एक चांगला आराखडा बनवलाय. ती म्हणते: “रविवारी मी पुढच्या आठवड्याच्या टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करते. आणि सोमवारी आणि मंगळवारी मी आठवड्यादरम्यान होणाऱ्या सभेची तयारी करते. आणि इतर दिवशी मी वेगवेगळ्या विषयांवर सखोल अभ्यास करते.” अशा प्रकारे व्यक्तिगत अभ्यासाचा एक चांगला आराखडा बनवून त्याप्रमाणे चालल्यामुळे सूझनला तिचा विश्वास मजबूत करायला मदत होते. तसंच, जागतिक मुख्यालयात अनेक दशकं सेवा करणारी आइरीन नावाची एक बहीण म्हणते, की बायबलच्या भविष्यवाण्यांबद्दल अभ्यास केल्यामुळेसुद्धा तिचा विश्वास खूप मजबूत होतो. ती म्हणते, की “अगदी बारीकसारीक गोष्टींच्या बाबतीतसुद्धा यहोवाच्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या, ही गोष्ट मला खूप जबरदस्त वाटते.” c
“तो नक्की खरा ठरेल”
१६. यहोवाने हबक्कूक संदेष्ट्यालाच नाही, तर आपल्यालाही नवीन जगाची खातरी दिली आहे असं आपण का म्हणू शकतो? (इब्री लोकांना १०:३६, ३७)
१६ यहोवाचे काही सेवक बऱ्याच काळापासून या जगाचा अंत होण्याची वाट पाहत आहेत. मानवी दृष्टिकोनातून देवाचं हे अभिवचन पूर्ण व्हायला खूप वेळ लागत आहे असं आपल्याला वाटेल. आपल्याला कसं वाटतं हे यहोवाला चांगलं माहीत आहे. आणि म्हणूनच प्राचीन काळात त्याने हबक्कूक संदेष्ट्याला अशी खातरी दिली होती, की “हा दृष्टान्त अजूनही आपल्या नेमलेल्या वेळेची वाट पाहत आहे, तो लवकरच पूर्ण होईल, तो खोटा ठरणार नाही. तो पूर्ण व्हायला उशीर लागला, तरी त्याची वाट पाहत राहा! कारण तो नक्कीच खरा ठरेल. त्याला उशीर होणार नाही!” (हब. २:३) यहोवाने ही खातरी फक्त हबक्कूक संदेष्ट्याला नाही, तर आपल्यालाही दिली आहे. कारण देवाच्या प्रेरणेने प्रेषित पौलने हे शब्द नव्या जगाची वाट पाहणाऱ्या ख्रिश्चनांनाही लागू केले. (इब्री लोकांना १०:३६, ३७ वाचा.) त्यामुळे नवीन जग यायला खूप उशीर होत आहे असं जरी आपल्याला वाटत असलं, तरी आपण याची खातरी ठेवू शकतो, की ‘ते नक्कीच खरं ठरेल. त्याला उशीर होणार नाही!’
१७. यहोवाने हबक्कूक संदेष्ट्याला दिलेला सल्ला एका बहिणीने कसा लागू केला?
१७ यहोवाने सांगितल्याप्रमाणे त्याचे बरेच सेवक अनेक दशकांपासून नवीन जगाची ‘वाट पाहत आहेत.’ १९३९ पासून लुईस नावाची बहीण यहोवाची सेवा करू लागली. ती म्हणते: “त्या वेळी मला असं वाटलं होतं, की माझं शिक्षण पूर्ण होण्याआधीच हर्मगिदोन येईल. पण तसं काहीच झालं नाही. पुढच्या काही वर्षांत बायबलमधल्या अशा काही लोकांचे अहवाल मी वाचले ज्यांनी यहोवाचं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहिली होती. त्यामुळे मलाही धीराने वाट पाहायला मदत झाली. मी नोहा, अब्राहाम, योसेफ आणि इतर विश्वासू सेवकांचे अहवाल वाचले. यहोवाने वचन दिलेले आशीर्वाद अनुभवण्यासाठी त्यांनाही बराच काळ वाट पाहावी लागली. वाट पाहत राहिल्यामुळे मला आणि इतरांना नवीन जग लवकरच येणार आहे या गोष्टीची खातरी बाळगून त्यावर आपली नजर टिकवून ठेवायला मदत झाली.” यहोवाची बराच काळ सेवा करणाऱ्या भाऊबहिणींचंही नक्की असंच म्हणणं असेल!
१८. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचं परीक्षण केल्यामुळे नवीन जगावरचा आपला विश्वास कसा मजबूत होतो?
१८ हे खरंय, की नवीन जग अजूनही आलेलं नाही. पण आपल्या सभोवती असलेल्या काही गोष्टींचा विचार करा. जसं की, झाडं, प्राणी, माणसं आणि तारे. या सगळ्या गोष्टी एकेकाळी अस्तित्वात नव्हत्या, तरी त्या आहेत यावर कोणी शंका घेणार नाही. या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत कारण यहोवाने त्यांना बनवलंय. (उत्प. १:१, २६, २७) आपल्याला देवाने नवीन जग आणायचंसुद्धा वचन दिलंय. आणि तो तेही नक्कीच पूर्ण करेल. नवीन जगात लोक परिपूर्ण आरोग्य असलेल्या कायमच्या जीवनाचा आनंद घेतील. आणि देवाने ठरवलेल्या वेळी ते नवीन जग आपल्या आजूबाजूच्या गोष्टींइतकंच खरं असेल.—यश. ६५:१७; प्रकटी. २१:३, ४.
१९. तुम्ही तुमचा विश्वास कसा मजबूत करू शकता?
१९ नवीन जग येईपर्यंत प्रत्येक संधीचा फायदा घेऊन आपला विश्वास मजबूत करा. खंडणी बलिदानाबद्दल आपली कदर आणखी वाढवा. यहोवा किती शक्तिशाली आहे यावर सखोल विचार करा. आणि आध्यात्मिक गोष्टी करण्यात व्यस्त राहा. असं केल्यामुळे “विश्वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारस होतात,” त्यांच्यापैकी तुम्हीसुद्धा एक असाल!—इब्री ६:११, १२; रोम. ५:५.
गीत १३९ नव्या जगी स्वतःला पहा
a बायबलमध्ये दिलेल्या नवीन जगाच्या अभिवचनावर आज बऱ्याच जणांचा विश्वास नाही. त्यांना वाटतं, की हे एक स्वप्न किंवा एक काल्पनिक कथा आहे किंवा मग अगदीच अशक्य गोष्ट आहे. पण यहोवाने दिलेली सगळी अभिवचनं तो पूर्ण करेल अशी आपल्याला खातरी आहे. आपला हा विश्वास जिवंत ठेवण्यासाठी त्याला मजबूत करत राहणं खूप गरजेचं आहे. आपण हे कसं करू शकतो, ते या लेखात पाहू या.
b काही नावं बदलण्यात आली आहेत.
c बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांबद्दल आणखी लेख वाचण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक यात “बायबल” या विषयाखाली, “भविष्यवाणी” हे उपशीर्षक पाहा. उदाहरणार्थ, १ जानेवारी २००८ च्या टेहळणी बुरूज अंकातला, “यहोवा जे भाकीत करतो ते खरे ठरते,” हा लेख पाहा.