व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १५

येशूने केलेल्या चमत्कारांमधून आपण काय शिकू शकतो?

येशूने केलेल्या चमत्कारांमधून आपण काय शिकू शकतो?

‘तो चांगली कामं करत आणि लोकांना बरं करत संपूर्ण देशभर फिरला.’​—प्रे. कार्यं १०:३८.

गीत १३ ख्रिस्ताचा आदर्श

सारांश a

१. येशूच्या पहिल्या चमत्काराबद्दल थोडक्यात सांगा.

 इ.स. २९ मध्ये घडलेल्या एका घटनेचं चित्र डोळ्यांसमोर उभं करा. येशूने नुकतीच आपल्या सेवाकार्याला सुरवात केली आहे. येशू जिथं राहतो त्या नासरेथच्या उत्तरेला काना नावाचं एक छोटसं गाव आहे. तिथे एक लग्न आहे आणि या लग्नाला येशू, त्याची आई आणि त्याच्या काही शिष्यांनासुद्धा आमंत्रण देण्यात आलंय. मरीया वधू-वराच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे ओळखते आणि त्यामुळे असं दिसतं, की येणाऱ्‍या पाहुण्यांना काय हवं, काय नको हे ती पाहत आहे. पण मेजवानीत एक समस्या निर्माण होते. पाहुण्यांसाठी असलेला द्राक्षारस संपतो आणि यामुळे वधू-वराला आणि त्यांच्या कुटुंबाला शरमेने मान खाली घालायची पाळी येते. b लग्नाला अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्यामुळे असं घडलं असावं. हे पाहून मरीया लगेच आपल्या मुलाला म्हणते: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” (योहा. २:१-३) मग येशू काय करतो? तो एक असाधारण गोष्ट करतो, तो चमत्कार करून पाण्याचा “चांगला द्राक्षारस” बनवतो.​—योहा. २:९, १०.

२-३. (क) येशूने आपल्या चमत्कार करायच्या शक्‍तीचा उपयोग कसा केला? (ख) येशूने केलेल्या चमत्कारांवर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

पुढे येशूने त्याच्या सेवाकार्यादरम्यान आणखी बरेच चमत्कार केले. c त्याने आपल्या चमत्कार करायच्या शक्‍तीचा उपयोग करून हजारो लोकांना मदत केली. उदाहरणार्थ, त्याच्या दोन चमत्कारांचाच विचार करा. बायबलमध्ये असं म्हटलंय, की एकदा त्याने ५,००० पुरुषांना आणि नंतर ४,००० पुरुषांना जेवू घातलं. आणि त्यांच्यासोबत आलेल्या स्त्रियांचा आणि मुलांचाही विचार केला तर त्या ठिकाणी आलेल्या लोकांची संख्या २७ हजार पेक्षा जास्त होती. (मत्त. १४:१५-२१; १५:३२-३८) आणि या दोन्ही वेळी त्याने बऱ्‍याच आजारी लोकांनासुद्धा बरं केलं. (मत्त. १४:१४; १५:३०, ३१) विचार करा, येशूने तिथे जमलेल्या लोकांना जेवू घातलं आणि त्यांना चमत्कार करून बरं केलं, हे पाहून तिथे जमलेल्या लोकांना किती आश्‍चर्य वाटलं असेल!

येशूने केलेल्या चमत्कारांवरून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आपला विश्‍वास वाढवणारे अनेक धडे आपल्याला शिकायला मिळतात. त्यांपैकीच काहींवर आपण या लेखात चर्चा करू या. तसंच, हे चमत्कार करत असताना येशूने नम्रतेची आणि दयाळूपणाची जी भावना दाखवली तिचं आपण कसं अनुकरण करू शकतो, हेही आपण पाहू या.

यहोवा आणि येशूबद्दल शिकायला मिळणारे धडे

४. येशूने केलेल्या चमत्कारांवरून आपल्याला कोणाबद्दल शिकायला मिळतं?

येशूने केलेल्या चमत्कारांमुळे आपल्याला फक्‍त त्याच्याबद्दलच नाही, तर त्याच्या पित्याबद्दल, यहोवाबद्दलही बरंच काही शिकायला मिळतं आणि त्यामुळे आपला विश्‍वास वाढतो. कारण त्याने केलेल्या चमत्कारांमागे खरंतर यहोवाची ताकद होती. प्रेषितांची कार्यं १०:३८ मध्ये म्हटलंय: “त्याला देवाने पवित्र शक्‍तीने आणि सामर्थ्याने अभिषिक्‍त केलं. तो चांगली कामं करत आणि सैतानाने पीडित केलेल्या लोकांना बरं करत संपूर्ण देशभर फिरला, कारण देव त्याच्यासोबत होता.” शिवाय हेसुद्धा लक्षात घ्या, की येशू जे काही बोलला आणि त्याने जे काही केलं, तसंच त्याने जे चमत्कार केले, त्यांवरून त्याच्या पित्याचे विचार आणि भावना दिसून आल्या. (योहा. १४:९) आता आपण येशूने केलेल्या चमत्कारांवरून कोणते तीन धडे शिकायला मिळतात ते पाहू या.

५. येशूने कोणत्या गोष्टीमुळे चमत्कार केले? (मत्तय २०:३०-३४)

पहिला धडा: येशूचं आणि त्याच्या पित्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे.  पृथ्वीवर असताना येशूने आपल्या चमत्कार करायच्या शक्‍तीचा वापर करून लोकांचं दुःख हलकं केलं. त्यावरून लोकांबद्दल त्याला किती प्रेम आहे हे दिसून आलं. उदाहरणार्थ, एकदा दोन आंधळ्यांनी मोठ्याने ओरडून त्याच्याकडे मदत मागितली. (मत्तय २०:३०-३४ वाचा.) त्या वेळी येशूला त्यांचा “कळवळा” आला आणि त्याने त्यांना बरं केलं. इथे ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “कळवळा” असं करण्यात आलंय त्या शब्दाचा अर्थ ‘मनात अगदी आतून वाटणारी हळहळ’ असा होतो. याच कोमल भावनेने त्याने भुकेल्यांना जेवू घातलं आणि एका कुष्ठरोग्याला बरं केलं. आणि अशा प्रकारे त्याने लोकांवर आपलं प्रेम दाखवलं. (मत्त. १५:३२; मार्क १:४१) यावरून आपण याची खातरी बाळगू शकतो, की ‘कोमल दया’ दाखवणाऱ्‍या यहोवा देवाचं आणि त्याच्या मुलाचं आपल्यावर जिवापाड प्रेम आहे. जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा त्यांनासुद्धा दुःख होतं. (लूक १:७८; १ पेत्र ५:७) खरंच मानवजातीच्या सगळ्या समस्या काढून टाकण्यासाठी यहोवा आणि येशू किती आतुरतेने वाट पाहत असतील!

६. देवाने येशूला काय करायची ताकद दिली आहे?

दुसरा धडा: देवाने येशूला मानवजातीच्या सगळ्या समस्या काढून टाकण्याची ताकद दिली आहे.  चमत्कार करून येशूने दाखवून दिलं, की ज्या समस्यांवर आपण मात करू शकत नाही, त्या काढून टाकण्याची ताकदसुद्धा येशूमध्ये आहे. उदाहरणार्थ, मानवजातीच्या समस्यांचं मूळ कारण काढून टाकायची जबरदस्त ताकदसुद्धा त्याच्यामध्ये आहे. ते कारण म्हणजे, वारशाने मिळालेलं पाप आणि त्यामुळे आलेलं आजारपण आणि मृत्यू. (मत्त. ९:१-६; रोम. ५:१२, १८, १९) त्याने केलेल्या चमत्कारांवरून हे सिद्ध झालं, की तो “सर्व प्रकारचे” आजार बरे करू शकतो आणि अगदी मेलेल्यांनासुद्धा पुन्हा उठवू शकतो. (मत्त. ४:२३; योहा. ११:४३, ४४) शिवाय, त्याच्याकडे मोठमोठ्या वादळांना शांत करण्याची आणि लोकांमधून दुष्ट स्वर्गदूतांना काढून टाकण्याची जबरदस्त ताकदसुद्धा आहे. (मार्क ४:३७-३९; लूक ८:२) यहोवाने आपल्या मुलाला किती जबरदस्त ताकद दिली आहे, हे पाहून आपल्यालाही दिलासा मिळत नाही का?

७-८. (क) येशूच्या चमत्कारांवरून आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी मिळते? (ख) देवाच्या नवीन जगात खासकरून कोणता चमत्कार पाहण्याची तुमची इच्छा आहे?

तिसरा धडा: आपण याची खातरी बाळगू शकतो की देवाने त्याच्या राज्यात जे आशीर्वाद देण्याचं अभिवचन दिलंय ते नक्की पूर्ण होईल.  पृथ्वीवर असताना येशूने जे चमत्कार केले त्यांवरून दिसून येतं, की देवाच्या राज्याचा राजा म्हणून तो या गोष्टी किती मोठ्या प्रमाणात करेल. त्या वेळी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अनुभवायला मिळतील याचा विचार करा. आपलं आरोग्य परिपूर्ण असेल, कारण वर्षानुवर्षं मानवजातीला पिडणारे आजार आणि रोग तो काढून टाकेल. (यश. ३३:२४; ३५:५, ६; प्रकटी. २१:३, ४) आपण कधीच भुकेले असणार नाही किंवा नैसर्गिक विपत्तीचा कधीच आपल्याला सामना करावा लागणार नाही. (यश. २५:६; मार्क ४:४१) तसंच, ‘स्मारक कबरींमधून’ परत आलेल्या आपल्या प्रियजनांना पुन्हा भेटायची आणि त्यांचं स्वागत करायची जबरदस्त संधीसुद्धा आपल्याला असेल. (योहा. ५:२८, २९) तर मग देवाच्या नवीन जगात खासकरून कोणता चमत्कार पाहण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात?

चमत्कार करताना येशू खूप नम्र होता. आणि त्याला लोकांबद्दल कळवळा होता. येशूच्या या सुंदर गुणांचं आपणही अनुकरण केलं पाहिजे. ते आपल्याला कसं करता येईल? चला त्यासाठी आपण त्याने केलेल्या दोन चमत्कारांवर लक्ष देऊ या. सगळ्यात आधी त्याने काना इथे केलेल्या चमत्काराबद्दल पाहू या.

नम्र राहण्याबद्दल धडा

९. लग्नाच्या मेजवानीत येशूने काय केलं? (योहान २:६-१०)

योहान २:६-१० वाचा. लग्नाच्या मेजवानीत जेव्हा द्राक्षारस संपला, तेव्हा येशूला काही करायची गरज होती का? नाही. येशू चमत्कार करून द्राक्षारस बनवेल अशी कोणतीही भविष्यवाणी नव्हती. पण तुमच्या स्वतःच्या लग्नात जर खाण्यापिण्याच्या गोष्टी कमी पडल्या, तर तुम्हाला कसं वाटेल याचा विचार करा. त्यामुळेच त्या कुटुंबाबद्दल आणि खासकरून वधू आणि वराबद्दल येशूला सहानुभूती वाटली असेल. आणि त्यांच्यावर शरमेने मान खाली घालायची पाळी येऊ नये, असं येशूला वाटलं असेल. म्हणूनच त्याने चमत्कार केला आणि जवळपास ३९० लिटर पाण्याचं चांगल्यातल्या चांगल्या द्राक्षारसात रूपांतर केलं. पण त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात द्राक्षारस का बनवला होता? पुढेही त्या कुटुंबाला तो द्राक्षारस वापरता यावा किंवा तो विकून नवीन जोडप्याला थोडेफार पैसे मिळावेत, म्हणून कदाचित येशूने असं केलं असावं. विचार करा, येशूने केलेल्या या चमत्कारामुळे त्या नवीन जोडप्याला किती बरं वाटलं असेल!

येशूने आपल्या कामांबद्दल कधीच बढाई मारली नाही. आपणही त्याचं अनुकरण केलं पाहिजे (परिच्छेद १०-११ पाहा) e

१०. योहान पुस्तकाच्या दुसऱ्‍या अध्यायातल्या घटनेमध्ये सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? (चित्रसुद्धा पाहा.)

१० योहान पुस्तकाच्या दुसऱ्‍या अध्यायात या घटनेबद्दल दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. जसं की, येशूने स्वतःहून त्या ठिकाणी ठेवलेले दगडी रांजण पाण्याने भरले नाहीत, हे तुमच्या लक्षात आलं का? स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधण्याऐवजी त्याने ती गोष्ट सेवकांना करायला सांगितली. (वचन ६, ७) तसंच पाण्याचा द्राक्षारस केल्यानंतरही तो त्यातला द्राक्षारस काढून स्वतःहून मेजवानीची देखरेख करणाऱ्‍याकडे गेला नाही. उलट त्याने हे काम सेवकांना सांगितलं. (वचन ८) शिवाय, द्राक्षारसाचा प्याला हातात घेऊन, ‘मी आत्ताच बनवलेला द्राक्षारस जरा चाखून तर बघा!’ अशी बढाईसुद्धा त्याने आलेल्या पाहुण्यांसमोर मारली नाही.

११. येशूने केलेल्या चमत्कारावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

११ येशूने पाण्यापासून द्राक्षारस बनवायचा जो चमत्कार केला त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? त्यातून आपल्याला नम्रतेचा एक धडा शिकायला मिळतो. येशूने केलेल्या या चमत्काराबद्दल त्याने बढाई मारली नाही. खरंतर आपण केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल त्याने कधीच  बढाई मारली नाही. उलट, त्याने नम्रपणे सगळं श्रेय आणि गौरव आपल्या पित्याला दिला. (योहा. ५:१९, ३०; ८:२८) आपणही जर येशूप्रमाणे नम्र असू, तर आपण केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल बढाई मारणार नाही. यहोवाच्या सेवेत आपल्याला काहीही करायची संधी मिळाली, तरी स्वतःबद्दल नाही तर आपल्या महान देवाची सेवा करायचा जो सन्मान आपल्याला मिळालाय त्याबद्दल आपण अभिमान बाळगला पाहिजे. (यिर्म. ९:२३, २४) म्हणून जो गौरव आणि सन्मान आपल्या देवाला मिळाला पाहिजे तो आपण त्याला देत राहू या. कारण त्याच्या मदतीशिवाय आपण कोणतीच गोष्ट साध्य करू शकत नाही.​—१ करिंथ. १:२६-३१.

१२. आणखी कोणत्या एका मार्गाने आपण येशूसारखी नम्रता दाखवू शकतो? उदाहरण द्या.

१२ आपण आणखी एका मार्गाने येशूसारखी नम्रता दाखवू शकतो. अशी कल्पना करा, की एक वडील एका तरुण सहायक सेवकाला त्याचं पहिलं जाहीर भाषण तयार करण्यासाठी भरपूर मदत करतात. त्यामुळे तो तरुण भाऊ मंडळीत एक खूप सुंदर भाषण देतो आणि सगळ्यांनाच त्याचं भाषण आवडतं. सभेनंतर एक जण त्या वडिलांकडे येतो आणि म्हणतो: ‘भावाने मस्त टॉक दिला, नाही का?’ आता ते वडील असं म्हणतील का: ‘हो पण त्यासाठी खूप मदत करावी लागली त्याला’? का ते नम्रपणे फक्‍त एवढंच म्हणतील: ‘हो खरंच, मला कौतुक करावंसं वाटतंय त्याचं.’ आपण जर नम्र असू, तर आपण इतरांसाठी करत असलेल्या चांगल्या गोष्टींचं श्रेय स्वतः कधीच घेणार नाही. उलट आपण यातच समाधान मानू, की आपण करत असलेल्या गोष्टी यहोवा पाहतो आणि त्याला त्याची कदर आहे. (मत्तय ६:२-४ सोबत तुलना करा; इब्री १३:१६) खरंच, आपण येशूसारखी नम्रता दाखवतो, तेव्हा यहोवा आपल्यावर खूश होतो.​—१ पेत्र ५:६.

इतरांना दया आणि सहानुभूती दाखवण्याबद्दल धडा

१३. नाईन शहरात पोचल्यावर येशू काय पाहतो आणि ते पाहिल्यावर तो काय करतो? (लूक ७:११-१५)

१३ लूक ७:११-१५ वाचा. येशूचं सेवाकार्य सुरू होऊन आता साधारण दीडएक वर्षं उलटली होती. त्यादरम्यान घडलेल्या एका घटनेचं दृश्‍य डोळ्यांसमोर उभं करा. येशू नाईन नावाच्या गावी आला आहे. गालीलमधलं हे गाव शूनेमपासून जास्त दूर नाही. या ठिकाणी अलीशाने जवळपास ९०० वर्षांआधी एका स्त्रीच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं होतं. (२ राजे ४:३२-३७) येशू जेव्हा नाईन शहरात पोचतो, तेव्हा शहराच्या प्रवेशद्वाराजवळ त्याला काही लोक दिसतात जे एका मेलेल्या माणसाला नेत आहेत. कोणालाही वाईट वाटेल असंच ते दृश्‍य आहे. कारण एका विधवेचा तो एकुलता एक मुलगा आहे. पण ती विधवा एकटीच नाही. तिच्यासोबत शहरातले बरेच लोक आहेत. ते पाहून येशू त्या जमावाला थांबवतो आणि दुःखात बुडालेल्या त्या आईसाठी तो एक विलक्षण गोष्ट करतो. तो तिच्या मुलाला पुन्हा जिवंत करतो. शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये येशूने केलेल्या तीन पुनरुत्थानांबद्दल सांगितलंय, त्यांपैकी हा पहिला होता.

येशूचं अनुकरण करून आपणही दुःखात बुडालेल्या लोकांना सहानुभूती दाखवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे (परिच्छेद १४-१६ पाहा)

१४. लूकच्या ७ व्या अध्यायात या घटनेबद्दल कोणत्या काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत? (चित्रसुद्धा पाहा)

१४ लूकच्या सातव्या अध्यायात दिलेल्या या घटनेच्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्या लक्षात आलं का, की सगळ्यात आधी शोक करणाऱ्‍या त्या आईकडे येशूचं लक्ष गेलं. आणि तिला पाहताच  त्याला “तिचा कळवला आला.” (वचन १३) लोक त्या मुलाला घेऊन जात असताना, येशूने कदाचित त्या मुलासोबत जाणाऱ्‍या आईकडे पाहिलं असेल. तिला किती दुःख होतंय, ती किती शोक करत आहे, ते पाहून त्याचं मन भरून आलं असेल. येशूला फक्‍त तिचा कळवळा आला  नाही तर तिच्यासाठी येशूने काहीतरी केलंसुद्धा.  आणि त्यावरून दिसून आलं, की त्याला तिच्याबद्दल किती सहानुभूती होती. येशू तिला म्हणाला: “रडू नकोस.” येशू नक्कीच हे खूप प्रेमाने बोलला असेल. आणि तिने काही बोलण्याआधी त्याने स्वतःहूनच तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं आणि ‘तिच्याकडे सोपवलं.’​—वचन १४, १५.

१५. येशूने केलेल्या या चमत्कारावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१५ येशूने विधवेच्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा जो चमत्कार केला त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? दुःखी असलेल्यांना सहानुभूती दाखवण्याचा धडा आपल्याला यातून शिकायला मिळतो. हे खरंय, की येशूप्रमाणे आपण मेलेल्यांना पुन्हा जिवंत करू शकत नाही. पण ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय, त्यांना आपण येशूप्रमाणेच सहानुभूती नक्कीच दाखवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला येशूसारखंच अशा लोकांकडे लक्ष द्यावं लागेल. तसंच, येशूप्रमाणे आपण पुढे येऊन आपल्या शब्दांनी त्यांना सहानुभूती दाखवू शकतो आणि जमेल ते करून आपण त्यांना मदत आणि सांत्वन देऊ शकतो. d (नीति. १७:१७; २ करिंथ. १:३, ४; १ पेत्र ३:८) आपण प्रेमाचे दोन शब्द जरी त्यांना बोललो किंवा प्रेमाने छोटसं जरी काही केलं तरी त्यांना खूप धीर मिळू शकतो.

१६. नुकतंच आपल्या मुलीला गमावलेल्या एका आईच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१६ एक अनुभव पाहा. काही वर्षांआधी मंडळीच्या सभेत गीत गात असताना एका बहिणीने दुसऱ्‍या एका बहिणीला रडताना पाहिलं. ते पुनरुत्थानाच्या आशेबद्दलचं गीत होतं. आणि नुकताच त्या बहिणीच्या तरुण मुलीचा मृत्यू झाला होता. हे पाहताच ती बहीण लगेच तिच्याकडे गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्यासोबत गीत गाऊ लागली. आपल्या मुलीसाठी रडणाऱ्‍या त्या आईने नंतर असं म्हटलं: “खरंच, आपले भाऊबहीण किती चांगले आहेत हे मला जाणवलं.” त्या बहिणीला खूप बरं वाटलं, की त्या दिवशी ती सभेला गेली. कारण ती म्हणते “तिथेच, राज्यसभागृहातच आपल्याला मदत मिळते.” जवळच्या लोकांसाठी शोक करणाऱ्‍या, ‘मनाने खचून गेलेल्या’ लोकांना सहानुभूती दाखवण्यासाठी आपण छोटसं जरी काही केलं, तरी यहोवा ते पाहतो आणि त्या गोष्टीची कदर करतो, याची आपण खातरी बाळगू शकतो.​—स्तो. ३४:१८.

विश्‍वास वाढवेल असा अभ्यास

१७. या लेखात आपण काय शिकलो?

१७ शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये येशूने केलेल्या चमत्कारांच्या अहवालांवर अभ्यास करणं एक विश्‍वास वाढवणारा अनुभव ठरू शकतो. त्यावरून यहोवा आणि येशूचं आपल्यावर किती प्रेम आहे, ते आपल्याला शिकायला मिळतं. तसंच, संपूर्ण मानवजातीच्या समस्या सोडवण्याची ताकद येशूमध्ये आहे या गोष्टीवरचा आणि लवकरच देवाच्या राज्यात आपल्याला आशीर्वाद देण्याचं जे वचन यहोवाने दिलंय, त्यावरचा आपला विश्‍वास वाढतो. या अहवालांचा अभ्यास करत असताना येशूच्या गुणांचं अनुकरण कसं करता येईल, यावरसुद्धा आपण मनन करू शकतो. तेव्हा येशूने केलेल्या इतर चमत्कारांबद्दल तुम्ही व्यक्‍तिगत अभ्यासात किंवा तुमच्या कौटुंबिक उपासनेत अभ्यास करू शकता. त्यातून तुम्हाला कोणते धडे शिकायला मिळतात ते पाहा आणि त्याबद्दल इतरांना सांगा. शिवाय, यामुळे एकमेकांना किती प्रोत्साहन मिळू शकतं याचा विचार करा.​—रोम. १:११, १२.

१८. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१८ येशूचं सेवाकार्य संपत आलं, तेव्हा त्याने तिसरं आणि शेवटचं पुनरुत्थान केलं. पण या वेळी त्याने जे पुनरुत्थान केलं ते अगदीच वेगळं होतं. त्याने आपल्या जवळच्या मित्राला पुन्हा जिवंत केलं आणि तेही अगदी असामान्य परिस्थितीत. शुभवर्तमानाच्या पुस्तकांत दिलेल्या या चमत्कारातून आपण काय शिकतो? आणि पुनरुत्थानाच्या आशेवरचा आपला भरवसा आपण आणखी कसा वाढवू शकतो? पुढच्या लेखात आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील.

गीत २० तू दिलेस अनमोल अर्पण

a त्याने भयानक वादळ शांत केलं, आजाऱ्‍यांना बरं केलं आणि मेलेल्यांना पुन्हा उठवलं. येशूने केलेल्या या चमत्कारांबद्दल बायबलमधून वाचताना खरंच रोमांचक वाटतं. पण बायबलमध्ये दिलेले हे अहवाल आपल्या मनोरंजनासाठी नाहीत, तर त्यांतून आपण शिकावं म्हणून आहेत. या लेखात आपण येशूच्या काही चमत्कारांबद्दल थोडक्यात चर्चा करू या. आणि हे करत असताना यहोवा आणि येशूवरचा आपला विश्‍वास वाढावा म्हणून आपल्याला त्यांतून काय शिकायला मिळतं ते पाहू या. तसंच, आपल्याला स्वतःमध्ये वाढवता येतील अशा काही गुणांबद्दलसुद्धा यांतून आपल्याला काय शिकायला मिळतं तेही पाहू या.

b बायबलचा एक विद्वान म्हणतो: “बायबल काळात पाहुण्याचं स्वागत करणं एक पवित्र गोष्ट आहे असं मानलं जायचं. त्यामुळे घरी आलेले पाहुणे पोटभर जेवून तृप्त झाले पाहिजेत याकडे खूप बारकाईने लक्ष दिलं जायचं. लग्नकार्यात तर याकडे विशेष लक्ष दिलं जायचं. आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींची भरपूर व्यवस्था केली जायची.”

c शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये येशूने केलेल्या ३० हून जास्त चमत्कारांचा विशेष उल्लेख करण्यात आलाय. पण त्याने असे कितीतरी चमत्कार केले ज्यांचा थोडक्यातच उल्लेख करण्यात आलाय. जसं की, एकदा “संपूर्ण शहर” त्याच्याकडे आलं “तेव्हा त्याने वेगवेगळे आजार असलेल्या” अनेक लोकांना बरं केलं. बायबलमध्ये अशा चमत्कारांबद्दल सविस्तर सांगितलेलं नाही.​—मार्क १:३२-३४.

d एखाद्याचं सांत्वन करण्यासाठी काय बोलता येईल आणि काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी १ नोव्हेंबर २०१० च्या टेहळणी बुरूज  इंग्रजी अंकातला “ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय, त्यांचं येशूप्रमाणे सांत्वन करा” हा लेख पाहा.

e चित्राचं वर्णन: वधू-वर आणि पाहुणे येशूने बनवलेल्या चांगल्या द्राक्षारसाचा आनंद घेत आहेत आणि मागे येशू उभा आहे.