व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १७

गीत १११ आपल्या आनंदाची कारणं!

आध्यात्मिक नंदनवन कधीच सोडून जाऊ नका!

आध्यात्मिक नंदनवन कधीच सोडून जाऊ नका!

“मी आता जे निर्माण करतोय, त्यामुळे जल्लोष करा आणि सर्वकाळ आनंदी राहा.”​—यश. ६५:१८.

या लेखात:

आध्यात्मिक नंदनवनाचे आपल्याला कसे फायदे होऊ शकतात आणि आपण इतरांना त्यात कसं आणू शकतो ते पाहा.

१. आध्यात्मिक नंदनवन काय आहे? आणि त्यात राहणाऱ्‍यांची काय इच्छा आहे?

 आज या पृथ्वीवर एक असं नंदनवन आहे, ज्यात पुष्कळ लोक एक चांगलं काम करण्यात व्यस्त आहेत. या नंदनवनात आज लाखो लोक खऱ्‍या शांतीचा आनंद घेत आहेत. आणि त्यांना हे नंदनवन सोडून जायची अजिबात इच्छा नाही. उलट आणखी लोकांनी या नंदनवनात यावं अशी त्यांची इच्छा आहे. हे नंदनवन म्हणजे आध्यात्मिक नंदनवन! a

२. आध्यात्मिक नंदनवनाबद्दल एक विशेष गोष्ट कोणती आहे?

सैतानाच्या या दुष्ट, धोकेदायक आणि द्वेषपूर्ण जगात यहोवाने एक असं लाक्षणिक ठिकाण बनवलंय ज्यात राहणाऱ्‍या लोकांमध्ये शांती आणि एकता आहे. आणि ही गोष्ट खूप विशेष आहे. (१ योहा. ५:१९; प्रकटी. १२:१२) आपल्या प्रेमळ देवाला या दुष्ट जगाच्या व्यवस्थेचे धोकेदायक परिणाम माहीत आहेत. म्हणून आपली आध्यात्मिक रित्या भरभराट व्हावी यासाठी तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. त्याच्या वचनात, बायबलमध्ये आध्यात्मिक नंदनवनाला “आसरा” आणि ‘भरपूर पाणी मिळालेली बाग’ म्हटलंय. (यश. ४:६; ५८:११) यहोवाच्या आशीर्वादामुळे नंदनवनात राहणारे लोक, या शेवटच्या कठीण दिवसांतसुद्धा आनंदी आणि सुरक्षित आहेत.​—यश. ५४:१४; २ तीम. ३:१.

३. यशया ६५ मधल्या भविष्यवाणीची पहिली पूर्णता कशी झाली?

यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍या लोकांचं आयुष्य कसं असेल याबद्दल सांगितलं. यशया ६५ अध्यायात तुम्हाला याबद्दल वाचायला मिळेल. याची पहिली पूर्णता इ.स.पू. ५३७ मध्ये झाली. त्या वेळी पश्‍चात्ताप करणाऱ्‍या यहुद्यांना बाबेलच्या बंदिवासातून सोडण्यात आलं आणि ते पुन्हा त्यांच्या मायदेशी परतले. यहोवाने त्याच्या लोकांना आशीर्वाद दिला आणि उद्ध्‌वस्त झालेलं यरुशलेम शहर सुंदर बनवण्यासाठी आणि इस्राएलमध्ये खऱ्‍या उपासनेचं केंद्र असलेलं मंदिर पुन्हा बांधण्यासाठी त्यांना मदत केली.​—यश. ५१:११; जख. ८:३.

४. यशया ६५ मधल्या भविष्यवाणीची दुसरी पूर्णता कशी झाली?

इ.स. १९१९ मध्ये यशयाच्या भविष्यवाणीची दुसरी पूर्णता व्हायला सुरुवात झाली. त्या वेळी यहोवाच्या सेवकांना मोठ्या बाबेलच्या गुलामगिरीतून मुक्‍त करण्यात आलं. तेव्हापासून आध्यात्मिक नंदनवन पूर्ण पृथ्वीवर तयार होऊ लागलं. आवेशी राज्य प्रचारकांनी बऱ्‍याच मंडळ्या सुरू केल्या. आणि ते ख्रिस्ती गुण दाखवू लागले. हिंसक आणि अनैतिक जीवन जगणारे स्त्री-पुरुष आता “देवाच्या इच्छेप्रमाणे निर्माण करण्यात आलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण” करू लागले. (इफिस. ४:२४) हे खरंय, की यशयाने ज्या आशीर्वादांबद्दल सांगितलं होतं, ते नवीन जगात प्रत्यक्ष पूर्ण होतील. पण आपण आजसुद्धा भरपूर आशीर्वादांचा अनुभव घेत आहोत. मग आध्यात्मिक नंदनवनाचे आपल्याला काय फायदे होत आहेत? आणि आपण ते सोडून का जाऊ नये? ते आता पाहू या.

आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍यांची वैशिष्ट्यं

५. यशया ६५:१३ प्रमाणे आध्यात्मिक नंदनवनात आपण कोणकोणत्या गोष्टींचा आनंद घेत आहोत?

आरोग्यदायी आणि ताजंतवानं.  यशयाच्या भविष्यवाणीत आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍या लोकांमध्ये आणि बाहेर राहणाऱ्‍या लोकांमध्ये असलेला मोठा फरक स्पष्टपणे पाहायला मिळतो. (यशया ६५:१३ वाचा.) यहोवा त्याच्या सेवकांच्या आध्यात्मिक गरजा उदारतेने पूर्ण करतो. आपल्याकडे त्याची पवित्र शक्‍ती आहे, त्याचं वचन आहे आणि भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न आहे. यामुळे आपण ‘पोटभर खाऊ शकतो, आपली तहान भागवू शकतो आणि आनंद साजरा करू शकतो.’ (प्रकटीकरण २२:१७ सोबत तुलना करा.) याच्या अगदी उलट, आध्यात्मिक नंदनवनाच्या बाहेर असलेले लोक “उपाशीच” आणि “तहानलेलेच” राहतात आणि यामुळे ते “लज्जित” होतात. कारण त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होत नाहीत.​—आमो. ८:११.

६. योएल २:२१-२४ मध्ये आध्यात्मिक अन्‍नाबद्दल काय सांगितलंय? आणि आपल्याला त्याचा कसा फायदा होऊ शकतो?

योएलने त्याच्या भविष्यवाणीत धान्य, द्राक्षारस आणि जैतुनाच्या तेलासारख्या गरजेच्या गोष्टींचा उल्लेख केला. त्यातून त्याला हे सांगायचं होतं, की यहोवा त्याच्या लोकांना गरजेचं आणि त्यासोबतच आध्यात्मिक अन्‍न अगदी उदारतेने पुरवतो. (योए. २:२१-२४) हे आध्यात्मिक अन्‍न तो बायबल, बायबल आधारित साहित्यं, वेबसाईट तसंच सभांमधून, संमेलनांमधून आणि अधिवेशनांमधून पुरवतो. आपण दररोज हे आध्यात्मिक अन्‍न घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला आरोग्यदायी आणि ताजंतवानं वाटेल.

७. कशामुळे आपलं ‘मन आनंदी आहे’? (यशया ६५:१४)

आनंदी आणि समाधानी.  यहोवाने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल कदर असल्यामुळे त्याचे लोक “मोठ्याने जयघोष” करतात. (यशया ६५:१४ वाचा.) देवाच्या वचनातल्या प्रोत्साहन देणाऱ्‍या सत्यामुळे, सांत्वन देणाऱ्‍या अभिवचनांमुळे आणि ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर आधारित असलेल्या मजबूत आशेमुळे आपलं ‘मन आनंदी आहे’. या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या भाऊबहिणींशी बोलल्यामुळे आपल्याला खरंच खूप आनंद होतो!​—स्तो. ३४:८; १३३:१-३.

८. आध्यात्मिक नंदनवनाची दोन मोठी वैशिष्ट्यं कोणती आहेत?

आध्यात्मिक नंदनवनातली दोन मोठी वैशिष्ट्यं म्हणजे यहोवाच्या लोकांमध्ये असलेलं प्रेम आणि एकता. नवीन जगात आपलं जीवन कसं असेल याची कल्पना आपल्याला ‘ऐक्याच्या बंधनातून’ येते. नवीन जगात यहोवाच्या सेवकांमध्ये आता आहे त्यापेक्षाही जास्त प्रेम आणि एकता पाहायला मिळेल. (कलस्सै. ३:१४) आपली एक बहीण जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना पहिल्यांदा भेटली तेव्हा तिचा अनुभव काय होता त्याबद्दल ती सांगते: “आनंदी कसं राहायचं हे मला माहीत नव्हतं, साधं कुटुंबातसुद्धा आनंदी कसं राहायचं हेपण मला माहीत नव्हतं. प्रेम काय असतं हे मी पहिल्यांदा यहोवाच्या साक्षीदारांमध्येच पाहिलं.” त्यामुळे जर एखाद्याला खऱ्‍या अर्थाने आनंदी आणि समाधानी राहायचं असेल, तर त्याने आध्यात्मिक नंदनवनाचा अनुभव घेतला पाहिजे. जग यहोवाच्या सेवकांबद्दल काहीही विचार करत असलं तरी यहोवाच्या आणि त्याची उपासना करणाऱ्‍यांच्या नजरेत त्यांचं एक चांगलं नाव आहे.​—यश. ६५:१५.

९. जीवनातल्या दुःखांबद्दल यशया ६५:१६, १७ मध्ये कोणतं अभिवचन दिलंय?

शांत मन.  यशया ६५:१४ मध्ये सांगितलंय, की जे आध्यात्मिक नंदनवनाच्या बाहेर राहायची निवड करतात त्यांचं ‘मन दुःखी असल्यामुळे ते मोठ्याने रडतात आणि निराशेमुळे आक्रोश करतात.’ पण ज्या गोष्टींमुळे देवाच्या लोकांना दुःख आणि त्रास सहन करावा लागतो त्या गोष्टींबद्दल काय? कालांतराने त्या गोष्टी ‘आठवणीत राहणार नाहीत, त्या देवाच्या नजरेआड केल्या जातील.’ (यशया ६५:१६, १७ वाचा.) यहोवा आपल्या सगळ्या समस्या काढून टाकेल आणि काळाच्या ओघात त्यांच्या आठवणींमुळे होणारं दुःखही नाहीसं केलं जाईल.

१०. भाऊबहिणींसोबत असणं हा आपल्यासाठी एक आशीर्वाद आहे असं तुम्हाला का वाटतं? (चित्रसुद्धा पाहा.)

१० आपण आजसुद्धा जेव्हा सभांना जातो तेव्हा आपलं मन शांत होतं. तिथे आपण या दुष्ट जगाच्या चिंता मागे टाकून निश्‍चिंत होऊ शकतो. आपण जेव्हा पवित्र शक्‍तीच्या फळांच्या गुणांपैकी प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता आणि दयाळूपणा हे गुण दाखवतो तेव्हा आपण या आध्यात्मिक नंदनवनाच्या शांतीला हातभार लावत असतो. (गलती. ५:२२, २३) खरंच देवाच्या संघटनेत राहणं हा आपल्यासाठी किती मोठा आशीर्वाद आहे! जे या आध्यात्मिक नंदनवनात राहायची निवड करतात ते “नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी” हे देवाचं अभिवचन पूर्ण होताना पाहतील.

देवाच्या कुटुंबाचा भाग म्हणून आध्यात्मिक नंदनवनाचा आनंद घेणं हा खरंच एक आशीर्वाद आहे (परिच्छेद १० पाहा) c


११. यशया ६५:१८, १९ प्रमाणे आध्यात्मिक नंदनवनाचा आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे?

११ आभारी आणि उत्सुक.  आपण आध्यात्मिक नंदनवनात “जल्लोष” का केला पाहिजे आणि “आनंदी” का राहिलं पाहिजे याबद्दल यशया सांगतो. हे लाक्षणिक नंदनवन यहोवाने बनवलंय. (यशया ६५:१८, १९ वाचा.) त्यामुळे यात आश्‍चर्य करण्यासारखं काहीच नाही की तो लोकांना आध्यात्मिक रितीने ओसाड पडलेल्या जगातल्या संघटनांमधून बाहेर काढायला आणि सुंदर लाक्षणिक नंदनवनात आणायला आपला वापर करतोय. सत्यात असल्यामुळे आपण ज्या आशीर्वादांचा आनंद घेतोय त्याबद्दल आपण उत्सुक आहोत. आणि त्यामुळेच इतरांना त्याबद्दल सांगायला आपण प्रवृत्त होतो.​—यिर्म. ३१:१२.

१२. यशया ६५:२०-२४ मधली अभिवचनं वाचून तुम्हाला कसं वाटतं आणि का?

१२ आध्यात्मिक नंदनवनाचे रहिवासी म्हणून आपल्याला मिळालेल्या आशेबद्दलसुद्धा आपण आभारी आणि उत्सुक आहोत. देवाच्या नवीन जगात आपल्याला काय पाहायला मिळेल आणि आपण काय करू या गोष्टींचा विचार करा. बायबल असं अभिवचन देतं: “पुन्हा कधीच असं बाळ जन्माला येणार नाही, जे फक्‍त काही दिवस जगेल. किंवा जो पूर्ण आयुष्य जगला नाही असा एकही वृद्ध माणूस” नसेल. आपण ‘घरं बांधू आणि त्यांत राहू, आपण द्राक्षांचे मळे लावू आणि त्यांचं फळ खाऊ.’ आपली “मेहनत वाया जाणार नाही.” कारण आपण “यहोवाने आशीर्वादित” केलेली मुलं असू. यहोवा आपल्याला खरा अर्थ असलेलं सुरक्षित आणि समाधानी जीवन देण्याचं वचन देतो. लोकांनी “हाक मारायच्या आधीच” त्याला प्रत्येकाच्या गरजा माहीत असतील. आणि तो “प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण” करेल.​—यश. ६५:२०-२४; स्तो. १४५:१६.

१३. लोक यहोवाची सेवा करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या जीवनात जो बदल होतो त्याबद्दल यशया ६५:२५ मध्ये कसं वर्णन करण्यात आलंय?

१३ शांत आणि सुरक्षित.  जे भाऊबहीण आधी क्रूर आणि हिंसक स्वभावाचे होते, त्यांनी आपल्या जीवनात पवित्र शक्‍तीच्या मदतीने खूप मोठमोठे बदल केलेत. (यशया ६५:२५ वाचा.) त्यांनी त्यांच्या वाईट गुणांवर मात करण्यासाठी खूप मेहनत घेतली. (रोम. १२:२; इफिस. ४:२२-२४) हे खरंय की देवाचे लोक अजूनही अपरिपूर्ण असल्यामुळे चुका करत राहतील, पण यहोवाने “सर्व प्रकारच्या” लोकांना प्रेम आणि शांतीच्या अतूट बंधनात बांधलंय. (तीत २:११) आणि हा चमत्कार सर्वशक्‍तिमान देवच करू शकतो!

१४. एका भावाच्या बाबतीत यशया ६५:२५ हे वचन कसं खरं ठरलं?

१४ लोकांचा स्वभाव खरंच बदलू शकतो का? या उदाहरणाचा विचार करा. २० वर्षांचा एक तरुण मुलगा बऱ्‍याच वेळा जेलमध्ये जाऊन आला होता. आणि त्याचं जीवन अनैतिक आणि हिंसक होतं. कार चोरी करणं, घरफोडी करणं आणि इतर गंभीर गुन्ह्यांसाठी त्याला बऱ्‍याच वेळा जेलमध्ये जावं लागलं होतं. तो कोणासोबतही भांडायला नेहमी तयार असायचा. पण जेव्हा त्याने बायबलमधलं सत्य पहिल्यांदा ऐकलं आणि यहोवाच्या साक्षीदारांसोबत सभांना जायला सुरुवात केली, तेव्हा त्याला आध्यात्मिक नंदनवनाबद्दल समजलं आणि त्यामुळे आपल्या जीवनाला एक अर्थ आहे या गोष्टीची त्याला खातरी पटली. बाप्तिस्मा घेऊन एक साक्षीदार बनल्यानंतर तो नेहमी यशया ६५:२५ हे वचन आपल्याला कसं लागू होतं या गोष्टीचा विचार करायचा. आता तो सिंहासारखा हिंसक नाही तर कोकऱ्‍यासारखा शांत बनलाय.

१५. आध्यात्मिक नंदनवनात इतरांना आणायची आपली इच्छा का असते आणि आपण ते कसं करू शकतो?

१५ यशया ६५:१३ च्या सुरुवातीला असं म्हटलंय: “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.” आणि २५ व्या वचनाचा शेवट “असं यहोवा म्हणतो” या शब्दांनी होतो. यहोवा जे काही म्हणतो ते नेहमीच पूर्ण होतं. (यश. ५५:१०, ११) आध्यात्मिक नंदनवन आज खरंच एक वास्तविकता आहे. यहोवाने भाऊबहिणींचं जे कुटुंब बनवलंय तसं आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. या हिंसक जगात त्याच्या लोकांमध्ये राहिल्यामुळे आपल्याला शक्य तितक्या प्रमाणात शांतीचा आणि सुरक्षिततेचा अनुभव घेता येतो. (स्तो. ७२:७) या कारणांसाठी भाऊबहिणींच्या मोठ्या कुटुंबात जास्तीत जास्त लोकांना आणायला मदत करायची आपली इच्छा आहे. आणि आपण हे शिष्य बनवण्याच्या कामावर लक्ष लावून करू शकतो.​—मत्त. २८:१९, २०.

आपण इतरांना आध्यात्मिक नंदनवनाकडे कसं आकर्षित करू शकतो?

१६. लोक आध्यात्मिक नंदनवाकडे कसे आकर्षित होतात?

१६ आपलं हे आध्यात्मिक नंदनवन इतरांना आकर्षित वाटेल असं बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी आज आपल्या प्रत्येकावर आहे. आपण जर यहोवाचं अनुकरण केलं तर आपल्याला ही जबाबदारी नक्की पूर्ण करता येईल. यहोवा लोकांना कधीच त्यांच्या इच्छेविरुद्ध त्याच्या संघटनेकडे ओढून आणत नाही, उलट तो अगदी प्रेमाने लोकांना त्याच्याजवळ ‘आणतो.’ (योहा. ६:४४; यिर्म. ३१:३) चांगल्या मनाचे लोक जेव्हा यहोवाच्या प्रेमळ गुणांबद्दल आणि त्याच्या सुंदर व्यक्‍तीमत्त्वाबद्दल शिकून घेतात, तेव्हा ते आपोआपच त्याच्याकडे आकर्षित होतात. मग आपल्या चांगल्या गुणांनी आणि चांगल्या वागण्याने आपण इतरांना आध्यात्मिक नंदनवनाकडे कसं आकर्षित करू शकतो?

१७. आपण इतरांना आध्यात्मिक नंदनवाकडे कसं आकर्षित करू शकतो?

१७ इतरांना आध्यात्मिक नंदनवनाकडे आकर्षित करण्याचा एक मार्ग म्हणजे भाऊबहिणींसोबत प्रेमाने आणि दयेने वागणं. जेव्हा बायबलमधल्या करिंथ मंडळीत नवीन लोक पहिल्यांदा सभेला उपस्थित राहिले असतील, तेव्हा त्यांना जे अनुभवायला मिळालं तेच आज ख्रिस्ती सभेला आलेल्या नवीन लोकांना अनुभवायला मिळावं अशी आपली इच्छा आहे. त्यांनी म्हटलं होतं: “देव खरंच तुमच्यामध्ये आहे.” (१ करिंथ. १४:२४, २५; जख. ८:२३) म्हणून “एकमेकांबरोबर शांतीने राहा” या सल्ल्याचं आपण पालन केलं पाहिजे.​—१ थेस्सलनी. ५:१३.

१८. कोणत्या गोष्टीमुळे लोक कदाचित आपल्या संघटनेकडे आकर्षित होतील?

१८ आपण आपल्या भाऊबहिणींकडे नेहमी यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. यासाठी आपण त्यांच्या अपरिपूर्णतांकडे नाही तर चांगल्या गुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण या अपरिपूर्णता कालांतराने नाहीशा होतील. त्यासोबतच आपण ‘एकमेकांशी प्रेमाने वागून, कोमलतेने सहानुभूती दाखवून आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करून’ आपसातले मतभेद प्रेमाने मिटवले पाहिजेत. (इफिस. ४:३२) यामुळे ज्यांना इतरांनी आपल्याशी प्रेमाने वागावं अशी इच्छा आहे ते आपोआपच आध्यात्मिक नंदनवनाकडे आकर्षित होतील. b

नेहमी आध्यात्मिक नंदनवनात राहा

१९. (क) “ ते सोडून गेले आणि पुन्हा आले” या चौकटीत सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक नंदनवनात पुन्हा आलेल्यांपैकी काही जणांनी काय म्हटलं? (ख) आपला काय निश्‍चय असला पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

१९ यहोवाने दिलेल्या या आध्यात्मिक नंदनवनासाठी आपण खरंच त्याचे किती आभारी आहोत! हे नंदनवन आज जास्तच सुंदर बनलंय आणि या नंदनवनात यहोवाची स्तुती करणाऱ्‍यांची संख्या आज कधी नव्हे इतकी वाढत आहे. यहोवाने बनवलेल्या नंदनवनाबद्दल आपण नेहमीच त्याचे आभारी असू. त्यामुळे ज्या कोणाला ताजंतवानं, समाधानी, शांत आणि सुरक्षित राहायची इच्छा आहे त्यांनी या आध्यात्मिक नंदनवनात यावं आणि ते कधीच सोडू नये. पण तरीसुद्धा आपण सावध असलं पाहिजे. कारण सैतान आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मोहात पाडायचा प्रयत्न करतोय. (१ पेत्र ५:८; प्रकटी. १२:९) आणि आपण त्याला कधीच यशस्वी होऊ दिलं नाही पाहिजे. तेव्हा या आध्यात्मिक नंदनवनाची सुंदरता, त्याची शुद्धता आणि त्यामध्ये असलेली शांती टिकवून ठेवायचा आपण कसोशीने प्रयत्न करत राहू या.

जे आध्यात्मिक नंदनवनात राहतात ते भविष्यात खरोखरच्या नंदनवनाचाही आनंद घेतील (परिच्छेद १९ पाहा)


तुमचं उत्तर काय असेल?

  • आध्यात्मिक नंदनवन काय आहे?

  • आध्यात्मिक नंदनवनात आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

  • आपण इतरांना या नंदनवनाकडे कसं आकर्षित करू शकतो?

गीत १४४ नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!

a शब्दांचा अर्थ: “आध्यात्मिक नंदनवन” हे शब्द अशा वातावरणाला सूचित करतात, जिथे आपण यहोवाची उपासना करतो. या आध्यात्मिक नंदनवनात आपण यहोवा आणि इतरांसोबत शांतीचे नातेसंबंध अनुभवतो.

b jw.org वर असलेल्या भेटूया त्यांना पुन्हा एकदा-ॲलेना झिटनिकोवा: माझं स्वप्न कसं पूर्ण झालं?  या व्हिडिओमध्ये एका बहिणीला आध्यात्मिक नंदनवनात असल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळाले ते पाहा.

c चित्राचं वर्णन: सभागृहात इतर जण एकमेकांच्या संगतीचा आनंद घेत आहेत, पण एक भाऊ मात्र त्यांच्यापासून वेगळा बसलाय.