तुम्हाला माहीत होतं का?
दावीद राजाच्या सैन्यात विदेशी सैनिक का होते?
दावीद राजाच्या सैन्यात काही विदेशी सैनिक होते. जसं की, सेलक अम्मोनी, उरीया हित्ती आणि इथ्मा मवाबी. a (१ इति. ११:३९, ४१, ४६) याशिवाय त्याच्या सैन्यात ‘करेथी, पलेथी आणि गित्ती माणसंही’ होती. (२ शमु. १५:१८) असं मानलं जायचं की करेथी आणि पलेथी हे पलिष्टी लोकांचे जवळचे नातेवाईक होते. (यहे. २५:१६) आणि गित्ती माणसं गथ या पलिष्टी शहरातली होती.—यहो. १३:२, ३; १ शमु. ६:१७, १८.
दावीदने आपल्या सैन्यात विदेशी माणसांची भरती का केली? कारण त्याला पूर्ण भरवसा होता, की ते त्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवाला एकनिष्ठ होते. उदाहरणार्थ, बायबलच्या एका शब्दकोशात (द न्यू इंटरप्रिटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल ) करेथी आणि पलेथी माणसांबद्दल असं म्हटलंय, की “दावीदच्या शासनकाळात सगळ्यात वाईट परिस्थितीत ते त्याला एकनिष्ठ राहिले.” ते कसं? जेव्हा “इस्राएलच्या सगळ्या माणसांनी दावीदच्या मागे जाण्याचं सोडून दिलं” आणि ते शबा नावाच्या दुष्ट माणसाच्या मागे जाऊ लागले, तेव्हा करेथी आणि पलेथी माणसं दावीदला विश्वासू राहिली. आणि शबाने सुरू केलेला बंड मोडून काढायला त्यांनी त्याला मदत केली. (२ शमु. २०:१, २, ७) तसंच, पुढे एकदा दावीदच्या मुलाने, अदोनीयाने दावीदचं राजासन बळकवण्याचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा करेथी आणि पलेथी माणसं दावीदला विश्वासू राहिली. शिवाय त्यांनी दावीदच्या मुलाला, शलमोनला पुढचा राजा बनायला मदत केली. कारण यहोवाने राजा म्हणून शलमोनला निवडलं होतं.—१ राजे १:२४-२७, ३८, ३९.
आणखी एक विदेशी माणूस दावीदला खूप विश्वासू राहिला. तो म्हणजे, गथचा राहणारा इत्तय. दावीदच्या मुलाने, अबशालोमने जेव्हा दावीदविरुद्ध बंड केलं आणि इस्राएलच्या सगळ्या लोकांची मनं जिंकायचा प्रयत्न केला, तेव्हा इत्तय आणि त्याचे ६०० योद्धे दावीदच्या बाजूने उभे राहिले. दावीदने सुरुवातीला इत्तयला म्हटलं, की तो विदेशी असल्यामुळे तो त्याच्यासाठी लढला नाही तरी चालेल. पण इत्तयने म्हटलं: “जिवंत देव यहोवाची शपथ, आणि माझे प्रभू, माझे राजे तुमच्या जिवाची शपथ! माझे प्रभू, माझे राजे तुम्ही जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यासोबत येईन; मग त्यासाठी मला मरावं लागलं तरी चालेल!”—२ शमु. १५:६, १८-२१.
करेथी, पलेथी आणि गित्ती माणसं जरी विदेशी असली, तरी त्यांनी ओळखलं होतं की यहोवा हाच खरा देव आहे. आणि दावीद हा यहोवाने अभिषिक्त केलेला राजा आहे. इतकी एकनिष्ठ माणसं आपल्या बाजूने उभी आहेत, या गोष्टीची दावीदने खरंच मनापासून कदर केली असेल!
a अनुवाद २३:३-६ यात सांगितलंय, की देवाच्या नियमाप्रमाणे अम्मोनी आणि मवाबी यांच्यापैकी कोणीही यहोवाच्या मंडळीत येऊ शकत नव्हते. या नियमानुसार असं दिसतं, की ते कायदेशीररीत्या इस्राएल राष्ट्राचे सदस्य होऊ शकत नव्हते. पण हे विदेशी लोक, देवाच्या लोकांसोबत संगती करू शकत होते किंवा त्यांच्यामध्ये राहू शकत होते. इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स खंड १, पान ९५ पाहा.