व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नेहमी खरं बोला

नेहमी खरं बोला

“तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला.”​—जख. ८:१६.

गीत क्रमांक: ३४, १८

१, २. मानवांना सर्वात जास्त दुःख देण्यासाठी सैतानाने काय केलं?

मानवांनी लावलेले काही शोध हे खूप फायद्याचे ठरले आहेत, जसं की टेलिफोन, कार आणि फ्रीज. या गोष्टींमुळे आपलं जीवन सोईस्कर झालं आहे. याउलट काही शोध असेदेखील आहेत ज्यामुळे मानवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, जसं की बंदूक, लँड माईन्स, सिगारेट आणि आण्विक बॉम्ब. पण या सर्व गोष्टींचा शोध लागला त्याच्या आधीपासून एक अशी गोष्ट आहे जिने मानवांना खूप दुःख दिलं आहे. ती काय आहे? खोटं बोलणं. खोटं बोलणं म्हणजे एखाद्या व्यक्‍तीला फसवण्यासाठी किंवा तिची दिशाभूल करण्यासाठी सत्य नसलेली गोष्ट सांगणं. मानव इतिहासात सर्वात पहिलं खोटं कोण बोललं? दियाबल सैतान! येशूने त्याला “खोटेपणाचा बाप” असं म्हटलं. (योहान ८:४४ वाचा.) सैतान सर्वात पहिलं खोटं कधी बोलला?

एदेन बागेत हजारो वर्षांआधी तो पहिलं खोटं बोलला. यहोवाने मानवांसाठी जे सुंदर नंदनवन बनवलं होतं त्यात आदाम आणि हव्वा जीवनाचा आनंद लुटत होते. देवाने त्यांना आधीच सांगितलं होतं की जर त्यांनी “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ” खाल्लं तर त्यांचा मृत्यू होईल. सैतानाला हे माहीत होतं, तरीदेखील त्याने एका सापाचा उपयोग करून हव्वाला असं म्हटलं: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” हे सर्वात पहिलं खोटं होतं. सैतानाने असंदेखील सांगितलं की, “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”​—उत्प. २:१५-१७; ३:१-५.

३. सैतानाने बोललेलं खोटं नुकसानदायी का होतं आणि त्याचा परिणाम काय झाला?

सैतानाची खोटं बोलण्यामागची भावना ही नुकसान पोहोचवण्याची होती. त्याला माहीत होतं की जर हव्वाने ते फळ खाल्लं तर तिचा मृत्यू होईल आणि तेच झालं. हव्वाने आणि मग आदामने यहोवाची आज्ञा मोडली आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. (उत्प. ३:६; ५:५) आदामने केलेल्या पापाचा वाईट परिणाम असा झाला की “मरण सर्व माणसांमध्ये पसरले.” खरंतर “ज्यांनी आदामच्या अपराधाप्रमाणे पाप केले नव्हते, अशांवरही मरणाने राजा म्हणून राज्य केले.” (रोम. ५:१२, १४) त्यामुळेच आज आपण अपरिपूर्ण आहोत आणि देवाच्या इच्छेनुसार नेहमीसाठी जगत नाही. याउलट आपलं “आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्‍ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे” असतं, आणि तेदेखील “कष्टमय व दु:खमय” असतं. (स्तो. ९०:१०) सैतान जे खोटं बोलला त्यामुळे या सर्व गोष्टी घडल्या.

४. (क) आपल्याला कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं माहीत असणं गरजेचं आहे? (ख) स्तोत्र १५:१, २ या वचनांनुसार फक्‍त कोणते लोक यहोवाचे मित्र बनू शकतात?

योहान ८:४४ मध्ये येशूने सैतानाबद्दल असं म्हटलं: “तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही.” सैतान आजदेखील बदललेला नाही. तो खोटं बोलून आजही “सबंध पृथ्वीवरील लोकांना” फसवत आहे. (प्रकटी. १२:९) पण सैतानाच्या फसवणुकीला बळी पडावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. त्यामुळे आपल्याला तीन महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सैतान आज लोकांची दिशाभूल कशी करत आहे? लोक खोटं का बोलतात? आदाम-हव्वाने तर खोटं बोलून यहोवासोबतची मैत्री गमावली, पण आपली मैत्री टिकून ठेवण्यासाठी आपण नेहमी खरं कसं बोलू शकतो?​—स्तोत्र १५:१, २ वाचा.

सैतान आज लोकांची दिशाभूल कशी करत आहे?

५. सैतान आज लोकांची दिशाभूल कशी करत आहे?

आपण सैतानाच्या कुयुक्त्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. प्रेषित पौलने म्हटलं: “आपल्याला त्याचे इरादे माहीत नाहीत, असे नाही.” (२ करिंथ. २:११; तळटीप) सैतानाचं जगावर नियंत्रण आहे हे आपल्याला माहीत आहे. यात खोटा धर्म, भ्रष्ट सरकारे आणि स्वार्थी व्यावसायिक जग सामील आहेत. (१ योहा. ५:१९) यामुळे सैतान आणि त्याचे दुरात्मे जेव्हा मोठ्या पदावर असलेल्या लोकांना खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त करतात, तेव्हा आपल्याला मुळीच आश्‍चर्य वाटत नाही. (१ तीम. ४:१, २) उदाहरणार्थ, व्यवसाय जगतातले काही लोक आपल्या वस्तू विकण्यासाठी जाहिरातींमध्ये खोटं बोलतात, मग त्या वस्तू हानिकारक असल्या तरीही. किंवा मग काही लोक जाहिरातींद्वारे लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळतात.

६, ७. (क) धार्मिक पुढारी जेव्हा खोटं बोलतात त्यामुळे लोकांचं खूप नुकसान का होतं? (ख) धार्मिक पुढारी सांगत असलेल्या कोणत्या खोट्या शिकवणींबद्दल तुम्ही ऐकलं आहे?

खासकरून जेव्हा धार्मिक पुढारी खोटं बोलतात तेव्हा लोकांचं खूप नुकसान होतं. असं का म्हणता येईल? कारण खोट्या शिकवणींवर भरवसा ठेवून देवाला न आवडणारी कार्यं केल्यामुळे ते सदासर्वकाळ जगण्याची आशा गमावून बसतात. (होशे. ४:९) येशूला माहीत होतं की त्याच्या काळातील धार्मिक पुढारी लोकांची दिशाभूल करत होते. त्यामुळे त्याने त्यांना ठामपणे म्हटलं: “अरे ढोंगी शास्त्र्यांनो व परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण एखाद्याला यहुदी मतानुसारी बनवण्यासाठी तुम्ही समुद्र आणि जमीन पालथी घालता, आणि जेव्हा तो तसा बनतो, तेव्हा तुम्ही त्याला . . . गेहेन्‍नात जाण्याच्या लायकीचा बनवता.” म्हणजेच त्याचा सर्वनाश होतो. (मत्त. २३:१५) येशूने म्हटलं की हे धार्मिक पुढारी त्यांचा पिता दियाबल याच्यासारखेच आहेत, जो खरंतर एक “खुनी” आहे.​—योहा. ८:४४.

आज आपल्या काळातही बरेच धार्मिक पुढारी आहेत. त्यांना पाळक, फादर, स्वामी किंवा इतर पदव्या देण्यात येतात. हेदेखील परूशी लोकांसारखंच देवाच्या वचनातील सत्य शिकवत नाहीत. त्यांनी “देवाच्या सत्याऐवजी असत्याला पसंत केले” आहे. (रोम. १:१८, २५) ते ज्या खोट्या शिकवणीबद्दल सांगतात त्यांमध्ये नरकाग्नी, अमर आत्मा, पुनर्जन्म, समलैंगिक लग्न व तशा जीवनशैलीला देवाची संमती या शिकवणी सामील आहेत.

८. लवकरच राजकीय पुढारी कोणतं खोटं बोलतील, पण त्याबद्दल आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे?

राजकीय पुढाऱ्‍यांनीही खोट्याचा आधार घेऊन लोकांची दिशाभूल केली आहे. लवकरच भविष्यात ते आतापर्यंतचं सर्वात मोठं खोटं बोलतील, ते म्हणजे “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी घोषणा ते करतील. त्यांनी जगात शांती आणि सुरक्षा आणली आहे हे दाखवण्यासाठी ते असं करतील. पण तेव्हाच “त्यांच्यावर अचानक नाश येईल.” त्यामुळे राजकीय पुढारी जेव्हा म्हणतात की ते जगाची परिस्थिती सुधारत आहेत, तेव्हा आपण त्यांच्यावर भरवसा ठेवू नये. सत्य हेच आहे की “रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा दिवस येत आहे,” आणि हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.​—१ थेस्सलनी. ५:१-४.

लोक खोटं का बोलतात?

९, १०. (क) लोक खोटं का बोलतात आणि त्याचे काय परिणाम होतात? (ख) आपण यहोवाबद्दल कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे?

आज फक्‍त उच्च पदावर असलेले लोकच खोटं बोलतात असं नाही. “आपण का खोटं बोलतो” या लेखात युधिजीत भट्टाचारजी यांनी असं म्हटलं आहे, की “खोटं बोलणं हे मानवांच्या मूळ स्वभावातच आहे असं म्हणता येईल.” दुसऱ्‍या शब्दांत लोकांना असं वाटतं की खोटं बोलण्यात काहीच गैर नाही, ते अगदी स्वाभाविक आहे. लोक सहसा स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटं बोलतात. कदाचित त्यांच्या हातून एखादी चूक झाली असेल किंवा त्यांनी एखादा अपराध केला असेल तर ते लपवण्यासाठी ते खोटं बोलतात. लोक पैसे कमवण्यासाठी किंवा इतर मार्गांनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीही खोटं बोलतात. त्या लेखात असंदेखील सांगितलं होतं की काही लोकांना “अनोळखी लोकांशी, कामावरच्या सोबत्यांशी, मित्रांशी आणि जवळच्या लोकांशी” खोटं बोलण्यात काहीच गैर वाटत नाही.

१० या सर्वांचा काय परिणाम होतो? लोकांचा एकमेकांवरून भरवसा उठला आहे आणि यामुळे अनेक नाती तुटली आहेत. उदाहरणार्थ, कल्पना करा की जर एखाद्या पतीला किंवा पत्नीला कळलं की आपल्या सोबत्याने आपल्याशी विश्‍वासघात केला आहे आणि ते लपवण्यासाठी त्याने आपल्याशी खोटं बोललं आहे, तर त्या पती किंवा पत्नीला कसं वाटेल. किंवा कल्पना करा, की एखादा पती घरात आपल्या पत्नीशी आणि मुलांशी वाईट वागतो, पण इतरांसमोर असं दाखवतो की त्याचं आपल्या पत्नीवर आणि मुलांवर खूप प्रेम आहे. तर पतीचं असं वागणं किती चुकीचं असेल. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की अशा प्रकारचे लोक माणसांना फसवू शकतात पण ते यहोवाला कधीच फसवू शकत नाही. कारण बायबल सांगतं की त्याच्या डोळ्यांपुढे “सर्व गोष्टी उघड्या व स्पष्ट आहेत.”​—इब्री ४:१३.

११. हनन्या आणि सप्पीरा यांच्या वाईट उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

११ बायबलमध्ये अशा एका ख्रिस्ती जोडप्याचं उदाहरण दिलं आहे जे सैतानाच्या प्रभावाखाली येऊन देवाशी खोटं बोलले. ते होते हनन्या आणि सप्पीरा. त्यांनी प्रेषितांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपली थोडी जमीन विकली आणि मिळालेल्या पैशांतून काही पैसेच प्रेषितांना दिले. मंडळीतल्या लोकांवर आपली छाप पाडण्यासाठी हनन्या आणि सप्पीरा यांनी प्रेषितांना सांगितलं की त्यांनी सर्व पैसे दिले आहेत. पण यहोवाला माहीत होतं की ते खोटं बोलत आहेत आणि त्याने त्या दोघांना शिक्षा केली.​—प्रे. कार्ये ५:१-१०.

१२. नुकसान पोहोचवण्यासाठी जे लोक खोटं बोलतात आणि पस्तावा करत नाही अशांचं काय होईल व का?

१२ खोटं बोलणाऱ्‍या लोकांबद्दल यहोवाला कसं वाटतं? नुकसान पोहोचवण्यासाठी जे लोक खोटं बोलतात आणि पस्तावा करत नाही, अशा सर्वांना सैतानासारखं ‘अग्नीच्या सरोवरात’ टाकलं जाईल. सोप्या शब्दांत सांगायचं तर, त्यांचा कायमचा नाश केला जाईल. (प्रकटी. २०:१०; २१:८; स्तो. ५:६) का? कारण “घृणास्पद” कार्यं करणाऱ्‍यांना यहोवा ज्या दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने तो खोटं बोलणाऱ्‍या लोकांनाही पाहतो.​—प्रकटी. २२:१५, तळटीप.

१३. आपल्याला यहोवाबद्दल काय माहीत आहे आणि यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळते?

१३ आपल्याला माहीत आहे, की यहोवा “मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी” आणि “देव कधीही खोटे बोलू शकत नाही.” (गण. २३:१९; इब्री ६:१८) यहोवा खोटं बोलणाऱ्‍या जिभेचा तिरस्कार करतो. (नीति. ६:१६, १७) म्हणून जर आपल्याला त्याचं मन आनंदित करायचं असेल तर आपण “एकमेकांशी खोटे बोलू” नये तर नेहमी खरं बोलावं.​—कलस्सै. ३:९.

आपण खरं बोलतो

१४. (क) खरे ख्रिस्ती खोट्या धर्माच्या लोकांपासून कसे वेगळे आहेत? (ख) लूक ६:४५ मध्ये दिलेलं तत्त्व समजवा?

१४ खरे ख्रिस्ती खोट्या धर्माच्या लोकांपासून कोणत्या एका बाबतीत वेगळे आहेत? ते नेहमी “खरे” बोलतात. (जखऱ्‍या ८:१६, १७ वाचा.) पौल म्हणतो की “खरे बोलण्याद्वारे” आपण “देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस” करतो. (२ करिंथ. ६:७, ४) तसंच येशूने म्हटलं की लोक “अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच” बोलतात. (लूक ६:४५) याचा अर्थ, एक प्रामाणिक व्यक्‍ती खरं बोलेल. ती अनोळखी लोकांशी, कामावर असलेल्या सोबत्यांशी, मित्रांशी आणि आपल्या जवळच्या लोकांशी खरं बोलेल. सर्व गोष्टींमध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आपण कसा करू शकतो याची काही उदाहरणं आता आपण पाहू या.

ही तरुण बहीण काय चुकीचं करत आहे हे तुम्ही पाहू शकता का? (परिच्छेद १५, १६ पाहा)

१५. (क) दुहेरी जीवन जगणं चुकीचं का आहे? (ख) तरुणांना सोबत्यांच्या दबावाचा सामना करण्यासाठी कशामुळे मदत होऊ शकते? (तळटीप पाहा.)

१५ तुम्ही तरुण असाल तर आपल्या सोबत्यांनी आपल्याशी मैत्री करावी, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ही इच्छा बाळगल्यामुळे काही तरुण दुहेरी जीवन जगत आहेत. कुटुंबासोबत आणि मंडळीसोबत असताना ते असं दाखवतात की त्यांचे नैतिक मूल्य चांगले आहेत. पण याच्या अगदी उलट ते जेव्हा सोशल मिडिया किंवा जगातल्या लोकांसोबत असतात तेव्हा ते अगदी वेगळे वागतात. काही जण शिवीगाळ करतात, शालीन नसलेले कपडे घालतात, अश्‍लील बोल असलेलं संगीत ऐकतात, खूप दारू पितात, ड्रग्स घेतात, लपून डेटिंग करतात किंवा मग इतर वाईट कामं करतात. असे तरुण आपल्या आईवडिलांशी, बंधुभगिनींशी आणि यहोवाशी खोटं बोलत असतात. (स्तो. २६:४, ५) आपण जेव्हा यहोवाची सेवा करण्याचं भासवतो, पण कोणी पाहत नसताना त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टी करतो, तेव्हा यहोवा ते पाहतो. (मार्क ७:६) असं करण्यापेक्षा नीतिसूत्रात जे म्हटलं आहे ते करणं फायद्याचं ठरेल. त्यात असं म्हटलं आहे: “तुझ्या हृदयाने पाप्यांचा हेवा करू नये, परंतु सारा दिवस तू यहोवाचे भय धरत जा.”​—नीति. २३:१७, पं.र.भा. *

१६. पूर्ण वेळेच्या सेवेचे अर्ज भरताना त्यात दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं आपण कशी दिली पाहिजेत?

१६ तुम्हाला जर पायनियर बनायचं असेल किंवा खास पूर्ण वेळेची सेवा, जसं की बेथेल सेवा सुरू करायची असेल तर तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागतो. असे अर्ज भरत असताना आपण आपल्या तब्येतीबद्दल, ज्या प्रकारचं मनोरंजन करतो त्याबद्दल आणि आपल्या नैतिक स्तरांबद्दल प्रामाणिक उत्तरं देणं खूप गरजेचं आहे. (इब्री १३:१८) पण समजा तुम्ही यहोवाला न आवडणारी एखादी गोष्ट केली आहे तेव्हा काय? किंवा असं काही केलं आहे ज्यामुळे तुमचा विवेक तुम्हाला दोषी ठरवत आहे आणि याबद्दल तुम्ही अजून वडिलांना सांगितलं नाही. अशा वेळी वडिलांकडे मदत मागा. यामुळे तुम्ही शुद्ध अंतःकरणाने यहोवाची सेवा करू शकाल.​—रोम. ९:१; गलती. ६:१.

१७. छळ करणाऱ्‍यांनी आपल्याला आपल्या बंधुभगिनींबद्दल विचारलं तर आपण काय केलं पाहिजे?

१७ समजा तुमच्या राहत्या ठिकाणी आपल्या कामावर बंदी आहे आणि सरकारी अधिकाऱ्‍यांनी तुम्हाला अटक करून आपल्या बांधवांबद्दल माहिती विचारली, तेव्हा तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांना तुमच्याजवळ असलेली सर्व माहिती सांगणार का? रोमी राज्यपालाने जेव्हा येशूला प्रश्‍नं विचारले तेव्हा त्याने काय केलं? “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो” हे तत्त्व येशूने लागू केलं आणि काही वेळा तर तो काहीच बोलला नाही. (उप. ३:१, ७; मत्त. २७:११-१४) आपण जर अशा परिस्थितीत असलो तर सुज्ञपणे वागणं गरजेचं आहे. सावधगिरी बाळगल्यामुळे आपल्या बांधवांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही.​—नीति. १०:१९; ११:१२.

कोणत्या परिस्थितीत शांत राहायचं आणि कधी संपूर्ण माहिती द्यायची हे तुम्ही कसं ठरवू शकता? (परिच्छेद १७, १८ पाहा)

१८. वडिलांनी एखाद्या पाप करणाऱ्‍याबद्दल आपल्याला माहिती विचारली तर आपली जबाबदारी काय आहे?

१८ समजा मंडळीतल्या एका प्रचारकाने गंभीर पाप केलं आहे आणि याबद्दल तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? मंडळीला नैतिक रीत्या शुद्ध ठेवण्याची जबाबदारी वडिलांना देण्यात आली आहे. त्यामुळे ते कदाचित तुम्हाला त्याबद्दल विचारतील. अशा वेळी तुम्ही काय कराल, खासकरून तो तुमचा मित्र किंवा नातेवाईक असला तर? बायबल म्हणतं: “ज्याच्या तोंडून सत्याचे उद्‌गार श्‍वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्याय्यत्व प्रगट करतो.” (नीति. १२:१७; २१:२८) म्हणून काहीही न लपवता संपूर्ण माहिती वडिलांना सांगणं ही तुमची जबाबदारी आहे. खरंतर, सर्व माहिती जाणून घेणं हा वडिलांचा हक्क आहे. यामुळे ते पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला योग्य ती मदत पुरवू शकतील आणि यहोवासोबत त्याचं तुटलेलं नातं परत जोडण्यासाठी त्याला मदत करू शकतील.​—याको. ५:१४, १५.

१९. आपण पुढच्या लेखात काय पाहणार आहोत?

१९ दावीदने यहोवाला प्रार्थना केली: “अंतर्यामीची सत्यता तुला आवडते.” (स्तो. ५१:६) दावीदला याची जाणीव होती की आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. खरे ख्रिस्ती या नात्याने सर्व प्रसंगी आपण “आपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला,” हे तत्त्व लागू केलं पाहिजे. आपण खोट्या धर्माच्या लोकांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे बायबलमधून सत्य शिकवणं. हे आपण सेवाकार्यात कसं करू शकतो याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.

^ परि. 15 तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं या माहितीपत्रकातील “मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?” हा प्रश्‍न ६ पाहा. तसंच, क्वेश्‍चन्स यंग पीपल आस्क-आन्सर्स दॅट वर्क, व्हॉल्यूम २ मधील “अ डबल लाईफ​—हू हॅझ टू नो?” हा अध्याय १६ पाहा.