व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

यहोवाने माझ्या निर्णयावर भरभरून आशीर्वाद दिला

यहोवाने माझ्या निर्णयावर भरभरून आशीर्वाद दिला

१९३९ चं ते वर्ष होतं. आम्ही मध्यरात्री उठलो आणि अमेरिकेच्या मिझूरीच्या दक्षिण-पश्‍चिम दिशेला असलेल्या जॉप्लिन या छोट्या शहरात गेलो. तिथे पोहोचायला आम्हाला एका तासापेक्षा जास्त वेळ लागला. तिथे आम्ही प्रत्येक घरात दरवाजाच्या खालून हळूच पत्रिका टाकू लागलो. हे काम पूर्ण झाल्यावर आम्ही कार घेऊन इतर गटांना भेटायला गेलो. तोपर्यंत पहाट झाली होती. पण आम्ही सकाळ व्हायच्या आधीच प्रचाराला का गेलो आणि तिथून लवकर का निघालो? हे मी तुम्हाला नंतर सांगतो.

माझा जन्म १९३४ साली झाला. माझ्या आई-बाबांचं नाव फ्रेड आणि एड्‌ना मॉलहन आहे. ते २० वर्षांपासून बायबल विद्यार्थी (यहोवाचे साक्षीदार) होते. मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी मला यहोवावर प्रेम करायला शिकवलं. आम्ही कॅन्झसच्या दक्षिण-पूर्व दिशेला असणाऱ्‍या पारसन्स या छोट्या गावात राहायचो. आमच्या मंडळीतले जवळजवळ सर्वच जण अभिषिक्‍त होते. आमचं कुटुंब नियमितपणे सभेला आणि सेवाकार्याला जायचं. सहसा शनिवारी दुपारी आम्ही रस्त्यावरचं साक्षकार्य करायचो. याला आज सार्वजनिक साक्षकार्य असं म्हटलं जातं. कधीकधी आम्ही थकायचो पण प्रचारकार्य झाल्यावर बाबा आम्हाला आईस्क्रीम खाऊ घालायचे.

आमच्या छोट्याशा मंडळीचं प्रचाराचं क्षेत्र खूप मोठं होतं. या क्षेत्रात अनेक लहान गावं आणि शेतं होती. काही शेतकरी आम्हाला पैसे देण्याऐवजी त्यांच्या शेतातली भाजी, ताजी अंडी किंवा कोंबड्याही द्यायचे. बाबांनी आधीच साहित्यांसाठी दान दिलं असल्यामुळे आमच्या खाण्या-पिण्याची सोय शेतकऱ्‍यांनी दिलेल्या अन्‍नामुळे व्हायची.

प्रचार मोहीम

प्रचारासाठी माझ्या पालकांनी फोनोग्राफ आणला. ते वापरण्यासाठी मी खूप लहान होतो, पण पुनर्भेटीच्या आणि बायबल अभ्यासाच्या वेळी माझे आई-बाबा बंधू रदरफर्डच्या भाषणाचं रेकॉर्डिंग ऐकवायचे तेव्हा त्यांना मदत करायला मला आनंद व्हायचा.

मी माझ्या आई-बाबांसोबत आमच्या साऊंड कारसमोर

आमच्याकडे १९३६ ची फॉर्ड कार होती. त्यावर बाबांनी एक मोठा स्पीकर लावला आणि ती आमची साऊंड कार झाली. प्रचारात तिचा खूप उपयोग व्हायचा. लोकांचं आमच्याकडे लक्ष जावं यासाठी आम्ही सहसा सुरुवातीला संगीत वाजवायचो. मग आम्ही बायबल आधारित एक भाषण लावायचो. नंतर आवड दाखवणाऱ्‍या लोकांना साहित्य द्यायचो.

कॅन्झसमध्ये चेरीवेल या छोट्या शहरात बाबांनी एका बागेत साऊंड कार नेली. तो रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक लोक तिथे आराम करायला आले होते. मग पोलीस तिथे आले आणि त्यांनी बाबांना साऊंड कार बागेच्या बाहेर नेऊन वापरायला सांगितली. लोकांना कार्यक्रम स्पष्ट ऐकू यावा यासाठी बाबांनी बागेच्या बाहेरच्या रस्त्यावर कार नेली. यासारख्या अशा अनेक प्रसंगात मला बाबांसोबत आणि माझा मोठा भाऊ जेरी याच्यासोबत वेळ घालवायला आनंद व्हायचा.

त्या काळात जिथे लोकांचा खूप जास्त विरोध केला जायचा त्या ठिकाणी आम्ही खास मोहिमेसाठी जायचो. मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं आम्ही मध्यरात्री उठायचो आणि हळूच प्रत्येक घरात दरवाजाच्या खालून पत्रिका किंवा पुस्तिका टाकायचो. मग कोणाला पोलिसांनी अटक तर केली नाही ना ते पाहण्यासाठी आम्ही शहराच्या बाहेर जमायचो.

सेवाकार्याचा आणखीन एक मजेशीर पैलू म्हणजे पदयात्रा (इन्फर्मेशन मार्च). आम्ही मोठमोठे साईन बोर्ड्‌स घालायचो आणि पूर्ण शहरात फिरायचो. मला आठवतं, एकदा काही बांधव आमच्या शहरात आले आणि ते ‘धर्म पाश आहे, जाळं आहे’ अशा घोषणा लिहिलेले बोर्ड्‌स घालून संपूर्ण शहरात फिरले होते. ही फेरी त्यांनी आमच्या घरापासून सुरू केली. ते दीड किलोमीटर शहरात चालले आणि मग परत आमच्या घरी आले. आनंदाची गोष्ट म्हणजे कोणीच त्यांना अडवलं नाही. उलट काय चाललं आहे हे जाणण्यासाठी अनेक जण उत्सुक होते.

मी तरुण असताना झालेली अधिवेशनं

आमचं कुटुंब सहसा अधिवेशनांसाठी टेक्ससला जायचं. बाबा रेल्वेत कामाला होते त्यामुळे अधिवेशनाला जाण्यासाठी आमचा गाडीचा खर्च वाचायचा. तसंच आम्हाला आमच्या नातेवाइकांना भेटता यायचं. टेक्ससमधल्या टेंपल इथे माझे मामा-मामी राहायचे. माझ्या मामांचं नाव फ्रेड विसमार आणि मामीचं नाव युलाली. माझ्या मामांना १९०० सालच्या नंतर सत्य मिळालं होतं. तेव्हा ते तरुण होते. मग त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि शिकलेल्या गोष्टी आपल्या भावंडांना सांगितल्या. त्यात माझी आईसुद्धा होती. मध्य टेक्ससमध्ये असलेले बांधव मामाला ओळखायचे कारण त्यांनी विभागीय सेवक (आता यांना विभागीय पर्यवेक्षक म्हटलं जातं) म्हणून सेवा केली होती. ते दयाळू, आनंदी आणि आवेशी होते. त्यांनी माझ्यासमोर खूप चांगलं उदाहरण मांडलं होतं.

एका मोठ्या अधिवेशनासाठी आम्ही १९४१ साली मिझूरीच्या सेंट. लुईस या शहरात रेल्वेने गेलो. “चिलड्रन ऑफ द किंग” हे बंधू रदरफर्डचं भाषण ऐकण्यासाठी सर्व लहान मुलांना मंचाजवळ एकत्र बसायला सांगण्यात आलं होतं. त्यांच्या भाषणाच्या शेवटी आम्हा १५,००० मुलांना एक मोठी भेट मिळाली. बंधू रदरफर्डने आणि त्यांच्या साहाय्यकांनी आम्हा प्रत्येकाला चिलड्रन नावाचं एक नवीन पुस्तक दिलं.

१९४३ सालच्या एप्रिल महिन्यात कॅन्झसमधल्या कॉफीवील इथे “कॉल टू अॅक्शन” या सम्मेलनाला आम्ही गेलो होतो. तिथे एक घोषणा करण्यात आली की आता सर्व मंडळ्यांत नवीन प्रशाला चालवली जाईल. तिचं नाव होतं ईश्‍वरशासित सेवा प्रशाला. या प्रशालेत वापरण्यासाठी आम्हाला ५२ पानी पुस्तिका देण्यात आली. त्यानंतर त्याच वर्षी मी माझं पहिलं विद्यार्थी भाषण दिलं. ते सम्मेलन माझ्यासाठी खास होतं, कारण जवळच्या शेतात असलेल्या थंड पाण्याच्या तळ्यात इतर काही जणांसोबत मीही बाप्तिस्मा घेतला.

बेथेलमध्ये सेवा करण्याची माझी इच्छा होती

१९५१ साली माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. मी माझ्या जीवनात पुढे काय करणार हा महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा होता. माझा भाऊ जेरी याने बेथेलमध्ये सेवा केली होती. मलाही बेथेलमध्ये सेवा करायची खूप इच्छा होती. त्यामुळे मी बेथेलचा अर्ज भरला. यानंतर थोड्या काळातच म्हणजे १० मार्च, १९५२ रोजी मी बेथेल सेवा सुरू केली. मी घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय होता. या निर्णयामुळे मला देवाची जास्त प्रमाणात सेवा करायला मदत मिळाली.

आपल्या नियतकालिकांच्या आणि इतर प्रकाशनांच्या छपाईत मदत करता यावी यासाठी मला प्रिंटरीत काम करण्याची इच्छा होती. पण मला कधीच ते काम मिळालं नाही. त्याऐवजी, मला आधी वेटर म्हणून आणि नंतर किचनमध्ये नेमण्यात आलं. मला या कामात मजा आली आणि मी बरंच काही शिकलो. आम्हाला कामाच्या पाळ्या लावल्या जायच्या आणि यामुळे मला दिवसा थोडा वेळ सुट्टी मिळायची. म्हणून मग मी बऱ्‍याचदा बेथेलच्या ग्रंथालयात जायचो आणि वैयक्‍तिक अभ्यासासाठी बरीच पुस्तकं वाचायचो. यामुळे माझा विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि यहोवाशी असलेलं नातं घनिष्ठ करण्यासाठी मला मदत मिळाली. बेथेलमध्ये जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत यहोवाची सेवा करण्याचा माझा निश्‍चय आणखी मजबूत झाला. १९४९ साली जेरीने बेथेल सोडलं आणि पॅट्रिशियासोबत लग्न केलं. ते ब्रुकलिन जवळच राहायला होते. त्या वेळी मी बेथेलमध्ये नवीनच होतो म्हणून त्यांनी मला खूप मदत केली आणि प्रोत्साहनही दिलं.

बेथेलला येण्याच्या काही वेळा नंतर बांधवांनी बेथेलमधल्या वक्त्यांची यादी बनवायला सुरुवात केली. या यादीत नाव असणाऱ्‍या बांधवांना ब्रुकलिनपासून ३२० कि.मी. अंतरापर्यंत असणाऱ्‍या मंडळ्यांना भेट द्यावी लागणार होती. तिथे ते जन भाषण देणार होते आणि मंडळीच्या प्रचारकार्यात भाग घेणार होते. माझंही नाव त्या यादीत होतं. मी थोडं भीतभीतच मंडळ्यांना भेटी द्यायला आणि जन भाषण द्यायला सुरुवात केली. त्या वेळी जन भाषण एक तासाचं असायचं. मी मंडळ्यांना भेटी देण्यासाठी सहसा ट्रेनने प्रवास करायचो. मला १९५४ सालची ती रविवारची दुपार स्पष्ट आठवते. त्या वेळी हिवाळा होता. मी न्यू यॉर्कला जाण्यासाठी ट्रेन पकडली. मला संध्याकाळी जवळजवळ पाच ते सातच्या मधे बेथेलला पोहोचायचं होतं. पण परत जाताना वादळी वारे वाहू लागले होते आणि बर्फ पडू लागला होता. विद्युत शक्‍तीवर चालणारं ट्रेनचं इंजिन बंद पडलं आणि मी न्यू यॉर्क शहरात रविवारी संध्याकाळी पोहोचण्याऐवजी सोमवारी सकाळी पाच वाजता पोहोचलो. मी स्टेशनवरून ब्रुकलिनसाठी सबवे म्हणजे भुयारी मार्गाची ट्रेन पकडली. आणि लगेचच किचनमध्ये कामाला गेलो. मला थोडा उशीर झाला होता आणि रात्रभर झोप नसल्यामुळे मी खूप थकलो होतो. पण मंडळ्यांमध्ये सेवा करण्याचा आणि अनेक नवीन बंधुभगिनींना भेटण्याचा जो आनंद मला मिळाला होता, तो मी केलेल्या कोणत्याही त्यागापेक्षा मोठा होता.

डब्ल्यूबीबीआर स्टुडिओमधून ब्रॉडकास्ट करण्याच्या तयारीत असताना

बेथेलच्या सुरुवातीच्या वर्षांत मी बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमातही भाग घेऊ लागलो. हा कार्यक्रम डब्ल्यूबीबीआर नावाच्या आपल्या संस्थेच्या रेडिओ स्टेशनवर दर आठवडी चालवला जायचा. याचे स्टुडिओ १२४ कोलंबिया हाइट्‌स या इमारतीच्या दुसऱ्‍या मजल्यावर होते. अनेक वर्षं बेथेलमध्ये सेवा करणारे बंधू अॅलेकझेंडर एच. मॅकमिलन या रेडिओ कार्यक्रमात नियमितपणे भाग घ्यायचे. आम्ही त्यांना ब्रदर मॅक म्हणायचो. बेथेलमधल्या सर्व तरुण बांधवांसमोर त्यांचं एक उत्तम उदाहरण होतं कारण अनेक समस्यांचा सामना करूनही ते विश्‍वासू राहिले होते.

डब्ल्यूबीबीआरची जाहिरात करण्यासाठी आम्ही अशा छोट्या पत्रिका वापरायचो

१९५८ साली माझ्या नेमणुकीत बदल झाला. आता मी गिलियड प्रशालेतून पदवीधर झालेल्यांसोबत काम करणार होतो. मी या आवेशी बंधुभगिनींना त्यांचे व्हिसा मिळवण्यासाठी मदत करायचो आणि त्यांच्या प्रवासाची सर्व व्यवस्था करायचो. त्या वेळी विमानाचा प्रवास खूप महाग असायचा. त्यामुळे आफ्रिका आणि आशियाला जाणारे बंधुभगिनी माल वाहून नेणाऱ्‍या जहाजाने प्रवास करायचे. याच्या अनेक वर्षांनंतर जेव्हा विमानाच्या प्रवासाचे दर कमी झाले तेव्हा अनेक मिशनरी त्यांच्या नेमणुकीसाठी विमानाने जायचे.

पदवीधर सम्मेलनाच्या आधी गिलियड पदवीधरांसाठी असलेले सर्टिफिकेट एकत्रित करताना

अधिवेशनासाठी प्रवास

युरोपच्या १९६१ सालच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी १९६० साली मी अमेरिकेहून छोट्या विमानाच्या प्रवासाची तयारी केली. जर्मनीतील हेम्बुर्गमध्ये होणाऱ्‍या एका अधिवेशनासाठी मी गेलो होतो. अधिवेशनानंतर मी व बेथेलमधल्या तीन बांधवांनी एक कार भाड्याने घेतली आणि आम्ही जर्मनीहून इटलीला गेलो व रोमच्या शाखा कार्यालयाला भेट दिली. तिथून आम्ही फ्रान्सला गेलो, मग पिरेनीज पर्वत ओलांडून स्पेनला पोहोचलो. स्पेनमध्ये आपल्या कामाला बंदी होती. बार्सिलोना इथल्या बांधवांना आम्हाला काही साहित्यं देता आली. ही साहित्यं आम्ही अशा रीतीने कागदात गुंडाळली होती की ती जणू भेटवस्तूच वाटायची. त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. तिथून आम्ही अॅमस्टरडॅमला गेलो आणि विमानाने परत न्यू यॉर्कला आलो.

जगभरात होणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या खास शृंखलेला हजर राहणाऱ्‍या ५८३ बंधुभगिनींच्या प्रवासाची तयारी करण्यासाठी मला १९६२ साली नेमण्यात आलं. १९६३ साली झालेल्या सम्मेलनाचा विषय होता “एवरलास्टींग गुड न्यूज.” अनेक देशांचे प्रतिनिधी युरोप, आशिया आणि दक्षिण पॅसिफिक इथे अधिवेशनांना हजर राहून होनोलूलू, हवाई आणि शेवटी कॅलिफोर्नियाच्या पॅसाडीना इथे जायचे. ते लेबनान आणि जॉर्डन या बायबल काळातल्या देशांचे खास दौरेही करायचे. आमचा विभाग विमानाच्या प्रवासाची, हॉटेलची आणि व्हिसाची तयारी पाहायचा.

नवीन प्रवासी सोबती

१९६३ चं वर्ष माझ्यासाठी आणखी एका कारणासाठी खूप महत्त्वाचं होतं. २९ जूनला मी लीला रॉजर्ससोबत लग्न केलं. ती मिझूरीची राहणारी आहे आणि तिने तिची बेथेल सेवा १९६० साली सुरू केली होती. आमच्या लग्नाच्या एका आठवड्यानंतर मी आणि लीला जगभरात होणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या खास शृंखलांना हजर राहण्यासाठी गेलो. आम्ही ग्रीस, इजिप्त आणि लेबनान या ठिकाणी गेलो. तिथून आम्ही जॉर्डनला गेलो. या ठिकाणी आपल्या कामाला बंदी होती आणि तिथले अधिकारी यहोवाच्या साक्षीदारांना व्हिसा देत नव्हते. त्यामुळे आम्हाला थोडी चिंता होती की आम्ही तिथे पोहोचल्यावर काय होईल. पण तिथे पोहोचल्यावर आम्हाला आश्‍चर्याचा धक्काच बसला. आम्ही तिथल्या काही बंधुभगिनींना विमानतळावर पाहिलं. त्यांच्या हातात मोठा फलक होता. त्या फलकावर असं लिहिलं होतं: “यहोवाच्या साक्षीदारांनो तुमचं स्वागत!” तुम्ही याची कल्पना करू शकता की हे पाहून आम्हाला किती आनंद झाला असेल. बायबल काळातल्या ठिकाणांना भेटी द्यायला आम्हाला आनंद झाला. तसंच, अब्राहाम, इसहाक व याकोब ज्या ठिकाणी राहायचे आणि येशू व त्याच्या प्रेषितांनी जिथे प्रचार केला आणि जिथून ख्रिस्ती विश्‍वास “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पसरू लागला ती ठिकाणं पाहायला आम्हाला आनंद झाला.​—प्रे. कार्ये १३:४७.

लीलाने ५५ वर्षं सर्व नेमणुकीत माझी अगदी एकनिष्ठपणे साथ दिली. स्पेन आणि पोर्तुगाल इथे आपल्या कामाला बंदी असताना आम्ही तिथे अनेक वेळा भेट दिली. आम्ही तिथल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देऊ शकलो. तसंच, साहित्य व त्यांच्या गरजेच्या वस्तूही त्यांना पुरवू शकलो. आम्हाला स्पेनमधल्या काडिस इथे तुरुंगात असलेल्या काही बंधुभगिनींनाही भेटता आलं. मी त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन देणारं भाषण देऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे.

१९६९ सालच्या “पीस ऑन अर्थ” या सम्मेलनाला पॅट्रिशिया आणि जेरी मॉलहनसोबत जाताना

१९६३ पासून मी आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मध्य व दक्षिण अमेरिका, युरोप, पूर्वीकडचे देश, हवाई, न्यूझीलंड आणि प्वेर्टोरिको या ठिकाणी होणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रवासाची सर्व तयारी केली. मी आणि लीला अनेक उल्लेखनीय अधिवेशनांना हजर राहिलो आहोत. १९८९ साली पोलंडच्या वॉरसा इथे झालेलं अधिवेशन यांपैकी एक होतं. रशियाच्या अनेक बांधवांना या मोठ्या अधिवेशनाला यायला जमलं होतं. हे त्यांचं पहिलं अधिवेशन होतं. सोव्हिएत संघात आपल्या विश्‍वासामुळे अनेक वर्षं तुरुंगात असलेल्या बंधुभगिनींना आम्ही भेटलो.

आणखी एक नेमणूक मी आनंदाने पार पाडली. ती म्हणजे जगभरात असलेल्या बेथेल कुटुंबांना आणि मिशनऱ्‍यांना भेट देणं व त्यांना प्रोत्साहन देणं. यांपैकी आम्ही शेवटची भेट दक्षिण कोरियाला दिली. तिथे आम्हाला सुवोन इथे तुरुंगात असलेल्या आपल्या ५० बांधवांना भेटता आलं. त्यांच्या चेहऱ्‍यावर कोणत्याही प्रकारचं नैराश्‍य नव्हतं. तसंच, यहोवाची पुन्हा एकदा कोणत्याही बंदीशिवाय सेवा करण्याची त्यांना आशा होती. त्यांना भेटून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं.​—रोम. १:११, १२.

वाढीमुळे मिळणारा आनंद

एवढ्या वर्षांत यहोवाने कशा प्रकारे त्याच्या लोकांना आशीर्वादित केलं ते मी पाहिलं आहे. १९४३ साली जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा संपूर्ण जगभरात जवळजवळ १,००,००० प्रचारक होते. पण आता २४० राष्ट्रांत ८०,००,००० पेक्षा जास्त लोक यहोवाची सेवा करत आहे. या वाढीत गिलियड पदवीधरांनी केलेल्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. या अनेक मिशनरींसोबत जवळून काम करायला आणि त्यांच्या नेमणुकीत त्यांना मदत करायला मला खूप आनंद झाला.

मी तरुणपणातच माझं जीवन यहोवाच्या सेवेत खर्च करण्याचा निर्णय घेतला आणि बेथेलला येण्याचा अर्ज दिला, याचा मला आनंद आहे. या वर्षांदरम्यान यहोवाने मला भरभरून आशीर्वाद दिला. बेथेलमध्ये सेवा करण्याच्या आनंदाशिवाय मला आणि लीलाला ५० वर्षांपासून ब्रुकलिनमधल्या अनेक मंडळ्यांसोबत प्रचार कार्य करण्यात आनंदही मिळाला. तसंच आम्हाला अनेक खरे मित्रही बनवता आले.

मी लीलाच्या मदतीने दररोज बेथेलमध्ये यहोवाची सेवा करत आहे. मी जरी आज ८४ पेक्षा जास्त वर्षांचा असलो तरी मला याचा आनंद आहे, की मी शाखा कार्यालयात पत्र व्यवहाराच्या कामाला हातभार लावून अजूनही अर्थपूर्ण काम करू शकतो.

आज लीलासोबत

यहोवाच्या विस्मयकारक संघटनेसोबत काम करण्याचा आणि मलाखीचे शब्द किती खरे आहेत हे पाहण्याचा आनंद खरंच खूप मोठा आहे. मलाखी ३:१८ म्हणतं: “मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.” आपण पाहतो की दिवसेंदिवस सैतानाचं जग दुष्ट होत चाललं आहे आणि लोकांना जीवनात काहीच आशा नाही व ते पूर्णपणे आनंदी नाहीत. पण जे कठीण काळातही यहोवावर प्रेम करतात आणि त्याची सेवा करतात ते आनंदी असतात. तसंच त्यांना भविष्याची पक्की आशाही आहे. इतरांना आनंदाचा संदेश सांगण्याचा आपल्याला खरंच एक खूप मोठा बहुमान मिळाला आहे! (मत्त. २४:१४) देवाचं राज्य लवकरच या जगाचं रूपांतर नंदनवनात करेल. त्या दिवसाची आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहत आहोत! त्या वेळी पृथ्वीवर राहणारे निरोगी असतील आणि ते आनंदाने सर्वकाळ जगतील.