व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१९१८​—शंभर वर्षांआधी

१९१८​—शंभर वर्षांआधी

१ जानेवारी, १९१८ च्या टेहळणी बुरूज अंकाची सुरुवात पुढे दिलेल्या शब्दांनी होते: “१९१८ हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे?” युरोपमध्ये पहिलं विश्‍वयुद्ध सुरूच होतं. पण वर्षाच्या सुरुवातीच्या घटनांवरून दिसून येत होतं की बायबल विद्यार्थ्यांसाठी आणि जगातल्या लोकांसाठी काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत.

जग शांतीबद्दल चर्चा करतं

८ जानेवारी, १९१८ ला अमेरिकेचे राष्ट्रपती वुडरो विल्सन यांनी यु.एस. काँग्रेसला दिलेल्या भाषणात असे १४ मुद्दे मांडले जे त्यांच्या मते ‘न्याय आणि टिकणारी शांती’ प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे होते. जगभरातल्या देशांमध्ये शांती प्रस्थापित करणं, युद्ध सामग्रीचं उत्पादन कमी करणं आणि लहान-मोठ्या देशांना समान फायदा होईल यासाठी ‘सर्व राष्ट्रांना संघटित’ करणं हे मुद्दे त्यांनी मांडले. त्यांनी मांडलेले “चौदा मुद्दे” नंतर “लीग ऑफ नेशन्स” किंवा “संयुक्‍त राष्ट्रसंघ” स्थापित करण्यासाठी वापरण्यात येणार होते. तसंच, “ट्रिटी ऑफ वर्सेल्स” किंवा “व्हर्सायचा तह” याच्या अटी ठरवण्यासाठीही हे वापरण्यात येणार होते. यामुळे पहिलं विश्‍वयुद्ध संपणार होतं.

विरोधकांचा पराजय

आदल्या वर्षी * बऱ्‍याच समस्या उद्‌भवल्या होत्या. पण वॉच टॉवर बायबल अॅन्ड ट्रॅक्ट सोसायटी याच्या वार्षिक सभेत अशा काही घडामोडी घडल्या ज्यांवरून लवकरच शांतीपूर्ण परिस्थिती स्थापित होईल असं बायबल विद्यार्थ्यांना वाटलं.

५ जानेवारी, १९१८ ला भरलेल्या या सभेत अशी अनेक नावाजलेली माणसं हजर होती ज्यांना बेथेलमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांनी संघटनेवर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला. रिचर्ड एच. बारबर या विश्‍वासू प्रवासी पर्यवेक्षकांनी सभेची सुरुवात प्रार्थनेने केली. त्यानंतर आदल्या वर्षाचा अहवाल वाचण्यात आला. मग डायरेक्टर्सची वार्षिक निवडणूक पार पाडण्यात आली. बंधू बारबर यांनी बंधू जोसेफ रदरफर्डसोबत आणखी सहा जणांची नावं सुचवली. मग विरोधकांच्या पक्षाच्या वकिलाने सात जणांची नावं सुचवली. यात अशा लोकांची नावंदेखील होती ज्यांना बेथेलमधून काढून टाकण्यात आलं होतं. पण विरोधकांची हार झाली. शेयरहोल्डर्स यांची भरपूर मतं बंधू रदरफर्ड आणि इतर सहा विश्‍वासू बांधवांच्या बाजूने असल्यामुळे त्यांना डायरेक्टर्स म्हणून नेमण्यात आलं.

अनेक बांधव जे या सभेला हजर होते ते म्हणाले, की या सभेला हजर राहून त्यांना सर्वात जास्त आनंद झाला. कारण त्यांना जाणवलं की यहोवाची खास संमती या सभेवर होती. पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही.

द फिनिश्‍ड मिस्ट्री याला मिळालेली प्रतिक्रिया

बऱ्‍याच महिन्यांपर्यंत बायबल विद्यार्थी द फिनिश्‍ड मिस्ट्री हे पुस्तक लोकांना देत होते. त्यात दिलेल्या बायबल सत्याबद्दल प्रामाणिक मनाच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

कॅनडामधले प्रवासी पर्यवेक्षक, एडवर्ड एफ. क्रिस्ट यांनी द फिनिश्‍ड मिस्ट्री हे पुस्तक वाचून झालेल्या आणि फक्‍त पाच आठवड्यांतच सत्य स्वीकारलेल्या एका जोडप्याविषयी म्हटलं: “या दोघांनीही पूर्णपणे स्वतःला समर्पित केलं आहे आणि ते चांगली प्रगती करत आहेत.”

एका माणसाला हे पुस्तक मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या मित्रांना त्यातला संदेश सांगितला. त्यात दिलेला संदेश त्याच्या मनाला भिडला. हे पुस्तक त्याला कसं मिळालं याबद्दल सांगताना तो म्हणतो: “मी थर्ड अॅवेन्यू इथून जात असताना काहीतरी माझ्या खांद्याला जोरात लागलं. मला वाटलं ती वीट आहे. पण ते ‘फिनिश्‍ड मिस्ट्री’ होतं. मी ते घरी आणून पूर्ण वाचून काढलं. . . . मग मला कळलं की ते पुस्तक . . . एका उपदेशकाने रागात खिडकीबाहेर फेकलं होतं. . . . पण मला खात्री पटली, की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात यासारखं कोणतंही कार्य केलं नसेल ज्यामुळे लोकांना खरी आशा मिळाली असेल. पण त्याच्या या एका कार्यामुळे अनेकांना खरी आशा मिळाली. . . . या उपदेशकाच्या रागामुळे आज आम्हाला देवाची स्तुती करण्याची संधी मिळाली.”

उपदेशकाच्या अशा प्रतिक्रियेबद्दल नवल करण्यासारखं काही नव्हतं. कॅनडातल्या अधिकाऱ्‍यांनी या पुस्तकावर १२ फेब्रुवारी, १९१८ रोजी बंदी आणली. त्यांचं म्हणणं होतं की त्यात बंडखोरीची आणि युद्धाविरुद्ध असलेली वाक्यं दिली आहेत. त्यानंतर लगेच, अमेरिकेच्या अधिकाऱ्‍यांनीही हे मान्य केलं. सरकारच्या प्रतिनिधींनी बेथेलमध्ये आणि न्यू यॉर्क, पेन्सिल्वेनिया व कॅलिफोर्निया इथल्या कार्यांलयात संघटनेच्या प्रमुखांविरुद्ध पुरावे शोधले. १४ मार्च, १९१८ रोजी अमेरिकेच्या न्यायालयाने द फिनिश्‍ड मिस्ट्री या पुस्तकावर बंदी आणली. या पुस्तकाच्या छपाई आणि वितरणामुळे युद्धासाठी घेण्यात येणाऱ्‍या परिश्रमांत अडखळण तयार होत आहे आणि गुप्तचर कायदा मोडला जात आहे असा दावा त्यांनी केला.

कैदेत

७ मे, १९१८ ला न्यायालयाने जोव्हाने डेखेका, जॉर्ज फिशर, अलेक्झॅन्डर मॅकमिलन, रॉबर्ट मार्टिन, फ्रेडरीक रॉबीसन, जोसेफ रदरफर्ड, विलियम वॅन ऍम्बर्घ आणि क्लेटन वुडवर्थ यांना अटक करायचा हुकूम दिला. त्यांच्यावर आरोप होता की ते “नियम मोडणारे, गंभीर गुन्हा करणारे तसंच, स्वेच्छेने अवज्ञा करणारे, अप्रामाणिक आणि अमेरिकेच्या लष्कर आणि नौदलात सेवा करण्यासाठी नकार देणारे” आहेत. त्यांच्यावर ५ जून, १९१८ रोजी खटला सुरू झाला खरा, पण त्यांना निर्दोष करार दिला जाईल याची काही शाश्‍वती नव्हती. असं का म्हणता येईल?

अमेरिकेच्या अटर्नी-जनरलच्या मते त्यांच्यावर गुप्तचर कायदा मोडण्याचा आरोप होता. या आरोपाला त्याने “देशाच्या योजनेविरुद्ध वापरण्यात येणारं प्रभावी हत्यार” असं म्हटलं. ज्या लोकांनी “सत्य, चांगल्या हेतूने आणि योग्य कारणांनी” पुस्तक प्रकाशित केलं त्यांच्या संरक्षणासाठी या कायद्यात फेरबदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पण काँग्रेसने तो १६ मे, १९१८ ला फेटाळला. द फिनिश्‍ड मिस्ट्री यावर प्रामुख्याने त्यांची चर्चा व्हायची. त्याबद्दल अमेरिकेच्या काँग्रेसच्या एका अधिकृत अहवालात म्हटलं आहे: “सर्वत्र पसरलेल्या अशा प्रकारच्या धारणेचं सर्वात धोकेदायक उदाहरण म्हणजे ‘द फिनिश्‍ड मिस्ट्री’ हे पुस्तक. . . . याचा एकच परिणाम होतो, तो म्हणजे सैनिकांना . . . आपल्या नियमाविरुद्ध जाण्यासाठी प्रेरित करणं आणि आपल्या हेतूचा अनादर करणं.”

२० जून, १९१८ ला पंचाने आठ बांधवांना सर्व आरोपांसाठी दोषी ठरवलं. दुसऱ्‍या दिवशी न्यायाधीशाने आपला निर्णय सुनावला. त्याने म्हटलं: “ज्या धार्मिक विचारसरणीची या आरोपींनी आपली शक्‍ती पणाला लावून वकिली केली आहे आणि पसरवली आहे, . . . ती जर्मन सैनिकांच्या एका तुकडीपेक्षाही जास्त धोकेदायक आहे. . . . यांना कडक शिक्षा देण्यात यावी.” दोन आठवड्यांनंतर या आठ बांधवांना १० ते २० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आणि जॉर्जिया इथल्या अॅटलँटाच्या तुरुंगात पाठवण्यात आलं.

प्रचाराचं काम चालू राहतं

या काळात बायबल विद्यार्थ्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) त्यांच्या कार्यांची बारकाईने चौकशी केली. त्यांनी यावर हजारो कागदपत्रं तयार केली. या अहवालांवरून कळतं की प्रचारकार्य चालू ठेवण्याचा आपल्या बांधवांचा दृढ निश्‍चय होता.

एफबीआयला फ्लोरिडामधल्या ऑर्लेन्डो इथल्या एका पोस्टमास्टरने पत्रात लिहिलं: “[बायबल विद्यार्थी] शहराची घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत. आणि ते हे जास्तकरून रात्रीच्या [वेळी] करत आहेत.” त्याने असंही म्हटलं, की कितीही विरोध असला तरी त्यांना काहीही करून आपलं काम चालूच ठेवायचं आहे.

युद्ध विभागातल्या एका कर्नलने ब्यूरोला फ्रेडरिक डब्ल्यू. फ्रांझ यांच्या कार्याबद्दल लिहिलं. त्या कर्नलने लिहिलं: “‘फिनिश्‍ड मिस्ट्री’ याच्या हजारो प्रती विकण्याच्या कामात एफ. डब्ल्यू. फ्रांझ . . . सक्रियपणे सामील होते.” बंधू फ्रांझ नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले.

चार्ल्स फेकल हेसुद्धा नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले. त्यांनीही तीव्र छळाचा सामना केला. द फिनिश्‍ड मिस्ट्री याचं वितरण करण्यासाठी अधिकाऱ्‍यांनी त्यांना अटक केली. तुरुंगातून ते पत्र पाठवायचे तेव्हा त्यांची पत्रं तपासली जायची. मेरीलँडमधल्या बॉल्टिमोर इथल्या तुरुंगात त्यांना एका महिन्यासाठी कैदेत ठेवलं होतं व “ऑस्ट्रीयनचा परराष्ट्रीय शत्रू” असं त्यांना नाव देण्यात आलं. त्यांची चौकशी करणाऱ्‍यांना त्यांनी धैर्याने साक्ष दिली. तेव्हा त्यांना १ करिंथकर ९:१६ यांतले पौलचे शब्द आठवले. पौलने म्हटलं: “मी जर आनंदाचा संदेश सांगितला नाही तर माझा धिक्कार असो!” *

आवेशाने प्रचारकार्य करण्यासोबत बायबल विद्यार्थ्यांनी अॅटलँटामधल्या बांधवांना तुरुंगातून सोडवण्यासाठी एक लेखी विनंतीवर सह्‍या मिळवल्या. अॅना के. गार्डनर याबद्दल आठवून सांगते: “आम्ही नेहमी काही न्‌ काहीतरी करत होतो. जेव्हा बांधव तुरुंगात होते तेव्हा आम्ही सह्‍या घेण्यासाठी लोकांना शोधत होतो. आम्ही घरोघरी गेलो. आम्हाला हजारो लोकांच्या सह्‍या मिळाल्या. आम्ही त्यांना सांगितलं की हे खरे ख्रिस्ती आहेत आणि त्यांच्यावर अन्याय झाला आहे व त्यांची चूक नसतानाही त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.”

अधिवेशनं

या कठीण काळात बरीच अधिवेशनं झाली. यामुळे बांधवांना आध्यात्मिक रीत्या बळ मिळालं. द वॉचटॉवर यात म्हटलं होतं: “संपूर्ण वर्षभरात चाळीसपेक्षा . . . जास्त अधिवेशनं आयोजित करण्यात आली. . . . या अधिवेशनांचे उत्तेजन देणारे अहवाल मिळत आहेत. आधी सर्व अधिवेशनं उन्हाळ्याच्या शेवटी किंवा हिवाळ्याच्या आधी व्हायची. पण आता वर्षाच्या प्रत्येक महिन्याला अधिवेशनं असतात.”

प्रामाणिक मनाचे लोक नंतरही आनंदाच्या संदेशाला चांगला प्रतिसाद देत होते. ओहायोच्या क्लीवलँड इथल्या एका अधिवेशनात जवळपास १,२०० जण हजर राहिले आणि ४२ जणांनी बाप्तिस्मा घेतला. त्यात एक लहान मुलगादेखील होता. “देवाबद्दल असलेली त्याची कृतज्ञता आणि समर्पण प्रौढ लोकांनाही लाजवणारं होतं.”

पुढे काय?

१९१८ सालच्या शेवटी बायबल विद्यार्थ्यांना एका अशा घटनेला समोरं जावं लागलं ज्यामुळे त्यांना आपलं भविष्य अनिश्‍चित वाटत होतं. ब्रुकलिनची काही जागा विकण्यात आली. तसंच, मुख्यालय पेन्सिल्वेनियामधल्या पिट्‌सबर्ग इथे हलवण्यात आलं. पुढाकार घेणारे अजून तुरुंगात होते व शेयरहोल्डर्सच्या वार्षिक सभेची तारीख ४ जानेवारी, १९१९ ही ठरवण्यात आली. आता पुढे काय होणार होतं?

आपले बांधव त्यांच्या कामात व्यस्त राहिले. पुढे काय होणार यावर त्यांना पूर्ण भरवसा होता. त्यामुळे त्यांनी १९१९ चं वार्षिक वचन हे निवडलं: “कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” (यश. ५४:१७) परिस्थिती अचानक बदलणार होती आणि ते त्यासाठी तयार होते. यामुळे त्यांचा विश्‍वास मजबूत होणार होता आणि पुढे राखून ठेवलेल्या मोठ्या कार्यासाठी त्यांना बळ मिळणार होतं.

^ परि. 6 2017 यहोवा के साक्षियों की सालाना किताब याच्या पृ. १७२-१७६ वर दिलेला “सौ साल पहले-1917” हा लेख पाहा.

^ परि. 22 चार्ल्स फेकल यांची “जॉय्स थ्रू परसीवीरन्स इन गुड वर्क” ही जीवन कथा टेहळणी बुरूज १ मार्च, १९६९ च्या अंकात पाहा.