व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४४

तुमची मुलं मोठी झाल्यावर यहोवाची सेवा करतील का?

तुमची मुलं मोठी झाल्यावर यहोवाची सेवा करतील का?

“येशू बुद्धीने व शरीराने वाढत गेला; तसेच, देवाच्या व माणसांच्या कृपेतही तो वाढत गेला.”—लूक २:५२.

गीत ४१ तारुण्यात यहोवाची सेवा करा

सारांश *

१. सगळ्यात चांगला निर्णय कोणता आहे?

सहसा पालक जे निर्णय घेतात, त्यांचा पुढे मुलांच्या जीवनावर परिणाम होतो. पालकांनी जर चुकीचे निर्णय घेतले तर त्यांचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. पण तेच जर त्यांनी योग्य निर्णय घेतले तर मुलांवर चांगला परिणाम होऊ शकतो. आणि मुलं पुढे आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतील. पण, मुलांनी स्वतःसुद्धा चांगले निर्णय घेतले पाहिजेत. आणि यहोवाची सेवा करण्याच्या निर्णयापेक्षा आणखी चांगला निर्णय कोणता असू शकतो!—स्तो. ७३:२८.

२. येशूच्या पालकांनी आणि स्वतः येशूने कोणते योग्य निर्णय घेतले?

येशूच्या आईवडिलांची, म्हणजे योसेफ आणि मरीया यांची अशी इच्छा होती, की पुढे जाऊन त्यांच्या मुलांनी यहोवाची सेवा करावी. आणि जीवनात त्यांनी जे काही निर्णय घेतले त्यांवरून दिसून आलं, की यहोवाची सेवा करणं त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. (लूक २:४०, ४१, ५२) तसंच, येशूनेसुद्धा आपल्या जीवनात योग्य निर्णय घेतले. त्यामुळे त्याच्यासाठी यहोवाची जी इच्छा होती ती त्याला पूर्ण करता आली. (मत्त. ४:१-१०) येशू मोठा होऊन दयाळू, विश्‍वासू आणि धैर्यवान माणूस बनला. कोणत्या पालकाला असं वाटणार नाही, की आपलाही मुलगा असाच असावा? अशा मुलाबद्दल त्यांना नक्कीच खूप अभिमान आणि आनंद वाटेल.

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

या लेखात पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल: यहोवाने येशूच्या बाबतीत कोणते चांगले निर्णय घेतले? योसेफ आणि मरीयाने जे निर्णय घेतले त्यांवरून ख्रिस्ती पालक काय शिकू शकतात? तसंच, येशूने जे निर्णय घेतले त्यांवरून तरुण काय शिकू शकतात?

यहोवाकडून शिका

४. यहोवाने आपल्या मुलाच्या बाबतीत कोणती महत्त्वाची निवड केली?

यहोवाने येशूसाठी खूप चांगल्या पालकांची निवड केली. (मत्त. १:१८-२३; लूक १:२६-३८) असं आपण का म्हणू शकतो? कारण, मरीयाचं यहोवावर आणि त्याच्या वचनावर खूप प्रेम होतं. हे तिने मनापासून व्यक्‍त केलेल्या भावनांवरून दिसून येतं. (लूक १:४६-५५) तसंच, यहोवाने दिलेल्या मार्गदर्शनाचं योसेफने ज्या प्रकारे पालन केलं, त्यावरून दिसून येतं की त्याचंही देवावर खूप प्रेम होतं आणि त्याला खूश करायची त्याची मनापासून इच्छा होती.—मत्त. १:२४.

५-६. यहोवाने आपल्या मुलाला कोणकोणत्या गोष्टी अनुभवू दिल्या?

लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, यहोवाने येशूसाठी श्रीमंत पालकांची निवड केली नाही. येशूच्या जन्मानंतर योसेफ आणि मरीयाने जे बलिदान अर्पण केलं त्यावरून आपल्याला कळतं की ते गरीब होते. (लूक २:२४) योसेफ सुतारकाम करायचा. नासरेथमध्ये त्याच्या घराजवळ कदाचित त्याचं एक छोटंसं दुकान असावं जिथे तो हे काम करायचा. त्यांचं राहणीमान खूप साधं असावं; खासकरून, त्यांचं कुटुंब वाढलं तेव्हा. कारण, बायबल म्हणतं, की त्यांना कमीत-कमी सात-आठ मुलं होती.—मत्त. १३:५५, ५६.

हे खरं आहे, की यहोवाने काही विशिष्ट धोक्यांपासून येशूचं संरक्षण केलं. पण त्याच्यासमोर येणाऱ्‍या सगळ्याच समस्या देवाने काढून टाकल्या नाहीत. (मत्त. २:१३-१५) उदाहरणार्थ, येशूला घरच्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. विचार करा, त्याच्या स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांनीच सुरुवातीला त्याला मसीहा म्हणून स्वीकारलं नाही, तेव्हा त्याला किती वाईट वाटलं असेल! (मार्क ३:२१; योहा. ७:५) तसंच, त्याला आपल्या वडिलांच्या, म्हणेजच योसेफच्या मृत्यूचं दुःखही सहन करावं लागलं. वडिलांच्या मृत्यूनंतर साहजिकच, मोठा मुलगा म्हणून कुटुंबाचा व्यवसाय संभाळायची जबाबदारी त्याच्यावर आली असेल. (मार्क ६:३) आणि जसजसा तो मोठा होता गेला तसतसं तो कुटुंबाची काळजी घ्यायलाही शिकला. त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले असतील. त्यामुळे दिवसभर मेहनत करून थकणं काय असतं, हे त्याला चांगलं माहीत होतं.

पालकांनो, जीवनात येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्या मुलांना तयार करा. त्यासाठी बायबल कशी मदत करतं हे त्यांना शिकवा (परिच्छेद ७ पाहा) *

७. (क) बाळाचा विचार करणारी जोडपी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतात? (ख) मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी नीतिसूत्रे २:१-६ ही वचनं पालकांना कशी मदत करू शकतात?

तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही जर आता बाळाचा विचार करत असाल, तर स्वतःला असं विचारा: ‘यहोवावर आणि त्याच्या वचनावर आपलं प्रेम आहे का? आपण नम्र आहोत का? एका अनमोल जिवाची आपण चांगली काळजी घेऊ असा भरवसा यहोवाला आपल्याबद्दल आहे का?’ (स्तो. १२७:३, ४) आणि तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मेहनत करणं किती महत्त्वाचं आहे, हे मी माझ्या मुलांना शिकवतो का?’ (उप. ३:१२, १३) ‘सैनातानाच्या जगातल्या शारीरिक आणि नैतिक धोक्यांपासून मी माझ्या मुलांचं होता होईल तितकं संरक्षण करतो का?’ (नीति. २२:३) हे खरं आहे, की तुम्ही तुमच्या मुलांचं सगळ्याच समस्यांपासून संरक्षण करू शकत नाही. तसं करणं शक्यही नाही. पण जीवनात येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही त्यांना तयार करू शकता. त्यासाठी बायबल कशी मदत करतं हे त्यांना प्रेमळपणे शिकवत राहा. (नीतिसूत्रे २:१-६ वाचा.) उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य यहोवाला सोडून देतो, तेव्हा यहोवाला एकनिष्ठ राहणं का महत्त्वाचं आहे हे तुमच्या मुलांना बायबलमधून शिकवा. (स्तो. ३१:२३) किंवा जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या दुःखाचा सामना करण्यासाठी आणि आपलं मन शांत ठेवण्यासाठी बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं, हे आपल्या मुलांना दाखवा.—२ करिंथ. १:३, ४; २ तीम. ३:१६.

योसेफ आणि मरीयाकडून शिका

८. योसेफ आणि मरीयाने अनुवाद ६:६, ७ या वचनांमध्ये दिलेला कोणता सल्ला पाळला?

योसेफ आणि मरीया, येशूला अशा प्रकारे वाढवू शकले ज्यामुळे त्याला पुढे जाऊन देवाची स्वीकृती मिळाली. कारण यहोवाने पालकांना जे मार्गदर्शन दिलं होतं ते त्यांनी पाळलं. (अनुवाद ६:६, ७ वाचा.) योसेफ आणि मरीया यांचं यहोवावर गाढ प्रेम होतं. आणि आपल्या मुलांनाही यहोवावर तितकंच प्रेम करायला शिकवणं हे त्यांचं ध्येय होतं.

९. योसेफ आणि मरीयाने कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले?

योसेफ आणि मरीयाने आपल्या मुलांसोबत मिळून यहोवाची उपासना करायची निवड केली. ते दर आठवडी नासरेथमधल्या सभास्थानात उपासना करायला जायचे. आणि दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेमला जायचे. (लूक २:४१; ४:१६) यरुशलेमला जात असताना ते कदाचित येशूला आणि आपल्या इतर मुलांना यहोवाच्या लोकांच्या इतिहासाबद्दल सांगत असतील. तसंच, शास्त्रवचनांत ज्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे, त्यांपैकी काही ठिकाणांना त्यांनी जाता-जाता भेटही दिली असेल. पुढे जसजसं त्यांचं कुटुंब वाढत गेलं तसतसं योसेफ आणि मरीयाला आपल्याला मुलांसोबत मिळून अशा रीतीने यहोवाची उपासना करणं कदाचित सोपं गेलं नसेल. पण तरीसुद्धा त्यांनी तसं केलं. आणि याचे फायदे त्यांना पाहायला मिळाले. एक कुटुंब म्हणून यहोवाच्या उपासनेला सगळ्यात जास्त महत्त्व दिल्यामुळे ते आध्यात्मिक रित्या मजबूत राहिले.

१०. ख्रिस्ती पालक योसेफ आणि मरीयाकडून काय शिकू शकतात?

१० आज ख्रिस्ती पालक योसेफ आणि मरीयाकडून काय शिकू शकतात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमचं यहोवावर मनापासून प्रेम आहे हे तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तुमच्या मुलांना दिसू द्या. हे नेहमी लक्षात असू द्या, की तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवणं यापेक्षा मौल्यवान भेट तुम्ही त्यांना देऊ शकत नाही. तसंच, तुम्ही त्यांना नियमितपणे यहोवाची उपासना करण्याचा महत्त्वाचा धडाही शिकवू शकता. दुसऱ्‍या शब्दांत, तुम्ही त्यांना नियमितपणे बायबल अभ्यास करायला, प्रार्थना करायला, सभांना जायला आणि प्रचार करायला शिकवू शकता. (१ तीम. ६:६) हे खरं आहे, की तुम्ही त्यांच्या भौतिक गरजाही पूर्ण केल्या पाहिजेत. (१ तीम. ५:८) पण हे कधीही विसरू नका, की या जगाच्या नाशापासून वाचण्यासाठी आणि नवीन जगात जाण्यासाठी भौतिक गोष्टी नाही, तर यहोवासोबत असलेलं त्यांचं जवळचं नातंच त्यांना मदत करेल. *यहे. ७:१९; १ तीम. ४:८.

आज अनेक ख्रिस्ती पालक असे निर्णय घेतात ज्यांमुळे त्यांच्या मुलांना यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत होते. हे पाहून खरंच खूप आनंद होतो! (परिच्छेद ११ पाहा) *

११. (क) १ तीमथ्य ६:१७-१९ या वचनांमध्ये दिलेला सल्ला पालकांना योग्य निर्णय घ्यायला कशी मदत करू शकतो? (ख) तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कोणती ध्येयं ठेवायचा विचार करू शकता, आणि याचे काय फायदे आहेत? (“ तुम्ही कोणती ध्येयं ठेवू शकता?” ही चौकट पाहा.)

११ आज अनेक ख्रिस्ती पालक असे निर्णय घेतात ज्यांमुळे त्यांच्या मुलांना यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत होते. हे पाहून खरंच खूप आनंद होतो! ते आपल्या मुलांसोबत मिळून यहोवाची उपासना करतात. जसं की, ते नियमितपणे सभांना आणि अधिवेशनांना जातात, प्रचारकार्य करतात. काही कुटुंबं तर अशा ठिकाणीही जाऊन प्रचार करतात जिथे जास्त प्रचारकार्य झालेलं नाही. काही पालक आपल्या मुलांना बेथेल पाहायला घेऊन जातात. तर काही कुटुंबं बांधकाम प्रकल्पांना हातभार लावतात. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी साहजिकच पैसा खर्च होतो. आणि त्यामुळे त्यांना कदाचित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण याच्या बदल्यात त्यांना यहोवाकडून भरपूर आशीर्वाद मिळतात. (१ तीमथ्य ६:१७-१९ वाचा.) कारण अशा कुटुंबांमध्ये वाढलेली मुलं मोठी झाल्यावरही या चांगल्या सवयी सोडून देत नाहीत. उलट, आपल्या आईवडिलांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवल्या याचा त्यांना खूप आनंद होतो. *नीति. १०:२२.

येशूकडून शिका

१२. मोठं झाल्यावर येशूला काय करावं लागलं?

१२ येशूचा स्वर्गातला पिता यहोवा नेहमीच योग्य निर्णय घेतो. आणि त्याच्या पृथ्वीवरच्या पालकांनीसुद्धा योग्य निर्णय घेतले. पण मोठा झाल्यावर येशूला स्वतःच आपले निर्णय घ्यावे लागले. (गलती. ६:५) आपल्या सगळ्यांसारखंच त्यालाही निवड करायचं स्वातंत्र्य होतं. त्याला हवं असतं तर तो स्वतःचाच विचार करू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. त्याने यहोवासोबत एक चांगलं नातं टिकवून ठेवायची निवड केली. (योहा. ८:२९) येशूचं हे उदाहरण आज मुलांना कसं मदत करू शकतं?

मुलांनो, नेहमी आपल्या आईवडिलांचं ऐका (परिच्छेद १३ पाहा) *

१३. लहान असताना येशूने कोणती महत्त्वाची निवड केली?

१३ लहान असताना येशूने आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहायची निवड केली. आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्याला जास्त माहीत आहे, असा विचार करून त्याने कधीच त्यांचं म्हणणं टाळलं नाही. उलट, तो “त्यांच्या आज्ञेत राहिला.” (लूक २:५१) कुटुंबातला मोठा मुलगा असल्यामुळे साहजिकच त्याच्यावर काही जबाबदाऱ्‍या आल्या. त्या सगळ्या जबाबदाऱ्‍या त्याने खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या. जसं की, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता याव्यात, म्हणून त्याने आपल्या वडिलांकडून सुतारकाम शिकून घेतलं.

१४. येशू शास्त्रवचनांचा चांगला अभ्यास करायचा असं आपण का म्हणू शकतो?

१४ येशूचा जन्म किती अद्‌भुत रीतीने झाला होता आणि त्याच्याबद्दल देवाचा संदेश सांगणाऱ्‍यांनी काय म्हटलं होतं, हे सगळं त्याच्या पालकांनी नक्कीच त्याला सांगितलं असेल. (लूक २:८-१९, २५-३८) पण येशूने तेवढ्यावरच समाधान मानलं नाही. त्याने स्वतःसुद्धा शास्त्रवचनांचा अभ्यास केला. तो देवाच्या वचनाचा चांगला अभ्यास करायचा असं आपण का म्हणू शकतो? कारण बायबल म्हणतं, की तो फक्‍त १२ वर्षांचा होता तेव्हा यरुशलेममधले धर्मगुरू “त्याच्या समजबुद्धीमुळे आणि त्याच्या उत्तरांमुळे अगदी थक्क झाले होते.” (लूक २:४२, ४६, ४७) आणि इतक्या लहान वयात त्याने स्वतःला याची खातरी पटवून दिली होती, की यहोवाच त्याचा पिता आहे.—लूक २:४३, ४९.

१५. येशूने यहोवाची इच्छा पूर्ण करायची निवड केली होती हे कसं दिसून आलं?

१५ यहोवाच्या उद्देशात आपली काय भूमिका आहे हे समजल्यावर येशूने यहोवाची इच्छा पूर्ण करायची निवड केली. (योहा. ६:३८) बरेच लोक आपला द्वेष करतील हे त्याला माहीत होतं. आणि या गोष्टीचा विचार करून त्याला कदाचित वाईटही वाटलं असेल. पण तरीसुद्धा त्याने यहोवाची इच्छा पूर्ण करायची निवड केली. इ.स. २९ मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला, त्यानंतर त्याने आपलं संपूर्ण लक्ष यहोवाकडून मिळालेली जबाबदारी पूर्ण करण्यावर लावलं. (इब्री १०:५-७) त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं तेव्हासुद्धा त्याने देवाची इच्छा पूर्ण करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं.—योहा. १९:३०.

१६. मुलं येशूकडून कोणता धडा शिकू शकतात?

१६ आपल्या आईवडिलांचं ऐका.  मुलांनो, योसेफ आणि मरीया यांच्यासारखेच तुमचे आईवडीलही अपरिपूर्ण आहेत. पण तरीसुद्धा यहोवाने त्यांना तुमचं संरक्षण करायची, तुम्हाला शिकवायची आणि तुमचं मार्गदर्शन करायची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर त्यांचं ऐकलं आणि त्यांचा आदर केला, तर तुमचं भलं होईल.—इफिस. ६:१-४.

१७. यहोशवा २४:१५ या वचनानुसार मुलांना स्वतः कोणता निर्णय घ्यावा लागेल?

१७ तुम्ही कोणाची सेवा कराल हे ठरवा.  यहोवा कोण आहे, त्याची इच्छा काय आहे आणि तुम्ही ती कशी पूर्ण करू शकता याची तुम्ही स्वतःला खातरी पटवून दिली पाहिजे. (रोम. १२:२) मग तुम्हाला जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. तो म्हणजे, यहोवाची सेवा करायचा निर्णय. (यहोशवा २४:१५ वाचा; उप. १२:१) तुम्ही जर नियमितपणे बायबलचं वाचन केलं आणि त्याचा अभ्यास केला, तर यहोवावरचं तुमचं प्रेम वाढत जाईल आणि त्याच्यावरचा तुमचा विश्‍वास मजबूत होत जाईल.

१८. मुलांनी कोणती निवड केली पाहिजे, आणि असं केल्यामुळे काय होईल?

१८ यहोवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या.  सैतानाचं जग असं शिकवतं, की तुम्ही जर तुमच्या क्षमतांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला, तर तुम्ही आनंदी राहाल. पण खरं काय ते आपल्याला माहीत आहे. जे लोक जगात यशस्वी होण्यावर आपलं लक्ष लावतात, ते “स्वतःला अनेक दुःखांनी भोसकून” घेतात. (१ तीम. ६:९, १०) याउलट, तुम्ही जर यहोवाचं ऐकलं आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तर तुम्हाला सुज्ञतेने वागत येईल आणि जीवनात आनंदी राहता येईल.—यहो. १:८.

तुम्ही काय करायची निवड कराल?

१९. पालकांनी कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे?

१९ पालकांनो, तुमच्या मुलांना यहोवाची सेवा करायला होता होईल तितकी मदत करा. यहोवावर विसंबून राहा आणि तो तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल याची खातरी बाळगा. (नीति. ३:५, ६) हे कधीही विसरू नका, की मुलांवर तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या वागण्याचा जास्त प्रभाव पडतो. म्हणून जीवनात असे निर्णय घ्या ज्यांमुळे तुमची मुलं मोठी झाल्यावर यहोवाची सेवा करतील आणि त्यांना त्याची स्वीकृती मिळेल.

२०. मुलांनी यहोवाची सेवा करायची निवड केली तर त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

२० मुलांनो, तुमचे आईवडील तुम्हाला जीवनात योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत करतील. पण यहोवाला खूश करण्याचा निर्णय हा तुम्हालाच घ्यावा लागेल. त्यासाठी येशूचं अनुकरण करा आणि यहोवाची सेवा करायची निवड करा. तुम्ही जर हा निर्णय घेतला तर यहोवाच्या सेवेत तुम्ही व्यस्त राहाल. तसंच, आत्ता तुम्हाला अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगता येईल. (१ तीम. ४:१६) आणि भविष्यातही तुम्हाला सगळ्यात आनंदी आणि समाधानी जीवन मिळेल!

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

^ परि. 5 आपल्या मुलांनी मोठं झाल्यावर आनंदी राहावं आणि यहोवाची सेवा करावी अशी प्रत्येक ख्रिस्ती पालकाची इच्छा असते. पालक आपल्या जीवनात असे कोणते निर्णय घेऊ शकतात, ज्यांमुळे त्यांच्या मुलांना पुढे जाऊन यहोवाची सेवा करायला मदत होईल? तसंच, जीवनात खऱ्‍या अर्थाने यशस्वी होण्यासाठी ख्रिस्ती तरुण कोणते निर्णय घेऊ शकतात? या प्रश्‍नांची उत्तरं या लेखात दिली जातील.

^ परि. 11 ऑक्टोबर २०११ च्या सजग होइए!  मासिकाच्या पृ. २० वर दिलेली, “मेरे मम्मी-पापा दुनिया के सबसे अच्छे मम्मी-पापा हैं” ही चौकट आणि ८ एप्रिल १९९९ च्या सावध राहा!  मासिकाच्या पृ. २५ वर दिलेला, “पालकांना लिहिलेले एक खास पत्र” हा लेख पाहा.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: येशू लहान असताना मरीयाने त्याला नक्कीच यहोवावर प्रेम करायला शिकवलं असेल. तसंच, आजसुद्धा आई आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवू शकते.

^ परि. 68 चित्रांचं वर्णन: योसेफने आपल्या कुटुंबासोबत देवाची उपासना करण्यासाठी सभास्थानात जायला खूप महत्त्व दिलं असेल. त्याचप्रमाणे वडीलसुद्धा आपल्या कुटुंबासोबत सभांना जायला महत्त्व देऊ शकतात.

^ परि. 70 चित्रांचं वर्णन: येशूने आपल्या वडिलांकडून कामाचं कौशल्य शिकून घेतलं. तसंच, मुलांनीसुद्धा आपल्या वडिलांकडून काही कौशल्यं शिकून घेतली पाहिजेत.