व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४१

बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग १

बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग १

“तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात हे स्पष्टच आहे. आणि सेवक या नात्याने आम्ही हे पत्र लिहिले आहे.”—२ करिंथ. ३:३.

गीत ४० पहिल्याने राज्यासाठी झटा!

सारांश *

एक बायबल विद्यार्थ्यी बाप्तिस्मा घेतो तेव्हा संपूर्ण मंडळीला किती आनंद होतो! (परिच्छेद १ पाहा)

१. दुसरे करिंथकर ३:१-३ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्याला येशूचा शिष्य बनायला मदत करणं एक बहुमान आहे, असं का म्हणता येईल? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

आपल्या मंडळीतल्या एखाद्या बायबल विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा होतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं? आपल्याला नक्कीच खूप आनंद होतो. (मत्त. २८:१९) आणि जर त्या व्यक्‍तीसोबत आपण बायबल अभ्यास केला असेल, तर आपल्याला आणखीनच आनंद होतो. (१ थेस्सलनी. २:१९, २०) तिच्या आध्यात्मिक प्रगतीवरून आणि तिने घेतलेल्या बाप्तिस्म्यावरून हे दिसून येतं, की तुम्ही आणि मंडळीतल्या इतर सदस्यांनी तिला मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे बाप्तिस्मा घेतलेले हे नवीन शिष्य फक्‍त तुमच्यासाठीच नाही, तर संपूर्ण मंडळीसाठी जिवंत “शिफारसपत्रे” आहेत, असं म्हणता येईल.—२ करिंथकर ३:१-३ वाचा.

२. (क) आपण कोणते प्रश्‍न विचारात घेतले पाहिजेत, आणि का? (ख) बायबल अभ्यास म्हणजे काय? (तळटीप पाहा.)

गेल्या चार वर्षांत दर महिन्याला जगभरात जवळजवळ १ कोटी बायबल अभ्यास * चालवण्यात आले. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. याच काळात, दरवर्षी जवळजवळ २,८०,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. पण उरलेल्या त्या लाखो बायबल विद्यार्थ्यांबद्दल काय? त्यांना बाप्तिस्मा घ्यायला आपण कशी मदत करू शकतो? जोपर्यंत यहोवा लोकांना सत्यात यायला वेळ आणि संधी देत आहे, तोपर्यंत त्यांना लवकरात लवकर प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला, आपण होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. कारण आता वेळ फार कमी उरला आहे.—१ करिंथ. ७:२९क; १ पेत्र ४:७.

३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आज शिष्य बनवण्याचं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बायबल विद्यार्थ्यांना प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला कशी मदत केली जाऊ शकते, याबद्दल नियमन मंडळाने काही शाखा कार्यालयांना विचारलं. त्याबद्दल काही अनुभवी पायनियरांनी, मिशनरी सेवा करणाऱ्‍यांनी आणि विभागीय पर्यवेक्षकांनी काही मुद्दे सुचवले. (नीति. ११:१४; १५:२२) त्या मुद्द्‌यांची चर्चा, या आणि पुढच्या लेखात केली जाईल. * बायबल अभ्यास चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी काय करू शकतात, हे त्या अनुभवी भाऊबहिणींनी सांगितलं. अशा पाच मद्द्‌यांबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. हे मुद्दे एका बायबल विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करत राहायला मदत करतील.

दर आठवडी अभ्यास करा

आपल्या विद्यार्थ्याला विचारा, की ‘आपण कुठेतरी बसून चर्चा करू शकतो का?’ (परिच्छेद ४-६ पाहा)

४. दारावर उभं राहून बायबल अभ्यास घेणं पुरेसं आहे का? स्पष्ट करा.

आपले अनेक भाऊबहीण दारावर उभे राहून बायबल अभ्यास चालवतात. बायबलमध्ये आवड निर्माण करण्यासाठी ही नक्कीच एक चांगली पद्धत आहे. पण सहसा अशा चर्चा खूप छोट्या असतात. आणि त्या प्रत्येक आठवडी केल्या जाऊ शकतात असंही नाही. त्यामुळे, विद्यार्थ्याची आवड आणखी वाढवण्यासाठी आपले भाऊबहीण त्याचा फोन नंबर घेतात. आणि बायबलमधली काही माहिती सांगण्यासाठी त्याला फोन करतात किंवा मेसेज पाठवतात. अशा छोट्या-छोट्या चर्चा कदाचित अनेक महिन्यांपासून चालू असतील. पण बायबलचा अभ्यास करण्यासाठी एखादा विद्यार्थी इतकाच वेळ आणि इतकीच मेहनत घेत असेल, तर तो खरोखरच समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करू शकेल का? कदाचित नाही!

५. लूक १४:२७-३३ या वचनांत सांगितलेली कोणती गोष्ट आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना समजायला मदत केली पाहिजे?

एका व्यक्‍तीला शिष्य होण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे येशूने उदाहरण देऊन सांगितलं. येशूने बुरूज बांधणाऱ्‍या एका माणसाचं आणि युद्धावर जाणाऱ्‍या एका राजाचं उदाहरण दिलं. त्याने म्हटलं, की बुरूज बांधणाऱ्‍याने “आधी बसून खर्चाचा हिशोब” लावला पाहिजे. तरच तो ते काम पूर्ण करू शकेल. तसंच, युद्धावर जाणाऱ्‍या राजानेसुद्धा “याविषयी आधी बसून विचार” केला पाहिजे, की आपलं सैन्य शत्रूचा सामना करू शकेल की नाही. (लूक १४:२७-३३ वाचा.) या उदाहरणांमधून येशूला हेच सांगायचं होतं, की आपला शिष्य होण्यासाठी एखाद्याला कायकाय करावं लागेल याचा त्याने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. ही गोष्ट आपल्या बायबल विद्यार्थ्यांना समजावी म्हणून आपण त्यांना दर आठवडी आपल्यासोबत बायबल अभ्यास करायचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण हे कसं करू शकतो?

६. प्रगती करणारे बायबल अभ्यास चालवण्यासाठी आपण काय करू शकतो?

सुरुवातीला, दारात उभं राहून केल्या जाणाऱ्‍या अभ्यासाची वेळ हळूहळू वाढवायचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणे घरमालकासोबत बायबलमधल्या एकाच मुद्द्‌यावर नाही, तर आणखी एका मुद्द्‌यावर चर्चा करू शकता. एकदा का घरमालकाला जरा जास्त वेळ चर्चा करायला आवडू लागलं, की मग तुम्ही त्याला विचारू शकता: ‘आपण कुठेतरी बसून चर्चा करूयात का?’ घरमालकाच्या उत्तरावरून कळून येईल, की बायबल अभ्यास त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आणि शेवटी, विद्यार्थ्याला लवकर प्रगती करायला मदत करण्यासाठी तुम्ही त्याला विचारू शकता, की ‘तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा अभ्यास करायला आवडेल का?’ पण आठवड्यातून एक किंवा दोन वेळा अभ्यास करण्यासोबतच आणखी काहीतरी करणं गरजेचं आहे.

बायबल अभ्यासासाठी प्रत्येक वेळी तयारी करा

बायबल अभ्यासासाठी चागंली तयारी करा आणि विद्यार्थ्यालाही तयारी करायला शिकवा (परिच्छेद ७-९ पाहा)

७. प्रत्येक वेळी बायबल अभ्यास घेण्याआधी शिक्षक चांगली तयारी कशी करू शकतो?

तुम्ही एक शिक्षक,  म्हणजेच बायबल अभ्यास घेणारे आहात. म्हणून अभ्यास घेण्याआधी प्रत्येक वेळी चांगली तयारी करणं गरजेचं आहे. ही तयारी तुम्ही कशी करू शकता? सर्वातआधी, अभ्यास केली जाणारी माहिती आणि त्यातली शास्त्रवचनं वाचून काढा. मुख्य मुद्दे कोणते आहेत ते समजून घ्या. ज्या धड्यावर तुम्ही चर्चा करणार आहात त्याच्या शीर्षकाचा, उपशीर्षकांचा आणि छापील प्रश्‍नांचा विचार करा; जी वचनं वाचायला सांगितली आहेत त्यांचा आणि चित्रांचा विचार करा; तसंच, तो मुद्दा समजावण्यासाठी तुम्ही कोणता व्हिडिओ दाखवू शकता त्याचाही विचार करा. मग विद्यार्थ्याला लक्षात ठेवून तुम्हाला ही माहिती त्याला सोप्या आणि स्पष्ट शब्दांत कशी समजावून सांगता येईल याचा विचार करा. म्हणजे विद्यार्थ्याला ती माहिती समजेल आणि ती लागू करता येईल.—नहे. ८:८; नीति. १५:२८क.

८. कलस्सैकर १:९, १० या वचनांतून, विद्यार्थ्यासाठी प्रार्थना करण्याच्या बाबतीत आपण काय शिकू शकतो?

बायबल अभ्यासाची तयारी करताना आपल्या विद्यार्थ्यासाठी आणि त्याला कशी मदत करता येईल यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा. बायबलमधली माहिती विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोचवता यावी म्हणून यहोवाकडे मदतीसाठी विनंती करा. (कलस्सैकर १:९, १० वाचा.) विद्यार्थ्याला कोणती गोष्ट समजायला किंवा स्वीकारायला कठीण जाऊ शकते, याचा आधीच विचार करा. हे नेहमी लक्षात ठेवा, की तुम्हाला विद्यार्थ्याला प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करायची आहे.

९. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला अभ्यासाची तयारी करायला कशी मदत करू शकतो?

आपण आशा करू शकतो, की विद्यार्थ्यासोबत नियमितपणे बायबल अभ्यास केल्यामुळे यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्याबद्दल त्याची कदर वाढेल आणि त्याला आणखी शिकावंसं वाटेल. (मत्त. ५:३, ६) बायबल अभ्यासाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्याने  शिकत असलेल्या गोष्टींवर लक्ष लावलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेळी अभ्यास करण्याआधी तयारी करणं, म्हणजेच ज्या माहितीवर चर्चा केली जाणार आहे ती आधीच वाचून ठेवणं आणि ती स्वतःच्या जीवनात कशी लागू करता येईल याचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे, हे त्याला समजावून सांगा. ही तयारी करायला तुम्ही त्याला कशी मदत करू शकता? अभ्यासाची तयारी कशी केली जाते हे दाखवण्यासाठी एक धडा त्याच्यासोबत तयार करा. * छापलेल्या प्रश्‍नांची नेमकी उत्तरं कशी शोधायची, हे त्याला समजावून सांगा. आणि ते उत्तर लक्षात राहावं म्हणून त्यातले फक्‍त काही मुख्य शब्द त्याला मार्क करायला शिकवा. मग त्याला ते उत्तर स्वतःच्या शब्दांत द्यायला सांगा. असं केल्यामुळे तुम्हाला कळेल की त्याला ती माहिती कितपत समजली आहे. पण यासोबतच तुम्ही विद्यार्थ्याला आणखी एक गोष्ट करायचं प्रोत्साहन देऊ शकता.

विद्यार्थ्याला दररोज यहोवाचं ऐकायला आणि त्याच्याशी बोलायला शिकवा

आपल्या विद्यार्थ्याला यहोवाचं ऐकायला आणि त्याच्याशी बोलायला शिकवा (परिच्छेद १०-११ पाहा)

१०. विद्यार्थ्याने दररोज बायबल का वाचलं पाहिजे, आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी त्याने काय करणं गरजेचं आहे?

१० आपल्या शिक्षकासोबत नियमितपणे बायबल अभ्यास करण्यासोबतच विद्यार्थ्याने आणखी एक गोष्ट स्वतः केली पाहिजे. ती म्हणजे, त्याने यहोवाचं ऐकलं पाहिजे आणि त्याच्याशी बोललं पाहिजे. त्यामुळे त्याला खूप फायदा होऊ शकतो. यहोवाचं ऐकण्यासाठी त्याने दररोज बायबल वाचलं पाहिजे.  (यहो. १:८; स्तो. १:१-३) त्यासाठी तो jw.org/mr या वेबसाईटवर दिलेला “बायबल वाचनाचा आराखडा” कसा वापरू शकतो हे त्याला दाखवा. * बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी बायबल यहोवाबद्दल काय शिकवतं यावर, आणि शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात कशा लागू करता येतील यावर मनन करायचं विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या.—प्रे. कार्ये १७:११; याको. १:२५.

११. विद्यार्थी प्रार्थना करायला कसं शिकू शकतो, आणि त्याने दररोज यहोवाला प्रार्थना करणं का गरजेचं आहे?

११ यहोवाशी बोलण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्याला दररोज प्रार्थना करायचं  प्रोत्साहन द्या. त्यासाठी, प्रत्येक वेळी बायबल अभ्यासाच्या सुरुवातीला आणि शेवटी, विद्यार्थ्यासोबत आणि विद्यार्थ्यासाठी मनापासून प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना ऐकून विद्यार्थी मनापासून प्रार्थना करायला शिकेल. तसंच, येशू ख्रिस्ताच्या नावाने यहोवा देवाला प्रार्थना कशा करायच्या हेसुद्धा तो शिकेल. (मत्त. ६:९; योहा. १५:१६) दररोज  बायबल वाचल्यामुळे (यहोवाचं ऐकल्यामुळे) आणि प्रार्थना केल्यामुळे (यहोवाशी बोलल्यामुळे) विद्यार्थ्याला यहोवासोबत घनिष्ठ नातं जोडायलं किती मदत होईल, याचा विचार करा. (याको. ४:८) या चांगल्या सवयींमुळे विद्यार्थी समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करू शकेल. आणखी कोणती गोष्ट त्याला मदत करेल?

विद्यार्थ्याला यहोवासोबत मैत्री करायला मदत करा

१२. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला यहोवासोबत जवळचं नातं जोडायला कशी मदत करू शकतो?

१२ आपल्या विद्यार्थ्याने यहोवाबद्दल शिकावं अशी आपली इच्छा आहे. पण तितकंच पुरेसं नाही. शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्याच्या मनापर्यंतही पोचल्या पाहिजेत. तरंच तो त्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करायला तयार होईल. येशूने लोकांना बऱ्‍याच गोष्टी शिकवल्या. लोकांनाही त्याच्याकडून शिकायला आवडायचं आणि ते त्याचे शिष्य बनायचे, कारण तो जे काही शिकवायचा ते त्यांच्या मनापर्यंत पोचायचं. (लूक २४:१५, २७, ३२) तेच तुम्हीही केलं पाहिजे. तुमच्या विद्यार्थ्याला हे समजणं खूप गरजेचं आहे, की यहोवा एक खरी व्यक्‍ती आहे आणि आपण त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडू शकतो. तसंच, यहोवा आपला पिता, आपला देव आणि आपला मित्र होऊ शकतो हेही तुमच्या विद्यार्थ्याने समजणं गरजेचं आहे. (स्तो. २५:४, ५) त्यासाठी बायबल अभ्यास घेताना यहोवाच्या सुंदर गुणांकडे विद्यार्थ्याचं लक्ष वेधा; मग तुम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करत असला तरीही. (निर्ग. ३४:५, ६; १ पेत्र ५:६, ७) यहोवा किती प्रेमळ आहे, कनवाळू आणि दयाळू आहे हे समजायला विद्यार्थ्याला मदत करा. येशूने म्हटलं होतं, की आपला देव यहोवा याच्यावर प्रेम करणं हीच सगळयात पहिली आणि महत्त्वाची आज्ञा आहे. (मत्त. २२:३७, ३८) त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला यहोवावर प्रेम करायला मदत करा.

१३. तुम्ही आपल्या विद्यार्थ्याला यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल कसं शिकवू शकता?

१३ आपल्या विद्यार्थ्याशी बोलत असताना, तुम्ही यहोवावर इतकं प्रेम का करता हे त्याला सांगा. त्यामुळे विद्यार्थ्याला याची जाणीव होईल, की आपणसुद्धा यहोवाशी मैत्री केली पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. (स्तो. ७३:२८) उदाहरणार्थ, तुम्ही ज्या प्रकाशनातून अभ्यास घेत आहात त्यात असं एखादं वाक्य किंवा वचन आहे का जे तुम्हाला खूप आवडलं आणि ज्यातून तुम्हाला यहोवाच्या प्रेमाबद्दल, बुद्धीबद्दल, न्यायाबद्दल किंवा शक्‍तीबद्दल काहीतरी शिकायला मिळालं? असेल, तर ते तुमच्या विद्यार्थ्याला सांगा. आणि अशा कितीतरी गोष्टींमुळे तुम्ही यहोवावर प्रेम करता, हे त्याला सांगा. पण प्रत्येक विद्यार्थ्याने प्रगती करून बाप्तिस्मा घेण्यासाठी आणखी एक गोष्ट करणं गरजेचं आहे.

विद्यार्थ्याला सभांना यायचं प्रोत्साहन द्या

आपल्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर सभांना यायचं प्रोत्साहन द्या! (परिच्छेद १४-१५ पाहा)

१४. इब्री लोकांना १०:२४, २५ या वचनांत सांगितल्यानुसार सभांना उपस्थित राहिल्यामुळे विद्यार्थ्याला प्रगती करायला कशी मदत होईल?

१४ आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं, की आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी प्रगती करून बाप्तिस्मा घ्यावा. हे पाऊल उचलायला त्यांना मदत करण्यासाठी आपण त्यांना सभांना यायचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. अनुभवी शिक्षकांचं असं म्हणणं आहे, की जे विद्यार्थी लगेच सभांना येऊ लागतात ते लवकर प्रगती करतात. (स्तो. १११:१) आपल्या विद्यार्थ्यांना सभांना यायचं प्रोत्साहन देण्यासाठी काही शिक्षक त्यांना हे समजावून सांगतात, की अशा बऱ्‍याच गोष्टी आहेत ज्या त्यांना बायबल अभ्यासामधून नाही, तर सभांमधून शिकायला मिळतील. आपल्या विद्यार्थ्यासोबत इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा. आणि सभांना येण्याचे फायदे काय आहेत हे त्या वचनांतून त्याला समजवा. तसंच, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  * हा व्हिडिओ त्याला दाखवा. आणि त्याला प्रत्येक सभेला यायचं ध्येय ठेवायला मदत करा.

१५. विद्यार्थ्याला नियमितपणे सभांना यायचं प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय करू शकतो?

१५ जर तुमचा विद्यार्थी एकाही सभेला आला नसेल किंवा नियमितपणे सभेला येत नसेल तर तुम्ही काय करू शकता? त्याला सभेला यायचं फक्‍त आमंत्रण देण्याऐवजी, नुकत्याच झालेल्या सभेत तुम्हाला काय शिकायला मिळालं ते उत्साहाने त्याला सांगा. तुमचा उत्साह पाहून त्यालाही सभांना यावंसं वाटेल. सभेमध्ये अभ्यास केल्या जाणाऱ्‍या टेहळणी बुरूज  नियतकालीकाची आणि जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका  याची एक प्रत त्याला द्या. पुढच्या सभेत ज्या भागावर चर्चा केली जाणार आहे, तो भाग त्याला दाखवा. आणि त्यातलं त्याला काय आवडलं हे त्याला विचारा. विद्यार्थ्यी पहिल्यांदाच सभेला येईल तेव्हा तिथे त्याला ज्या चांगल्या गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतील, त्या दुसऱ्‍या कोणत्याही धार्मिक सभेत त्याने ऐकल्या किंवा पाहिल्या नसतील. (१ करिंथ. १४:२४, २५) आपल्या सभेत त्याची इतर भाऊबहिणींशी भेट होईल आणि त्यांच्या उदाहरणातून त्याला बरंच काही शिकता येईल. आणि तेही त्याला प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करतील.

१६. आपल्या विद्यार्थ्याने बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करावी म्हणून आपण कशा प्रकारे बायबल अभ्यास चालवू शकतो, आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१६ तर मग, आपल्या विद्यार्थ्याने बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करावी म्हणून आपण कशा प्रकारे बायबल अभ्यास चालवू शकतो? त्यासाठी आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला दर आठवडी अभ्यास करायचं आणि अभ्यासाची चांगली तयारी करायचं प्रोत्साहन देऊ शकतो. तरच, बायबल अभ्यासाचं महत्त्व त्याला कळेल. तसंच, आपण त्याला दररोज यहोवाचं ऐकायचं आणि त्याचीशी बोलायचं उत्तेजन दिलं पाहिजे. यासोबतच, आपण त्याला यहोवाशी मैत्री करायचंही प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्याला सभांना यायचं उत्तेजन दिलं पाहिजे. (“ बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे?” ही चौकट पाहा.) पण विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करायला मदत करण्यासाठी शिक्षकाने आणखी पाच गोष्टी केल्या पाहिजेत. त्या कोणत्या आहेत, त्याची चर्चा पुढच्या लेखात केली जाईल.

गीत १६ देव राज्याचा आश्रय घ्या!

^ परि. 5 एखाद्या व्यक्‍तीला शिकवणं म्हणजे, तिला एका नवीन किंवा एका वेगळ्या पद्धतीने विचार करायला किंवा वागायला मदत करणं. २०२० चं आपलं वार्षिक वचन, मत्तय २८:१९ आहे. या वचनाने आपल्याला याची आठवण करून दिली, की लोकांसोबत बायबल अभ्यास करणं आणि त्यांना बाप्तिस्मा घेऊन येशूचे शिष्य बनायला मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. हे काम आपण आणखी चांगल्या प्रकारे कसं करू शकतो, हे आपण या आणि पुढच्या लेखात पाहू.

^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: जर तुम्ही बायबलचा उपयोग करून नियमितपणे आणि पद्धतशीरपणे एखाद्या व्यक्‍तीसोबत चर्चा करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही बायबल अभ्यास चालवत आहात. बायबल अभ्यास कसा करायचा हे त्या व्यक्‍तीला दाखवल्यानंतर तुम्ही जर दोन वेळा तिच्यासोबत अभ्यास केला असेल आणि तो अभ्यास पुढे चालू राहील असं तुम्हाला दिसत असेल, तर तुम्ही तो बायबल अभ्यास म्हणून मोजू शकता.

^ परि. 3 आपली राज्य सेवा  याच्या जुलै २००४ ते मे २००५ च्या अंकांमध्ये, “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे” ही श्रृंखला दिली आहे. त्यातले काही मुद्देसुद्धा या लेखांमध्ये दिले आहेत.

^ परि. 9 बायबल विद्यार्थ्याला तयारी करायला शिकवणं  हा चार मिनिटांचा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ तुम्हाला JW लायब्ररी मध्ये मिडिया > आमच्या सभा आणि सेवाकार्य > आपली कौशल्यं सुधारणं, या ठिकाणी सापडेल.

^ परि. 10 हा आराखडा पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटवर इथे जा: लायब्ररी > पुस्तके आणि माहितीपत्रके > बायबल वाचनाचा आराखडा.

^ परि. 14 JW लायब्ररी  > मिडिया > आमच्या सभा आणि सेवाकार्य > सेवाकार्यासाठी मदत, या ठिकाणी हा व्हिडिओ पाहा.