व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४२

आपण जे मानतो तेच सत्य आहे याची खातरी बाळगा

आपण जे मानतो तेच सत्य आहे याची खातरी बाळगा

“सगळ्या गोष्टींची खातरी करा; जे चांगलं आहे त्याला धरून राहा.”—१ थेस्सलनी. ५:२१.

गीत ५४ खरा विश्‍वास बाळगू या!

सारांश *

१. आज कशामुळे लोक गोंधळात पडले आहेत?

आज ख्रिस्ती धर्मामध्येच हजारो पंथ आहेत. आणि ते सगळे असा दावा करतात, की देवाला मान्य असलेल्या पद्धतीनेच ते त्याची उपासना करत आहेत. त्यामुळे साहजिकच अनेकांचा गोंधळ होतो. त्यांना प्रश्‍न पडतो, की “एकच खरा धर्म आहे, की सर्वच धर्म देवाला मान्य आहेत?” पण आपल्या बाबतीत काय? आपण जे मानतो तेच खरं आहे, याची आपल्याला पक्की खातरी आहे का? आपण ज्या प्रकारे उपासना करतो तीच यहोवाला मान्य आहे, असं आपण ठामपणे म्हणून शकतो का? चला त्यासाठी आपल्याकडे कोणते पुरावे आहेत, ते आता आपण पाहू या.

२. आपण जे मानतो ते सत्य आहे याबद्दल पौलला खातरी का होती? (१ थेस्सलनीकाकर १:५)

आपण जे मानतो ते सत्य आहे, याची प्रेषित पौलला पूर्ण खातरी होती. (१ थेस्सलनीकाकर १:५ वाचा.) पण ही खातरी त्याला फक्‍त श्रद्धेमुळे नव्हती. तर देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्याला याची खातरी होती. ‘संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे,’ या गोष्टीवर त्याचा पूर्ण भरवसा होता. (२ तीम. ३:१६) पौलने जेव्हा शास्त्रवचनांचा अभ्यास केला, तेव्हा येशू हाच वचन दिलेला मसीहा असल्याचा भक्कम पुरावा त्याला मिळाला. या पुराव्याकडे यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केलं होतं. ते देवाबद्दलचं सत्य लोकांना शिकवायचा दावा तर करायचे, पण खरंतर ते देवाच्या विरोधात काम करत होते. (तीत १:१६) पौल मात्र या लोकांसारखा नव्हता. त्याने फक्‍त शास्त्रवचनातल्या काही भागांकडेच लक्ष दिलं नाही. तर, देवाच्या इच्छेबद्दल तो “सगळं काही” मानायला आणि शिकवायला तयार होता.—प्रे. कार्यं २०:२७.

३. सत्याची खातरी पटण्यासाठी आपल्याला सगळ्याच  प्रश्‍नांची उत्तरं माहीत असली पाहिजेत का? (“ यहोवाची कार्यं आणि विचार ‘अगणित आहेत’” ही चौकटसुद्धा पाहा)

काहींना असं वाटतं की जो पंथ सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं देतो, तोच खरा ख्रिस्ती धर्म असला पाहिजे; अगदी अशा प्रश्‍नांची उत्तरंसुद्धा ज्यांची उत्तरं बायबलमध्ये दिलेली नाहीत. पण अशी अपेक्षा करणं योग्य आहे का? पौलचंच उदाहरण घ्या. त्याने आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींना “सगळ्या गोष्टींची खातरी करा,” असं म्हटलं. पण त्याने असंही मान्य केलं, की अशा बऱ्‍याचशा गोष्टी आहेत, ज्या त्याला अजून समजलेल्या नाहीत. (१ थेस्सलनी. ५:२१) तो म्हणाला: “आपल्याजवळ असलेलं ज्ञान अपूर्ण आहे.” पुढे तो असंही म्हणाला, की “आपल्याला धातूच्या आरशात अंधूक दिसतं,” तशा बऱ्‍याच गोष्टी आपल्याला अजूनही अस्पष्ट आहेत. (१ करिंथ. १३:९, १२) जसं पौलला सगळ्याच गोष्टी समजल्या नाहीत, तसंच आपल्यालाही सगळ्याच गोष्टी समजणार नाहीत. पण त्याला मात्र पवित्र शास्त्रातल्या मूलभूत गोष्टी समजल्या होत्या. आणि आपण जे मानतो ते सत्य आहे, हे पटण्यासाठी तेवढ्या गोष्टी त्याला पुरेशा होत्या.

४. आपण जे मानतो तेच सत्य आहे, याची खातरी आपण कशी करू शकतो? आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांबद्दल कोणत्या चार गोष्टी आपण पाहणार आहोत?

देवाची उपासना करण्यासाठी येशूने आपल्याला एक पद्धत घालून दिली होती. आज यहोवाचे साक्षीदार त्याच पद्धतीने उपासना करत आहेत की नाही हे तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जे मानतो तेच सत्य आहे याची आपल्याला खातरी पटेल. त्यासाठी या लेखात आपण चार गोष्टी पाहणार आहोत. खरे ख्रिस्ती (१) मूर्तिपूजा करत नाहीत, (२) यहोवाच्या नावाचा गौरव करतात, (३) सत्यावर प्रेम करतात आणि (४) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात.

आपण मूर्तिपूजा करत नाही

५. येशूने देवाची उपासना कशी केली? आणि त्यातून आपण काय शिकू शकतो?

येशूचं यहोवावर खूप प्रेम होतं. म्हणून त्याने स्वर्गात आणि पृथ्वीवर असतानाही फक्‍त आणि फक्‍त यहोवाचीच उपासना केली. (लूक ४:८) आणि त्याने आपल्या शिष्यांनाही तसंच करायला शिकवलं. पण उपासना करण्यासाठी येशूने आणि त्याच्या शिष्यांनी कधीच मूर्तींचा वापर केला नाही. देव अदृश्‍य आहे, त्यामुळे कोणीही त्याची मूर्ती किंवा प्रतिमा बनवू शकत नाही. (यश. ४६:५) मग लोक ज्यांना संत म्हणतात त्यांच्याबद्दल काय? आपण त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा बनवून उपासना करू शकतो का? यहोवाने ज्या दहा आज्ञा दिल्या होत्या, त्यांतली दुसरी आज्ञा काय म्हणते त्याकडे लक्ष द्या: “तुम्ही आपल्यासाठी कोरलेली मूर्ती बनवू नका. वर आकाशातल्या, खाली पृथ्वीवरच्या . . . कशाचीही  प्रतिमा आपल्यासाठी बनवू नका. त्यांच्यासमोर वाकू नका.” (निर्ग. २०:४, ५) यावरून आपल्याला समजतं, की ज्यांना यहोवाला खूश करायची इच्छा आहे, ते उपासनेत मूर्तींचा उपयोग करत नाहीत.

६. आज यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे यहोवाची उपासना करत आहेत?

पहिल्या शतकातले ख्रिस्ती फक्‍त देवाचीच उपासना करायचे असं इतिहासकार म्हणतात. जसं की, इतिहासाच्या एका पुस्तकात असं म्हटलं आहे, की “पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना उपासनेत प्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पनासुद्धा धक्कादायक वाटली असती.” त्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच आज यहोवाचे साक्षीदारसुद्धा उपासनेत प्रतिमांचा किंवा मूर्तींचा वापर करत नाहीत. आपण “संतांची” किंवा स्वर्गदूतांची उपासना करत नाही. तसंच आपण येशूचीसुद्धा उपासना करत नाही. इतकंच नाही, तर आपण झेंडावंदन करत नाही किंवा कोणत्याही प्रकारे देशाची भक्‍ती करत नाही. लोकांनी कितीही आपल्यावर दबाव आणला, तरी येशूने जे म्हटलं त्याप्रमाणे करायचा आपण निर्धार करतो. त्याने म्हटलं: “तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर.”—मत्त. ४:१०.

७. कोणत्या कारणांमुळे यहोवाचे उपासक इतर ख्रिस्ती गटांपेक्षा वेगळे दिसून येतात?

आज ख्रिस्ती धर्मामध्ये बरेच प्रसिद्ध पाळक किंवा प्रवचन सांगणारे आहेत. आणि लोक त्यांना खूप मानतात. इतकं, की काही वेळा ते त्यांना देवाच्या जागीच बसवतात. चर्चेमध्ये त्यांची प्रवचनं ऐकायला लोकांची गर्दी होते. लोक त्यांची मासिकं-पुस्तकं विकत घेतात आणि त्यांच्या कार्याला भरपूर दान देतात. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान असतो. त्यांना पाहून लोक इतके भारावून जातात की ते जणू येशूलाच पाहात आहेत असं त्यांना वाटतं. पण यहोवाच्या उपासकांमध्ये पाळक किंवा उपदेशक असा कोणताही प्रकार नाही. मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांचा ते नक्कीच आदर करतात. पण “तुम्ही सगळे भाऊ आहात” असं जे येशूने शिकवलं होतं, ही गोष्ट ते नेहमी लक्षात ठेवतात. (मत्त. २३:८-१०) तसंच, ते कोणत्याही माणसाची उपासना करत नाहीत. मग तो धर्मगुरू असो किंवा राजकीय नेता असो. शिवाय, ते त्यांच्या कार्यालाही पाठिंबा देत नाहीत. उलट, निःपक्ष राहून ते जगातल्या गोष्टींमध्ये भाग घेत नाहीत. अशा सगळ्या कारणांमुळे स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणाऱ्‍या जगातल्या इतर लोकांपासून ते वेगळे आहेत हे दिसून येतं.—योहा. १८:३६.

आपण यहोवाच्या नावाचा गौरव करतो

खरे ख्रिस्ती मोठ्या अभिमानाने इतरांना यहोवाबद्दल सांगतात (परिच्छेद ८-१० पाहा) *

८. संपूर्ण जगात आपल्या नावाचा गौरव व्हावा अशी यहोवाची इच्छा आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

येशूने एकदा अशी प्रार्थना केली, “बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” त्याच्या या प्रार्थनेचं यहोवाने स्वतः स्वर्गातून उत्तर दिलं. त्याने त्याला वचन दिलं, की तो ‘आपल्या नावाचा गौरव करेल.’ (योहा. १२:२८) पृथ्वीवर असताना येशूने अगदी शेवटपर्यंत आपल्या पित्याच्या नावाचा गौरव केला. (योहा. १७:२६) त्यामुळे देवाच्या नावाचा वापर करणं आणि इतरांना त्याबद्दल सांगणं ही खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

९. पहिल्या शतकातल्या ख्रिशचनांनी देवाच्या नावाचा गौरव कसा केला?

पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली त्याच्या काही काळानंतरच, “देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे आपलं लक्ष वळवलं.” (प्रे. कार्यं १५:१४) पहिल्या शतकातल्या त्या ख्रिश्‍चनांनी मोठ्या अभिमानाने देवाच्या नावाचा उपयोग केला आणि इतरांनाही त्याबद्दल सांगितलं. तसंच, इतरांना प्रचार करताना आणि बायबलचं लिखाण करतानाही त्यांनी देवाच्या नावाचा उपयोग केला. * असं करून त्यांनी दाखवून दिलं, की देवाच्या नावाचा गौरव करणारे लोक तेच होते.—प्रे. कार्यं २:१४, २१.

१०. आज फक्‍त यहोवाचे साक्षीदारच यहोवाचं नाव जाहीर करतात याचा काय पुरावा आहे?

१० आज फक्‍त यहोवाचे साक्षीदारच यहोवाचं नाव जाहीर करतात का? पुरावा काय दाखवतो त्याकडे लक्ष द्या. देवाला एक नाव आहे ही गोष्ट लोकांपासून लपवण्याचा आज अनेक धर्मपुढाऱ्‍यांनी होता होईल तितका प्रयत्न केला आहे. बायबलच्या भाषांतरांतून त्यांनी देवाचं नाव काढून टाकलं आहे आणि काहींनी तर त्याचा वापर करण्यावर बंदीही घातली आहे. * पण यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काय? आज फक्‍त यहोवाचे साक्षीदारच देवाच्या नावाचा वापर करून त्याचा गौरव करत आहेत ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. आणि इतर कोणत्याही ख्रिस्ती गटापेक्षा जास्त आपण हे नाव इतरांना जाहीर करतो. असं करून आपण खऱ्‍या अर्थाने यहोवाचे साक्षीदार असल्याचं दाखवतो. (यश. ४३:१०-१२) आजपर्यंत आपण पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  याच्या २४ कोटींपेक्षा जास्त प्रती छापल्या आहेत. बायबलच्या या भाषांतराची एक खास गोष्ट ही आहे, की इतर भांषातरांनी ज्या-ज्या वचनांतून देवाचं नाव गाळून टाकलं आहे, त्या प्रत्येक वचनात या भाषांतरामध्ये देवाचं नाव आहे. याशिवाय, आपण एक हजारपेक्षा जास्त भाषांमध्ये प्रकाशनं छापली आहेत. या प्रकाशनांमध्ये यहोवाच्या नावाचा सर्रासपणे उपयोग करण्यात आला आहे.

आपण सत्यावर प्रेम करतो

११. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी सत्यावर प्रेम असल्याचं कसं दाखवलं?

११ येशूला देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दलचं सत्य माहीत होतं आणि त्यावर त्याचं प्रेम होतं. तो ज्या प्रकारे जीवन जगला त्यावरून दिसून आलं, की त्या सत्यावर त्याचा खूप विश्‍वास होता. आणि त्याने इतरांनाही त्याबद्दल सांगितलं. (योहा. १८:३७) येशूच्या शिष्यांचंही सत्यावर मनापासून प्रेम होतं. (योहा. ४:२३, २४) सत्यावर त्यांचं इतकं प्रेम होतं, की प्रेषित पेत्रने खऱ्‍या ख्रिस्ती धर्माविषयी म्हटलं की तो ‘सत्याचा मार्ग’ आहे. (२ पेत्र २:२) या प्रेमामुळेच पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी, सत्याच्या विरोधात असलेल्या सगळ्या धार्मिक कल्पनांचा, रूढी-परंपरांचा आणि मानवी मतांचा विरोध केला. (कलस्सै. २:८) आज खरे ख्रिस्तीसुद्धा ज्या गोष्टी मानतात आणि ज्या प्रकारे जीवन जगतात ते पूर्णपणे देवाच्या वचनानुसार असतं. असं करून ते सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.—३ योहा. ३, ४.

१२. एखाद्या गोष्टीबद्दल असलेली आपली समज बदलण्याची गरज आहे असं नियमन मंडळाला वाटतं तेव्हा ते काय करतात, आणि ते हा बदल का करतात?

१२ यहोवाचे साक्षीदार असा दावा करत नाहीत, की त्यांच्याकडे बायबलचं संपूर्ण ज्ञान आहे. बायबलमधली एखादी शिकवण समजावण्याच्या बाबतीत आणि संघटना चालवण्याच्या बाबतीत काही वेळा त्यांच्याकडून चुका झाल्या. पण या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटायची गरज नाही. कारण बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, की देवाचं अचूक ज्ञान हे काळानुसार वाढत जातं. (कलस्सै. १:९, १०) ‘दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखं’ देव हळूहळू सत्य प्रकट करतो. त्यामुळे आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. (नीति. ४:१८) नियमन मंडळाला जेव्हा जाणवतं, की एखाद्या गोष्टीबद्दल आपली जी समज होती किंवा एखादी गोष्ट आपण ज्या पद्धतीने करत होतो, त्यामध्ये बदल करायची गरज आहे, तेव्हा ते लगेच तो बदल करतात. आज अनेक चर्चसुद्धा आपल्या शिकवणींमध्ये बदल करतात. पण हे बदल, ते आपल्या सदस्यांना खूश करण्यासाठी किंवा जगातल्या बदलत्या विचारसरणीशी जुळवून घेण्यासाठी करतात. यहोवाचे साक्षीदार मात्र देवासोबत आणखी जवळचं नातं जोडण्यासाठी आणि येशूने शिकवलेल्या पद्धतीने उपासना करण्यासाठी आपल्या शिकवणीत बदल करतात. (याको. ४:४) आपण हे बदल, जगातल्या लोकांच्या बदलत्या विचारसरणीनुसार नाही, तर शास्त्रवचनं आणखी चांगल्या प्रकारे समजल्यामुळे करतो. कारण सत्यावर आपलं प्रेम आहे.—१ थेस्सलनी. २:३, ४.

आपण एकमेकांवर जिवापाड प्रेम करतो

१३. खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता आहे, आणि आज यहोवाच्या साक्षीदारांमध्ये तो कसा दिसून येतो?

१३ पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांमध्ये अनेक चांगले गुण होते. पण त्यांपैकी प्रेम हा सगळ्यात उठून दिसणारा गुण होता. येशूने म्हटलं होतं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३४, ३५) आज जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांमध्ये खरं प्रेम आणि एकता दिसून येते. आपण इतर सर्व ख्रिस्ती गटांपेक्षा फार वेगळे आहोत. कारण आपण वेगवेगळ्या देशांतले आणि संस्कृतीतले असलो, तरी आपण एका कुटुंबासारखे आहोत. आपल्यातलं हे खरं प्रेम आपल्या सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये दिसून येतं. यावरून आपल्याला आणखी खातरी मिळते, की आपण ज्या प्रकारे देवाची उपासना करतो ती त्याला मान्य आहे.

१४. कलस्सैकर ३:१२-१४ यात सांगितल्याप्रमाणे आपण एकमेकांवर जिवापाड प्रेम असल्याचं कसं दाखवतो?

१४ बायबल आपल्याला असं प्रोत्साहन देतं, की “एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा.” (१ पेत्र ४:८) आपण हे कसं करतो? एकमेकांचं सहन करून आणि एकमेकांना मोठ्या मनाने माफ करून. तसंच, मंडळीतल्या सगळ्यांना अगदी ज्यांनी आपलं मन दुखावलं आहे अशांनासुद्धा उदारता आणि पाहुणचार दाखवून आपण एकमेकांवर मनापासून प्रेम करतो. (कलस्सैकर ३:१२-१४ वाचा.) अशा प्रकारे आपण एकमेकांवर जिवापाड प्रेम करतो तेव्हा हेच दिसून येतं, की आपण खरे ख्रिस्ती आहोत.

“एकच विश्‍वास”

१५. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांमध्ये आणि आज आपल्यामध्ये आणखी कोणत्या बाबतींत सारखेपणा आहे?

१५ पहिल्या शतकातली ख्रिस्ती मंडळी ज्या प्रकारे देवाची उपासना करायची, त्याच प्रकारे आज आपण करतो हे इतरही काही गोष्टींवरून दिसून येतं. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात प्रेषितांनी जी व्यवस्था घालून दिली होती, तशीच व्यवस्था आज आपल्यामध्ये दिसून येते. पहिल्या शतकाप्रमाणेच आज आपल्यातसुद्धा प्रवासी पर्यवेक्षक, ख्रिस्ती वडील आणि सहायक सेवक आहेत. (फिलिप्पै. १:१; तीत १:५) तसंच, लैंगिक संबंध आणि विवाह, रक्‍ताचा वापर आणि मंडळीच्या संरक्षणासाठी पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या व्यक्‍तीला बहिष्कृत करण्याची व्यवस्था या गोष्टींच्या बाबतीत पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा जो दृष्टिकोन होता तोच आपलासुद्धा आहे.—प्रे. कार्यं १५:२८, २९; १ करिंथ. ५:११-१३; ६:९, १०; इब्री १३:४.

१६. इफिसकर ४:४-६ या वचनातून आपल्याला काय समजतं?

१६ येशूने म्हटलं होतं, की त्याचे शिष्य असल्याचा दावा करणारे सगळेच जण खऱ्‍या अर्थाने त्याचे शिष्य असतील असं नाही. (मत्त. ७:२१-२३) शिवाय, बायबलमध्ये आधीच हे सांगितलं होतं, की शेवटच्या दिवसांत अनेक जण ‘देवाची भक्‍ती करायचा फक्‍त दिखावा करतील.’ (२ तीम. ३:१, ५) पण बायबलमध्ये असंही स्पष्टपणे सांगितलं आहे, की देवाला मान्य असलेला विश्‍वास “एकच” आहे.—इफिसकर ४:४-६ वाचा.

१७. आज एकच खरा विश्‍वास कोणामध्ये दिसून येतो?

१७ मग देवाला मान्य असलेला एकच खरा विश्‍वास आज कोणामध्ये दिसून येतो? याचे काही पुरावे या लेखात आपण पाहिले. आपण पाहिलं, की येशूने उपासना करायची एक पद्धत आपल्याला घालून दिली होती. आणि पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी त्या पद्धतीने कशी उपासना केली तेही आपण पाहिलं. मग आज या पद्धतीने कोण उपासना करत आहे? याचं एकच उत्तर आहे—यहोवाचे साक्षीदार! यहोवाचे लोक असल्याचा खूप मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे. आपल्याला यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल शिकायला मिळालं, हासुद्धा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. त्यामुळे आपण जे मानतो तेच सत्य आहे याची आपण पक्की खातरी बाळगू शकतो!

गीत २३ यहोवा आमचे बळ!

^ परि. 5 या लेखात आपण पाहणार आहोत, की येशूने आणि पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे देवाची उपासना केली. आज यहोवाचे साक्षीदारसुद्धा त्याच प्रकारे यहोवाची उपासना कशी करतात, याचे काही पुरावे आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 9 १ जानेवारी २०११ टेहळणी बुरूज अंकातल्या पृष्ठ १८ वर दिलेली “पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी देवाच्या नावाचा वापर केला का?” ही चौकट पाहा.

^ परि. 10 उदाहरणार्थ, २००८ मध्ये पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी असा आदेश दिला की, कॅथालिक धर्म-विधींमध्ये, गीतांमध्ये किंवा प्रार्थनांमध्ये देवाच्या नावाचा “वापर किंवा उच्चारसुद्धा केला जाऊ नये.”

^ परि. 63 चित्राचं वर्णन: लोकांना स्वतःच्या भाषेत बायबल वाचता यावं म्हणून यहोवाच्या संघटनेने आज २०० पेक्षा जास्त भाषांमध्ये नवे जग भाषांतर  हे बायबल प्रकाशित केलं आहे. या बायबलमध्ये देवाचं नाव वापरण्यात आलं आहे.