व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४०

खरा पश्‍चात्ताप म्हणजे काय?

खरा पश्‍चात्ताप म्हणजे काय?

‘मी पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलोय.’—लूक ५:३२.

गीत ५२ मनाचे रक्षण करा

सारांश *

१-२. अहाब आणि मनश्‍शे यांच्यात काय फरक होता, आणि आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

तर चला सर्वात आधी आपण बायबल काळातल्या दोन राजांची उदाहरणं पाहू. एक इस्राएलच्या दहा वंशांनी बनलेल्या राज्यावर राज्य करत होता, तर दुसरा यहूदाच्या दोन वंशांनी बनलेल्या राज्यावर राज्य करत होता. हे दोन्ही राजे जरी वेगवेगळ्या काळातले असले, तरी त्यांच्यामध्ये बऱ्‍याच बाबतीत सारखेपणा होता. दोघंही यहोवाच्या विरोधात गेले आणि त्यांनी लोकांना वाईट कामं करायला लावली. दोघांनीही खोट्या देवांची उपासना केली आणि निरपराध लोकांचं रक्‍त सांडलं. पण एका गोष्टीच्या बाबतीत त्यांच्यात फरक होता. एक शेवटपर्यंत वाईट कामं करत राहिला, तर दुसऱ्‍याने वाईट कामं सोडून पश्‍चात्ताप केला आणि देवाने त्याला माफ केलं. कोण होते हे दोन राजे?

एक होता इस्राएलचा राजा अहाब आणि दुसरा होता यहूदाचा राजा मनश्‍शे. त्यांच्यात जो फरक होता त्यातून पश्‍चात्तापाच्या बाबतीत आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. (प्रे. कार्यं १७:३०; रोम. ३:२३) पण पश्‍चात्ताप म्हणजे काय? आणि आपण तो कसा दाखवू शकतो? आपण जेव्हा पाप करतो तेव्हा यहोवाने आपल्याला माफ करावं अशी जर आपली इच्छा असेल, तर या दोन प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी या दोन राजांच्या जीवनाबद्दल आपण थोडसं पाहू या आणि त्यांतून काय शिकायला मिळतं ते बघू या. त्यानंतर पश्‍चात्तापाबद्दल येशूने काय शिकवलं ते आपण पाहू या.

अहाब राजाच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

३. अहाब राजा कसा होता?

अहाब इस्राएलचा सातवा राजा होता. त्याने सीदोनच्या राजाची मुलगी ईजबेल हिच्याशी लग्न केलं होतं. सीदोन हे उत्तरेचं एक श्रीमंत राष्ट्र होतं. त्यामुळे इस्राएल राष्ट्रालासुद्धा बरीच संपत्ती मिळाली असेल. पण त्यामुळे इस्राएली लोकांचं यहोवाशी असलेलं नातं आणखीनच बिघडलं. कारण ईजबेल बआल दैवताची उपासक होती. या उपासनेत वेश्‍येची कामं चालायची आणि लहान मुलांचा बळी दिला जायचा. आणि तिने अहाब राजाला अशा प्रकारची घाणेरडी उपासना इस्राएलमध्ये पसरवायला लावली. ईजबेलच्या हातात जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत यहोवाच्या प्रत्येक संदेष्ट्याच्या जिवाला धोका होता. कारण तिने बऱ्‍याच संदेष्ट्यांना ठार केलं होतं. (१ राजे १८:१३) आणि अहाबबद्दल काय? तो तर यहोवाच्या नजरेत, “त्याच्याआधी होऊन गेलेल्या सगळ्यांपेक्षा जास्त दुष्ट होता.” (१ राजे १६:३०) पण अहाब आणि ईजबेल यांनी जे काही केलं ते यहोवाच्या नजरेतून सुटलं नाही. तो सगळं काही पाहत होता. त्याला आपल्या लोकांची दया आली. म्हणून त्याने एलीया संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवलं. आणि त्यांना चुकीची कामं सोडून द्यायला सांगितलं. पण अहाब आणि ईजबेलने एलीयाचं ऐकलं नाही.

४. यहोवाने अहाब राजाला कोणती शिक्षा सुनावली, आणि याचा त्याच्यावर काय परिणाम झाला?

शेवटी, यहोवाची सहनशक्‍ती संपली. त्याने एलीयाद्वारे अहाब आणि ईजबेलला शिक्षा सुनावली. त्यांच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल असं यहोवाने त्यांना सांगितलं. एलीयाचे हे शब्द ऐकून अहाब राजाला धक्काच बसला. आणि आश्‍चर्य म्हणजे, हा उद्धट राजा “नम्र झाला.”—१ राजे २१:१९-२९.

अहाब राजाने यहोवाच्या संदेष्ट्याला तुरुंगात टाकलं, त्यावरून दिसून आलं की त्याला खरा पश्‍चात्ताप झाला नव्हता (परिच्छेद ५-६ पाहा) *

५-६. अहाबने खरा पश्‍चात्ताप दाखवला नाही हे कशावरून दिसून येतं?

सुरुवातीला अहाब राजा जरी नम्र झाला तरी नंतरच्या त्याच्या वागण्यावरून असं दिसून येतं, की त्याने खरा पश्‍चात्ताप दाखवला नव्हता. कारण त्याने त्याच्या राज्यातून बआल उपासना काढून टाकण्याचा प्रयत्न केला नाही आणि लोकांना यहोवाच्या उपासनेकडे वळवलं नाही. याशिवाय, त्याने अशाही काही गोष्टी केल्या ज्यांवरून दिसून आलं, की त्याला जरासुद्धा पश्‍चात्ताप नव्हता. जसं की, त्याने यहूदाचा राजा यहोशाफाट याला सीरियाविरुद्ध युद्ध करायला आपल्यासोबत बोलावलं. यहोशाफाट एक चांगला राजा होता आणि यहोवावर त्याचा पूर्ण भरवसा होता. त्यामुळे त्याने असं सुचवलं, की युद्धावर जाण्याआधी आपण यहोवाच्या एका संदेष्ट्याचा सल्ला घेऊ या.

पण अहाबला ही कल्पना मुळीच आवडली नाही. तो म्हणाला, “इथे आणखी एक माणूस आहे; . . . आपण त्याच्याकडूनही यहोवाचा सल्ला घेऊ शकतो, पण मला तो अजिबात आवडत नाही. कारण माझ्या बाबतीत तो कधीच चांगला संदेश देत नाही, नेहमी वाईटच देतो.” अहाबने जरी असं म्हटलं तरी त्यांनी मीखाया संदेष्ट्याचा सल्ला घेतला. पण अहाबने म्हटलं होतं तसंच झालं. मीखायाने अहाबला जो संदेश दिला तो वाईटच होता. तो ऐकून खरंतर दुष्ट राजा अहाबने पश्‍चात्ताप करून यहोवाकडे माफी मागायला पाहिजे होती. पण त्याने असं काहीच केलं नाही. उलट, त्याने त्या संदेष्ट्याला तुरुंगात टाकलं. (१ राजे २२:७-९, २३, २७) पण मीखायाने सांगितलेली भविष्यवाणी मात्र पूर्ण झाली. कारण त्यानंतर जे युद्ध झालं त्यामध्ये अहाब राजा मारला गेला.—१ राजे २२:३४-३८.

७. अहाब राजाबद्दल यहोवा कसा विचार करत होता?

अहाब राजाविषयी यहोवा कसा विचार करत होता हे त्याने त्याच्या मृत्यूनंतर दाखवून दिलं. यहोशाफाट राजा जेव्हा युद्धावरून सुखरूप घरी आला तेव्हा यहोवाने येहू संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठवलं आणि त्याची कानउघडणी केली. कारण तो अहाब राजासोबत युद्धावर गेला होता. येहू त्याला म्हणाला, दुष्टाला  मदत करणं आणि यहोवाचा द्वेष करणाऱ्‍यांवर  प्रेम करणं तुला योग्य वाटतं का?” (२ इति. १९:१, २) विचार करा, अहाब राजाने जर खरा पश्‍चात्ताप दाखवला असता तर येहू संदेष्ट्याने “यहोवाचा द्वेष” करणारा दुष्ट माणूस असं त्याच्याबद्दल म्हटलं असतं का? तर हे स्पष्टपणे दिसून येतं, की अहाब राजाला काही प्रमाणात पस्तावा झाला होता, पण त्याने खरा किंवा मनापासून पश्‍चात्ताप केला नाही.

८. अहाबच्या उदाहरणातून आपल्याला पश्‍चात्तापाबद्दल कोणता धडा शिकायला मिळतो?

अहाबच्या उदाहरणातून आपण कोणता धडा शिकतो? एलीयाने जेव्हा अहाबला सांगितलं, की त्याच्या घराण्याचा नाश होईल तेव्हा तो सुरुवातीला नम्र झाला. ही एक चांगली गोष्ट होती. पण नंतर त्याच्या कामांवरून दिसून आलं, की त्याला मनापासून पश्‍चात्ताप झाला नव्हता. त्यामुळे पश्‍चात्ताप करणं म्हणजे केलेल्या चुकीबद्दल वाईट वाटणं किंवा “मी चुकलो,” असं नुसतं म्हणणं पुरेसं नाही. तर खरा पश्‍चात्ताप काय असतो हे समजण्यासाठी चला आता आणखी एक उदाहरण पाहू या.

मनश्‍शे राजाच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?

९. मनश्‍शे राजा कसा होता?

पुढे जवळपास २०० वर्षांनी मनश्‍शे यहूदाचा राजा बनला. तो अहाबपेक्षा वाईट होता असं म्हणता येईल. कारण बायबल म्हणतं, “त्याने फार मोठ्या प्रमाणात यहोवाच्या नजेरत जे वाईट ते केलं आणि त्याचा क्रोध भडकवला.” (२ इति. ३३:१-९) त्याने खोट्या दैवतांसाठी वेदी बांधल्या. इतकंच नाही, तर त्याने एक पूजेचा खांब, म्हणजे कोरीव मूर्ती बनवली. ही कदाचित प्रजनन देवतेची मूर्ती असावी. आणि त्याने ही मूर्ती यहोवाच्या पवित्र मंदिरात ठेवली. यासोबतच त्याने जादूटोणा केला, शकुन पाहिले आणि भूतविद्येची कामं केली. तसंच, त्याने “खूप मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचं रक्‍तही सांडलं.” इतकंच नाही, तर त्याने खोट्या दैवतांना अर्पण करण्यासाठी “आपल्या स्वतःच्या मुलांचा अग्नीत होम केला.”—२ राजे. २१:६, ७, १०, ११, १६.

१०. यहोवाने मनश्‍शेला कशा प्रकारे ताडन दिलं, आणि त्याचा काय परिणाम झाला?

१० यहोवा मनश्‍शे राजालासुद्धा आपल्या संदेष्ट्यांद्वारे ताकीद देत राहिला. पण अहाबसारखंच मनश्‍शेनेसुद्धा आपलं मन कठोर केलं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी, “यहोवाने अश्‍शूरच्या राजांच्या सेनाधिकाऱ्‍यांना [यहूदावर] हल्ला करायला लावलं. त्यांनी मनश्‍शेला आकड्यांनी पकडलं आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला नेलं.” एक कैदी म्हणून परक्या देशात असताना आपण केलेल्या वाईट कामांवर त्याने खोलवर विचार केला असावा. तो यहोवासमोर, म्हणजे “त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर फार नम्र बनला”. इतकंच नाही, तर त्याने त्याच्याकडे “दयेची भीक मागितली” आणि तो त्याला “प्रार्थना करत  राहिला.” यावरून दिसून येतं, की मनश्‍शेमध्ये बदल होऊ लागला होता.—२ इति. ३३:१०-१३.

मनश्‍शे राजाने देशातून खोटी उपासना काढून टाकली, त्यावरून दिसून आलं की त्याला खरंच पश्‍चात्ताप झाला होता (परिच्छेद ११ पाहा) *

११. २ इतिहास ३३:१५, १६ मध्ये सांगितल्यानुसार मनश्‍शेने खरा पश्‍चात्ताप कसा दाखवला?

११ काही काळानंतर यहोवाने मनश्‍शेची प्रार्थना ऐकली. कारण त्याच्या प्रार्थनांवरून यहोवाने पाहिलं, की त्याचं मन बदललं आहे. मनश्‍शेने जेव्हा त्याच्याकडे दयेची भीक मागितली तेव्हा यहोवाने त्याला माफ केलं आणि त्याचं राज्यपद त्याला परत दिलं. राज्यपद परत मिळाल्यावर मनश्‍शेनेसुद्धा हे दाखवून दिलं, की त्याला मनापासून पश्‍चात्ताप झाला होता. अहाबने जे केलं नव्हतं ते त्याने केलं. त्याने आपला चुकीचा मार्ग बदलला. देशातून खोटी उपासना काढून टाकण्यासाठी आणि लोकांना खऱ्‍या उपासनेकडे आणण्यासाठी त्याने पावलं उचलली. (२ इतिहास ३३:१५, १६ वाचा.) हे करण्यासाठी त्याला धैर्याची आणि विश्‍वासाची खूप गरज होती. कारण कित्येक वर्षं त्याने वाईट कामं केली होती आणि आपल्या कुटुंबासमोर, दरबारातल्या लोकांसमोर आणि प्रजेसमोर त्याचं वाईट उदाहरण होतं. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याने आपल्या काही चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि याचाच त्याचा नातू योशिया याच्यावर चांगला परिणाम झाला असावा. कारण तो नंतर एक खूप चांगला राजा बनला.—२ राजे २२:१, २.

१२. मनश्‍शेच्या उदाहरणातून आपण पश्‍चात्तापाबद्दल काय शिकतो?

१२ मनश्‍शेच्या उदाहरणातून आपण काय शिकतो? तो यहोवासमोर फक्‍त नम्र झाला नाही, तर त्याने आणखी बरंच काही केलं. त्याने यहोवाकडे प्रार्थना केली. त्याच्याकडे दयेची भीक मागितली. आपला चुकीचा मार्ग सोडून दिला आणि केलेल्या चुका सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केला. तो पुन्हा यहोवाची उपासना करू लागला आणि इतरांनाही तीच गोष्ट करायला त्याने मदत केली. ज्यांनी आपल्या जीवनात फार वाईट कामं केली आहेत त्यांना मनश्‍शेच्या उदाहरणातून खूप मदत होऊ शकते. कारण त्याच्या उदाहरणातून हे दिसून येतं, की यहोवा किती “चांगला आणि क्षमाशील” आहे! (स्तो. ८६:५) जे खरा पश्‍तात्ताप करतात त्यांना तो नक्की क्षमा करेल.

१३. पश्‍चात्ताप दाखवण्यासाठी नुसतं वाईट वाटणं पुरेसं नाही हे उदाहरण देऊन सांगा.

१३ खरा पश्‍चात्ताप दाखवण्यासाठी नुसतं वाईट वाटणंच पुरेसं नाही. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. समजा, तुम्ही एका मिठाईच्या दुकानात गेला आहात. आणि दुकानदाराला तुम्ही गुलाबजाम मागितले. पण दुकानदाराने गुलाबजामच्या ऐवजी तुम्हाला फक्‍त साखर दिली. तर चालेल का? मुळीच नाही. दुकानदाराने तुम्हाला कितीही सांगितलं, की गुलाबजाम बनवण्यासाठी साखर खूप महत्त्वाचं साहित्य आहे तरी तुम्हाला ते चालणार नाही. तसंच, आपल्या चुकांबद्दल पस्तावा होणं किंवा वाईट वाटणं ही एक चांगली गोष्ट आहे. कारण पश्‍चात्ताप दाखवण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. पण तितकंच पुरेसं नाही. तर त्यासाठी आपण मनापासून पश्‍चात्ताप करावा असं यहोवाला वाटतं. याचा काय अर्थ होतो हे समजण्यासाठी आता येशूने सांगितलेल्या उधळ्या पुत्राचं उदाहरण पाहू या.

खरा पश्‍चात्ताप कसा ओळखता येईल?

उधळा पुत्र भानावर आला तेव्हा तो लांबचा प्रवास करून आपल्या घरी परत आला (परिच्छेद १४-१५ पाहा) *

१४. येशूने सांगितलेल्या गोष्टीतल्या उधळ्या पुत्राला पस्तावा झाला हे कशावरून दिसून येतं?

१४ लूक १५:११-३२ मध्ये येशूने सांगितलेली उधळ्या पुत्राची एक सुंदर गोष्ट वाचायला मिळते. एक तरूण मुलगा वडिलांकडून आपल्या वाटणीची मालमत्ता घेतो आणि घर सोडून एका दूरदेशी निघून जातो. तिथं अनैतिक जीवन जगण्यात आणि ऐशआरामात तो आपली सगळी मालमत्ता उधळून टाकतो. पण त्याच्यावर वाईट परिस्थिती येते तेव्हा आपण जे काही केलं त्यावर तो खोलवर विचार करू लागतो. आणि आपल्या वडिलांच्या घरी आपण किती सुखात राहायचो हे त्याला आठवतं. येशूने म्हटल्याप्रमाणे आता तो भानावर येतो. तो ठरवतो की आपण पुन्हा घरी जाऊ आणि आपल्या वडिलांची माफी मागू. त्याला जाणीव होते की आपण चुकलो. आणि ही जाणीव खूप महत्त्वाची होती. पण तेवढंच पुरेसं होतं का? नाही. त्याने त्याप्रमाणे वागणंसुद्धा महत्त्वाचं होतं.

१५. उधळ्या पुत्राला खरंच पश्‍चात्ताप झाला होता हे त्याने कसं दाखवलं?

१५ त्या उधळ्या पुत्राने जे काही केलं होतं, त्याबद्दल त्याने मनापासून पश्‍चात्ताप दाखवला. तो लांबचा प्रवास करून परत आपल्या घरी आला. आणि आपल्या वडिलांना भेटल्यावर त्यांना म्हणाला, “बाबा, मी देवाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केलंय. तुमचा मुलगा म्हणवून घ्यायची आता माझी लायकी राहिली नाही.” (लूक १५:२१) त्याच्या या शब्दांवरून दिसून येतं, की त्याला यहोवासोबत तुटलेलं आपलं नातं पुन्हा जोडायचं होतं. त्याला हेसुद्धा जाणवलं, की त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्या वडिलांना किती दुःख झालं होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत परत एक चांगलं नातं जोडण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. त्यांच्यासाठी तो अगदी मजूर म्हणून काम करायलाही तयार होता. (लूक १५:१९) बायबलमध्ये सांगितलेली ही फक्‍त एक सुंदर गोष्ट नाही. तर त्यातून मंडळीतल्या वडिलांना बरंच काही शिकता येतं. एखाद्या गंभीर पाप केलेल्या व्यक्‍तीला खरंच पश्‍चात्ताप आहे की नाही हे ओळखायला वडिलांना यामुळे खूप मदत होऊ शकते.

१६. एखाद्याला खरंच पश्‍चात्ताप झाला आहे की नाही हे ओळखणं वडिलांसाठी कठीण का असू शकतं?

१६ गंभीर पाप केलेल्या व्यक्‍तीला खरंच पश्‍चात्ताप आहे का हे ओळखणं खरंतर वडिलांसाठी खूप कठीण आहे. कारण एखाद्याच्या मनात काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे त्या व्यक्‍तीच्या वागण्या-बोलण्यावरून त्यांना जे काही दिसतं, त्यावरूनच त्यांना हे ओळखावं लागतं, की त्या व्यक्‍तीला खरंच पस्तावा आहे की नाही. काही वेळा एखाद्या व्यक्‍तीने केलेली चूक इतक्या गंभीर स्वरूपाची असेल, की तिला खरंच पश्‍चात्ताप झाला आहे असं कदाचित वडिलांना लगेच वाटणार नाही.

१७. (क) पश्‍चात्तापासाठी फक्‍त वाईट वाटणंच पुरेसं नाही हे दाखवून देणारं एक उदाहरण सांगा. (ख) २ करिंथकर ७:११ या वचनानुसार खरा पश्‍चात्ताप दाखवण्यासाठी एका व्यक्‍तीने काय केलं पाहिजे?

१७ एका उदाहरणाचा विचार करा. समजा एका बांधवाचे बरीच वर्षं विवाहबाह्‍य संबंध आहेत. आणि त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीपासून, मित्रांपासून आणि मंडळीतल्या वडिलांपासून लपवून ठेवली आहे. पण नंतर ती गोष्ट उघड होते. वडील जेव्हा त्याला सांगतात, की त्यांच्याकडे याचे पुरावे आहेत तेव्हा तो आपली चूक मान्य करतो. आणि असं दिसतं की त्याला या गोष्टीबद्दल खूप पस्तावा आहे. मग याचा अर्थ असा होतो का, की त्याला खरंच पश्‍चात्ताप झाला आहे? त्याला खरंच पश्‍चात्ताप झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी वडिलांनी आणखीही काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. कारण चुकीचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या हातून एकदाच घडलेलं हे पाप नाही. तर बऱ्‍याच काळापासून तो हे पाप करत आला आहे. शिवाय, त्याचं हे पाप त्याने स्वतः कबूल केलं नाही, तर ते उघड करण्यात आलं. त्यामुळे वडिलांना हे बघावं लागेल, की त्याने त्याच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि वागण्यामध्ये खरंच बदल केले आहेत की नाहीत. (२ करिंथकर ७:११ वाचा.) आणि हे बदल करण्यासाठी त्याला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे त्याच्यात योग्य ते बदल दिसून येईपर्यंत त्याला मंडळीतून काही काळासाठी बहिष्कृत केलं जाऊ शकतं.—१ करिंथ. ५:११-१३; ६:९, १०.

१८. बहिष्कृत झालेली व्यक्‍ती खरा पश्‍चात्ताप कसा दाखवू शकते, आणि त्यामुळे काय होऊ शकतं?

१८ बहिष्कृत व्यक्‍तीला जर खरंच पश्‍चात्ताप झाला असेल तर ती सभांना नियमितपणे येईल. वडिलांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे ती नियमितपणे प्रार्थना आणि बायबल अभ्यास करेल. आणि ज्या गोष्टींमुळे तिच्या हातून ते पाप घडलं त्या गोष्टींपासून ती दूर राहायचा प्रयत्न करेल. देवासोबत आपलं नातं पुन्हा जोडण्यासाठी तिने जर मनापासून प्रयत्न केला, तर ती या गोष्टीची खातरी बाळगू शकते, की यहोवा तिला क्षमा करेल. आणि वडील त्या व्यक्‍तीला पुन्हा मंडळीत येण्यासाठी मदत करतील. एखाद्याला खरंच पश्‍चात्ताप झाला आहे की नाही हे पाहताना मंडळीतले वडील हे लक्षात ठेवतात की प्रत्येक प्रकरण वेगळं असतं. त्यामुळे ते निर्णय घ्यायची घाई करत नाहीत. तर ते प्रत्येक प्रकरणाचं बारकाईने परीक्षण करतात आणि मगच निर्णय घेतात.

१९. खरा पश्‍चात्ताप म्हणजे काय? (यहेज्केल ३३:१४-१६)

१९ आपण हे पाहिलं, की खरा पश्‍चात्ताप म्हणजे गंभीर पाप केल्यानंतर “मी चुकलो,” असं नुसतं म्हणणं किंवा वाईट वाटणंच पुरेसं नाही. तर पाप केलेल्या व्यक्‍तीने आपल्या विचारांमध्ये आणि वागण्या-बोलण्यामध्ये मनापासून बदल केला पाहिजे. तिने आपला वाईट मार्ग सोडून दिला पाहिजे. आणि यहोवाच्या तत्त्वांनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (यहेज्केल ३३:१४-१६ वाचा.) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तिने यहोवासोबत पुन्हा चांगलं नातं जोडलं पाहिजे.

पश्‍चात्ताप करायला मदत करा

२०-२१. गंभीर पाप केलेल्या व्यक्‍तीला आपण कशी मदत करू शकतो?

२० येशूने आपल्या सेवाकार्याचा एक महत्त्वाचा उद्देश काय आहे हे सांगताना म्हटलं, ‘मी पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलोय.’ (लूक ५:३२) तोच उद्देश आपलासुद्धा असला पाहिजे. समजा आपल्या एखाद्या जवळच्या मित्राने एक गंभीर पाप केलं आणि ते आपल्याला समजलं तर आपण काय करणार?

२१ आपण जर त्याचं पाप झाकायचा प्रयत्न केला तर आपण खरंतर त्याचं नुकसानच करत असू. आपण ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी कधी ना कधी ते उघड होईलच. कारण यहोवा सगळं काही पाहतो. (नीति. ५:२१, २२; २८:१३) तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकता, की वडिलांना सांगितल्यामुळे त्याला खूप मदत होऊ शकते. पण त्याने जर ती गोष्ट वडिलांना सांगितली नाही, तर तुम्ही ती वडिलांच्या लक्षात आणून दिली पाहिजे. असं करून तुम्ही दाखवाल, की तुम्हाला खरंच त्याला मदत करायची इच्छा आहे. असं करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर त्याने वडिलांची मदत घेतली नाही आणि पश्‍चत्ताप केला नाही, तर यहोवासोबतची त्याची मैत्री तुटू शकते.

२२. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२२ एखाद्या व्यक्‍तीने जर खूप मोठं पाप केलं असेल आणि बऱ्‍याच काळापासून ती ते करत आली असेल, तर वडील कदाचित तिला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतील. मग याचा अर्थ असा होतो का, की त्यांनी त्याला दया दाखवली नाही. पुढच्या लेखात आपण हे पाहणार आहोत, की यहोवा शिस्त लावतानाही दयाळूपणा कसा दाखवतो आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो.

गीत ४२ “दुर्बळांना साहाय्य करावे”

^ परि. 5 खरा पश्‍चात्ताप म्हणजे, “सॉरी मी चुकलो,” असं नुसतं म्हणणं पुरेसं नाही. तर खरा पश्‍चात्ताप काय असतो हे समजण्यासाठी या लेखात आपण तीन उदाहरणं पाहू या. अहाब राजाचं, मनश्‍शे राजाचं आणि येशूने दिलेल्या उधळ्या पुत्राचं. तसंच, गंभीर पाप केलेल्या एका व्यक्‍तीला खरा पश्‍चात्ताप आहे की नाही हे पाहण्यासाठी वडिलांनी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत याबद्दलसुद्धा या लेखात चर्चा केली जाईल.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: अहाब राजा रागात येऊन आपल्या रक्षकांना असा हुकूम देतो, की त्यांनी यहोवाच्या संदेष्ट्याला, मीखायाला तुरुंगात टाकावं.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: मनश्‍शे राजाने यहोवाच्या मंदिरात अनेक मूर्ती उभ्या केल्या होत्या. त्या तोडून टाकायला तो आपल्या माणसांना सांगत आहे.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: लांबचा खडतर प्रवास केल्यामुळे उधळा पुत्र फार दमून गेला आहे. शेवटी दुरून त्याला आपलं घर दिसतं तेव्हा त्याला खूप हायसं वाटतं.