व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवासोबत तुटलेली मैत्री पुन्हा जोडा

यहोवासोबत तुटलेली मैत्री पुन्हा जोडा

दरवर्षी, यहोवापासून दूर गेलेली त्याची कित्येक मेंढरं पुन्हा त्याच्याकडे येतात. जेव्हा असं एखादं मेंढरू परत येतं, तेव्हा स्वर्गात किती “आनंद” होत असेल याचा विचार करा! (लूक १५:७, १०) अशा मेंढरांपैकी तुम्ही एक असाल, तर ख्रिस्ती मंडळीत परत येण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेतली ती पाहून येशूला, स्वर्गदूतांना आणि यहोवाला नक्कीच खूप आनंद झाला असेल. पण यहोवासोबत पुन्हा मैत्रीचं नातं जोडताना तुमच्यासमोर काही अडचणी येऊ शकतात. त्या काय आहेत? आणि त्यांचा सामना तुम्ही कसा करू शकता?

कोणत्या अडचणी येऊ शकतात?

ख्रिस्ती मंडळीत परत आल्यानंतरही अनेकांच्या मनात दोषीपणाच्या किंवा निराशेच्या भावना असतात. दावीद राजालासुद्धा असंच वाटलं होतं. यहोवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे हे माहीत असूनही त्याने म्हटलं: “माझ्या चुकांनी मला घेरलंय.” (स्तो. ४०:१२; ६५:३) यहोवाकडे परत आल्यावरही एखाद्याच्या मनात अपराधीपणाची भावना असू शकते किंवा त्याला स्वतःची लाज वाटू शकते. एलिझाबेथचाच * विचार करा. जवळपास २० वर्षं ती बहिष्कृत होती. ती म्हणते: “मला असं वाटत होतं, की यहोवा मला कधीच माफ करणार नाही.” पण तुम्ही जर असं निराश झालात, तर तुमचा विश्‍वास आणखी कमजोर होईल. (नीति. २४:१०) म्हणून असं कधीच होऊ देऊ नका.

यहोवासोबत पुन्हा जवळची मैत्री करण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागेल, आणि ते करणं कदाचित आपल्याला जमणार नाही असं काहींना वाटतं. ॲन्थनीला मंडळीत परत घेण्यात आलं, तेव्हा त्याला कसं वाटत होतं त्याबद्दल तो म्हणतो: “साक्षीदार असताना मी जे काही शिकलो होतो किंवा करत होतो त्यातलं बरंच काही मी विसरून गेलो असं मला वाटत होतं.” ॲन्थनीसारखंच काहींना अशा भावनेमुळे आध्यात्मिक गोष्टींमध्ये पूर्णपणे सहभाग घ्यायला संकोच वाटू शकतो.

हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. एखाद्याने खूप हौसेने आपलं घर बांधलं असेल. पण एका मोठ्या वादळामुळे त्या घराची खूप पडझड होते. आणि ते पुन्हा उभं करण्यासाठी आपल्याला किती वेळ आणि परिश्रम घ्यावे लागतील याचा विचार करून त्याला दडपण येतं. अगदी तसंच, एखादं गंभीर पाप केल्यामुळे यहोवासोबतची तुमची मैत्री तुटली, तर ती पुन्हा जोडण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल असं तुम्हाला वाटू शकतं. पण त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. कारण यहोवा तुम्हाला मदत करू शकतो.

यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.” (यश. १:१८) यहोवासोबत चांगलं नातं जोडण्यासाठी तुम्ही आधीच खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही त्याच्याकडे परत आला आहात हे पाहून त्याला खूप आनंद होतो. कारण तुमचं उदाहरण देऊन तो सैतानाला सडेतोड उत्तर देऊ शकतो.—नीति. २७:११.

यहोवाकडे परत येऊन तुम्ही त्याच्या जवळ आला आहात. आणि तोसुद्धा तुमच्या जवळ यायचं वचन देतो. (याको. ४:८) तुम्ही मंडळीत परत आला आहात हे इतरांना समजणं ही एक चांगली गोष्ट आहे. पण तेवढंच पुरेसं नाही. तर यहोवावरचं तुमचं प्रेम तुम्ही वाढवत राहिलं पाहिजे. कारण तो तुमचा पिता आणि मित्र आहे. मग तुम्हाला हे प्रेम कसं वाढवता येईल?

पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा

तुम्ही यहोवाबद्दल आणि त्याच्या सुंदर नवीन जगाबद्दल पूर्वी जे काही शिकला होता ते तुमच्या चांगलं लक्षात असेल. कारण या बायबलच्या मूलभूत शिकवणी आहेत. पण यहोवासोबत पुन्हा जवळचं नातं जोडण्यासाठी तुम्ही पूर्वी ज्या गोष्टी करत होता त्या तुम्हाला परत सुरू कराव्या लागतील. जसं की, प्रचार करणं, सभांना हजर राहणं आणि भाऊबहिणींसोबत वेळ घालवणं. त्यासाठी तुम्ही छोट्याछोट्या गोष्टी करू शकता. तुम्ही अशी ध्येयं ठेवू शकता:

नेहमी यहोवाशी बोला:  स्वर्गातल्या तुमच्या पित्याला, यहोवाला हे माहीत आहे, की तुम्ही केलेल्या चुकीमुळे तुमचं मन जर तुम्हाला सतत खात राहिलं, तर प्रार्थना करणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. (रोम. ८:२६) पण असं असलं, तरी यहोवाला “प्रार्थना करत राहा,” आणि तुम्हाला त्याच्यासोबत पुन्हा मैत्री करायची किती इच्छा आहे हे त्याला सांगा. (रोम. १२:१२) या बाबतीत ॲन्ड्रू काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “मला आठवतं, त्या वेळी माझं मन मला सतत दोष देत होतं. मला स्वतःची खूप लाज वाटत होती. पण प्रत्येक वेळी प्रार्थना केल्यावर मला फार बरं वाटायचं. माझं मन खूप शांत व्हायचं.” पण प्रार्थनेत काय म्हणायचं हे जर तुम्हाला सुचत नसेल, तर स्तोत्र ५१ आणि ६५ मध्ये दिलेल्या प्रार्थनांवर विचार करा. या प्रार्थना दावीद राजाने त्याला पश्‍चात्ताप झाल्यावर केल्या होत्या.

बायबलचा नियमितपणे अभ्यास करा:  यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल आणि यहोवावरचं तुमचं प्रेम वाढेल. (स्तो. १९:७-११) फिलिप म्हणतो: “मी रोज बायबल वाचत नव्हतो आणि नियमितपणे बायबलचा अभ्यास करत नव्हतो. त्यामुळेच खरंतर माझा विश्‍वास कमजोर झाला आणि मी यहोवाचं मन दुखावलं.” तो पुढे म्हणतो: “मला पुन्हा ती चूक करायची नव्हती. म्हणून मी रोज बायबल वाचायचं आणि नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करायचं ठरवलं.” तुम्हीसुद्धा हेच करू शकता. पण वैयक्‍तिक अभ्यास करण्यासाठी कोणते विषय निवडायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर काय? अशा वेळी यहोवासोबत चांगलं नातं असलेल्या एखाद्या भावाची किंवा बहिणीची तुम्ही मदत घेऊ शकता.

मंडळीतल्या भाऊबहिणींशी पुन्हा मैत्री करा.  मंडळीत परत येणाऱ्‍या काहींना अशी चिंता असते, की भाऊबहीण आपल्याबद्दल काय विचार करतील. लीसा म्हणते: “मला खूप लाज वाटत होती. मी माझ्या भाऊबहिणींचं मन फार दुखावलं, त्यांना निराश केलं असं मला वाटत होतं. आणि खूप दिवस मला असंच वाटत राहिलं.” पण हे नेहमी लक्षात असू द्या, की तुम्हाला यहोवासोबत पुन्हा जवळचं नातं जोडता यावं म्हणून मंडळीतल्या वडिलांना आणि इतरांना तुम्हाला मदत करायची खूप इच्छा आहे. (“ मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात?” ही चौकट पाहा) तुम्ही परत आलात याचा त्यांना खूप आनंद होतो आणि तुम्हीही आनंदी असावं असं त्यांना वाटतं.—नीति. १७:१७.

मंडळीतल्या भाऊबहिणींशी पुन्हा जवळची मैत्री करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी त्यांच्यासोबत सर्व सभांना हजर राहा आणि त्यांच्यासोबत मिळून प्रचार कार्य करा. त्यामुळे कशी मदत होईल? फेलिक्स म्हणतो: “मी कधी यहोवाकडे परत येतो याची मंडळी आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे भाऊबहिणींचं माझ्यावर अजूनही किती प्रेम आहे हे मला जाणवलं. मला पुन्हा मंडळीचा भाग असल्यासारखं वाटलं. यहोवाने मला क्षमा केली आहे आणि त्यामुळे मी परत शुद्ध मनाने त्याची सेवा करू शकतो हे मला समजलं.” (“ तुम्ही काय करू शकता?” ही चौकट पाहा)

हार मानू नका!

तुम्ही यहोवासोबत पुन्हा जवळची मैत्री जोडायचा प्रयत्न करता तेव्हा सैतान शांत बसणार नाही. तो सतत तुमच्यासमोर कोणत्या ना कोणत्या समस्या आणेल. (लूक ४:१३) म्हणून आत्तापासूनच यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करत राहा.

आपल्या मेंढरांविषयी यहोवा असं वचन देतो: “मी हरवलेल्या मेंढराला शोधून काढीन आणि भरकटलेल्या मेंढराला परत घेऊन येईन. मी जखमी झालेल्या मेंढराची मलमपट्टी करीन आणि कमजोराला बळ देईन.” (यहे. ३४:१६) यहोवाने अनेकांना त्याच्यासोबत पुन्हा एकदा जवळची मैत्री जोडायला मदत केली आहे. त्यामुळे तो तुम्हालाही त्याच्यासोबत जवळची मैत्री करायला मदत करेल याची खातरी बाळगा.

^ परि. 4 या लेखातली नावं बदलण्यात आली आहेत.