व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४३

हिंमत हारू नका!

हिंमत हारू नका!

“आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये.”—गलती. ६:९.

गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

सारांश *

१. यहोवाचे साक्षीदार असल्याचा आपल्याला आनंद आणि अभिमान का वाटतो?

आपण यहोवाचे साक्षीदार आहोत याचा आपल्याला खूप अभिमान आहे! साक्षीदार असल्यामुळेच आपण त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगतो. आणि “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्यांना सत्यात यायला जेव्हा आपण मदत करतो, तेव्हा आपल्यालाही येशूसारखाच खूप आनंद होतो. येशूच्या शिष्यांनी जेव्हा प्रचारकार्यात त्यांना किती चांगले अनुभव आले हे त्याला सांगितलं, तेव्हा “त्याला खूप आनंद झाला” होता.—प्रे. कार्यं १३:४८; लूक १०:१, १७, २१.

२. प्रचाराचं काम आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, हे आपण कसं दाखवून देऊ शकतो?

आपण प्रचाराच्या कामाला खूप महत्त्व देतो. पौलने तीमथ्यलाही असा सल्ला दिला, की “स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असं केल्याने तू स्वतःला आणि जे तुझं ऐकतात त्यांनाही वाचवशील.” (१ तीम. ४:१६) यावरून कळतं, की प्रचाराचं काम हे स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याचं काम आहे. देवाच्या राज्याचे नागरिक असल्यामुळे आपण स्वतःकडे सतत लक्ष देत असतो. त्यासाठी आनंदाच्या संदेशाला शोभेल आणि यहोवाची स्तुती होईल, असं आपण वागतो. (फिलिप्पै. १:२७) तसंच, आपण आपल्या ‘शिक्षणाकडेही सतत लक्ष’ देत असतो. त्यासाठी आपण प्रचारकार्याची चांगली तयारी करतो आणि आपल्या कामावर देवाचा आशीर्वाद राहावा म्हणून त्याला प्रार्थनाही करतो.

३. सगळेच लोक आनंदाच्या संदेशाला प्रतिसाद देतात का? उदाहरण द्या.

प्रचारकार्यात आपल्या परीने होईल तितकं आपण करायचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा कधीकधी लोक आपल्या कामाला खूपच कमी प्रतिसाद देतात किंवा अजिबातच देत नाहीत. जेऑर्ग लिंडल या बांधवाचाच अनुभव लक्षात घ्या. त्यांनी १९२९ पासून १९४७ पर्यंत आइसलँडच्या वेगवेगळ्या भागांत एकट्यानेच प्रचारकार्य केलं. या काळात त्यांनी हजारो प्रकाशनं लोकांनी दिली. पण एकही जण सत्यात आला नाही. ते म्हणतात: “काही जण विरोध करत होते असं वाटलं आणि बहुतेकांना सत्याबद्दल मुळात आवडच नव्हती.” त्यानंतर गिलियड प्रशिक्षण मिळालेल्या बऱ्‍याच भाऊबहिणींनीही तिथं बरीच वर्षं प्रचाराचं काम केलं. पण लोकांनी त्यांचंही फारसं ऐकलं नाही. शेवटी ९ वर्षांनंतर तिथल्या काही लोकांनी आवड दाखवून बाप्तिस्मा घेतला. *

४. प्रचारकार्यात जेव्हा आनंदाच्या संदेशाला लोक प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा आपल्याला कसं वाटू शकतं?

प्रचारकार्यात लोक आपला संदेश ऐकत नाहीत किंवा आपला बायबल विद्यार्थी प्रगती करत नाही, तेव्हा आपण खूप निराश होतो. आपल्यालाही प्रेषित पौलसारखं वाटू शकतं. बहुतेक यहुद्यांनी येशूच मसीहा आहे हे जेव्हा नाकारलं, तेव्हा पौल “खूप दुःखी” झाला आणि त्याच्या मनाला जणू “सतत वेदना होत आहेत” असं त्याला वाटलं. (रोम. ९:१-३) समजा तुमचा एक बायबल विद्यार्थी आहे. त्याने प्रगती करावी म्हणून तुम्ही त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेता, त्याच्यासाठी यहोवाला प्रार्थनासुद्धा करता. पण तो प्रगती करत नाही. त्यामुळे तुम्हाला तो बायबल अभ्यास बंद करावा लागत असेल तर काय? किंवा तुम्ही कधी बाप्तिस्म्यापर्यंत पोचायला कोणालाही मदत करू शकला नसाल तर काय? मग याचा अर्थ असा होता का, की तुम्हीच कुठंतरी कमी पडत आहात आणि तुमच्या सेवाकार्यावर यहोवाचा आशीर्वाद नाही? हे समजून घेण्यासाठी या लेखात आपण दोन प्रश्‍नांची उत्तरं पाहणार आहोत: (१) प्रचारकार्यात आपण यशस्वी आहोत हे कोणत्या गोष्टींवरून ठरतं? (२) प्रचार करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो?

प्रचारकार्यात आपण यशस्वी आहोत हे कोणत्या गोष्टींवरून ठरतं

५. यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो त्याचा परिणाम नेहमी आपल्याला पाहिजे तसाच का होत नाही?

देवाच्या इच्छेनुसार जो काम करतो, त्याबद्दल बायबल असं म्हणतं, की “तो जे काही करतो त्यात त्याला यश मिळतं.” (स्तो. १:३) पण याचा अर्थ असा होत नाही, की यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्याला पाहिजे तसाच होईल. कारण आपण अपरिपूर्ण आहोत आणि एका दुष्ट जगात जगत आहोत. त्यामुळे आपल्यावर अचानक समस्या येऊ शकतात. आणि यहोवाच्या सेवेत आपल्याला जे करायचं आहे ते करता येत नाही. (ईयो. १४:१) तसंच, काही वेळा विरोधकांमुळेसुद्धा यहोवाच्या सेवेत आपल्याला हवं तितकं करता येत नाही. (१ करिंथ. १६:९; १ थेस्सलनी. २:१८) मग आपण सेवाकार्यात कितपत यशस्वी आहोत, हे यहोवा कोणत्या गोष्टींवरून ठरवतो? हे समजण्यासाठी आता आपण बायबलची काही तत्त्वं लक्षात घेऊ या.

आपण लोकांशी प्रत्यक्ष बोलून, पत्र लिहून किंवा फोनवर बोलून प्रचार करण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा यहोवा त्याची कदर करतो (परिच्छेद ६ पाहा)

६. प्रचारकार्यात आपण कितपत यशस्वी आहोत, हे यहोवा कशावरून ठरवतो?

हार न मानता आपण प्रचाराचं काम किती मेहनतीने करतो हे यहोवा पाहतो.  लोक आपलं ऐकोत किंवा न एकोत, आपण जेव्हा प्रचाराचं काम मेहनतीने आणि यहोवावरच्या प्रेमामुळे करत राहतो, तेव्हा आपलं काम त्याच्या नजरेत यशस्वी ठरतं. पौलने म्हटलं: “तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम  आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम  विसरून जायला देव अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) म्हणून आपण घेत असलेल्या मेहनतीचा जरी चांगला परिणाम दिसून आला नाही, तरी आपण घेतलेल्या परिश्रमांना आणि दाखवत असलेल्या प्रेमाला यहोवा लक्षात ठेवतो. तसंच, प्रेषित पौलने करिंथकरांना जे म्हटलं होतं तेही आपण लक्षात ठेवू शकतो. त्याने म्हटलं: “प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत  कधीही वाया जाणार नाही.”—१ करिंथ. १५:५८.

७. प्रेषित पौलने त्याच्या प्रचारकार्याबद्दल जे म्हटलं, त्यातून आपण काय शिकतो?

प्रेषित पौलने खूप आवेशाने मिशनरी सेवा केली. त्याने अनेक शहरांमध्ये ख्रिस्ती मंडळ्या स्थापन केल्या. पण काही लोकांनी जेव्हा त्याची टीका केली आणि तो चांगला शिक्षक नाही असं म्हटलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की ‘मी कित्येक लोकांना ख्रिस्ती बनवलंय!’ उलट तो म्हणाला, की ‘मी जास्त मेहनत केली आहे.’ (२ करिंथ. ११:२३) तेव्हा प्रेषित पौलसारखं आपणही हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण हार न मानता किती मेहनत करतो हे यहोवासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.

८. प्रचारकार्याच्या बाबतीत आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

आपल्या प्रचारकार्यामुळे यहोवाला आनंद होतो.  येशूने एकदा आपल्या ७० शिष्यांना राज्याचा प्रचार करायला पाठवलं. आणि बायबल म्हणतं, की तिथून ते “आनंदाने परत आले.” ते इतके आनंदी का होते? याबद्दल शिष्य येशूला म्हणाले: “प्रभू, तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूतसुद्धा आमच्या अधीन होतात.” पण येशूने त्यांचा चुकीचा दृष्टिकोन सुधारला. तो त्यांना म्हणाला: “दुष्ट स्वर्गदूत तुमच्या अधीन करण्यात आले आहेत यामुळे आनंदी होऊ नका. तर, स्वर्गात तुमची नावं लिहिण्यात आली आहेत यामुळे आनंदी व्हा.” (लूक १०:१७-२०) येशूला माहीत होतं, की त्याच्या शिष्यांना प्रचारकार्यात नेहमीच असे चांगले अनुभव येणार नाहीत. शिवाय, त्या दिवशी ज्यांनी शिष्यांचं ऐकलं होतं, त्यांपैकी शेवटी किती जण शिष्य बनले हे आपल्याला माहीत नाही. येशूच्या शिष्यांना हे समजणं गरजेचं होतं, की लोक आपल्या संदेशाला चांगला प्रतिसाद देतात तेव्हा आपल्याला आनंद तर होतोच. पण आपण घेत असलेल्या मेहनतीमुळे यहोवा खूश आहे या जाणिवेमुळे आपल्याला सगळ्यात जास्त आनंद झाला पाहिजे.

९. गलतीकर ६:७-९ या वचनानुसार आपण प्रचारकार्यात मेहनत घेत राहतो तेव्हा काय होतं?

आपण हार न मानता प्रचारकार्य करत राहिलो तर आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.  जेव्हा आपण मनापासून राज्याचं बी पेरायचा आणि त्याची मशागत करायचा प्रयत्न करतो, तेव्हा देवाच्या पवित्र शक्‍तीला आपण आपल्या जीवनात कार्य करू देतो. त्यामुळे एका अर्थाने आपण ‘पवित्र शक्‍तीसाठीच पेरणी’ करत असतो. म्हणून आपण जरी एखाद्या व्यक्‍तीला बाप्तिस्मा घ्यायला मदत करू शकलो नाही, तरी आपण खचून जाऊ नये. उलट, हिंमत न हारता आपण प्रचारकार्य करत राहिलं पाहिजे. आपण जर असं केलं तर यहोवा वचन देतो, की तो आपल्याला सर्वकाळाचं जीवन देईल.—गलतीकर ६:७-९ वाचा.

प्रचार करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो?

१०. प्रचारकार्यातला लोकांचा प्रतिसाद कशावर अवलंबून असतो?

१० लोकांचा प्रतिसाद हा मुळात त्यांच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतो.  ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी येशूने बी पेरणाऱ्‍याचं उदाहरण दिलं होतं. या उदाहरणात शेतकरी बी पेरायला जातो. आणि पेरणी करताना त्याचं बी वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवर पडतं. पण फक्‍त चांगल्या जमिनीवर पडलेल्या बियांनाच अंकुर फुटतात. (लूक ८:५-८) या उदाहरणात बी हे ‘देवाच्या वचनाला’ सूचित करतं. तर वेगवेगळ्या प्रकारची जमीन ही लोकांच्या मनोवृत्तीला सूचित करते. (लूक ८:११-१५) जसं पेरलेलं बी वाढेल की नाही हे शेतकऱ्‍याच्या हातात नसतं, तसंच सेवाकार्यात आपण घेत असलेल्या मेहनतीचं आपल्याला चांगलं फळ मिळेल की नाही हे आपल्या हातात नसतं. कारण लोक कसा प्रतिसाद देतील हे त्यांच्या मनावृत्तीवर अवलंबून असतं. त्यामुळे राज्याचं बी पेरायचं काम आपण करत राहिलं पाहिजे. कारण, आपल्याला प्रचारकार्यात किती चांगले परिणाम  मिळतात यावरून आपल्याला प्रतिफळ मिळणार नाही. तर प्रेषित पौलने सांगितल्यानुसार, “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे  प्रतिफळ” मिळणार आहे.—१ करिंथ. ३:८.

नोहाने अनेक वर्षं प्रामाणिकपणे लोकांना प्रचार केला. पण त्याच्या कुटुंबाशिवाय कोणीही त्याच्यासोबत जहाजात गेलं नाही. नोहाने मात्र यहोवाचं ऐकलं आणि दिलेलं काम पूर्ण केलं. (परिच्छेद ११ पाहा)

११. लोकांनी नोहाचं ऐकलं नाही, तरी यहोवा त्याच्यावर खूश का होता? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

११ प्राचीन काळापासून यहोवाच्या कित्येक सेवकांनी प्रचारकार्य केलं. पण लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. नोहाचंच उदाहरण घ्या. तो “नीतिमत्त्वाचा प्रचारक होता.” आणि त्याने अनेक वर्षं प्रचारकार्य केलं. (२ पेत्र २:५) लोक आपलं ऐकतील आणि आपल्याला प्रतिसाद देतील असं नोहाला नक्कीच वाटलं असेल. पण यहोवाने त्याला तसं काहीच सांगितलं नव्हतं. उलट, देवाने त्याला जहाज बांधताना फक्‍त एवढंच सांगितलं होतं, की “तू जहाजात जा आणि आपल्यासोबत आपली मुलं, बायको आणि आपल्या सुनांनाही घेऊन जा.” (उत्प. ६:१८) आणि ज्या आकाराचं जहाज यहोवाने त्याला बांधायला सांगितलं होतं, त्यावरून नोहाला हे कळलंच असेल की लोकांनी जरी आपल्याला प्रतिसाद दिला तरी तो खूप कमी असेल. (उत्प. ६:१५) आणि आपल्याला माहीतच आहे, त्या दुष्ट जगातल्या एकाही व्यक्‍तीने नोहाचं ऐकलं नाही. (उत्प. ७:७) मग यहोवाने असा विचार केला का, की नोहाने चांगल्या प्रकारे प्रचार केला नव्हता? नाही! उलट यहोवा त्याच्यावर खूश होता, कारण यहोवाने जे काम त्याला सांगितलं ते त्याने प्रामाणिकपणे पूर्ण केलं होतं.—उत्प. ६:२२.

१२. कोणत्या गोष्टींमुळे यिर्मया विरोध होत असतानाही आनंदाने प्रचार करत राहू शकला?

१२ यिर्मया संदेष्ट्यानेसुद्धा ४० पेक्षा जास्त वर्षं संदेश सांगितला. पण लोकांनी त्याचं ऐकलं नाही. उलट त्याचा विरोध केला. लोकांनी त्याचा इतका “अपमान आणि थट्टा” केली की तो निराश झाला आणि स्वतःला म्हणाला, की ‘मी यापुढे संदेश सांगणार नाही.’ (यिर्म. २०:८, ९) पण यिर्मयाने हार मानली नाही! मग कोणत्या गोष्टीने त्याला निराशेवर मात करायला आणि आनंदाने प्रचार करायला मदत केली? त्याने दोन गोष्टी लक्षात ठेवल्या. पहिली म्हणजे, तो जो संदेश सांगत होता तो ‘चांगल्या भविष्याबद्दल आणि आशेबद्दल’ होता. (यिर्म. २९:११) दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवाने त्याला आपल्या वतीने संदेश सांगण्यासाठी निवडलं होतं. (यिर्म. १५:१६) आपणही निराशेने भरलेल्या या जगात आशेचा संदेश देतो. आणि आपण यहोवाचे साक्षीदार म्हणून त्याच्या नावाने ओळखले जातो. जेव्हा आपण या दोन गोष्टी लक्षात ठेवतो, तेव्हा आपल्यालाही आनंदाने प्रचार करत राहायला मदत होईल; मग लोकांचा प्रतिसाद कसाही असला तरी!

१३. मार्क ४:२६-२९ मध्ये येशूने दिलेल्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१३ एखाद्याला प्रगती करायला वेळ लागू शकतो.  येशूने ही गोष्ट आणखी एका उदाहरणात स्पष्ट केली. (मार्क ४:२६-२९ वाचा.) त्याने एका शेतकऱ्‍याचं उदाहरण दिलं आणि सांगितलं, की एक शेतकरी बी पेरतो. मग काही दिवसांनंतर ते बी अंकुरतं आणि हळूहळू वाढतं. पण हे नेमकं कसं घडतं हे त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे सुरवातीला तुम्हालासुद्धा विद्यार्थ्याची प्रगती लगेच दिसून येणार नाही. कारण विद्यार्थी हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने प्रगती करत असतो. जसं शेतकरी पीक भराभर वाढावं म्हणून काही करू शकत नाही. तसं आपणही विद्यार्थ्याला भरभर प्रगती करायची जबरदस्ती करू शकत नाही. म्हणून जर विद्यार्थ्याला प्रगती करायला वेळ लागत असेल, तर निराश होऊन हार मानू नका. कारण शेतकऱ्‍याप्रमाणेच आपल्यालाही शिष्य बनवण्याच्या कामात धीराने वाट पाहायची गरज आहे.—याको. ५:७, ८.

१४. आपल्या प्रचारकार्याचा परिणाम दिसायला वेळ लागू शकतो, हे एका उदाहरणातून कसं कळतं?

१४ काही क्षेत्रांमध्ये आपल्या प्रचारकार्याचा परिणाम खूप वर्षांनंतर दिसून येतो. कॅनडामधल्या क्यूबेक या छोट्याशा शहराचंच उदाहरण घ्या. १९५९ मध्ये ग्लॅडीस आणि रुबी ॲलन या सख्ख्या बहिणींना क्यूबेकमध्ये पायनियर म्हणून पाठवलं होतं. * समाजातल्या लोकांच्या दबावामुळे आणि कॅथलिक चर्चच्या प्रभावामुळे सुरवातीला त्यांचं कोणीच ऐकत नव्हतं. ग्लॅडीस म्हणते, की “पहिली दोन वर्षं आम्ही दररोज आठ-आठ तास घरोघरचं प्रचारकार्य करत होतो. पण लोकांनी काहीच ऐकून घेतलं नाही. लोक दारावर यायचे आणि आम्हाला पाहून पुन्हा आत निघून जायचे. पण आम्ही हार मानली नाही.” नंतर लोकांची मनं हळूहळू बदलू लागली आणि लोक त्यांचं ऐकून घेऊ लागले. आता या छोट्याशा शहरातच तीन मंडळ्या आहेत.—यश. ६०:२२.

१५. १ करींथकर ३:६, ७ या वचनात शिष्य बनवण्याच्या कामाबद्दल काय सांगितलं आहे?

१५ सगळ्यांच्या मदतीनेच एक व्यक्‍ती सत्यात येते.  एखाद्याला सत्यात आणण्यासाठी मंडळीतला प्रत्येक जण हातभार लावत असतो. (१ करींथकर ३:६, ७ वाचा.) उदाहरणार्थ, एक प्रचारक आवड दाखवलेल्या व्यक्‍तीला एखादी पत्रिका किंवा मासिक देतो. पण या प्रचारकाला जाणवतं, की त्याला त्याच्या कामामुळे त्या व्यक्‍तीला पुन्हा भेटता येणार नाही. म्हणून तो एका दुसऱ्‍या प्रचारकाला त्या व्यक्‍तीला भेटायला सांगतो. मग तो दुसरा प्रचारक त्याला भेटतो आणि पुढे बायबल अभ्यास सुरू होतो. दर वेळी हा प्रचारक बायबल अभ्यासासाठी वेगवेगळ्या भाऊबहिणींना घेऊन जातो. आणि प्रत्येक जण त्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देतो. एका अर्थाने प्रत्येक जण त्या विद्यार्थ्याच्या मनात रुजलेलं सत्याचं बी वाढण्यासाठी त्याला पाणी घालतो. अशा प्रकारे, तो विद्यार्थी जेव्हा बाप्तिस्मा घेतो तेव्हा येशूने म्हटल्याप्रमाणे पेरणी करणारा आणि कापणी करणारा, दोघांनाही आनंद होतो.—योहा. ४:३५-३८.

१६. प्रचारकार्यात पूर्वीइतकं करता येत नसलं तरी तुम्ही आनंदी राहू शकता, असं का म्हणता येईल?

१६ तब्येत ठीक नसल्यामुळे किंवा वय झाल्यामुळे आता पूर्वीइतका प्रचारकार्यात तुम्हाला सहभाग घेता येत नसला तर काय? तरीसुद्धा कापणीच्या कामात तुम्ही जे काही करू शकता त्यातून तुम्हाला आनंद मिळू शकतो. दावीद राजाच्या आयुष्यातला तो प्रसंग आठवा, जेव्हा त्याने आणि त्याच्या माणसांनी आपल्या बायका-मुलांना अमालेकी लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि लुटलेली मालमत्ता परत मिळवली. त्या वेळी दावीदची २०० माणसं खूप थकल्यामुळे लढायला जाऊ शकली नाहीत. त्यामुळे ती सामानाजवळच थांबून राहिली. पण लढाई जिंकून आल्यानंतर दावीदने आपल्या लोकांना लुटीतून आणलेल्या गोष्टी, जे लढायला गेले होते आणि जे सामानाजवळ थांबले होते त्या सर्वांना सारख्याच वाटून घ्यायला सांगितल्या. (१ शमु. ३०:२१-२५) यातून आपण हेच शिकतो, की शिष्य बनवण्याच्या कामात आपल्याला जितकं जमतं तितकं आपण करत राहिलं पाहिजे. मग, कोणाचा बाप्तिस्मा होतो तेव्हा आपल्यालाही त्या आनंदात सामील होता येईल.

१७. कोणत्या गोष्टींमुळे आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत?

१७ यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो त्याकडे यहोवा ज्या पद्धतीने पाहतो त्याबद्दल आपण खरंच त्याचे आभार मानले पाहिजेत. आपण लोकांना सत्यात यायची जबरदस्ती करू शकत नाही, हे त्याला माहीत आहे. पण त्याच्यावर आपलं किती प्रेम आहे आणि प्रचारकार्यात आपण किती मेहनत घेतो, हे तो पाहतो. आणि त्यानुसार तो आपल्याला आशीर्वाद देतो. जगभरात चाललेल्या कापणीच्या कामातून आनंद कसा मिळवता येईल, हे तो आपल्याला शिकवतो. (योहा. १४:१२) तेव्हा आपण हिंमत न हारता प्रचारकार्य करत राहिलो, तर यहोवा आपल्याला आशीर्वाद देत राहील, याची पक्की खातरी आपण बाळगू शकतो!

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

^ परि. 5 लोक आपला संदेश ऐकतात आणि बायबल अभ्यास करायला तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण तुमचा बायबल विद्यार्थी जर प्रगती करत नसेल तर काय? किंवा, तुम्ही कोणाला बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करायला मदत करू शकला नाही तर काय? मग याचा अर्थ, शिष्य बनवण्याच्या कामात तुम्हीच कुठेतरी कमी पडला आहात असा होतो का? या लेखात आपण पाहणार आहोत, की लोकांचा प्रतिसाद कसाही असला, तरी सेवाकार्यात आपण यशस्वी होऊ शकतो आणि हे काम आनंदाने करत राहू शकतो.

^ परि. 14 सप्टेंबर १, २००२ च्या टेहळणी बुरूज  अंकात ग्लॅडीस ॲलन यांची जीवन कथा, “मी तीळमात्रही बदल कशात करणार नाही!” या लेखात दिली आहे.