व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४१

खरा आनंद कसा मिळवता येईल?

खरा आनंद कसा मिळवता येईल?

“जो कोणी यहोवाची भीती बाळगतो, जो त्याच्या मार्गांनी चालतो, तो सुखी आहे!”​—स्तो. १२८:१.

गीत १४ सर्व काही नवे झाले!

सारांश *

१. देवाच्या मार्गदर्शनाची भूक म्हणजे काय? आणि खरा आनंद त्यावर कशा प्रकारे अवलंबून आहे?

 खरा आनंद फक्‍त आनंदी असल्याची भावना नाही, जी येते आणि जाते. तर खरा आनंद एक व्यक्‍ती आयुष्यभर अनुभवू शकते. कसं बरं? डोंगरावरच्या प्रवचनात येशूने म्हटलं होतं: “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.” (मत्त. ५:३) येशूला हे माहीत होतं की मानवांमध्ये आपल्या निर्माणकर्त्याला, म्हणजे यहोवा देवाला जाणून घेण्याची आणि त्याची उपासना करण्याची तीव्र इच्छा आहे. यालाच येशू “देवाच्या मार्गदर्शनाची भूक” असं म्हणत होता. आणि यहोवा एक ‘आनंदी देव’ असल्यामुळे जे त्याची उपासना करतात तेसुद्धा आनंदी राहू शकतात.​—१ तीम. १:११.

“नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत.”​—मत्त. ५:१० (परिच्छेद २-३ पाहा) *

२-३. (क) आपण कोणकोणत्या परिस्थितीत आनंदी राहू शकतो? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत आणि हे का गरजेचं आहे?

जीवनात आनंदी राहायचं असेल तर आपली परिस्थिती चांगली असणं गरजेचं आहे का? नाही. येशूने डोंगरावरच्या प्रवचनात एक आश्‍चर्यकारक गोष्ट सांगितली. त्याने म्हटलं, “जे शोक करतात ते सुखी आहेत.” म्हणजे एखादी व्यक्‍ती दोषीपणाच्या भावनेने दबून गेलेली असो किंवा जीवनात कठीण परिस्थितीला तोंड देत असो, ती सुखी राहू शकते असं येशूला म्हणायचं होतं. तसंच “नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झालाय” आणि येशूचे अनुयायी असल्यामुळे ज्यांचा “अपमान” होतो त्यांच्याबद्दलही येशूने असंच म्हटलं. (मत्त. ५:४, १०, ११) पण मग अशा परिस्थितीत खऱ्‍या अर्थाने आनंदी राहणं कसं शक्य आहे?

येशू आपल्याला हेच शिकवत होता, की खरा आनंद मिळवणं हे चांगल्या परिस्थितीमुळे नाही तर देवाच्या मार्गदर्शनासाठी आपली भूक भागवल्यामुळे आणि देवासोबत एक जवळचं नातं जोडल्यामुळे शक्य आहे. (याको. ४:८) मग आपल्याला या गोष्टी कशा करता येतील? या लेखात आपण अशा तीन गोष्टींबद्दल पाहू या ज्यामुळे आपल्याला खऱ्‍या अर्थाने आनंदी राहता येईल?

आध्यात्मिक अन्‍न घेत राहा

४. खरा आनंद मिळण्यासाठी आपण सर्वात पहिली गोष्ट कोणती केली पाहिजे? (स्तोत्र १:१-३)

पहिली गोष्ट: खऱ्‍या अर्थाने आनंदी राहायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक अन्‍न घ्यावं लागेल.  जिवंत राहण्यासाठी माणसांना आणि प्राण्यांना दोघांनाही शारीरिक  अन्‍नाची गरज असते. पण आध्यात्मिक  अन्‍न फक्‍त माणसंच घेऊ शकतात, आणि आपल्याला खरंच त्याची गरज आहे. म्हणूनच येशूने म्हटलं होतं: “माणसाने फक्‍त भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगलं पाहिजे.” (मत्त. ४:४) त्यामुळे दररोज न चुकता आपण देवाच्या मौल्यवान वचनातून म्हणजे बायबलमधून आध्यात्मिक अन्‍न घेत राहिलं पाहिजे. स्तोत्रकर्त्याने म्हटलं: ‘सुखी आहे तो माणूस, जो यहोवाच्या नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो, आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो.’​—स्तोत्र १:१-३ वाचा.

५-६. (क) बायबलमधून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायला मिळतात? (ख) बायबलचं वाचन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी आवश्‍यक माहिती यहोवाने बायबलमध्ये प्रेमळपणे दिली आहे. आपल्याला जीवन देण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. त्याच्यासोबत एक जवळचं नातं आपण कसं जोडू शकतो आणि आपल्या पापांची क्षमा मिळण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलही त्यात सांगितलंय. तसंच भविष्याबद्दल त्याने आपल्याला जी सुंदर आशा दिली आहे त्याबद्दलही आपल्याला शिकायला मिळतं. (यिर्म. २९:११) बायबलचा अभ्यास केल्यामुळे ही सत्यं जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपलं मन आनंदाने भरून जातं.

आपल्याला माहीत आहे की दररोजच्या जीवनासाठी लागणारे बरेच व्यावहारिक सल्ले बायबलमध्ये आहेत. या सल्ल्यांचं पालन केल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. म्हणूनच जेव्हा आपण जीवनातल्या समस्यांमुळे निराश होतो, तेव्हा बायबल वाचून त्यावर मनन करण्यासाठी आपण थोडा जास्त वेळ काढला पाहिजे. येशूने म्हटलं होतं: “जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”​—लूक ११:२८.

७. बायबलचं वाचन करत असताना त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

बायबल वाचत असताना तुम्ही जे वाचता त्याचा आस्वाद घ्या. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का, की कोणीतरी तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवलाय, पण तुम्ही खूपच घाईत असल्यामुळे किंवा दुसऱ्‍या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करत असल्यामुळे तुम्ही तो घाईघाईत संपवला. आणि मग खाऊन झाल्यानंतर तुम्हाला वाटलं, की तो पदार्थ हळूहळू मजा घेत खाल्ला असता तर किती बरं झालं असतं! बायबल वाचत असतानासुद्धा काही वेळा असंच होऊ शकतं. कधीकधी आपण बायबल इतकं भरभर वाचतो, की त्यातल्या संदेशाचा आस्वादच आपल्याला घेता येत नाही. पण असं न करता आपण देवाचं वचन वाचण्यासाठी वेळ काढला पाहिजे, त्यातल्या दृश्‍यांना डोळ्यासमोर उभं केलं पाहिजे, कल्पनाशक्‍तीचा वापर करून त्यातल्या लोकांचा आवाज ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जे वाचतो त्यावर विचार केला पाहिजे. असं केल्यामुळे बायबल वाचताना तुम्हाला खरंच खूप आनंद मिळेल.

८. ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास’ आपली जबाबदारी कशा प्रकारे पूर्ण पाडत आहे? (तळटीपसुद्धा पाहा.)

येशूने ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ योग्य वेळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी नेमलंय. आणि त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न मिळतं. * (मत्त. २४:४५) आणि हा विश्‍वासू दास आपल्याला जे काही पुरवतो ते सगळं काही बायबलवर आधारित असतं. (१ थेस्सलनी. २:१३) त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल यहोवाचे विचार काय आहेत ते समजून घ्यायला आपल्याला मदत होते. म्हणूनच टेहळणी बुरूज, सावध राहा!  आणि jw.org/mr वेबसाईटवर प्रकाशित झालेले लेख आपण वाचले पाहिजेत. तसंच आपण आठवड्यादरम्यान आणि आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभांची तयारी केली पाहिजे. आणि दर महिन्याला येणारा JW ब्रॉडकास्टिंग कार्यक्रम पाहिला पाहिजे. जर आपण असं केलं तर खरा आनंद मिळवण्यासाठी जी दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे तीसुद्धा करायला आपल्याला मदत होईल.

यहोवाच्या स्तरांनुसार जगा

९. खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कोणती दुसरी गोष्ट करणं गरजेचं आहे?

दुसरी गोष्ट: खऱ्‍या अर्थाने आनंदी राहायचं असेल तर आपण यहोवाच्या स्तरांनुसार जगलं पाहिजे.  स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “जो कोणी यहोवाची भीती बाळगतो, जो त्याच्या मार्गांनी चालतो, तो सुखी आहे!” (स्तो. १२८:१) यहोवाबद्दल आपल्या मनात खूप आदर असल्यामुळे जेव्हा आपण त्याला न आवडणारी कोणतीही गोष्ट करायचं टाळतो, तेव्हा त्यालाच यहोवाची भीती बाळगणं असं म्हटलंय. (नीति. १६:६) बायबलमध्ये योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल देवाचे स्तर देण्यात आले आहेत. म्हणून आपण या स्तरांप्रमाणे चालायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. (२ करिंथ. ७:१) जर आपण यहोवाला आवडणाऱ्‍या गोष्टी करत राहिलो आणि त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टींचा द्वेष केला तर आपण आनंदी राहू.​—स्तो. ३७:२७; ९७:१०; रोम. १२:९.

१०. रोमकर १२:२ नुसार यहोवाचे स्तर माहीत असण्यासोबतच आणखी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे?

१० रोमकर १२:२ वाचा. बरोबर काय आणि चुकीचं काय हे ठरवण्याचा अधिकार यहोवाला आहे हे कदाचित एखाद्याला माहीत  असेल. पण त्याने ते स्वीकारलं  पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. उदाहरणार्थ. हायवेवर वाहनांचा वेग किती असला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार शासनाचा आहे हे एखाद्याला माहीत  असेल. पण तो स्वतः ज्या वेगाने गाडी चालवतो त्यावरून हे दिसून येईल की त्याला ते मान्य  आहे की नाही. त्याचप्रमाणे आपण ज्या प्रकारे जीवन जगतो त्यावरून आपण हे दाखवू शकतो, की यहोवाचे स्तर मानणं हाच जीवन जगण्याचा चांगला मार्ग आहे. (नीति. १२:२८) दावीदलाही असंच वाटत होतं, म्हणून त्याने म्हटलं: “तू मला जीवनाचा मार्ग दाखवतोस. तुझ्या सहवासात अमाप सुख आहे; तुझ्या उजव्या हाताला सर्वकाळाचा आनंद आहे.”​—स्तो. १६:११.

११-१२. (क) आपण दुःखी किंवा निराश असतो तेव्हा कोणत्या गोष्टीबद्दल आपण सावध असलं पाहिजे? (ख) मनोरंजनाची निवड करताना फिलिप्पैकर ४:८ मधले शब्द आपल्याला कशी मदत करतील?

११ जेव्हा आपण खूप दुःखी असतो किंवा निराश असतो तेव्हा कदाचित आपल्याला असं काहीतरी करावंसं वाटेल ज्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत होईल. आणि हे समजण्यासारखं आहे. पण अशा वेळी आपण सावध असलं पाहिजे, नाहीतर आपण असं काहीतरी करून बसू ज्याचा यहोवा द्वेष करतो.​—इफिस. ५:१०-१२, १५-१७.

१२ पौलने फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात असं प्रोत्साहन दिलं, की त्यांनी ‘नीतिमान, शुद्ध, प्रिय मानण्यालायक आणि चांगलं’ आहे अशा गोष्टींचा नेहमी विचार करावा. (फिलिप्पैकर ४:८ वाचा.) पौल या ठिकाणी खासकरून मनोरंजनाबद्दल बोलत नसला, तरी आपल्या मोकळ्या वेळेत मनोरंजनाची निवड करताना आपण या गोष्टींचा विचार करू शकतो. उदाहरणार्थ, एखादा चित्रपट पाहण्याआधी आपण स्वतःला असं विचारू शकतो, की हा चित्रपट ‘शुद्ध’ आहे का? तो चांगलंय असं म्हणता येईल का? तसंच, “गाणी ऐकताना,” “पुस्तकं वाचताना,” किंवा “व्हिडिओ गेम्स” खेळताना आपण स्वतःला विचारू शकतो, की या गोष्टी यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे आहेत का? अशा प्रकारे विचार केल्यामुळे कोणत्या गोष्टी देवाला मान्य आहेत आणि कोणत्या नाहीत हे आपल्याला समजायला मदत होईल. आपल्या सर्वांनाच यहोवाच्या उच्च स्तरांप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. (स्तो. ११९:१-३) असं केल्यामुळे आपला विवेक शुद्ध राहील आणि आनंदी राहण्यासाठी जी पुढची गोष्ट करणं गरजेचं आहे तीसुद्धा आपल्याला करता येईल.​—प्रे. कार्यं २३:१.

यहोवाच्या उपासनेला जीवनात पहिलं स्थान द्या

१३. खऱ्‍या अर्थाने आनंदी राहण्यासाठी कोणती तिसरी गोष्ट करणं महत्त्वाची आहे? (योहा. ४:२३, २४)

१३ तिसरी गोष्ट: आपल्या जीवनात यहोवाच्या उपासनेला सगळ्यात पहिलं स्थान आहे या गोष्टीची खातरी करा.  यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे आपण त्याची उपासना केली पाहिजे. (प्रकटी. ४:११; १४:६, ७) आणि त्याला आवडेल अशा प्रकारे, म्हणजे “पवित्र शक्‍तीने आणि सत्याप्रमाणे” आपण त्याची उपासना केली पाहिजे. आणि याच गोष्टीला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्वं असलं पाहिजे. (योहान ४:२३, २४ वाचा.) आपली उपासना देवाच्या वचनात असलेल्या सत्याप्रमाणे असावी म्हणून पवित्र शक्‍तीने आपलं मार्गदर्शन करावं अशी आपली इच्छा आहे. ज्या ठिकाणी आपल्या कामावर निर्बंध लावण्यात आले आहेत किंवा आपल्या कामावर बंदी आहे, अशा ठिकाणी जरी आपण राहत असलो तरी यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात आपण सगळ्यात पहिलं स्थान दिलं पाहिजे. आज १०० पेक्षा जास्त भाऊबहीण फक्‍त यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे जेलमध्ये आहेत. * असं असलं तरी प्रार्थना करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि इतरांना देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी त्यांना जे जमेल ते आनंदाने करायचा ते प्रयत्न करतात. आपलाही जेव्हा छळ केला जातो किंवा निंदा केली जाते, तेव्हा यहोवा आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला नक्की प्रतिफळ देईल या जाणिवेने आपणसुद्धा आनंदी राहू शकतो.​—याको. १:१२; १ पेत्र ४:१४.

सध्याच्या काळातल्या एका भावाचा अनुभव

१४. ताजिकिस्तानमधल्या एका तरुण भावाच्या बाबतीत काय झालं आणि का?

१४ आपल्या काही भाऊबहिणींना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. पण आपण आताच चर्चा केलेल्या तीन गोष्टींमुळे त्यांना आनंदी राहायला मदत झाली. ताजिकिस्तानमध्ये राहणाऱ्‍या १९ वर्षांच्या जोविडॉन बाबाजोनोव नावाच्या बांधवाच्या बाबतीत काय झालं त्याचा विचार करा. त्याने लष्करी सेवेत भाग घ्यायला नकार दिला होता. म्हणून ४ ऑक्टोबर २०१९ ला पोलिसांनी त्याला घरातून उचलून बऱ्‍याच महिन्यांसाठी जेलमध्ये टाकलं. तिथे त्याला एका गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली. बऱ्‍याच देशांमधल्या बातम्यांमध्ये ही गोष्ट उघड करण्यात आली. बातमीपत्रात सांगण्यात आलं, की त्याला बरीच मारहाण करण्यात आली आणि लष्करी सेवेत सहभाग घ्यायला शपथ घेण्यासाठी आणि लष्करी पोशाख घालण्यासाठी त्याला जबरदस्ती करण्यात आली. इतकंच नाही, तर त्यानंतर त्याला न्यायालयाने दोषी ठरवून सक्‍तमजूरीची शिक्षा ठोठावली. शेवटी काही काळानंतर ताजिकिस्तानच्या राष्ट्रपतीने त्याला निर्दोष घोषित करून त्याला तुरुंगातून सोडण्याचा आदेश दिला. या सबंध कठीण काळात जोविडॉन यहोवाला एकनिष्ठ राहिला आणि त्याने आपला आनंद ठिकवून ठेवला. कारण त्याला आपल्या आध्यात्मिक भूकेची नेहमी जाणीव होती.

जोविडॉन आध्यात्मिक अन्‍न घेत राहिला, तो यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगला आणि त्याने यहोवाच्या उपासनेला जीवनात पहिलं स्थान दिलं (परिच्छेद १५-१७ पाहा)

१५. जेलमध्ये असतानासुद्धा जोविडॉन आध्यात्मिक अन्‍न कशा प्रकारे घेत राहिला?

१५ तुरुंगात असताना जोविडॉनकडे बायबल किंवा बायबल आधारित प्रकाशनं नसतानाही तो आध्यात्मिक अन्‍न घेत राहिला.  त्याला हे कसं शक्य झालं? तिथले भाऊबहीण जेव्हा त्याच्यासाठी जेवण घेऊन जायचे तेव्हा जेवणाच्या पिशव्यांवर ते दैनिक वचन लिहायचे. अशा प्रकारे, त्याला दररोज बायबलचं वचन वाचायची आणि त्यावर मनन करायची संधी मिळायची. जेलमधून सुटल्यानंतर जोविडॉन म्हणतो: ज्या भाऊबहिणींनी अशा प्रकारच्या छळाचा सामना केलेला नाही त्यांना मला हे सांगायचंय, की “जोपर्यंत तुमच्याकडे स्वातंत्र्य आहे तोपर्यंत तुम्ही बायबल आणि इतर प्रकाशनं वाचून यहोवाबद्दल होता होईल तितकं ज्ञान घेत राहिलं पाहिजे.”

१६. जोविडॉनने कोणत्या गोष्टींवर विचार केला?

१६ तुरुंगात असतानासुद्धा जोविडॉन यहोवाच्या स्तरांना जडून राहिला.  चुकीच्या इच्छांना मनात आणण्याऐवजी किंवा वाईट कामं कर राहण्याऐवजी तो यहोवावर आणि यहोवाला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्यावर विचार करत राहिला. जेलमध्ये असताना यहोवाची सृष्टी किती सुंदर आहे या गोष्टीचा तो विचार करायचा. दररोज सकाळी तो चिमण्यांचा किलबिलाट ऐकायचा आणि रात्रीच्या वेळी तो चंद्र आणि ताऱ्‍यांना पाहायचा. तो म्हणतो: “या सगळ्या गोष्टी यहोवाकडून मिळालेली एक भेटच होती. त्यामुळे मला आनंद व्हायचा आणि प्रोत्साहन मिळायचं.” आपणसुद्धा जेव्हा यहोवाने बनवलेल्या गोष्टींबद्दल आणि त्याच्या वचनात दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कदर बाळगतो तेव्हा आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. आणि हा आनंद आपल्याला समस्यांचा धीराने सामना करायला मदत करू शकतो.

१७. जोविडॉनसारख्या परिस्थितीला जर एखाद्याला तोंड द्यावं लागलं, तर १ पेत्र १:६, ७ मधल्या शब्दांमुळे त्याला कसं प्रोत्साहन मिळू शकतं?

१७ जोविडॉनने यहोवाच्या उपासनेला पहिलं स्थानही दिलं.  खऱ्‍या देवाला एकनिष्ठ राहणं किती महत्त्वाचं आहे, हे त्याला माहीत होतं. येशूने म्हटलं होतं: “तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि फक्‍त त्याचीच पवित्र सेवा कर.” (लूक ४:८) जोविडॉनने आपला धर्म सोडून द्यावा असं लष्करी अधिकाऱ्‍यांना आणि सैनिकांना वाटत होतं. पण तो दिवस-रात्र अशी प्रार्थना करत राहिला, की हार मानता विश्‍वासात टिकून राहण्यासाठी यहोवाने त्याला मदत करावी. आणि इतकी वाईट वागणूक मिळूनसुद्धा जोविडॉन विश्‍वासात टिकून राहिला. त्याला घरातून उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं आणि मारहाण करण्यात आली. या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या विश्‍वासाची परीक्षा झाली. पण आता तो खूप आनंदी आहे, कारण त्याच्या विश्‍वासाची पारख झाली आहे आणि त्याचा विश्‍वास आणखी मजबूत झाला आहे.​—१ पेत्र १:६, ७ वाचा.

१८. आपण आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो?

१८ खऱ्‍या अर्थाने आनंदी राहायला आपल्याला कशाची गरज आहे, हे यहोवाला माहीत आहे. या लेखात दिलेल्या तीन गोष्टी तुम्ही करत राहिलात, तर कठीण परिस्थितीतही तुम्ही तुमचा आनंद टिकवून ठेवू शकता. आणि तुम्हालाही स्तोत्रकर्त्यासारखं म्हणता येईल: “यहोवा ज्यांचा देव आहे, ते लोक सुखी आहेत!”​—स्तो. १४४:१५.

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

^ आज बऱ्‍याच लोकांना खरा आनंद मिळवणं खूप कठीण वाटतं, कारण ते ऐशआराम, धनसंपत्ती, प्रसिद्धी आणि सत्ता अशा चुकीच्या गोष्टींच्या मागे लागून आनंद शोधायचा प्रयत्न करतात. पण येशू जेव्हा या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने खरा आनंद कसा मिळवायचा याबद्दल लोकांना सांगितलं. या लेखात आपण अशा तीन गोष्टींचा विचार करू या ज्यामुळे आपल्याला खरा आनंद अनुभवता येईल.

^ १५ ऑगस्ट २०१४ च्या टेहळणी बुरूज अंकातला “तुम्हाला ‘यथाकाळी’ आध्यात्मिक अन्‍न मिळत आहे का?” हा लेख पाहा.

^ जास्त माहितीसाठी, jw.org या वेबसाईटवर इंग्रजीत “इंप्रिझन्ड फॉर देअर फेथ” (“Imprisoned for Their Faith”) हे शब्द वापरून शोधा.

^ चित्राचं वर्णन: एका बांधवाला अटक करून त्याच्यावर खटला चालवण्यासाठी न्यायालयात नेलं जात आहे. आणि इतर साक्षीदार त्याला पाठिंबा देण्यासाठी तिथे आले आहेत, असं दाखवणारं एक रूपांतरित दृश्‍य.