व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४३

खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे

खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे

“खरी बुद्धी रस्त्यावर हाक मारते. ती चौकाचौकांत मोठ्याने घोषणा करते.”​—नीति. १:२०.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

सारांश *

१. आज बरेच लोक बुद्धीच्या हाकेला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत? (नीतिवचनं १:२०, २१)

 अनेक देशांमध्ये तुम्ही आपल्या भाऊबहिणींना वर्दळीच्या रस्त्यांवर उभे राहून येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांना आनंदाने प्रकाशनं देत असल्याचं पाहिलंच असेल. तुम्ही कधी अशा प्रकारच्या सेवाकार्यात भाग घेतलाय का? असेल, तर नीतिवचनाच्या पुस्तकात दिलेल्या एका शब्दचित्राचा तुम्ही नक्कीच विचार केला असेल. ते शब्दचित्र बुद्धीबद्दलचं आहे. लोकांनी आपला सल्ला ऐकावा म्हणून ती रस्त्यावर मोठ्याने हाक मारत आहे. (नीतिवचनं १:२०, २१ वाचा.) ही “खरी बुद्धी,” म्हणजेच यहोवाची बुद्धी आपल्याला बायबलमधून आणि आपल्या प्रकाशनांमधून मिळते. जीवनाच्या मार्गावर पहिलं पाऊल उचलण्यासाठी लोकांना या बुद्धीची खरंच खूप गरज आहे. त्यामुळे लोक जेव्हा आपली प्रकाशनं घेतात तेव्हा आपल्याला खरंच खूप आनंद होतो. पण सगळेच लोक असं करत नाहीत. काहींना बायबल जे सांगतं ते जाणून घेण्यात मुळीच आवड नसते. काही जण तर आपली चेष्टा करतात, कारण बायबल आता इतिहासजमा झालंय असं त्यांना वाटतं. आणि असेही काही जण आहेत जे नैतिकतेच्या बाबतीत बायबल जे शिकवतं त्याची टिका करतात. त्यांना असं वाटतं, की बायबलच्या नैतिक स्तरांप्रमाणे चालणारे लोक कठोर असतात आणि नेहमी टोकाची भूमिका घेतात. तरीसुद्धा यहोवा प्रेमाने सगळ्यांना खरी बुद्धी देत राहतो. तो हे कोणत्या मार्गांनी करतो?

२. आपल्याला खरी बुद्धी कुठे मिळू शकते? पण आज बरेच लोक काय करतात?

एक मार्ग म्हणजे, यहोवा त्याच्या वचनाद्वारे म्हणजे बायबलद्वारे लोकांना खरी बुद्धी देतो. आज जवळपास सगळ्यांनाच बायबल सहज मिळू शकतं. आणि आपल्या प्रकाशनांबद्दल काय म्हणता येईल? यहोवाच्या आशीर्वादाने आज ती १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. जे लोक बायबल आणि आपली प्रकाशनं वाचतात आणि त्यांप्रमाणे वागतात त्यांना खूप फायदा होतो. पण आज बरेच जण खऱ्‍या बुद्धीच्या हाकेकडे दुर्लक्ष करतात. त्यांना काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते स्वतःच्या बुद्धीवर किंवा इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतात. शिवाय, आपण बायबलच्या सल्ल्याप्रमाणे चालतो म्हणून ते आपल्याकडे खालच्या नजरेनेही पाहतात. लोक असं का वागतात याबद्दल या लेखात चर्चा केली जाईल. पण त्याआधी आपण बघू, की यहोवाकडून मिळणारी बुद्धी आपण कशी मिळवू शकतो?

यहोवाचं ज्ञान घेतल्यामुळे बुद्धी मिळते

३. खरी बुद्धी म्हणजे काय, आणि ती मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

आपल्या ज्ञानाचा उपयोग करून चांगले निर्णय घेण्याच्या क्षमतेला बुद्धी म्हणतात. पण खरी बुद्धी यापेक्षा खूप वेगळी आहे. बायबल म्हणतं: “यहोवाची भीती बाळगणं हीच बुद्धीची सुरुवात आहे, आणि परमपवित्र देवाचं ज्ञान हीच समजशक्‍ती आहे.” (नीति. ९:१०) त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपण ‘परमपवित्र देवाच्या ज्ञानाच्या’ आधारावर, म्हणजे यहोवाचे विचार लक्षात घेऊन ते घेतले पाहिजेत. आपल्याला हे कसं करता येईल? त्यासाठी आपण बायबलचा आणि बायबलवर आधारित प्रकाशनांचा अभ्यास करू शकतो. असं करून आपण खरी बुद्धी दाखवत असतो.​—नीति. २:५-७.

४. खरी बुद्धी फक्‍त यहोवाच देऊ शकतो असं का म्हणता येईल?

फक्‍त यहोवाच आपल्याला खरी बुद्धी देऊ शकतो. (रोम. १६:२७) असं का म्हणता येईल? पहिलं कारण म्हणजे, तो आपला निर्माणकर्ता आहे आणि त्याने जे काही निर्माण केलंय त्याबद्दल त्याला अमर्याद ज्ञान आहे. (स्तो. १०४:२४) दुसरं कारण म्हणजे, तो जे काही करतो त्यातून त्याची अफाट बुद्धी दिसून येते. (रोम. ११:३३) आणि तिसरं कारण म्हणजे, जे त्याच्या सुज्ञ सल्ल्यांप्रमाणे चालतात त्यांना नेहमी फायदाच होतो. (नीति. २:१०-१२) आपल्याला जर खरी बुद्धी मिळवायची असेल, तर या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. आणि कोणतेही निर्णय घेताना किंवा कोणतंही काम करताना आपण या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

५. खरी बुद्धी यहोवाच देऊ शकतो ही गोष्ट लोक स्वीकारत नाहीत तेव्हा काय परिणाम होतात?

बऱ्‍याचदा क्षेत्रात आपल्याला असे लोक भेटतात जे हे कबूल करतात, की निसर्गात एक अद्‌भुत रचना आहे. पण हे सगळं एका निर्माणकर्त्याने केलंय हे ते मानत नाहीत. याउलट, सगळं काही उत्क्रांतीने आलंय असं ते मानतात. आणि असेही काही लोक आहे जे देवाला मानतात खरं, पण बायबलची तत्त्वं, त्याचे स्तर आता जुने झाले आहेत असं म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे चालतात. मग याचा परिणाम काय झालाय? देवाच्या बुद्धीऐवजी लोक स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहत असल्यामुळे हे जग आणखी चांगलं बनलंय का? ते खऱ्‍या अर्थाने आनंदी आहेत का? आणि भविष्यासाठी त्यांना एक पक्की आशा मिळाली आहे का? आज जगाची परिस्थिती पाहिली तर हेच सिद्ध होतं, की “यहोवाच्या विरोधात कसलीही बुद्धी, शहाणपण आणि योजना चालत नाही.” (नीति. २१:३०) खरंच, यहोवाच्या बुद्धीवर अवलंबून राहणं किती चांगलं आहे! पण दुःखाची गोष्ट म्हणजे आज बरेच लोक तसं करत नाहीत. का बरं?

लोक खरी बुद्धी का स्वीकारत नाहीत

६. नीतिवचनं १:२२-२५ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचे लोक खऱ्‍या बुद्धीकडे दुर्लक्ष करतात?

खरी बुद्धी जेव्हा ‘रस्त्यावर हाक मारते’ तेव्हा बरेच जण तिच्याकडे दुर्लक्ष करतात. बायबल म्हणतं, की असे तीन प्रकारचे लोक आहेत जे खरी बुद्धी नाकारतात. ते म्हणजे: ‘अज्ञानी लोक,’ ‘थट्टा करणारे’ आणि ‘मूर्ख लोक.’ (नीतिवचनं १:२२-२५ वाचा.) पण हे लोक देवाकडून मिळणारी बुद्धी का नाकारतात? आणि आपण त्यांच्यासारखं होऊ नये म्हणून काय करू शकतो? या दोन प्रश्‍नांकडे आता आपण लक्ष देऊ या.

७. आज काही जण ‘अज्ञानीच राहायची’ निवड का करतात?

ज्यांना सहज फसवलं जाऊ शकतं अशा भोळ्याभाबड्या, अनुभव नसलेल्या लोकांना बायबलमध्ये ‘अज्ञानी लोक’  असं म्हटलं आहे. (नीति. १४:१५, तळटीप.) सेवाकार्यात अशा प्रकारचे लोक आपल्याला नेहमी भेटतात. उदाहरणार्थ, आज धार्मिक आणि राजकीय पुढारी लाखो लोकांची दिशाभूल करत असल्याचं बघायला मिळतं. अशा लोकांकडून आपली दिशाभूल झाली आहे हे समजल्यावर अनेकांना धक्काच बसतो. पण नीतिवचनं १:२२ मध्ये ज्यांना ‘अज्ञानी लोक’ म्हटलं आहे त्यांना याचा काहीच फरक पडत नाही. ते अज्ञानीच राहायची निवड करतात. कारण त्यांना तसंच राहायला आवडतं. (यिर्म. ५:३१) त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगायला आवडतं. बायबल काय म्हणतं हे शिकायला किंवा बायबलच्या नीतिनियमांप्रमाणे चालायला त्यांना आवडत नाही. कॅनडाच्या क्यूबेकमध्ये राहणाऱ्‍या एका अतिशय धार्मिक स्त्रीचा विचार करा. एकदा प्रचार कार्यात आपल्या एका भावाला ती भेटली तेव्हा ती त्याला म्हणाली: “जर पाळक आमची दिशाभूल करत असतील तर ही त्यांची चूक आहे, आमची नाही.” या स्त्रीसारखंच आज अनेक लोकांना वाटतं. पण आपल्याला मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्‍या लोकांसारखं व्हायचं नाही.​—नीति. १:३२; २७:१२.

८. खरी बुद्धी मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

म्हणूनच बायबल आपल्याला म्हणतं, की आपण अज्ञानी राहू नये, तर ‘समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखं व्हावं.’ (१ करिंथ. १४:२०) आणि त्यासाठी लागणारी “खरी बुद्धी” बायबलची तत्त्वं जीवनात लागू करून आपण मिळवू शकतो. आणि हळूहळू आपण प्रत्यक्ष हे अनुभवू, की बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपण समस्या कशा टाळू शकतो आणि योग्य निर्णय कसे घेऊ शकतो. आपण घेतलेले निर्णय योग्य आहेत का हे वेळोवेळी तपासून पाहणंसुद्धा गरजेचं आहे. आपण जर काही काळापासून बायबलचा अभ्यास करत असलो आणि सभांनाही येत असलो, तर आपण स्वतःला विचारलं पाहिजे, की ‘मी अजूनपर्यंत यहोवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा का घेतला नाही?’ आणि आपला जर बाप्तिस्मा झाला असेल, तर प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात आपण प्रगती करत आहोत का? आपण बायबलच्या तत्त्वांप्रमाणे चालतो हे आपल्या निर्णयांवरून दिसून येतं का? इतरांशी वागताना आपण ख्रिस्तासारखे गुण दाखवतो का? या बाबतीत कुठेही सुधारणा करायची गरज आहे असं जर आपल्याला जाणवलं, तर आपण यहोवाच्या सूचनांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण देवाच्या सूचना ‘अज्ञानी लोकांना,’ म्हणजे ‘अनुभव नसलेल्या लोकांना बुद्धिमान’ बनवतात.​—स्तो. १९:७.

९. नीतिवचन १:२२ मध्ये आणखी कोणत्या लोकांबद्दल सांगितलं आहे? आणि ते काय करतात?

नीतिवचनं १:२२ मध्ये ‘थट्टा करणाऱ्‍या’  लोकांबद्दलही सांगितलं आहे. हे लोकसुद्धा देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीकडे दुर्लक्ष करतात. असे काही लोक आपल्याला प्रचारकार्यात भेटतात. आपली थट्टा करायला त्यांना खूप आवडतं. (स्तो. १२३:४) बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं, की शेवटच्या काळात थट्टेखोर लोकांची कमी नसेल. (२ पेत्र ३:३, ४) लोटच्या जावयांप्रमाणेच आज काही लोक देवाकडून मिळणाऱ्‍या धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. (उत्प. १९:१४) आणि बायबलच्या तत्त्वांप्रमाणे चालणाऱ्‍या लोकांची अनेक जण चेष्टा करतात. थट्टा करणारे हे लोक “स्वतःच्या दुष्ट वासनांप्रमाणे” चालतात. (यहू. ७, १७, १८) बायबलमध्ये थट्टेखोर लोकांचं जे वर्णन करण्यात आलं आहे ते धर्मत्यागी लोकांच्या आणि यहोवाला नाकारणाऱ्‍या लोकांच्या वागण्याशी किती अचूकपणे जुळतं!

१०. स्तोत्र १:१ मध्ये सांगितल्याप्रमाणे थट्टा करणाऱ्‍यांसारखी मनोवृत्ती आपण कशी टाळू शकतो?

१० थट्टेखोर लोकांसारखी मनोवृत्ती आपल्यामध्ये येऊ नये म्हणून आपण सावध कसं राहू शकतो? एक म्हणजे, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत टीका करणाऱ्‍या लोकांची संगत आपण टाळली पाहिजे. (स्तोत्र १:१ वाचा.) याचा अर्थ, आपण धर्मत्यागी लोकांचं ऐकणार नाही आणि त्यांचं कोणतंही साहित्य वाचणार नाही. या बाबतीत जर आपण काळजी घेतली नाही, तर आपलीही मनोवृत्ती या लोकांसारखीच टीकात्मक होऊ शकते. तसंच, आपण यहोवावर आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर शंका घ्यायलाही सुरुवात करू. आणि हे जर टाळायचं असेल, तर आपण या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे: ‘संघटनेकडून काही नवीन सूचना किंवा समज मिळते तेव्हा त्यात काही ना नाही खोट काढायचाच मी प्रयत्न करतो का? संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍यांच्या चुका शोधण्याकडेच माझा कल असतो का?’ अशा प्रवृत्ती लगेच काढून टाकायचा आपण प्रयत्न करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो.​—नीति. ३:३४, ३५.

११. बायबलमध्ये ‘मूर्ख लोक’ असं कोणाला म्हटलं आहे?

११ देवाकडून मिळणारी बुद्धी नाकारणारे तिसऱ्‍या प्रकारचे लोक म्हणजे ‘मूर्ख लोक.’  त्यांना मूर्ख म्हटलं आहे, कारण त्यांना देवाच्या नैतिक स्तरांप्रमाणे चालायला आवडत नाही, तर स्वतःच्या मनासारखं करायला आवडतं. (नीति. १२:१५) ते खरी बुद्धी देणाऱ्‍या देवाला नाकारतात. (स्तो. ५३:१) असे लोक बऱ्‍यादा आपल्याला प्रचारकार्यात भेटतात. त्यांच्याकडे आपल्याला सांगण्यासारखं काहीच चांगलं नसतं. उलट, आपण बायबलच्या स्तरांप्रमाणे चालतो म्हणून ते कठोर शब्दांत आपली टीका करतात. त्यांच्याबद्दल बायबल म्हणतं: “खरी बुद्धी मूर्खाच्या आवाक्याबाहेर असते; शहराच्या फाटकाजवळ त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीही नसतं.” (नीति. २४:७) म्हणून बायबल आपल्याला सावध करतं, की “मूर्ख माणसापासून दूर राहा”!​—नीति. १४:७.

१२. आपण मूर्ख लोकांसारखं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे?

१२ देवाकडून मिळणारी बुद्धी नाकारणाऱ्‍या या मूर्ख लोकांपेक्षा आपण फार वेगळे आहोत. आपण यहोवाच्या मार्गांवर आणि त्याच्या नैतिक स्तरांवर प्रेम करतो. आपल्याला हे प्रेम कसं वाढवता येईल बरं? देवाच्या आज्ञा पाळण्याचा आणि न पाळण्याचा काय परिणाम होतो याची तुलना करून आपण हे करू शकतो. लोक जेव्हा देवाकडून मिळणाऱ्‍या सुज्ञ सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा करतात, तेव्हा ते स्वतःवर किती समस्या ओढवून घेतात याचा विचार करा. आणि मग, देवाचा सल्ला ऐकल्याल्यामुळे तुमचं जीवन किती सुंदर झालं आहे याचा विचार करा.​—स्तो. ३२:८, १०.

१३. यहोवा कोणालाही आपला सल्ला स्वीकारायची जबरदस्ती करतो का?

१३ यहोवा प्रेमाने सगळ्यांना खरी बुद्धी देतो. पण ती स्वीकारायची जबरदस्ती तो कोणालाही करत नाही. जे त्याच्या सुज्ञ सल्ल्याप्रमाणे चालत नाहीत त्यांचं काय होईल हे मात्र तो सांगतो. (नीति. १:२९-३२) तो म्हणतो: “त्यांना त्यांच्या वागणुकीचे परिणाम भोगावे लागतील.” ते सध्या ज्या प्रकारे जीवन जगतात त्यामुळे पुढे त्यांना खूप त्रास आणि दुःख सहन करावं लागेल. आणि शेवटी येणाऱ्‍या नाशातून ते वाचणार नाहीत. याउलट, जे देवाचा सुज्ञ सल्ला स्वीकारतात आणि त्याप्रमाणे चालतात त्यांना तो असं वचन देतो, “जो माझं ऐकतो तो सुरक्षित राहील आणि त्याला संकटाची भीती सतावणार नाही.”​—नीति. १:३३.

खऱ्‍या बुद्धीमुळे फायदा होतो

आपण सभांमध्ये उत्तरं देतो तेव्हा यहोवासोबतचं आपलं नातं आणखी मजबूत होतं (परिच्छेद १५ पाहा)

१४-१५. नीतिवचनं ४:२३ मधून आपण काय शिकतो?

१४ देवाकडून मिळणाऱ्‍या खऱ्‍या बुद्धीप्रमाणे आपण चालतो तेव्हा आपला फायदाच होतो. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं, की या खऱ्‍या बुद्धीमुळे सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, नीतिवचनं या पुस्तकात यहोवाने बऱ्‍याच गोष्टींबद्दल आपल्याला व्यावहारिक सल्ले दिले आहेत, जे नेहमीच फायद्याचे ठरतात. कारण त्यांमुळे आपलं जीवन आणखी आनंदी आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. चला याची चार उदाहरणं आता आपण पाहू या.

१५ आपल्या हृदयाचं रक्षण करा.  बायबल म्हणतं: “ज्या गोष्टींचं तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचे झरे फुटतात.” (नीति. ४:२३) हृदयाचा आजार होऊ नये म्हणून आपण बरंच काही करत असतो. आपण पौष्टिक आहार घेतो, पुरेसा व्यायाम करतो आणि वाईट सवयी टाळतो. त्याचप्रमाणे आपल्या लाक्षणिक हृदयाचं, म्हणजे आपल्या मनाचं रक्षण करण्यासाठी आपण असंच काहीसं केलं पाहिजे. आपण दररोज बायबल वाचतो, सभांची तयारी करतो, सभांना जातो आणि त्यांत सहभाग घेतो. तसंच, आपण आवेशाने प्रचारकार्य करतो. इतकंच नाही, तर आपल्या विचारांना दूषित करणाऱ्‍या वाईट गोष्टींपासून, जसं की अनैतिक मनोरंजन आणि वाईट संगत यांसारख्या गोष्टींपासूनही आपण दूर राहतो. त्यामुळे आपल्या हृद्याचं, म्हणजेच मनाचं रक्षण होतं.

पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपण आहे त्यात समाधानी राहतो (परिच्छेद १६ पाहा)

१६. नीतिवचनं २३:४, ५ मध्ये दिलेला सल्ला आज इतका व्याहारिक का आहे?

१६ आहे त्यात समाधानी राहा.  बायबल असा सल्ला देतं: “संपत्ती मिळवण्यासाठी आपली शक्‍ती वाया घालवू नकोस। . . . कारण तुझी नजर तिच्यावर पडेल, तेव्हा ती तिथे नसेल, तिला गरुडासारखे पंख फुटतील आणि ती उडून जाईल. (नीति. २३:४, ५) भौतिक संपत्ती शेवटपर्यंत टिकेल की नाही हे सांगता येत नाही. पण तरीसुद्धा गरीब-श्रीमंत असे सगळेच हात धुवून पैशाच्या मागे लागतात. पैसा मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यामुळे त्यांचं नाव खराब होतं, नातेसंबंध बिघडतात आणि त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. (नीति. २८:२०; १ तीम. ६:९, १०) याउलट, खरी बुद्धी आपल्याला पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला मदत करते. त्यामुळे आपण लोभापासून दूर राहतो आणि आपलं जीवन आणखी आनंदी आणि समाधानी होतं.​—उप. ७:१२.

बोलण्याआधी विचार केला तर आपल्या शब्दांमुळे आपण इतरांना दुखावणार नाही (परिच्छेद १७ पाहा)

१७. नीतिवचनं १२:१८ या वचनातून आपण काय शिकतो?

१७ बोलण्याआधी विचार करा.  आपण विचार न करता बोललो तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. बायबल म्हणतं: “विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे असतात, पण बुद्धिमानाच्या शब्दांमुळे घाव भरून निघतात.” (नीति. १२:१८) आपण इतरांच्या चुकांची चहाडी करायचं टाळलं तर आपल्यातली शांती टिकून राहील. (नीति. २०:१९) आपल्या शब्दांनी इतरांची मनं दुखावली जाऊ नये तर त्यांना सांत्वन मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण खरी बुद्धी मिळवली पाहिजे. त्यासाठी आपण रोज बायबल वाचलं पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. (लूक ६:४५) आपण जर असं केलं, तर आपले शब्द इतरांना तजेला देणाऱ्‍या ‘बुद्धीच्या झऱ्‍यासारखे’ असतील. ​—नीति. १८:४.

संघटनेकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं पालन केल्यामुळे आपण आणखी चांगल्या प्रकारे सेवाकार्य करू शकतो (परिच्छेद १८ पाहा)

१८. नीतिवचनं २४:६ मधला सल्ला लागू केल्यामुळे आपण आपलं सेवाकार्य आणखी चांगल्या प्रकारे कसं करू शकतो?

१८ सूचनांचं पालन करा.  बायबल असा सल्ला देतं: “कुशल मार्गदर्शनाने लढाई लढ; पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे विजय मिळतो.” (नीति. २४:६, तळटीप.) हे तत्त्व पाळल्यामुळे आपण प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात यशस्वी कसं होऊ शकतो याचा विचार करा. स्वतःच्या मनाप्रमाणे सेवाकार्य करण्याऐवजी संघटनेकडून ज्या काही सूचना मिळतात त्या पाळायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तसंच, आपल्या सभांमध्ये जी भाषणं दिली जातात आणि जे भाग सादर केले जातात त्यांतून इतरांना आपण आणखी चांगल्या प्रकारे कसं शिकवू शकतो हे आपल्याला शिकायला मिळतं. याशिवाय, संघटनेने आपल्याला बरीच उपयुक्‍त साधनं पुरवली आहेत. जसं की, प्रकाशनं आणि व्हिडिओ. ही साधनं, बायबल काय सांगतं ते समजून घ्यायला लोकांना मदत करतात. तुम्ही या साधनांचा चांगल्या प्रकारे वापर करायला शिकलात का?

१९. यहोवाकडून मिळणाऱ्‍या खऱ्‍या बुद्धीबद्दल तुम्हाला काय वाटतं? (नीतिवचनं ३:१३-१८)

१९ नीतिवचनं ३:१३-१८ वाचा. देवाने त्याच्या वचनात आपल्याला बरेच सुज्ञ सल्ले दिले आहेत याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! हे सल्ले नसते तर विचार करा आपलं काय झालं असतं. या लेखात आपण नीतिवचनांच्या पुस्तकात दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यांची काही उदाहरणं पाहिली. असेच सुज्ञ सल्ले खरंतर संपूर्ण बायबलमध्ये दिले आहेत. तेव्हा देवाने दिलेल्या सुज्ञ सल्ल्यांप्रमाणे नेहमी वागायचा आपण ठाम निश्‍चय करू या. या सुज्ञ सल्ल्यांबद्दल, खऱ्‍या बुद्धीबद्दल जग कसाही विचार करो, आपल्याला मात्र याची खातरी आहे, की जे खऱ्‍या बुद्धीला “घट्ट धरून राहतात, त्यांना सुखी म्हटलं जाईल.”

गीत ५२ मनाचे रक्षण करा

^ यहोवाकडून मिळणारी बुद्धी ही जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आणि श्रेष्ठ आहे. या लेखात आपण नीतिवचनं या पुस्तकातल्या एका खास शब्दचित्रावर चर्चा करणार आहोत. ते शब्दचित्र बुद्धीबद्दलचं आहे, जी चौकाचौकांत मोठ्याने घोषणा करते. आपण खरी बुद्धी कशी मिळवू शकतो? काही जण तिच्याकडे दुर्लक्ष का करतात? आणि आपण जर तिच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? या प्रश्‍नांची चर्चा आपण या लेखात करू या.