व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

व्यासपीठाचा आणि वरती असलेल्या बॅनरचा जवळून घेतलेला फोटो

१९२२​—शंभर वर्षांआधी

१९२२​—शंभर वर्षांआधी

“आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव आपल्याला विजय देतो.” (१ करिंथ. १५:५७) १९२२ च्या या वार्षिक वचनामुळे बायबल विद्यार्थ्यांना याची खातरी मिळाली, की यहोवा त्यांच्या विश्‍वासूपणाचं त्यांना नक्की प्रतिफळ देईल. आणि खरंच तसंच झालं. कारण त्या वर्षी या आवेशी प्रचारकांनी स्वतः आपल्या पुस्तकांची छपाई आणि बाईन्डिंग करायला, तसंच रेडिओवरून राज्याबद्दलच्या सत्यांचा प्रसार करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या या कामावर यहोवाने भरपूर आशीर्वाद दिला. मग १९२२ साली यहोवाने आणखी एकदा दाखवून दिलं, की तो आपल्या लोकांना आशीर्वादित करत आहे. त्या वर्षी अमेरिकेच्या सिडर पॉईंट ओहायो इथे झालेल्या ऐतिसाहिक अधिवेशनासाठी बायबल विद्यार्थी एकत्र आले. त्या अधिवेशनात जे घडलं त्याचा प्रभाव आजपर्यंत यहोवाच्या संघटनेत होणाऱ्‍या कामावर आहे.

“एक अप्रतिम कल्पना”

प्रचाराचं काम वाढत गेलं, तसं प्रकाशनांची मागणीही वाढत गेली. ब्रुकलीन बेथेलमधले बांधव मासिकांची छपाई स्वतः करायचे, पण जाड कव्हरची पुस्तकं मात्र बाहेरच्या प्रेसमधून छापून घ्यायचे. पण प्रेसमधून जाड कव्हरची पुस्तकं पुरेशा प्रमाणात छापली जात नसल्यामुळे बऱ्‍याच महिन्यांपर्यंत त्यांची कमतरता होती. आणि याचा प्रचाराच्या कामावर परिणाम होत होता. म्हणून बंधू रदरफर्ड यांनी फॅक्टरी मॅनेजर असलेल्या बंधू रॉबर्ट मार्टीन यांना म्हटलं: ‘ही पुस्तकं आपणच छापली तर?’

न्यू यॉर्क, ब्रुकलीन मधलं १८ कॉन्कॉर्ड स्ट्रीट

बंधू मार्टीन आठवून सांगतात, की “ती खरंच एक अप्रतिम कल्पना होती. त्यासाठी एक नवीन छपाई कारखानाच सुरू करावा लागणार होता.” म्हणून बांधवांनी ब्रुकलीनमधल्या १८ कॉन्कॉर्ड स्ट्रीट इथे भाड्याने जागा घेतली आणि त्यासाठी लागणारी छपाई उपकरणं विकत घेतली.

पण ही गोष्ट सगळ्यांनाच पटली असं नाही. पूर्वी ज्या प्रेसमधून आपण आपली पुस्तकं छापून घ्यायचो त्याचे अध्यक्ष आपला नवीन छापखाना पाहायला आले, तेव्हा त्यांनी असा शेरा मारला: “तुमची छपाईची उपकरणं तर एकदम फर्स्टक्लास आहेत. पण एकाला तरी ती वापरायचं ज्ञान आहे का? सहा महिन्यांत ही उपकरणं मोडीत काढावी लागतात की नाही बघा.”

बंधू मार्टीन सांगतात: “त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. पण आम्ही हे सगळं यहोवावर सोपवून दिलं; आणि त्याने नेहमीच आम्हाला मदत केली.” बंधू मार्टीन यांचे शब्द खरे ठरले. कारण आपल्या या नवीन छापखान्यात दर दिवशी २,००० पुस्तकं छापली जाऊ लागली.

छापखान्यातलं छपाई मशीन चालवणारे बांधव

हजारोंपर्यंत पोचण्यासाठी रेडिओचा वापर

स्वतः पुस्तकांची छपाई करण्यासोबतच यहोवाच्या लोकांनी आनंदाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एका नवीन पद्धतीचा वापर करायला सुरुवात केली; ती म्हणजे, रेडिओ ब्रॉडकास्टिंग. रविवारी दुपारी, २६ फेब्रुवारी १९२२ या तारखेला बंधू रदरफर्ड पहिल्यांदा रेडिओवरून बोलले. त्यांनी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया, लॉस ॲन्जेलेसमध्ये केओजी (KOG) रेडिओ स्टेशनवरून भाषण दिलं. त्यांच्या भाषणाचा विषय होता: “सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीच मरणार नाहीत.”

जवळजवळ २५,००० लोकांनी हा कार्यक्रम ऐकला. काही जणांनी तर या ब्रॉडकास्टबद्दल आभार व्यक्‍त करण्यासाठी पत्रंही लिहिली. असंच एक पत्र सॅन्टा ॲना, कॅलिफोर्निया इथे राहणाऱ्‍या विलर्ड ॲश्‍फर्ड यांनी लिहिलं होतं. “इतकं मनोरंजक आणि लक्षवेधक” भाषण सादर केल्याबद्दल त्यांनी बंधू रदरफर्ड यांची प्रशंसा केली. पुढे ते म्हणाले: “घरात तीन-तीन लोक आजारी असताना, तुम्ही हे भाषण अगदी आमच्या घराजवळ जरी दिलं असतं, तरी आम्ही ते प्रत्यक्ष ऐकू शकलो नसतो. पण रेडिओमुळे ते शक्य झालं.”

येणाऱ्‍या काही आठवड्यांमध्ये रेडिओवरून आणखी काही कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. द वॉच टॉवर  मासिकात असं सांगण्यात आलं, की वर्षाअखेरपर्यंत, “जवळजवळ तीन लाख लोकांना रेडिओवरून हा कार्यक्रम ऐकता आला.”

लोकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, बायबल विद्यार्थ्यांनी ब्रुकलीन बेथेलपासून जवळच असलेल्या स्टेटन आयलँडमध्ये एक रेडिओ स्टेशन बांधायचं ठरवलं. येणाऱ्‍या वर्षांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोचवण्यासाठी ते या रेडिओ स्टेशनचा, म्हणजे डब्लूबीबीआरचा (WBBR) वापर करणार होते.

“ए.डी.व्ही.”

१५ जून १९२२ च्या द वॉच टॉवर  अंकात असं सांगण्यात आलं, की ५ ते १३ सप्टेंबर १९२२ या तारखांना, सिडर पॉईंट ओहायो इथे एक अधिवेशन भरवलं जाईल. बायबल विद्यार्थी त्या अधिवेशनाला एकत्र आले तेव्हा सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं.

सुरुवातीच्या भाषणात बंधू रदरफर्ड श्रोत्यांना म्हणाले: ‘मला पूर्ण खातरी आहे, की प्रभू हे अधिवेशन आशीर्वादित करेल आणि या पृथ्वीवर आजवर दिली गेली नसेल, इतकी मोठी साक्ष दिली जाईल.’ त्या अधिवेशनात वक्त्यांनी पुन्हा-पुन्हा प्रचाराच्या कामावर भर दिला.

१९२२ साली सिडर पॉईंट ओहायो इथे झालेल्या अधिवेशनाला आलेला मोठा जमाव

मग ८ सप्टेंबरला, शुक्रवारी जवळजवळ ८,००० लोक त्या मोठ्या सभागृहात जमले आणि बंधू रदरफर्ड यांचं भाषण ऐकण्यासाठी ते खूप उत्सुक होते. कार्यक्रम पत्रिकांवर “ए.डी.व्ही.” असं लिहिलेल्या अक्षरांचा काय अर्थ आहे हे बंधू रदरफर्ड सांगतील अशी त्यांची अपेक्षा होती. सभागृहात बसलेल्या काही लोकांचं लक्ष, व्यासपीठावर वरच्या बाजूला व्यवस्थित गुंडाळून लटकवलेल्या कापडाकडे नक्कीच गेलं असेल. अमेरिकेतल्या टुल्सा, ओक्लाहोमा इथून आलेल्या आर्थर क्लाऊस नावाच्या एका बांधवाने कार्यक्रम व्यवस्थित ऐकू येईल अशी जागा निवडली होती. कारण आजच्यासारखं त्या काळात मायक्रोफोन किंवा लाऊडस्पिकर नव्हते.

“आम्ही एकएक शब्द लक्ष देऊन ऐकत होतो”

भाषणादरम्यान कोणतंही अडखळण होऊ नये म्हणून बंधू रदरफर्ड यांचं भाषण सुरू असताना कोणालाही सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही, अशी चेअरमनने घोषणा केली. सकाळी ९:३० वाजता भाषण सुरू झालं तेव्हा बंधू रदरफर्ड यांनी “स्वर्गाचं राज्य जवळ आलंय,” असं म्हणत मत्तय ४:१७ मधल्या शब्दांचा उल्लेख केला. देवाच्या राज्याबद्दल मानवांना कसं ऐकायला मिळेल याबद्दल चर्चा करताना ते म्हणाले: “येशूने स्वतः सांगितलं होतं, की त्याच्या उपस्थितीदरम्यान तो पिकाच्या कापणीला सुरुवात करेल आणि आपल्या विश्‍वासू व एकनिष्ठ लोकांना एकत्र करेल.”

त्या वेळी बंधू क्लाऊस मुख्य सभागृहात बसले होते. ते आठवून सांगतात: “आम्ही एकएक शब्द लक्ष देऊन ऐकत होतो.” पण अचानक त्यांची तब्येत खराब झाली आणि इच्छा नसतानाही त्यांना उठून बाहेर जावं लागलं. त्यांना माहीत होतं की एकदा बाहेर गेलं की पुन्हा आत येता येणार नाही.

मग काही मिनिटांनी त्यांना बरं वाटू लागलं. म्हणून ते पुन्हा सभागृहाकडे आले आणि त्यांना टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. तो ऐकून त्यांना काय करू आणि काय नको, असं झालं. त्यांनी ठरवलं, ‘काहीही झालं तरी उरलेला कार्यक्रम ऐकायचाच. त्यासाठी आपल्याला छतावर जाऊन ऐकावा लागला तरी चालेल.’ २३ वर्षांच्या क्लाऊस यांना छतावर चढून जाण्यासाठी एक जागा सापडली. छतावरचे झरोके उघडे असल्यामुळे ते जसं तिथे गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की इथून तर अगदी स्पष्ट ऐकायला येतंय.

पण तिथे छतावर बंधू आर्थर एकटेच नव्हते. त्यांचे काही मित्रही तिथेच होते. बंधू आर्थरला पाहताच फ्रँक जॉनसन नावाचा एक भाऊ धावतच त्यांच्याकडे आला आणि म्हणाला: “तुझ्याकडे छोटी सुरी आहे का?”

आर्थर म्हणाले, “हो आहे ना!”

तेव्हा फ्रँक म्हणाले, “देवाने आमची प्रार्थना ऐकली बाबा!” मग ते आर्थरला म्हणाले: “तुला ते गुंडाळून ठेवलेलं कापड दिसतंय ना? ते या खिळ्यांना बांधलेलं बॅनर आहे. जज्‌ * काय म्हणतात ते लक्ष देऊन ऐक. ते जेव्हा ‘ॲडव्हरटाईज ॲडव्हरटाईज’ असं म्हणतील तेव्हा लगेच हे चारही दोर कापून टाक.”

त्यामुळे बंधू आर्थर आणि इतर जण बंधू रदरफर्डच्या त्या शब्दांची वाट पाहत होते. मग काही वेळानेच बंधू रदरफर्डने आपल्या भाषणाचा कळस गाठला. मोठ्या आवेशाने आणि आत्मविश्‍वासाने ते आपल्या दमदार आवाजात म्हणाले: “प्रभूचे विश्‍वासू व खरे साक्षी व्हा. लढाईत पुढे व्हा आणि मोठ्या बाबेलचा लवलेशही उरणार नाही तोपर्यंत संघर्ष करा. सगळीकडे संदेशाची घोषणा करा. यहोवा हा देव आहे आणि येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे हे सर्व जगाला कळू द्या. हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. पाहा, राजा राज्य करत आहे! तुम्ही लोकांसमोर त्याचे प्रतिनिधी आहात. म्हणून राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा! (ॲडव्हरटाईज, ॲडव्हरटाईज, ॲडव्हरटाईज!)”

त्या वेळी बंधू आर्थर आणि इतर बांधवांनी दोर कापले आणि तो बॅनर अलगदपणे उलगडत गेला. कार्यक्रम पत्रिकेवर लिहिलेल्या “ए.डी.व्ही.” या अक्षरांनुसार त्या बॅनरवर “राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करा” असं लिहिलं होतं (‘ॲडव्हरटाईज’ या शब्दाची पहिली तीन अक्षरं).

एक महत्त्वाचं काम

सिडर पॉईंट इथे झालेल्या अधिवेशनामुळे बांधवांना राज्याचा प्रचार करण्याच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष द्यायला मदत झाली. अनेक जण स्वेच्छेने आणि आनंदाने हे काम करायला तयार झाले. अमेरिकेतल्या ओक्लाहोमा इथल्या एका कॉलपोर्टरने (त्या वेळी पायनियरांना या नावाने ओळखलं जायचं) असं लिहिलं: “आम्ही ज्या ठिकाणी सेवा करायचो तिथे कोळशाच्या खाणी होत्या. आणि तिथे गरिबीचं प्रमाण खूप जास्त होतं.” ते म्हणाले, की बऱ्‍याचदा लोक जेव्हा गोल्डन एज  मासिकातला संदेश ऐकायचे तेव्हा “त्यांच्या डोळ्यांत पाणी यायचं.” शेवटी त्यांनी म्हटलं: “त्यांचं सांत्वन करणं हा खरंच आमच्यासाठी एक बहुमान होता.”

“पीक तर भरपूर आहे, पण कामकरी कमी आहेत,” या लूक १०:२ मधल्या येशूच्या शब्दांमुळे प्रचाराचं काम करणं किती गरजेचं आहे हे बायबल विद्यार्थ्यांना कळालं. ते वर्ष सरत गेलं तसा जगभरात राज्याच्या संदेशाची घोषणा करण्याचा त्यांचा निर्धार आणखीच पक्का झाला.

^ बंधू रदरफर्ड यांना काही वेळा “जज्‌” म्हटलं जायचं. कारण त्यांनी एके काळी अमेरिकेतल्या मिसूरी इथे विशेष न्यायाधीश म्हणून काम केलं होतं.