१९२३—शंभर वर्षांआधी
“१९२३ या वर्षी बऱ्याच रोमांचक गोष्टी घडतील अशी आमची आशा आहे,” असं १ जानेवारी, १९२३ च्या टेहळणी बुरूज अंकात म्हटलं होतं. त्यात असंही म्हटलं होतं, “या जगातल्या, दुःखाखाली दबलेल्या लोकांना पुढे एक नवीन काळ येणार आहे त्याबद्दल खातरीने सांगणं . . . हा आमच्यासाठी खरंच एक मोठा बहुमान आहे आणि आम्हाला लाभलेला आशीर्वाद आहे.” १९२३ हे वर्ष खरंच खूप प्रोत्साहन देणारं ठरणार होतं. कारण त्या वर्षी सभांमध्ये, अधिवेशनांमध्ये आणि प्रचार कार्यामध्ये बरेच मोठमोठे बदल व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे बायबल विद्यार्थ्यांमधली एकता आणखीन मजबूत होणार होती.
सभांमुळे एकता वाढली
बायबल विद्यार्थ्यांना एकतेने मिळून उपासना करता यावी म्हणून संघटनेने या वर्षादरम्यान काही बदल केले. आठवड्याच्या ‘प्रार्थना आणि स्तुतीच्या सभेत’ ज्या वचनावर चर्चा केली जायची ते वचन आणि त्याचं स्पष्टीकरण टेहळणी बुरूज मध्ये नंतर प्रकाशित केलं जायचं. तसंच, बायबल विद्यार्थी त्यानंतर एक कॅलेंडरसुद्धा प्रकाशित करू लागले. त्यात प्रत्येक आठवड्याच्या सभेत कोणत्या वचनावर चर्चा केली जाईल, तसंच प्रत्येक दिवशी कौटुंबिक उपासनेत आणि व्यक्तिगत अभ्यासाच्या वेळी कोणतं गाणं गायचं आहे हेसुद्धा सांगितलेलं असायचं.
‘प्रार्थना आणि स्तुतीच्या सभेत’ बायबल विद्यार्थी साक्षसुद्धा द्यायचे. त्यात ते प्रचार कार्यात आलेला अनुभव सांगायचे, यहोवाला धन्यवाद द्यायचे, गीत गायचे आणि प्रार्थनासुद्धा करायचे. १९२३ ला १५ वर्षांची असताना इवा बार्नी या बहिणीचा बाप्तिस्मा झाला. तो काळ आठवून ती म्हणते: “जर एखाद्याला साक्ष द्यायची असेल तर तो उभा राहायचा आणि त्याला जे बोलायचंय ते सांगायचा. जसं की, ‘प्रभूने मला जो चांगुलपणा दाखवलाय त्यासाठी मी त्याचा खूप आभारी आहे.’” काही भावांना साक्ष द्यायला खूप आवडायचं. अशाच एका वृद्ध भावाबद्दल सिस्टर बार्नी यांनी सांगितलं: “ब्रदर गॉडविन यांच्याकडे प्रभूला धन्यवाद देण्यासाठी बऱ्याच गोष्टी असायच्या. पण जेव्हा त्यांच्या पत्नीच्या लक्षात यायचं की सभा चालवणारे भाऊ त्यांच्या बोलण्यामुळे अस्वस्थ होत आहेत, तेव्हा त्यांची पत्नी ब्रदर गॉडविनचा कोट हळूच खेचायची आणि त्यानंतर ते गप्प बसायचे.”
महिन्यातून एकदा प्रत्येक वर्ग (मंडळी), प्रार्थना आणि स्तुतीची एक खास सभा भरवायचा. या सभेबद्दल १ एप्रिल, १९२३ च्या टेहळणी बुरूज अंकात असं म्हटलं होतं: “अर्धी सभा ही सेवाकार्यात आलेले अनुभव सांगण्यासाठी आणि भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी असली पाहिजे. . . . आमची आशा आहे की अशा सभांमुळे भाऊबहिणींमधलं नातं आणखी मजबूत होईल.”
कॅनडामधल्या व्हँकूव्हर इथे राहणाऱ्या चार्ल्स मार्टिन नावाच्या भावाला या सभांमधून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. त्या वेळी ते १९ वर्षांचे होते आणि एक ‘वर्ग कामकरी’ (मंडळीचे प्रचारक) होते. या सभांबद्दल आठवून त्यांनी एकदा म्हटलं: “घरोघरच्या प्रचारात कसं बोलायचं हे पहिल्यांदा मी इथेच शिकलो. बऱ्याचदा भाऊबहीण घरोघरच्या प्रचारात आलेले अनुभव सांगायचे. यामुळे प्रचारात कसं बोलायचं आणि एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर द्यायचं याबद्दल मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.”
प्रचार कार्यामुळे एकता वाढली
भाऊबहिणींना प्रचार करता यावा म्हणून “सेवेचे दिवस” ठरवले जायचे. यामुळेसुद्धा त्यांच्यातली एकता आणखी वाढली. १ एप्रिल, १९२३ च्या टेहळणी बुरूज अंकात याबद्दल अशी घोषणा करण्यात आली होती: “भाऊबहिणींमधली एकता मजबूत व्हावी म्हणून . . . मंगळवार १ मे, १९२३ हा दिवस सेवेचा दिवस म्हणून ठरवला जात आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी . . . सर्व मंडळ्यामधल्या प्रचारकांनी या कामामध्ये भाग घ्यावा.”
तरुण बायबल विद्यार्थ्यांनीसुद्धा या कामात खूप आवेशाने सहभाग घेतला. हेजल बरफर्ड या त्या वेळी फक्त १६ वर्षांच्या होत्या. तो काळ आठवून त्यांनी म्हटलं: “बुलेटिन या मासिकात चर्चेसाठी नमुने असायचे (आजच्यासारखे चर्चेसाठी नमुने) आणि त्यामुळे प्रचारात जाण्याआधी आम्हाला सराव करता यायचा. a मी माझ्या आजोबांसोबत या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आवेशाने भाग घ्यायचे.” पण सिस्टर बरफर्डने अपेक्षाही केली नव्हती अशा प्रकारे त्यांचा विरोध झाला. याबद्दल त्या म्हणतात: “एका वृद्ध भावाला ठामपणे असं वाटत होतं, की मी प्रचारात लोकांशी नाही बोललं पाहिजे. त्या वेळी बायबल विद्यार्थ्यांमध्ये ‘तरुण आणि तरुणीसुद्धा’ येतात हे काही बांधवांना समजत नव्हतं. आणि त्यांनीसुद्धा आपल्या महान निर्माणकर्त्याची स्तुती करण्यात भाग घेतला पाहिजे हे त्यांना मान्य नव्हतं.” (स्तो. १४८:१२, १३) मग सिस्टर बरफर्डने काय केलं? त्यांनी हार मानली नाही. त्या प्रचार करत राहिल्या. आणि पुढे त्यांना गिलियड प्रशालेच्या दुसऱ्या वर्गाला उपस्थित राहता आलं. नंतर त्यांनी पनामा इथे मिशनरी म्हणून सेवा केली. तरुण भाऊबहिणींनी प्रचारात भाग नाही घेतला पाहिजे हा चुकीचा दृष्टिकोन काही काळानंतर बांधवांनी बदलला.
अधिवेशनांमुळे एकता वाढली
स्थानिक आणि प्रांतीय अधिवेशनांमुळेसुद्धा भाऊबहिणींमधली एकता मजबूत झाली. यांपैकी बऱ्याचशा अधिवेशनांमध्ये सेवाकार्यासाठी एक दिवस ठरवला जायचा. कॅनडामधल्या विनिपेगमध्येसुद्धा अशीच व्यवस्था करण्यात आली होती. अधिवेशनामध्ये आलेल्या सगळ्यांना ३१ मार्च रोजी संपूर्ण शहरात प्रचार कार्य करण्याचं प्रोत्साहन देण्यात आलं. अशा प्रकारे प्रचार कार्य केल्यामुळे भविष्यात होणाऱ्या वाढीसाठी एक पाया घालण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी विनिपेगमध्ये आणखी एक अधिवेशन झालं आणि जवळजवळ ७,००० लोक तिथे उपस्थित होते. त्याआधी कॅनडामध्ये झालेल्या अधिवेशनांमध्ये इतके लोक कधीच आले नव्हते.
१९२३ मधलं यहोवाच्या साक्षीदारांचं सगळ्यात महत्त्वाचं अधिवेशन हे १८-२६ ऑगस्टला कॅलिफोर्नियामधल्या लॉस
अँजिलीस इथे झालं. या अधिवेशनाच्या आधीच्या काही आठवड्यांत त्याबद्दल वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या. तसंच बायबल विद्यार्थ्यांनी ५,००,००० पेक्षा जास्त पत्रिका वाटल्या. शिवाय, सार्वजनिक आणि खासगी वाहनांवर बॅनरसुद्धा लावण्यात आले.२५ ऑगस्टच्या शनिवारी ब्रदर रदरफर्ड यांनी “मेंढरं आणि बकरे” हे भाषण दिलं. त्यात त्यांनी असं सांगितलं की “मेंढरं” हे असे नीतिमान लोक आहेत जे पृथ्वीवरच्या नंदनवनात कायम राहतील. त्यासोबतच त्यांनी एक ठरावसुद्धा वाचला. त्याचं नाव “एक इशारा” असं होतं. त्या ठरावामध्ये ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणी आणि त्यांची कामं कशी चुकीची आहेत हे सांगण्यात आलं. आणि प्रामाणिक मनाच्या लोकांनी ‘मोठ्या बाबेलमधून’ स्वतःला वेगळं करावं असं प्रोत्साहन त्यांना देण्यात आलं होतं. (प्रकटी. १८:२, ४) नंतर, संपूर्ण जगभरातल्या आवेशी बायबल विद्यार्थ्यांनी या ठरावाच्या लाखो प्रती वाटल्या.
“अशा सभांमुळे भाऊबहिणींमधलं नातं आणखी मजबूत होईल”
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जवळजवळ ३०,००० लोकांनी ब्रदर रदरफर्ड यांचं जाहीर भाषण ऐकलं. त्या भाषणाचा विषय होता: “सर्व राष्ट्रं हर्मगिदोनच्या दिशेने जात आहेत, पण सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीच मरणार नाहीत.” अधिवेशनासाठी भरपूर लोक येतील याचा अंदाज असल्यामुळे बायबल विद्यार्थ्यांनी लॉस अँजिलीसमध्ये नवीनच बांधलेलं स्टेडियम भाड्याने घेतलं. सगळ्यांना हा कार्यक्रम व्यवस्थित ऐकता यावा म्हणून बांधवांनी स्टेडियममध्ये असलेले लाऊडस्पिकर वापरले. त्या वेळी या तंत्रज्ञानाचा नवीनच शोध लागला होता. इतर अनेकांनी हा कार्यक्रम रेडिओवर ऐकला.
आंतरराष्ट्रीय वाढ
१९२३ या वर्षी, आफ्रिका, युरोप, भारत आणि दक्षिण अमेरिकेमध्ये प्रचार कार्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. भारतातल्या ए. जे. जोसफ नावाच्या भावाने त्यांची पत्नी आणि सहा मुलांची जबाबदारी सांभाळून हिंदी, तमीळ, तेलगु आणि उर्दु भाषेत साहित्यं प्रकाशित करायला मदत केली.
सिएरा लिओनमधल्या अल्फ्रेड जोसफ आणि लिओनार्ड ब्लॅकमन या बायबल विद्यार्थ्यांनी ब्रुकलिन इथल्या मुख्यालयाला मदतीसाठी एक पत्र लिहिलं. १४ एप्रिल, १९२३ ला त्यांना त्याचं उत्तर मिळालं. त्याबद्दल सांगताना अल्फ्रेड म्हणतात: “त्या रात्री शनिवारी खूप उशीर झाला होता आणि तेवढ्यात एक फोन आला.” समोरून खणखणीत आवाजात एक माणूस बोलत होता. त्याने विचारलं: “प्रचारकांसाठी वॉचटावर सोसायटीला तुम्हीच पत्र लिहिलं होतं का?” अल्फ्रेड यांनी हो असं उत्तर दिलं. त्या माणसाने म्हटलं: “बरं, त्यांनी मला पाठवलं आहे.” तो आवाज विलियम आर. ब्राऊन या बांधवाचा होता. त्या दिवशी ते त्यांची पत्नी अँटोनिया आणि त्यांच्या दोन मुली लुईस आणि लुसी यांच्यासोबत कॅरिबियनहून आले होते. ब्रदर अल्फ्रेड आणि लिओनार्ड यांना या नवीन प्रचारकांची जास्त वाट पाहावी लागली नाही.
ब्रदर अल्फ्रेड पुढे म्हणतात: “दुसऱ्या दिवशी मी आणि लिओनार्ड नेहमीप्रमाणे बायबलवर चर्चा करत होतो. तेव्हा एक उंचापुरा माणूस दारात येऊन उभा राहिला. ते ब्रदर ब्राऊन होते. सत्याबद्दल त्यांना इतका आवेश होता की दुसऱ्याच दिवशी त्यांना जाहीर भाषण द्यायचं होतं.” एक महिन्याच्या आतच ब्रदर ब्राऊन यांनी त्यांच्यासोबत आणलेलं सगळं साहित्यं वाटून टाकलं. त्यानंतर लवकरच त्यांना आणखी ५,००० पुस्तकं मिळाली. आणि ती संपत नाही तोवरच आणखी पुस्तकांची गरज पडली. पण ब्रदर ब्राऊनला पुस्तकं विकणारा म्हणून ओळखलं जात नव्हतं. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात यहोवाची आवेशाने सेवा करत असताना त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये नेहमी शास्त्रवचनं वापरली. त्यामुळे त्यांचं बायबल ब्राऊन असं नाव पडलं.
त्या काळादरम्यान, जर्मनीमधलं बरमेन इथलं शाखा कार्यालय भाऊबहिणींना पुरत नव्हतं. तसंच बांधवांच्या ऐकण्यात आलं होतं, की फ्रान्सचं सैन्य लवकरच त्या शहरावर कब्जा मिळवणार आहे. त्यामुळे बायबल विद्यार्थ्यांनी छपाईची कामं करण्यासाठी माक्देबर्ग इथे एक मोठी बिल्डिंग घेतली. १९ जूनला बांधवांनी छपाईच्या यंत्रांची आणि इतर गोष्टींची बांधाबांध पूर्ण केली. आणि माक्देबर्ग इथल्या नवीन बेथेलमध्ये ते राहायला गेले. बांधवांना नवीन बेथेलमध्ये हलवण्यात आलंय ही बातमी मुख्यालयाला कळवण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रांत अशी बातमी आली, की फ्रान्सच्या सैन्याने बरमेन शहरावर कब्जा केलाय. खरंच बांधवांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, की यहोवाने त्यांना कसं सुरक्षित ठेवलं आणि त्यांना कशी मदत केली.
जॉर्ज यंग या बांधवाने आनंदाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी बराच प्रवास केला होता. ब्राझीलमध्ये त्यांनी एक नवीन शाखा सुरू केली आणि पोर्तुगीज भाषेत ते टेहळणी बुरूज प्रकाशित करू लागले. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी ७,००० पेक्षा जास्त पुस्तकं आणि पत्रिका वाटल्या. ते ब्राझीलमध्ये आल्यामुळे सारा फर्गुसन या बहिणीला खूप आनंद झाला. कारण ती १८९९ पासून टेहळणी बुरूज वाचत होती, पण तिला बाप्तिस्मा घेऊन तिचं समर्पण जाहीर करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. त्याच्या काही महिन्यांनंतर तिने आणि तिच्या चार मुलांनी शेवटी बाप्तिस्म्याचं महत्त्वाचं पाऊल उचललं.
“आनंदाने आपलं काम पुढे करत राहू या”
सभांमध्ये, सेवाकार्यामध्ये आणि अधिवेशनांमध्ये जे बदल झाले त्यामुळे बायबल विद्यार्थ्यांमधली एकता वाढली. आणि हीच गोष्ट १५ डिसेंबर, १९२३ च्या टेहळणी बुरूज अंकात सांगण्यात आली. तिथे म्हटलं होतं: “मंडळ्या आता चांगल्या आध्यात्मिक स्थितीत आहेत . . . ही गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे. . . . तर मग आपण आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करू या आणि पुढच्या वर्षाची पूर्ण आवेशाने आणि निश्चयाने वाट पाहू या आणि आनंदाने आपलं काम पुढे करत राहू या.”
१९२४ हे वर्ष बायबल विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असणार होतं. ब्रुकलिनमधल्या मुख्यालयाच्या जवळच स्टेटन आयलॅन्ड इथे काही बांधव बऱ्याच महिन्यांपासून काम करत होते. १९२४ च्या सुरुवातीला हे नवीन बांधकाम पूर्ण झालं. या बांधवांमुळे भाऊबहिणींमधली एकता वाढली आणि आधी शक्य नव्हतं अशा मार्गांनी आनंदाचा संदेश सांगणं शक्य झालं.
a आता आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका.