अभ्यास करण्यासाठी एक टीप
मुख्य मुद्द्यांवर पुन्हा विचार करा
तुम्हाला नुकतंच अभ्यास केलेल्या गोष्टी आठवायला कधीकधी कठीण जातं का? आपल्या सर्वांसोबत कधी न कधी असं झालं असेल. मग कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला त्या आठवायला मदत होईल? मुख्य मुद्द्यांवर पुन्हा विचार करून आपल्याला मदत होऊ शकते.
अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचे विचार लक्षात घेण्यासाठी मध्येमध्ये थांबा. प्रेषित पौलने आपलं पत्र वाचणाऱ्या भाऊबहिणींना हे करण्यासाठी कशी मदत केली ते लक्षात घ्या. त्याने म्हटलं: “मुख्य मुद्दा हा.” (इब्री ८:१) असं म्हणून त्याने आपलं पत्र वाचणाऱ्यांना तो मांडत असलेला तर्क समजून घ्यायला आणि प्रत्येक मुद्दा मुख्य विषयाशी कसा संबंधित आहे हे समजून घ्यायला मदत केली.
अभ्यास केलेल्या मुख्य मुद्द्यांवर विचार करण्यासाठी तुम्ही अभ्यास संपल्यानंतर दहा मिनिटं वेळ राखून ठेवू शकता. जर तुम्हाला मुद्दे आठवत नसतील तर तुम्ही उपशीर्षकं पाहू शकता किंवा प्रत्येक परिच्छेदाचं पहिलं वाक्य वाचू शकता. जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं तर ते स्वतःच्या शब्दांत समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. मुख्य मुद्द्यांवर पुन्हा विचार केल्यानंतर आपली स्मरणशक्तीच वाढणार नाही, तर जे वाचलंय त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हेही स्पष्टपणे दिसेल.