व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन इस्राएली लोकांसाठी संगीत किती महत्त्वाचं होतं?

संगीत हा प्राचीन इस्राएलच्या संस्कृतीचाच एक भाग होतं. बायबलमध्ये संगीत वाद्य आणि गायन यांचा बऱ्‍याच ठिकाणी उल्लेख आहे. खरंतर बायबलचा बराचसा भाग संगीतात रचण्यात आलाय. उदाहरणार्थ, स्तोत्रं, गीतरत्न आणि विलापगीत ही पुस्तकं गाण्यासाठीच रचण्यात आली आहेत. म्युझिक इन बिब्लिकल लाईफ या पुस्तकात म्हटलंय, की बायबलमध्ये “एका अशा लोकांच्या समाजाचं चित्र रेखाटण्यात आलंय, ज्यांच्या दररोजच्या कामातसुद्धा संगीताचा समावेश होता.”

दररोजच्या जीवनात संगीताचा वापर. इस्राएली लोक आपल्या भावना व्यक्‍त करण्यासाठी संगीत वाजवायचे. (यश. ३०:२९) राज्याभिषेक, सण आणि लष्करी विजय साजरा करायला स्त्रिया आनंदाने गाणी गाऊन आणि नृत्य करून डफ वाजवायच्या. (शास्ते ११:३४; १ शमु. १८:६, ७; १ राजे १:३९, ४०) इस्राएली लोक एखाद्याचा मृत्यू झाल्यावर दुःख व्यक्‍त करण्यासाठीसुद्धा शोकगीतं गायचे. (२ इति. ३५:२५) मॅक्लिनटॉक आणि स्ट्राँग यांच्या सायक्लोपिडीयामध्ये सांगितल्याप्रमाणे “इब्री लोक संगीतप्रेमी होते” यात काहीच शंका नाही.

शाही दरबारात संगीताचा वापर. इस्राएली राजांना संगीत खूप आवडायचं. शौल राजाने त्याच्या शाही दरबारात दावीदला संगीतकार म्हणून बोलवलं होतं. (१ शमु. १६:१८, २३) नंतर स्वतः दावीद राजा बनला तेव्हा त्याने नवनवीन संगीत वाद्यांचा शोध लावला, सुंदर गीतं रचली आणि यहोवाच्या मंदिरात वाद्यं वाजवणाऱ्‍यांची व्यवस्था केली. (२ इति. ७:६; आमो. ६:५) तसंच, शलमोन राजाच्या दरबारात बरेच स्त्री-पुरुष गायक होते.—उप. २:८.

उपासनेत संगीताचा वापर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्राएली लोक यहोवाची उपासना करण्यासाठी संगीताचा वापर करायचे. एका अहवालाप्रमाणे यरुशलेमच्या मंदिरात ४,००० संगीतकारांनी संगीतवाद्य वाजवली होती. (१ इति. २३:५) त्यांनी झांजा, तंतुवाद्यं, वीणा आणि कर्णे वाजवले. (२ इति. ५:१२) पण संगीतात कुशल असणारे इतकेच लोक संगीताचा वापर करून यहोवाची उपासना करत नव्हते. तर यरुशलेममध्ये वार्षिक सणांसाठी जात असताना अनेक इस्राएली चढणीचं गीत गायचे. (स्तो. १२०-१३४) तसंच, यहुदी लिखाणांनुसार, इस्राएली लोक वल्हांडण भोजनाच्या वेळी हालेल स्तोत्रं a गायचे.

देवाच्या लोकांसाठी संगीत आजसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. (याको. ५:१३) आपल्या उपासनेचा भाग म्हणून आपण गीत गातो. (इफिस. ५:१९) सोबत मिळून गीत गायल्यामुळे आपल्यातली एकी आणखी घट्ट होते. (कलस्सै. ३:१६) तसंच कठीण परीक्षांचा सामना करताना गीतांमुळे आपल्याला बळ मिळतं. (प्रे. कार्यं १६:२५) संगीत हा यहोवावर असलेला विश्‍वास आणि त्याच्यावर असलेलं प्रेम दाखवण्याचा एक सुंदर मार्ग आहे.

a यहुदी लोक स्तोत्रं ११३ ते ११८ मध्ये असलेल्या गीतांना हालेल स्तोत्रं म्हणायचे. ही गीतं यहोवाच्या स्तुतीसाठी गायली जायची.