अभ्यास लेख ४२
गीत १०३ मेंढपाळ—माणसांच्या रूपात भेटी!
‘माणसांच्या रूपात असलेल्या भेटींबद्दल’ कदर असल्याचं दाखवा
“तो उंचावर चढून गेला तेव्हा . . . त्याने माणसांच्या रूपात भेटी दिल्या.”—इफिस. ४:८.
या लेखात:
सहायक सेवक, वडील आणि विभागीय पर्यवेक्षक आपल्याला कशी मदत करतात आणि ही विश्वासू माणसं आपल्यासाठी जे करतात त्याबद्दल आपण कशी कदर दाखवू शकतो ते पाहा.
१. आपल्याला येशूकडून कोणत्या काही भेटी मिळाल्या आहेत?
कोणताही माणूस येशू इतका उदार नाही. पृथ्वीवर असताना, त्याने इतरांना मदत करण्यासाठी आपल्या चमत्कारिक शक्तीचा उदारपणे उपयोग केला. (लूक ९:१२-१७) त्याने आपल्यासाठी स्वतःचं जीवन अर्पण करून सर्वात मोठी देणगी दिली. (योहा. १५:१३) पुनरुत्थान झाल्यापासून येशू अशाच प्रकारे उदारता दाखवत आला आहे. त्याने वचन दिलं होतं की तो आपल्या पित्याकडे प्रार्थना करेल आणि त्याच्या शिष्यांवर पवित्र शक्ती ओतायला सांगेल. आणि त्याने तसंच केलं. त्यामुळे त्यांना सत्य शिकून घेता आलं आणि समजून घेता आलं आणि सांत्वन मिळालं. (योहा. १४:१६, १७, तळटीप; १६:१३) येशू आजही मंडळीच्या सभांद्वारे आपल्याला संपूर्ण जगभरात शिष्य बनवण्यासाठी तयार करतोय.—मत्त. २८:१८-२०.
२. इफिसकर ४:७, ८ मध्ये सांगितलेल्या “माणसांच्या रूपात भेटी” कोण आहेत?
२ येशूच्या आणखी एका भेटीचा विचार करा. प्रेषित पौलने लिहिलं की येशू स्वर्गात गेल्यानंतर त्याने “माणसांच्या रूपात भेटी दिल्या.” (इफिसकर ४:७, ८ वाचा.) पौलने स्पष्ट केलं की येशूने मंडळीला वेगवेगळ्या मार्गाने मदत करण्यासाठी या भेटी दिल्या. (इफिस. १:२२, २३; ४:११-१३) आज या ‘माणसांच्या रूपात दिलेल्या भेटींमध्ये’ सहायक सेवक, मंडळीतले वडील आणि विभागीय पर्यवेक्षक यांचा समावेश होतो. a हे खरंय की ते अपरिपूर्ण आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात. (याको. ३:२) पण आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मदत करण्यासाठी त्यांचा वापर करतो. त्यामुळे ते त्याच्याकडून आपल्याला मिळालेल्या भेटीच आहेत.
३. आपण सगळेच “माणसांच्या रूपात भेटी” असलेल्या भावांना पाठिंबा कसा देऊ शकतो ते समजावून सांगा.
३ मंडळीला मजबूत करण्यासाठी येशूने “माणसांच्या रूपात भेटी” दिल्या आहेत. (इफिस. ४:१२) पण ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सगळेच त्यांना मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्यापैकी काही जण राज्य सभागृहाच्या बांधकामात काम करतात. तर इतर जण त्यांच्या खाण्या-पिण्याची, येण्या-जाण्याची सोय करून किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांना मदत करून या कामाला पाठिंबा देतात. त्याचप्रमाणे आपण जे बोलतो आणि करतो त्याद्वारे आपण सगळेच जण सहायक सेवक, मंडळीतले वडील आणि विभागीय पर्यवेक्षक यांच्या मेहनतीला पाठिंबा देऊ शकतो. पण हे भाऊ घेत असलेल्या मेहनतीमुळे आपल्याला कसा फायदा होतो? आणि आपण त्यांना आणि “माणसांच्या रूपात भेटी” देणाऱ्या येशूला कदर कशी दाखवू शकतो? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढे पाहणार आहोत.
“उपयोगी सेवा करणारे” सहायक सेवक
४. पहिल्या शतकात सहायक सेवकांनी केलेल्या काही “उपयोगी सेवा” कोणत्या होत्या?
४ पहिल्या शतकात काही भावांना सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं होतं. (१ तीम. ३:८) पौलने ज्यांचा “उपयोगी सेवा करणारे” म्हणून उल्लेख केला होता ते कदाचित हेच भाऊ असावेत. (१ करिंथ. १२:२८) यावरून असं दिसतं की वडिलांना शिकवायचं आणि मेंढपाळ म्हणून असलेली जबाबदारी पार पाडायचं काम करता यावं, म्हणून सहायक सेवक आवश्यक गोष्टींची काळजी घेत होते. उदाहरणार्थ, सहायक सेवकांनी शास्त्रवचनांच्या प्रती बनवण्याच्या कामात मदत केली असेल किंवा प्रती बनवण्यासाठी लागणारं साहित्यं खरेदी केलं असेल.
५. आज सहायक सेवक करत असलेल्या काही उपयोगी सेवा कोणत्या आहेत?
५ तुमच्या मंडळीत सहायक सेवक करत असलेल्या काही उपयोगी सेवांचा विचार करा. (१ पेत्र ४:१०) त्यांना मंडळीच्या जमाखर्चाची किंवा प्रचाराच्या क्षेत्राची काळजी घेण्यासाठी, प्रकाशनं मागवण्यासाठी आणि ते प्रचारकांना उपलब्ध करून देण्यासाठी, ऑडिओ-व्हिडिओ उपकरणं चालवण्यासाठी, अटेंडन्ट म्हणून काम करण्यासाठी किंवा सभागृहाची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलं जाऊ शकतं. मंडळीचं काम व्यवस्थित चालावं म्हणून या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. (१ करिंथ. १४:४०) यासोबतच काही सहायक सेवक जीवन आणि सेवाकार्य सभेचे काही भाग हाताळतात आणि जाहीर भाषण देतात. तसंच, गट पर्यवेक्षकांना मदत करण्यासाठीसुद्धा सहायक सेवक नियुक्त केले जाऊ शकतात. कधीकधी वडील, भाऊबहिणींना मेंढपाळ भेटी देण्यासाठीसुद्धा सहायक सेवकांना सोबत घेऊन जातात.
६. आपल्या सहायक सेवकांची प्रशंसा करण्याची काही कारणं कोणती आहेत?
६ सहायक सेवक करत असलेल्या मदतीमुळे मंडळीला कसा फायदा होतो? बोलिव्हिया इथे राहणारी बिबर्ली b म्हणते: “आमच्या सहायक सेवकांचे मला खरंच खूप आभार मानावेसे वाटतात. ते करत असलेल्या कामामुळेच मी सभांचा पूर्ण आनंद घेऊ शकते, गीत गाऊ शकते, उत्तरं देऊ शकते, भाषण नीट ऐकू शकते. आणि व्हिडिओ तसंच चित्रांमधून शिकू शकते. ते आमच्या सुरक्षेची काळजी घेतात तसंच झूमवर सभेला उपस्थित असलेल्या भाऊबहिणींना मदत करतात. सभेनंतर ते साफ-सफाईच्या कामात मदत करतात. ते मंडळीचा जमाखर्च पाहतात आणि आमच्याकडे गरजेची प्रकाशनं आहेत की नाही याची खातरी करतात. मी खरंच त्यांची खूप आभारी आहे!” कोलंबियामध्ये राहणाऱ्या लेस्ली नावाच्या एका बहिणीचा पती मंडळीत वडील म्हणून सेवा करतो. ती बहीण म्हणते: “माझे पती वेगवेगळ्या नेमणुका सांभाळण्यासाठी सहायक सेवकांवर अवलंबून असतात. सहायक सेवक जर नसते तर ते कामात आणखी जास्त व्यस्त झाले असते. त्यामुळे सहायक सेवक उत्साहाने आणि स्वेच्छेने जी मदत करतात त्यासाठी खरंच मला त्यांचं कौतुक करावसं वाटतं.” तुम्हालाही तसंच वाटत असेल यात काही शंका नाही.—१ तीम. ३:१३.
७. आपण सहायक सेवकांबद्दल कदर वाटत असल्याचं कसं दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
७ सहायक सेवकांबद्दल आपल्याला कदर वाटत असली, तर बायबल आपल्याला अशी विनंती करतं, की आपण “आपली कृतज्ञता दाखवली पाहिजे.” (कलस्सै. ३:१५) फिनलंडमध्ये सेवा करणारे एक वडील, क्रिझस्टॉफ सहायक सेवकांना कदर कशी दाखवतात याबद्दल म्हणतात: “मी सहायक सेवकांना एखादं पोस्टकार्ड किंवा मेसेज पाठवतो. त्यात मी एखादं वचन लिहितो आणि कोणत्या विशिष्ट मार्गाने त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं किंवा मला त्यांचे किती आभार मानावेसे वाटतात, हे मी त्यांना सांगतो.” न्यू कॅलेडोनीयामध्ये राहणारं पास्कल आणि जाएल हे जोडपं खासकरून सहायक सेवकांसाठी प्रार्थना करतात. पास्कल म्हणतो, की “अलीकडे आम्ही मंडळीतल्या या नियुक्त भावांसाठी खूप प्रार्थना, विनंत्या करतो आणि यहोवाचे आभार मानतो.” यहोवा अशा प्रार्थना ऐकतो आणि त्यामुळे संपूर्ण मंडळीला फायदा होतो.—२ करिंथ. १:११.
‘तुमच्यामध्ये मेहनत घेणारे’ मंडळीतले वडील
८. पहिल्या शतकातले वडील खूप ‘मेहनत घ्यायचे’ असं पौलने का लिहिलं? (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३)
८ पहिल्या शतकातल्या वडिलांनी मंडळीमध्ये खूप मेहनत घेतली. (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३ वाचा; १ तीम. ५:१७) ते मंडळीच्या सभा चालवायचे आणि वडीलवर्ग या नात्याने एकत्र मिळून मंडळीसाठी निर्णय घ्यायचे. अशा प्रकारे ते मंडळीचं “नेतृत्व” करायचे. तसंच, ते भाऊबहिणींना “शिकवायचं” काम करायचे, म्हणजे मंडळीचं संरक्षण करण्यासाठी ते प्रेमळपणे त्यांना विशिष्ट सल्ले द्यायचे. (१ थेस्सलनी. २:११, १२; २ तीम. ४:२) यासोबतच ते आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आणि स्वतःला आध्यात्मिक रितीने मजबूत ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यायचे.—१ तीम. ३:२, ४; तीत १:६-९.
९. आज मंडळीतले वडील कोणकोणत्या जबाबदाऱ्या सांभाळतात?
९ वडील आजसुद्धा व्यस्त असतात. ते आवेशी प्रचारक म्हणून काम करतात. (२ तीम. ४:५) ते प्रचाराच्या कामात आवेशाने पुढे असतात. तसंच ते मंडळीच्या क्षेत्रात प्रचारकार्याची योजना करतात. शिवाय ते प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देतात. ते दयाळूपणे आणि कोणताही भेदभाव न करता निर्णय घेतात. एखादा भाऊ किंवा बहीण गंभीर पाप करते तेव्हा वडील त्यांना यहोवासोबतची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी मदत करायचा प्रयत्न करतात. त्याच वेळी ते मंडळीला शुद्ध ठेवायची काळजी घेतात. (१ करिंथ. ५:१२, १३; गलती. ६:१) वडील खासकरून मेंढपाळ म्हणूनसुद्धा ओळखले जातात. (१ पेत्र ५:१-३) ते चांगल्या प्रकारे तयार केलेली आणि शास्त्रवचनांवर आधारित असलेली भाषणं देतात, मंडळीतल्या प्रत्येकाशी ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि मेंढपाळ भेटी देतात. काही वडील आपल्या इतर जबाबदाऱ्यांसोबतच राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पात तसंच सभागृहांची देखभाल करायच्या कामात, अधिवेशनाचं आयोजन करण्याच्या कामात आणि हॉस्पिटल संपर्क समितीत तसंच पेशंटला भेट देणाऱ्या गटाच्या कामातही मदत करतात. थोडक्यात, वडील आपल्यासाठी खरंच खूप मेहनत घेतात!
१०. आपण आपल्या मेहनती वडिलांची कदर का करतो?
१० मेंढपाळ आपली चांगली काळजी घेतील आणि त्यामुळे आपण ‘परत कधीच घाबरणार नाही आणि आपल्याला कधीच भीती वाटणार नाही’ असं यहोवाने आधीच सांगितलं होतं. (यिर्म. २३:४) फिनलंडमध्ये राहणाऱ्या जोहॅनाला हे वचन किती खरंय हे अनुभवायला मिळालं. तिची आई खूप आजारी होती. तो काळ आठवत ती म्हणते: “माझ्या भावना इतरांना सांगणं मला कठीण जात होतं. पण ज्यांच्यासोबत माझी इतकी ओळख नव्हती अशा एका वडिलांनी मला खूप धीर दिला. त्यांनी माझ्यासोबत प्रार्थना केली आणि मला यहोवाच्या प्रेमाची खातरी करून दिली. त्यांनी नेमकं काय म्हटलं हे मला आठवत नाही, पण त्यामुळे मला खूप सुरक्षित वाटलं. मला खातरी आहे की यहोवाने त्यांना अगदी योग्य वेळी मला मदत करण्यासाठी पाठवलं होतं.” तुमच्या मंडळीतल्या वडिलांनी तुम्हाला कशी मदत केली आहे?
११. आपण वडिलांना कदर कशी दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
११ वडील “करत असलेल्या कामाबद्दल” आपण त्यांना कदर दाखवावी अशी यहोवाची इच्छा आहे. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) फिनलंडमध्ये राहणारी हेन्रीएटा नावाची आणखी एक बहीण म्हणते: “मंडळीतले वडील स्वेच्छेने इतरांना मदत करतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे जास्त वेळ आहे किंवा शक्ती आहे किंवा त्यांच्या जीवनात समस्या नाहीत. म्हणूनच काही वेळा मी त्यांना इतकंच म्हणते की ‘तुम्ही मंडळीची खूप चांगली काळजी घेता. खूप कौतुक वाटतं तुमचं.’” तुरकिएमध्ये c राहणारी सेरा नावाची एक बहीण म्हणते: “वडिलांना आपलं काम करत राहण्यासाठी ‘इंधन’ लागतं, प्रोत्साहन लागतं. त्यामुळे आपण त्यांना एक कार्ड पाठवू शकतो, त्यांना घरी जेवायला बोलवू शकतो किंवा प्रचारकार्यात त्यांच्यासोबत काम करू शकतो.” तुमच्याही मंडळीत असे कोणी वडील आहेत का, ज्यांच्या मेहनतीबद्दल तुम्हाला कदर वाटते. तर मग ती कदर व्यक्त करण्याचे मार्ग शोधा.—१ करिंथ. १६:१८.
मंडळीला मजबूत करणारे विभागीय पर्यवेक्षक
१२. पहिल्या शतकात कोणत्या योजनेमुळे मंडळ्या मजबूत झाल्या? (१ थेस्सलनीकाकर २:७, ८)
१२ ख्रिस्त येशूने “माणसांच्या रूपात” ज्या भेटी दिल्या त्यात इतर मार्गांनी मंडळीची सेवा करणारे भाऊसुद्धा होते. येशूच्या मार्गदर्शनाखाली यरुशलेममधल्या वडिलांनी पौलला, बर्णबाला आणि इतरांना प्रवासी पर्यवेक्षक म्हणून पाठवलं. (प्रे. कार्यं ११:२२) का बरं? कारण ज्या प्रकारे सहायक सेवक आणि वडील मंडळीला मजबूत करत होते त्याच प्रकारे यांनीसुद्धा मंडळीला मजबूत करावं म्हणून येशूने असं केलं होतं. (प्रे. कार्यं १५:४०, ४१) या लोकांनी आपल्या आरामदायी जीवनाचा त्याग केला आणि इतरांना शिकवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपला जीवही धोक्यात घातला.—१ थेस्सलनीकाकर २:७, ८ वाचा.
१३. विभागीय पर्यवेक्षकांच्या काही जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?
१३ विभागीय पर्यवेक्षक सतत प्रवास करत असतात. काही जण तर मंडळ्यांमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जातात. दर आठवडी विभागीय पर्यवेक्षक अनेक भाषणं देतात, मेंढपाळ भेटी देतात आणि पायनियर सभा, वडिलांची सभा आणि क्षेत्रसेवेसाठी असणारी सभासुद्धा घेतात. ते भाषणं तयार करतात आणि विभागीय संमेलनाची आणि अधिवेशनाची योजना करतात. ते पायनियर प्रशालेत शिकवण्याचं काम करतात आणि विभागातल्या पायनियर भाऊबहिणींसोबत खास सभासुद्धा घेतात. तसंच, शाखा कार्यालयाने नेमून दिलेल्या आणि कधीकधी तातडीच्या असलेल्या काही जबाबदाऱ्यासुद्धा ते हाताळतात.
१४. आपल्या मेहनती विभागीय पर्यवेक्षकांची प्रशंसा करण्याची कोणती काही कारणं आपल्याजवळ आहेत?
१४ विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटींचा मंडळ्यांना कसा फायदा होतो? विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटींबद्दल बोलताना तुरकिएमधला एक भाऊ म्हणतो: “त्यांच्या प्रत्येक भेटीमुळे मला माझ्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी आणखी जास्त प्रेरणा मिळते. मी अनेक विभागीय पर्यवेक्षकांना भेटलोय. तरीही त्यांच्यापैकी एकानेही मला असं कधीच जाणवू दिलं नाही की ते खूप व्यस्त आहेत किंवा त्यांना माझ्याशी बोलायची इच्छा नाही.” आधी उल्लेख केलेल्या जोहॅनानेसुद्धा विभागीय पर्यवेक्षकांसोबत प्रचारकार्य केलं. पण त्यांना घरी कोणीही भेटलं नाही. ती म्हणते “तरीही मला तो दिवस नेहमी आठवतो. माझ्या दोन्ही बहिणी मला नुकत्याच सोडून दूर गेल्या होत्या. आणि मला त्यांची खूप आठवण येत होती. पण विभागीय पर्यवेक्षांनी मला अगदी प्रेमळपणे प्रोत्साहन दिलं आणि मला हे समजून घ्यायला मदत केली की यहोवाच्या सेवेत जरी आपल्याला कधीकधी एकमेकांपासून दूर जावं लागलं तरी नवीन जगात आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायच्या भरपूर संधी असतील.” तुमच्याही मनात कदाचित विभागीय पर्यवेक्षकांच्या अशाच चांगल्या आठवणी असतील.—प्रे. कार्यं २०:३७–२१:१.
१५. (क) ३ योहान ५-८ मध्ये सांगितल्याप्रमाणे, विभागीय पर्यवेक्षकांची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) नियुक्त करण्यात आलेल्या भावांच्या पत्नींबद्दल आपल्या मनात कदर का असली पाहिजे आणि आपण ती कशी दाखवू शकतो? (“ त्यांच्या पत्नींनाही विसरू नका” ही चौकट पाहा.)
१५ प्रेषित योहानने गायसला असं उत्तेजन दिलं, की त्याने त्याच्याकडे आलेल्या भावांचा पाहुणचार करावा आणि त्यांना ‘देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल अशा पद्धतीने निरोप द्यावा.’ (३ योहान ५-८ वाचा.) हा सल्ला लागू करायचा एक मार्ग म्हणजे आपण विभागीय पर्यवेक्षकांना जेवणासाठी बोलवू शकतो. तसंच, त्यांच्या भेटीदरम्यान होणाऱ्या प्रचारकार्यात सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा देऊ शकतो. आधी उल्लेख केलेली लेस्ली आणखी काही मार्गांनी त्यांच्याबद्दल कदर असल्याचं दाखवते. ती म्हणते: “यहोवाने त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या म्हणून मी प्रार्थना करते. मी आणि माझे पती त्यांना पत्रसुद्धा लिहितो. आणि त्यांच्या भेटीमुळे आम्हाला किती फायदा झालाय हेसुद्धा त्यांना सांगतो.” हे नेहमी लक्षात ठेवा, की विभागीय पर्यवेक्षक आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यामुळे कधीकधी त्यांनाही आजाराचा, चिंतेचा, इतकंच नाही तर निराशेचाही सामना करावा लागतो. पण तुमचे प्रेमळ शब्द किंवा तुम्ही दिलेली छोटीशी भेटवस्तू कदाचित ते करत असलेल्या प्रार्थनेचं उत्तर असेल!—नीति. १२:२५.
‘माणसांच्या रूपात असलेल्या भेटींची’ आपल्याला गरज आहे
१६. नीतिवचनं ३:२७ प्रमाणे भावांनी स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१६ संपूर्ण जगभरात “माणसांच्या रूपात भेटी” म्हणून सेवा करण्यासाठी भावांची खूप जास्त गरज आहे. तुम्ही बाप्तिस्मा घेतला असेल तर ‘इतरांचं भलं करण्याची तुमच्यात ताकद’ आहे का? (नीतिवचनं ३:२७ वाचा.) तुम्ही सहायक सेवक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी पात्र ठरू शकता का? वडील म्हणून सेवा करून तुम्ही तुमच्या भाऊबहिणींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकता का? d सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरता यावा म्हणून तुम्ही तुमच्या परिस्थितीत काही फेरबदल करू शकता का? येशूने तुमचा पूर्णपणे वापर करावा म्हणून ही प्रशाला तुम्हाला तयार करेल. पण आपण अजून पात्र नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर यहोवाला प्रार्थना करा. तुम्हाला दिलेली कोणतीही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडता यावी म्हणून त्याच्याजवळ पवित्र शक्ती मागा.—लूक ११:१३; प्रे. कार्यं २०:२८.
१७. ‘माणसांच्या रूपात असलेल्या भेटींमुळे’ आपला राजा ख्रिस्त येशूबद्दल कोणती गोष्टी सिद्ध होते?
१७ येशू “माणसांच्या रूपात भेटी” म्हणून ज्या भावांचा उपयोग करत आहे त्यामुळे या शेवटच्या काळात तोच आपलं नेतृत्व करत असल्याचा पुरावा आपल्याला मिळतो. (मत्त. २८:२०) मग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा भावांची तरतूद करणाऱ्या प्रेमळ, उदार आणि काळजी असणाऱ्या राजाचे आपण आभार मानू नयेत का? तर मग वेगवेगळ्या मार्गांनी अशा मेहनती भावांबद्दल कदर असल्याचं दाखवा. तसंच, “प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान” देणाऱ्या यहोवा देवाचे आभार मानायचं कधीच विसरू नका.—याको. १:१७.
गीत ९९ लाखो आपण भाऊबहिणी
a नियमन मंडळाचे सदस्य, नियमन मंडळाचे सहायक, शाखा समितीचे सदस्य आणि इतर मार्गांनी सेवा करणारे भाऊसुद्धा “माणसांच्या रूपात भेटी” आहेत.
b काही नावं बदलण्यात आली आहेत.
c आधी याला टर्की म्हटलं जायचं.
d सहायक सेवक किंवा वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवण्यासाठी काय करायची गरज आहे याबद्दलची माहिती नोव्हेंबर २०२४ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या “भावांनो—सहायक सेवक बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का?” आणि “भावांनो—मंडळीत वडील म्हणून सेवा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात?” या लेखांमध्ये पाहा.