अभ्यास लेख ४०
गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र
यहोवा “दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो”
“तो दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो; तो त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतो.”—स्तो. १४७:३.
या लेखात:
ज्यांच्या मनावर जखमा झाल्या आहेत त्यांची यहोवाला खूप काळजी आहे. तो आपलं दुःख कसं कमी करतो आणि इतरांना सांत्वन द्यायला तो कशी मदत करतो हे पाहू या.
१. यहोवाला त्याच्या सेवकांबद्दल कसं वाटतं?
पृथ्वीवर असलेल्या आपल्या सेवकांसोबत कायकाय होतंय हे यहोवाला चांगलं माहीत आहे. ते कधी दुखात असतात आणि कधी आनंदात असतात हे त्याला समजतं. (स्तो. ३७:१८) कठीण परिस्थितीचा सामना करूनही आपण जेव्हा त्याला सगळ्यात चांगलं ते देतो आणि त्याची सेवा करतो, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! तो नेहमी आपल्याला मदत करायला आणि सांत्वन करायला तयार असतो.
२. दुःखी मनाच्या लोकांसाठी यहोवा काय करतो आणि तो घेत असलेल्या काळजीचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
२ स्तोत्र १४७:३ मध्ये सांगितलंय की यहोवा दुःखी मनाच्या लोकांच्या ‘जखमांवर पट्टी बांधतो.’ या वचनात यहोवा निराश असणाऱ्या लोकांची कशी प्रेमाने काळजी घेतो याबद्दल सांगितलंय. यहोवा ज्या पद्धतीने आपली काळजी घेतो त्याचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? एका उदाहरणाकडे लक्ष द्या. एक कुशल डॉक्टर एका जखमी झालेल्या व्यक्तीला बरं करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करू शकतो. पण त्याचा फायदा होण्यासाठी त्या जखमी व्यक्तीला डॉक्टरच्या प्रत्येक सूचनेचं काळजीपूर्वक पालन करणं गरजेचं आहे. या लेखात, यहोवा मनाने खचलेल्या लोकांना त्याच्या वचनात काय म्हणतो ते पाहू या. तसंच आपण त्याचा प्रेमळ सल्ला कसा लागू करू शकतो, तेसुद्धा पाहू या.
आपण मौल्यवान आहोत या गोष्टीची यहोवा खातरी देतो
३. आपली काहीच लायकी नाही असं काही जणांना का वाटतं?
३ आज सगळीकडे प्रेम आटत चाललंय. दुःखाची गोष्ट म्हणजे, आज बऱ्याच जणांना खूप वाईट वागणूक दिली जाते. त्यामुळे आपली काहीच किंमत नाही, लायकी नाही असं त्यांना वाटतं. हेलन a नावाची एक बहीण म्हणते: “मी अशा कुटुंबात वाढले ज्यात प्रेम नव्हतं. माझे वडील अतिशय हिंसक होते आणि आमची काहीच लायकी नाही, हे ते आमच्या मनात नेहमी ठसवायचा प्रयत्न करायचे.” हेलनसारखंच, तुम्हालाही कदाचित खूप वाईट वागणूक दिली जात असेल. तुमची नेहमी टीका केली जात असेल किंवा तुम्ही प्रेमाच्या लायकीचे नाहीत, अशी तुम्हाला जाणीव करून दिली जात असेल. जर खरंच असं होत असेल, तर कोणालातरी आपली काळजी आहे यावर विश्वास ठेवायला तुम्हाला कठीण जात असेल.
४. स्तोत्र ३४:१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी देतो?
४ इतर जण तुम्हाला वाईट वागवत असतील तरी तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्याला तुमची किंमत आहे. कारण तो “दुःखी लोकांच्या जवळ असतो.” (स्तोत्र ३४:१८ वाचा.) जर तुम्हाला ‘खचून’ गेल्यासारखं वाटत असेल, तर हे लक्षात ठेवा की यहोवा तुमच्यात असलेल्या चांगल्या गोष्टी पाहतो आणि त्याने स्वतः तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित केलंय. (योहा. ६:४४) तुम्हाला मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असतो, कारण तुम्ही त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहात.
५. लोक ज्यांना खालच्या नजरेने बघायचे त्यांना येशूने कसं वागवलं आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
५ यहोवाला आपल्याबद्दल कसं वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण येशूचा विचार करू शकतो. तो पृथ्वीवर होता तेव्हा त्याने अशा लोकांकडे लक्ष दिलं, ज्यांना इतर जण खालच्या नजरेने बघायचे. त्याने त्यांना खूप कोमलतेने आणि सहानुभूतीने वागवलं. (मत्त. ९:९-१२) खूप त्रासदायक आजार सहन करत असलेल्या एका स्त्रीने, बरं होण्याच्या आशेने जेव्हा त्याच्या कपड्यांना हात लावला, तेव्हा येशूने तिचं सांत्वन केलं आणि तिच्या विश्वासासाठी तिची स्तुती केली. (मार्क ५:२५-३४) येशूने त्याचा पिता कसा आहे हे अगदी हुबेहूब दाखवून दिलं. (योहा. १४:९) म्हणूनच तुम्ही अशी पक्की खातरी ठेवू शकता, की यहोवाला तुमची किंमत आहे आणि तुमच्यात असलेल्या चांगल्या गुणांकडे, जसं की तुमचा विश्वास आणि त्याच्यावर असलेलं तुमचं प्रेम, या गोष्टींकडे तो लक्ष देतो.
६. एखाद्या व्यक्तीला जर कमीपणाची भावना सतावत असेल तर ती काय करू शकते?
६ पण आपली खरंच काही लायकी आहे का, अशी शंका तुम्हाला वाटत असेल किंवा ती पुन्हा-पुन्हा तुमच्या मनात डोकावत असेल तर तुम्ही काय करू शकता? तर, यहोवाला तुमची किंमत आहे याची खातरी करून देणारी वचनं बायबलमधून वाचा आणि त्यावर मनन करा. b (स्तो. ९४:१९) तुम्हाला कदाचित एखादं ध्येय गाठता आलं नसेल किंवा इतर जण करतात तितकं करता येत नसेल. आणि त्यामुळे तुम्ही निराश झाला असाल. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. कारण यहोवासुद्धा तुम्हाला जमणार नाहीत अशा गोष्टींची तुमच्याकडून कधीच अपेक्षा करत नाही. (स्तो. १०३:१३, १४) तुम्हाला कोणाकडून मारहाण झाली असेल, अपमानास्पद रितीने वागवलं गेलं असेल किंवा तुमच्यावर लैंगिक अत्याचार झाला असेल, तर त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींसाठी स्वतःला दोष देऊ नका. कारण यात तुमची काहीएक चूक नाही. लक्षात ठेवा, की ज्यांच्यासोबत वाईट काम झालंय त्यांना नाही, तर ज्यांनी वाईट काम केलंय त्यांना यहोवा दोषी ठरवतो. (१ पेत्र ३:१२) सॅन्ड्रा नावाची बहीण जेव्हा लहान होती तेव्हा तिला खूप क्रूर वागणूक देण्यात आली होती. ती म्हणते: “यहोवा नेहमी माझ्यामध्ये चांगलंच पाहतो. मीही स्वतःबद्दल असाच दृष्टिकोन ठेवावा अशी मी नेहमी त्याला प्रार्थना करते.”
७. आपल्या जीवनात आलेल्या कठीण अनुभवांचा यहोवाच्या सेवेत आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
७ इतरांना मदत करण्यासाठी यहोवा तुमचा वापर करू शकतो यावर शंका घेऊ नका. त्याने तुम्हाला प्रचारकार्यात त्याचे सहकारी बनून काम करण्याचा सन्मान दिलाय. (१ करिंथ. ३:९) तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवामुळे, इतर जण कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे समजून घ्यायला तुम्हाला कदाचित सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी बरंच काही करू शकता. सुरुवातीला उल्लेख केलेल्या हेलनला मदत मिळाली आणि ती आता इतरांना चांगल्या प्रकारे मदत करू शकते. ती म्हणते: “मी कसल्याच लायकीची नाही असं मला वाटत होतं. पण यहोवाने मला या गोष्टीची जाणीव करून दिली की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि मीही इतरांना मदत करू शकते.” आज हेलन आनंदाने पायनियर म्हणून सेवा करत आहे.
आपण यहोवाची माफी स्वीकारावी असं त्याला वाटतं
८. यशया १:१८ या वचनातून आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी मिळते?
८ यहोवाच्या काही सेवकांनी बाप्तिस्म्याआधी किंवा त्यानंतरसुद्धा ज्या चुका केल्या त्यांबद्दल त्यांना खूप वाईट वाटतं. पण लक्षात ठेवा, की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि यामुळेच आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी त्याने खंडणीची व्यवस्था केली. त्याची इच्छा आहे की आपण त्याची ही भेट स्वीकारावी. यहोवा आपल्याला अशी खातरी देतो की त्याच्यासोबत ‘आपसात बोलल्यानंतर’ c तो आपल्याला आपल्या पापांसाठी दोषी ठरवणार नाही. (यशया १:१८ वाचा.) आपल्याकडून आधी झालेल्या चुका यहोवा आठवत नाही. यावरून कळतं की यहोवा खरंच किती प्रेमळ आहे. तसंच, आपण केलेली चांगली कामंसुद्धा तो विसरत नाही.—स्तो. १०३:९, १२; इब्री ६:१०.
९. मागे झालेल्या गोष्टींवर विचार करण्याऐवजी आपण आज आणि भविष्यातल्या गोष्टींवर लक्ष लावण्याचा पुरेपूर प्रयत्न का केला पाहिजे?
९ जर आधी केलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल, तर त्या गोष्टींऐवजी सध्याच्या गोष्टींवर आणि भविष्यातल्या गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करा. पौलच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने देवाच्या सेवकांचा आधी किती क्रूरपणे छळ केला होता याचं त्याला वाईट वाटत होतं. पण यहोवाने त्याला माफ केलंय हे त्याला माहीत होतं. (१ तीम. १:१२-१५) मग तो त्याच्या पूर्वीच्या पापांबद्दलच विचार करत राहिला का? नाही. त्याने ज्या प्रकारे यहुदी म्हणून जे साध्य केलं होतं त्यावर विचार करायचं टाळलं, त्याचप्रमाणे त्याने पूर्वी केलेल्या पापांवरसुद्धा विचार करायचं नक्कीच टाळलं असेल. (फिलिप्पै. ३:४-८, १३-१५) त्याऐवजी, तो आवेशाने सेवाकार्य करत राहिला आणि भविष्यातल्या गोष्टींकडे त्याने लक्ष दिलं. पौलप्रमाणे तुम्हीसुद्धा गेलेला काळ बदलू शकत नाही. पण तुम्ही सध्याच्या परिस्थितीत यहोवाची स्तुती करू शकता आणि त्याने भविष्याबद्दल दिलेल्या अभिवचनांकडे आशेने पाहू शकता.
१०. आधी केलेल्या चुकांमुळे जर कोणाचं मन दुखावलं असेल तर आपण काय करू शकतो?
१० तुमच्या हातून आधी घडलेल्या चुकांमुळे कदाचित इतरांचं मन दुखावलं गेलं असेल आणि म्हणून तुम्हाला खूप वाईट वाटत असेल. अशा वेळी कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होईल? त्यांची मनापासून माफी मागण्यासोबतच तुम्हाला त्यांच्यासाठी काही करता येत असेल तर ते करायचा पुरेपूर प्रयत्न करा. (२ करिंथ. ७:११) तुमच्या चुकीमुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना यहोवाने मदत करावी म्हणून त्याला प्रार्थना करा. तो तुमच्यासोबत त्यांनाही धीर धरायला आणि पुन्हा शांतीने राहायला मदत करेल.
११. योना संदेष्ट्याच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
११ आधी केलेल्या चुकांमधून शिका आणि ज्या मार्गाने यहोवाला तुमचा वापर करायचा आहे त्या मार्गाने तुमचा वापर व्हावा यासाठी तयार असा. योना संदेष्ट्याच्या उदाहरणाचा विचार करा. यहोवाने त्याला निनवेला जायला सांगितलं होतं. पण तो विरुद्ध दिशेला पळाला. त्यामुळे यहोवाने त्याला सुधारलं. आणि तोही त्याच्या चुकांमधून शिकला. (योना १:१-४, १५-१७; २:७-१०) यहोवाने त्याच्याबद्दल आशा सोडली नाही. त्याने त्याला निनवेला जायची आणखी एक संधी दिली. आणि या वेळी त्याने ती आज्ञा लगेच पाळली. त्याला जरी त्याच्या चुकीबद्दल वाईट वाटत असलं, तरी यहोवाकडून मिळालेल्या नवीन नेमणुकीवर त्याने त्याचा परिणाम होऊ दिला नाही.—योना ३:१-३.
यहोवा त्याच्या पवित्र शक्तीने आपलं सांत्वन करतो
१२. जेव्हा आपल्या मनावर मोठा आघात होतो किंवा आपलं मोठं नुकसान होतं तेव्हा यहोवा आपल्याला शांती कशी देतो? (फिलिप्पैकर ४:६, ७)
१२ जेव्हा आपल्या मनावर आघात होतो किंवा आपलं मोठं नुकसान होतं, तेव्हा यहोवा पवित्र शक्तीने आपलं सांत्वन करतो. रॉन आणि कॅरलचा अनुभव लक्षात घ्या. त्यांच्या मुलाने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. ते म्हणतात: “आम्ही आयुष्यात वाईट दिवस पाहिलेत, पण हे सगळ्यात वाईट होतं. कित्येक रात्र आम्हाला झोपसुद्धा लागत नव्हती. पण यहोवाला प्रार्थना केल्यामुळे फिलिप्पैकर ४:६, ७ (वाचा.) मधली शांती आम्हाला खरोखर अनुभवता आली.” तुमच्यासोबत काही वाईट झाल्यामुळे तुम्ही खूप दुःखातून जात असाल, तर तुम्हाला नक्की कसं वाटतंय ते यहोवाला सांगून तुमचं मन मोकळं करा. तुम्ही त्याच्याशी सारखं-सारखं आणि जितका वेळ बोलावंसं वाटतंय तितका वेळ बोलू शकता. (स्तो. ८६:३; ८८:१) त्याची पवित्र शक्ती मिळावी म्हणून त्याला पुन्हा-पुन्हा विनंती करा. तो तुमच्या विनंतीकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही.—लूक ११:९-१३.
१३. यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहण्यासाठी पवित्र शक्तीमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (इफिसकर ३:१६)
१३ तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीतून गेला आहात का? त्यामुळे तुमच्यात काहीच ताकद उरलेली नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर यहोवाची पवित्र शक्ती तुम्हाला त्याची विश्वासूपणे सेवा करत राहायला ताकद देऊ शकते. (इफिसकर ३:१६ वाचा.) फ्लोरा नावाच्या एका बहिणीच्या अनुभवाकडे लक्ष द्या. ती आणि तिचा पती मिशनरी म्हणून सेवा करत होते. पण तिला समजलं, की तिच्या पतीने तिचा विश्वासघात केलाय. त्यामुळे तिने घटस्फोट घेतला. ती म्हणते: “त्याने केलेल्या विश्वासघातामुळे मला खूप त्रास झाला. ती गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नव्हती. म्हणून यहोवाने मला धीर धरायला मदत करावी अशी प्रार्थना मी त्याला करायचे. त्याने माझं सांत्वन केलं आणि सुरुवातीला अशक्य वाटत असलं, तरी यहोवाच्या मदतीने मी खंबीर राहिले आणि सर्व काही सहन करू शकले.” तिला जाणवलं, की देवानेच तिला त्याच्यावरचा विश्वास वाढवायला मदत केली आहे. तिला खातरी आहे, की पुढेही सर्व परीक्षांमध्ये टिकून राहायला तो तिला नक्की मदत करेल. ती म्हणते: “स्तोत्र ११९:३२ मधले शब्द मला लागू होतात: ‘तुझ्या आज्ञांचं मी आतुरतेने पालन करीन कारण तू माझ्या मनात त्यांच्यासाठी जागा निर्माण केली आहेस.’”
१४. आपण यहोवाच्या पवित्र शक्तीला आपल्यावर कार्य कसं करू देऊ शकतो?
१४ पवित्र शक्तीसाठी प्रार्थना केल्यावर तुम्ही त्याप्रमाणे कसं काम करू शकता? उपासनेशी संबंधित कार्यांमध्ये सहभाग घ्या. त्यामुळे देवाच्या पवित्र शक्तीला तुमच्यावर जास्त कार्य करता येईल. यात सभांना उपस्थित राहणं, इतरांना प्रचार करणं यांसारख्या गोष्टी सामील आहेत. दररोज देवाचं वचन वाचून त्याच्या विचारांनी आपलं मन भरून टाका. (फिलिप्पै. ४:८, ९) बायबल काळातल्या देवाच्या लोकांनी संकटांचा सामना कसा केला, याचा विचार करा. तसंच, यहोवाने त्यांना धीर धरायला कशी मदत केली यावर मनन करा. आधी उल्लेख केलेल्या सॅन्ड्राला बऱ्याच कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता. ती म्हणते: “योसेफच्या अहवालामुळे मला खूप धीर मिळाला. त्याला बऱ्याच कठीण परिस्थितीचा आणि अन्यायाचा सामना करावा लागला. पण तरी त्याने यहोवासोबतचं त्याचं नातं कमजोर होऊ दिलं नाही.”—उत्प. ३९:२१-२३.
यहोवा भाऊबहिणींकडून आपलं सांत्वन करतो
१५. आपल्याला कोणाकडून सांत्वन मिळू शकतं आणि ते आपल्याला कशी मदत करू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ जेव्हा आपण दुःख सहन करत असतो, तेव्हा भाऊबहीण आपलं “खूप सांत्वन” करतात. (कलस्सै. ४:११) आपल्या भाऊबहिणींद्वारेच यहोवा आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम दाखवतो. भाऊबहीण सहानुभूतीने आपलं ऐकून घेतात किंवा आपल्यासोबत राहून ते आपल्याला आधार देत असतात. ते कदाचित दिलासा देणारं एखादं वचन आपल्याला दाखवतील किंवा आपल्यासोबत प्रार्थना करतील. d (रोम. १५:४) कधीकधी एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याला यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करायला मदत करेल. त्यामुळे आपल्याला नेहमी धीर धरायला मदत होईल. यासोबतच भाऊबहीण आपल्याला काही व्यावहारिक मार्गांनी, जसं की आपण संकटात असताना आपल्याला जेवण पुरवून मदत करतात.
१६. भाऊबहिणींकडून मदत मिळवायला आपल्याला काय करावं लागेल?
१६ आपल्याला भाऊबहिणींकडून मदत हवी असेल तर आपण ती मागितली पाहिजे. भाऊबहिणींचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांना आपली मदत करायची इच्छा असते. (नीति. ) पण आपल्याला कसं वाटतंय आणि आपल्याला कशाची गरज आहे, हे त्यांना कदाचित माहीत नसेल. ( १७:१७नीति. १४:१०) जर तुमच्या मनाला खूप वेदना होत असतील, तर अशा एखाद्या भावाशी किंवा बहिणीशी बोला जे तुम्हाला समजून घेतील. तुम्हाला कशाची गरज आहे, हे त्यांना सांगा. तुम्हाला कदाचित अशा एक-दोन वडिलांशी बोलावंसं वाटेल, ज्यांच्यासमोर तुम्हाला मन मोकळं करता येईल. काही बहिणींना मंडळीतल्या काही प्रौढ बहिणींसोबत बोलायला जास्त सोपं गेलंय.
१७. कोणत्या समस्यांमुळे आपल्याला इतरांकडून प्रोत्साहन मिळवायला कठीण जाऊ शकतं आणि आपण त्यावर कशी मात करू शकतो?
१७ एकटं राहणं टाळा. तुमचं मन दुःखी असल्यामुळे तुम्हाला कदाचित इतरांसोबत बोलावंसं वाटणार नाही. कधीकधी भाऊबहिणींना तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे समजणार नाही. किंवा ते कदाचित असं काहीतरी बोलतील जे तुमच्या मनाला लागेल. (याको. ३:२) असं असलं तरी त्यांच्यापासून दूर राहू नका. कारण यहोवा त्यांचा वापर करून तुम्हाला प्रोत्साहन देत असतो. गॅवीन नावाचे एक भाऊ मंडळीत वडील म्हणून सेवा करतात. त्यांना नैराश्याची समस्या आहे. ते म्हणतात: “माझ्या या समस्येमुळे मला माझ्या मित्रांसोबत राहायला, त्यांच्याशी बोलायला आवडत नाही.” या समस्येमुळे त्यांना भाऊबहिणींसोबत वेळ घालवायला कठीण जात असलं, तरी ते प्रयत्न करत राहतात. आणि असं केल्यामुळे त्यांना नेहमीच बरं वाटतं. ॲमी नावाची बहीण म्हणते: “आधी माझ्यासोबत जे झालंय त्यामुळे मला लोकांवर विश्वास ठेवणं कठीण जातंय. पण यहोवा जसं भाऊबहिणींवर प्रेम करतो, त्यांच्यावर भरवसा ठेवतो, तसंच करण्याचा मीही प्रयत्न करते. कारण मला माहीत आहे की यामुळे यहोवाला आनंद होतो आणि नक्कीच मलासुद्धा.”
भविष्यातल्या अभिवचनांमुळे आपल्याला सांत्वन मिळू शकतं
१८. भविष्यात यहोवा काय करणार आहे आणि आता आपण काय करू शकतो?
१८ यहोवा लवकरच आपल्याला आपल्या शारीरिक आणि भावनिक त्रासांपासून पूर्णपणे बरं करेल. हे समजल्यामुळे आपण भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहू शकतो. (प्रकटी. २१:३, ४) त्यावेळी, आपण अनुभवलेल्या वाईट गोष्टी पुन्हा कधीच आपल्या “मनात येणार नाहीत.” (यश. ६५:१७) आपण पाहिलं की यहोवा आत्ताही ‘आपल्या जखमांवर पट्टी बांधतो.’ म्हणून आपल्याला मदत आणि सांत्वन देण्यासाठी यहोवाने ज्या प्रेमळ तरतुदी केल्या आहेत, त्यांचा पुरेपूर फायदा घ्या. “त्याला तुमची काळजी आहे,” या गोष्टीवर कधीच शंका घेऊ नका.—१ पेत्र ५:७.
गीत ७ यहोवा आमचं बळ
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b “ यहोवाला तुमची कदर आहे” ही चौकट पाहा.
c यहोवासोबत ‘आपसात बोलण्यासाठी’ आपल्याला पश्चात्ताप होतोय हे सिद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला त्याच्याकडे आपल्या पापांची माफी मागावी लागेल आणि आपल्या वागण्या-बोलण्यात बदल करावा लागेल. जर आपण एखादं गंभीर पाप केलं असेल, तर आपल्याला मंडळीतल्या वडिलांची मदत घेणंही गरजेचं आहे.—याको. ५:१४, १५.