वाचकांचे प्रश्न
शलमोनच्या मंदिरातल्या द्वारमंडपाची उंची किती होती?
मंदिराच्या पवित्रस्थानात जाण्यासाठी द्वारमंडपातून जावं लागायचं. २०२३ च्या आधी प्रकाशित करण्यात आलेल्या इंग्रजी भाषेतल्या पवित्र शास्त्र नवे जग भाषांतरच्या आवृत्त्यांप्रमाणे “मंदिरासमोरच्या द्वारमंडपाची लांबी २० हात, म्हणजे मंदिराच्या रुंदीइतकीच होती आणि त्याची उंची १२० हात होती.” (२ इति. ३:४) इतर भाषांतरांमध्येसुद्धा सांगितल्याप्रमाणे द्वारमंडपाची उंची “१२० हात,” म्हणजेच १७५ फूट होती.
पण २०२३ च्या नवे जग भाषांतरमध्ये मंदिराच्या द्वारमंडपाची “उंची २० हात” किंवा जवळजवळ ३० फूट होती असं सांगितलंय. a हा बदल का करण्यात आला याची काही कारणं पुढे दिली आहेत.
१ राजे ६:३ मध्ये द्वारमंडपाच्या उंचीबद्दल सांगण्यात आलेलं नाही. त्या वचनात, यिर्मयाने द्वारमंडपाच्या लांबी आणि खोलीबद्दल सांगितलंय, पण उंचीबद्दल काहीच सांगितलेलं नाही. पुढच्या अध्यायातसुद्धा त्याने मंदिराच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बारकाईने वर्णन केलंय. जसं की मंदिराच्या अंगणात असलेला धातूचा एक मोठा ओतीव गंगाळ-सागर, दहा गाड्या आणि तांब्याचे दोन स्तंभ. (१ राजे ७:१५-३७) जर द्वारमंडप खरोखर १७० फुटापेक्षा जास्त उंच होता, म्हणजे मंदिराच्या इतर भागांपेक्षा जास्त उंच होता, तर यिर्मयाने त्याच्या उंचीबद्दल काहीच का सांगितलं नाही? बऱ्याच शतकानंतरसुद्धा यहुदी लेखकांनी हा द्वारमंडप मंदिराच्या इतर भागांपेक्षा उंच नव्हता असं म्हटलं.
विद्वानांच्या मते मंदिराच्या भिंतींची उंची लक्षात घेता द्वारमंडपाची उंची १२० हात नसावी. प्राचीन काळात विटा आणि दगडं वापरून ज्या उंच इमारती बांधल्या जायच्या, त्यांचा पाया खूप रुंद असायचा आणि त्या वरच्या बाजूने निमुळत्या असायच्या. जसं की इजिप्तमधल्या मंदिराची द्वारं. पण शलमोनचं मंदिर तसं नव्हतं. विद्वानांचं म्हणणं आहे की मंदिराच्या भिंतींची रुंदी ६ हात किंवा ९ फुटापेक्षा जास्त नव्हती. प्राचीन काळातल्या बांधकामाचं परीक्षण करणारे तज्ज्ञ थिओडर बुसिंक यांनी असा निष्कर्ष काढला, की “द्वारमंडपाच्या भिंतीची रुंदी लक्षात घेता द्वारमंडपाची उंची १२० हात असू शकत नाही.”
२ इतिहास ३:४ मधल्या मजकुराची नक्कल करत असताना कदाचित त्यात चूक झाली असेल. काही जुन्या हस्तलिखितांमध्ये या वचनात “१२०” दिलं असलं, तरी पाचव्या शतकातल्या कोडेक्स ॲलेक्झँड्रिनस आणि सहाव्या शतकातल्या कोडेक्स ॲमब्रोसिएनस यांसारख्या भरवशालायक लिखाणांत “२० हात” असं लिहिलंय. मग लेखकाने चुकून “१२०” का लिहिलं असावं? कारण “शंभर” आणि “हात” या शब्दांसाठी असलेले हिब्रू शब्द सारखेच दिसतात. म्हणून कदाचित लेखकाने “हात” या शब्दाऐवजी “शंभर” लिहिलं असावं.
शलमोनच्या मंदिराबद्दलची बारीकसारीक माहिती समजून घ्यायचा आणि त्याचं अचूकपणे वर्णन करायचा आपण प्रयत्न करत असलो, तरी हे मंदिर ज्या महान आध्यात्मिक मंदिराला सूचित करतं त्यावर आपण खास लक्ष दिलं पाहिजे. यहोवाने त्याच्या सर्व सेवकांना या मंदिरात त्याची सेवा करण्यासाठी बोलवलंय, यामुळे आपण त्याचे खरंच खूप आभारी आहोत!—इब्री ९:११-१४; प्रकटी. ३:१२; ७:९-१७.
a तळटिपेत स्पष्ट करण्यात आलंय, की “काही जुन्या हस्तलिखितांमध्ये ‘१२०’ असं लिहिण्यात आलंय, तर काही इतर हस्तलिखितांमध्ये आणि भाषांतरांमध्ये ‘२० हात’ लिहिण्यात आलंय.”