व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१९२४​—⁠शंभर वर्षांआधी

१९२४​—⁠शंभर वर्षांआधी

“सेवेच्या जास्त संधी शोधण्यासाठी . . . प्रभूच्या प्रत्येक पवित्र मुलासाठी वर्षाचा हा सुरुवातीचा काळ एक चांगली वेळ आहे,” असं बुलेटिन a मासिकाच्या जानेवारी १९२४ च्या अंकात म्हटलं होतं. त्या वर्षी जसजसे महिने सरत गेले तसतसं बायबल विद्यार्थ्यांनी धाडस दाखवून आणि प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून हा सल्ला लागू केला.

धाडसाने रेडिओ स्टेशनची सुरुवात

न्यूयॉर्क शहरातलं डब्लू.बी.बी.आर. रेडिओ स्टेशन बांधण्यासाठी बेथेलमधल्या बांधवांनी एक वर्षाहून जास्त काळ मेहनत केली. त्यांनी तिथली जागा मोकळी केली आणि कामगारांसाठी एक घर आणि उपकरणांसाठी एक वेगळी इमारत बांधली. हे काम पूर्ण झाल्यावर रेडिओ स्टेशनचं प्रसारण सुरू करण्यासाठी लागणारे उपकरणांचे भाग बांधवांनी जमवायला सुरुवात केली. पण हे करण्यासाठी त्यांना अनेक अडथळे पार करावे लागणार होते.

बांधवांच्या असं लक्षात आलं की स्टेशनसाठी मुख्य अँटेना बसवणं अवघड आहे. कारण ३०० फूट लांब असलेला अँटेना प्रत्येकी २०० फूट उंच असलेल्या लाकडी खांबावर उभं करणं आवश्‍यक होतं. पण असं करायचा पहिला प्रयत्न फसला. मग यहोवाच्या मदतीवर भरवसा ठेवून बांधवांनी शेवटी यात यश मिळवलं. या प्रकल्पावर काम करणारे कॅलविन प्रॉसर यांनी असं म्हटलं: “जर आमचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला असता, तर आम्ही स्वतःचीच पाठ थोपटून म्हणालो असतो की ‘व्वा! काय भारी काम केलंय आपण.’” पण असं झालं नाही. उलट बांधवांनी त्यांच्या यशाचं श्रेय यहोवाला दिलं. तरी त्यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत.

डब्ल्यू.बी.बी.आर. रेडिओ स्टेशनचा अँटेना लावण्यासाठी खांब उभा करताना

त्या काळात रेडिओ प्रसारण ही एक नवीनच गोष्ट होती. त्यामुळे व्यावसायिक रित्या तयार केलेली उपकरणं सहज मिळत नव्हती. म्हणून बांधवांनी एका माणसाने बनवलेला ५००-वॅटचा एक जुना ट्रान्समीटर मिळवला. तसंच मायक्रोफोनची गरज होती. म्हणून त्यांनी मायक्रोफोन विकत घेण्याऐवजी साध्याशा टेलिफोनचा वापर केला. मग फेब्रुवारी महिन्याच्या एका रात्री बांधवांनी असा विचार केला, की ‘चला, या उपकरणांची आपण चाचणी घेऊन पाहू.’ पण प्रसारित करणार काय? म्हणून बांधवांनी राज्यगीतं गायली. त्या वेळी झालेल्या एका गंमतीशीर गोष्टीची आठवण करून अर्नेस्ट लोव म्हणतात, की बांधव गीत गात असताना जवळजवळ २५ किलोमीटर लांब ब्रुकलिनमध्ये जज रदरफर्ड b यांनी रेडिओवर ही गाणी ऐकली आणि त्यांचा फोन आला.

ब्रदर रदरफर्ड म्हणाले: “मांजरीची भांडणं लागल्यासारखं काय आरडाओरडा चाललाय. बंद करा ते!” हे ऐकून लाजिरवाणा चेहरा झालेल्या बांधवांनी पटकन ट्रान्समीटर बंद केला. पण त्यांना या गोष्टीची खातरी झाली, की त्यांच्या पहिल्या प्रसारणासाठी ते तयार आहेत.

२४ फेब्रुवारी, १९२४ ला आपलं पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं. ब्रदर रदरफर्ड यांनी “मसीहाच्या राज्याच्या हितासाठी” हे रेडिओ स्टेशन समर्पित केलं. त्यांनी सांगितलं की या रेडिओ स्टेशनचा उद्देश “बायबलचा प्रकाश सगळ्यांपर्यंत पोचावा आणि आपण कोणत्या काळात जगत आहोत हे त्यांना कळावं हा आहे; मग ते कोणत्याही धर्माचे किंवा पंथाचे असोत.”

डावीकडे पहिल्या स्टूडिओमध्ये ब्रदर रदरफर्ड

उजवीकडे: ट्रान्समीटर आणि प्रसारणाचं उपकरण

हे पहिलं प्रसारण खूप यशस्वीपणे पार पडलं. आणि पुढची ३३ वर्षं डब्ल्यू.बी.बी.आर. रेडिओ स्टेशनचा वापर करून यहोवाच्या संघटनेने बरेच कार्यक्रम प्रसारित केले.

पाळकांचं पितळ उघडं करण्यासाठी दाखवलेलं धाडस

१९२४ च्या जुलै महिन्यात बायबल विद्यार्थी ओहायोच्या कोलंबस इथे एका अधिवेशनासाठी एकत्र आले होते. ते जगभरातून तिथे जमले होते आणि त्यांनी अरबी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, हंगेरियन, इटालियन, लिथूएनियन, पोलिश, रशियन आणि युक्रेनियन या भाषांमध्ये, तसंच स्कँडिनेव्हियाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषणं ऐकली. कार्यक्रमाचे काही भाग रेडिओवर प्रसारित करण्यात आले आणि ओहायो स्टेट जर्नल या स्थानिक बातमीपत्रात अधिवशेनाच्या दर दिवसाचे अहवाल छापण्यासाठीसुद्धा दिले.

ओहायोच्या कोलंबसमध्ये १९२४ ला झालेलं अधिवेशन

२४ जुलैला गुरुवारी अधिवेशनाला आलेल्या ५,००० हून जास्त भाऊबहिणींनी अधिवेशनाच्या क्षेत्रात प्रचारकार्य केलं. त्यांनी त्या वेळी जवळपास ३०,००० पुस्तकं लोकांना दिली आणि हजारो जणांचे बायबल अभ्यास सुरू झाले. द वॉच टॉवरने याला अधिवेशनातला “सगळ्यात अप्रतिम दिवस” असं म्हटलं.

त्या अधिवेशनात आणखी एक खास गोष्ट घडली. २५ जुलैला शुक्रवारी, ब्रदर रदरफर्डनी पाळकांच्या विरोधात एक घोषणा वाचून जबरदस्त धाडस दाखवलं. कायदेशीर दस्तऐवजाच्या शैलीत त्यांनी एक आरोपपत्र सादर केलं होतं. त्यात त्यांनी राजकीय, धार्मिक आणि व्यावसायिक पुढाऱ्‍यांवर “जीवनाचा आशीर्वाद मिळावा म्हणून देवाने केलेल्या तरतुदींपासून लोकांना परावृत्त करण्याचा” आरोप लावला होता. शिवाय या आरोपपत्रात असंही म्हटलं होतं, की या लोकांनी “संयुक्‍त राष्ट्रसंघाला साथ दिली होती आणि ते ‘पृथ्वीवरच्या देवाच्या राज्याचे राजकीय प्रतिनिधी आहेत’ असं घोषित केलं होतं.” त्यामुळे हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बायबल विद्यार्थ्यांना धाडसाची आणि चिकाटीची गरज होती.

या अधिवेशनाचा लोकांवर जो प्रभाव झाला त्याबद्दल बोलताना द वॉच टॉवरने म्हटलं: “कोलंबसमधल्या अधिवेशनात जमलेलं प्रभूचं हे छोटंसं सैन्य विश्‍वासात बळकट होऊन तिथून निघून गेलं. . . . त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर सोडलेले जळते बाण किंवा इतर कोणतीही शक्‍ती त्यांच्याविरुद्ध चालणार नव्हती.” अधिवेशनाला उपस्थित राहिलेले लिओ क्लॉज आठवून सांगतात: “आमच्या भागात हे आरोपपत्र वाटप करायचा उत्साह घेऊन आम्ही त्या अधिवेशनातून निघालो.”

एक्लिसिॲस्टिक्स इंडिक्टेडच्या पत्रिकेची एक प्रत

ऑक्टोबरमध्ये बायबल विद्यार्थ्यांनी एक्लिसिॲस्टिक्स इंडिक्टेड या पत्रिकेच्या लाखो प्रती वाटायला सुरुवात केली. ब्रदर रदरफर्डने जी घोषणा केली होती त्याची ही छापील आवृत्ती होती. ऑक्लाहोमामधल्या क्लिवलँडच्या छोट्याशा गावात फ्रँक जॉनसन यांना पत्रिका वाटायच्या होत्या. आणि मग काही भाऊबहीण त्यांना घ्यायला येणार होते, पण फ्रँक यांनी त्यांचं काम २० मिनिटांआधीच संपवलं. त्यामुळे त्यांना भाऊबहिणींची वाट पाहावी लागणार होती. पण ते बाहेर कुठेही थांबू शकत नव्हते कारण त्यांच्या या कामामुळे त्या गावातले लोक संतापून त्यांना शोधत होते. म्हणून मग त्यांनी जवळच्या एका चर्चमध्ये लपायचं ठरवलं. ते चर्च रिकामं असल्याचं पाहून त्यांनी चर्चच्या बायबलमध्ये आणि प्रत्येक खुर्चीवर त्या घोषणेची एक प्रत ठेवली. आणि ते लगेच तिथून बाहेर पडले. त्यांच्याकडे अजूनही थोडा वेळ होता. म्हणून ते आणखी दोन चर्चमध्ये गेले आणि तिथेही त्यांनी असंच केलं.

भाऊबहीण त्यांना जिथे घ्यायला येणार होते तिथे ते परत गेले. कोणाचं आपल्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून ते पेट्रोल पंपाच्या मागे जाऊन लपले. त्यांना शोधणारी माणसं त्यांच्यासमोरून पुढे गेली, पण त्यांनी त्यांना पाहिलं नाही. तेवढ्यात जवळपास प्रचार करणारे भाऊबहीण तिथे पोचले. आणि ते त्यांना घेऊन निघून गेले.

ती घटना आठवून एक भाऊ म्हणतात: “शहर सोडत असताना आम्ही तीन चर्चसमोरून गेलो. त्या प्रत्येक चर्चच्या समोर जवळपास ५० लोक उभे होते. काही लोक पत्रिका वाचत होते, तर काहींनी त्या पत्रिका पाळकांना दिसाव्यात म्हणून हातात धरल्या होत्या. आम्ही अगदी थोडक्यात वाचलो होतो. पण राज्याच्या या शत्रूंपासून आमचं संरक्षण करण्यासाठी आणि बुद्धीसाठी आम्ही खरंच यहोवाचे आभार मानले.”

बायबल विद्यार्थी धाडसाने प्रचार करत राहिले

जोझफ क्रेट

बायबल विद्यार्थ्यांनी इतर देशांमध्येसुद्धा अशाच प्रकारे धाडसाने प्रचारकार्य केलं. उत्तर फ्रांसमध्ये जोझफ क्रेट नावाच्या एका भावाने पोलंडहून आलेल्या खाणकामगारांना प्रचार केला. ब्रदर क्रेट तिथल्या शहरात एक भाषण देणार होते. त्याचा विषय होता: “मृतांचं पुनरुत्थान लवकरच!” जेव्हा त्यांनी तिथल्या रहिवाश्‍यांना आमंत्रण दिलं तेव्हा तिथल्या पाळकाने या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा इशारा लोकांना दिला. पण याचा उलटाच परिणाम झाला. त्या भाषणासाठी ५,००० पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी हजर होते. आणि त्यांच्यामध्ये चक्क तो पाळकसुद्धा होता! ब्रदर क्रेटने त्या पाळकाला पुढे येऊन त्याच्या विश्‍वासाची बाजू मांडण्यासाठी आमंत्रित केलं, पण त्याने नकार दिला. ब्रदर क्रेटने ओळखलं, की तिथे आलेल्या लोकांना देवाच्या वचनाची भूक होती म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असलेलं सगळं साहित्यं त्या लोकांमध्ये वाटलं.—आमो. ८:११.

क्लॉड ब्राऊन

आफ्रिकेत, ब्रदर क्लॉड ब्राऊन यांनी आत्ता ज्याला घाना म्हणतात त्या गोल्ड कोस्टमध्ये आनंदाच्या बातमीचा प्रचार केला. त्यांच्या भाषणांमुळे आणि त्यांनी वाटप केलेल्या साहित्यांमुळे त्या देशात सत्याचा झपाट्याने प्रसार व्हायला मदत झाली. फार्मसी शिकणारे जॉन ब्लँक्सन हे ब्रदर ब्राऊनच्या एका भाषणाला उपस्थित होते. त्यांच्या पटकन लक्षात आलं की हेच सत्य आहे. जॉन आठवून सांगतात: “सत्यामुळे मला इतका आनंद झाला होता, की मी माझ्या फार्मसी कॉलेजमध्ये सगळ्यांना अगदी उघडपणे सांगत होतो.”

जॉन ब्लँक्सन

एक दिवशी जॉन एका चर्चमध्ये गेले आणि त्यांनी तिथल्या पाळकाला त्रैक्याबद्दल प्रश्‍न विचारला. कारण त्यांना आता स्पष्टपणे समजलं होतं की त्रैक्याची शिकवण ही शास्त्रानुसार नाही. यावर त्या पाळकाने त्यांना तिथून अक्षरशः हाकलून लावलं आणि ओरडून म्हणाला: “तू ख्रिस्ती नाहीस, सैतानाकडून आहेस. चालता हो इथून.”

घरी गेल्यावर जॉनने त्या पाळकाला पत्र लिहिलं आणि त्याला सगळ्यांसमोर येऊन त्रैक्याबद्दल उघडपणे चर्चा करायला बोलवलं. यावर त्या पाळकाने त्याला कॉलेजच्या मुख्य शिक्षकाच्या कार्यालयात जायला सांगितलं. तिथे गेल्यावर शिक्षकाने त्यांना विचारलं की ‘तू खरंच पाळकांना पत्र लिहिलंय?’

जॉनने उत्तर दिलं: “हो सर.”

मग त्या शिक्षकाने जॉनला पाळकाची लेखी स्वरूपात माफी मागायला सांगितली. म्हणून जॉनने लिहिलं:

“सर, माझ्या शिक्षकाने तुम्हाला माफीपत्र लिहायला सांगितलंय. पण तुम्ही खोट्या शिकवणी शिकवता हे जर कबूल करायला तयार असाल, तर मी माफीपत्र लिहायला तयार आहे.”

यावर अवाक होऊन शिक्षकाने त्यांना विचारलं: “ब्लँक्सन, तू खरंच असं लिहणार आहेस?”

“हो, सर. मी एवढंच लिहू शकतो.”

“मग तुला कॉलेजमधून काढून टाकलं जातंय. तू सरकारी चर्चच्या पाळकाला असं बोलून या कॉलेजमध्ये राहू शकत नाहीस.”

“पण, सर, . . . तुम्ही शिकवत असताना आम्हाला काही समजत नसेल तर आम्ही तुम्हाला प्रश्‍न विचारू शकत नाही का?”

“नक्कीच विचारू शकता.”

“हेच घडलंय सर. ते आम्हाला बायबलमधून शिकवत होते आणि मी त्यांना एक प्रश्‍न विचारला. जर त्यांना त्या प्रश्‍नाचं उत्तर देता येत नसेल तर मी माफीपत्र का लिहायचं?”

ब्लँक्सनना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं नाही. आणि त्यांना माफीपत्रही लिहावं लागलं नाही.

भविष्याबद्दल उत्सुकता

वर्षभरात झालेल्या कार्यांचा सारांश देत द वॉच टॉवरने म्हटलं: “आम्ही अगदी दावीदसारखंच म्हणू शकतो: ‘तू मला शक्‍ती देऊन युद्धासाठी सज्ज करशील.’ (स्तो. १८:३९) या वर्षी आपण प्रभूचा हात पाहिला, त्यामुळे हे वर्ष खूप प्रोत्साहन देणारं ठरलं आहे. . . . त्याचे पवित्र जन . . . आनंदाने साक्ष देत आहेत.”

वर्ष संपत आलं, तेव्हा बांधवांनी रेडिओ सेवेचा विस्तार करायची योजना आखली. त्यांनी शिकागोजवळ आणखी एक रेडिओ स्टेशन सुरू केलं. या नवीन रेडिओ स्टेशनला “वर्ड” (मराठीत याचा अर्थ ‘वचन’ असा होतो.) असं नाव देण्यात आलं होतं. आणि हे नाव योग्यच होतं. ५,०००-वॅट ट्रान्समीटरचा वापर करून हे रेडिओ स्टेशन शेकडो मैलापर्यंत अगदी उत्तरेकडे कॅनडापर्यंत राज्याचा संदेश प्रसारित करू शकत होतं.

१९२५ हे वर्ष लवकरच आध्यात्मिक प्रकाश चमकवणारं एक रोमांचक वर्ष ठरणार होतं. बायबल विद्यार्थ्यांना प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायाची समज स्पष्ट होणार होती. काहींसाठी हे अडखळण ठरणार होतं. पण अनेक जण ही नवीन समज स्वीकारायला तयार असणार होते. त्यांना स्वर्गात घडलेल्या घटनांबद्दल आणि पृथ्वीवर देवाच्या लोकांवर त्याचा जो परिणाम झाला होता त्याबद्दल जाणून आनंद होणार होता.

a आता आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका.

b त्यावेळी बायबल विद्यार्थ्यांमध्ये पुढाकार घेणाऱ्‍या जे. एफ. रदरफर्ड यांना जज रदरफर्ड म्हणून ओळखलं जायचं. कारण बेथेलमध्ये सेवा करण्याआधी त्यांनी मिसूरीच्या राज्यातल्या एका न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं होतं.