व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

परीक्षेत टिकून राहिल्याने आशीर्वादच मिळतात

परीक्षेत टिकून राहिल्याने आशीर्वादच मिळतात

“किती निर्दयी बाप आहेस तू!” असं एक गुप्त पोलीस अधिकारी मला रागावून म्हणाला. “आपल्या गरोदर बायकोला आणि लहान मुलीला खुशाल वाऱ्यावर सोडून दिलंस. त्यांना खायला कोण देणार? त्यांचा सांभाळ कोण करणार? तुझी ही सगळी कार्ये सोडून दे आणि घरी जा!” मी त्याला म्हणालो: “नाही, मी माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं नाही; तुम्ही मला अटक केलीय! आणि तेसुद्धा कशासाठी?” त्यावर तो अधिकारी म्हणाला: “साक्षीदार असणं यापेक्षा मोठा गुन्हा नाही.”

हा वाद, १९५९ साली रशियातल्या इर्कुत्सक शहरामधल्या एका तुरुंगात झाला होता. पण, मी आणि माझी पत्नी मरीया नीतिमत्त्वासाठी ‘दुःख सोसण्यास’ तयार का होतो आणि शेवटपर्यंत विश्वासू राहिल्यामुळे आम्हाला कसे आशीर्वाद मिळाले, त्यांबद्दल आता थोडं सांगतो.—१ पेत्र ३:१३, १४.

माझा जन्म १९३३ साली युक्रेनमधल्या झोलोटनिके नावाच्या एका गावात झाला होता. १९३७ साली, साक्षीदार असलेली माझी मावशी आणि तिचे पती फ्रान्सहून आम्हाला भेटायला आले होते आणि जाताना गव्हर्मेन्ट आणि डेलिव्हरेन्स ही पुस्तकं ते आम्हाला देऊन गेले. * माझ्या वडिलांनी ती पुस्तकं वाचली आणि देवावरचा त्यांचा विश्वास जागा झाला. दुःखाची गोष्ट म्हणजे, १९३९ मध्ये ते खूप आजारी पडले; पण मृत्यूच्या आधी ते माझ्या आईला म्हणाले: “हेच सत्य आहे. आपल्या मुलांना ते नक्की शिकव.”

साइबीरिया—प्रचारकार्याचं एक नवीन क्षेत्र

एप्रिल १९५१ मध्ये अधिकाऱ्यांनी, पश्‍चिम युएसएसआर मधून साक्षीदारांना साइबीरियात हद्दपार करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मला, माझ्या आईला आणि धाकट्या भावाला, ग्रीगोरीला पश्‍चिम युक्रेनमधून हद्दपार करण्यात आलं. ट्रेनने ६,००० हून अधिक किलोमीटरचा प्रवास करून आम्ही साइबीरियातल्या टूलून शहरात पोचलो. दोन आठवड्यांनंतर, माझा थोरला भाऊ, बोग्दान जवळच्याच एन्गर्स्क शहरातल्या एका छावणी आला. त्याला २५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

मी, माझी आई आणि भाऊ आम्ही टूलूनच्या आसपासच्या वसाहतींमध्ये प्रचार करायचो. पण, आम्हाला हे खूप हुशारीनं करावं लागायचं. उदाहरणार्थ, आम्ही लोकांना विचारायचो, “इथं असं कुणी आहे का ज्याला आपली गाय विकायची आहे?” मग, असं कोणी सापडल्यावर आम्ही त्याला सांगायचो, की गायीला किती अद्‌भुत रीतीनं बनवण्यात आलं आहे. आणि बोलण्याच्या ओघात, त्या व्यक्तीसोबत निर्माणकर्त्याविषयी आमची चर्चा केव्हा सुरू व्हायची हे त्या व्यक्तीला कळायचंसुद्धा नाही. त्या वेळी, एका वृत्तपत्राने साक्षीदारांबद्दल असं लिहिलं, की ते गायींविषयी विचारत येतात, पण मुळात ते मेंढरांच्या शोधात असतात! आणि खरंच, मेंढरांसारखे नम्र असलेले कितीतरी लोक आम्हाला सापडले! नेमून न दिलेल्या त्या क्षेत्रात, नम्र आणि पाहुणचारी वृत्ती असलेल्या लोकांसोबत शास्त्रवचनांचा अभ्यास करणं खूप आनंददायक होतं. आज टूलूनमध्ये १०० हून अधिक प्रचारकांची एक मंडळी आहे.

मरीयाच्या विश्वासाची परीक्षा कशी झाली?

माझी पत्नी, मरीया हिला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युक्रेनमध्ये सत्य शिकायला मिळालं. ती १८ वर्षांची असताना एक गुप्त पोलीस अधिकारी तिला त्रास देऊ लागला आणि आपल्यासोबत अनैतिक लैंगिक संबंध ठेवण्यास गळ घालू लागला. पण, त्याच्या या प्रयत्नांना मरीयाने ठामपणे नकार दिला. एकदा ती घरी आली तेव्हा तर तो अधिकारी तिच्या बिछान्यात असलेला तिला दिसला. ते पाहून ती तिथून पळाली. त्यामुळे, त्या अधिकाऱ्याला इतका राग आला, की त्याने तिला साक्षीदार असण्याच्या आरोपावरून तुरुंगात डांबण्याची धमकी दिली. आणि खरंच तसंच झालं. १९५२ साली मरीयाला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी, तिला अगदी बायबलमधल्या योसेफसारखंच वाटलं. यहोवाला विश्वासू राहिल्यामुळे त्यालासुद्धा तुरुंगात डांबण्यात आलं होतं. (उत्प. ३९:१२, २०) मरीयाला शिक्षा झाली, तेव्हा जो ड्रायवर तिला न्यायालयातून तुरुंगात घेऊन गेला तो म्हणाला: “घाबरू नकोस. असे कितीतरी लोक तुरुंगात जातात, पण स्वाभिमानाने परत बाहेर येतात.” त्याच्या शब्दांमुळे, मरीयाला खूप धीर मिळाला.

सन १९५२ ते १९५६ पर्यंत मरीयाला, रशियातल्या गोरकी (आजचे नझ्नी नोव्गोरद) या शहराजवळ असलेल्या एका श्रम छावणीत काम करण्यासाठी पाठवलं गेलं. तिथं अगदी कडाक्याच्या थंडीतसुद्धा तिला रोपटी उपटायला सांगण्यात आलं. त्यामुळे तिची तब्येत खूप बिघडली. पण, १९५६ मध्ये तिची सुटका झाली आणि ती टूलून शहराकडे जायला निघाली.

पत्नी आणि मुलांपासून ताटातूट

टूलूनमधल्या एका बांधवाने एक बहीण तिथं येत असल्याचं मला सांगितलं. त्यामुळे, बस स्टॉपवरून तिला आणायला आणि सामान उचलण्यास तिची मदत करायला मी सायकलवर गेलो. पहिल्याच भेटीत मला मरीया आवडू लागली. अर्थात, तिचं मन जिंकण्यासाठी मला बरेच प्रयत्न करावे लागले. पण, शेवटी मी यशस्वी झालो. सन १९५७ मध्ये आमचं लग्न झालं आणि एका वर्षानंतर आमच्या मुलीचा, ईरीनाचा जन्म झाला. पण, मला फार काळ तिच्यासोबत वेळ घालवता आला नाही. कारण, १९५९ मध्ये बायबलचं साहित्य छापण्याच्या आरोपावरून मला अटक करण्यात आली. मला सहा महिन्यांची एकांतवासाची शिक्षा झाली. त्या काळात, मन शांत ठेवण्यासाठी मी सतत प्रार्थना करायचो, राज्य गीतं गायचो आणि सुटका झाल्यावर आपण कशा प्रकारे प्रचार करू याची कल्पना करायचो.

१९६२ मध्ये एका श्रम छावणीत असताना

तुरुंगात असताना, उलटतपासणीच्या वेळी चौकशी करणारा अधिकारी माझ्यावर खेकसून म्हणाला: “तुम्हा लोकांना आम्ही लवकरच उंदरांसारखं चिरडून टाकू!” त्यावर मी त्याला म्हणालो: “राज्याचा आनंदाचा संदेश सर्व राष्ट्रांमध्ये घोषित केला जाईल असं येशूने म्हटलंय; आणि ते काम कोणीही थांबवू शकत नाही.” मग, त्या अधिकाऱ्याने आपली चाल बदलली आणि मी माझ्या विश्वासाचा त्याग करावा म्हणून, लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, तो माझं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला. पण, धमक्यांचा किंवा भुलवण्याचा माझ्यावर काहीएक परिणाम होत नसल्याचं पाहून मला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यासाठी, मला सेरांक्स शहराजवळच्या एका छावणीत पाठवण्यात आलं. छावणीकडे जात असतानाच मला समजलं, की आमची दुसरी मुलगी, ओल्गा हिचा जन्म झाला आहे. माझ्या पत्नीपासून आणि मुलींपासून माझी ताटातूट झाली असली, तरी मी आणि मरीया आम्ही दोघंही यहोवाला एकनिष्ठ राहिलो याचं मला समाधान होतं.

१९६५ मध्ये, माझी पत्नी मरीया आणि आमच्या मुली ओल्गा व ईरीना

वर्षातून एकदा मरीया मला भेटायला सेरांक्सला यायची. खरंतर, टूलून ते सेरांक्स येऊन-जाऊन करण्यासाठी ट्रेनने १२ दिवस लागायचे. पण, तरीसुद्धा ती दर वर्षी मला भेटायला यायची आणि येताना माझ्यासाठी बुटांचा एक नवीन जोड आणायची. त्या बुटांच्या टाचेत वॉचटॉवर मासिकाच्या नवीन प्रती लपवून ठेवलेल्या असायच्या. एकदा, मला भेटायला येताना मरीया आमच्या दोन लहान मुलींनाही सोबत घेऊन आली. तो दिवस माझ्यासाठी अतिशय खास होता. त्यांना पाहून आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून मला किती आनंद झाला असेल, याची तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता!

नवीन जागा, नवीन आव्हानं

१९६६ मध्ये, श्रम छावणीतून माझी सुटका करण्यात आली आणि आम्ही चौघं, काळ्या समुद्राजवळ असलेल्या आर्माविर शहरात राहायला गेला. तिथे आम्हाला यारोस्लाव आणि पावेल ही दोन मुलं झाली.

तिथं राहायला गेल्यानंतर काही काळातच गुप्त पोलीस अधिकाऱ्यांनी, बायबलचं साहित्य शोधण्यासाठी आमच्या घरावर छापा घालण्यास सुरुवात केली. बायबलचं साहित्य कुठं सापडतं का, हे पाहण्यासाठी त्यांनी संपूर्ण घर पालथं घातलं; अगदी गायीच्या चाऱ्यातसुद्धा त्यांनी शोधलं. अशाच एका प्रसंगी, आमच्या घरावर छापा घालण्यासाठी पोलीस आले होते. उकाड्यामुळे ते अतिशय घामेजले होते आणि त्यांचे कपडेसुद्धा धुळीने माखले होते. त्यांची ती अवस्था पाहून मरीयाला खूप वाईट वाटलं; कारण, ते बिचारे केवळ त्यांचं कर्तव्य पार पाडत होते. त्यामुळे, तिने त्यांना पिण्यासाठी सरबत, कपड्यांवरची धूळ झटकण्यासाठी एक ब्रश, भांड्यात थोडं पाणी आणि एक टॉवेल दिला. नंतर, त्यांचा मुख्य अधिकारी आला तेव्हा आपल्याला मिळालेल्या चांगल्या वागणुकीबद्दल त्यांनी त्याला सांगितलं. त्यामुळे, जाताना त्या अधिकाऱ्याने हसून आमचा निरोप घेतला. ‘बऱ्याने वाइटाला जिंकत राहिल्याने’ किती चांगले परिणाम घडून येतात हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.—रोम. १२:२१.

आमच्या घरावर वरचेवर असे छापे पडत असतानाही आम्ही आर्माविरमध्ये प्रचारकार्य करत राहिलो. तसंच, जवळच्या कूर्गनिंस्क गावात असलेल्या प्रचारकांच्या एका छोट्याशा गटाला आध्यात्मिक रीत्या मजबूत करण्यासाठीही आम्ही मदत केली. आज आर्माविरमध्ये सहा आणि कूर्गनिंस्कमध्ये चार मंडळ्या आहेत, हे पाहून मला खूप आनंद होतो.

यहोवाची सेवा करत असताना असेही काही प्रसंग होते जेव्हा आम्ही आध्यात्मिक रीत्या कमजोर पडलो. पण, यहोवाने विश्वासू बांधवांद्वारे आमची सुधारणूक केली आणि आम्हाला आध्यात्मिक रीत्या मदत केली. त्याबद्दल आम्ही यहोवाचे खूप आभारी आहोत. (स्तो. १३०:३) त्या काळात, गुप्त पोलिसांनी बांधवांच्या नकळत मंडळीत शिरकाव केला होता. त्यांच्या सोबतीने सेवा करणं ही आमच्यासाठी खूप मोठी परीक्षा होती. ते खूप आवेशी वाटायचे आणि सेवाकार्यातही फार उत्साही असायचे. त्यांच्यापैकी काही जण तर संघटनेत जबाबदारीच्या पदांवरही होते. अर्थात, काही काळानंतर त्यांचा खरा चेहरा समोर आला.

सन १९७८ मध्ये, मरीया ४५ वर्षांची असताना पुन्हा गरोदर राहिली. तिला हृदयाचा एक गंभीर आजार असल्यामुळे गरोदरपणात तिच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती डॉक्टरांना वाटत होती. त्यामुळे ते गर्भपात करण्याचा तिच्यावर दबाव आणू लागले. पण, मरीयाने तसं करण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणून मग, तिची अकाली प्रसूती घडवून आणण्याकरता काही डॉक्टर तिला इंजेक्शन देण्यासाठी ती जाईल तिथे सिरिंज घेऊन तिच्या मागे जायचे. त्यामुळे, न जन्मलेल्या आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी मरीया हॉस्पिटलमधून पळून गेली.

पुढे गुप्त पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला ते शहर सोडून जाण्याचा हुकूम दिला. त्यामुळे आम्ही एस्टोनिया देशातल्या टालिन शहराजवळ असलेल्या एका गावात राहायला गेलो; त्या वेळी, एस्टोनिया हा यूएसएसआर चा भाग होता. टालिनमध्ये राहायला गेल्यावर मात्र डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याच्या अगदी उलट घडलं. मरीयाने एका सुदृढ मुलाला, व्हिटालीला जन्म दिला.

नंतर, आम्ही एस्टोनियातून निघून दक्षिण रशियातल्या नेझ्लोबनायामध्ये असलेल्या वसाहतीत राहायला गेलो. तिथल्या जवळपासच्या शहरांमध्ये पर्यटनासाठी आणि उपचारांसाठी देशभरातून अनेक लोक यायचे. या लोकांना आम्ही खूप दक्षता बाळगून प्रचार करायचो. उपचारासाठी आलेल्यांपैकी काही जण, जाताना सर्वकाळाच्या जीवनाची आशा घेऊन जायचे.

मुलांना यहोवावर प्रेम करण्यास शिकवलं

आम्ही मुलांच्या मनात यहोवाबद्दलचं प्रेम रुजवण्याचा आणि त्याची सेवा करण्याची इच्छा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुलांवर चांगला प्रभाव पाडणाऱ्या बंधुभगिनींना आम्ही सहसा आमच्या घरी बोलवायचो. माझा भाऊ ग्रीगोरी हासुद्धा आम्हाला नेहमी भेटायला यायचा. त्याने १९७० पासून १९९५ पर्यंत प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा केली. तो आल्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद व्हायचा. कारण, तो स्वतः खूप आनंदी असायचा आणि त्याच्यात उत्तम विनोदबुद्धीही होती. बंधुभगिनी घरी आल्यावर आम्ही सहसा त्यांच्यासोबत बायबलवर आधारित गेम्स खेळायचो आणि बायबलचे ऐतिहासिक अहवाल तर आमच्या मुलांचा आवडीचा विषय बनला.

माझी मुलं आणि त्यांच्या पत्नी.

डावीकडून उजवीकडे: यारोस्लाव, पावेल, व्हिटाली

समोरच्या रांगेत: अॅलीयोना, राया, स्वेट्‌लेना

१९८७ मध्ये आमचा मुलगा, यारोस्लाव हा लाटव्हिया देशातल्या रिगा शहरात राहायला गेला. तिथे तो अधिक उघडपणे प्रचारकार्य करू शकत होता. पण, लष्करी सेवा करण्यास नकार दिल्यामुळे त्याला दीड वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्या काळात त्याला नऊ वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये ठेवण्यात आलं. मी त्याला तुरुंगातल्या माझ्या स्वतःच्या अनुभवांबद्दल पूर्वी सांगितलं होतं. त्या अनुभवांमुळे त्यालाही यहोवाला एकनिष्ठ राहण्यास मदत झाली. पुढे, त्याने पायनियर सेवा सुरू केली. १९९० मध्ये, १९ वर्षांचा आमचा मुलगा, पावेल याने उत्तर जपानमध्ये असलेल्या साखालीन बेटावर जाऊन सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला, त्याने जाऊ नये असं आम्हाला वाटलं. त्या संपूर्ण बेटावर फक्त २० प्रचारक होते; शिवाय, त्या बेटापासून आम्ही ९,००० हून अधिक किलोमीटर दूर राहत होतो. पण शेवटी आम्ही त्याला जाण्याची परवानगी दिली आणि तो निर्णय योग्यच होता. कारण, तिथल्या लोकांनी राज्य संदेशाला चांगला प्रतिसाद दिला. काही वर्षांतच, तिथे आठ मंडळ्या स्थापित झाल्या. पावेलने १९९५ पर्यंत साखालीन बेटावर सेवा केली. तोपर्यंत, आमचा सगळ्यात लहान मुलगा, व्हिटाली हाच फक्त आमच्यासोबत राहत होता. लहानपणापासूनच त्याला बायबल वाचायला खूप आवडायचं. वयाच्या १४ व्या वर्षीच तो पायनियर बनला आणि दोन वर्षं मी स्वतः त्याच्यासोबत पायनियर सेवा केली. तो काळ खरंच खूप मस्त होता! मग, व्हिटाली १९ वर्षांचा झाला तेव्हा खास पायनियर सेवा करण्यासाठी घराबाहेर पडला.

१९५२ मध्ये, एक गुप्त पोलीस अधिकारी मरीयाला म्हणाला होता: “एकतर तुझ्या विश्वासाचा त्याग कर किंवा दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगण्यास तयार राहा. तू तुंरुगातून सुटून बाहेर येशील तेव्हा म्हातारी झालेली असशील आणि तुझं कोणीच नसेल.” पण, घडलं मात्र उलटंच. आम्ही आमच्या एकनिष्ठ देवाचं, यहोवाचं, तसंच आमच्या मुलांचं आणि आम्ही सत्य शिकण्यास मदत केलेल्या कितीतरी लोकांचं प्रेम अनुभवलं आहे. आमच्या मुलांनी ज्या-ज्या ठिकाणी सेवा केली तिथे जाण्याची संधी मला आणि मरीयाला मिळाली. तसंच, आमच्या मुलांनी ज्यांना सत्य शिकण्यास मदत केली त्यांच्या चेहऱ्यांवरचे कृतज्ञतेचे भावही आम्ही प्रत्यक्ष पाहिले.

यहोवाच्या चांगुलपणाबद्दल कृतज्ञ

१९९१ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला कायदेशीर मान्यता मिळाली. त्या निर्णयामुळे, प्रचारकार्याला आणखी चालना मिळाली. दर शनिवारी-रविवारी जवळपासच्या नगरांत आणि गावांत जाऊन प्रचार करता यावा म्हणून आमच्या मंडळीने तर एक बससुद्धा विकत घेतली.

२०११ मध्ये माझ्या पत्नीसोबत

आज यारोस्लाव आणि त्याची पत्नी, अॅलीयोना; तसंच, पावेल आणि त्याची पत्नी, राया बेथेलमध्ये सेवा करत आहेत. तर, व्हिटाली आणि त्याची पत्नी, स्वेट्‌लेना विभागीय कार्य करत आहेत. आमची सगळ्यात मोठी मुलगी ईरीना तिच्या कुटुंबासह जर्मनीमध्ये राहते. तिचे पती व्लादिमीर आणि त्यांची तिन्ही मुलं मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहेत. आमची मुलगी ओल्गा सध्या एस्टोनियामध्ये राहते आणि वेळोवेळी मला फोन करते. माझी पत्नी, मरीया हिचा २०१४ मध्ये मृत्यू झाला, या एकाच गोष्टीचं दुःख आहे. तिचं पुनरुत्थान होईल त्या वेळेची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. सध्या मी बेल्गोरोड या शहरात राहतो आणि इथल्या बांधवांचा मला खूप आधार आहे.

आजवर केलेल्या यहोवाच्या सेवेतून मी एक गोष्ट शिकलो; ती म्हणजे, यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी किंमत मोजावी लागली, तरी त्याच्या बदल्यात यहोवा आपल्याला जी मनाची शांती देतो ती कितीतरी पटीने मौल्यवान असते. अढळ विश्वास राखल्यामुळे मला आणि मरीयाला आम्ही कल्पनाही केली नव्हती इतके आशीर्वाद मिळाले. १९९१ मध्ये युएसएसआर चा पाडाव झाला तेव्हा तिथे फक्त ४०,००० पेक्षा थोडे जास्त प्रचारक होते. पण, एकेकाळी युएसएसआरचा भाग असलेल्या देशांमध्ये आज मात्र ४,००,००० हून अधिक प्रचारक आहेत! आता मी ८३ वर्षांचा आहे आणि मंडळीत एक वडील म्हणून सेवा करत आहे. यहोवाने मला नेहमीच विश्वासात टिकून राहण्यास मदत केली आहे. खरंच, यहोवाने मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत.—स्तो. १३:५, ६.

^ परि. 6 वॉच टॉवर सोसायटीद्वारे प्रकाशित.