व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या संग्रहातून

“आता आपलं पुढचं संमेलन केव्हा असणार आहे?”

“आता आपलं पुढचं संमेलन केव्हा असणार आहे?”

नोव्हेंबर १९३२ सालामधला तो दिवस. दहा लाखांपेक्षा जास्त लोक राहत असलेल्या मेक्सिको सिटीत एका आठवड्यापूर्वी पहिल्यांदाच ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते. पण त्या दिवशी शहरातले लोक एका वेगळ्या कारणामुळे उत्साहात होते. रेल्वे स्टेशनवर पत्रकार आपापले कॅमेरे घेऊन एका खास पाहुण्याची वाट पाहत होते. ते खास पाहुणे कोण होते? ते होते, वॉच टॉवर सोसायटीचे अध्यक्ष, जोसेफ एफ. रदरफर्ड. तिथले स्थानिक बांधवही, तीन दिवसांच्या अधिवेशनासाठी येत असलेल्या बंधू रदरफर्ड यांच्या आगमनाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते.

द गोल्डन एज या मासिकाने म्हटलं: मेक्सिको देशात सत्याचा प्रसार होण्याच्या दृष्टीने, “हे अधिवेशन इतिहासातलं एक महत्त्वाचं अधिवेशन म्हणून ओळखलं जाईल, यात कोणतीही शंका नाही.” पण, ते अधिवेशन तर फार लहान होतं आणि त्यात फक्त १५० च्या आसपास लोक उपस्थित होते. मग ते इतकं महत्त्वपूर्ण का मानण्यात आलं?

ते अधिवेशन होण्याअगोदर मेक्सिकोमध्ये सत्याचा म्हणावा तितका प्रसार झाला नव्हता. सन १९१९ पासून त्या देशात काही लहान संमेलनं भरवण्यात आली होती. पण, त्यानंतर मंडळ्यांची संख्या कमी झाली. १९२९ मध्ये मेक्सिको सिटीमध्ये शाखा कार्यालय सुरू केलं गेलं, तेव्हा असं वाटत होतं की परिस्थिती सुधारेल. पण, अजूनही काही अडथळे होते. संघटनेनं कॉलपोर्टर्सना (पायनियर) सूचना दिल्या होत्या, की त्यांनी प्रचार करताना व्यवसाय करू नये. संघटनेकडून मिळालेल्या या सूचनेमुळे एका कॉलपोर्टर बांधवाला इतका राग आला, की त्याने सत्य सोडून दिलं आणि स्वतःचा बायबल अभ्यास गट तयार केला. त्याच काळादरम्यान, शाखा कार्यालयाच्या पर्यवेक्षकाने चुकीचं वर्तन केल्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या पर्यवेक्षकाची नेमणूक करावी लागली. त्यामुळे, मेक्सिकोतल्या विश्वासू व एकनिष्ठ साक्षीदारांना त्या वेळी प्रोत्साहनाची खूप गरज होती.

विश्वासू साक्षीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी बंधू रदरफर्ड यांनी अधिवेशनात दोन भाषणं दिली. या भाषणांमुळे बांधवांना खूप उत्तेजन मिळालं. तसंच, रेडिओवरूनही बंधू रदरफर्ड यांची पाच प्रोत्साहनदायक भाषणं प्रसारित करण्यात आली. आनंदाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी रेडिओचा वापर करण्याची मेक्सिको देशामध्ये ही पहिलीच वेळ होती. अधिवेशन झाल्यानंतर मेक्सिकोमधलं संघटनेचं काम पाहण्यासाठी नवीन शाखा पर्यवेक्षकाला नेमण्यात आलं. तिथले साक्षीदार आता पुन्हा एकदा उत्साहित झाले होते; आणि यहोवाच्या आशीर्वादाने त्यांनी प्रचाराचं कार्य पुढे चालू ठेवलं.

१९४१ मधलं अधिवेशन, मेक्सिको सिटी

त्याच्या पुढच्याच वर्षी, म्हणजे १९३३ मध्ये या देशात आणखी दोन अधिवेशनं भरवण्यात आली; एक व्हेराक्रूझ या ठिकाणी आणि दुसरं मेक्सिको सिटीमध्ये. बांधव प्रचारकार्यात फार मेहनत घेत होते आणि याचे अनेक चांगले परिणाम पाहायला मिळाले. उदाहरणार्थ, १९३१ मध्ये मेक्सिको देशात फक्त ८२ प्रचारक होते. पण, १९४१ पर्यंत त्यांची संख्या दहा पटींनी वाढली! मेक्सिको सिटीमध्ये १९४१ मध्ये झालेल्या ईश्वरशासित संमेलनासाठी जवळजवळ १००० लोक उपस्थित राहिले.

“रस्त्यांवर आक्रमण”

सन १९४३ मध्ये साक्षीदारांनी “मुक्त राष्ट्राचे” ईश्वरशासित संमेलन याची जाहिरात करण्यास सुरुवात केली. हे संमेलन मेक्सिकोच्या १२ शहरांमध्ये होणार होतं. * ही जाहिरात करण्यासाठी साक्षीदारांनी सॅन्डविच पोस्टर वापरले; सॅन्डविच पोस्टर म्हणजे घोषवाक्यं लिहिलेली दोन मोठे पोस्टर. एकमेकांना जोडलेले हे पोस्टर खांद्यावर लटकवले जाऊ शकत होते. त्यामुळे एक पोस्टर पुढे आणि एक मागे असायचं. जाहिरात करण्यासाठी साक्षीदार १९३६ पासून अशा प्रकारचे सॅन्डविच पोस्टर वापरत होते.

बांधव सॅन्डविच पोस्टर घेऊन जाहिरात करताना—१९४४ मधल्या मासिकातलं चित्र

मेक्सिको सिटीमध्ये सॅन्डविच पोस्टरद्वारे केलेली जाहिरात इतकी यशस्वी झाली, की ला नासियॉन या मासिकाने संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या साक्षीदारांबद्दल लिहिलं: “पहिल्या दिवशी साक्षीदारांना जास्तीत जास्त लोकांना आमंत्रण देण्यास सांगितलं होतं. पण दुसऱ्या दिवशी तिथं बसण्यासाठी जागा कमी पडली.” साक्षीदारांना मिळालेलं यश पाहून कॅथलिक चर्चच्या लोकांना मुळीच आनंद झाला नाही आणि ते त्यांचा विरोध करू लागले. पण साक्षीदार बंधुभगिनी घाबरले नाहीत. त्यांनी संमेलनाची जाहिरात करणं चालूच ठेवलं. ला नासियॉनमध्ये आलेल्या आणखी एका लेखात म्हटलं होतं: “संपूर्ण शहराने त्यांना पाहिलं.” त्यात पुढे म्हटलं होतं, की सगळे बंधुभगिनी जणू “सॅन्डविच पोस्टर बनले आहेत.” या लेखात बंधुभगिनी मेक्सिको सिटीमध्ये जाहिरात करत असतानाचा एक फोटोही छापण्यात आला आणि त्याला “रस्त्यांवर आक्रमण” असं शीर्षक देण्यात आलं.

“सिमेंटच्या लादीपेक्षा मऊ आणि उबदार” बिछाने

त्या काळात मेक्सिकोमध्ये फार कमी अधिवेशनं व्हायची. आणि त्या अधिवेशनांना हजर राहण्यासाठी बऱ्याच साक्षीदारांना मोठा त्याग करावा लागायचा. अनेक बंधुभगिनी अशा दुर्गम भागांत राहायचे जिथे रेल्वे किंवा रस्तेसुद्धा नव्हते. त्यामुळे, रेल्वे मिळेल अशा ठिकाणी पोचण्यासाठी त्यांना खेचरावर बसून जावं लागायचं किंवा अनेक दिवस पायी चालावं लागायचं.

अनेक बंधुभगिनी खूप गरीब होते आणि त्यांच्याकडे अधिवेशनाच्या ठिकाणी पोचण्यापुरतेच पैसे असायचे. तिथे पोचल्यानंतर अनेक जण स्थानिक बंधुभगिनींच्या घरी राहायचे. हे स्थानिक बंधुभगिनी त्यांना प्रेम आणि आदरातिथ्य दाखवायचे. दुर्गम भागांतून आलेले इतर जण राज्य सभागृहांमध्ये रात्र काढायचे. एकदा तर जवळजवळ ९० बांधव शाखा कार्यालयात राहिले; तिथे ते पुस्तकांच्या खोक्यांवर झोपले. इयरबुक म्हणतं, की त्याबद्दल बांधवांनी खूप कृतज्ञता दाखवली. कारण, पुस्तकांचे हे खोके “सिमेंटच्या लादीपेक्षा मऊ आणि उबदार” होते.

अधिवेशनात इतर बंधुभगिनींसोबत एकत्र येण्याची संधी मिळाल्यामुळे हे बंधुभगिनी खूप आनंदी होते. आणि त्यासाठी त्यांनी जे त्याग केले ते योग्यच होते असं त्यांना वाटत होतं. आज मेक्सिकोमध्ये असलेल्या ८ लाख ५० हजाराहून अधिक साक्षीदारांचीसुद्धा हीच मनोवृत्ती आहे. * १९४९ इयरबुकचा अहवाल सांगतो, की बंधुभगिनींना जे त्याग करावे लागले त्यामुळे यहोवाच्या सेवेतला त्यांचा आवेश मुळीच कमी झाला नाही. उलट प्रत्येक संमेलन झाल्यानंतर पुढचे कितीतरी दिवस ते त्या संमेलनाविषयीच बोलायचे. बांधव पुन्हा-पुन्हा एकच प्रश्न विचारायचे: “आता आपलं पुढचं संमेलन केव्हा असणार आहे?”—आपल्या संग्रहातून, मध्य अमेरिका.

^ परि. 9 १९४४ इयरबुकनुसार या संमेलनामुळे यहोवाचे साक्षीदार संपूर्ण मेक्सिकोमध्ये ओळखले जाऊ लागले.

^ परि. 14 २०१६ मध्ये २२,६२,६४६ जण स्मारकविधीसाठी उपस्थित राहिले.