व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सहनशीलता—एका उद्देशासाठी धीर धरणं

सहनशीलता—एका उद्देशासाठी धीर धरणं

आपण “शेवटच्या दिवसांत” राहत असल्यामुळे आपल्यावर खूप दबाव येतो. यामुळे यहोवाच्या लोकांना कधी नव्हे इतकी आज सहनशीलतेची गरज आहे. (२ तीम. ३:१-५) आपण अशा जगात जगत आहोत जिथे लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे आणि संयम नसलेले आहेत. असे गुण दाखवणारे लोक सहसा असंयमी असतात. त्यामुळे सर्व ख्रिश्‍चनांनी स्वतःला विचारलं पाहिजे: ‘जगाच्या असंयमी वृत्तीचा माझ्यावर प्रभाव पडला आहे का? खऱ्‍या अर्थाने सहनशील असण्याचा काय अर्थ होतो? आणि या उल्लेखनीय गुणाला मी माझ्या व्यक्‍तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग कसा बनवू शकतो?’

सहनशीलता म्हणजे काय?

बायबलच्या मते सहनशीलता दाखवणं म्हणजे केवळ कठीण परिस्थितीत सहन करणंच नव्हे, तर त्यात बरंच काही गोवलेलं आहे. जी व्यक्‍ती देवासारखी सहनशीलता दाखवते ती एका उद्देशासाठी धीर धरते म्हणजे परिस्थिती सुधारेल याची आशा बाळगते. ती स्वतःच्या गरजांच्या पलीकडे पाहते आणि समस्येसाठी कारणीभूत असणाऱ्‍याचं हित पाहते. म्हणूनच एक सहनशील व्यक्‍ती जेव्हा दुखावली किंवा तिला गैरवागणूक दिली जाते तेव्हा ती बिघडलेलं नातं सुधारण्याची आशा बाळगत असते. म्हणूनच ही आश्‍चर्याची गोष्ट नाही की प्रेमातून विकसित होणाऱ्‍या गुणांपैकी ‘सहनशीलता’ या गुणाचा बायबल सर्वात आधी उल्लेख करतं. * (१ करिंथ. १३:४) देवाच्या वचनात “सहनशीलता” या गुणाला ‘आत्म्याच्या फळाच्या’ पैलूत सामील करण्यात आलं आहे. (गलती. ५:२२, २३) मग हा गुण विकसित करण्यासाठी आपण काय करण्याची गरज आहे?

सहनशीलता कशी विकसित करावी?

सहनशीलतेचा गुण विकसित करण्यासाठी आपण देवाच्या पवित्र आत्म्याची मदत मिळावी म्हणून प्रार्थना केली पाहिजे. देव त्याचा पवित्र आत्मा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या आणि त्याच्यावर विसंबून राहणाऱ्‍या लोकांना देतो. (लूक ११:१३) देवाचा पवित्र आत्मा खूप शक्‍तिशाली आहे. तरीही आपण आपल्या परीने प्रयत्न करणं आणि आपल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने काम करणंही महत्त्वाचं आहे. (स्तो. ८६:१०, ११) याचा अर्थ सहनशीलता हा गुण आपल्या हृदयात रुजवण्यासाठी आपण रोज पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे. पण सहनशीलता या गुणाला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा महत्त्वपूर्ण भाग बनवण्यासाठी आपल्याला आणखीही काही करण्याची गरज आहे. आणखी कशामुळे आपल्याला मदत मिळू शकते?

येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचं परीक्षण व अनुकरण करण्याद्वारे आपण सहनशीलता विकसित करू शकतो. येशूचं उदाहरण लक्षात ठेवून प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने ज्या ‘नवीन व्यक्‍तिमत्त्वाचं’ वर्णन केलं त्यात “सहनशीलता” सामील आहे. नंतर त्याने आपल्याला आर्जवलं की “ख्रिस्ताच्या शांतीला तुमच्या मनावर राज्य करू द्या.” (कलस्सै. ३:१०, १२, १५) येशूच्या अढळ विश्‍वासाचं अनुकरण करण्याद्वारे आपण अशा प्रकारच्या शांतीला आपल्या मनावर “राज्य” करू देऊ शकतो. येशूला विश्‍वास होता की मानवांना ज्याची चिंता आहे त्याबद्दल देव योग्य वेळी कार्य करेल. जर आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण केलं तर आपल्या भोवती काहीही होत असलं तरी आपण आपला संयम गमावून क्रोधित होणार नाही.—योहा. १४:२७; १६:३३.

आपल्याला जरी देवाचं वचनयुक्‍त नवीन जग पाहण्याची आतुरता असली तरी यहोवा आपल्या बाबतीत दाखवत असलेल्या सहनशीलतेवर मनन करून आपण आणखी सहनशील बनायला शिकतो. देवाचं वचन आपल्याला आश्‍वासन देतं: “काहींना वाटते त्याप्रमाणे, यहोवा आपले अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत नाही; उलट, तुमच्या बाबतीत तो सहनशीलता दाखवतो, कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असे त्याला वाटते.” (२ पेत्र ३:९) देव आपल्या बाबतीत दाखवत असलेल्या सहनशीलतेवर मनन केल्यामुळे इतरांशी आणखी सहनशीलतेने वागायला आपण प्रवृत्त होत नाही का? (रोम. २:४) तर मग, अशा कोणत्या परिस्थिती आहेत ज्यांत आपल्याला सहनशीलता दाखवण्याची गरज पडू शकते?

अशा परिस्थिती ज्यांमध्ये सहनशीलता दाखवण्याची गरज पडते

दैनंदिन जीवनातल्या अनेक परिस्थितींमध्ये आपल्या सहनशीलतेची परीक्षा होत असते. उदाहरणार्थ, कदाचित तुमच्याकडे महत्त्वाचं असं काहीतरी बोलण्यासारखं असेल, पण अशा वेळी इतरांच्या बोलण्यात खंड पडू नये म्हणून तुम्हाला सहनशीलता दाखवण्याची गरज पडेल. (याको. १:१९) तसंच, ज्यांच्या सवयींमुळे तुम्हाला चीड येते अशांच्या बाबतीतही तुम्हाला सहनशीलता दाखवण्याची गरज पडू शकते. अशा वेळी टोकाची प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही विचार करू शकता की यहोवा आणि येशूला आपल्या कमतरतांबद्दल काय वाटतं. ते आपल्या छोट्या-छोट्या चुकांवर लक्ष ठेवत नाही. उलट, ते आपल्यातले चांगले गुण पाहतात. तसंच आपण सुधारणा करण्यासाठी किती मेहनत घेत आहोत हेही ते पाहतात.—१ तीम. १:१६; १ पेत्र ३:१२.

आपल्याला जेव्हा आपली चूक दाखवण्यात येते तेव्हाही आपल्या सहनशीलतेची परीक्षा होऊ शकते. आपण सहसा लगेचच यावर आक्षेप घेतो आणि स्वतःची बाजू खरी आहे हे पटवतो. पण देवाचं वचन आपल्याला या बाबतीत एक वेगळा सल्ला देतं. ते म्हणतं: “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.” (उप. ७:८, ९) तर मग आपल्यावर लावण्यात आलेला एखादा आरोप जरी पूर्णपणे खोटा असला, तरी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण थोडं थांबून विचार केला पाहिजे. लोकांनी येशूची अन्यायीपणे थट्टा केली तेव्हा त्यानेही याच तत्त्वाचं पालन केलं.—मत्त. ११:१९.

आपल्या मुलांमध्ये विकसित होणाऱ्‍या चुकीच्या सवयी, इच्छा किंवा प्रवृत्ती पालकांना दिसतात, तेव्हा ती परिस्थिती हाताळताना त्यांना खासकरून सहनशीलता दाखवण्याची गरज पडते. मॅटायस नावाच्या बांधवाचं उदाहरण लक्षात घ्या. तो सध्या स्कॅन्डिनेव्हियाच्या बेथेलमध्ये सेवा करत आहे. तरुण असताना त्याला शाळेत त्याच्या विश्‍वासासाठी अनेक टोमणे सहन करावे लागले. सुरुवातीला तर त्याच्या पालकांना याची कल्पनाच नव्हती. पण विरोधामुळे त्याच्यावर होणाऱ्‍या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागलं. नंतर त्यांच्या मुलाने सत्याबद्दल शंका उपस्थित केली. मॅटायसचे वडील यिलीस म्हणतात: “त्या वेळी आम्हाला संयम दाखवण्याची खूप गरज होती.” मॅटायस विचारायचा: “देव कोण आहे? बायबल हे देवाचं वचन नसलं तर? आपल्याला कसं माहीत की देवच आपल्याकडून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करत आहे?” तो त्याच्या वडिलांना असंही म्हणायचा: “मला जर तुमच्यासारखं वाटत नसलं आणि तुमच्यासारखा माझा विश्‍वास नसला तर कोणी मला दोषी का ठरवावं?”

यिलीस म्हणतात: “कधीकधी तर आमच्या मुलाच्या प्रश्‍नांतून त्याचा राग व्यक्‍त व्हायचा. तो माझ्या किंवा त्याच्या आईच्या विरोधात नव्हता तर सत्याच्या विरोधात होता. त्याला वाटायचं की सत्यामुळे त्याचं जीवन जगणं कठीण झालंय.” मग यिलीस यांनी परिस्थिती कशी हाताळली? “मी त्याच्यासोबत तास न्‌ तास बसून बोलायचो. बऱ्‍याचदा मी त्याचं ऐकायचो आणि कधीकधी त्याच्या मनातल्या भावना व विचार जाणून घेण्यासाठी प्रश्‍न विचारायचो. झालेल्या चर्चेवर विचार करण्यासाठी मी कधीकधी त्याला वेळ द्यायचो आणि एक-दोन दिवसांनंतर त्यावर पुन्हा चर्चा करायचो. तर इतर वेळी, त्याने मांडलेल्या एखाद्या विषयावर मला विचार करायला थोडे दिवस लागतील असं मी त्याला सांगायचो. सतत होणाऱ्‍या या संभाषणांमुळे खंडणी, देवाचा सर्वोच्च अधिकार आणि प्रेम यांबद्दलची मॅटायसची समज हळूहळू सुधारू लागली व तो या सर्व गोष्टी स्वीकारू लागला. जरी त्याला असं करणं कठीण गेलं आणि यासाठी वेळ लागला तरी त्याच्या मनात यहोवासाठी प्रेम हळूहळू वाढत गेलं. आमच्या मुलाला त्याच्या किशोरवयात मदत करण्यासाठी मी आणि माझ्या पत्नीने धीराने घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं. सहनशीलतेमुळे सत्य त्याच्या मनापर्यंत पोहोचलं याचा आम्हाला खूप आनंद आहे!”

यहोवा आपल्याला मदत करेल असा भरवसा बाळगल्यामुळेच यिलीस आणि त्यांच्या पत्नीला आपल्या मुलाच्या बाबतीत सहनशीलता दाखवता आली. तो प्रसंग आठवून यिलीस म्हणतात की आम्ही मॅटायसला नेहमी सांगायचो: “तुझ्यावर असलेल्या प्रेमामुळेच आम्हाला यहोवाला कळकळून प्रार्थना करायला प्रेरणा मिळाली की त्याने तुला सत्य समजण्यासाठी मदत करावी.” सहनशीलता हा महत्त्वपूर्ण गुण दाखवल्यामुळे हे पालक खरंच यहोवाचे किती उपकार मानत असतील!

आध्यात्मिक मदत देण्यासोबतच खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी दीर्घकाळ आजारी असलेल्या आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची किंवा मित्रांची काळजी घेताना सहनशीलता विकसित करणं गरजेचं आहे. स्कॅन्डिनेव्हियामध्ये राहणाऱ्‍या इलेन * नावाच्या बहिणीच्या उदाहरणाचा विचार करा.

जवळपास आठ वर्षांपूर्वी इलेनच्या पतीला एका अशा आजाराने ग्रासलं ज्यामुळे त्याच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम झाला. आता तो प्रेम, आनंद किंवा दुःख या सर्व भावना अनुभवू शकणार नव्हता. तिच्यासाठी ही खरंच खूप मोठी समस्या होती. ती म्हणते: “मला धीराची आणि बऱ्‍याचदा प्रार्थना करण्याची गरज भासली.” ती पुढे म्हणते: “मला सांत्वन देणारं माझं आवडतं वचन आहे फिलिप्पैकर ४:१३. त्यात म्हटलंय: ‘जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.’” यहोवाकडून मिळत असलेल्या त्या सामर्थ्यासाठी ती खूप आभारी आहे. यामुळे तिला धीराने सहन करायला मदत होते. तिला यहोवाच्या मदतीवर पूर्ण भरवसा आहे.—स्तो. ६२:५, ६.

यहोवा दाखवत असलेल्या सहनशीलतेचं अनुकरण करा

सहनशीलता दाखवण्याच्या बाबतीत यहोवा सर्वोत्तम उदाहरण आहे. आपण त्याचं अनुकरण करू शकतो. (२ पेत्र ३:१५) यहोवाने बऱ्‍याच वेळा सहनशीलता दाखवली. याचे अहवाल बायबलमध्ये नमूद आहेत. (नहे. ९:३०; यश. ३०:१८) उदाहरणार्थ, सदोमचा नाश करण्याचा निर्णय घेताना यहोवाने अब्राहामने विचारलेल्या प्रश्‍नांबद्दल कशी प्रतिक्रिया दिली? अब्राहाम जेव्हा बोलत होता तेव्हा यहोवाने त्याला मधेच थांबवलं नाही. उलट, अब्राहामचा प्रत्येक प्रश्‍न आणि त्याच्या चिंता त्याने धीराने ऐकून घेतल्या. अब्राहामचं बोलणं यहोवाने लक्षपूर्वक ऐकलं आहे हे दाखवण्यासाठी त्याने अब्राहामला वाटणाऱ्‍या चिंता पुन्हा बोलून दाखवल्या. तसंच त्याने त्याला याची हमी दिली की सदोममध्ये जरी दहा धार्मिक जण असले तरी तो त्या शहराचा नाश करणार नाही. (उत्प. १८:२२-३३) सहनशीलतेने ऐकण्याचं आणि टोकाची प्रतिक्रिया न देण्याचं किती उत्तम उदाहरण!

देवासारखी सहनशीलता दाखवणे हा नवीन व्यक्‍तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सर्व ख्रिश्‍चनांनी तो परिधान केला पाहिजे. हा मौल्यवान आणि कायम टिकून राहणारा गुण विकसित करण्यासाठी आपण जर मेहनत घेतली, तर आपण आपल्या प्रेमळ आणि सहनशील असणाऱ्‍या स्वर्गीय पित्याचा आदर करू. तसंच “विश्‍वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारसदार” आहेत त्यांमध्ये आपण गणले जाऊ.—इब्री ६:१०-१२.

^ परि. 4 पवित्र आत्म्याचं फळ यांबद्दल असलेल्या ९ लेखांच्या शृंखलेतल्या पहिल्या लेखात प्रेम या गुणावर चर्चा करण्यात आली आहे.

^ परि. 15 नाव बदलण्यात आलं आहे.