व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?

तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?

“[पूर्ण माहिती, NW] ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.”—नीति. १८:१३.

गीत क्रमांक: ४३, ४०

१, २. (क) आपल्याला काय शिकून घेणं गरजेचं आहे आणि का? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

खरे ख्रिस्ती या नात्याने आपण एखादी माहिती कितपत खरी आहे हे पडताळून पाहायला शिकणं गरजेचं आहे. यामुळे आपल्याला योग्य निष्कर्षावर पोचणं शक्य होईल. (नीति. ३:२१-२३; ८:४, ५) आपण हे शिकून घेतलं नाही, तर सैतान आणि त्याचं जग आपल्या विचारांवर चुकीचा प्रभाव पाडू शकतं. (इफिस. ५:६; कलस्सै. २:८) पण योग्य निष्कर्षावर पोचण्यासाठी आपल्याजवळ एखाद्या गोष्टीबद्दल संपूर्ण आणि खरी माहिती असणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे १८:१३ म्हणतं: “[पूर्ण माहिती, NW] ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.”

या लेखात आपण पाहू की कोणत्या कारणामुळे संपूर्ण आणि खरी माहिती मिळवून योग्य निष्कर्ष काढणं कठीण जाऊ शकतं. तसंच, बायबलमधली कोणती तत्त्वं आणि उदाहरणं आपल्याला माहिती पडताळून पाहण्यासाठी मदत करू शकतात हेही आपण पाहू या.

“प्रत्येक शब्दावर” भरवसा ठेवू नका

३. नीतिसूत्रे १४:१५ मधील तत्त्व लागू करणं गरजेचं का आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

आज आपल्यावर चारही बाजूंनी माहितीचा भडिमार होत आहे. इंटरनेट, टिव्ही आणि इतर माध्यमांतून ही माहिती सतत आपल्यापर्यंत येत असते. आपल्या मित्रांकडून एखादा अनुभव किंवा माहिती आपल्याला ई-मेल आणि मेसेज यांद्वारे येऊ शकते. सतत येणाऱ्‍या या माहितीला अंत नाही. यामुळे आपण सावध असणं गरजेचं आहे. आपले मित्र आपल्याला जे काही पाठवतात त्यामागे त्यांचा हेतू चांगला असतो. पण जगात असेही लोक आहेत जे मुद्दाम चुकीची माहिती पसरवतात किंवा एखाद्या गोष्टीत आपल्या मनाचं जोडून लोकांची दिशाभूल करतात. तर मग आपण जे काही ऐकतो किंवा वाचतो ती माहिती खरी आहे की नाही, हे ओळखण्यासाठी बायबलचं कोणतं तत्त्व आपल्याला मदत करू शकतं? नीतिसूत्रे १४:१५ म्हणतं: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.”

४. कोणती माहिती वाचली पाहिजे हे ओळखण्यासाठी फिलिप्पैकर ४:८, ९ आपली मदत कसं करू शकतं? अचूक माहिती मिळवणं इतकं गरजेचं का आहे? (“ खरी माहिती मिळवण्यासाठी काही तरतुदी” ही चौकट पाहा.)

चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्याजवळ भरवशालायक माहिती असणं गरजेचं आहे. यामुळे आपण जे वाचतो त्याबद्दल आपण खूप सावध असलं पाहिजे. (फिलिप्पैकर ४:८, ९ वाचा.) भरवशालायक नसलेल्या बातम्यांच्या वेबसाईट्‌स, किंवा ई-मेल, मेसेज यांद्वारे पसरवल्या जाणाऱ्‍या अफवा वाचण्यात आपण आपला वेळ घालवणं चुकीचं ठरेल. खासकरून आपण अशा वेबसाईट्‌सवर माहिती वाचण्याचं टाळलं पाहिजे जिथे धर्मत्यागी लोक आपले विचार मांडतात. देवाच्या लोकांचा विश्‍वास कमकुवत करण्याची आणि सत्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याची त्यांची इच्छा असते. भरवशालायक नसलेल्या माहितीवर विश्‍वास ठेवल्यामुळे आपले निर्णय चुकतील. अशा माहितीचा आपल्यावर प्रभाव होणार नाही, असा विचार आपण कधीही करू नये.—१ तीम. ६:२०, २१.

५. इस्राएली लोकांनी कोणत्या खोट्या माहितीवर विश्‍वास ठेवला आणि याचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला?

चुकीची माहिती पसरवण्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. मोशेच्या काळात १२ जासूद वचनयुक्‍त देशाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यातील १० जासूद त्या देशाबद्दल नकारात्मक माहिती घेऊन आले. (गण. १३:२५-३३) त्यांनी माहिती बढवून चढवून सांगितली आणि यामुळे इस्राएली लोक खूप घाबरले व निराश झाले. (गण. १४:१-४) लोकांनी अशी प्रतिक्रिया का दिली? जवळपास सर्व जासुदांनी एकसारखी माहिती सांगितल्यामुळे ती माहिती खरी आहे असा त्या लोकांनी विचार केला असावा. म्हणून मग त्या देशाबद्दल इतर दोन जासुदांनी ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यावर लोकांनी लक्षच दिलं नाही. (गण. १४:६-१०) त्या लोकांनी संपूर्ण आणि खरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तसंच, त्यांनी यहोवावरही भरवसा ठेवला नाही. याउलट त्यांनी खोट्या आणि नकारात्मक माहितीवर भरवसा ठेवला.

६. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल धक्कादायक गोष्टी पसरवल्या जातात तेव्हा आपण गोंधळून का जाऊ नये?

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आपण जेव्हा इतरांकडून काही ऐकतो, खासकरून तेव्हा सावध असणं गरजेचं आहे. आपल्या शत्रूला, सैतानाला बायबलमध्ये “बांधवांवर दोष” लावणारा असं म्हणण्यात आलं आहे. (प्रकटी. १२:१०) येशूने आपल्याला आधीच सांगितलं आहे की विरोधक आपल्यावर “सर्व प्रकारचे खोटे आरोप” लावतील. (मत्त. ५:११) आपण जर येशूचे शब्द नेहमी लक्षात ठेवले तर आपण साक्षीदारांबद्दल काही विचित्र गोष्टी ऐकून गोंधळून जाणार नाही.

७. ई-मेल किंवा मेसेज यांद्वारे माहिती इतरांना पाठवण्याआधी आपण स्वतःला काय विचारायला हवं?

तुम्हाला तुमच्या मित्रांना मेसेज, ई-मेल पाठवायला नक्कीच आवडत असेल. तुम्ही एखादी रोचक बातमी पाहता किंवा एखादा चांगला अनुभव ऐकता, तेव्हा तुम्हाला एखाद्या पत्रकारासारखं लगेच ती माहिती इतरांना सांगाविशी वाटते का? अशी माहिती इतरांना मेसेज, ई-मेल यांद्वारे पाठवण्याआधी स्वतःला विचारा: ‘मी खात्रीने म्हणू शकतो का, की ही माहिती खरी आहे? याबद्दल माझ्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?’ तुमच्याजवळ जर संपूर्ण माहिती नसेल, तर कदाचित तुमच्या हातून खोटी माहिती पसरवली जाऊ शकते. म्हणून एखादा अनुभव किंवा माहिती भरवशालायक आहे की नाही, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मग ती इतरांना पाठवू नका. ती लगेच डिलिट करा!

८. काही देशांमध्ये विरोधकांनी काय केलं आहे, आणि आपण सावध नसलो तर नकळत आपल्या हातून काय घडू शकतं?

अविचारीपणे ई-मेल आणि मेसेज पाठवण्यात आणखी एक धोका आहे. काही देशांमध्ये आपल्या कामावर काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत आणि काही ठिकाणी तर पूर्णपणे बंदी आहे. अशा देशांमध्ये साक्षीदारांच्या मनात भीती घालण्यासाठी किंवा शंका उत्पन्‍न करण्यासाठी विरोधक आपल्याबद्दल मुद्दाम खोटी माहिती पसरवू शकतात. पूर्वीच्या काळात असलेल्या सोव्हिएत संघात काय घडलं याचा विचार करा. तिथे गुप्त पोलिसांचा एक गट होता. त्याला केजीबी असं म्हटलं जायचं. आपल्या संघटनेत जबाबदारीच्या पदावर असलेल्या काही बांधवांबद्दल या पोलिसांनी अफवा पसरवली की त्यांनी साक्षीदारांना धोका दिला आहे. * दुःखाची गोष्ट म्हणजे बऱ्‍याच बंधुभगिनींनी या बातमीवर भरवसा ठेवला आणि ते संघटना सोडून गेले. यांपैकी बरेच जण नंतर मंडळीत परत आले, पण काही लोकांनी कायमचंच यहोवाला सोडून दिलं. त्यांनी या अफवांवर भरवसा ठेवून यहोवावरचा आपला विश्‍वास गमावला. (१ तीम. १:१९) आपण अशा प्रकारचे वाईट परिणाम कसे टाळू शकतो? नकारात्मक किंवा खात्री नसलेली माहिती इतरांना पाठवू नका. ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर भरवसा ठेवू नका. याऐवजी त्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.

अर्धसत्य

९. आणखी कोणत्या गोष्टीमुळे योग्य निष्कर्षावर पोचणं कठीण जाऊ शकतं?

कधीकधी आपल्याला अशा गोष्टी ऐकायला मिळतात ज्यात काही प्रमाणातच सत्य असतं. काही वेळा संपूर्ण माहिती सांगितली जात नाही. यामुळेही आपल्याला योग्य निष्कर्षावर पोचणं कठीण जातं. एखाद्या माहितीत फक्‍त अर्धसत्य असलं तर आपण त्यावर भरवसा ठेवू शकत नाही. अशा प्रकारच्या माहितीमुळे आपली दिशाभूल होणार नाही याची आपण खबरदारी कशी बाळगू शकतो?—इफिस. ४:१४.

१०. पश्‍चिमेकडे राहणारे काही इस्राएली आपल्या बांधवांविरुद्ध लढायला का तयार झाले? कोणत्या गोष्टीमुळे ही परिस्थिती टळली?

१० यहोशवाच्या दिवसांत यार्देन नदीच्या पश्‍चिमेला राहणाऱ्‍या इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्यातून आपण धडा घेऊ शकतो. (यहो. २२:९-३४) या लोकांना बातमी मिळाली की यार्देनच्या पूर्वेकडे राहणाऱ्‍या इस्राएली लोकांनी नदीजवळ एक मोठी वेदी बांधली आहे. पूर्वेकडे रऊबेन, गाद व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातले लोक राहायचे. त्यांनी वेदी बांधली ही बातमी खरी होती. आणि ती ऐकून नदीच्या पश्‍चिमेला राहणाऱ्‍या इस्राएली लोकांना वाटलं की पूर्वेकडे राहणाऱ्‍या त्यांच्या बांधवांनी यहोवाविरुद्ध बंड केला आहे. यामुळे ते त्यांच्याविरुद्ध युद्ध करायला एकत्र आले. (यहोशवा २२:९-१२ वाचा.) पण युद्ध करण्याआधी सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी काही माणसांना पूर्वेकडे राहणाऱ्‍या इस्राएली लोकांकडे पाठवलं. तिथे गेल्यावर या लोकांना काय माहिती मिळाली? पूर्वेकडच्या इस्राएली लोकांनी ही वेदी खोट्या देवतांना बलिदानं देण्यासाठी बनवली नव्हती. तर इतर राष्ट्रांतील लोकांना कळून यावं की इस्राएली लोक फक्‍त यहोवाचीच उपासना करतात यासाठी त्यांनी ही वेदी बांधली होती. पश्‍चिमेकडच्या इस्राएली लोकांना हे ऐकून किती बरं वाटलं असेल! तसंच, त्यांना आनंद झाला असेल की त्यांनी आपल्या बांधवांसोबत युद्ध करण्याआधी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी वेळ दिला.

११. (क) मफीबोशेथला कोणता अन्याय सहन करावा लागला? (ख) दावीद ते कसं टाळू शकला असता?

११ कधीकधी लोक कदाचित तुमच्याबद्दल अर्धसत्य सांगतील आणि याचं तुम्हाला खूप वाईट वाटू शकतं. मफीबोशेथसोबत जे झालं त्याचा विचार करा. शौल हा मफीबोशेथचा आजोबा होता आणि त्याची सर्व जमीन दावीद राजाने मफीबोशेथला दिली होती. (२ शमु. ९:६, ७) पण काही काळानंतर दावीदने मफीबोशेथबद्दल काही नकारात्मक गोष्टी ऐकल्या. या गोष्टी खऱ्‍या आहेत की नाही, याची खात्री न करता दावीदने मफीबोशेथची सर्व संपत्ती परत घेतली. (२ शमु. १६:१-४) नंतर जेव्हा दावीद त्याच्याशी बोलला तेव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. म्हणून मग त्याने काही संपत्ती मफीबोशेथला परत दिली. (२ शमु. १९:२४-२९) दावीदने लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, तर मफीबोशेथला हा अन्याय सहन करावा लागला नसता.

१२, १३. (क) येशूबद्दल लोक खोटं बोलले तेव्हा त्याने काय केलं? (ख) आपल्याबद्दल कोणी खोटी माहिती पसरवली तर आपण काय करू शकतो?

१२ तुमच्याबद्दल जर कोणी खोटी माहिती पसरवली तर तुम्ही काय करू शकता? येशू आणि बाप्तिस्मा देणारा योहान यांच्याबद्दलही लोकांनी खोटी माहिती पसरवली होती. (मत्तय ११:१८, १९ वाचा.) यावर येशूने काय केलं? लोकांनी ऐकलेली गोष्ट खोटी आहे हे त्यांना पटवून देण्यात त्याने आपला वेळ आणि शक्‍ती घालवली नाही. याउलट त्याने लोकांना संपूर्ण माहिती जाणून घेण्याचं उत्तेजन दिलं. तो जे शिकवतो आणि जी कार्यं करतो त्यावर लोकांनी लक्ष द्यावं अशी त्याची इच्छा होती. येशूने म्हटलं: “बुद्धी ही कार्यांद्वारे नीतिमान ठरते.”—मत्त. ११:१९, तळटीप.

१३ येशूच्या शब्दांमधून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. कधीकधी लोक आपल्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलतील आणि यामुळे आपल्याला चिंता वाटू शकते की आपलं नाव खराब होईल. पण अशा वेळी आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांना दाखवून देऊ शकतो, की आपण खरोखर कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत. येशूच्या उदाहरणावरून आपण एक महत्त्वाचं सत्य शिकतो. ते म्हणजे आपल्या चांगल्या आचरणावरून इतरांना दिसून येईल की आपल्याबद्दल पसरवलेली माहिती ही खोटी होती किंवा ते अर्धसत्य होतं.

तुम्ही स्वतःवर अवलंबून राहता का?

१४, १५. आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून का राहू नये?

१४ आपण आधी पाहिलं की एखाद्या गोष्टीबद्दल भरवशालायक माहिती मिळवणं इतकं सोपं नाही. यात आणखी एका समस्येची भर पडते, ती म्हणजे आपली अपरिपूर्णता. आपण कदाचित बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असू आणि काही बाबतींत आपल्याला बराच अनुभव मिळाला असेल. आपली विचार करण्याची पद्धत योग्य आहे यामुळे कदाचित लोक आपला आदर करत असतील. पण हा आपल्यासाठी एक पाश ठरू शकतो का?

१५ हो, कारण यामुळे आपण स्वतःच्या बुद्धीवर जास्त भरवसा ठेवायला लागू शकतो. आपल्या भावनांचा आणि आपल्याला जे योग्य वाटतं त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होऊ शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल संपूर्ण माहिती नसली तरीदेखील आपल्याला वाटू शकतं की आपण आपल्या अनुभवामुळे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो. हे धोक्याचं ठरू शकतं! बायबल आपल्याला स्पष्ट शब्दांत ताकीद देतं की आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नये.—नीति. ३:५, ६; २८:२६.

१६. या काल्पनिक घटनेत काय घडतं आणि विल्सन नावाचा बांधव काय विचार करतो?

१६ एका काल्पनिक घटनेचा विचार करा: एका संध्याकाळी विल्सन नावाचा एक अनुभवी वडील एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. तिथे त्याला त्याच्याच मंडळीचा एक वडील, जॉन एका स्त्रीसोबत बसलेला दिसतो. ती दोघं हसत आहेत, त्यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्या आहेत असं विल्सनला दिसतं. हे पाहून त्याला खूप काळजी वाटते. तो विचार करतो: ‘जॉन दुसऱ्‍या एका स्त्रीसोबत! त्याच्या पत्नीचं, मुलांचं कसं होणार?’ विल्सनने आधीही अशा गोष्टींमुळे विवाह तुटताना पाहिले आहेत. तुम्ही विल्सनच्या जागी असता तर तुम्हीही असाच विचार केला असता का?

१७. विल्सनने जॉनला फोन केल्यानंतर त्याला कोणती माहिती मिळाली, आणि आपण यातून काय शिकू शकतो?

१७ विल्सनला वाटत आहे की जॉन आपल्या पत्नीशी एकनिष्ठ नाही. पण त्याच्याकडे संपूर्ण माहिती आहे का? रात्री विल्सन जॉनला फोन करून याबद्दल बोलतो, तेव्हा त्याला कळतं की ती स्त्री जॉनची बहीण आहे. ती दुसऱ्‍या शहरात राहते आणि बऱ्‍याच वर्षांनंतर ते आज भेटले. तसंच, तिच्याकडे कमी वेळ असल्यामुळे घरी न जाता ती दोघं हॉटेलमध्ये भेटले. जॉनची पत्नीही हॉटेलमध्ये त्यांना भेटणार होती पण काही कारणामुळे तिला येता आलं नाही. हे सर्व ऐकून विल्सनला खूप बरं वाटतं आणि तो विचार करतो ‘बरं झालं ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही.’ यातून आपण काय शिकतो? आपण बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरीही योग्य निष्कर्षावर पोचण्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे.

१८. कोणत्या गोष्टीमुळे आपण आपल्या बांधवाबद्दल चुकीचा निष्कर्ष काढू?

१८ आपल्या बांधवासोबत आपलं पटत नसतं, तेव्हा एखाद्या परिस्थितीत नीट विचार करून निष्कर्ष काढणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. आपसांत असलेल्या मतभेदांवरच आपण सारखा विचार करत राहिलो, तर आपण आपल्या बांधवाच्या हेतूंवर शंका घेऊ लागू. यामुळे जेव्हा आपण त्याच्याबद्दल काही नकारात्मक ऐकू, तेव्हा आपण लगेच त्यावर भरवसा ठेवू. मग त्याबद्दल काही पुरावे नसले तरीही. आपण हे कसं टाळू शकतो? आपल्या बांधवांबद्दल आपण जर मनात नकारात्मक भावना बाळगली, तर यामुळे आपण चुकीच्या निष्कर्षावर पोचू. आणि हे निष्कर्ष संपूर्ण माहितीवर आधारित नसतील. (१ तीम. ६:४, ५) यामुळे आपण कधीही आपल्या मनात बांधवांबद्दल नकारात्मक भावना, जसं की ईर्षा किंवा हेवा बाळगू नये. यहोवाची इच्छा आहे की आपण नेहमी आपल्या बांधवांवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांना क्षमा केली पाहिजे. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.—कलस्सैकर ३:१२-१४ वाचा.

बायबल तत्त्वांमुळे आपलं संरक्षण होतं

१९, २०. (क) बायबलच्या कोणत्या तत्त्वांमुळे आपल्याला माहिती अचूकपणे पडताळून घ्यायला मदत होईल? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ आज भरवशालायक माहिती मिळवणं आणि तिला अचूकपणे पडताळणं खूप कठीण झालं आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण आपल्या अपरिपूर्णतेमुळे हे करणं शक्य होत नाही. तसंच, आज उपलब्ध असलेली बहुतेक माहिती अपूर्ण असते किंवा ती पूर्णपणे खरी नसते. पण आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? यासाठी बायबलमध्ये तत्त्वं दिली आहेत. उदाहरणार्थ, एक तत्त्व असं म्हणतं की संपूर्ण माहिती ऐकून घेण्याआधी उत्तर देणं मूर्खपणाचं आहे. (नीति. १८:१३) आणखी एका तत्त्वामुळे आपल्याला समजतं की आपण ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर भरवसा ठेवण्याऐवजी, ती खरी आहे का हे आधी पडताळून पाहणं गरजेचं आहे. (नीति. १४:१५) तसंच, जरी अनेक वर्षं आपण यहोवाची सेवा करत असलो तरी आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचं टाळलं पाहिजे. (नीति. ३:५, ६) बायबलच्या तत्त्वांमुळे आपण भरवशालायक माहितीचा उपयोग करून योग्य निष्कर्षावर पोचलो आणि सुज्ञ निर्णय घेतले तर आपलं संरक्षण होईल.

२० पण आणखी एका गोष्टीमुळे आपल्याला सत्य परिस्थिती काय आहे हे ओळखणं कठीण जाऊ शकतं. मानव या नात्याने आपण सहसा दिसणाऱ्‍या गोष्टींवरून पटकन आपलं मत बनवतो. पुढच्या लेखात आपण अशा परिस्थितींबद्दल पाहणार आहोत ज्यांमध्ये आपल्या हातून अशी चूक घडू शकते. तसंच, आपण ती कशी टाळू शकतो यावरही आपण चर्चा करू.

^ परि. 8 इयरबुक ऑफ जेहोवाज विट्‌नेसेस २००४, पृष्ठं १११-११२ आणि इयरबुक २००८, पृष्ठं १३३-१३५ पाहा.