व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

हात गळू न देण्याचा मी निर्धार केला आहे

हात गळू न देण्याचा मी निर्धार केला आहे

मी ८९ वर्षांचा आहे. बेथेलमधले अनेक तरुण मला “डॅडी,” “पप्पा,” “अंकल” अशी हाक मारतात. ही गोष्ट माझ्या ७२ वर्षांच्या पूर्णवेळच्या सेवेबद्दल यहोवाने मला दिलेलं एक बक्षीस आहे असं मला वाटतं. देवाच्या सेवेतल्या माझ्या अनुभवावरून मी तरुणांना या गोष्टीची अगदी मनापासून खात्री देऊ शकतो की ‘त्यांनी जर आपले हात गळू दिले नाहीत तर त्यांना नक्कीच आशीर्वाद मिळतील.’—२ इति. १५:७.

माझे आईबाबा आणि भावंडं

माझे आईबाबा युक्रेनवरून कॅनडाला स्थलांतरित झाले होते. ते मॅनिटोबा प्रांतातल्या, रॉस्बर्न शहरात राहू लागले. आम्ही एकूण १६ भावंडं होतो आणि त्यातला मी १४ वा होतो. आम्ही ८ भाऊ आणि ८ बहिणी; आमच्यात कोणीही जुळं नव्हतं. माझ्या बाबांना बायबल आवडायचं आणि ते दर रविवारी सकाळी बायबल वाचायचे. पण धर्म म्हणजे जणू पैसा कमवण्याचा एक मार्ग आहे असं त्यांना वाटायचं. आणि मस्करीत ते म्हणायचे: “येशूला प्रचार आणि शिकवण्याच्या कामासाठी कोण पैसे द्यायचं?”

माझ्या चार भावांनी आणि चार बहिणींनी कालांतराने सत्य स्वीकारलं. माझी बहीण रोझ ही शेवटपर्यंत पायनियर होती. देवाच्या वचनाकडे लक्ष द्या असं ती आपल्या अखेरच्या दिवसांत सर्वांना सांगत होती. ती म्हणायची, “मला तुम्हाला नवीन जगात बघायचंय.” माझा मोठा भाऊ टेड हा आधी नरकाग्नीबद्दल प्रचार करायचा. दर रविवारी सकाळी तो रेडिओवर वारंवार असं ठासून सांगायचा, की पापी लोकांना नरकात सतत जळत असणाऱ्‍या आगीत राहावं लागेल. पण पुढे जाऊन तो यहोवाचा एक आवेशी आणि विश्‍वासू सेवक बनला.

माझ्या पूर्णवेळेच्या सेवाकार्याची सुरुवात

१९४४ च्या जून महिन्यात एके दिवशी मी शाळेतून घरी आलो तेव्हा मला द कमिंग वर्ल्ड रिजनरेशन * ही पुस्तिका टेबलावर दिसली. मी पहिलं पान वाचलं, मग दुसरं, मग मी वाचतच गेलो. ती पुस्तिका मी संपूर्ण वाचून काढली. मग येशूसारखंच यहोवाची सेवा करण्याचा निर्णय मी घेतला.

पण ती पुस्तिका आमच्या टेबलावर कशी आली? माझा मोठा भाऊ स्टीव म्हणाला की “दोन जण पुस्तकं विकण्यासाठी आपल्या घरी आले होते. ती पुस्तिका खूप स्वस्त होती म्हणून मग मी ती विकत घेतली.” ती माणसं रविवारी परत आमच्या घरी आली. ते यहोवाचे साक्षीदार होते. त्यांनी सांगितलं की ते लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून देतात. आम्हाला ते आवडलं, कारण आमच्या आईबाबांमुळे आमच्या मनात बायबलबद्दल आदर होता. त्या दोघांनी आम्हाला हेही सांगितलं की लवकरच विनिपेग या ठिकाणी साक्षीदारांचं अधिवेशन होणार आहे. माझी बहीण एल्सीसुद्धा त्याच शहरात राहायची म्हणून मग मी त्या अधिवेशनाला जायचं ठरवलं.

मी विनिपेगला पोचण्यासाठी जवळजवळ ३२० कि.मी. सायकलवर प्रवास केला. प्रवासादरम्यान मी केलवुडमध्ये थांबलो. आमच्या घरी आलेले दोन साक्षीदार याच गावात राहात होते. मी तिथल्या सभेला गेलो आणि मंडळी म्हणजे नेमकं काय असतं हे मला तेव्हा कळलं. सर्व स्त्री-पुरुषांनी आणि तरुणांनी घरोघरी जाऊन येशूसारखं शिकवलं पाहिजे हेही मला तेव्हा समजलं.

विनिपेगमध्ये मला माझा मोठा भाऊ जॅक भेटला. तो उत्तर ऑन्टारियो इथून अधिवेशनासाठी आला होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एका बांधवाने घोषणा केली की बाप्तिस्मा देण्यात येणार आहे. जॅक आणि मी त्या अधिवेशनात बाप्तिस्मा घेण्याचं ठरवलं. त्यानंतर लवकरात लवकर पायनियर बनण्याचा आम्ही निश्‍चय केला. जॅकने अधिवेशनानंतर पूर्णवेळेची सेवा सुरू केली. मला तसं करता आलं नाही, कारण त्या वेळी मी १६ वर्षांचा होतो आणि मला शाळा पूर्ण करायची होती. पण पुढच्या वर्षी मी पायनियर बनलो.

पायनियरिंगने मला बरंच काही शिकवलं

स्टॅन निकोलसन याच्यासोबत मी सुरस इथे माझी पायनियरिंग सुरू केली. हे शहर मॅनिटोबाच्या प्रांतात होतं. पायनियरिंग करणं सोपं नाही हे लवकरच माझ्या लक्षात आलं. आमचे पैसेही संपत आले होते, पण आम्ही प्रचारकार्य चालूच ठेवलं. एकदा तर दिवसभर प्रचारकार्य करून आम्ही घरी चाललो होतो तेव्हा आमच्या खिशात एक दमडीही नव्हती आणि आम्हाला खूप भूक लागली होती. पण घरी आलो तेव्हा पाहतो तर काय, आमच्या दाराबाहेर एक मोठी बॅग ठेवली होती. त्यात भरपूर अन्‍न होतं. ती बॅग तिथे कोणी ठेवली होती हे आजपर्यंत आम्हाला समजलं नाही. त्या रात्री तर आमच्यासाठी मेजवानीच होती! हात गळू न दिल्यामुळे आम्हाला हा आशीर्वाद मिळाला होता. खरंतर त्या महिन्यात माझं वजन कधी नव्हे इतकं वाढलं होतं!

काही महिन्यांनंतर आम्हाला उत्तर सुरसच्या २४० कि.मी. अंतरावर असलेल्या गिल्बर्ट प्लेन्स या शहरात नेमण्यात आलं. त्या काळी स्टेजवर मंडळीच्या प्रत्येक महिन्याचा प्रचारकार्याच्या अहवालाचा मोठा चार्ट लावण्यात यायचा. एकदा जेव्हा आमच्या मंडळीचं सेवाकार्य कमी झालं तेव्हा बंधुभगिनींनी अजून मेहनत घेतली पाहिजे यावर जोर देत मी एक भाषण दिलं. सभा संपल्यावर आमच्या मंडळीतली एक वृद्ध पायनियर बहीण, जिचा पती सत्यात नव्हता माझ्याकडे आली. ती रडत रडत मला म्हणाली, “मी खूप प्रयत्न केले, पण मी एवढंच करू शकले.” हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रूच आले. मग मी तिची माफी मागितली.

माझ्यासारखी चूक जेव्हा तरुण बांधव करतात, तेव्हा ते निराश होतात. पण आपण केलेल्या चुकीमुळे निराश न होता आपण त्यापासून धडा घेतला पाहिजे हे मी शिकलो. असं जर आपण करत राहिलो तर विश्‍वासूपणे केलेल्या सेवेबद्दल यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल.

क्विबेकचा लढा

१९५० सालच्या फेब्रुवारी महिन्यात मी गिलियड प्रशालेच्या १४ व्या वर्गामधून पदवीधर झालो. त्या वेळी मी फक्‍त २१ वर्षांचा होतो. माझ्या वर्गातल्या १०३ विद्यार्थ्यांपैकी जवळपास २५ विद्यार्थ्यांना कॅनडातल्या क्विबेकमधल्या फ्रेंच भाषा बोलल्या जाणाऱ्‍या प्रांतात पाठवण्यात आलं. तिथे साक्षीदारांना खूप विरोध होता. मला सोन्याच्या खाणी असलेल्या देशाच्या वॅल्डर या शहरात नेमण्यात आलं. एकदा आमचा गट जवळच्या वॅल्सेनविल या गावात प्रचाराला गेला. तिथल्या पाळकाने आम्हाला अशी धमकी दिली की जर आम्ही ते गाव सोडून गेलो नाही तर आम्हाला मारण्यात येईल. त्याच्या या धमकीबद्दल मी कोर्टात तक्रार नोंदवली आणि त्यामुळे त्या पाळकाला दंड भरावा लागला. *

क्विबेकच्या लढाईदरम्यान यासारख्या अनेक घटना घडल्या. ३०० वर्षांपर्यंत क्विबेक प्रांत रोमन कॅथलिक चर्चच्या अधिकाराखाली होता. पाळक आणि त्यांच्या राजकीय मित्रांनी यहोवाच्या साक्षीदारांचा खूप छळ केला. तो खूप कठीण काळ होता. आम्ही संख्येने खूप कमी होतो, पण आम्ही आमचे हात गळू दिले नाहीत. प्रामाणिक मनाच्या क्विबेकच्या रहिवाशांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. मला अशा अनेकांसोबत बायबल अभ्यास करण्याचा बहुमान मिळाला जे नंतर सत्यात आले. माझ्या एका बायबल विद्यार्थ्याच्या घरात दहा जण होते. ते सर्व सत्यात आले व यहोवाची सेवा करू लागले. त्यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे इतरांनाही कॅथलिक चर्च सोडण्याचं प्रोत्साहन मिळालं. आम्ही प्रचार करणं चालूच ठेवलं आणि कालांतराने आमचा विजय झाला!

बांधवांना त्यांच्या भाषेत प्रशिक्षित करणं

१९५६ मध्ये मला हैटीमध्ये नेमणूक मिळाली. तिथे नेमण्यात आलेल्या अनेक नवीन मिशनरींना फ्रेंच भाषा शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. पण लोकांनी संदेश ऐकला. स्टॅन्ली बोगस या मिशनरी बांधवाने म्हटलं, “आमचा संदेश आम्हाला सांगता यावा म्हणून लोकांनी आम्हाला खूप मदत केली आणि हे पाहून आम्हाला नवल वाटलं.” मी क्विबेकमध्ये फ्रेंच शिकलो होतो त्यामुळे सुरुवातीला मला त्याचा फायदा झाला. पण लवकरच आम्हाला असं जाणवलं की तिथले अनेक स्थानिक बांधव फक्‍त हैतीयन क्रियोल भाषाच बोलतात. त्यामुळे आम्हा मिशनरींना सेवेत यशस्वी होण्यासाठी स्थानिक भाषा शिकून घेणं गरजेचं होतं. आम्ही ती शिकलो आणि आमच्या मेहनतीचं आम्हाला चांगलं फळ मिळालं.

बांधवांची आणखी मदत करता यावी म्हणून आम्हाला नियमन मंडळाकडून टेहळणी बुरूज आणि इतर प्रकाशने हैतीयन क्रियोलमध्ये भाषांतर करण्याची परवानगी मिळाली. संपूर्ण देशात सभेच्या उपस्थितीत मोठी वाढ झाली. १९५० मध्ये हैटीमध्ये ९९ प्रचारक होते, पण १९६० मध्ये ८०० पेक्षा जास्त प्रचारक झाले. त्या वेळी मला बेथेलला पाठवण्यात आलं. १९६१ मध्ये मला राज्य सेवा प्रशालेत प्रशिक्षण देण्याचा मोठा बहुमान मिळाला. आम्ही ४० वडिलांना आणि खास पायनियरांना प्रशिक्षित केलं. १९६२ च्या जानेवारीच्या अधिवेशनात आम्ही प्रशिक्षित स्थानिक बांधवांना आपली सेवा वाढवण्याचं प्रोत्साहन दिलं. काहींना खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. हे अगदी योग्य वेळी घडलं कारण लवकरच विरोधाचे वारे वाहू लागले.

२३ जानेवारी १९६२ ला अधिवेशनानंतर लगेचच अॅन्ड्रु डिअमिको या मिशनरी बांधवाला आणि मला शाखा कार्यालयात अटक करण्यात आली. तसंच जानेवारी ८, १९६२ च्या अवेक! (फ्रेंच भाषेतील) नियतकालिकांचा साठा जप्त करण्यात आला. हैटीमध्ये भूतविद्येचा (वूडूचा) वापर केला जातो हे फ्रेंच वर्तमानपत्रातलं विधान अवेकमध्ये छापण्यात आलं होतं. काहींना हे विधान आवडलं नाही आणि त्यांनी असा दावा केला की आम्ही तो लेख शाखा कार्यालयात लिहिला. काही आठवड्यांनंतर मिशनरींना हद्दपार करण्यात आलं. पण प्रशिक्षित स्थानिक बांधवांनी कामाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पेलली. त्यांनी जो धीर धरला आणि विश्‍वास दाखवला त्याचा मला आनंद होतो. आता तर न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स हे बायबलही हैतीयन क्रियोल भाषेत उपलब्ध आहे. त्या काळी तर आमच्यासाठी हे फक्‍त स्वप्नच होतं.

मध्य आफ्रिका प्रजासत्ताकमध्ये बांधकाम

हैटीमध्ये सेवा केल्यानंतर मला मध्य आफ्रिका प्रजासत्ताकला मिशनरी म्हणून नेमण्यात आलं. नंतर तिथे मला प्रवासी पर्यवेक्षक आणि शाखा पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचा विशेषाधिकार मिळाला.

त्या वेळचे राज्य सभागृह अगदी साधे असायचे. मी झुडपातून सुकलेलं गवत वेचायला शिकलो आणि त्याचं छप्पर बनवायलाही शिकलो. मला हे नवीन काम करताना पाहून येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या लोकांची करमणूक होत होती. बांधवांना स्वतःच्या राज्य सभागृहाचं बांधकामात जास्त हातभार लावण्याचं आणि त्याची देखरेख करण्याचं उत्तेजन मिळालं. चर्चचे पाळक आमची खिल्ली उडवायचे कारण त्यांच्या चर्चचं छत पत्र्याचं होतं आणि आमचं नव्हतं. पण आम्ही विचलित न होता, आमचं गवताचं छप्पर असलेलं साधं राज्य सभागृह बांधत राहिलो. त्यांचं तोंड तेव्हा गप्पं झालं जेव्हा राजधानी असलेल्या बांगुई शहरात मोठं वादळ आलं. त्यामुळे चर्चचे पत्रे उडून मुख्य रस्त्यावर येऊन पडले, पण आमच्या राज्य सभागृहाच्या गवताच्या छप्पराला मात्र काहीच झालं नाही. राज्य प्रचाराच्या कार्याची चांगली देखरेख करता यावी म्हणून आम्ही नवीन शाखा कार्यालय आणि मिशनरी गृह फक्‍त ५ महिन्यांत बांधून पूर्ण केलं. *

आवेशी जोडीदारासोबत वैवाहिक जीवन

आमच्या लग्नाच्या दिवशी

१९७६ साली मध्य आफ्रिका प्रजासत्ताकमध्ये प्रचारकार्यावर बंदी होती. मला चाड या देशाची राजधानी असलेल्या इंजामिना नावाच्या शहरात नेमण्यात आलं. आनंदाची गोष्ट ही की तिथे मला हॅपी भेटली. ती मूळची कॅमरूनची आहे आणि ती एक आवेशी खास पायनियर होती. आम्ही १ एप्रिल १९७८ साली लग्न केलं. त्याच महिन्यात देशात युद्ध सुरू झालं आणि इतरांसारखं आम्हीही देशाच्या दक्षिणेला पळ काढला. युद्ध संपल्यावर आम्ही घरी आलो तेव्हा आमचं घर सैनिकांचं मुख्यालय बनलं होतं. आम्ही आमचं साहित्यच नाही तर हॅपीचा लग्नाचा ड्रेस आणि लग्नात मिळालेल्या सर्व भेटवस्तूही गमावून बसलो होतो. पण आम्ही आमचे हात गळू दिले नाहीत. आम्ही जरी सर्वकाही गमावून बसलो होतो तरीही आम्हाला एकमेकांची साथ होती आणि देवाच्या सेवेत पुढे काय करायचं यावर आम्ही लक्ष लावलं.

याच्या जवळपास दोन वर्षांनंतर मध्य आफ्रिका प्रजासत्ताकमध्ये प्रचारकार्यावर असलेली बंदी हटवण्यात आली. आम्ही तिथे परत आलो आणि प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करू लागलो. आमचं घर म्हणजे एक वॅन होती. त्यात दुमडता येणारा पलंग, २०० लीटर पाण्याचा एक मोठा पिंप, एक फ्रिज आणि एक शेगडी असं सर्व सामान होतं. प्रवास करणं कठीण होतं. एकदा तर आम्हाला जवळजवळ ११७ वेळा तपासणी नाक्यांवर रोखण्यात आलं.

तिथे तापमान सहसा ५० डिग्री सेल्सियसच्या वर जायचं. संमेलनात तर बाप्तिस्म्यासाठी पाणी मिळणं कधीकधी मुश्‍किल व्हायचं. म्हणून बांधव कोरडी नदी खोदून, त्यातून थोडं-थोडं पाणी काढायचे आणि ते पिंपात भरायचे. बाप्तिस्मा सहसा पिंपातच दिला जायचा.

इतर आफ्रिकन देशात प्रचारकार्य

१९८० साली आम्हाला नायजीरियाला पाठवण्यात आलं. तिथे अडीच वर्षं आम्ही नवीन शाखेच्या बांधकामाला हातभार लावला. या बांधकामासाठी बांधवांनी दोन मजली गोदामाची इमारत विकत घेतली होती. नंतर या इमारतीला तोडून तिथे शाखेसाठी जागा तयार केली जाणार होती. एकदा सकाळी मी इमारतीच्या मोडतोडीच्या कामासाठी उंचावर चढलो. मी जसं वर चढलो होतो तसंच मी दुपारी खाली उतरू लागलो. पण मोडतोडीमुळे बरेच काही बदल झाले होते आणि मी उतरता-उतरता सरळ खाली पडलो. मला वाटलं की मला खूप गंभीर रीत्या दुखापत झाली आहे. पण एक्स-रे आणि काही तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हॅपीला म्हटलं: “काळजी करण्याचं काही कारण नाही. ते एक किंवा दोन आठवड्यांत बरे होतील.”

“सार्वजनिक वाहनातून” संमेलनाला जाताना

१९८६ मध्ये आम्ही कोट दि वार या देशात गेलो. तिथे आम्ही प्रवासी कार्य करू लागलो. यामुळे आम्ही शेजारच्या बर्किना फासो या देशातही गेलो. मी असा कधीच विचार केला नव्हता की काही वर्षांनंतर आम्हाला काही काळासाठी बर्किना इथेच राहावं लागेल.

प्रवासी कार्य करताना आम्ही एका वॅनमध्ये राहायचो

१९५६ मध्ये मी कॅनडा सोडलं होतं, पण ४७ वर्षांनी म्हणजे २००३ मध्ये मी पुन्हा कॅनडाच्या बेथेलमध्ये परत आलो. आणि यावेळी मी एकटा नव्हतो, हॅपी माझ्यासोबत होती. कागदपत्रांवर आम्हाला कॅनडाचं नागरिकत्व होतं. पण आमचं मन आफ्रिकेतच होतं.

बर्किना फासो इथे बायबल अभ्यास चालवताना

मग नंतर २००७ मध्ये, मी ७९ वर्षांचा असताना आम्ही पुन्हा आफ्रिकेला आलो. आम्हाला बर्किना फासो इथे नेमण्यात आलं. या ठिकाणी मी राष्ट्र समितीचा सदस्य म्हणून सेवा केली. हे कार्यालय नंतर बेनिन शाखेच्या देखरेखीत असलेलं भाषांतर विभाग (आर.टी.ओ.) बनलं. मग २०१३ सालच्या ऑगस्ट महिन्यात आम्हाला बेनिनच्या बेथेलमध्ये नेमण्यात आलं.

हॅपीसोबत बेनीन शाखेत सेवा करताना

वाढत्या वयामुळे मी जास्त काही करू शकत नाही. पण तरीही मला माझं सेवाकार्य प्रिय आहे. मागील तीन वर्षांत वडिलांच्या प्रेमळ मदतीमुळे आणि माझ्या पत्नीच्या पाठिंब्यामुळे मला माझ्या दोन बायबल विद्यार्थ्यांना म्हणजे गिडिओन आणि फेगीस यांना बाप्तिस्मा घेताना पाहता आलं, याचा मला खूप आनंद वाटतो. ते आता आवेशाने यहोवाची सेवा करत आहेत.

यादरम्यान, मला आणि माझ्या पत्नीला दक्षिण आफ्रिकेच्या शाखेत पाठवण्यात आलं. इथे बेथेल कुटुंब प्रेमळपणे माझी काळजी घेतं. मला आफ्रिकेतल्या ज्या देशांत सेवा करण्याचा सन्मान लाभला त्यांपैकी दक्षिण आफ्रिका हा सातवा देश आहे. नंतर २०१७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात आम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळाला. आम्हाला न्यूयॉर्क मधल्या वॉरविक इथे असलेल्या जागतिक मुख्यालयाच्या समर्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. ती एक अविस्मरणीय घटना होती!

१९९४ च्या इयरबुक मध्ये पृष्ठ २५५ वर असं विधान करण्यात आलं आहे: “अनेक वर्षांपासून जे धीराने यहोवाची सेवा करत आहेत त्या सर्वांना आम्ही असं प्रोत्साहन देतो: ‘तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल.’—२ इति. १५:७.” हे लागू करण्याचा आणि इतरांना असंच करण्याचं प्रोत्साहन देण्याचा मी आणि हॅपीने निर्धार केला आहे.

^ परि. 9 १९४४ साली यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित. आता त्याची छपाई होत नाही.

^ परि. 18 ८ नोव्हेंबर १९५३ च्या अवेक! मधल्या पृष्ठ ३-५ वर “क्विबेक प्रिस्ट कन्वीकटेड फॉर अटॅक ऑन जेहोवाज विटनेसेस” हा लेख पाहा.

^ परि. 26 ८ मे १९६६ च्या अवेक! मधल्या पृष्ठ २७ वर “बिल्डींग ऑन ए सॉलिड फाउंडेशन” हा लेख पाहा.