व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३२

नम्र राहा आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा

नम्र राहा आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा

आपल्या देवासोबत नम्रभावाने चाला.—मीखा ६:८.

गीत २६ देवासोबत चालत राहा!

सारांश *

१. यहोवाच्या नम्रतेबद्दल दावीदने काय म्हटलं?

यहोवा एक नम्र देव आहे. त्याच्याबद्दल दावीदने असं लिहिलं: “तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे  [नम्रतेमुळे ] मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (२ शमु. २२:३६; स्तो. १८:३५) ही गोष्ट लिहिताना दावीदच्या मनात कदाचित तो दिवस असावा, जेव्हा शमुवेल संदेष्टा इस्राएलच्या पुढच्या राजाला नियुक्‍त करण्यासाठी त्याच्या घरी आला होता. आठ भावांपैकी दावीद सगळ्यात लहान होता. पण तरीही यहोवाने त्यालाच शौलच्या जागी राजा होण्यासाठी निवडलं.—१ शमु. १६:१, १०-१३.

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

एका स्तोत्रकर्त्याला यहोवाबद्दल जसं वाटलं, तसंच दावीदलाही नक्कीच वाटलं असेल. त्या स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल असं म्हटलं: “जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालांस धुळीतून उठवतो, दरिद्र्‌यास उकिरड्यावरून उचलतो; आणि त्यांना अधिपतींच्या . . . पंक्‍त्‌तीस बसवतो.” (स्तो. ११३:६-८) या लेखात आधी आपण यहोवाकडून नम्रतेच्या बाबतीत कोणते महत्त्वाचे धडे शिकू शकतो हे पाहू. मग आपण शौल राजा, दानीएल संदेष्टा आणि येशू यांच्या उदाहरणांतून, आपल्या मर्यादांची जाणीव राखण्याच्या बाबतीत काय शिकू शकतो हे पाहू.

यहोवाच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

३. यहोवा आपल्याशी कसं वागतो, आणि त्यावरून काय दिसून येतं?

आपण अपरिपूर्ण असूनही यहोवा आपल्याशी जसं वागतो, त्यावरून दिसून येतं की तो नम्र आहे. तो आपली उपासना तर स्वीकारतोच, पण त्यासोबतच तो आपल्याला त्याचे मित्रही मानतो. (स्तो. २५:१४) आपल्याला त्याच्याशी मैत्री करता यावी म्हणून सर्वात आधी त्याने पाऊल उचललं. त्याने आपल्या पापांसाठी स्वतःच्या मुलाचं बलिदान दिलं. खरंच, यहोवा किती प्रेमळ आणि दयाळू देव आहे!

४. यहोवाने आपल्याला कोणतं स्वातंत्र्य दिलं आहे?

यहोवा किती नम्र आहे हे आणखी एका गोष्टीतून दिसून येतं. त्याने आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. खरंतर, तो आपल्याला या क्षमतेशिवाय बनवू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. उलट, त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवलं, आणि जीवन कसं जगायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं. त्याच्या तुलनेत आपण जरी काहीच नसलो, तरी आपण जीवनात जे निर्णय घेतो ते त्याच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर प्रेम असल्यामुळे आपण त्याची सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे. तसंच, त्याच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात हे आपण समजून घ्यावं, अशीही त्याची इच्छा आहे. (अनु. १०:१२; यश. ४८:१७, १८) खरंच, यहोवाने आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं त्यासाठी आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत!

येशूला स्वर्गात दाखवण्यात आलं आहे. आणि त्याच्या बाजूला त्याचे काही सहराजे उभे आहेत. ते सर्व देवदूतांच्या एका मोठ्या सैन्याला पाहत आहेत. काही देवदूत आपली नेमणूक पार पाडण्यासाठी पृथ्वीवर जात आहेत. या चित्रात दाखवलेल्या सर्वांना यहोवाने अधिकार दिले आहेत (परिच्छेद ५ पाहा)

५. यहोवाची नम्रता आणखी कोणत्या गोष्टींतून दिसून येते? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

यहोवा आपल्याशी ज्या प्रकारे वागतो त्यावरून नम्र कसं राहायचं हे आपण शिकू शकतो. खरंतर, या संपूर्ण विश्‍वात यहोवा सर्वात बुद्धिमान आहे. पण तरीसुद्धा तो इतरांचं म्हणणं ऐकून घेतो. याचं एक उदाहरण म्हणजे, यहोवा जेव्हा सर्वकाही निर्माण करत होता तेव्हा त्याने आपल्या मुलालाही या कामात मदत करायची संधी दिली. (नीति. ८:२७-३०; कलस्सै. १:१५, १६) याशिवाय, यहोवा सगळ्यात शक्‍तिशाली देव असला, तरी तो इतरांनाही काही अधिकार देतो. जसं की, त्याने येशूला आपल्या राज्याचा राजा म्हणून नेमलं आहे. तसंच, भविष्यात तो १,४४,००० मानवांनाही येशूसोबत राज्य करण्याचा अधिकार देईल. (लूक १२:३२) यहोवाने येशूला राजा आणि महायाजक होण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. (इब्री ५:८, ९) आणि आज तो येशूसोबत राज्य करणाऱ्‍यांनाही त्यांची जबाबदारी हाताळण्याचं प्रशिक्षण देत आहे. पण ते ही जबाबदारी नीट पार पाडतात की नाही, हे पाहण्यासाठी यहोवा त्यांच्या कामात लुडबुड करणार नाही. याउलट, ते त्याच्या इच्छेप्रमाणे काम करतील असा त्याला पूर्ण भरवसा आहे.—प्रकटी. ५:१०.

आपण जेव्हा इतरांना प्रशिक्षण देतो आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्‍या सोपवतो तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो (परिच्छेद ६-७ पाहा) *

६-७. कोणत्या दोन मार्गांनी पालक आणि मंडळीतले वडील यहोवाचं अनुकरण करू शकतात?

स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तरीही तो इतरांना अधिकार देतो, त्यांच्यावर जबाबदाऱ्‍या सोपवतो. पण आपल्याला तर मदतीची गरज आहे. मग आपण असं करणं किती गरजेचं आहे! उदाहरणार्थ, तुम्ही जर एक कुटुंबप्रमुख किंवा मंडळीतले वडील असाल, तर तुम्ही यहोवासारखंच इतरांवर जबाबदाऱ्‍या सोपवू शकता का? आणि त्या सोपवल्यानतंर त्यांच्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायचं तुम्ही टाळू शकता का? तुम्ही जर असं केलं तर ते काम पूर्ण तर होईलच, पण त्यासोबतच तुम्ही इतरांना प्रशिक्षण द्याल आणि त्यांचा आत्मविश्‍वास वाढवायला मदत कराल. (यश. ४१:१०) ज्यांच्यावर जबाबदाऱ्‍या आहेत ते यहोवाकडून आणखी काय शिकू शकतात?

यहोवा आपल्या मुलांचं, म्हणजेच देवदूतांचं म्हणणं ऐकून घेतो. (१ राजे २२:१९-२२) आईवडिलांनो, तुम्ही यहोवाच्या या उदाहरणाचं कसं अनुकरण करू शकता? एखादं काम कसं करायचं त्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलांचं मत घेऊ शकता. आणि ते योग्य वाटत असेल तर त्यानुसार काम करा.

८. यहोवा अब्राहाम आणि सारा यांच्याशी धीराने कसा वागला?

यहोवा मानवांशी धीराने वागतो. यावरूनसुद्धा दिसून येतं, की तो नम्र आहे. उदाहरणार्थ, यहोवाचा एखादा निर्णय त्याच्या सेवकाला योग्य वाटत नाही आणि त्याबद्दल तो यहोवाला आदराने प्रश्‍न विचारतो, तेव्हा यहोवा धीराने त्याचं ऐकतो. यहोवाने जेव्हा सदोम आणि गमोराचा नाश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अब्राहामने यहोवापुढे आपल्या चिंता व्यक्‍त केल्या, आणि यहोवाने त्या धीराने ऐकून घेतल्या. (उत्प. १८:२२-३३) तसंच, अब्राहामची पत्नी सारा हिच्याशी यहोवा कशा प्रकारे वागला याचाही विचार करा. सारा तिच्या म्हातारपणात गरोदर राहील असं अभिवचन यहोवाने तिला दिलं तेव्हा ती हसली. पण त्यामुळे यहोवा तिच्यावर चिडला नाही. (उत्प. १८:१०-१४) उलट, तो तिच्याशी आदराने वागला.

९. यहोवाच्या उदाहरणातून पालक आणि मंडळीतले वडील काय शिकू शकतात?

पालकांनो आणि मंडळीतल्या वडिलांनो, तुम्ही यहोवाच्या उदाहरणातून काय शिकू शकता? तुम्ही घेतलेला एखादा निर्णय तुमच्या मुलांना किंवा मंडळीतल्या काहींना पटत नाही तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते? त्या वेळी, आपलंच म्हणणं खरं आहे हे पटवून द्यायची तुम्ही घाई करता का? की तुम्ही त्यांचीही बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करता? अशा वेळी तुम्ही जर यहोवाचं अनुकरण केलं, तर तुमच्या कुटुंबाला आणि मंडळीला नक्कीच फायदा होईल. आतापर्यंत आपण पाहिलं, की आपण नम्रतेच्या बाबतीत यहोवाच्या उदाहरणातून काय शिकू शकतो. आता आपण, आपल्या मर्यादांची जाणीव राखण्याच्या बाबतीत बायबलमध्ये दिलेल्या उदाहरणांतून काय शिकू शकतो हे पाहू.

बायबलमध्ये दिलेल्या इतर लोकांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१०. यहोवा आपल्याला कशा प्रकारे शिकवतो?

१० यहोवा आपला महान “शिक्षक” असल्यामुळे आपल्याला शिकवण्यासाठी त्याने बायबलमध्ये अनेक लोकांची उदाहरणं दिली आहेत. (यश. ३०:२०, २१) त्यांच्यापैकी अनेकांनी देवाला आवडणारे चांगले गुण दाखवले; जसं की मर्यादा राखण्याचा गुण. या उदाहरणांवर मनन केल्यामुळे आपण बरंच काही शिकू शकतो. पण, ज्यांनी असे चांगले गुण दाखवले नाही त्यांच्या बाबतीत जे घडलं त्याचं परीक्षण केल्यामुळेही आपण बरेच धडे घेऊ शकतो.—स्तो. ३७:३७; १ करिंथ. १०:११.

११. शौलच्या उदाहरणातून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

११ शौल राजाच्या  बाबतीत काय घडलं त्याचा विचार करा. सुरुवातीला तो खूप नम्र होता. त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. आणि त्यामुळे जेव्हा त्याला एक मोठी जबाबदारी दिली जात होती, तेव्हा ती घ्यायला तो कचरला. (१ शमु. ९:२१; १०:२०-२२) पण राजा बनल्यानंतर मात्र तो गर्विष्ठ बनला. आणि त्याने अशा काही गोष्टी केल्या ज्या करण्याचा त्याला अधिकार नव्हता. एकदा शमुवेल संदेष्ट्याची वाट पाहत असताना शौल खूप अधीर झाला. नम्रपणे यहोवावर विसंबून राहण्याऐवजी त्याने स्वतःच होमार्पण दिलं. खरंतर, असं करण्याचा त्याला अधिकार नव्हता. आणि त्यामुळे शौल यहोवाच्या नजरेतून पडला. आणि शेवटी त्याने आपलं राजपदही गमावलं. (१ शमु. १३:८-१४) शौलच्या उदाहरणातून आपण हा धडा शिकतो, की ज्या गोष्टी करण्याचा आपल्याजवळ अधिकार नाही, त्या आपण करू नये.

१२. दानीएलने कोणतं चांगलं उदाहरण मांडलं?

१२ शौलच्या अगदी उलट दानीएल संदेष्ट्याने  एक चांगलं उदाहरण मांडलं. तो आयुष्यभर नम्र राहिला आणि मार्गदर्शनासाठी त्याने नेहमी यहोवाकडे मदत मागितली. उदाहरणार्थ, नबुखद्‌नेस्सरच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी यहोवाने दानीएलचा उपयोग केला, तेव्हा त्या गोष्टीचं श्रेय त्याने स्वतः घेतलं नाही. उलट त्याने सर्व श्रेय आणि सन्मान यहोवाला दिला. (दानी. २:२६-२८) यातून आपण काय शिकतो? मंडळीतल्या भाऊबहिणींना जर आपली भाषणं आवडत असतील किंवा सेवाकार्यात आपल्याला चांगले अनुभव येत असतील, तर त्याचं सगळं श्रेय यहोवाला द्यायला आपण कधीच विसरू नये. आपण हे मान्य केलं पाहिजे की यहोवाच्या मदतीशिवाय आपण हे सगळं करूच शकलो नसतो. (फिलिप्पै. ४:१३) आपण जेव्हा अशी मनोवृत्ती दाखवतो तेव्हा आपण येशूचंही अनुकरण करत असतो. ते कसं?

१३. योहान ५:१९, ३० या वचनांतून आपण येशूबद्दल काय शिकतो?

१३ येशू  यहोवाचा एक परिपूर्ण मुलगा होता. पण तरीही तो यहोवावर नेहमी विसंबून राहिला. (योहान ५:१९, ३० वाचा.) त्याने कधीही आपल्या स्वर्गातल्या पित्याचा अधिकार बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच फिलिप्पैकर २:६ मध्ये येशूबद्दल असं म्हटलं आहे, की “त्याने कधीही देवाचे स्थान बळकावण्याचा, म्हणजेच देवाशी बरोबरी करण्याचा विचार केला नाही.” उलट, येशूने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवली आणि आपल्या पित्याच्या अधिकाराचा आदर केला.

येशूला आपल्या मर्यादांची जाणीव होती. ज्या गोष्टी करण्याचा अधिकार त्याला नव्हता त्या त्याने कधीच केल्या नाहीत (परिच्छेद १४ पाहा)

१४. येशूने कसं दाखवलं की त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती?

१४ एकदा याकोब, योहान आणि त्यांची आई येशूकडे आले. त्यांनी येशूकडे अशी गोष्ट मागितली जी देण्याचा अधिकार येशूजवळ नव्हता. तेव्हा येशूने काय म्हटलं त्याचा विचार केला. एका क्षणाचाही विचार न करता त्याने म्हटलं, की देवाच्या राज्यात आपल्या उजवीकडे आणि डावीकडे कोण बसणार हे ठरवण्याचा अधिकार फक्‍त त्याच्या स्वर्गातल्या पित्याकडे आहे. (मत्त. २०:२०-२३) असं म्हणून येशूने दाखवून दिलं, की त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. तो नेहमी नम्र राहिला. आणि यहोवाने त्याला ज्या गोष्टी करण्याचा अधिकार दिला नव्हता त्या त्याने केल्या नाहीत. (योहा. १२:४९) आपण येशूच्या या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

आपल्या मर्यादांची जाणीव ठेवण्याच्या बाबतीत आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५-१६. १ करिंथकर ४:६ मध्ये दिलेला सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

१५ आपण १ करिंथकर ४:६ या वचनात दिलेला सल्ला लागू करतो, तेव्हा आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करत असतो. त्या वचनात असं म्हटलं आहे: “ज्या लिहिण्यात आल्या आहेत, त्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.” त्यामुळे इतर जण जेव्हा आपल्याकडे सल्ला मागतात, तेव्हा आपण आपली मतं त्यांच्यावर लादू नये, किंवा विचार न करता मनात येईल ते बोलू नये. याउलट, बायबलमध्ये आणि आपल्या प्रकाशनांमध्ये जो सल्ला दिला आहे तो आपण त्यांना दाखवला पाहिजे. आपण असं करतो तेव्हा आपण स्वतःच्या मर्यादा ओळखतो. म्हणजेच आपल्याला सगळं काही माहीत नाही ही गोष्ट आपण मान्य करतो. आणि आपल्या सल्ल्यांपेक्षा यहोवाचे नीती-नियम नेहमीच चांगले असतात हे आपण दाखवतो.—प्रकटी. १५:३, ४.

१६ आतापर्यंत आपण पाहिलं, की नम्र राहिल्यामुळे आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवल्यामुळे आपण यहोवाचा सन्मान करतो. हेच गुण आपल्याला इतरांसोबत चांगले संबंध ठेवायला आणि आनंदी राहायला कसे मदत करू शकतात हे आता आपण पाहू या.

नम्र राहणं आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवणं चांगलं का आहे?

१७. जी व्यक्‍ती नम्र असते आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवते ती आनंदी का असते?

१७ आपण जेव्हा नम्र असतो आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतो तेव्हा आपण आनंदी असतो. असं का म्हणतो येईल? कारण काही गोष्टी आपण स्वतः करू शकत नाही याची आपल्याला जाणीव असते आणि म्हणून आपण इतरांची मदत घेतो. ते जेव्हा आपल्याला मदत करतात तेव्हा आपण आनंदी होतो आणि त्यांचे आभार मानतो. हे समजण्यासाठी, येशूने ज्या दहा कुष्ठरोग्यांना बरं केलं होतं तो प्रसंग आठवा. त्या दहा जणांपैकी फक्‍त एक जण येशूचे आभार मानायला परत त्याच्याकडे आला. कारण येशूच्या मदतीशिवाय या भयंकर रोगातून आपली सुटका होऊच शकली नसती याची त्या माणसाला जाणीव होती. आणि म्हणून त्याने येशूचे आभार मानले आणि देवाची स्तुती केली.—लूक १७:११-१९.

१८. जे लोक नम्र असतात आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात त्यांचं इतरांसोबत चांगलं जमतं असं का म्हणता येईल? (रोमकर १२:१०)

१८ जे लोक नम्र असतात आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात त्यांचं सहसा इतरांसोबत चांगलं जमतं आणि त्यांना अनेक मित्र असतात. कारण, ते इतरांच्या चांगल्या गुणांची मनापासून कदर करतात आणि त्यांच्यावर भरवसा ठेवतात. तसंच, इतर जण जेव्हा एखादी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतात तेव्हा त्यांना आनंद होतो आणि ते लगेच त्यांची प्रशंसा करतात.—रोमकर १२:१० वाचा.

१९. आपण गर्विष्ठ होण्याचं का टाळलं पाहिजे?

१९ नम्र लोकांच्या अगदी उलट गर्विष्ठ लोकांना इतरांची प्रशंसा करणं कठीण जातं. कारण इतरांनी आपली प्रशंसा करावी अशी त्यांची अपेक्षा असते. असे लोक सहसा स्वतःची तुलना इतरांसोबत करतात, आणि आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. गर्विष्ठ लोक सहसा इतरांना प्रशिक्षण देत नाहीत किंवा त्यांच्यावर जबाबदाऱ्‍याही सोपवत नाहीत. कारण एखादं काम चांगलं व्हायचं असेल, तर ते आपणच केलेलं बरं असं त्यांना वाटतं. गर्विष्ठ लोक सहसा इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्‍यांना यश मिळतं तेव्हा त्यांना आनंद होत नाही. (गलती. ५:२६) आणि बऱ्‍याचदा अशा लोकांनी इतरांसोबत केलेली मैत्री जास्त काळ टिकत नाही. आपल्याला जर असं जाणवलं, की आपल्यामध्ये गर्वाची भावना आहे तर आपण मदतीसाठी कळकळून यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. हा वाईट गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग होऊ नये म्हणून आपली विचारसरणी बदलण्यासाठी आपण यहोवाला मदत मागितली पाहिजे.—रोम. १२:२.

२०. आपण नम्र का राहिलं पाहिजे आणि आपल्या मर्यादांची जाणीव का ठेवली पाहिजे?

२० नम्रतेच्या बाबतीत यहोवाने आपल्यासमोर जे सुंदर उदाहरण मांडलं आहे त्याबद्दल आपण किती आभारी आहोत! तो आपल्या सेवकांशी ज्या प्रकारे वागतो त्यातून त्याची नम्रता दिसून येते. आणि आपणही तसंच वागायचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच, जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून नम्रपणे देवासोबत चालले अशांच्या उदाहरणाचंही आपण अनुकरण केलं पाहिजे. आपण नेहमी यहोवाचा सन्मान आणि गौरव केला पाहिजे. कारण तोच त्यासाठी योग्य आहे. (प्रकटी. ४:११) आपण जर असं केलं, तर आपली यहोवासोबतची मैत्री कायम टिकून राहील. कारण त्याला नम्र आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवणारे लोक आवडतात.

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

^ परि. 5 एक दयाळू व्यक्‍ती सहसा खूप नम्र असते. यहोवासुद्धा एक दयाळू देव आहे, त्यामुळे तो नम्र आहे असं आपण म्हणू शकतो. यहोवाचं हे उदाहरण आपल्याला नम्र राहायला कसं मदत करू शकतं, हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आपल्या मर्यादांची जाणीव ठेवण्याच्या बाबतीत आपण शौल राजा, दानीएल संदेष्टा आणि येशू यांच्या उदाहरणांतून काय शिकू शकतो हेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: मंडळीतले एक वडील एका तरुण बांधवाला प्रचाराच्या क्षेत्राचं काम कसं करायचं याचं प्रशिक्षण देत आहेत. पण नंतर तो तरुण बांधव ती जबाबदारी पूर्ण करत असतो तेव्हा ते वडील त्याच्या प्रत्येक कामात लुडबुड करत नाहीत.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: एक बहीण मंडळीतल्या वडिलांना विचारत आहे, की तिने चर्चमध्ये होणाऱ्‍या लग्नाला जाणं योग्य राहील का? त्या वेळी वडील तिला आपलंच मत सांगत नाहीत, तर तिला बायबलमधून काही तत्त्वं दाखवत आहेत.