व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३३

पुनरुत्थानावरून देवाचं प्रेम, बुद्धी आणि धीर हे गुण दिसून येतात

पुनरुत्थानावरून देवाचं प्रेम, बुद्धी आणि धीर हे गुण दिसून येतात

“नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे.”—प्रे. कार्ये २४:१५.

गीत १२ सार्वकालिक जीवनाची प्रतिज्ञा

सारांश *

१. यहोवाने सृष्टी का घडवली?

सुरुवातीला संपूर्ण विश्‍वात यहोवा एकटाच होता. पण त्यामुळे तो दुःखी होता असं नाही. आनंदी राहण्यासाठी त्याला कोणाच्याही सोबतीची गरज नव्हती. पण एक प्रेमळ देव असल्यामुळे यहोवाची इच्छा होती की इतरांनाही जीवन मिळावं आणि त्यांनी जीवनाचा आनंद घ्यावा. म्हणूनच त्याने सृष्टी घडवली.—स्तो. ३६:९; १ योहा. ४:१९.

२. यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टी पाहून येशूला आणि देवदूतांना कसं वाटलं?

सगळ्यात आधी यहोवाने आपल्या मुलाला, म्हणजे येशूला घडवलं. मग येशूद्वारे त्याने इतर “सर्व गोष्टी” निर्माण केल्या. त्यामध्ये देवदूतसुद्धा होते. (कलस्सै. १:१६) येशूला आपल्या पित्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा त्याला खूप आनंद झाला. (नीति. ८:३०) यहोवाने आणि त्याच्या कुशल कारागिराने, म्हणजे येशूने आकाश आणि पृथ्वी बनवली तेव्हा देवदूतांनी ते प्रत्यक्ष पहिलं. ते पाहून देवदूतांना खूप आनंद झाला. त्यांनी आपला आनंद कसा व्यक्‍त केला? देवाने बनवलेली पृथ्वी पाहून देवदूतांनी “जयजयकार केला.” (ईयो. ३८:७) पुढे यहोवाने बनवलेली प्रत्येक गोष्ट पाहून, खासकरून मानवांची निर्मिती पाहून देवदूतांनी अशाच प्रकारे आपला आनंद व्यक्‍त केला असेल यात काही शंका नाही. (नीति. ८:३१) यहोवाने निर्माण केलेल्या या प्रत्येक गोष्टीतून त्याचं प्रेम आणि त्याची बुद्धी दिसून आली.—स्तो. १०४:२४; रोम. १:२०.

३. १ करिंथकर १५:२१, २२ या वचनांनुसार येशूच्या खंडणी बलिदानामुळे काय शक्य झालं?

या सुंदर पृथ्वीवर मानवांनी सर्वकाळ जगावं आणि जीवनाचा आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा होती. पण आदाम आणि हव्वाने यहोवाची आज्ञा मोडली. त्यामुळे ते पापी बनले आणि त्यांनी सर्वकाळाचं जीवन गमावलं. आणि हीच गोष्ट पुढे सर्व मानवजातीच्या बाबतीत घडली. (रोम. ५:१२) यासाठी यहोवाने कोणतं पाऊल उचललं? पाप आणि मृत्यूतून मानवांची सुटका करण्यासाठी त्याने लगेच एक व्यवस्था केली. (उत्प. ३:१५) ती व्यवस्था म्हणजे त्याने आपल्या मुलाचं, येशूचं बलिदान द्यायचं ठरवलं. या व्यवस्थेमुळे यहोवाची सेवा करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला सर्वकाळाचं जीवन मिळू शकणार होतं.—योहा. ३:१६; रोम. ६:२३; १ करिंथकर १५:२१, २२ वाचा.

४. या लेखात आपण कोणकोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा मृतांचं पुनरुत्थान करेल. पण पुनरुत्थानाबद्दल आपल्या मनात बरेच प्रश्‍न येऊ शकतात. जसं की, पुनरुत्थान कशा प्रकारे होईल? आपल्या जवळच्या लोकांचं पुनरुत्थान होईल तेव्हा आपण त्यांना ओळखू शकू का? पुनरुत्थानामुळे आपल्या आनंदात भर कशी पडेल? पुनरुत्थानाच्या आशेवर मनन केल्यामुळे यहोवाच्या प्रेमाबद्दल, त्याच्या बुद्धीबद्दल आणि त्याच्या धीराबद्दल आपली कदर कशी वाढेल? या प्रश्‍नांची उत्तरं आता आपण पाहू या.

पुनरुत्थान कशा प्रकारे होण्याची शक्यता आहे?

५. सगळ्या लोकांचं पुनरुत्थान एकाच वेळी होणार नाही, अशी अपेक्षा आपण का करू शकतो?

यहोवा आपल्या मुलाद्वारे लाखो लोकांचं पुनरुत्थान एकाच वेळी करणार नाही, अशी अपेक्षा आपण करू शकतो. कारण अचानक इतके लोक जिवंत होऊन आले तर पृथ्वीवर गोंधळ माजू शकतो. आणि बायबल म्हणतं, यहोवा कधीच अव्यवस्थितपणे काही करत नाही. त्याला माहीत आहे, की शांती टिकवून ठेवण्यासाठी सगळं काही व्यवस्थित होणं गरजेचं आहे. (१ करिंथ. १४:३३) येशूसोबत मिळून मानवांसाठी पृथ्वी तयार करताना यहोवा देवाने सर्व गोष्टी क्रमाक्रमाने बनवल्या. यावरून यहोवाची बुद्धी आणि धीर हे गुण दिसून आले. येशू त्याच्या हजार वर्षांच्या शासनकाळात, हर्मगिदोनमधून वाचलेल्या लोकांसोबत मिळून पुनरुत्थान झालेल्या लोकांसाठी पृथ्वी तयार करणार आहे. म्हणजेच तो त्यांच्यासाठी अन्‍न, वस्त्र, निवारा आणि इतर आवश्‍यक वस्तूंची व्यवस्था करणार आहे. त्या वेळी यहोवासारखंच तोसुद्धा बुद्धी आणि धीर हे गुण दाखवेल.

हर्मगिदोनमधून वाचलेले लोक पुनरुत्थान झालेल्या लोकांना देवाच्या राज्याबद्दल आणि यहोवाच्या स्तरांबद्दल शिकवतील (परिच्छेद ६ पाहा) *

६. प्रेषितांची कार्ये २४:१५ या वचनानुसार नीतिमानांसोबत आणखी कोणाचं पुनरुत्थान होईल?

हर्मगिदोनमधून वाचलेले लोक पुनरुत्थान झालेल्या लोकांना देवाच्या राज्याबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल शिकवतील. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम असेल. असं का म्हणता येईल? कारण पुनरुत्थान झालेल्यांपैकी जास्तीत जास्त लोक अशा गटातले असतील ज्याला बायबलमध्ये “अनीतिमान” असं म्हटलं आहे. (प्रेषितांची कार्ये २४:१५ वाचा.) ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानामुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवण्यासाठी त्यांना आपल्या जीवनात अनेक बदल करावे लागतील. ज्यांना यहोवाबद्दल काहीच माहीत नाही, अशा लाखो लोकांना सत्य शिकवणं किती मोठं काम असेल याचा विचार करा! आज जसं आपण एकेका व्यक्‍तीला शिकवतो तसंच त्या वेळीसुद्धा शिकवलं जाईल का? आजसारखंच त्या वेळी मंडळ्या असतील का? आणि नवीन लोकांना त्या मंडळ्यांमध्ये नेमलं जाईल का? आणि या नवीन लोकांना, पुढे ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल का? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला तेव्हाच मिळतील. पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत आहे. ती म्हणजे, ख्रिस्ताचं हजार वर्षांचं शासनकाळ संपेल तोपर्यंत “परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यश. ११:९) खरंच, हजार वर्षांदरम्यान आपल्याजवळ अशी बरीच कामं असतील ज्यांमुळे आपल्याला आनंद मिळेल!

७. देवाचे लोक पुनरुत्थान झालेल्यांना सहानुभूती का दाखवू शकतील?

हजार वर्षांच्या त्या काळादरम्यान यहोवाला खूश करण्यासाठी त्याच्या सर्व सेवकांना सतत स्वतःमध्ये बदल करावे लागतील. त्यामुळे ते पुनरुत्थान झालेल्यांना सहानुभूती दाखवू शकतील. ते त्यांना स्वतःमध्ये बदल करायला मदत करतील. ते त्यांना त्यांच्या मनातले चुकीचे विचार आणि इच्छा काढून टाकायला, तसंच यहोवाच्या स्तरांनुसार जगायला मदत करतील. (१ पेत्र ३:८) त्या वेळी यहोवाचे लोकसुद्धा “तारण मिळवून” घेण्यासाठी स्वतःमध्ये बदल करत राहतील. (फिलिप्पै. २:१२) आणि हे जेव्हा पुनरुत्थान झालेले लोक पाहतील, तेव्हा त्यांना यहोवाच्या लोकांसोबत मिळून त्याची उपासना करावीशी वाटेल.

आपण पुनरुत्थान झालेल्यांना ओळखू शकू का?

८. आपल्या जवळच्या लोकांचं पुनरुत्थान होईल तेव्हा आपण त्यांना ओळखू शकू असं आपण का म्हणू शकतो?

नवीन जगात पुनरुत्थान झालेल्या आपल्या जवळच्या लोकांना आपण ओळखू शकू असं म्हणता येईल. असं म्हणण्याची बरीच कारणं आपल्याजवळ आहेत. जसं की, प्राचीन काळात यहोवाने ज्या लोकांचं पुनरुत्थान केलं होतं, त्यांचा विचार करा. यहोवाने जेव्हा त्यांचं पुनरुत्थान केलं तेव्हा त्यांचा मृत्यू होण्याआधी ते जसे दिसायचे, बोलायाचे आणि विचार करायचे तसंच यहोवाने त्यांना पुन्हा घडवलं. यावरून दिसून येतं की भविष्यातलं पुनरुत्थानही असंच असेल. आपल्याला हेही माहीत आहे की येशूने मृत्यूची तुलना झोपेशी आणि पुनरुत्थानाची तुलना मेलेल्यांना झोपेतून उठवण्याशी केली. (मत्त. ९:१८, २४; योहा. ११:११-१३) एक व्यक्‍ती झोपण्याआधी जशी बोलते, जशी दिसते उठल्यानंतरही तिच्या या गोष्टींमध्ये काहीच बदल झालेला नसतो. तसंच तिच्या विचारांमध्येही काही बदल झालेला नसतो. लाजरचाच विचार करा. त्याला मरून चार दिवस झाले होते. आणि त्याचं शरीर कुजायला लागलं होतं. पण येशूने जेव्हा लाजरला पुन्हा जिवंत केलं तेव्हा त्याच्या बहिणींनी त्याला लगेच ओळखलं. आणि लाजरनेही त्यांना ओळखलंच असेल.—योहा. ११:३८-४४; १२:१, २.

९. मेलेल्या लोकांचं परिपूर्ण अवस्थेत पुनरुत्थान होणार नाही असं आपण का म्हणू शकतो?

यहोवाने हे अभिवचन दिलं आहे, की ख्रिस्ताच्या शासनकाळात “मी रोगी आहे” असं कोणीही म्हणणार नाही. (यश. ३३:२४; रोम. ६:७) त्यामुळे, ज्यांना जिवंत केलं जाईल त्यांचं शरीर सुदृढ असेल. पण ते लगेच परिपूर्ण होणार नाहीत. कारण तसं जर झालं तर त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र कदाचित त्यांना ओळखू शकणार नाहीत. असं दिसतं, की ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनकाळादरम्यान संपूर्ण मानवजात हळूहळू परिपूर्ण होत जाईल. मग हजार वर्षांच्या शेवटी, येशू पित्याला राज्य परत करेल. तोपर्यंत राज्याने देवाचा उद्देश पूर्ण केलेला असेल; आणि संपूर्ण मानवजातीला परिपूर्ण करण्याचा देवाचा जो उद्देश होता तोही पूर्ण झालेला असेल.—१ करिंथ. १५:२४-२८; प्रकटी. २०:१-३.

पुनरुत्थानामुळे आपल्या आनंदात कशी भर पडेल?

१०. तुमच्या प्रियजनांचं पुनरुत्थान होईल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल?

१० तुमचे जवळचे लोक तुम्हाला पुन्हा भेटतील तो क्षण किती सुंदर असेल याची कल्पना करा. तुम्ही कदाचित आनंदाने नाचाल किंवा आनंदाने तुमचे डोळे भरून येतील! तुम्ही कदाचित इतके आनंदी व्हाल की यहोवाची स्तुती करण्यासाठी तुम्ही गीत गाल! आपल्या प्रियजनांचं पुनरुत्थान केल्यामुळे आपल्या प्रेमळ पित्याबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल आपल्या मनात नक्कीच खूप प्रेम दाटून येईल.

११. योहान ५:२८, २९ या वचनांनुसार जे लोक देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जीवन जगतील त्यांना कोणती संधी मिळेल?

११ पुनरुत्थान झालेले लोक आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकतील आणि देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जीवन जगू लागतील, तेव्हा त्यांना किती आनंद होईल याचा जरा विचार करा. जे लोक आपल्या जीवनात असे बदल करतील त्यांना नंदनवनात कायम जगण्याची संधी मिळेल. पण जे लोक आपल्या जीवनात हे बदल करणार नाहीत त्यांना देव नंदनवनातली शांती भंग करू देणार नाही. खरंतर, अशा लोकांना तो तिथे राहूच देणार नाही.—यश. ६५:२०; योहान ५:२८, २९ वाचा.

१२. पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांना यहोवा कोणते आशीर्वाद देईल?

१२ देवाच्या राज्यात त्याचे सर्व लोक नीतिसूत्रे १०:२२ यात दिलेले शब्द खरे ठरताना पाहतील. तिथं म्हटलं आहे: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” यहोवाचा आत्मा त्याच्या लोकांवर काम करत असल्यामुळे ते आध्यात्मिक रितीने समृद्ध होतील. म्हणजेच, त्यांचं व्यक्‍तिमत्त्व दिवसेंदिवस ख्रिस्तासारखं होईल आणि ते परिपूर्ण होत जातील. (योहा. १३:१५-१७; इफिस. ४:२३, २४) दिवसेंदिवस ते सुदृढ होत जातील आणि चांगले लोक बनतील. खरंच, त्या वेळी जीवन किती सुंदर असेल! (ईयो. ३३:२५) पुनरुत्थानाच्या आशेवर मनन केल्याने आज आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

यहोवाने दाखवलेल्या प्रेमाची कदर करा

१३. यहोवा आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो हे स्तोत्र १३९:१-४ या वचनांवरून कसं दिसून येतं? आणि ही गोष्ट पुनरुत्थानावरून कशी दिसून येईल?

१३ आपण आधी चर्चा केली होती त्याप्रमाणे यहोवा जेव्हा लोकांचं पुनरुत्थान करेल तेव्हा मृत्यू होण्याआधी त्यांचं जसं व्यक्‍तिमत्त्व होतं ते तसंच राहील. मृत्यू होण्याआधीच्या त्यांच्या सगळ्या आठवणीही तशाच असतील. आणि त्यासाठी यहोवा आज काय करत आहे त्याचा विचार करा. यहोवाचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की आपण जे काही बोलतो, करतो किंवा आपले जे विचार आहेत, भावना आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे तो बारकाईने लक्ष देतो. म्हणजे मृत्यूआधी आपल्या ज्या आठवणी होत्या, आपलं जे व्यक्‍तिमत्त्व होतं ते तसंच ठेवून त्याला आपलं पुनरुत्थान करता येईल. आपल्यापैकी प्रत्येकाला यहोवा किती चांगल्या प्रकारे ओळखतो हे दावीद राजाला माहीत होतं. (स्तोत्र १३९:१-४ वाचा.) यहोवा आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखतो हे समजल्यामुळे आपल्याला कसं वाटलं पाहिजे?

१४. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे यहोवा बारकाईने लक्ष देतो याची आपल्याला भीती का वाटू नये?

१४ यहोवा आपल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतो या विचाराने आपल्याला भीती वाटली पाहिजे का? मुळीच नाही. कारण हे नेहमी लक्षात असू द्या की यहोवाला आपली खूप काळजी आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्यासाठी मौल्यवान आहे. आपल्या जीवनात कोणकोणत्या गोष्टी घडतात याकडे तो बारकाईने लक्ष देतो. खरंच, ही गोष्ट किती दिलासा देणारी आहे! आपण कधीच असा विचार करू नये की आपण एकटे आहोत. प्रत्येक क्षणी तो आपल्या सोबत असतो आणि आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो.—२ इति. १६:९.

यहोवाच्या बुद्धीची कदर करा

१५. पुनरुत्थानाच्या आशेवरून यहोवाची बुद्धी कशी दिसून येते?

१५ मृत्यूची भीती हे एक शक्‍तिशाली हत्यार आहे. सैतानाच्या प्रभावाखाली असलेले लोक याच हत्याराचा उपयोग करतात. लोकांना आपल्या मित्रांचा विश्‍वासघात करायला लावण्यासाठी किंवा आपल्या धार्मिक विश्‍वासाशी तडजोड करण्यासाठी ते या हत्याराचा उपयोग करतात. पण आपल्याला मात्र ते तसं करायला लावू शकत नाहीत. कारण आपल्या शत्रूंनी जरी आपल्याला मारून टाकलं, तरी यहोवा आपल्याला पुन्हा जिवंत करू शकतो ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. (प्रकटी. २:१०) तसंच, त्यांच्या कोणत्याही प्रयत्नामुळे यहोवासोबत असलेली आपली मैत्री तुटू शकणार नाही याची आपल्याला पक्की खातरी आहे. (रोम. ८:३५-३९) पुनरुत्थानाच्या आशामुळे यहोवाची बुद्धी दिसून येते. कारण, या आशेमुळे आपण सैतानाच्या धमक्यांना मुळीच घाबरत नाही आणि आपल्या मनात मृत्यूची भीती राहत नाही. उलट, यहोवाला विश्‍वासू राहण्याचं धैर्य आपल्याला मिळतं.

यहोवाने आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करायचं अभिवचन दिलं आहे. या अभिवचनावर आपला भरवसा आहे, हे आपल्या निर्णयांवरून दिसून येतं का? (परिच्छेद १६ पाहा) *

१६. तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत, आणि त्या प्रश्‍नांच्या उत्तरांवरून काय दिसून येईल?

१६ विरोधकांनी जर तुम्हाला मारून टाकण्याची धमकी दिली, तर यहोवा तुमचं पुनरुत्थान करेल यावर तुम्ही पूर्ण भरवसा ठेवाल का? तुम्ही यहोवावर भरवसा ठेवाल की नाही याची तुम्ही खातरी कशी करू शकता? त्यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, ‘मी दररोज जे छोटे-छोटे निर्णय घेतो त्यावरून यहोवावर माझा भरवसा आहे हे दिसून येतं का?’ (लूक १६:१०) ‘मी जर माझ्या जीवनात देवाच्या राज्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं, तर यहोवा माझ्या रोजच्या गरजा पूर्ण करेल यावर माझा भरवसा आहे का? आणि, मी ज्या प्रकारे माझा वेळ आणि पैसा खर्च करतो त्यावरून माझा हा भरवसा दिसून येतो का?’ (मत्त. ६:३१-३३) या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला “हो” अशी देता आली, तर त्यावरून दिसून येईल की यहोवावर तुमचा पूर्ण भरवसा आहे. आणि भविष्यात तुमच्यासमोर येणाऱ्‍या कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार असाल.—नीति. ३:५, ६.

यहोवाच्या धीराची कदर करा

१७. (क) पुनरुत्थान करण्याच्या बाबतीत यहोवा धीर दाखवतो हे कसं दिसून येतं? (ख) यहोवा दाखवत असलेल्या धीराची आपण कदर कशी करू शकतो?

१७ या दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी यहोवाने एक विशिष्ट दिवस ठरवला आहे. (मत्त. २४:३६) पण अधीर होऊन तो त्याआधी या दुष्ट जगाचा नाश करणार नाही. मृत लोकांचं पुनरुत्थान करण्याची तो आतुरतेने वाट पाहत आहे. पण म्हणून त्याने अंत लगेच आणला नाही, तर तो धीर धरतो. (ईयो. १४:१४, १५) मृत लोकांना जिवंत करण्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत आहे. (योहा. ५:२८) यहोवा दाखवत असलेल्या धीराबद्दल त्याचे आभार मानण्याची किती कारणं आपल्याकडे आहेत, याचा विचार करा: यहोवाच्या धीरामुळे अनेकांना, अगदी आपल्यालासुद्धा पश्‍चात्ताप करण्याची संधी मिळाली आहे. (२ पेत्र ३:९) जास्तीत जास्त लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. त्यामुळे यहोवा दाखवत असलेल्या धीराची आपण कदर केली पाहिजे. आपण ती कशी दाखवू शकतो? आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना शोधायचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. तसंच, आपण त्यांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची उपासना करायलाही मदत केली पाहिजे. (प्रे. कार्ये १३:४८) मग आपल्यासारखंच त्यांनाही यहोवाच्या धीराचा फायदा होईल.

१८. आपण इतरांशी धीराने का वागलं पाहिजे?

१८ आपण सर्व हजार वर्षांच्या शेवटी परिपूर्ण होऊ. पण तोपर्यंत यहोवा धीराने वाट पाहायला आणि आपल्या पापांची क्षमा करायला तयार आहे. आपणही यहोवासारखंच धीर दाखवून इतरांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. एका बहिणीचं उदाहरण विचारात घ्या. तिच्या पतीला अचानक तीव्र चिंतेचे झटके येऊ लागले आणि त्यामुळे त्याने सभांना जायचं बंद केलं. बहीण म्हणते: “हे पाहून मला फार दुःख झालं. आमचं आयुष्य अचानक बदलून गेलं. आम्ही ज्या गोष्टी करायचं ठरवलं होतं, त्या गोष्टी आता आम्हाला करता येणार नव्हत्या.” पण या संपूर्ण काळात ती बहीण आपल्या पतीशी खूप प्रेमाने आणि धीराने वागली. ती खचून गेली नाही, तर यहोवावर विसंबून राहिली. यहोवासारखंच तिने समस्येवर लक्ष देण्याऐवजी आपल्या पतीच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिलं. ती म्हणते: “माझ्या पतीमध्ये अनेक चांगले गुण आहेत. आणि आपल्या चिंतेवर मात करण्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत.” खरंच, आपल्या कुटुंबातले किंवा मंडळीतले सदस्य समस्यांवर मात करायचा प्रयत्न करत असतात तेव्हा धीर दाखवणं किती महत्त्वाचं आहे!

१९. आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

१९ यहोवाने पृथ्वी निर्माण केली तेव्हा येशूला आणि देवदूतांना खूप आनंद झाला होता. पण जेव्हा ही पृथ्वी यहोवावर मनापासून प्रेम करणाऱ्‍या आणि त्याची उपासना करणाऱ्‍या परिपूर्ण लोकांनी भरून जाईल तेव्हा त्यांना किती जास्त आनंद होईल याची कल्पना करा. अभिषिक्‍त ख्रिस्ती स्वर्गात येशूसोबत राज्य करतील आणि सर्व मानवांना परिपूर्ण व्हायला मदत करतील, तेव्हा आपल्या कामामुळे मानवांना होणारा फायदा पाहून त्यांना किती आनंद होईल याचा विचार करा. (प्रकटी. ४:४, ९-११; ५:९, १०) तसंच आजार, दु:ख आणि मरण कायमचं नाहीसं होईल आणि दुःखाच्या ऐवजी आनंदाचे अश्रू आपल्या डोळ्यांत असतील तो काळ किती सुंदर असेल याचाही विचार करा. (प्रकटी. २१:४) तोपर्यंत आपल्या प्रेमळ, बुद्धिमान आणि धीर धरणाऱ्‍या पित्याचं अनुकरण करत राहण्याचा निर्धार करा. मग तुमच्यासमोर कोणत्याही परीक्षा आल्या तरी तुम्हाला तुमचा आनंद टिकवून ठेवता येईल. (याको. १:२-४) खरंच, “नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे,” हे अभिवचन दिल्याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत!—प्रे. कार्ये २४:१५.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 यहोवा एक प्रेमळ, बुद्धिमान आणि धीर धरणारा पिता आहे. त्याचे हे गुण त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींतून दिसून येतात. तसंच, भविष्यात तो मृत लोकांचं जे पुनरुत्थान करणार आहे, त्यावरूनसुद्धा त्याचे हे गुण दिसून येतात. पुनरुत्थानाविषयी आपल्या मनात येणाऱ्‍या काही प्रश्‍नांची उत्तरं आपण या लेखात पाहू या. तसंच, यहोवाचं प्रेम, बुद्धी आणि धीर यांबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो, हेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 59 चत्रांचं वर्णन: शेकडो वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका माणसाचं, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनकाळात पुनरुत्थान केलं जातं. आणि हर्मगिदोन पार केलेला एक भाऊ त्या माणसाला आनंदाने हे शिकवत आहे, की ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानापासून फायदा मिळवण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे.

^ परि. 61 चत्रांचं वर्णन: एक भाऊ आपल्या बॉसला हे सांगत आहे, की आठवड्यातले काही दिवस तो ओव्हरटाईम करू शकणार नाही. कारण त्या दिवशी संध्याकाळी त्याला देवाच्या उपासनेशी संबंधित बऱ्‍याच गोष्टी करायच्या असतात. पण इतर दिवशी गरज असेल तर तो ओव्हरटाईम करायला तयार आहे.