व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३४

यहोवाच्या मंडळीत तुमचं महत्त्वाचं स्थान आहे!

यहोवाच्या मंडळीत तुमचं महत्त्वाचं स्थान आहे!

“ज्याप्रमाणे शरीर एक असले, तरी अनेक अवयव असतात आणि शरीराचे अवयव अनेक असले, तरी शरीर एकच असते; त्याचप्रमाणे ख्रिस्त आहे.”—१ करिंथ. १२:१२.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

१. आपल्याला कोणता बहुमान मिळाला आहे?

यहोवाच्या मंडळीचा भाग असणं आपल्यासाठी किती मोठा बहुमान आहे! कारण जेव्हा आपण मंडळीत आपल्या भाऊबहिणींसोबत यहोवाची उपासना करतो तेव्हा आपण शांती आणि आनंद अनुभवत असतो. मंडळीत तुमचंही महत्त्वाचं स्थान आहे का?

२. प्रेषित पौलने आपल्या पत्रांमध्ये कोणतं उदाहरण वापरलं?

प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने मंडळ्यांना जी पत्रं लिहिली होती, त्यांत त्याने एक उदाहरण दिलं होतं. मंडळीत आपली काय भूमिका आहे हे समजून घ्यायला ते उदाहरण आपल्याला मदत करू शकतं. त्या पत्रांमध्ये त्याने मंडळीची तुलना मानवी शरीराशी केली. आणि मंडळीतल्या प्रत्येक सदस्याची तुलना शरीराच्या अवयवांशी केली.—रोम. १२:४-८; १ करिंथ. १२:१२-२७; इफिस. ४:१६.

३. या लेखात आपण कोणते तीन धडे शिकणार आहोत?

पौलने दिलेल्या उदाहरणातून कोणते तीन महत्त्वाचे धडे आपण शिकू शकतो, हे आपण या लेखात पाहणार आहोत. सर्वातआधी आपण हे पाहू, की यहोवाच्या मंडळीत प्रत्येक व्यक्‍तीचं एक महत्त्वाचं स्थान आहे. * दुसरं, आपण हे पाहू की मंडळीत आपलं काय स्थान आहे हे जर आपल्याला समजत नसेल, तर आपण काय करू शकतो. तिसरं, आपण यावर चर्चा करू की यहोवाने आपल्यापैकी प्रत्येकाला जे काम दिलं आहे ते आपण का करत राहिलं पाहिजे.

यहोवाच्या मंडळीत प्रत्येकाची एक महत्त्वाची भूमिका आहे

४. रोमकर १२:४, ५ या वचनांमधून आपण काय शिकतो?

यहोवाच्या मंडळीत प्रत्येकाची एक महत्त्वाची भूमिका आहे. पौलने दिलेल्या उदाहरणातून सर्वातआधी आपण हे शिकतो, की आपल्यापैकी प्रत्येकाचं यहोवाच्या कुटुंबात एक महत्त्वाचं स्थान आहे. त्या उदाहरणात पौलने सुरुवातीला असं म्हटलं: “ज्याप्रमाणे आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत, पण ते सर्व एकाच प्रकारचे कार्य करत नाहीत; त्याचप्रमाणे, आपणसुद्धा पुष्कळ असलो, तरी ख्रिस्तासोबतच्या ऐक्यात एक शरीर असून एकमेकांना जोडलेले अवयव आहोत.” (रोम. १२:४, ५) इथे पौलला काय म्हणायचं होतं? त्याला हेच म्हणायचं होतं, की आपल्यापैकी प्रत्येक जण मंडळीत वेगळी भूमिका निभावत असला तरी प्रत्येक जण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे.

मंडळीत आपल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी प्रत्येक जण महत्त्वाचा आहे (परिच्छेद ५-१२ पाहा) *

५. यहोवाने मंडळ्यांना कोणत्या “देणग्या” दिल्या आहेत?

मंडळीत कोणाचं महत्त्वाचं स्थान आहे, याचा आपण विचार करतो तेव्हा सर्वातआधी आपल्या डोळ्यांसमोर कदाचित मंडळीत नेतृत्व करणारे येतील. (१ थेस्सलनी. ५:१२; इब्री १३:१७) हे खरं आहे की यहोवाने येशूद्वारे मंडळीला “माणसांच्या रूपात देणग्या” दिल्या आहेत. (इफिस. ४:८) या देणग्या म्हणजे, नियमन मंडळाचे सदस्य, नियमन मंडळाचे सहायक, शाखा समितीचे सदस्य, विभागीय पर्यवेक्षक, बायबल प्रशालांमध्ये शिकवणारे, मंडळीतले वडील आणि सहायक सेवक. या बांधवांना यहोवाच्या कळपाची काळजी घेण्यासाठी आणि मंडळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केलं जातं.—१ पेत्र ५:२, ३.

६. १ थेस्सलनीकाकर २:६-८ या वचनांनुसार पवित्र आत्म्याने नियुक्‍त झालेले बांधव मंडळीसाठी इतकी मेहनत का घेतात?

या बांधवांना वेगवेगळया जबाबदऱ्‍या पार पाडण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केलं जातं. शरीराचे वेगवेगळे भाग संपूर्ण शरीरासाठी काम करतात. जसं की, आपले हात आणि पाय. अगदी तसंच, पवित्र आत्म्याने नियुक्‍त केलेले बांधव संपूर्ण मंडळीच्या फायद्यासाठी खूप मेहनत घेतात. भाऊबहिणींकडून प्रशंसा मिळवण्यासाठी नाही, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते इतकी मेहनत घेतात. (१ थेस्सलनीकाकर २:६-८ वाचा.) असे निःस्वार्थ आणि प्रौढ बांधव दिल्याबद्दल आपण यहोवाचे खूप आभारी आहोत.

७. पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या भाऊबहिणींना कोणते आशीर्वाद मिळतात?

मंडळीमध्ये काही जणांना मिशनरी, खास पायनियर किंवा नियमित पायनियर म्हणून नेमलं जातं. खरंतर, जगभरातल्या अशा अनेक भाऊबहिणींनी प्रचारकार्याला आणि शिष्य बनवण्याच्या कामाला पूर्ण वेळेचं करियर बनवलं आहे. यामुळे ते अनेक लोकांना येशूचे शिष्य बनण्यासाठी मदत करू शकले. पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्‍या बऱ्‍याच जणांकडे पैसा किंवा इतर गोष्टी कमी असल्या, तरी यहोवाने त्यांना अनेक आशीर्वाद दिले आहेत. (मार्क १०:२९, ३०) अशा भाऊबहिणींची आपण मनापासून कदर करतो. आणि ते मंडळीचे भाग आहेत यासाठी आपण यहोवाचे खूप आभारी आहोत.

८. मंडळीतला प्रत्येक प्रचारक यहोवासाठी महत्त्वाचा का आहे?

पण मंडळीतल्या नियुक्‍त बांधवांना आणि पूर्ण वेळेच्या सेवकांनाच फक्‍त मंडळीत महत्त्वाचं स्थान आहे का? मुळीच नाही. आनंदाचा संदेश सांगणारा प्रत्येक प्रचारक देवासाठी आणि मंडळीसाठी खूप महत्त्वाचा आहे. (रोम. १०:१५; १ करिंथ. ३:६-९) कारण लोकांना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनवणं हा मंडळीचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. (मत्त. २८:१९, २०; १ तीम. २:४) आणि मंडळीतला प्रत्येक प्रचारक, मग त्याचा बाप्तिस्मा झालेला असो किंवा नसो, प्रचारकार्याला आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न करतो.—मत्त. २४:१४.

९. आपल्या ख्रिस्ती बहिणींची आपण कदर का केली पाहिजे?

यहोवाच्या मंडळीत ख्रिस्ती बहिणींनासुद्धा महत्त्वाचं स्थान आहे. या बहिणींपैकी काही विवाहित आहेत, काही अविवाहित आहेत, काही विधवा आहेत आणि काहींना मुलंबाळं आहेत. एकनिष्ठपणे यहोवाची सेवा करणाऱ्‍या या सगळ्या बहिणींची तो खूप कदर करतो. बायबलमध्ये अशा अनेक स्त्रियांबद्दल सांगितलं आहे, ज्यांनी यहोवाचं मन आनंदित केलं. त्यांनी बुद्धी, विश्‍वास, आवेश, धैर्य आणि उदारता असे गुण दाखवण्याच्या बाबतीत आणि चांगली कामं करण्याच्या बाबतीत खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्यामुळे बायबलमध्ये त्यांची प्रशंसा करण्यात आली आहे. (लूक ८:२, ३; प्रे. कार्ये १६:१४, १५; रोम. १६:३, ६; फिलिप्पै. ४:३; इब्री ११:११, ३१, ३५) आज असेच गुण दाखवणाऱ्‍या अनेक बहिणी आपल्या मंडळ्यांमध्ये आहेत, यासाठी आपण यहोवाचे किती आभारी आहोत!

१०. मंडळीतले वयस्कर भाऊबहीण आपल्यासाठी मौल्यवान का आहेत?

१० आपल्या मंडळ्यांमध्ये अनेक वयस्कर भाऊबहीणसुद्धा आहेत. आणि ते आपल्यासाठी आशीर्वादच आहेत. काही मंडळ्यांमध्ये असे काही वयस्कर भाऊबहीण आहेत ज्यांनी आयुष्यभर विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली आहे. तर असेही काही आहेत जे अलीकडेच सत्यात आले आहेत. पण यांच्यापैकी अनेकांना वाढत्या वयामुळे बऱ्‍याच आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे त्यांना मंडळीत आणि प्रचारकार्यात कदाचित जास्त करता येत नसेल. पण तरीही हे वयस्कर भाऊबहीण होता होईल तितकं सेवाकार्य करण्याचा प्रयत्न करतात. आणि इतरांना प्रोत्साहन व प्रशिक्षण देतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. खरंच, ते आपल्यासाठी आणि यहोवासाठी खूप मौल्यवान आहेत.—नीति. १६:३१.

११-१२. तुमच्या मंडळीतल्या मुलांमुळे तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं आहे?

११ आपल्या मंडळीतल्या लहान मुलांचा आणि तरुणांचाही विचार करा. त्यांनाही बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. कारण ते सैतानाच्या प्रभावाखाली असलेल्या जगात राहत आहेत. आणि त्यांच्या मनावर चुकीच्या विचारांचा प्रभाव पडतो. (१ योहा. ५:१९) पण तरीही आपली मुलं सभांमध्ये चांगली उत्तरं देतात, सेवाकार्यात सहभाग घेतात आणि धैर्याने आपल्या विश्‍वासाची बाजू मांडतात. हे पाहून आपल्या सगळ्यांनाच खूप प्रोत्साहन मिळतं. तर मुलांनो, हे कधीही विसरू नका, की यहोवाच्या मंडळीत तुमचं एक महत्त्वाचं स्थान आहे.—स्तो. ८:२.

१२ पण मंडळीत आपलंही एक महत्त्वाचं स्थान आहे, हे मान्य करणं काही भाऊबहिणींना कठीण जातं. मग आपल्यापैकी प्रत्येकाला मंडळीत एक महत्त्वाचं स्थान आहे हे समजून घ्यायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? हे आता आपण पाहू या.

मंडळीत तुमचं एक महत्त्वाचं स्थान आहे हे कधीही विसरू नका

१३-१४. ‘मंडळीत आपलं काहीच स्थान नाही’ असं काहींना का वाटू शकतं?

१३ पौलने दिलेल्या उदाहरणातून आपण कोणता दुसरा धडा शिकतो, ते आता आपण पाहू. आज अनेकांसमोर असलेल्या एका समस्येकडे तो आपलं लक्ष वेधतो. ती म्हणजे, आपणसुद्धा मंडळीचा एक महत्त्वाचा भाग आहोत ही गोष्ट समजून घेणं अनेकांना कठीण जातं. पौलने जे उदाहरण दिलं त्यात त्याने असं म्हटलं: “पायाने जर म्हटले, की ‘मी हात नाही, त्यामुळे मी शरीराचा भाग नाही,’ तर यावरून तो शरीराचा भाग नाही असा अर्थ होत नाही. आणि जर कानाने म्हटले, ‘मी डोळा नाही, त्यामुळे मी शरीराचा भाग नाही,’ तर यावरून तो शरीराचा भाग नाही असा अर्थ होत नाही.” (१ करिंथ. १२:१५, १६) पौलला इथे काय म्हणायचं होतं?

१४ तुम्ही जर स्वतःची तुलना मंडळीतल्या इतर भाऊबहिणींशी केली तर ‘मंडळीत माझं काहीच स्थान नाही’ असं कदाचित तुम्हाला वाटेल. मंडळीतले काही जण कदाचित चांगले शिक्षक असतील, चांगले नियोजक असतील, किंवा ते खूप चांगल्या प्रकारे इतरांचं सांत्वन करत असतील, त्यांना प्रोत्साहन देत असतील. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटेल, की मी त्यांच्याइतकं चांगलं काम करू शकत नाही. यावरून दिसून येतं, की तुम्ही नम्र आहात आणि तुम्हाला तुमच्या मर्यादांची जाणीव आहे. (फिलिप्पै. २:३) पण यासोबतच तुम्ही सावधही असलं पाहिजे. कारण तुम्ही जर सतत स्वतःची तुलना इतरांशी आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांशी करत राहाल, तर तुम्ही निराश व्हाल. पौलने उदाहरणात उल्लेख केला त्याप्रमाणे कदाचित तुम्हालाही असं वाटेल, की मंडळीत माझं काहीच स्थान नाही. अशा भावनांवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?

१५. १ करिंथकर १२:४-११ या वचनांतून आपण कोणती गोष्ट शिकतो?

१५ पुढे दिलेल्या गोष्टीचा विचार करा. यहोवाने पहिल्या शतकात काही ख्रिश्‍चनांना पवित्र आत्म्याची कृपादानं दिली होती. म्हणजेच त्यांना काही खास क्षमता दिल्या होत्या. पण त्या सगळ्यांना एकसारखीच कृपादानं मिळाली नव्हती, ती वेगवेगळी होती. (१ करिंथकर १२:४-११ वाचा.) यहोवाने जरी त्या सगळ्यांना वेगवगेळी कृपादानं दिली होती, तरी त्यातली प्रत्येक व्यक्‍ती त्याच्यासाठी महत्त्वाची होती. आज पवित्र आत्म्याची अशी कृपादानं आपल्याला मिळत नाहीत. पण यातून आपण एक गोष्ट शिकतो. ती म्हणजे, आज आपल्याजवळ एकसारखीच कौशल्यं नसली, तरीही आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवासाठी महत्त्वाचा आहे.

१६. प्रेषित पौलने दिलेला कोणता सल्ला आपण लागू केला पाहिजे?

१६ आपण मंडळीतल्या इतर भाऊबहिणींसोबत स्वतःची तुलना करण्याऐवजी पौलने दिलेला सल्ला लागू केला पाहिजे. त्याने म्हटलं होतं: “प्रत्येकाने स्वतःच्या कार्यांचे परीक्षण करावे, म्हणजे मग दुसऱ्‍या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या कार्यांमुळे त्याला आनंदी होता येईल.”—गलती. ६:४.

१७. पौलने दिलेला सल्ला लागू केल्याने आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

१७ आपण जर पौलने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे स्वतःच्या कार्यांचं परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, की आपल्यातसुद्धा अशा काही क्षमता आहेत ज्या इतरांमध्ये नाहीत. उदाहरणार्थ, मंडळीतले एखादे वडील कदाचित चांगली भाषणं देत नसतील, पण शिष्य बनवण्याच्या कामात ते कुशल असतील. किंवा कदाचित मंडळीतल्या इतर वडिलांप्रमाणे ते चांगले नियोजक नसतील. पण ते खूप प्रेमळ असतील, आणि त्यामुळे मंडळीतले भाऊबहीण बायबलमधून काही सल्ला हवा असेल तर अगदी सहज त्यांच्याकडे येत असतील. किंवा कदाचित पाहुणचार करण्याच्या बाबतीत मंडळीत त्यांचं एक चांगलं नाव असेल. (इब्री १३:२, १६) आपणसुद्धा आपल्या क्षमता ओळखल्या तर आपल्याला हे जाणवेल, की आपणही मंडळीसाठी काहीतरी करू शकतो. यामुळे आपल्यात कमीपणाची भावना येणार नाही, तर आपण आनंदी राहू. आणि इतर भाऊबहिणींमध्ये जरी आपल्यापेक्षा चांगली कौशल्यं असली, तरी आपल्याला त्यांचा हेवा वाटणार नाही.

१८. आपली कौशल्यं वाढवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१८ मंडळीत आपलं कोणतंही स्थान असो, आपण सगळ्यांनीच आपली सेवा आणि आपली कौशल्यं वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला हे करता यावं म्हणून यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला खूप छान प्रशिक्षण देतो. उदाहरणार्थ, आपण आणखी चांगल्या प्रकारे प्रचारकार्य कसं करू शकतो यासाठी आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणानुसार तुम्ही तुमची कौशल्यं वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहात का?

१९. सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१९ प्रशिक्षण देण्यासाठी आणखी एक व्यवस्था आहे. ती म्हणजे, सुवार्तिकांसाठी प्रशाला. जे भाऊबहीण पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत आणि ज्यांचं वय २३ ते ६५ च्या मधे आहे, असे भाऊबहीण या प्रशालेसाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला कदाचित वाटेल ‘मला तर या प्रशालेला कधीच जाता येणार नाही.’ पण तुम्हाला या प्रशालेला का जाता येणार नाही याची कारणं शोधण्याऐवजी, तुम्ही या प्रशालेला का गेलं पाहिजे  याची कारणं लिहून काढा. आणि त्यासाठी लागणाऱ्‍या पात्रता तुम्हाला कशा पूर्ण करता येतील तेही लिहून काढा व त्यावर काम करा. मग जी गोष्ट तुम्हाला सुरुवातीला अशक्य वाटत होती, ती आता यहोवाच्या मदतीने आणि तुमच्या मेहनतीने तुम्हाला शक्य होईल.

मंडळीला मजबूत करण्यासाठी आपल्या कृपादानांचा उपयोग करा

२०. रोमकर १२:६-८ या वचनांमधून आपण कोणता धडा शिकतो?

२० पौलने दिलेल्या उदाहरणातून आपल्याला जो तिसरा धडा शिकायला मिळतो तो रोमकर १२:६-८ या वचनांत दिला आहे. (वाचा.) इथे पौल पुन्हा हे सांगतो, की मंडळीत प्रत्येकाकडे वेगवेगळी कृपादानं किंवा कौशल्यं असतात. पण या वेळी मात्र पौल या गोष्टीवर जोर देतो, की आपल्या प्रत्येकाकडे जी काही कौशल्यं आहेत त्यांचा उपयोग आपण मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी केला पाहिजे.

२१-२२. रॉबर्ट आणि फेलिस या बांधवांच्या उदाहरणांतून आपण काय शिकू शकतो?

२१ आता आपण रॉबर्ट नावाच्या एका भावाचं उदाहरण पाहू या. * आधी हे भाऊ एका दुसऱ्‍या देशात सेवा करत होते. नंतर त्यांना त्यांच्याच देशातल्या बेथेलमध्ये सेवा करायला नेमण्यात आलं. त्यामुळे सुरुवातीला त्यांना असं वाटायचं, की आपल्याकडून काही चूक झाल्यामुळे आपली नेमणूक बदलण्यात आली आहे. पण बांधवांनी त्यांना समजावून सांगितलं की असं काहीच नाही. तरीसुद्धा ते बांधव म्हणतात: “पुढचे कितीतरी महिने मी खूप निराश होतो. कारण मला असं वाटत होतं, की मी माझी नेमणूक नीट पार पाडली नाही. बऱ्‍याचदा बेथेल सेवा सोडून देण्याचा विचार माझ्या मनात आला.” अशा नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी कोणत्या गोष्टीने त्यांना मदत केली? त्यांच्या मंडळीतल्या एक वडिलांनी त्यांना याची आठवण करून दिली, की “आपण आधी ज्या नेमणुका पार पाडल्या त्या प्रत्येक नेमणुकीतून यहोवाने आपल्याला प्रशिक्षण दिलेलं असतं. आणि त्या प्रशिक्षणामुळे आपल्याला आपली सध्याची  नेमणूक चांगल्या प्रकारे पार पाडता येते.” यावरून रॉबर्टला याची जाणीव झाली, की आधी आपण काय करत होतो याचा विचार करत राहण्याऐवजी आपण आत्ता  काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे.

२२ बंधू फेलिस इपिस्कोपो यांनाही असंच वाटायचं. १९५६ मध्ये ते आणि त्यांची पत्नी गिलियड प्रशालेतून पदवीधर झाले. आणि त्यानंतर ते बोलिव्हिया देशात विभागीय कार्य करत होते. मग १९६४ मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याबद्दल सांगताना बंधू फेलिस म्हणतात: “आम्हाला आवडत असलेली पूर्ण वेळची सेवा सोडणं आम्हाला खूप अवघड गेलं. आणि जे झालं त्याचा विचार करण्यात मी एक अख्खं वर्ष घालवलं याचं मला खूप वाईट वाटतं. पण यहोवाच्या मदतीने मी माझी मनोवृत्ती बदलली आणि पालक म्हणून जी नवीन जबाबदारी माझ्यावर आली होती ती चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा मी प्रयत्न करू लागलो.” रॉबर्ट आणि फेलिस या बांधवांच्या बाबतीत जे घडलं तसंच तुमच्या बाबतीतही घडलं आहे का? पूर्वी तुमच्याकडे सेवेच्या ज्या जबाबदाऱ्‍या होत्या त्या आता तुमच्याकडे नाहीत म्हणून तुम्ही निराश होता का? तसं जर असेल तर यहोवासाठी आणि आपल्या भाऊबहिणींसाठी तुम्ही आत्ता  काय करू शकता, याचा विचार करा. इतरांना मदत करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या कृपादानांचा, म्हणजेच तुमच्या कौशल्यांचा वापर करत राहा. अशा प्रकारे मंडळीला मजबूत केल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.

२३. आपण कोणत्या गोष्टीवर विचार केला पाहिजे, आणि पुढच्या लेखात आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत?

२३ आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवासाठी खूप मौल्यवान आहे. आपण त्याच्या कुटुंबाचा एक भाग असावं असं त्याला वाटतं. आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय करू शकतो यावर जर आपण विचार केला आणि ते करण्यासाठी मेहनत घेतली तर मंडळीत आपलं कोणतंही स्थान नाही असं आपल्याला वाटणार नाही. पण मंडळीतल्या इतर भाऊबहिणींबद्दल आपण काय विचार करतो? आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटतो हे आपण कसं दाखवू शकतो? या महत्त्वाच्या विषयाबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू.

गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!

^ परि. 5 यहोवाने आपल्यावर प्रेम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी कधी आपल्याला वाटेल, की आपण यहोवाच्या काहीच कामाचे नाहीत. हा लेख आपल्याला हे समजायला मदत करेल की आपल्यापैकी प्रत्येकाचं यहोवाच्या मंडळीत एक महत्त्वाचं स्थान आहे.

^ परि. 3 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: यहोवाच्या मंडळीतलं आपलं स्थान, हे मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जी भूमिका पार पाडतो त्याला सूचित करतं. आपण कोणत्या समाजातले आहोत, आपल्याकडे किती पैसा आहे किंवा आपण किती शिकलेले आहोत यांवरून मंडळीतलं आपलं स्थान ठरत नाही.

^ परि. 21 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 63 चित्रांचं वर्णन : या तीन चिंत्रांमध्ये सभा सुरू होण्याआधीचं, सभा चालू असतानाचं आणि सभेनंतरचं मंडळीतलं दृश्‍य दाखवलं आहे. पहिलं चित्र: एक वडील नवीन आलेल्या व्यक्‍तीला भेटत आहेत. एक तरुण बांधव माईक हाताळत आहे. एक बहीण एका वयस्कर बहिणीशी बोलत आहे. दुसरं चित्र: टेहळणी बुरूज  अभ्यासात लहान-मोठे सगळेच उत्तरं देण्यासाठी हात वर करत आहेत. तिसरं चित्र: राज्य सभागृहाची स्वच्छता करण्यात एक जोडपं हातभार लावत आहे. एक आई आपल्या मुलीला दान पेटीत अनुदान टाकायला शिकवत आहे. एक भाऊ लिट्रेचर काऊंटर स्वच्छ करत आहे. आणि एक बांधव एका वयस्कर बहिणीशी प्रोत्साहनाचे दोन शब्द बोलत आहे.