व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३१

तुम्ही धीराने वाट पाहाल का?

तुम्ही धीराने वाट पाहाल का?

“मी वाट पाहण्याची वृत्ती दाखवीन.”—मीखा ७:७, तळटीप.

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

सारांश *

१-२. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

आपण एखाद्याची खूप वाट पाहत असतो, आणि तो यायला उशीर करतो तेव्हा सहसा काय होतं? आपण नाराज होतो. तेच नीतिवचनं १३:१२ मध्ये सांगितलं आहे. तिथे म्हटलं आहे: “अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं.” पण त्या माणसाला यायला उशीर का होत आहे याचं कारण जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण त्याची वाट पाहायला तयार असतो.

या लेखात आपण बायबलमधली अशी काही वचनं पाहू जी आपल्याला “वाट पाहण्याची वृत्ती” दाखवायला मदत करतील. (मीखा ७:७, तळटीप) त्याचबरोबर आपण अशा दोन परिस्थिती पाहू ज्यांत आपल्याला धीर धरायची गरज आहे. आणि शेवटी आपण हे पाहू, की जे धीर धरतात त्यांना भविष्यात कोणते आशीर्वाद मिळतील.

धीर धरायला मदत करणारी बायबलची वचनं

३. नीतिवचनं १३:११ या वचनातून आपण काय शिकतो?

नीतिवचनं १३:११ म्हणतं: “झटपट मिळवलेली संपत्ती कमी होत जाते, पण जो हळूहळू  साठवतो, त्याची संपत्ती वाढत जाईल.” या वचनातून आपण काय शिकतो? हेच की कोणतंही काम घाईघाईने नाही, तर काळजीपूर्वक आणि धीराने करणं नेहमी चांगलं असतं.

४. नीतिवचनं ४:१८ या वचनातून आपण काय शिकतो?

नीतिवचनं ४:१८ यात म्हटलं आहे, “नीतिमान माणसाचा मार्ग पहाटेच्या प्रकाशासारखा असतो; दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखा तो असतो.” या शब्दांवरून दिसून येतं, की यहोवा टप्प्याटप्प्याने आपल्या लोकांना त्याचा उद्देश कळवतो. पण हे वचन अशा व्यक्‍तीच्या बाबतीतही लागू केलं जाऊ शकतं, जी आपल्या जीवनात बदल करते आणि प्रगती करून यहोवासोबत जवळचं नातं जोडते. पण प्रगती करण्यासाठी आणि यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी वेळ लागतो. या बाबतीत घाई करता येत नाही. त्यासाठी एका व्यक्‍तीला बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करायची, तसंच बायबलमधून आणि संघटनेकडून मिळालेला सल्ला जीवनात लागू करायची गरज आहे. त्यामुळे ती व्यक्‍ती हळूहळू ख्रिस्तासारखे गुण स्वतःमध्ये विकसित करू लागते. शिवाय, ती देवालाही चांगल्या प्रकारे ओळखू लागते. ही गोष्ट येशूने उदाहरण देऊन कशी समजवली ते आपण पुढे पाहू या.

रोपटं जसं हळूहळू वाढतं, अगदी तसंच संदेश ऐकणारी व्यक्‍तीसुद्धा हळूहळू प्रगती करते (परिच्छेद ५ पाहा)

५. एक व्यक्‍ती स्वतःमध्ये हळूहळू बदल करते हे समजवण्यासाठी येशूने कोणतं उदाहरण दिलं?

येशूने म्हटलं: “पेरलेलं बी अंकुरतं आणि चांगलं वाढतं. पण हे नेमकं कसं घडलं हे त्याला [म्हणजे बी पेरणाऱ्‍याला] कळत नाही. हळूहळू, जमीन आपोआप पीक देते; आधी अंकुर, मग कणीस आणि शेवटी कणसात भरलेला दाणा.” (मार्क ४:२७, २८) इथे “बी” आपल्या संदेशाला सूचित करतं. या उदाहरणातून येशूला हेच सांगायचं होतं, की ज्याप्रमाणे एक रोपटं हळूहळू वाढतं, अगदी त्याचप्रमाणे संदेश ऐकणारासुद्धा हळूहळू स्वतःच्या जीवनात बदल करतो. हेच आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो. जसजशी त्यांना यहोवाची ओळख होऊ लागते, तसतसे ते आपल्या जीवनात अनेक चांगले बदल करू लागतात. (इफिस. ४:२२-२४) पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की पेरलेलं बी वाढवण्याचं काम यहोवा करतो.—१ करिंथ. ३:७.

६-७. यहोवाने ज्या प्रकारे पृथ्वी बनवली त्यावरून त्याच्याबद्दल आपल्याला काय समजतं?

यहोवा जे काही करतो ते धीराने करतो. म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ तो घेतो. कारण त्यामुळे त्याच्या नावाचा गौरव होतो आणि इतरांनाही फायदा होतो. जसं की, मानवांसाठी त्याने पृथ्वी टप्प्याटप्प्याने कशी बनवली त्याचा विचार करा.

बायबल म्हणतं, की पृथ्वी बनवताना यहोवाने “तिची लांबी-रुंदी” ठरवली, “तिचे खांब” बसवले आणि “तिच्या मुख्य दगडाची स्थापना” केली. (ईयो. ३८:५, ६) शिवाय, आपण जे काही बनवलं ते पाहण्यासाठी त्याने वेळ दिला. (उत्प. १:१०, १२) यहोवा जेव्हा एकएक नवीन गोष्ट बनवत होता तेव्हा स्वर्गदूतांना नक्कीच खूप आनंद झाला असेल. कारण बायबल म्हणतं, ते “जल्लोष” करू लागले. (ईयो. ३८:७) या सगळ्यांतून आपल्याला यहोवाबद्दल काय समजतं? हेच की यहोवाने पृथ्वी, तारे आणि प्राणी बनवायला पुरेसा वेळ घेतला, त्याने हजारो वर्षं घेतली. त्यानंतर, विचार करून बनवलेली प्रत्येक गोष्ट पाहिल्यावर तो म्हणाला: “सर्वकाही खूप चांगलं आहे.”—उत्प. १:३१.

८. आता आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आतापर्यंत आपण जी उदाहरणं पाहिली त्यांवरून दिसून येतं, की बायबलमध्ये अशी कितीतरी वचनं आहेत, जी आपल्याला धीर धरायला मदत करू शकतात. आता आपण अशा दोन परिस्थिती पाहू ज्यांत आपल्याला धीराने वाट पाहायची गरज आहे.

धीराने वाट कधी पाहावी लागू शकते?

९. अशी कोणती एक परिस्थिती आहे ज्यात आपल्याला वाट पाहावी लागू शकते?

प्रार्थनांची उत्तरं मिळेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागू शकते.  काही वेळा असं होतं, की एखाद्या समस्येचा सामना करण्यासाठी देवाने आपल्याला शक्‍ती द्यावी किंवा एखादी वाईट सवय सोडून देण्यासाठी त्याने आपल्याला मदत करावी अशी आपण त्याला प्रार्थना करतो. आणि तो आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर देईल असं आपल्याला वाटतं. पण तसं नेहमीच होत नाही. असं का होतं?

१०. आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेपर्यंत आपल्याला धीर धरण्याची गरज का आहे?

१० यहोवा आपल्या प्रार्थना खूप लक्ष देऊन ऐकतो. (स्तो. ६५:२) मनापासून केलेल्या आपल्या प्रार्थनांवरून त्याला समजतं, की आपला त्याच्यावर किती भरवसा आहे! (इब्री ११:६) तसंच, आपण जेव्हा त्याला प्रार्थना करतो तेव्हा आपण त्या प्रार्थनेप्रमाणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे काम करतो का, हेसुद्धा तो पाहतो. (१ योहा. ३:२२) त्यामुळे एखादी वाईट सवय सोडण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागतो तेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि धीर धरला पाहिजे. येशूने जे म्हटलं होतं त्यावरूनसुद्धा हे दिसून येतं, की काही प्रार्थनांची आपल्याला लगेच उत्तरं मिळणार नाहीत. त्याने म्हटलं: “मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. कारण जो मागतो त्याला दिलं जातं, जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जातं.” (मत्त. ७:७, ८) येशूच्या या सल्ल्याप्रमाणे आपण ‘नेहमी प्रार्थना करत राहिलो’ तर आपण हा भरवसा ठेवू शकतो, की यहोवा आपल्या प्रार्थना ऐकेल आणि त्यांचं नक्की उत्तर देईल.—कलस्सै. ४:२.

धीराने वाट पाहत असताना आपण असा विश्‍वास ठेवला पाहिजे, की यहोवा आपल्या प्रार्थनेचं नक्की उत्तर देईल (परिच्छेद ११ पाहा) *

११. आपल्याला जर असं वाटलं की आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर मिळत नाही, तर १ पेत्र ५:६ हे वचन आपल्याला कशी मदत करू शकतं?

११ कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं, की यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला वेळ लावत आहे. पण तो आपल्याला वचन देतो, की तो योग्य वेळी तिचं उत्तर देईल. (१ पेत्र ५:६ वाचा.) त्यामुळे आपल्याला वाटलं होतं तितक्या लवकर जर आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, तर त्यासाठी आपण यहोवाला दोष देऊ नये. जसं की देवाच्या राज्याने या दुष्ट जगाचा अंत करावा, अशी बऱ्‍याच वर्षांपासून आपण प्रार्थना करत आहोत. येशूनेसुद्धा आपल्याला यासाठी प्रार्थना करायला सांगितली. (मत्त. ६:१०) पण आपल्याला  वाटलं होतं त्या वेळी जगाचा अंत झाला नाही आणि म्हणून जर आपण देवावर विश्‍वास ठेवायचं सोडून दिलं तर हे किती मूर्खपणाचं ठरेल! (हब. २:३; मत्त. २४:४४) त्याऐवजी धीराने वाट पाहत राहणं आणि यहोवा आपल्या प्रार्थनेचं नक्की उत्तर देईल असा विश्‍वास ठेवणं खरंच किती शहाणपणाचं ठरेल! जगाचा अंत योग्य वेळीच होईल, कारण तो दिवस आणि वेळ यहोवाने आधीच ठरवली आहे. आणि आपल्याला कळून येईल की तो दिवस सगळ्यांसाठी योग्य होता.—मत्त. २४:३६; २ पेत्र ३:१५.

धीर धरण्याच्या बाबतीत आपण योसेफकडून काय शिकू शकतो? (परिच्छेद १२-१४ पाहा)

१२. खासकरून कोणत्या परिस्थितीत आपल्याला धीराने वाट पाहावी लागू शकते?

१२ न्याय मिळेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागू शकते.  जगातले लोक सहसा दुसऱ्‍या जातीच्या, संस्कृतीच्या, लिंगाच्या आणि देशाच्या लोकांशी वाईट वागतात. तसंच जे अपंग असतात किंवा ज्यांना मानसिक आजार असतो अशा लोकांशीसुद्धा ते वाईट वागतात. इतकंच नाही, तर बऱ्‍याच यहोवाच्या साक्षीदारांनाही आपल्या धार्मिक विश्‍वासामुळे वाईट वागणूक सहन करावी लागते. अशा वेळी आपण येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. त्याने म्हटलं: “जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल.” (मत्त. २४:१३) पण जेव्हा आपल्याला कळतं, की मंडळीतल्या एका व्यक्‍तीने गंभीर चूक केली आहे तेव्हा आपण काय केलं पाहिजे? त्याबद्दल आपण वडिलांना सांगितलं पाहिजे. आणि ते ती गोष्ट यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे हाताळतील असा भरवसा ठेवून आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. पण अशा गोष्टी हाताळण्यासाठी वडिलांना कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

१३. एखादा विषय यहोवाच्या पद्धतीने हाताळण्यासाठी वडिलांना कायकाय करावं लागतं?

१३ मंडळीतल्या एखाद्याने गंभीर चूक केली आहे असं वडिलांना कळतं तेव्हा ‘वरून येणाऱ्‍या बुद्धीसाठी’ ते प्रार्थना करतात. त्यामुळे या विषयाबद्दल यहोवा कसा विचार करतो हे समजायला त्यांना मदत होते. (याको. ३:१७) त्या व्यक्‍तीला आपल्या ‘चुकीच्या मार्गापासून परत फिरायला’ मदत करणं हा त्यांचा उद्देश असतो. (याको. ५:१९, २०) तसंच, ते मंडळीचं संरक्षण करायचा आणि चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीमुळे ज्यांची मनं दुःखावली गेली आहेत त्यांचं सांत्वन करायचा प्रयत्न करत असतात. (२ करिंथ. १:३, ४) एखादा गंभीर अपराध हाताळताना नेमकं काय घडलं याबद्दल वडिलांना सगळी माहिती मिळवावी लागते, आणि त्यासाठी वेळ लागू शकतो. मग ते प्रार्थना करतात आणि चूक करणाऱ्‍याला देवाच्या वचनातून सल्ला देतात. तसंच, त्याला सुधारण्यासाठी ते त्याला “योग्य प्रमाणात” शिस्तही लावतात. (यिर्म. ३०:११) असे विषय हाताळण्यासाठी वडील फार वेळ लावत नाहीत. पण त्याच वेळी निर्णय घेताना ते घाईसुद्धा करत नाहीत. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी यहोवाच्या पद्धतीने हाताळल्या जातात तेव्हा संपूर्ण मंडळीलाच फायदा होतो. पण तरीसुद्धा काही वेळा असं होऊ शकतं, की पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीने ज्यांची मनं दुःखावली आहेत त्यांना अजूनही वाईट वाटू शकतं. असं तुमच्या बाबतीत घडलं असेल तर तुम्ही काय करू शकता?

१४. कोणी जर तुमचं मन दुःखावलं असेल तर बायबलमधलं कोणाचं उदाहरण तुम्हाला दिलासा देऊ शकतं?

१४ एखाद्या भावाने किंवा बहिणीने कधी तुमचं मन दुःखावलं आहे का? असेल, तर बायबलमधली काही उदाहरणं तुम्हाला मदत करू शकतात. बायबलमध्ये अशा काही व्यक्‍तींबद्दल सांगितलं आहे ज्यांना आपल्या जीवनात अन्याय सोसावा लागला. पण अशा वेळी ते यहोवावर कसे विसंबून राहिले हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळेल. योसेफचंच उदाहरण घ्या. त्याचे भाऊ त्याच्याशी फार वाईट वागले. पण त्यांच्या अशा वागण्यामुळे त्याने त्यांच्याबद्दल मनात राग धरला नाही. उलट त्याने धीर धरला आणि तो प्रामाणिकपणे यहोवाची सेवा करत राहिला. त्यामुळे यहोवाने त्याला अनेक आशीर्वाद दिले. (उत्प. ३९:२१) पुढे योसेफने आपल्या भावांना माफ केलं आणि यहोवा कशा प्रकारे आशीर्वाद देतो, हे तो स्वतः पाहू शकला. (उत्प. ४५:५) योसेफप्रमाणेच आपणही नेहमी यहोवाच्या जवळ राहिलो आणि आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी त्याच्यावर विसंबून राहिलो, तर आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल.—स्तो. ७:१७; ७३:२८.

१५. कोणत्या गोष्टीमुळे एका बहिणीला अन्याय सहन करायला मदत मिळाली?

१५ योसेफवर जितका अन्याय झाला कदाचित तितका कदाचित आपल्यावर होणार नाही. पण आपले भाऊबहीण किंवा एखादी बाहेरची व्यक्‍ती आपल्याशी चुकीचं वागली, तर आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटतं. अशा वेळी बायबलचा सल्ला पाळल्यामुळे आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. (फिलिप्पै. २:३, ४) एका बहिणीच्या बाबतीत काय घडलं त्याकडे लक्ष द्या. तिच्यासोबत काम करणारी एक स्त्री तिच्याबद्दल इतरांना वाईट आणि चुकीच्या गोष्टी सांगत होती. बहिणीला हे कळलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. पण ती त्या स्त्रीवर भडकली नाही. उलट तिने येशूच्या उदाहरणावर मनन केलं. लोकांनी येशूचा अपमान केला तेव्हा त्याने उलटून त्यांचा अपमान केला नाही. (१ पेत्र २:२१, २३) येशूचं हे उदाहरण लक्षात ठेवून त्या बहिणीने शांत राहण्याचा निर्णय घेतला. नंतर बहिणीला समजलं, की ती स्त्री एका गंभीर आजाराचा सामना करत होती आणि भयंकर तणावाखाली होती. त्यामुळे ती आपल्याबद्दल असं बोलून गेली असेल. पण तिच्या मनात आपल्याबद्दल तसं काही नसेल असा विचार बहिणीने केला. आपण या गोष्टीचा बाऊ केला नाही, तर धीराने सहन केलं याचं तिला समाधान वाटलं.

१६. तुम्ही जर अन्याय सहन करत असाल, तर कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो? (१ पेत्र ३:१२)

१६ तुम्ही जर अन्यायाचा सामना करत असाल किंवा कोणी जर तुमचं मन दुःखावलं असेल, तर हे नेहमी लक्षात ठेवा की “यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो.” (स्तो. ३४:१८) तुम्ही ते सगळं धीराने सहन करता आणि आपलं ओझं त्याच्यावर टाकता, म्हणून तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. (स्तो. ५५:२२) यहोवा संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहे आणि कोणतीही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटत नाही. (१ पेत्र ३:१२ वाचा.) तुम्ही जर अशा काही समस्यांचा सामना करत असाल ज्यांबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही, तर अशा वेळी तुम्ही धीराने वाट पाहाल का? तुम्ही यहोवावर विसंबून राहाल का?

जे धीराने वाट पाहतात त्यांना भरपूर आशीर्वाद मिळतात

१७. यशया ३०:१८ यातून आपल्याला कसा दिलासा मिळतो?

१७ लवकरच आपला स्वर्गीय पिता त्याच्या राज्याद्वारे आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल. यशया ३०:१८ मध्ये असं म्हटलं आहे: “तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे, तुम्हाला दया दाखवण्यासाठी तो पाऊल उचलेल. कारण यहोवा हा न्यायी देव आहे. त्याची वाट पाहत राहणारे सर्व आनंदी असतात.” जे यहोवाची वाट पाहतात त्यांना आता आणि नवीन जगात त्याच्याकडून भरपूर आशीर्वाद मिळतील.

१८. नवीन जगातलं जीवन कसं असेल?

१८ देवाचे लोक नवीन जगात जातील तेव्हा आजच्यासारख्या चितांचा आणि समस्यांचा त्यांना पुन्हा कधीच सामना करावा लागणार नाही. अन्यायाचा अंत झालेला असेल आणि दुःखही नसेल. (प्रकटी. २१:४) आपल्याला कुठल्याही गोष्टीची चिंता करावी लागणार नाही, कारण तिथे सगळं काही भरपूर असेल. (स्तो. ७२:१६; यश. ५४:१३) खरंच, तो किती सुंदर काळ असेल!

१९. आज यहोवा कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला तयार करत आहे?

१९ त्या नवीन जगात राहण्यासाठी यहोवा आत्तापासूनच आपल्याला तयार करत आहे. तो आपल्याला वाईट सवयी सोडून देण्यासाठी आणि स्वतःमध्ये चांगले गुण वाढवण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमुळे निराश होऊन यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ नका. कारण एक सुंदर जीवन आपली वाट पाहत आहे. यहोवा आपला उद्देश पूर्ण करेपर्यंत आपण धीराने वाट पाहू या आणि आनंदाने त्याची सेवा करत राहू या.

गीत ५४ खरा विश्‍वास बाळगू या!

^ परि. 5 अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या भाऊबहिणींना तुम्ही असं म्हणताना ऐकलं असेल, की “माझं वय व्हायच्या आधीच मी नवीन जगात जाईन असं मला वाटलं होतं.” आपण सगळेच खरंतर नवीन जगाची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत, खासकरून या संकटाच्या काळात. पण आपल्याला धीर धरायची गरज आहे. म्हणून या लेखात आपण बायबलमधली अशी काही वचनं पाहू जी आपल्याला धीराने वाट पाहायला मदत करतील. त्याचबरोबर आपण अशा दोन परिस्थिती पाहू ज्यांत आपल्याला धीर धरायची गरज आहे. आणि शेवटी आपण हे पाहू, की जे धीर धरतात त्यांना भविष्यात कोणते आशीर्वाद मिळतील.

^ परि. 56 चित्राचं वर्णन: एक बहीण लहानपणापासून यहोवाला प्रार्थना करत आली आहे. ती लहान असताना, प्रार्थना कशी करायची हे तिच्या आईवडिलांनी तिला शिकवलं होतं. तरुण असताना तिने पायनियर सेवा सुरू केली आणि यहोवाने आपल्या सेवेवर आशीर्वाद द्यावा म्हणून ती नेहमी त्याला प्रार्थना करायची. पुढे अनेक वर्षांनंतर तिचे पती आजारी पडले तेव्हासुद्धा या परीक्षेचा सामना करण्यासाठी यहोवाने आपल्याला बळ द्यावं, म्हणून ती कळकळून त्याला प्रार्थना करते. पती वारल्यामुळे आज ती एकटीच आहे. अशा परिस्थितीतही ती यहोवाला प्रार्थना करत राहते. तिला हा भरवसा आहे, की तो नेहमीप्रमाणे आत्तासुद्धा तिच्या प्रार्थनांची उत्तरं देईल.