व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३३

यहोवासाठी तुम्ही जे काही करू शकता त्यातून आनंद मिळवा

यहोवासाठी तुम्ही जे काही करू शकता त्यातून आनंद मिळवा

“मनातल्या इच्छांमागे धावण्यापेक्षा, जे डोळ्यांसमोर आहे त्याचा आनंद घेणं कधीही चांगलं.” —उप. ६:९.

गीत २८ नवे गीत

सारांश *

१. यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी आज अनेक जण काय करत आहेत?

लवकरच या जगाचा अंत होणार आहे. पण त्याआधी आपल्याकडे भरपूर काम आहे. (मत्त. २४:१४; लूक १०:२; १ पेत्र ५:२) त्यासाठी अनेक जण आपलं सेवाकार्य वाढवत आहेत. काहींनी पायनियर बनायचं, तर काहींनी बेथेलमध्ये किंवा बांधकाम प्रकल्पांवर काम करायचं ध्येय ठेवलं आहे. आणि असे कितीतरी भाऊ आहेत ज्यांनी मंडळीमध्ये सहायक सेवक किंवा वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलं आहे. (१ तीम. ३:१, ८) यहोवाची सेवा करण्यासाठी स्वतःहून पुढे येणाऱ्‍या या सगळ्या भाऊबहिणींना पाहून त्याला खरंच किती आनंद होत असेल!—स्तो. ११०:३; यश. ६:८.

२. आपण ठेवलेली काही ध्येयं पूर्ण झाली नाहीत तर आपल्याला कसं वाटू शकतं?

बराच काळ होऊन गेल्यावरही आपली काही ध्येयं पूर्ण झाली नाहीत, तर आपण निराश होऊ शकतो. तसंच, वयामुळे किंवा इतर काही परिस्थितींमुळे आपल्याला यहोवाच्या संघटनेत काही गोष्टी करता येत नसतील, तर तेव्हासुद्धा आपण निराश होऊ शकतो. (नीति. १३:१२) मेलिसाच्या * बाबतीत असंच घडलं. तिला बेथेलला किंवा सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जायची खूप इच्छा आहे. ती म्हणते: “पण मी ते करू शकत नाही, कारण त्यासाठी असलेलं माझं वय उलटून गेलंय. त्यामुळे काही वेळा मी निराश होते.”

३. यहोवाच्या सेवेतल्या इतर जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी काहींना काय करावं लागू शकतं?

काही जण तरुण असतील, त्यांचं आरोग्यही चांगलं असेल. पण इतर जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी त्यांना कदाचित स्वतःमध्ये काही विशिष्ट गुण वाढवण्याची गरज असू शकते. ते कदाचित हुशार असतील, निर्णय घ्यायला वेळ लावत नसतील आणि काम करायचीही त्यांची तयारी असेल. पण त्यांना कदाचित आणखी धीर दाखवायची, आपलं काम अजून काळजीपूर्वक करायची आणि इतरांशी आणखी आदराने वागायची गरज असू शकते. तुम्हाला ज्या गुणांवर काम करायची गरज आहे त्यांवर तुम्ही लक्ष दिलं, तर तुम्हाला वाटलंही नव्हतं इतक्या लवकर तुम्हाला जबाबदारी दिली जाऊ शकते. निकच्या बाबतीत काय झालं त्याचा विचार करा. तो २० वर्षांचा होता तेव्हा तो खूप निराश झाला. कारण त्याला सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं नाही. तो म्हणतो: “माझंच काहीतरी चुकतंय असं मला वाटलं.” पण त्याला जे गुण वाढवायची गरज होती त्यांवर तो काम करत राहिला. मंडळीत आणि प्रचारकार्यात तो जे काही करू शकत होता, ते त्याने मन लावून केलं आणि आज तो शाखा समितीचा एक सदस्य आहे.

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

यहोवाच्या सेवेतलं एखादं ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून तुम्ही निराश आहात का? असाल, तर यहोवाला प्रार्थना करा, आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतं ते त्याला सांगा. (स्तो. ३७:५-७) तसंच, तुम्हाला कुठे सुधारणा करायची गरज आहे हे अनुभवी भावांना विचारा, आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांप्रमाणे काम करा. असं केल्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करता येईल. पण मेलिसाच्या बाबतीत घडलं तसं, एखादं ध्येय जर पूर्ण होणं शक्य नसेल तर काय? अशा वेळीही तुम्ही आनंदी कसे राहू शकता? या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्यासाठी या लेखात आपण तीन मुद्द्‌यांवर चर्चा करू. (१) कोणत्या गोष्टींतून आनंद मिळवता येईल? (२) तो आनंद कसा वाढवता येईल? आणि, (३) त्यासाठी कोणती ध्येयं ठेवता येतील?

कोणत्या गोष्टींतून आनंद मिळवता येईल?

५. आनंदी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (उपदेशक ६:९क)

उपदेशक ६:९क वाचा. आनंद कसा मिळवता येईल हे या वचनात सांगितलं आहे. “जे डोळ्यांसमोर आहे त्याचा आनंद”  घेणारी व्यक्‍ती, तिच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी असते. याच्या अगदी उलट, ‘मनातल्या इच्छांमागे धावणारी’  व्यक्‍ती अशा गोष्टींच्या मागे लागते ज्या मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे ती कधीच समाधानी नसते. यावरून आपल्याला हेच शिकायला मिळतं, की आनंदी राहण्यासाठी आपण आपल्याकडे जे आहे त्यावर लक्ष दिलं पाहिजे, आणि पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवली पाहिजेत.

६. आता आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत, आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळेल?

आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहणं खरंच शक्य आहे का? अनेकांना वाटतं, की ते शक्य नाही. कारण माणसांना सतत नवीननवीन गोष्टी मिळवायची आवड असते. पण बायबल म्हणतं, की आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी  राहू शकतो. ते कसं? हे जाणून घेण्यासाठी आता आपण मत्तय २५:१४-३० यामध्ये येशूने जे उदाहरण दिलं त्यावर चर्चा करू या. त्यातून आपल्याला हे शिकायला मिळेल, की आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण आनंदी कसं राहू शकतो आणि आपला आनंद आणखी कसा वाढवू शकतो.

आनंद कसा वाढवता येईल?

७. येशूने दिलेलं उदाहरण थोडक्यात सांगा.

येशूच्या उदाहरणातला माणूस परदेशी जाण्याआधी आपल्या दासांना बोलवतो आणि व्यापार करण्यासाठी प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे तालान्त देतो. * तो एकाला पाच, दुसऱ्‍याला दोन आणि तिसऱ्‍याला एक तालान्त देतो. पहिले दोन दास त्यावर आणखी पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण तिसरा दास त्या पैशाचं काहीच करत नाही. म्हणून मालक त्याला कामावरून काढून टाकतो.

८. पहिल्या दासाला आनंद का झाला असेल?

मालकाने आपल्याला पाच तालान्त दिले या गोष्टीचा पहिल्या दासाला खूप आनंद झाला असेल. कारण ती खूप मोठी रक्कम होती. आणि मालकाचा आपल्यावर किती भरवसा आहे, हे त्याच्या लक्षात आलं. पण दुसऱ्‍या दासाबद्दल काय? आपल्याला पहिल्या दासाइतके तालान्त मिळाले नाहीत म्हणून तो निराश झाला का? त्याने काय केलं ते आपण पुढे पाहू.

येशूने सांगितलेल्या उदाहरणातल्या दुसऱ्‍या दासाकडून आपण काय शिकू शकतो? (१) मालकाने त्याला दोन तालान्त दिले होते (२) त्याने मेहनत करून आणखी पैसे कमवले (३) त्याने मालकाला दुप्पट पैसे कमवून दिले (परिच्छेद ९-११ पाहा)

९. दुसऱ्‍या दासाबद्दल येशू काय बोलला नाही? (मत्तय २५:२२, २३)

मत्तय २५:२२, २३ वाचा. दुसऱ्‍या दासाला फक्‍त दोन तालान्त मिळाले म्हणून तो रागवला किंवा चिडला, असं काहीही येशू बोलला नाही. त्या दासाने अशी कोणतीही तक्रार केली नाही, की ‘मला फक्‍त दोनच तालान्त? मीपण त्या पहिल्या दासाइतकाच मेहनती आहे. मग मला फक्‍त इतकेच का? मालकाला माझ्या कामाची किंमत नसेल, तर मी तरी कशाला त्याच्यासाठी व्यापार करू? त्यापेक्षा मी ते पैसे जमिनीत पुरून ठेवतो आणि स्वतःसाठी काम करतो.’

१०. दुसऱ्‍या दासाला जे तालान्त मिळाले त्यांचं त्याने काय केलं?

१० पहिल्या दासाप्रमाणे दुसऱ्‍या दासाच्याही हे लक्षात आलं, की मालकाने आपल्याला दिलेली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. म्हणून ती पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि अजून दोन तालान्त मिळवले. हे पाहून त्याच्या मालकाला खूप आनंद झाला. त्याने त्याची प्रंशसा केली आणि त्याला आणखी जबाबदाऱ्‍या सोपवल्या.

११. आपण आपला आनंद कसा वाढवू शकतो?

११ दुसऱ्‍या दासाप्रमाणे, आपल्याला जे काही काम दिलं जातं, ते पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत  घेतली पाहिजे. आपण प्रचारकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं पाहिजे आणि मंडळीची कामं मनापासून केली पाहिजेत. (प्रे. कार्यं १८:५; इब्री १०:२४, २५) त्यासाठी सभांची चांगली तयारी करा. त्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल अशी उत्तरं तुम्हाला देता येतील. सभांमध्ये जे काही भाग दिले जातात ते महत्त्वाचे समजून पूर्ण करा. मंडळीत तुम्हाला एखादं काम सोपवलं गेलं, तर ते वेळेवर आणि चांगल्या प्रकारे करा. कुठल्याही कामाबद्दल असा विचार करू नका की ‘हे इतकं महत्त्वाचं नाही. त्यासाठी इतका वेळ द्यायची गरज नाहीए.’ आपल्या कामातली कौशल्यं वाढवत राहा. (नीति. २२:२९) तुम्ही यहोवाच्या सेवेत जितकी मेहनत घ्याल, तितकं त्याच्यासोबत तुमचं नातं घट्ट होईल आणि तितका जास्त तुम्हाला आनंद मिळेल. (गलती. ६:४) इतकंच नाही, तर तुम्हाला हवी असलेली जबाबदारी दुसऱ्‍या कुणाला मिळाली तरीसुद्धा तुम्हाला आनंद होईल.—रोम. १२:१५; गलती. ५:२६.

१२. मेलिसा आणि निकने आपला आनंद वाढवण्यासाठी काय केलं?

१२ आपण दुसऱ्‍या परिच्छेदात मेलिसाबद्दल पाहिलं होतं. तिला बेथेलला किंवा सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाणं शक्य झालं नाही. पण ती म्हणते: “मी पायनियरिंग करण्यात खूप मेहनत घेते आणि वेगवेगळ्या मार्गांनी साक्ष द्यायचा प्रयत्न करते. यातून मला खूप आनंद मिळतो.” तसंच, तिसऱ्‍या परिच्छेदात आपण निक नावाच्या भावाबद्दल पाहिलं होतं. त्याला सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं नाही, म्हणून तो खूप निराश झाला होता. मग त्याने काय केलं? तो म्हणतो, “यहोवाच्या सेवेत मी जे काही करू शकत होतो ते मी केलं. जसं की, प्रचार करणं आणि मंडळीत प्रोत्साहन देणारी उत्तरं देणं. त्यासोबतच, मी बेथेलचा अर्ज भरला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मला बेथेलला बोलवण्यात आलं.”

१३. सध्या यहोवाच्या सेवेत तुम्ही जे काही करू शकता ते केल्यामुळे काय होऊ शकतं? (उपदेशक २:२४)

१३ यहोवाच्या सेवेत सध्या तुम्ही जे काही करू शकता ते करण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत घेतली, तर पुढे तुम्हाला आणखी जबाबदाऱ्‍या मिळतील का? निकच्या बाबतीत घडलं तसं कदाचित मिळतील. आणि नाही जरी मिळाल्या तरी मेलिसाप्रमाणे यहोवाच्या सेवेतला तुमचा आनंद नक्कीच वाढेल आणि यहोवाला खूश केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. (उपदेशक २:२४ वाचा.) शिवाय, येशूने सांगितलेलं काम आपण करतो तेव्हा त्याला आनंद होतो हे पाहून आपलाही आनंद वाढेल.

आनंद वाढवण्यासाठी कोणती ध्येयं ठेवता येतील?

१४. यहोवाच्या सेवेत सध्या आपण जे करतो त्यातच आपण समाधानी असलं पाहिजे का?

१४ सध्या यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो त्यातच आपण समाधानी राहिलं पाहिजे का? दुसरी कोणतीही ध्येयं आपण ठेवू नयेत का? नाही, तसं मुळीच नाही. सेवाकार्यातलं कौशल्य वाढवण्यासाठी आणि भाऊबहिणींना मदत करण्यासाठी आपण काही ध्येयं नक्कीच ठेवू शकतो. स्वतःचा विचार करण्याऐवजी आपण नम्र राहून इतरांना मदत करण्याचा विचार केला, तर आपल्याला ती ध्येयं पूर्ण करता येतील.—नीति. ११:२; प्रे. कार्यं २०:३५.

१५. आपला आनंद वाढवण्यासाठी तुम्ही कोणती काही ध्येयं ठेवू शकता?

१५ यहोवाच्या सेवेत ठेवण्यासारखी बरीच ध्येयं आहेत. जसं की, सहायक किंवा नियमित पायनियरिंग करणं, बेथेलमध्ये किंवा बांधकाम प्रकल्पांवर काम करणं, एखादी नवीन भाषा शिकणं किंवा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं. यांपैकी तुम्ही कोणती ध्येयं ठेवाल? तुम्हाला पूर्ण करता येतील अशी ध्येयं ओळखायला यहोवाकडे मदत मागा. (नीति. १६:३; याको. १:५) या ध्येयांबद्दल जास्त माहिती तुम्हाला यहोवा की मरजी पूरी करने के लिए संगठीत, या पुस्तकाच्या १० व्या अध्यायात मिळेल, किंवा त्याबद्दल तुम्ही मंडळीतल्या वडिलांशीही बोलू शकता. * ही ध्येयं गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, तेव्हा इतरांना तुमची प्रगती दिसून येईल आणि तुमचा आनंद वाढेल.

१६. एखादं ध्येय तुम्हाला सध्या पूर्ण करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता?

१६ आधीच्या परिच्छेदात सांगितलेल्या ध्येयांपैकी एकही ध्येय तुम्ही ठेवू शकत नसाल तर काय? तर मग असं एखादं ध्येय ठेवा जे तुम्हाला पूर्ण करता येईल. याची काही उदाहरणं आपण पाहू या.

पूर्ण करता येईल असं कोणतं ध्येय तुम्ही ठेवू शकता? (परिच्छेद १७ पाहा) *

१७. १ तीमथ्य ४:१३, १५ या वचनांप्रमाणे एक भाऊ चांगला शिक्षक बनण्यासाठी काय करू शकतो?

१७ १ तीमथ्य ४:१३, १५ वाचा. भावांनो, तुमचा बाप्तिस्मा झाला असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचायची, भाषण द्यायची आणि शिकवायची कला वाढवू शकता. यासाठी तुम्ही मेहनत घेतली, तर मंडळीला खूप फायदा होईल. म्हणून वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा,  या माहितीपत्रकातल्या प्रत्येक मुद्द्‌याचा अभ्यास करण्याचं आणि त्यावर काम करण्याचं ध्येय ठेवा. प्रत्येक वेळी एकेका मुद्द्‌याचा अभ्यास करा, घरी त्याचा चांगला सराव करा आणि त्याप्रमाणे भाषण देण्याचा प्रयत्न करा. तसंच, तुम्ही मंडळीतल्या सहायक सल्लागाराकडून किंवा ‘बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेत असलेल्या’ वडिलांकडून सल्ला घेऊ शकता. * (१ तीम. ५:१७) या माहितीपत्रकातले मुद्दे लागू करण्यासोबतच श्रोत्यांचा विश्‍वास वाढवायचा आणि त्यांना कार्य करायला प्रोत्साहन द्यायचाही प्रयत्न करा. यामुळे तुमचा आणि तुमचं ऐकणाऱ्‍यांचाही आनंद वाढेल.

पूर्ण करता येईल असं कोणतं ध्येय तुम्ही ठेवू शकता? (परिच्छेद १८ पाहा) *

१८. प्रचारकार्यात निपुण होण्यासाठी आपण काय करू शकतो?

१८ आपल्यापैकी प्रत्येकाला प्रचाराची आणि शिष्य बनवायची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (मत्त. २८:१९, २०; रोम. १०:१४) तुम्हाला या कामात निपुण व्हायचं आहे का? असेल, तर शिकवणे या माहितीपत्रकाचा अभ्यास करा आणि त्यातून शिकलेल्या गोष्टी लागू करण्यासाठी विशिष्ट ध्येयं ठेवा. तसंच, आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका  आणि चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचे जे व्हिडिओ सभांमध्ये दाखवले जातात त्यांतूनही तुम्हाला व्यावहारिक मुद्दे शिकायला मिळतील. त्यांतले जे मुद्दे तुमच्या क्षेत्रासाठी योग्य असतील ते वापरा. असं केल्यामुळे तुम्ही शिकवण्यात निपुण व्हाल आणि तुमचा आनंद वाढेल.—२ तीम. ४:५.

पूर्ण करता येईल असं कोणतं ध्येय तुम्ही ठेवू शकता? (परिच्छेद १९ पाहा) *

१९. यहोवाला आवडतील असे गुण आपण स्वतःमध्ये कसे वाढवू शकतो?

१९ एक असं ध्येय आहे जे आपण सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. ते म्हणजे, यहोवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवणं. (गलती. ५:२२, २३; कलस्सै. ३:१२; २ पेत्र १:५-८) ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? समजा तुम्हाला तुमचा विश्‍वास मजबूत करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही आपल्या प्रकाशनांमधले असे लेख वाचू शकता ज्यांमध्ये विश्‍वास मजबूत करण्यासाठी काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत. यासोबतच, JW ब्रॉडकास्टिंगमधले आपल्या अशा काही भाऊबहिणींचे व्हिडिओ दिले आहेत ज्यांनी परीक्षांचा सामना करताना मजबूत विश्‍वास दाखवला. हे व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. मग तुम्हीसुद्धा कोणकोणत्या मार्गांनी त्यांच्यासारखाच विश्‍वास दाखवू शकता याचा विचार करा.

२०. निराश न होता आपण आपला आनंद कसा वाढवू शकतो?

२० यहोवाच्या सेवेत जास्त करायची आपली सगळ्यांचीच इच्छा आहे. पण आता कदाचित ते शक्य नसेल. नवीन जगात मात्र खऱ्‍या अर्थाने आपल्याला देवाची सेवा पूर्णपणे करता येईल. तोपर्यंत निराश न होता, आपल्याला यहोवासाठी जे काही करणं शक्य आहे ते करून आपण आपला आनंद वाढवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण आपल्या आनंदी देवाचा, यहोवाचा गौरव आणि स्तुती करत राहू. (१ तीम. १:११) तर मग, यहोवासाठी आपण जे काही करू शकतो त्यातून आपण आनंद मिळवू या.

गीत ४५ उन्‍नती करू या!

^ परि. 5 यहोवावर आपलं खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याच्या सेवेत आपल्याला खूप काही करायची इच्छा आहे. आपली कदाचित मंडळीत किंवा प्रचारकार्यात खूप काही करायची इच्छा असेल. पण भरपूर प्रयत्न करूनही आपली काही ध्येयं पूर्ण झाली नाहीत तर काय? अशा वेळी आनंदाने यहोवाची सेवा करत राहायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? याचं उत्तर येशूने दिलेल्या एका उदाहरणातून आपल्याला मिळेल.

^ परि. 2 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 7 शब्दाचा अर्थ: एक तालान्त म्हणजे एका मजुराने जवळजवळ २० वर्षं काम करून कमवलेली रक्कम.

^ परि. 15 बाप्तिस्मा झालेल्या भावांना हे प्रोत्साहन दिलं जातं, की त्यांनी सहायक सेवक किंवा वडील बनण्यासाठी पुढे यावं. त्यासाठी कोणत्या पात्रता आहेत त्यांबद्दल यहोवा की मरजी पूरी करने के लिए संगठीत,  या पुस्तकाच्या ५ व्या आणि ६ व्या अध्यायात माहिती दिली आहे.

^ परि. 17 शब्दांचा अर्थ: सहायक सल्लागार होण्यासाठी मंडळीतल्या एका वडिलाला नेमलं जातं. हा सहायक सल्लागार मंडळीतले इतर वडील आणि सहायक सेवक हाताळत असलेल्या कोणत्याही भागासाठी गरज असते तेव्हा वैयक्‍तिक सल्ला देतो.

^ परि. 64 चित्राचं वर्णन: एका भावाने चांगलं शिक्षक बनायचं ध्येय ठेवलं आहे. त्यासाठी तो आपलं एक प्रकाशन वाचत आहे.

^ परि. 66 चित्राचं वर्णन: एका बहिणीने संधी मिळेल तेव्हा साक्ष द्यायचं ध्येय ठेवलं आहे, आणि म्हणून ती हॉटेलमध्ये काम करणाऱ्‍या एका मुलीला संपर्क कार्ड देत आहे.

^ परि. 68 चित्राचं वर्णन: तर दुसऱ्‍या बहिणीने उदारतेचा गुण वाढवण्याचं ध्येय ठेवलं आहे, म्हणून तिने एका बहिणीसाठी काहीतरी बनवून आणलं आहे.