व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३४

यहोवा किती चांगला आहे याचा स्वतः अनुभव घेऊन पाहा

यहोवा किती चांगला आहे याचा स्वतः अनुभव घेऊन पाहा

“यहोवा किती चांगला आहे, याची पारख करून पाहा; त्याचा आश्रय घेणारा सुखी असतो!”—स्तो. ३४:८.

गीत १९ नंदनवन—देवाचे अभिवचन

सारांश *

१-२. स्तोत्र ३४:८ या वचनाप्रमाणे यहोवा चांगला आहे हे आपल्याला कसं समजेल?

समजा तुम्हाला कोणीतरी एक नवीन पदार्थ खायला दिला आहे. तो पाहिल्यावर, त्याचा सुगंध घेतल्यावर किंवा तो कसा बनवला आहे आणि कसा लागतो हे इतरांकडून जाणून घेतल्यावर त्या पदार्थाबद्दल तुम्हाला थोडीफार कल्पना येईल. पण तो पदार्थ तुम्हाला आवडेल की नाही हे त्याची चव घेतल्यावरच तुम्हाला कळेल.

त्याचप्रमाणे, बायबल आणि आपली प्रकाशनं वाचून, तसंच इतरांचे अनुभव ऐकून यहोवा किती चांगला आहे याची थोडीफार कल्पना आपल्याला येते. पण यहोवा खरंच किती चांगला आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतः त्याचा चांगुलपणा “पारखून” किंवा अनुभवून पाहिला पाहिजे. (स्तोत्र ३४:८ वाचा.) हे कसं करता येईल त्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. समजा आपल्याला पायनियरिंग करायची आहे. पण ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपलं जीवन साधं करावं लागेल. येशूने म्हटलं होतं, की आपण जर देवाच्या राज्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिलं, तर यहोवा आपल्या रोजच्या गरजा नक्की पूर्ण करेल. हे अभिवचन आपण बऱ्‍याचदा वाचलं असेल, पण आपण स्वतः ते कधी अनुभवलं नसेल. (मत्त. ६:३३) पण या अभिवचनावर भरवसा असल्यामुळे आपण आपला खर्च कमी करायचा प्रयत्न करतो, कामात काही फेरबदल करतो आणि प्रचारकार्याला जास्तीत जास्त वेळ देतो. आपण असं करतो तेव्हा यहोवा कशा प्रकारे आपल्या गरजा भागवतो, हे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा चांगुलपणा आपल्याला स्वतःला अनुभवता येईल.

३. स्तोत्र १६:१, २ या वचनांप्रमाणे यहोवा खासकरून कोणाला चांगुलपणा दाखवतो?

“यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो,” जे त्याला ओळखत नाही त्यांनासुद्धा. (स्तो. १४५:९; मत्त. ५:४५) पण जे त्याच्यावर प्रेम करतात, त्याची मनापासून सेवा करतात खासकरून त्यांना तो अनेक आशीर्वाद देतो. (स्तोत्र १६:१, २ वाचा.) यहोवाने आपल्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्याची आता आपण चर्चा करू.

४. यहोवाने आपल्याला चांगुलपणा कसा दाखवला?

आपण यहोवाकडून शिकलेल्या गोष्टींप्रमाणे जीवन जगतो तेव्हा आपल्या जीवनात किती फरक पडतो हे आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा त्याच्याबद्दल शिकायला लागलो आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण व्हायला लागलं, तेव्हा त्याने आपल्याला चुकीचे विचार आणि चुकीची कामं सोडून द्यायला मदत केली. (कलस्सै. १:२१) पुढे जेव्हा आपण त्याला आपलं जीवन समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला, तेव्हा तर त्याचा चांगुलपणा आपल्याला आणखीनच जास्त अनुभवायला मिळाला. कारण त्याने आपल्याला एक शुद्ध विवेक दिला आणि त्याच्यासोबत मैत्री करायची संधी दिली.—१ पेत्र ३:२१.

५. प्रचारकार्यात आपल्याला यहोवाचा चांगुलपणा कशा प्रकारे अनुभवायला मिळतो?

सेवाकार्याच्या बाबतीतही आपल्याला यहोवाचा चांगुलपणा अनुभवायला मिळतो. आपल्यापैकी बऱ्‍याच जणांचा स्वभाव असा आहे, की आपण लगेच अनोळखी लोकांशी बोलत नाही. त्यामुळे साक्षीदार होण्याआधी आपण असा कधीच विचार केला नसेल, की आपण अनोळखी लोकांच्या घरी जाऊन त्यांना बायबलबद्दल सांगू. पण यहोवाच्या मदतीमुळे आज आपण ते किती सहजपणे करतो आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो. याशिवाय, तो आणखीनही काही मार्गांनी आपल्याला मदत करतो. जसं की, प्रचार करताना कोणी आपल्यावर रागवलं, आपल्यावर ओरडलं तर शांत राहायला तो आपल्याला मदत करतो. घरमालकाशी बोलताना योग्य वचन आठवायला तो आपल्याला मदत करतो. इतकंच नाही, तर ज्या क्षेत्रात लोक आपला संदेश ऐकत नाहीत त्या क्षेत्रात प्रचार करत राहायलाही तो आपल्याला शक्‍ती देतो.—यिर्म. २०:७-९.

६. आणखी कोणत्या एका मार्गाने यहोवा आपल्याला चांगुलपणा दाखवतो?

सेवाकार्य कसं करायचं याचं प्रशिक्षण देऊनही यहोवा आपल्याला चांगुलपणा दाखवतो. (योहा. ६:४५) जसं की, प्रचारकार्यात लोकांशी कसं बोलायचं याबद्दलचे व्हिडिओ सभांमध्ये दाखवले जातात आणि त्यांप्रमाणे आपण लोकांशी बोलावं असं प्रोत्साहन आपल्याला दिलं जातं. सुरुवातीला एखादी नवीन पद्धत वापरायला आपल्याला भीती वाटू शकते. पण तरीसुद्धा आपण ती वापरतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं, की ही पद्धत खूप चांगली आहे. तसंच, सभांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये आपल्याला हे सुचवलं जातं, की साक्ष द्यायच्या ज्या पद्धती आपण आतापर्यंत वापरल्या नाहीत, त्या आपण वापरून पाहाव्यात. हेसुद्धा कदाचित आपल्याला कठीण वाटू शकतं. पण आपण त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो, तेव्हा यहोवा आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतो. आपली परिस्थिती कशीही असो, आपण यहोवावर भरवसा ठेवतो आणि वेगवेगळ्या मार्गांनी आपली सेवा वाढवायचा प्रयत्न करतो तेव्हा यहोवा कोणकोणते आशीर्वाद देतो, हे आता आपण पाहू या. तसंच, आपण कशा प्रकारे आपलं सेवाकार्य वाढवू शकतो हेसुद्धा आपण पाहू.

जे यहोवावर भरवसा ठेवतात त्यांना तो भरपूर आशीर्वाद देतो

७. आपण जर आपली सेवा वाढवायचा प्रयत्न केला तर आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?

यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होतं.  सध्या कोलंबियामध्ये सेवा करणारे सॅम्युएल * नावाचे एक वडील आणि त्यांची पत्नी यांचंच उदाहरण घ्या. ते आपल्या मंडळीत पायनियरिंग करत होते आणि आनंदी होते. पण जास्त गरज असलेल्या मंडळीला मदत करून त्यांना आपली सेवा वाढवायची होती. त्यासाठी त्यांना काही त्याग करावे लागले. सॅम्युएल म्हणतात: “आम्ही मत्तय ६:३३ मधला सल्ला लागू केला. आणि गरज नसलेल्या वस्तू खरेदी करायचं बंद केलं. पण स्वतःचं राहतं घर सोडून जाणं खूप कठीण होतं. आम्हाला हवं होतं तसंच ते बांधलं होतं. शिवाय, त्याचं कर्जही आम्ही फेडलं होतं.” पण ते नवीन ठिकाणी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की गरजा भागवण्यासाठी त्यांना आधीपेक्षा खूप कमी पैशांची गरज आहे. सॅम्युएल पुढे म्हणतात: “यहोवा प्रत्येक वेळी कशा प्रकारे आम्हाला मार्गदर्शन देतो आणि आमच्या प्रार्थनांची उत्तरं देतो हे आम्ही स्वतः पाहिलंय. आता आम्हाला यहोवाचं प्रेम आणखी जास्त अनुभवायला मिळतं.” तुम्हीसुद्धा आपली सेवा वाढवायचा विचार कराल का? केला, तर यहोवासोबतची तुमची मैत्री घट्ट होईल आणि तो नक्कीच तुम्हाला सांभाळेल.—स्तो. १८:२५.

८. इवान आणि विक्टोरिया यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

आपल्याला आनंद मिळतो.  किर्गिझस्तानमध्ये पायनियरिंग करणाऱ्‍या इवान आणि विक्टोरिया या जोडप्याचं उदाहरण आता आपण पाहू या. त्यांनी एक साधं जीवन जगायचं ठरवलं, म्हणजे मग संघटनेच्या कोणत्याही कामासाठी ते तयार असतील; अगदी बांधकाम प्रकल्पांवर काम करायलासुद्धा. भाऊ इवान म्हणतात: “संघटनेने दिलेलं कोणतंही काम आम्ही खूप मन लावून करायचो. संध्याकाळपर्यंत आम्ही खूप थकून जायचो. पण आम्ही आमची शक्‍ती यहोवाच्या कामासाठी वापरली याचं आम्हाला खूप समाधान वाटायचं. शिवाय, वेगवेगळी कामं करताना आम्हाला बरेच नवीन मित्र मिळाले आणि त्या काळातल्या अनेक चांगल्या आठवणी आमच्याकडे आहेत.”—मार्क १०:२९, ३०.

९. कठीण परिस्थिती असूनही एका बहिणीने आपली सेवा कशी वाढवली, आणि याचे तिला कोणते चांगले परिणाम पाहायला मिळाले?

कठीण परिस्थितीतही आपण यहोवाची सेवा करतो तेव्हा आपण आनंदी राहतो. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्‍या मेरी नावाच्या एका वयस्कर बहिणीचंच उदाहरण घ्या. पती वारल्यामुळे ती एकटीच आहे. ती एक डॉक्टर होती. पण रिटायर झाल्यानंतर तिने पायनियरिंग सुरू केली. संधिवाताचा भयंकर त्रास असल्यामुळे तिला चालणं खूप कठीण जातं. म्हणून एका तासापेक्षा जास्त तिला घरोघरचं कार्य करायला जमत नाही. पण ती ट्रॉली लावून जास्त वेळ साक्षकार्य करते. याचा परिणाम म्हणजे तिच्याकडे अनेक पुनर्भेटी आणि बायबल अभ्यास आहेत. त्यांच्यापैकी काहींशी ती फोनवरून बोलते. मेरीसमोर एवढ्या समस्या असूनही ती यहोवासाठी इतकं का करते? यावर मेरी म्हणते: “कारण यहोवावर आणि येशूवर माझं खूप प्रेम आहे. आणि जास्तीत जास्त सेवा करायला यहोवाने मला मदत करावी म्हणून मी सतत त्याला प्रार्थना करते.”—मत्त. २२:३६, ३७.

१०. १ पेत्र ५:१० यात सांगितल्याप्रमाणे जे आपली सेवा वाढवतात त्यांना कोणता फायदा होतो?

१० यहोवा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो.  हे मॉरिशियसमध्ये पायनियरिंग करणाऱ्‍या केनी नावाच्या एका भावाने स्वतः अनुभवलं. सत्य मिळाल्यावर त्याने युनिर्व्हसिटीचं शिक्षण सोडलं, बाप्तिस्मा घेतला आणि पायनियरिंग सुरू केली. केनी म्हणतो: “मी यशया संदष्ट्यासारखं बनायचा प्रयत्न करतो, ज्याने म्हटलं होतं, ‘मी जाईन, मला पाठव.’” (यश. ६:८) केनीने आपल्या अनेक बांधकाम प्रकल्पांवर काम केलं आहे. तसंच, भाषांतराच्या कामातही त्याने मदत केली आहे. तो पुढे म्हणतो: “ही कामं करण्यासाठी मला खूप चांगलं प्रशिक्षण मिळालं.” केनीला फक्‍त काम कसं करायचं हेच शिकायला मिळालं नाही, तर आणखीनही खूप काही शिकायला मिळालं. त्याबद्दल तो म्हणतो: “मी कुठे कमी पडतो हे ओळखायला आणि यहोवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवायला मी शिकलो.” (१ पेत्र ५:१० वाचा.) यहोवाकडून वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण मिळावं म्हणून तुम्हीसुद्धा आपल्या जीवनात फेरबदल करून आपली सेवा वाढवू शकता का?

एक जोडपं, प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करत आहे; एक तरुण बहीण बांधकाम प्रकल्पावर काम करत आहे; एक वयस्कर जोडपं टेलिफोनद्वारे साक्ष देत आहे. या सगळ्यांना, ते करत असलेल्या सेवाकार्यातून आनंद मिळतो (परिच्छेद ११ पाहा)

११. दक्षिण कोरियातल्या तीन बहिणींनी काय केलं, आणि त्याचा काय परिणाम झाला? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

११ जे भाऊबहीण अनेक वर्षांपासून सत्यात आहेत त्यांनासुद्धा खूप काही शिकायला मिळतं. त्यासाठी कोव्हिड-१९ च्या काळातला एक अनुभव आपण पाहू या. दक्षिण कोरियातल्या एका मंडळीतल्या वडिलांनी असं म्हटलं: “पूर्वी काहींना वाटायचं, की आपल्या तब्येतीमुळे प्रचारकार्यात आपण फारसा भाग घेऊ शकत नाही. पण आता ते व्हिडिओ कॉल करून खूप चांगल्या प्रकारे साक्ष देतात. वयाची ८० ओलांडलेल्या तीन बहिणींनी कम्प्युटर कसा वापरायचा ते शिकून घेतलं आणि आता त्या दररोज या पद्धतीने साक्ष देतात.” (स्तो. ९२:१४, १५) यहोवाचा चांगुलपणा आणखी जास्त अनुभवण्यासाठी तुम्हीसुद्धा आपली सेवा वाढवू शकता का? त्यासाठी काय करायची गरज आहे ते आपण पुढे पाहू या.

तुम्ही आपली सेवा कशी वाढवू शकता?

१२. जे यहोवावर भरवसा ठेवतात त्यांना तो कोणतं अभिवचन देतो?

१२ यहोवावर भरवसा ठेवा.  आपण त्याच्यावर भरवसा ठेवला आणि त्याची सेवा करण्यासाठी मेहनत घेतली, तर तो आपल्याला अनेक आशीर्वाद द्यायचं वचन देतो. (मला. ३:१०) कोलंबियामध्ये राहणाऱ्‍या फीबी नावाच्या बहिणीने हे कसं अनुभवलं ते पाहू या. तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तिला लगेच पायनियरिंग सुरू करायची होती. पण कुटुंबाला सांभाळण्यासाठी तिला नोकरी करणं गरजेचं होतं. पुढे तिची रिटायर व्हायची वेळ आली तेव्हा तिने यहोवाला कळकळून प्रार्थना केली. ती म्हणते: “सहसा पेन्शन सुरू व्हायला बराच वेळ लागतो. पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही. एका महिन्यानंतर लगेच माझी पेन्शन सुरू झाली. माझ्यासाठी हा एक चमत्कारच होता!” मग दोन महिन्यांनंतर तिने पायनियरिंग सुरू केली. आता तिचं वय ७० पेक्षा जास्त आहे. आणि ती २० पेक्षा जास्त वर्षांपासून पायनियरिंग करते. या काळात तिने आठ लोकांना सत्यात यायला मदत केली. ती म्हणते: “कधीकधी मला खूप थकल्यासारखं वाटतं. पण यहोवा मला रोज मदत करतो. त्यामुळे मी पायनियरिंग करू शकते.”

अब्राहाम आणि साराचा, तसंच याकोबचा आणि याजकांचा यहोवावर भरवसा होता हे त्यांनी कसं दाखवलं? (परिच्छेद १३ पाहा)

१३-१४. कोणती उदाहरणं तुम्हाला यहोवावर भरवसा ठेवायला आणि तुमची सेवा वाढवायला मदत करू शकतात?

१३ ज्यांनी यहोवावर भरवसा ठेवला त्यांच्याकडून शिका.  बायबलमध्ये अशा कितीतरी लोकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांनी यहोवाची सेवा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांच्या बाबतीत असं घडलं, की आधी त्यांनी यहोवावर भरवसा असल्याचं दाखवलं आणि मग यहोवाकडून त्यांना भरपूर आशीर्वाद मिळाले. उदाहरणार्थ, “आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही” अब्राहामने आपलं घर सोडलं. त्यानंतरच यहोवाने त्याला आशीर्वाद दिले. (इब्री ११:८) याकोबने स्वर्गदूताशी कुस्ती केली, त्यानंतरच त्याला एक खास आशीर्वाद मिळाला. (उत्प. ३२:२४-३०) तसंच, वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्यासाठी याजकांनी यार्देन नदीत पाय टाकल्यावरच ती वाहायची थांबली. आणि मग सगळ्या इस्राएली लोकांनी ती पार केली.—यहो. ३:१४-१६.

१४ याशिवाय, आजच्या काळातल्या ज्या सेवकांनी यहोवावर भरवसा ठेवला आणि आपली सेवा वाढवली त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. पिटर आणि डायना या जोडप्याचाच विचार करा. या दोघांनाही, “सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले” आणि “त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले,” ही श्रृंखला खूप आवडायची. कारण त्यांत अशा भाऊबहिणींचे अनुभव दिले आहेत, ज्यांनी आपली सेवा वाढवली आणि अनेक आशीर्वाद अनुभवले. पिटर म्हणतो: “त्यांचे अनुभव वाचताना आम्हाला असं वाटायचं, की आम्ही कोणालातरी स्वादिष्ट जेवण खाताना पाहत आहोत. आम्ही जितके जास्त ते अनुभव वाचायचो तितकं जास्त आम्हाला वाटायचं, की यहोवा किती चांगला आहे हे आपण स्वतः अनुभवून पाहिलं पाहिजे.” शेवटी पिटर आणि डायना प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करायला गेले. तुम्हीसुद्धा ही श्रृंखला वाचली आहे का? तसंच, तुम्ही jw.org/hi वर दिलेले “दूर-दराज़ के इलाकों में प्रचार—ऑस्ट्रेलिया”  आणि “वहाँ जाकर सेवा करना, जहाँ प्रचारकों की ज़्यादा ज़रूरत है,”  हे व्हिडिओ पाहिले आहेत का? त्यामुळे तुम्ही तुमची सेवा कोणत्या मार्गाने वाढवू शकता हे समजायला तुम्हाला मदत होईल.

१५. आपण कोणासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे?

१५ अशा लोकांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला सेवा वाढवायचं प्रोत्साहन देतील.  हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. एखादा पदार्थ आपल्यासाठी अगदीच नवीन असेल. पण आपण ज्यांच्यासोबत आहोत ते लोक तो पदार्थ किती आवडीने खातात हे पाहून आपल्यालासुद्धा तो खावासा वाटेल. तसंच, आपण जर अशा भाऊबहिणींसोबत वेळ घालवला जे यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान देतात, तर आपल्यालासुद्धा आपली सेवा वाढवावीशी वाटेल. केन्ट आणि वेरॉनिका या जोडप्याच्या बाबतीत असंच घडलं. केन्ट म्हणतात: “आमच्या मित्रांनी आणि कुटुंबातल्या लोकांनी सेवा वाढवण्यासाठी आम्हाला वेगवेगळे मार्ग सुचवले. त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे आम्हाला काहीतरी नवीन करायची हिंमत मिळाली.” आज केन्ट आणि वेरॉनिका सर्बियामध्ये खास पायनियर म्हणून सेवा करत आहेत.

१६. आपण त्याग का केले पाहिजेत? (लूक १२:१६-२१)

१६ यहोवासाठी त्याग करा.  याचा असा अर्थ होत नाही, की यहोवाला खूश करण्यासाठी आपल्याला सगळं काही सोडून द्यावं लागेल. (उप. ५:१९, २०) पण सेवा वाढवण्यासाठी आपण कोणतेही त्याग करायला तयार नसलो तर येशूने दिलेल्या उदाहरणातल्या माणसासारखी चूक आपण करून बसू. जीवनात चांगल्या-चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतली. पण देवासाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता. (लूक १२:१६-२१ वाचा.) फ्रान्समध्ये राहणारा क्रिस्टोफर नावाचा एक भाऊ म्हणतो: “यहोवासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी जितका वेळ द्यायला पाहिजे होता तितका देत नव्हतो.” म्हणून त्याने आणि त्याच्या बायकोने पायनियरिंग करायचं ठरवलं. पण ते करण्यासाठी त्या दोघांना आपली नोकरी सोडून द्यावी लागली. आपला खर्च भागवण्यासाठी ते साफसफाईचं काम करू लागले आणि कमी पैशात आनंदी राहायला शिकले. पायनियरिंग करण्यासाठी त्यांनी जे काही त्याग केले त्यांबद्दल त्यांना कसं वाटतं? क्रिस्टोफर म्हणतो: “आम्ही खूप खूश आहोत, कारण आता आम्हाला प्रचारकार्यासाठी भरपूर वेळ देता येतो आणि आम्हाला अनेक चांगल्या पुनर्भेटीही मिळाल्या आहेत. शिवाय, आमच्या बायबल विद्यार्थ्यांना यहोवाबद्दल शिकताना पाहून खूप आनंद होतो.”

१७. एका नवीन पद्धतीने साक्ष देण्यासाठी शर्लीने काय केलं?

१७ साक्ष द्यायच्या नवीन पद्धती वापरून पाहा.  (प्रे. कार्यं १७:१६, १७; २०:२०, २१) अमेरिकेत राहणाऱ्‍या शर्ली नावाच्या पायनियरिंग करणाऱ्‍या एका बहिणीला कोव्हिड-१९ च्या काळात साक्ष देण्याच्या आपल्या पद्धतीत बदल करावा लागला. सुरुवातीला फोनवरून साक्ष द्यायला तिला खूप भीती वाटत होती. पण विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान फोनवरून साक्ष कशी द्यायची हे मंडळीत शिकवण्यात आलं. त्यामुळे तिची भीती कमी झाली आणि आता ती खूप सहज या पद्धतीने साक्ष देते. शर्ली म्हणते: “सुरुवातीला मी घाबरत होते, पण आता मला ते खूप आवडतं. घरोघरच्या कार्यापेक्षा फोनवरून जास्त लोकांना साक्ष देता येते.”

१८. आपण कशा प्रकारे समस्यांचा सामना करू शकतो?

१८ एक ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करा.  आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा मदतीसाठी आपण प्रार्थना करतो आणि त्या समस्या कशा सोडवता येतील याचा विचार करतो. (नीति. ३:२१) सोनिया नावाची एक पायनियर बहीण काय करते याकडे लक्ष द्या. युरोपमध्ये रोमेनी भाषेच्या एका गटामध्ये ती सेवा करते. ती म्हणते, “मला जी ध्येयं पूर्ण करायची आहेत ती मी एका कागदावर लिहिते आणि तो कागद दिसेल अशा ठिकाणी ठेवते. तसंच, मी माझ्या टेबलवर दोन वेगळ्या दिशांना जाणाऱ्‍या रस्त्यांचं चित्र ठेवलं आहे. मला एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मी ते चित्र पाहते आणि कोणता निर्णय घेतल्याने मला माझं ध्येय गाठता येईल याचा विचार करते.” तसंच, समोर येणाऱ्‍या समस्यांकडे कसं पाहायचं हेसुद्धा ती ठरवते. ती म्हणते, “समस्यांकडे कसं पाहायचं हे आपल्या हातात आहे. समोर आलेली परिस्थिती आड येणाऱ्‍या एका भितींसारखी आहे असं जर आपण मानलं, तर आपण आपलं ध्येय गाठूच शकणार नाही. पण तेच जर त्या परिस्थितीला आपण एखाद्या पुलासारखं समजलं तर ती पार करून आपल्याला आपलं ध्येय गाठता येईल.”

१९. यहोवाने दिलेल्या आशीर्वादांबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१९ आज यहोवा अनेक मार्गांनी आपल्याला आशीर्वाद देतो. त्याबद्दल आपल्याला कदर आहे, हे दाखवण्यासाठी आपण होताहोईल तितकी त्याची स्तुती केली पाहिजे. (इब्री १३:१५) त्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांनी यहोवाची सेवा करू शकतो. मग आपण अपेक्षाही केली नसेल, इतके आशीर्वाद यहोवा आपल्याला देईल. यहोवा किती चांगला आहे याचा दररोज आपण अनुभव घेऊन पाहू या. मग येशूप्रमाणेच आपल्यालाही असं म्हणता येईल, “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं हेच माझं अन्‍न आहे.”—योहा. ४:३४.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 यहोवा चांगला आहे आणि तो सगळ्यांना चांगल्या गोष्टी पुरवतो; दुष्ट लोकांनासुद्धा. पण खासकरून आपल्या सेवकांना चांगल्या गोष्टी द्यायला त्याला आवडतं. या लेखात आपण हे पाहणार आहोत, की यहोवा आपल्या सेवकांना चांगल्या गोष्टी कशा देतो. तसंच, आपण हेसुद्धा पाहू, की जे लोक आपली सेवा वाढवतात त्यांना तो कोणकोणते आशीर्वाद देतो.

^ परि. 7 काही नावं बदलण्यात आली आहेत.