व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३५

‘एकमेकांना प्रोत्साहन देत राहा’

‘एकमेकांना प्रोत्साहन देत राहा’

‘तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत राहा आणि एकमेकांना बळकट करत राहा.’​—१ थेस्सलनी. ५:११.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

१. १ थेस्सलनीकाकर ५:११ याप्रमाणे आपण सगळे कोणत्या खास बांधकामात भाग घेऊ शकतो?

 तुमच्या मंडळीत कधी नवीन राज्यसभागृह बांधायचं किंवा ते दुरूस्त करायचं काम झालं आहे का? जर झालं असेल, तर त्या नवीन सभागृहात जी पहिली सभा झाली होती, ती तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ते सुंदर नवीन सभागृह पाहून तुम्ही यहोवाचे आभार मानले असतील. कदाचित तुम्हाला इतकं भरून आलं असेल, की सुरुवातीचं गाणं गायलाही तुम्हाला जमलं नसेल. खरंच, जेव्हा-जेव्हा एक नवीन राज्यसभागृह बांधलं जातं तेव्हा-तेव्हा यहोवाची खूप स्तुती होते. पण जेव्हा आपण या राज्यसभागृहांमध्ये येणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देतो तेव्हा तर यहोवाची आणखीनच जास्त स्तुती होते. कारण भाऊबहिणींना प्रोत्साहन देणं हेही एक प्रकारचं बांधकामच आहे. असं आपण का म्हणू शकतो? आपलं मुख्य वचन १ थेस्सलनीकाकर ५:११ (वाचा.) यात प्रेषित पौलने ‘एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि बळकट करा’ असं म्हटलं. इथे त्याने जो ग्रीक शब्द वापरला त्याचा संबंध बांधकामाशी आहे. आणि हे बांधकाम खरोखरच्या इमारती बांधण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

भाऊबहिणींना प्रोत्साहन द्यायच्या बाबतीत प्रेषित पौलचं एक खूप सुंदर उदाहरण आपल्यासमोर आहे. तो नेहमी भाऊबहिणींची परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. या लेखात आपण पाहणार आहोत की त्याने भाऊबहिणींना (१) परीक्षांचा सामना करायला, (२) एकमेकांसोबत शांतीने राहायला आणि (३) यहोवावरचा त्यांचा विश्‍वास मजबूत करायला कशी मदत केली. असं करताना आपण पौलचं कसं अनुकरण करू शकतो आणि आज आपल्या भाऊबहिणींना कसं प्रोत्साहन देऊ शकतो याकडे लक्ष देऊ या.​—१ करिंथ. ११:१.

पौलने भाऊबहिणींना परीक्षांचा सामना करायला मदत केली

३. कामाबद्दल पौलचा योग्य दृष्टिकोन होता असं का म्हणता येईल?

पौलचं भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. शिवाय त्याने स्वतःही बऱ्‍याच परीक्षांचा सामना केला होता. त्यामुळे जेव्हा भाऊबहीण कठीण परिस्थितीतून जात होते, तेव्हा तो त्यांना सहानुभूती दाखवू शकला आणि त्यांची परिस्थिती समजून घेऊ शकला. एकदा जेव्हा त्याला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला, तेव्हा स्वतःचं आणि आपल्या सोबत्यांचं पोट भरण्यासाठी त्याला कष्टाचं काम करावं लागलं. (प्रे. कार्यं २०:३४) तो तंबू बनवायचं काम करायचा. करिंथला आल्यावर त्याने सुरुवातीला अक्विल्ला आणि प्रिस्किल्लासोबत काम केलं कारण तेसुद्धा तंबू बनवायचे. पण “दर शब्बाथाच्या दिवशी” तो यहुदी आणि ग्रीक लोकांना आनंदाचा संदेश सांगायचा. मग जेव्हा सीला आणि तीमथ्य आले “तेव्हा पौलने प्रचारकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं.” (प्रे. कार्यं १८:२-५) यावरून कळतं, की आपल्या जीवनातलं सगळ्या महत्त्वाचं काम पौल कधीच विसरला नव्हता. ते म्हणजे यहोवाची सेवा करणं. पौल स्वतः कष्ट करत असल्यामुळे तो भाऊबहिणींना प्रोत्साहन देऊ शकला. जीवनातल्या समस्यांमुळे किंवा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागत असल्यामुळे त्यांनी “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींकडे, म्हणजेच यहोवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष करायला नको याची पौलने त्यांना आठवण करून दिली.​—फिलिप्पै. १:१०.

४. पौल आणि तीमथ्यने भाऊबहिणींना छळाचा सामना करायला कशी मदत केली?

थेस्सलनीका इथे नवीन मंडळी सुरू केल्याच्या काही काळानंतरच तिथल्या भाऊबहिणींना तीव्र छळाचा सामना करावा लागला. संतापलेल्या विरोधकांच्या जमावाला जेव्हा पौल आणि सीला सापडले नाहीत, तेव्हा त्यांनी काही बांधवांना फरफटत शहराच्या अधिकाऱ्‍यांपुढे आणलं. ते सगळे मोठमोठ्याने ओरडून म्हणत होते, की “ही सगळी माणसं, येशू नावाचा दुसराच कोणी राजा आहे असं म्हणून कैसराच्या हुकमांच्या विरोधात वागत आहेत.” (प्रे. कार्यं १७:६, ७) शहरातले सगळे लोक आपल्याविरूद्ध उठले आहेत हे पाहून त्या नवीन भाऊबहिणींना किती धक्का बसला असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का? खरंतर या घटनेमुळे यहोवाच्या सेवेत त्यांचा आवेश कमी होऊ शकला असता. पण पौलला असं घडू द्यायचं नव्हतं. त्याला आणि सीलाला शहर सोडून जावं लागलं तरीसुद्धा त्यांनी नवीनच तयार झालेल्या मंडळीची काळजी घेण्यासाठी एक व्यवस्था केली. पौलने थेस्सलनीकामधल्या भाऊबहिणींना म्हटलं, “आम्ही आमचा भाऊ . . . तीमथ्य, याला तुमच्याकडे पाठवलं. हे यासाठी, की या संकटांमुळे तुमच्यापैकी कोणाचाही विश्‍वास डळमळू नये.” (१ थेस्सलनी. ३:२, ३) तीमथ्य मूळचा लुस्त्रचा होता आणि कदाचित त्याने तिथे याआधी स्वतः छळ सहन केला असेल. त्या वेळी पौलने तिथल्या भाऊबहिणींचा विश्‍वास कसा मजबूत केला हे त्याने पाहिलं होतं. यहोवाने त्यांना कशी मदत केली हे त्याने स्वतः पाहिलं असल्यामुळे तो थेस्सलनीकातल्या भाऊबहिणींना याची खातरी देऊ शकला, की सगळं काही ठीक होईल.​—प्रे. कार्यं १४:८, १९-२२; इब्री १२:२.

५. वडिलांनी केलेल्या मदतीमुळे ब्रायंट नावाच्या एका भावाला कसा फायदा झाला?

पौलने आणखी कोणत्या मार्गाने आपल्या भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत केला? पौल आणि बर्णबा हे दोघं लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखियाला परत आले, तेव्हा त्यांनी “प्रत्येक मंडळीत वडिलांना नियुक्‍त केलं.” (प्रे. कार्यं १४:२१-२३) नियुक्‍त केलेल्या या भावांनी तिथल्या मंडळीला नक्कीच खूप सांत्वन आणि दिलासा दिला असेल, आणि आज मंडळीतले वडीलसुद्धा तेच करतात. ब्रायंट नावाच्या एका भावाचा अनुभव पाहू या. तो म्हणतो: “मी १५ वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील घर सोडून गेले आणि माझी आई बहिष्कृत झाली. मला अगदी एकटं पडल्यासारखं आणि निराश वाटू लागलं.” मग अशा कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहायला ब्रायंटला कशामुळे मदत झाली? तो म्हणतो, “टोनी नावाचे वडील माझ्याशी सभांमध्ये आणि इतर वेळीही बोलायचे आणि माझी विचारपूस करायचे. त्यांनी मला अशा लोकांबद्दल सांगितलं ज्यांनी परीक्षांचा सामना केला होता आणि तरीही ते आनंदी होते. त्यांनी मला स्तोत्र २७:१० हे वचन दाखवलं. ते नेहमी मला हिज्कीया राजाचं उदाहरण द्यायचे. हिज्कीयासमोर त्याच्या वडिलांचं चांगलं उदाहरण नसतानाही तो विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहिला.” वडिलांनी केलेल्या या मदतीमुळे ब्रायंटला कसा फायदा झाला? तो सांगतो, “त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला पूर्णवेळेची सेवा सुरू करता आली.” वडिलांनो, तुमच्या मंडळीतसुद्धा कदाचित असे भाऊबहीण असतील ज्यांना ब्रायंटसारखीच “दिलासा देणाऱ्‍या शब्दांची” आणि प्रोत्साहनाची गरज असेल. तेव्हा अशा भाऊबहिणींकडे लक्ष द्या आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न करा.​—नीति. १२:२५.

६. पौलने विश्‍वासू साक्षीदारांचं उदाहरण देऊन भाऊबहिणींना प्रोत्साहन कसं दिलं?

पौलने भाऊबहिणींना आठवण करून दिली, की आपण ‘साक्षीदारांच्या मोठ्या ढगाने वेढलेले’ आहोत. प्राचीन काळातल्या या विश्‍वासू साक्षीदारांनी यहोवाच्या मदतीने बऱ्‍याच कठीण परीक्षांचा सामना केला होता. (इब्री १२:१) पौलला माहीत होतं, की या साक्षीदारांच्या अहवालांवर विचार केल्यामुळे भाऊबहिणींना समस्यांचा सामना करायचं बळ मिळेल आणि त्यांना ‘जिवंत देवाच्या शहराकडे’ लक्ष लावायला मदत होईल. (इब्री १२:२२) आणि आजही तीच गोष्ट खरी आहे. आपण जेव्हा गिदोन, बाराक, दावीद, शमुवेल आणि अशा इतर बऱ्‍याच जणांना यहोवाने कशी मदत केली त्याबद्दल वाचतो, तेव्हा आपल्यालाही धैर्य मिळत नाही का? (इब्री ११:३२-३५) शिवाय, आपल्या काळातल्या विश्‍वासू भाऊबहिणींच्या उदाहरणाबद्दल काय म्हणता येईल? आपल्या प्रकाशनांमध्ये यहोवाच्या अशा विश्‍वासू सेवकांच्या बऱ्‍याच जीवन कथा आपल्याला वाचायला मिळतात. बरेच भाऊबहीण इथे जागतिक मुख्यालयात आम्हाला पत्र लिहून कळवतात, की अशा जीवन कथांमुळे त्यांचा विश्‍वास खूप मजबूत झालाय.

पौलने भाऊबहिणींना एकमेकांसोबत शांतीने राहायला शिकवलं

७. रोमकर १४:१९-२१ मध्ये पौलने दिलेल्या सल्ल्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

आपण मंडळीत शांतीचं वातावरण टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण एकमेकांना प्रोत्साहन देत असतो. काही बाबतींत आपली मतं वेगवेगळी असली, तरी त्यामुळे आपण मंडळीत फूट पडू देत नाही. तसंच, जर एखादी गोष्ट बायबल तत्त्वांच्या विरोधात जात नसेल, तर आपण आपल्याच मतावर अडून राहत नाही. याचं एक उदाहरण आपण पाहू या. रोमच्या मंडळीतले काही भाऊ यहूदी होते तर काही विदेशी होते. मोशेचं नियमशास्त्र रद्द झाल्यावर पूर्वी ज्या गोष्टी खायची मनाई होती, ती आता राहिली नव्हती. (मार्क ७:१९) त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचं अन्‍न खायला हरकत नाही असं काही यहूदी भाऊबहिणींना वाटत होतं. पण काही यहूदी भाऊबहिणींना ते चुकीचं वाटत होतं. आणि त्यामुळे मंडळीत फूट पडली होती. पण मंडळीत शांती टिकवून ठेवणं किती महत्त्वाचं आहे याची आठवण करून देण्यासाठी पौल त्यांना म्हणाला, “मांस न खाणं किंवा द्राक्षारस न पिणं किंवा [आपल्या] भावाला अडखळण होईल असं काहीही न करणं हेच चांगलं.” (रोमकर १४:१९-२१ वाचा.) अशा मतभेदांमुळे भाऊबहिणींचं आणि मंडळीचं किती नुकसान होऊ शकतं हे समजून घ्यायला पौलने त्यांना मदत केली. तसंच इतरांना अडखळण होऊ नये म्हणून तो स्वतःमध्ये बदल करायलाही तयार होता. (१ करिंथ. ९:१९-२२) आपणसुद्धा लहानसहान गोष्टींमध्ये स्वतःच्या आवडी-निवडींवर अडून राहायचं टाळलं पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या भाऊबहिणींना आपल्याला प्रोत्साहन देता येईल आणि मंडळीतली शांती टिकवून ठेवता येईल.

८. एका महत्त्वाच्या विषयावर मंडळीत मतभेद निर्माण झाला तेव्हा पौलने काय केलं?

महत्त्वाच्या गोष्टींवरून मतभेद झाले तरीसुद्धा आपण शांती कशी टिकवून ठेवू शकतो याबाबतीतही पौलने चांगलं उदाहरण मांडलं. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातल्या काही ख्रिश्‍चनांचं असं म्हणणं होतं, की जे विदेशी लोक ख्रिस्ती बनले होते त्यांनी सुंता करणं गरजेचं आहे. यहूदी लोकांनी ख्रिश्‍चनांची टीका करू नये म्हणून कदाचित ते असं म्हणत असावेत. (गलती. ६:१२) पौल स्वतः या गोष्टीशी मुळीच सहमत नव्हता. पण आपल्याच मतावर अडून राहण्याऐवजी त्याने नम्रपणे हा विषय यरुशलेममधल्या प्रेषितांच्या आणि वडील जनांच्या समोर ठेवला. (प्रे. कार्यं १५:१, २) पौलने ज्या प्रकारे ही समस्या हाताळली त्यामुळे मंडळीत शांती आणि आनंद कसा टिकवून ठेवायचा हे भाऊबहिणींना शिकायला मिळालं.​—प्रे. कार्यं १५:३०, ३१.

९. आपण आज पौलच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

आजसुद्धा मंडळीत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतभेद निर्माण होऊ शकतो. अशा वेळी मंडळीतली शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ज्यांना मंडळीची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलं आहे त्यांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. सहसा अशा विषयांबद्दल बायबल काय म्हणतं हे आपल्या प्रकाशनांमध्ये आणि संघटनेने पुरवलेल्या लेखी मार्गदर्शनामध्ये दिलेलं असतं. जर आपण स्वतःचीच मतं पुढे करण्याऐवजी हे मार्गदर्शन स्वीकारलं तर मंडळीतली शांती आपल्याला टिकवून ठेवता येईल.

१०. मंडळीतली शांती टिकवून ठेवण्यासाठी पौलने आणखी काय केलं?

१० पौलने भाऊबहिणींच्या कमतरतांवर लक्ष देण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष दिलं. अशा प्रकारे त्याने मंडळीची शांती टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावला. उदाहरणार्थ रोमच्या मंडळीला पत्र लिहिताना शेवटी त्याने बऱ्‍याच भाऊबहिणींचा नावाने उल्लेख केला आणि त्यासोबतच त्यांच्याबद्दल काही चांगल्या गोष्टीही सांगितल्या. आपणसुद्धा इतरांशी बोलताना आपल्या भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांचा उल्लेख केला पाहिजे. असं केल्यामुळे भाऊबहिणींना एकमेकांच्या आणखी जवळ यायला मदत होईल आणि मंडळीतलं प्रेमसुद्धा वाढेल.

११. कोणाशी मतभेद झाले तर आपण काय केलं पाहिजे?

११ कधीकधी मंडळीतल्या प्रौढ ख्रिस्ती भाऊबहिणींमध्येसुद्धा मतभेद किंवा वाद-विवाद होऊ शकतात. पौल आणि बर्णबा चांगले मित्र होते पण त्यांच्यातही वाद झाला. पुढच्या मिशनरी दौऱ्‍यात मार्कला सोबत घ्यायचं की नाही यावरून त्यांच्यात वाद झाला. “त्यांच्यात इतकं कडाक्याचं भांडण झालं, की ते एकमेकांपासून वेगळे झाले.” (प्रे. कार्यं १५:३७-३९) पण पौल, बर्णबा आणि मार्क यांनी आपसातले वाद मिटवले आणि ते पुन्हा एक झाले. कारण त्यांना माहीत होतं, की मंडळीतली शांती आणि एकता खूप महत्त्वाची आहे. पुढे बर्णबा आणि मार्क या दोघांबद्दल पौल चांगलं बोलला. (१ करिंथ. ९:६; कलस्सै. ४:१०) आपलेसुद्धा मंडळीतल्या भाऊबहिणींशी काही मतभेद असतील तर आपण ते मिटवले पाहिजेत आणि त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष दिलं पाहिजे. असं केल्यामुळे मंडळीची शांती आणि एकता टिकून राहील.​—इफिस. ४:३.

पौलने भाऊबहिणांचा विश्‍वास मजबूत केला

१२. आज आपल्या भाऊबहिणींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?

१२ आपण जेव्हा भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत करतो तेव्हा आपण त्यांना यहोवाची सेवा करत राहायचं प्रोत्साहन देतो. आपल्या भाऊबहिणींना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सत्यात नसलेले नातेवाईक, कामावरचे किंवा शाळेतले सोबती काहींची थट्टा करतात. काहींना गंभीर आजार आहेत तर काहींचं मन दुखावलं गेल्यामुळे ते निराश झाले आहेत. असेही काही भाऊबहीण आहेत जे बऱ्‍याच वर्षांपासून सत्यात आहेत आणि या जगाचा शेवट होण्याची ते बऱ्‍याच काळापासून वाट पाहत आहेत. या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपल्या भाऊबहिणींच्या विश्‍वासाची परीक्षा होऊ शकते. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागला. मग पौलने आपल्या भाऊबहिणींचा विश्‍वास कशा प्रकारे मजबूत केला?

प्रेषित पौलसारखंच आपण इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो? (परिच्छेद १३ पाहा.) *

१३. ज्यांच्या विश्‍वासाची थट्टा केली जात होती त्यांना पौलने कशी मदत केली?

१३ पौलने शास्त्रवचनांचा उपयोग करून भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत केला. उदाहरणार्थ, काही यहुदी ख्रिश्‍चनांचे नातेवाईक विश्‍वासात नव्हते. आणि यहुदी धर्म ख्रिस्ती धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणून ते त्यांची टीका करायचे. या नातेवाइकांना काय उत्तर द्यावं हे कदाचित आपल्या भाऊबहिणींना कळत नव्हतं. पण पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांचा विश्‍वास नक्कीच खूप मजबूत झाला असेल. (इब्री १:५, ६; २:२, ३; ९:२४, २५) या पत्रात पौलने ज्या प्रकारे तर्क केला त्यामुळे त्यांना टीका करणाऱ्‍यांना उत्तर द्यायला नक्कीच मदत झाली असेल. आज आपल्या ज्या भाऊबहीणींची थट्टा केली जाते, त्यांना आपण मदत करू शकतो. बायबलवर आधारीत असलेल्या प्रकाशनांच्या मदतीने आपल्या विश्‍वासाबद्दल खातरीने कसं बोलायचं, हे आपण त्यांना सांगू शकतो. तसंच आपल्या तरुण भाऊबहिणींची टिंगल केली जाते. देवाने या पृथ्वीला आणि मानवांना निर्माण केलंय असं ते मानत असल्यामुळे त्यांची थट्टा केली जाते. अशा भाऊबहिणींना, साक्षीदार निर्मितीवर विश्‍वास का ठेवतो हे समजून सांगता यावं म्हणून आपण मदत करू शकतो. त्यासाठी वॉज लाईफ क्रीएटेड?  (जीवसृष्टी खरंच निर्माण करण्यात आली आहे का?) आणि जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न  या माहितीपत्रकातून आपण त्यांना मदत करू शकतो.

प्रेषित पौलसारखंच आपण इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो? (परिच्छेद १४ पाहा.) *

१४. पौल प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात व्यस्त होता तरी त्याने काय केलं?

१४ पौलने भाऊबहिणींना “चांगली कार्यं” करून प्रेम दाखवायचं प्रोत्साहन दिलं. (इब्री १०:२४) त्याने आपल्या शब्दातूनच नाही तर आपल्या उदाहरणातूनसुद्धा बरंच काही शिकवलं. उदाहरणार्थ, यहूदीयातल्या भाऊबहिणींना जेव्हा दुष्काळाचा सामना करावा लागला तेव्हा पौलने गरजेच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोचवल्या. (प्रे. कार्यं ११:२७-३०) प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात पौल व्यस्त असला, तरी गरजू भाऊबहिणींना मदत करण्यात तो नेहमी पुढे असायचा. (गलती. २:१०) असं करण्याद्वारे यहोवा आपली नेहमी काळजी घेईल या गोष्टीवर त्याने भाऊबहीणींचा भरवसा वाढवला. आज आपणसुद्धा विपत्ती मदतकार्यात आपला वेळ, शक्‍ती आणि कौशल्य वापरतो तेव्हा आपण भाऊबहिणींना त्यांचा विश्‍वास मजबूत करायला मदत करत असतो. आपण जेव्हा जगभरात चाललेल्या कार्यासाठी नियमितपणे दान देतो, तेव्हासुद्धा आपण भाऊबहिणींना एका प्रकारे मदत करत असतो. या आणि अशा बऱ्‍याच मार्गांनी आपण आपल्या भाऊबहिणींना हा भरवसा ठेवायला मदत करतो, की यहोवा त्यांना कधीच सोडणार नाही.

प्रेषित पौलसारखंच आपण इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो? (परिच्छेद १५-१६ पाहा.) *

१५-१६. विश्‍वास कमजोर झालेल्या भाऊबहिणींना आपण कशी मदत करू शकतो?

१५ विश्‍वास कमजोर झालेल्या भाऊबहिणींना पौलने मदत करायचं सोडलं नाही. तो त्यांच्याशी समजूतदारपणे वागला आणि त्याने त्यांना प्रेमळपणे दिलासा दिला. (इब्री ६:९; १०:३९) उदाहरणार्थ, इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात त्याने बऱ्‍याच वेळा “आपण,” “आपल्या” आणि “आपल्याला” असे शब्द वापरले. असे शब्द वापरून त्याने दाखवलं, की त्याने जो सल्ला दिला होता, त्याप्रमाणे त्याने स्वतःसुद्धा वागणं गरजेचं आहे. (इब्री २:१, ३) पौलसारखंच आपणही विश्‍वास कमजोर झालेल्या भाऊबहिणींना मदत करायचं सोडत नाही. उलट, आपल्याला त्यांची मनापासून काळजी आहे हे आपण दाखवून देतो आणि अशा रीतीने आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो. असं करून आपण दाखवून देतो की आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तसंच, त्यांना सल्ला देताना आपण त्यांच्याशी प्रेमळपणे आणि समजूतदारपणे बोलतो तेव्हा तो सल्ला स्वीकारणं त्यांना सोपं जातं.

१६ पौलने भाऊबहिणींना याची खातरी करून दिली, की ते करत असलेली चांगली कार्यं यहोवा लक्षात ठेवतो. (इब्री १०:३२-३४) विश्‍वासात कमजोर झालेल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला मदत करताना आपणही हेच करू शकतो. ते सत्यात कसे आले किंवा यहोवाने त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी कशी मदत केली, याचे अनुभव आपण त्यांना विचारू शकतो. तसंच, आपण त्यांना ही खातरी देऊ शकतो, की त्यांनी यहोवावर जे प्रेम दाखवलं आणि त्याची जी सेवा केली ते तो कधीच विसरणार नाही. आणि पुढेही तो त्यांना कधीच एकटं सोडणार नाही. (इब्री ६:१०; १३:५, ६) अशा प्रकारे भाऊबहिणींशी बोलून त्यांना दिलासा दिल्यामुळे यहोवाची सेवा करत राहायचं त्यांना प्रोत्साहन मिळेल.

‘एकमेकांना प्रोत्साहन देत राहा’

१७. आपण कोणत्या बाबतीत आपलं कौशल्य वाढवत राहू शकतो?

१७ बांधकाम करणारा जसं आपली कौशल्यं सुधारत राहतो, तसंच आपणही आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देत राहायला शिकू शकतो. जे परीक्षांचा सामना करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण अशा विश्‍वासू सेवकांचं उदाहरण त्यांना सांगू शकतो, ज्यांनी अशा समस्यांचा धीराने सामना केला. इतरांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करून आपण भाऊबहिणींना यहोवाच्या आणखी जवळ यायला मदत करू शकतो. तसंच काही कारणांमुळे जेव्हा वादविवाद किंवा मतभेद होतात, तेव्हा ते लवकरात लवकर मिटवून आपण मंडळीतली शांती टिकवून ठेवू शकतो. यासोबतच त्या भाऊबहिणींना बायबलमधली महत्त्वाची सत्यं सांगून, त्यांना लागणारी मदत देऊन आणि ज्यांचा विश्‍वास कमजोर झाला आहे त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचा विश्‍वास मजबूत करत राहू शकतो.

१८. तुम्ही काय करायचं ठरवलं आहे?

१८ आपल्या संघटनेच्या बांधकाम प्रकल्पांवर जे काम करतात त्यांना या कामातून खूप आनंद आणि समाधान मिळतं. या लेखाच्या सुरवातीला पाहिल्याप्रमाणे भाऊबहिणींना प्रोत्साहन देणं हेही एक प्रकारचं बांधकामच आहे. आणि या कामात सहभाग घेतल्यामुळे आपल्यालाही खूप आनंद आणि समाधान मिळतं. खरोखरच्या इमारती हळूहळू खराब होतात. पण भाऊबहिणींना प्रोत्साहन देऊन आपण जे काम करतो, ते कायम टिकून राहील. तर चला आपण ‘एकमेकांना प्रोत्साहन देत राहू या आणि एकमेकांना बळकट करत राहू या.’​—१ थेस्सलनी. ५:११.

गीत ५० देवाच्या प्रीतीचा आदर्श

^ सैतानाच्या या जगात जीवन जगणं सोपं नाही. आपल्या भाऊबहिणींना बऱ्‍याच समस्यांचा आणि दबावांचा सामना करावा लागतो. पण आपण नेहमी त्यांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला तर त्यांना खूप मदत होऊ शकते. याबाबातीत आपण प्रेषित पौलकडून खूप काही शिकू शकतो. या लेखात आपण त्याच्या उदाहरणावर चर्चा करू या.

^ चित्राचं वर्णन: वर्गातले सोबती ख्रिसमस साजरा करण्यासाठी दबाव टाकतात, तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्या प्रकाशनांमधल्या माहितीचा वापर कसा करता येईल, याबद्दल एक वडील आपल्या मुलीला सांगत आहेत.

^ चित्राचं वर्णन: एक जोडपं विपत्तीग्रस्त भागात मदत करण्यासाठी आलं आहे.

^ चित्राचं वर्णन: एक वडील विश्‍वासात कमजोर झालेल्या एका भावाला भेटायला आले आहेत. ते या भावाला पायनियर सेवा प्रशालेचे काही फोटो दाखवत आहेत, ज्यात ते दोघंही होते. फोटो पाहून त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. ते आनंदाचे क्षण आठवल्यावर त्या भावाला पुन्हा यहोवाची सेवा करायची इच्छा होते. काही काळाने तो मंडळीत परत येतो.