व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३६

जे यहोवावर प्रेम करतात ते नीतिमत्त्वावर प्रेम करतात!

जे यहोवावर प्रेम करतात ते नीतिमत्त्वावर प्रेम करतात!

“ज्यांना नीतिमत्त्वाची तहान आणि भूक आहे ते सुखी आहेत, कारण त्यांना तृप्त केलं जाईल.”​—मत्त. ५:६.

गीत ४६ यहोवा राजा बनला आहे!

सारांश *

१. योसेफला कोणत्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागलं आणि त्याने काय केलं?

 याकोबचा मुलगा योसेफ याला एका कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. त्याच्या मालकाची म्हणजे पोटीफरची बायको त्याला म्हणाली, “माझ्याशी संबंध ठेव.” पण योसेफने तिला नकार दिला. कदाचित काही जणांना या गोष्टीचं आश्‍चर्य वाटेल आणि ते कदाचित म्हणतील, ‘योसेफने तिला नकार का दिला?’ कारण पोटीफर तर घरात नव्हता. आणि योसेफ त्या घरात एक दास होता. शिवाय त्याने नकार दिल्यामुळे त्याची मालकीण त्याचं जगणं मुश्‍कील करू शकत होती. पण ती वारंवार प्रयत्न करत राहिली तरी योसेफ तिला नकार देत राहिला. त्याने असं का केलं? तो म्हणाला, “इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?”​—उत्प. ३९:७-१२.

२. व्यभिचार हे देवाविरूद्ध एक पाप आहे हे योसेफला कसं कळलं असेल?

मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा होती, की “व्यभिचार करू नका.” (निर्ग. २०:१४) पण मोशेचं नियमशास्त्र योसेफच्या काळाच्या दोनशे वर्षांनंतर देण्यात आलं. मग व्यभिचार देवाच्या नजरेत खूप “वाईट काम” आहे हे योसेफला कसं कळलं? योसेफ यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यामुळे अशा अनैतिक कामाबद्दल यहोवाला कसं वाटेल हे तो समजू शकत होता. उदाहरणार्थ, योसेफला हे माहीत होतं की विवाहाची सुरुवात यहोवाने केली आहे. आणि विवाह फक्‍त एक पुरूष आणि एक स्त्रीमधेच झाला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. तसंच दोन वेळा जेव्हा त्याची पणजी सारा हिची अब्रू धोक्यात होती, तेव्हा यहोवाने तिला कसं वाचवलं हेही त्याने ऐकलं असेल. आणि तसंच यहोवाने इसहाकची पत्नी रिबका हिलाही वाचवलं होतं. (उत्प. २:२४; १२:१४-२०; २०:२-७; २६:६-११) या सर्व गोष्टींवर विचार केल्यानंतर देवाच्या नजरेत योग्य काय आणि अयोग्य काय हे योसेफला समजलं असेल. योसेफचं यहोवा देवावर प्रेम असल्यामुळे त्याच्या नीतिमान स्तरांवरही त्याचं प्रेम होतं आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत या स्तरांच्या विरोधात वागायचं नव्हतं.

३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

तुमचंही नीतिमत्त्वावर प्रेम आहे का? नक्कीच असेल! पण आपण सगळे अपरिपूर्ण आहोत. आणि आपण जर सावध राहिलो नाही तर नीतिमत्त्वाबद्दल जगाच्या दृष्टिकोनाचा आपल्यावर अगदी सहज प्रभाव पडू शकतो. (यश. ५:२०; रोम. १२:२) म्हणूनच या लेखात नीतिमत्त्व म्हणजे काय आहे आणि त्यावर प्रेम केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर आपण विचार करू या. आणि त्यानंतर यहोवाच्या नीतिमान स्तरांवर आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपण कोणती तीन पावलं उचलू शकतो तेही पाहू या.

नीतिमत्त्व म्हणजे काय?

४. कोणत्या प्रकारच्या लोकांना नीतिमान म्हणता येणार नाही?

काही जण नियमांवर अडून बसतात आणि ते स्वतःला जास्तच धार्मिक समजतात. दुसऱ्‍यांकडून थोडी जरी चूक झाली तरी ते लगेच त्यांच्याकडे बोट दाखवतात. असे लोक स्वतःला नीतिमान समजत असले तरी त्याला नीतिमत्त्व म्हणता येणार नाही. कारण देवाला अशा प्रकारचं वागणं बिलकुल आवडत नाही. येशूच्या काळातसुद्धा काही धर्मपुढारी स्वतःला जास्तच नीतिमान समजायचे. आणि योग्य काय, अयोग्य काय याबद्दल त्यांनी स्वतःचे स्तर ठरवले होते. (उप. ७:१६; लूक १६:१५) पण जो खरोखर नीतिमान असतो तो स्वतःला इतरांपेक्षा कधीच श्रेष्ठ समजत नाही.

५. बायबलप्रमाणे नीतिमत्त्व म्हणजे काय आणि त्याचा संबंध कोणकोणत्या गोष्टींशी आहे?

नीतिमत्त्व हा एक सुंदर गुण आहे. पण नीतिमत्त्व म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करणं म्हणजे नीतिमत्त्व. बायबलमध्ये “नीतिमत्त्वाबद्दल” बोलताना जे शब्द वापरलेत त्याचा अर्थ सगळ्यात उच्च स्तरांप्रमाणे म्हणजे यहोवाच्या स्तरांप्रमाणे जीवन जगणं असा होतो. उदाहरणार्थ, यहोवाने आपल्या लोकांना अशी आज्ञा दिली होती की व्यापार करणाऱ्‍यांनी “प्रामाणिक वजनं” वापरावीत. (अनु. २५:१५) इथे “प्रामाणिक” असं भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू शब्दाचं भाषांतर “नीतिमान” असंही केलं जाऊ शकतं. यावरून कळतं, की देवाने आपल्याला नीतिमान समजावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या सगळ्या व्यवहारात पूर्णपणे प्रामाणिक असलं पाहिजे. नीतिमत्त्वाचा संबंध न्यायाशीसुद्धा आहे. एक नीतिमान व्यक्‍ती नेहमी न्यायाने वागते. कोणावरही अन्याय झालेला तिला पाहवत नाही. तसंच जो खरोखर नीतिमान असतो त्याला नेहमी यहोवाला ‘पूर्णपणे संतुष्ट करायची’ इच्छा असते. आणि म्हणून कोणताही निर्णय घेताना यहोवाला त्याच्याबद्दल कसं वाटेल याचाही तो विचार करतो.​—कलस्सै. १:१०.

६. यहोवाच्या स्तरांवर आपण पूर्ण भरवसा का ठेवू शकतो? (यशया ५५:८, ९)

बायबलमध्ये सांगितलंय की नीतिमत्त्वाचा उगम यहोवापासून होतो. म्हणूनच बायबलमध्ये त्याला “नीतिमत्त्वाचं निवासस्थान” असं म्हटलंय. (यिर्म. ५०:७) यहोवा निर्माणकर्ता असल्यामुळे बरोबर काय आणि चूक काय याचे स्तर तोच ठरवू शकतो. शिवाय तो परिपूर्ण आहे आणि म्हणून त्याचे स्तर अपरिपूर्ण आणि पापी मानवांच्या विचारांपेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. (नीति. १४:१२; यशया ५५:८, ९ वाचा.) पण आपल्याला देवाच्या प्रतिरूपात बनवलं आहे. त्यामुळे त्याच्या उच्च नीतिमान स्तरांप्रमाणे जगणं आपल्याला शक्य आहे. (उत्प. १:२७) आणि त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे जगायची आपली इच्छासुद्धा आहे. आपल्या पित्यावर आपलं प्रेम असल्यामुळे आपण होताहोईल तितकं त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करतो.​—इफिस. ५:१.

७. भरवशालायक स्तर आणि नियम असणं का गरजेचं आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

बरोबर आणि चूक याबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांचं पालन करणं आपल्यासाठी फायद्याचं आहे. असं का म्हणता येईल? कल्पना करा, की प्रत्येक चौकात जर ट्रॅफिक सिग्नल लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या ऐवजी वेगवेगळ्या रंगाचे असतील तर काय होईल. यामुळे खूप गोंधळ माजेल आणि बरेच अपघात होतील. तसंच विचार करा, की जर बांधकाम करणाऱ्‍या कंपन्यांनी कोणतेच नियम पाळले किंवा हलक्या दर्जाचा माल वापरला तर काय होईल? यामुळे बांधकाम चांगल्या दर्जाचं होणार नाही आणि बिल्डींग कोसळून बऱ्‍याच जणांचा मृत्यू होऊ शकतो. तसंच डॉक्टर किंवा नर्सने उपचार करताना योग्य नियम पाळले नाहीत तर कितीतरी लोकांचा जीव जाऊ शकतो. यावरून कळतं की भरवशालायक स्तर किंवा नियम असणं गरजेचं आहे कारण यामुळे आपलं संरक्षण होतं. त्याच प्रकारे यहोवाच्या स्तरांमुळेसुद्धा आपलं संरक्षण होतं.

८. जे यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगायचा प्रयत्न करतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

जे यहोवाच्या स्तरांप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात त्यांना तो आशीर्वाद देतो. त्याने असं वचन दिलंय: “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.” (स्तो. ३७:२९) संपूर्ण जगात जेव्हा लोक यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागतील तेव्हा लोकांमध्ये किती ऐक्य असेल आणि किती शांतीचं आणि आनंदाचं वातावरण असेल याची कल्पना करा! तुम्ही असं आनंदी जीवन जगावं अशी यहोवाची इच्छा आहे. खरंच, आपल्यापैकी प्रत्येकाने नीतिमत्त्वावर प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे! पण आपण हे प्रेम कसं वाढवू शकतो? यासाठी आपण कोणती तीन पावलं उचलू शकतो ते आता पाहू या.

यहोवाच्या स्तरांवर असलेलं प्रेम वाढवत राहा

९. यहोवाच्या स्तरांवर प्रेम करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

पहिलं पाऊल: यहोवावर प्रेम करा. नीतिमत्त्वावर म्हणजेच यहोवाच्या स्तरांवर आपलं प्रेम वाढवायचं असेल, तर ज्याने हे स्तर घालून दिलेत त्या यहोवा देवावर आपण आपलं प्रेम वाढवलं पाहिजे. आपण जितकं जास्त यहोवावर प्रेम करू तितकीच आपल्याला त्याच्या नीतिमान स्तरांनुसार वागायची इच्छा होईल. आदाम आणि हव्वाचाच विचार करा. यहोवाने त्यांना एक आज्ञा दिली होती आणि ती योग्यच होती. जर त्यांचं यहोवावर प्रेम असतं तर त्यांनी ती आज्ञा मोडली नसती.​—उत्प. ३:१-६, १६-१९.

१०. यहोवाचे विचार समजून घेण्यासाठी अब्राहामने काय केलं?

१० आदाम आणि हव्वाने जी चूक केली ती चूक करायची आपली मुळीच इच्छा नाही. आणि जर आपल्याला ती चूक करायचं टाळायचं असेल तर आपण यहोवाबद्दल शिकत राहिलं पाहिजे, त्याच्या गुणांची कदर केली पाहिजे आणि त्याचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यामुळे यहोवावर असलेलं आपलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल. अब्राहामचंच उदाहरण घ्या. त्याचं यहोवावर मनापासून प्रेम होतं. यहोवाचे निर्णय समजून घ्यायला कठीण गेलं तेव्हासुद्धा तो यहोवाच्या विरोधात गेला नाही. उलट त्याने यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, अब्राहामच्या काळात यहोवाने सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश करायचं ठरवलं. जेव्हा अब्राहामला हे कळलं तेव्हा “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” दुष्टांसोबत नीतिमान लोकांचाही नाश करेल का, अशी भीती त्याला सुरुवातीला वाटली. यहोवा असं करू शकतो ही गोष्ट अब्राहामला पटत नव्हती. म्हणून त्याने नम्रपणे यहोवाला एकापाठोपाठ एक असे बरेच प्रश्‍न विचारले. आणि यहोवाने धीराने त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं दिली. शेवटी अब्राहामला याची जाणीव झाली, की यहोवा प्रत्येक माणसाचं हृदय पारखतो आणि तो दुष्टांसोबत निर्दोष लोकांना कधीही शिक्षा देत नाही.​—उत्प. १८:२०-३२.

११. अब्राहामने यहोवावर प्रेम असल्याचं आणि त्याच्यावर भरवसा असल्याचं कसं दाखवलं?

११ सदोम आणि गमोरा या शहरांबद्दल अब्राहाम यहोवाशी जे बोलला, त्याचा त्याच्या मनावर खूप खोल प्रभाव पडला. यहोवाबद्दल त्याच्या मनात असलेलं प्रेम आणि आदर नक्कीच खूप वाढला असेल. पण काही वर्षांनंतर अब्राहामला एका अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, जेव्हा यहोवावर भरवसा ठेवणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. यहोवाने त्याला त्याच्या लाडक्या मुलाचं, इसहाकचं बलिदान द्यायची आज्ञा दिली. ही आज्ञा खूप कठीण होती. पण आता तो यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. आणि म्हणून या वेळी त्याने कोणतेही प्रश्‍न विचारले नाहीत. उलट यहोवाने जे सांगितलं होतं ते करायच्या तो तयारीला लागला. पण विचार करा, आपल्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान द्यायची तयारी करत असताना त्याला कसं वाटलं असेल! यहोवाबद्दल तो जे काही शिकला होता त्यावर त्याने नक्कीच खूप खोलवर विचार केला असेल. यहोवा कधीच अन्यायीपणे किंवा क्रूरपणे वागणार नाही हे त्याला माहीत होतं. यहोवाने त्याला वचन दिलं होतं, की इसहाकद्वारे एक राष्ट्र निर्माण होईल. पण अजूनपर्यंत इसहाकला मुलं झाली नव्हती. म्हणून, प्रेषित पौल सांगतो त्याप्रमाणे, अब्राहामने असा तर्क केला की यहोवा त्याच्या लाडक्या मुलाला, इसहाकला पुन्हा जिवंत करायला समर्थ आहे. (इब्री ११:१७-१९) अब्राहामचा यहोवावर पूर्ण भरवसा होता आणि त्याला याची खातरी होती की यहोवा योग्य तेच करेल. आणि म्हणून यहोवाने दिलेली आज्ञा खूप कठीण असूनही अब्राहामने त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे केलं.​—उत्प. २२:१-१२.

१२. आपण अब्राहामचं अनुकरण कसं करू शकतो? (स्तोत्र ७३:२८)

१२ आपण अब्राहामचं अनुकरण कसं करू शकतो? त्याच्याप्रमाणे आपणसुद्धा यहोवाचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यामुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ आणि त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढेल. (स्तोत्र ७३:२८ वाचा.) आणि देवाच्या विचारसरणीप्रमाणे निर्णय घ्यायला आपला विवेक प्रशिक्षित होईल. (इब्री ५:१४) आणि वाईट गोष्ट करायच्या मोहाला आपण बळी पडणार नाही. आपल्या स्वर्गीय पित्याचं मन दुखावेल आणि त्याच्यासोबतचं आपलं नातं धोक्यात येईल अशी कोणतीही गोष्ट करायचा आपण विचारही करणार नाही. मग यहोवाच्या नीतिमान स्तरांवर आपलं प्रेम आहे, हे आपण आणखी कसं दाखवू शकतो?

१३. नीतीने वागायचा आपण कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो? (नीतिवचनं १५:९)

१३ दुसरं पाऊल: नीतिमत्त्वावर तुमचं प्रेम वाढवायचा दररोज प्रयत्न करा. आपल्याला जर आपलं शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. तसंच यहोवाच्या नीतिमान स्तरांवर आपलं प्रेम वाढवायला आपल्याला दररोज प्रयत्न करावे लागतील. आणि हे आपल्यासाठी अवघड नाही. आपण जे करू शकतो त्यापेक्षा जास्त करण्याची यहोवा कधीच आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (स्तो. १०३:१४) तो आपल्याला याची खातरी देतो, की “जो नीतीने वागण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर तो प्रेम करतो.” (नीतिवचनं १५:९ वाचा.) यहोवाच्या सेवेत जेव्हा आपण एखादं ध्येय ठेवतो तेव्हा ते पूर्ण करायचा प्रयत्न आपण करत राहतो. नीतीने वागायचा प्रयत्न करण्याच्या बाबतीतही तेच खरंय. आणि जेव्हा आपण प्रयत्न करत राहतो तेव्हा प्रगती करत राहायला यहोवा आपल्याला नक्की मदत करेल.​—स्तो. ८४:५, ७.

१४. “नीतिमत्त्वाचं कवच” काय आहे आणि आपल्याला त्याची का गरज आहे?

१४ यहोवा प्रेमळपणे आपल्याला आठवण करून देतो, की त्याचे नीतिमान स्तर आपल्यासाठी ओझ्यासारखे नाहीत. (१ योहा. ५:३) उलट ते आपलं संरक्षण करतात आणि या संरक्षणाची आपल्याला दररोज गरज आहे. प्रेषित पौलने सांगितलेल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचा विचार करा. (इफिस. ६:१४-१८) या शस्त्रसामग्रीतल्या कोणत्या गोष्टीमुळे एका सैनिकाच्या हृदयाचं संरक्षण व्हायचं? ‘नीतिमत्त्वाच्या कवचामुळे.’ आणि हे कवच यहोवाच्या नीतिमान स्तरांना सूचित करतं. कवच घातल्यामुळे जसं सैनिकाच्या हृदयाचं संरक्षण व्हायचं त्याचप्रमाणे यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार चालल्यामुळे आपल्या लाक्षणिक हृदयाचं संरक्षण होतं, ज्यामध्ये आपल्या इच्छा, विचार आणि भावनासुद्धा येतात. म्हणून आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत नीतिमत्त्वाचं कवच असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.​—नीति. ४:२३.

१५. नीतिमत्त्वाचं कवच आपण कसं घालू शकतो?

१५ नीतिमत्त्वाचं कवच आपण कसं घालू शकतो? यासाठी दररोजच्या जीवनात लहान-मोठे निर्णय घेताना आपण देवाच्या स्तरांना लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्या विषयावर बोलावं किंवा बोलू नये, कोणतं संगीत ऐकावं, कोणते व्हिडिओ किंवा चित्रपट पाहावेत आणि कोणती पुस्तकं वाचावीत, हे ठरवताना तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘याचा माझ्या विचारांवर काय परिणाम होईल? यहोवाला हे आवडेल का? यामधून यहोवाच्या नजरेत चुकीच्या असणाऱ्‍या गोष्टींना प्रोत्साहन मिळतं का, जसं की अनैतिकता, हिंसा आणि स्वार्थीपणा?’ (फिलिप्पै. ४:८) जर तुम्ही यहोवाच्या इच्छेनुसार निर्णय घेतले, तर त्याच्या नीतिमान स्तरांमुळे तुमच्या हृदयाचं संरक्षण होईल.

तुमचं नीतिमत्त्व “समुद्राच्या लाटांसारखं” होऊ शकतं (परिच्छेद १६-१७ पाहा)

१६-१७. यहोवाच्या स्तरांप्रमाणे आपण कायम चालत राहू शकतो हे यशया ४८:१८ या वचनावरून कसं कळतं?

१६ आपल्याला दररोज, वर्षानुवर्षं यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे जगायला जमेल का, अशी चिंता तुम्हाला कधी वाटली आहे? याबाबतीत यहोवाने यशया ४८:१८ (वाचा.) यामध्ये जे उदाहरण वापरलंय, त्याचा विचार करा. तिथे यहोवा असं म्हणतो, की आपलं नीतिमत्त्व “समुद्राच्या लाटांसारखं” असू शकतं. तुम्ही एका अफाट समुद्राच्या किनाऱ्‍यावर उभे आहात आणि सतत एका मागून एक येणाऱ्‍या लाटांकडे तुम्ही पाहत आहात अशी कल्पना करा. त्या शांत समुद्राकडे पाहताना तुम्हाला कधी अशी चिंता वाटेल का, की एक दिवशी त्या लाटा अचानक किनाऱ्‍याकडे यायच्या थांबतील? नक्कीच नाही! कारण तुम्हाला माहीत आहे की हजारो वर्षांपासून या लाटा किनाऱ्‍याला येऊन थडकत आहेत आणि पुढेही येतच राहतील.

१७ तुमचं नीतिमत्त्वसुद्धा समुद्राच्या त्या लाटांसारखं असू शकतं. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जेव्हाही तुम्हाला एखादा निर्णय घायचा असतो तेव्हा स्वतःला विचारा, ‘मी काय करावं असं यहोवाला वाटतं?’ आणि मग त्याप्रमाणे करा. ते करणं कितीही कठीण असलं तरी मागे हटू नका. कारण तुमचा प्रेमळ पिता नेहमी तुमच्यासोबत असेल आणि तो तुम्हाला मदत करेल. तो तुम्हाला नेहमी त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे वागत राहायला मदत करेल.​—यश. ४०:२९-३१.

१८. स्वतःच्या स्तरांप्रमाणे आपण इतरांचा न्याय का करू नये?

१८ तिसरं पाऊल: न्याय करायचं यहोवावर सोपवून द्या. आपण यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. पण हे करत असताना आपण इतरांचा न्याय करू नये आणि स्वतःला इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजू नये. इतरांना कमी लेखण्याऐवजी आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवा “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” आहे. (उत्प. १८:२५) आपल्याला कोणाचा न्याय करायचा अधिकार नाही, कारण यहोवाने तो अधिकार आपल्याला दिलेला नाही. उलट येशूने आपल्याला अशी आज्ञा दिली: “तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या.”​—मत्त. ७:१. *

१९. यहोवा न्याय करेल या गोष्टीवर योसेफचा भरवसा होता हे त्याने कसं दाखवून दिलं?

१९ आता पुन्हा एकदा यहोवाचा नीतिमान सेवक योसेफ याचा विचार करा. जे त्याच्याशी अगदी वाईट वागले होते त्यांचाही न्याय त्याने स्वतः केला नाही. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याच्यावर खूप अत्याचार केला होता. त्याला दास म्हणून विकलं होतं, आणि तो मेलाय असं त्याच्या वडिलांना सांगितलं होतं. बऱ्‍याच वर्षांनंतर योसेफची त्याच्या भावांसोबत पुन्हा भेट झाली. योसेफ आता एक मोठा अधिकारी बनला होता. आणि त्यामुळे आपल्या भावांना शिक्षा देऊन तो त्यांचा बदला घेऊ शकत होता. पण त्याच्या भावांना त्यांनी केलेल्या गोष्टीचा पश्‍चात्ताप झाला होता. असं असलं तरी योसेफ आपला बदला घेईल असं त्यांना वाटत होतं. पण योसेफने त्यांना असं म्हणून धीर दिला: “घाबरू नका. मी काय देव आहे?” (उत्प. ३७:१८-२०, २७, २८, ३१-३५; ५०:१५-२१) योसेफने हे नम्रपणे ओळखलं की त्याच्या भावांचा न्याय करायचा अधिकार फक्‍त यहोवाला आहे.

२०-२१. स्वतःला इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजायचं आपण कसं टाळू शकतो?

२० योसेफसारखं आपणसुद्धा न्याय करायचं यहोवावर सोपवून दिलं पाहिजे. भाऊबहिणींनी केलेल्या एखाद्या गोष्टीमागे त्यांचा काय हेतू होता याबद्दल आपण कोणताही निष्कर्ष काढू नये. कारण आपण त्यांचं मन पाहू शकत नाही. फक्‍त ‘यहोवा हेतूंचं परीक्षण करू शकतो.’ (नीति. १६:२) वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या आणि संस्कृतीच्या लोकांवर त्याचं प्रेम आहे आणि आपणही आपली “मनं मोठी” करावीत असं त्याला वाटतं. (२ करिंथ. ६:१३) आपण आपल्या भाऊबहिणींचा न्याय करण्याऐवजी सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे.

२१ जे मंडळीचा भाग नाहीत अशा लोकांचासुद्धा न्याय करायचा अधिकार आपल्याला नाही. (१ तीम. २:३, ४) सत्यात नसलेल्या एखाद्या नातेवाईकाबद्दल, ‘तो कधीच सत्यात येणार नाही’ असं म्हणणं योग्य राहील का? नाही. असं म्हणणं त्याचा न्याय केल्यासारखं होईल. यावरून आपण गर्विष्ठ आहोत आणि स्वतःला इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजतो, असं दिसून येईल. आज यहोवा “सगळ्या लोकांना” पश्‍चात्ताप करायची संधी देतोय. (प्रे. कार्यं १७:३०) लक्षात ठेवा, जो स्वतःला इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजतो तो एका अर्थाने अनीतिमानच असतो.

२२. यहोवाच्या नीतिमान स्तरांवर प्रेम करत राहायचा निर्धार तुम्ही का केला आहे?

२२ यहोवाच्या नीतिमान स्तरांवर प्रेम केल्यामुळे आपलं जीवन आनंदी होईल. तसंच लोक आपल्यावर प्रेम करतील आणि त्यांना यहोवाच्या जवळ यायलाही मदत होईल. तर मग आपण आपल्या मनात “नीतिमत्त्वाची तहान आणि भूक” नेहमी वाढवत राहू या. (मत्त. ५:६) आपल्या सगळ्या प्रयत्नांवर यहोवा लक्ष देतो आणि आपण प्रगती करत आहोत हे पाहून त्याला आनंद होतो. या जगाचे स्तर दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. आणि हे जग यहोवाच्या नीतिमान स्तरांपासून आणखीनच दूर जात आहे. पण निराश होऊ नका! तर नेहमी लक्षात ठेवा, की “यहोवा नीतिमानांवर प्रेम करतो.”​—स्तो. १४६:८.

गीत ५५ चिरकालाचे जीवन!

^ आज सैतानाच्या या दुष्ट जगात नीतिमान लोक शोधायचं खूप अवघड आहे. तरीपण आज लाखो लोक नीतीच्या मार्गाने चालायचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच तुम्हीही त्यांच्यापैकी एक असाल. तुम्ही या मार्गावर चालत आहात कारण तुमचं यहोवावर प्रेम आहे आणि यहोवाचं नीतिमत्त्वावर प्रेम आहे. मग नीतिमत्त्वाच्या या सुंदर गुणावर आपण आपलं प्रेम कसं वाढवू शकतो? या लेखात आपण पाहणार आहोत की नीतिमत्त्वं म्हणजे काय आणि या गुणावर प्रेम केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? तसंच नीतिमत्त्वावर प्रेम करण्यासाठी आपण कोणती तीन पावलं उचलू शकतो तेही आपण या लेखात पाहणार आहोत.

^ कधीकधी मंडळीतल्या वडिलांना गंभीर पाप आणि पश्‍चात्ताप यासंबंधी काही गोष्टींचा न्याय करावा लागतो. (१ करिंथ. ५:११; ६:५; याको. ५:१४, १५) पण ते नम्रपणे लक्षात ठेवतात, की ते कोणाचं मन पाहू शकत नाही आणि ते यहोवाच्या वतीने न्याय करत आहेत. (२ इतिहास १९:६ सोबत तुलना करा.) उलट या गोष्टी हाताळताना ते देवाचे स्तर लक्षात घेऊन समजूतदारपणे आणि दयाळूपणे न्याय करायचा प्रयत्न करतात.