अभ्यास लेख ३३
यहोवाची त्याच्या लोकांवर नेहमी नजर असते
“यहोवाचं भय मानणाऱ्यांवर . . . त्याची नजर असते.”—स्तो. ३३:१८.
गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”
सारांश *
१. आपल्या अनुयायांना सांभाळावं अशी येशूने यहोवाला विनंती का केली?
आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला एक खास विनंती केली. आपल्या अनुयायांना यहोवाने सांभाळावं अशी विनंती त्याने केली. (योहा. १७:१५, २०) येशूला हे माहीत होतं, की यहोवा नेहमीच आपल्या लोकांना सांभाळतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांचं संरक्षण करतो. पण त्याला हेही माहीत होतं, की येणाऱ्या दिवसांत त्याच्या अनुयायांना सैतानाकडून खूप मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागेल. सैतानाच्या या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी त्यांना यहोवाच्या मदतीची गरज असेल याची येशूला जाणीव होती.
२. आपल्यावर येणाऱ्या संकटांना आपल्याला घाबरण्याची गरज का नाही? (स्तोत्र ३३:१८-२०)
२ सैतानाच्या जगात राहणं आज खऱ्या ख्रिश्चनांसाठी सोपं नाही. कारण आपल्याला अशा वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपण निराश होतो. तसंच, यहोवाला एकनिष्ठ राहणंसुद्धा आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण या लेखात आपण पाहणार आहोत, की आपल्याला अशा संकटांना घाबरण्याची काही गरज नाही. कारण आपल्याला सांभाळण्यासाठी यहोवाची आपल्यावर नजर आहे. आपण कोणत्या कठीण परिस्थितींतून जात आहोत हे त्याला माहीत आहे. आणि त्यांचा सामना करण्यासाठी तो आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो. आता आपण बायबलमधल्या अशा दोन उदाहरणांवर लक्ष देऊ, ज्यांवरून आपल्याला कळतं की “यहोवाचं भय मानणाऱ्यांवर . . . त्याची नजर असते.”—स्तोत्र ३३:१८-२० वाचा.
आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटतं तेव्हा . . .
३. आपल्याला कोणकोणत्या कारणांमुळे एकटं पडल्यासारखं वाटू शकतं?
३ मंडळीत बरेच भाऊबहीण असूनसुद्धा कधीकधी आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटू शकतं. उदाहरणार्थ, तरुण भाऊबहिणींना जेव्हा वर्गसोबत्यांसमोर आपल्या विश्वासाबद्दल बोलावं लागतं किंवा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे नवीन मंडळीत जावं लागतं, तेव्हा कदाचित त्यांना एकटं पडल्यासारखं वाटू शकतं. आपल्यापैकी काही जणांना निराशेच्या भावना सतावत असतील. आणि या भावनांचा आपल्याला एकट्याने सामना करावा लागेल असं कदाचित वाटू शकतं. कोणालाच आपल्या भावना समजणार नाहीत असा विचार करून कदाचित आपण दुसऱ्यांशी त्याबद्दल बोलत नसू. आणि कधीकधी तर आपल्याला असं वाटेल, की कोणालाच आपली काळजी नाही. आपल्याला जेव्हा एकटं पडल्यासारखं वाटतं, मग त्याचं कोणतंही कारण असो, तेव्हा मदत करणारं कोणीच नाही असा आपण विचार करतो आणि चिंतेत बुडून जातो. पण आपल्याला असं वाटावं अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. आपण असं का म्हणू शकतो?
४. “मी एकटाच उरलोय” असं एलीया का म्हणाला?
४ देवाचा विश्वासू सेवक एलीया याच्यासोबत काय घडलं याचा विचार करा. ईजबेलने त्याला ठार मारायची शपथ घेतली होती आणि म्हणून तो ४० दिवसांपासून आपला जीव मुठीत घेऊन पळत होता. (१ राजे १९:१-९) शेवटी तो एका गुहेत जाऊन लपला आणि यहोवाला कळकळून म्हणाला, “मी एकटाच [संदेष्टा] उरलोय.” (१ राजे १९:१०) पण खरं पाहिलं तर देशात इतरही संदेष्टे होते. ओबद्याने १०० संदेष्ट्यांना ईजबेलच्या हातून वाचवलं होतं. (१ राजे १८:७, १३) मग तरीसुद्धा एलीयाला एकटं पडल्यासारखं का वाटत होतं? ओबद्याने वाचवलेल्या संदेष्ट्यांना आता मारून टाकण्यात आलं असेल असं त्याला वाटत होतं का? की मग, कर्मेल डोंगरावर यहोवा हा खरा देव आहे हे सिद्ध झाल्यावरही कोणी त्याच्यासोबत यहोवाची उपासना करायला तयार झालं नाही, म्हणून त्याला एकटं वाटत असेल? किंवा आपला जीव किती धोक्यात आहे या गोष्टीची कोणालाच जाणीव नाही आणि कोणालाही आपली काळजी नाही असं कदाचित त्याला वाटलं असेल का? एलीयाला नेमकं कसं वाटत होतं याबद्दल त्या अहवालात काही सांगितलेलं नाही. पण एलीयाला नेमकं कसं वाटत होतं हे यहोवा समजू शकत होता आणि त्याला नेमकी कशी मदत करायची आहे हेही त्याला माहीत होतं.
५. एलीयाला एकटं वाटत होतं तेव्हा यहोवाने त्याला कसा धीर दिला?
५ यहोवाने एलीयाला मदत करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. त्याने एलीयाला आपलं मन मोकळं करायचं प्रोत्साहन दिलं. यासाठी दोनदा त्याने त्याला विचारलं, “एलीया, तू इथे काय करतोस?” (१ राजे १९:९, १३) आणि जेव्हा एलीया बोलू लागला तेव्हा यहोवाने त्याचं लक्ष देऊन ऐकलं. त्यानंतर यहोवाने चमत्कार करून एलीयाला दाखवलं की तो त्याच्यासोबत आहे आणि तो खूप शक्तिशाली आहे. तसंच त्याने एलीयाला सांगितलं, की इस्राएलमध्ये अजूनही शुद्ध उपासना करणारे बरेच जण आहेत. आणि अशा प्रकारे त्याला धीर दिला. (१ राजे १९:११, १२, १८) नक्कीच, यहोवासमोर आपलं मन मोकळं केल्यावर आणि यहोवाचं उत्तर ऐकल्यावर एलीयाला खूप बरं वाटलं असेल. त्यानंतर यहोवाने त्याला बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्याने हजाएलला सीरियाचा राजा, येहूला इस्राएलचा राजा आणि अलीशाला संदेष्टा म्हणून नियुक्त करायला त्याला सांगितलं. (१ राजे १९:१५, १६) या सगळ्या जबाबदाऱ्या देऊन यहोवाने एलीयाला चांगल्या गोष्टींकडे लक्ष लावायला मदत केली. आणि त्याच्यासोबत काम करण्यासाठी यहोवाने त्याला अलीशा हा एक चांगला साथीदारही दिला. तुम्हालाही जेव्हा एकटं पडल्यासारखं वाटतं तेव्हा यहोवा नक्कीच तुम्हालाही मदत करेल. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
६. तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही यहोवाला कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकता? (स्तोत्र ६२:८)
६ आपण यहोवाला प्रार्थना करावी असं तो आपल्याला प्रोत्साहन देतो. आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत हे तो पाहतो. आणि आपण कोणत्याही वेळेला त्याला प्रार्थना केली तरी तो आपलं ऐकेल अशी तो आपल्याला खातरी देतो. (१ थेस्सलनी. ५:१७) आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकून त्याला आनंद होतो. (नीति. १५:८) तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही यहोवाला कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकता? एलीयाप्रमाणेच यहोवासमोर आपलं मन मोकळं करा. (स्तोत्र ६२:८ वाचा.) तुम्हाला कशाबद्दल काळजी वाटते आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतं ते त्याला सांगा. या भावनांवर मात करता यावी म्हणून काय करता येईल हे समजावं म्हणून त्याच्याकडे मदत मागा. उदाहरणार्थ, तुम्हाला शाळेत आपल्या विश्वासाबद्दल बोलताना एकटं पडल्यासारखं वाटत असेल, किंवा भीती वाटत असेल, तर स्पष्टपणे बोलण्यासाठी यहोवाने तुम्हाला धैर्य द्यावं अशी त्याला विनंती करा. तसंच, इतरांच्या भावना न दुखावता तुम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही त्याच्याकडे बुद्धीसुद्धा मागू शकता. (लूक २१:१४, १५) जर तुम्हाला निराशेच्या भावना सतावत असतील तर एखाद्या प्रौढ ख्रिस्ती भावाशी किंवा बहिणीशी त्याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही यहोवाकडे मदत मागू शकता. तुम्ही ज्याच्याशी बोलणार आहात त्याने तुमचं चांगल्या प्रकारे ऐकून घ्यावं आणि तुम्हाला समजून घ्यावं म्हणून तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता. आपल्या सगळ्या भावना मोकळेपणाने यहोवाला सांगा. आणि तो तुमच्या प्रार्थनेचं कसं उत्तर देतो ते पाहा. तसंच इतरांकडून मदत घ्यायला तयार असा. जर तुम्ही असं केलं, तर तुम्हाला एकटेपणाच्या भावनांवर मात करता येईल.
७. मॉरिसच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
७ यहोवाने आपल्या सगळ्यांनाच महत्त्वाचं काम सोपवलंय. आपण जेव्हा मंडळीतल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि सेवाकार्य करण्यासाठी मेहनत घेतो, तेव्हा यहोवा त्याकडे लक्ष देतो आणि त्याची कदर करतो अशी खातरी आपण बाळगू शकतो. (स्तो. ११०:३) यहोवाने दिलेल्या कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे एकटेपणाच्या भावनेवर मात करायला आपल्याला कशी मदत होऊ शकते? मॉरिस * नावाच्या एका तरुण भावाच्या उदाहरणाचा विचार करा. मॉरिसचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही काळातच त्याचा एक जवळचा मित्र सत्यात मागे पडला आणि त्याने शेवटी सत्य सोडून दिलं. मॉरिस म्हणतो, “तो यहोवापासून कसा दूर जातोय हे पाहून माझाही आत्मविश्वास खचला. मी यहोवाला दिलेलं वचन पूर्ण करू शकेन की नाही, आणि त्याच्या संघटनेत टिकून राहू शकेन की नाही अशी भीती मला वाटू लागली. मला एकटं वाटायला लागलं आणि असं वाटायचं की कोणीही मला समजू शकणार नाही.” मग मॉरिसला कशामुळे मदत झाली? तो म्हणतो की “मी सेवाकार्यात जास्त सहभाग घेऊ लागलो. आधी मी स्वतःचाच विचार करायचो आणि माझ्या नकारात्मक भावनांकडेच जास्त लक्ष द्यायचो. पण प्रचारात जास्त सहभाग घेतल्यामुळे मी जास्त आनंदी राहू लागलो. आणि इतरांसोबत काम केल्यामुळे माझा एकटेपणा कमी झाला.” जरी आपण आपल्या भाऊबहिणींसोबत प्रत्यक्ष भेटून प्रचारकार्य करू शकत नसलो, तरी जेव्हा आपण त्यांच्यासोबत मिळून पत्राद्वारे किंवा टेलिफोनद्वारे प्रचारकार्य करतो, तेव्हा आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं. मॉरिसला आणखी कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? तो म्हणतो, की “मी मंडळीच्या कामातसुद्धा जास्त सहभाग घेऊ लागलो. तसंच मला मिळणाऱ्या विद्यार्थी भागांची मी जास्त चांगली तयारी करू लागलो. आणि ते आणखी चांगल्या प्रकारे सादर करायचा मी प्रयत्न करू लागलो. त्यामुळे यहोवाला आणि माझ्या भाऊबहिणींना माझी कदर आहे या गोष्टीची मला जाणीव झाली.”
कठीण परीक्षांमुळे आपण निराश होतो तेव्हा . . .
८. कठीण परीक्षा येतात तेव्हा आपल्याला कसं वाटू शकतं?
८ या शेवटच्या काळात आपल्या सर्वांनाच कठीण परीक्षांचा सामना करावा लागेल हे आपल्याला माहीत आहे. (२ तीम. ३:१) पण कधीकधी अचानक आपल्या जीवनात कठीण परीक्षा येतात तेव्हा आपण गोंधळून जाऊ शकतो. जसं की, अचानक आपल्यावर आर्थिक संकट येऊ शकतं, आपल्याला एखादा गंभीर आजार होऊ शकतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा वेळी आपण अगदी खचून जातो आणि काय करावं हे आपल्याला सुचत नाही. खासकरून जेव्हा एकापाठोपाठ एक समस्या येतात किंवा सगळ्याच समस्या एकदम येतात तेव्हा आपल्याला असं वाटू शकतं. पण अशा परिस्थितीतही यहोवाची नजर आपल्यावर आहे हे कधीही विसरू नका. त्याच्या मदतीने आपण कोणत्याही समस्येचा धैर्याने सामना करू शकतो.
९. ईयोबवर कोणकोणती संकटं आली?
९ यहोवाने त्याचा विश्वासू सेवक ईयोब याला कशी मदत केली याचा विचार करा. त्याच्यावर एकापाठोपाठ एक खूप कठीण समस्या आल्या. एकाच दिवशी घडलेल्या भयानक दुर्घटनांमध्ये त्याची गुरंढोरं गेली. त्याच्या सेवकांना ठार मारण्यात आलं आणि इतकंच काय तर त्याने त्याच्या मुलामुलींनाही गमावलं. (ईयो. १:१३-१९) या दुःखातून तो अजून सावरलाही नव्हता इतक्यातच त्याला एक वेदनादायक आणि किळसवाणा आजार झाला. (ईयो. २:७) त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की तो म्हणाला, “मला माझ्या जीवनाचा वीट आलाय; मला आता आणखी जगायचं नाही.”—ईयो. ७:१६.
१०. यहोवाने ईयोबला त्याच्या परीक्षांचा सामना करायला कशी मदत केली? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)
१० यहोवाचं ईयोबवर लक्ष होतं. ईयोबवर प्रेम असल्यामुळे यहोवाने त्याला त्याच्या सगळ्या परीक्षांचा धीराने सामना करायला मदत केली. यहोवा ईयोबशी बोलला तेव्हा त्याने त्याला याची आठवण करून दिली, की त्याच्याकडे अमर्याद बुद्धी आहे आणि त्याचं आपल्या सर्व सृष्टीवर खूप प्रेम आहे. त्याने ईयोबला बऱ्याच विस्मयकारक आणि आश्चर्यचकित करणाऱ्या प्राण्यांबद्दल सांगितलं. (ईयो. ३८:१, २; ३९:९, १३, १९, २७; ४०:१५; ४१:१, २) तसंच यहोवाने आपला विश्वासू सेवक अलीहू याचा वापर करून ईयोबला धीर आणि सांत्वन दिलं. अलीहूने ईयोबला याची आठवण करून दिली, की यहोवाचे सेवक जेव्हा परीक्षांचा धीराने सामना करतात तेव्हा तो त्यांना आशीर्वाद देतो. पण त्यासोबतच यहोवाने अलीहूद्वारे ईयोबचा चुकीचा दृष्टिकोनही प्रेमळपणे सुधारला. अलीहूने ईयोबला याची आठवण करून दिली की या संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता यहोवा याच्या तुलनेत ईयोब खूप लहान आहे. यामुळे ईयोबला त्याच्या समस्यांच्या पलीकडे पाहायला मदत झाली. (ईयो. ३७:१४) तसंच यहोवाने ईयोबला त्याच्या तीन साथीदारांसाठी प्रार्थना करायलाही सांगितलं कारण त्यांनी पाप केलं होतं. (ईयो. ४२:८-१०) आज आपल्याला कठीण परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा यहोवा आपल्याला कशी मदत करतो?
११. परीक्षांचा सामना करत असताना आपल्याला बायबलमधून सांत्वन कसं मिळू शकतं?
११ यहोवा ईयोबशी प्रत्यक्ष बोलला तसं तो आज आपल्याशी बोलत नाही. पण तो आज त्याच्या वचनाद्वारे म्हणजे बायबलद्वारे आपल्याशी बोलतो. (रोम. १५:४) त्याने आपल्याला भविष्यासाठी एक आशा दिली आहे आणि त्या आशेमुळे आपल्याला खूप सांत्वन मिळतं. कठीण परीक्षांचा सामना करत असताना बायबलमधल्या काही वचनांतून आपल्याला कसं सांत्वन मिळतं याचा विचार करा. उदाहरणार्थ, यहोवा आपल्याला अशी खातरी देतो, की कोणतीही गोष्ट म्हणजे कठीण परीक्षासुद्धा आपल्याला त्याच्या ‘प्रेमापासून वेगळं करू शकत नाही.’ (रोम. ८:३८, ३९) तसंच तो आपल्याला असंही आश्वासन देतो, की “त्याला हाक मारणाऱ्या सर्वांच्या तो जवळ आहे.” (स्तो. ) यहोवा आपल्याला सांगतो, की आपण जर त्याच्यावर भरवसा ठेवला तर आपण कोणत्याही परीक्षेचा धीराने सामना करू शकतो. आणि कठीण परीक्षांचा सामना करत असतानाही आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो. ( १४५:१८१ करिंथ. १०:१३; याको. १:२, १२) बायबल आपल्याला याचीही आठवण करून देतं, की पुढे जे कायमचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत त्याच्या तुलनेत आजच्या समस्या तात्पुरत्या आणि काही काळासाठी आहेत. (२ करिंथ. ४:१६-१८) यहोवाने आपल्याला वचन दिलंय, की आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण असलेल्या सैतानाचा आणि त्याला साथ देणाऱ्या सगळ्यांचा तो नाश करेल. (स्तो. ३७:१०) तुम्ही बायबलमधली अशी काही सांत्वन देणारी वचनं पाठ केली आहेत का, ज्यामुळे तुम्हाला पुढे येणाऱ्या परीक्षांचा धीराने सामना करायला मदत होईल?
१२. देवाच्या वचनातून आपल्याला फायदा व्हावा म्हणून आपण काय केलं पाहिजे?
१२ दररोज बायबल वाचण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला काढावा आणि त्यावर सखोल विचार करावा, अशी यहोवाची इच्छा आहे. बायबलमध्ये शिकलेल्या गोष्टींप्रमाणे आपण वागतो, तेव्हा आपला विश्वास मजबूत होत जातो आणि यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होत जातं. यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करायचं बळ मिळतं. तसंच जे देवाच्या वचनाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात, त्यांना तो आपली पवित्र शक्ती देतो. आणि ती शक्ती आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी “असाधारण सामर्थ्य” देते.—२ करिंथ. ४:७-१०.
१३. ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या आध्यात्मिक अन्नामुळे आपल्याला परीक्षांचा सामना करायला कशी मदत होते?
१३ यहोवाच्या मदतीने “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आपल्याला भरपूर गोष्टी पुरवतात. जसं की, लेख, व्हिडिओ आणि गीतं. या सगळ्या गोष्टींमुळे आपला विश्वास मजबूत होतो आणि आपण आध्यात्मिक रितीने जागरूक राहतो. (मत्त. २४:४५) योग्य वेळेवर पुरवल्या जाणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा आपण फायदा घेतला पाहिजे. अलिकडेच अमेरिकेत राहणाऱ्या एका बहिणीने, तिला आध्यात्मिक अन्नाबद्दल किती कदर वाटते याबद्दल सांगितलं. ती म्हणते: “मी ४० वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहे. माझ्या जीवनात अशा बऱ्याच कठीण समस्या आल्या ज्यामध्ये यहोवाला एकनिष्ठ राहणं माझ्यासाठी सोपं नव्हतं.” या बहिणीच्या जीवनात खूप कठीण प्रसंग आले. पिऊन गाडी चालवणाऱ्या एका ड्रायव्हरमुळे अपघात होऊन तिच्या आजोबांचा मृत्यू झाला. एका जीवघेण्या आजारामुळे तिचे आईवडीलही गेले. आणि तिला स्वतःलाही दोन वेळा कॅन्सर झाला. मग या सगळ्या परीक्षांचा तिने कसा सामना केला? ती सांगते: “आजपर्यंत यहोवाने नेहमीच माझी काळजी घेतली आहे. त्याने विश्वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे पुरवलेल्या आध्यात्मिक अन्नामुळे मला या परीक्षांना तोंड देणं शक्य झालं. मलासुद्धा अगदी ईयोबसारखंच वाटतं: ‘मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!’”—ईयोब २७:५.
१४. परीक्षांचा सामना करण्यासाठी यहोवा भाऊबहिणींद्वारे आपल्याला कशी मदत करतो? (१ थेस्सलनीकाकर ४:९)
१४ दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा एकमेकांवर प्रेम कसं दाखवायचं आणि एकमेकांचं सांत्वन कसं करायचं, हे यहोवाने त्याच्या लोकांना शिकवलं आहे. (२ करिंथ. १:३, ४; १ थेस्सलनीकाकर ४:९ वाचा.) आपल्यावर जेव्हा कठीण परीक्षा येतात तेव्हा अलीहूप्रमाणे आपले भाऊबहिणसुद्धा आपल्याला विश्वासात टिकून राहायला मदत करण्यासाठी आतुर असतात. (प्रे. कार्यं १४:२२) डायना नावाच्या एका बहिणीचा विचार करा. तिच्या पतीला जेव्हा एक गंभीर आजार झाला, तेव्हा मंडळीतल्या भाऊबहिणींनी तिला खूप दिलासा दिला आणि आध्यात्मिक रीत्या मजबूत राहायला मदत केली. ती म्हणते: “ते काही महिने माझ्यासाठी खूप कठीण होते. पण त्या काळातही यहोवाने आम्हाला प्रेमाने जवळ घेतलं आहे, असं आम्हाला जाणवलं. आमच्या मंडळीतले भाऊबहीण आम्हाला लगेच मदत करायला पुढे आले. ते आम्हाला भेटायला यायचे, फोन करायचे आणि खूप आपुलकी दाखवायचे. या सगळया गोष्टींमुळे आम्हाला त्या कठीण काळाचा सामना करायला खूप मदत झाली. मला गाडी चालवता येत नसल्यामुळे भाऊबहीण मला जेव्हाही शक्य व्हायचं तेव्हा सेवेला आणि प्रचारकार्याला आपल्या गाडीतून घेऊन जायचे.” खरंच यहोवाने आपल्याला किती प्रेमळ भाऊबहीण दिले आहेत!
यहोवा आपली प्रेमाने काळजी घेतो या गोष्टीची कदर करा
१५. आपल्याला परीक्षांचा सामना करता येईल अशी खातरी आपण का बाळगू शकतो?
१५ आपल्या सगळ्यांनाच कोणत्या-ना-कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागेल. पण या लेखात पाहिल्याप्रमाणे, परीक्षांचा सामना करताना आपण कधीच एकटं असणार नाही. कारण एका प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवाची नेहमी आपल्यावर नजर असते. तो नेहमी आपल्यासोबत असतो. आणि जेव्हा-जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा-तेव्हा त्या ऐकण्यासाठी आणि आपल्याला मदत करण्यासाठी तो आतुर असतो. (यश. ४३:२) आपल्याला खातरी आहे, की आपण येणाऱ्या समस्यांचा नक्कीच सामना करू शकतो. कारण त्या समस्यांचा सामना करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्या यहोवाने उदारपणे पुरवल्या आहेत. त्याने आपल्याला त्याला प्रार्थना करायचा बहुमान दिला आहे, बायबल, भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न, तसंच गरज असते तेव्हा मदत करण्यासाठी आपल्या भाऊबहिणींचं एक प्रेमळ कुटुंब दिलं आहे.
१६. यहोवाने नेहमी आपली काळजी घ्यावी म्हणून आपण काय करू शकतो?
१६ आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर लक्ष असतं याबद्दल आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत. कारण यामुळेच आपण सर्व प्रकारच्या परिस्थितीत आनंदी राहू शकतो. (स्तो. ३३:२१) यहोवा आपली प्रेमळपणे काळजी घेतो याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व तरतुदींचा फायदा घेऊन आपण ही कदर दाखवू शकतो. यहोवाने नेहमी आपली काळजी घ्यावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण त्याच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागत राहिलो आणि योग्य ते केलं, तर यहोवाची नजर नेहमी आपल्यावर राहील.—१ पेत्र ३:१२.
गीत ५१ यहोवाला जडून राहू!
^ आज आपल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. आणि त्यांवर मात करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. या लेखात आपल्याला या गोष्टीची खातरी मिळेल की यहोवाचं त्याच्या सेवकांकडे नेहमी लक्ष असतं. आपल्यापैकी प्रत्येकाला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे त्याला माहीत आहे. आणि त्यांवर मात करण्यासाठी लागणारी मदत तो आपल्याला पुरवतो.
^ काही नावं बदलण्यात आली आहेत.