व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३४

‘सत्याच्या मार्गावर चालत राहा’

‘सत्याच्या मार्गावर चालत राहा’

‘सत्याच्या मार्गावर चालत राहा.’​—३ योहान ४.

गीत २८ नवे गीत

सारांश *

१. आपण सत्यात कसे आलो, याबद्दल बोलल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

 “तुम्ही सत्यात कसं आला?” हा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच बऱ्‍याच भाऊबहिणींनी विचारला असेल. एखाद्या भावाची किंवा बहिणीची ओळख करून घेताना आपण सहसा त्यांना हा प्रश्‍न विचारतो. त्यांना सत्य कसं समजलं आणि ते यहोवाची सेवा कशी करू लागले हे जाणून घ्यायला आपल्याला आवडतं. आणि आपण सत्यात कसे आलो हे त्यांना सांगायलाही आपल्याला आवडतं. (रोम. १:११) जेव्हा-जेव्हा आपण भाऊबहिणींशी याबद्दल बोलतो तेव्हा-तेव्हा सत्य किती अनमोल आहे याची आपल्याला जाणीव होते. तसंच ‘सत्याच्या मार्गावर चालत राहायचा,’ म्हणजेच यहोवाचं मन आनंदित होईल आशा प्रकारे जीवन जगायचा आपला निर्धारही आणखी पक्का होतो.​—३ योहा. ४.

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

सत्य आपल्याला इतकं मौल्यवान का वाटतं याच्या काही कारणांवर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. तसंच या मौल्यवान देणगीबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण पुढेही कसं दाखवू शकतो यावरही आपण चर्चा करू या. यहोवाने आपल्याला सत्याकडे आकर्षित केलं आहे याबद्दल आपली कदर यामुळे नक्कीच वाढेल. (योहा. ६:४४) तसंच बायबलमधलं सत्य इतरांना सांगायची प्रेरणाही आपल्याला मिळेल.

सत्य आपल्यासाठी इतकं मौल्यवान का आहे?

३. सत्य आपल्यासाठी मौल्यवान असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे?

सत्य आपल्यासाठी मौल्यवान असण्याची बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, ज्याने आपल्याला हे सत्य दिलं आहे त्या यहोवा देवावर आपलं खूप प्रेम आहे. त्याच्या वचनातून म्हणजेच बायबलमधून आपल्याला कळलं आहे, की तो आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा सर्वशक्‍तिमान परमेश्‍वर आहे. पण यासोबतच आपल्याला हेही कळलं की तो आपली काळजी घेणारा एक प्रेमळ पितासुद्धा आहे. (१ पेत्र ५:७) आपल्याला माहीत आहे की यहोवा हा “दयाळू, करुणामय आणि सहनशील” देव आहे. तसंच तो “एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला” आहे. (निर्ग. ३४:६) यहोवा कधीच अन्याय करत नाही. (यश. ६१:८) आपल्याला दुःख सहन करावं लागतं तेव्हा त्यालाही दुःख होतं. त्याने ठरवलेल्या वेळी तो आपल्या सगळ्या दुःखांचा अंत करणार आहे. खरंतर, तो असं करायला उत्सुक आहे. (यिर्म. २९:११) आपण त्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहतोय! खरंच यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपलंही त्याच्यावर खूप प्रेम आहे.

बायबलचं सत्य . . . नांगरासारखं आहे

नांगरामुळे जहाज एका जागी स्थिर राहतं, तसंच आपल्या जीवनात कठीण परीक्षा येतात, तेव्हा बायबलमधल्या आशेमुळे आपला विश्‍वास डळमळत नाही. बायबलमधल्या सत्यामुळे आपल्याला भविष्याच्या आशेबद्दल इतरांना सांगायची प्रेरणासुद्धा मिळते (परिच्छेद ४-७ पाहा)

४-५. आपली आशा नांगरासारखी आहे असं प्रेषित पौलने का म्हटलं?

सत्य आपल्यासाठी मौल्यवान असण्याचं आणखी एक कारण कोणतं आहे? ते कारण म्हणजे, सत्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. याचं एक उदाहरण म्हणजे, बायबलमध्ये असलेल्या सत्यामुळे आपण हे शिकलो की देवाने भविष्यासाठी आपल्याला एक चांगली आशा दिली आहे. ही आशा किती महत्त्वाची आहे याबद्दल प्रेषित पौलने असं लिहिलं, “ही खातरीलायक आणि पक्की आशा आपल्या जिवासाठी एखाद्या नांगरासारखी आहे.” (इब्री ६:१९) जसं नांगरामुळे जहाज एका जागी स्थिर राहतं, तसंच आपल्या जीवनात जेव्हा कठीण परीक्षा येतात तेव्हा बायबलमधल्या आशेमुळे आपण स्थिर राहतो आणि आपला विश्‍वास डळमळत नाही.

या ठिकाणी पौल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असलेल्या स्वर्गातल्या जीवनाच्या आशेबद्दल बोलत होता. पण पृथ्वीवरच्या नंदनवन कायम जगण्याची आशा असलेल्या ख्रिश्‍चनांनाही त्याचे हे शब्द लागू होतात. (योहा. ३:१६) खरंच, कायमच्या जीवनाच्या आशेबद्दल शिकून घेतल्यामुळे आपल्या जीवनाला एक उद्देश मिळाला आहे.

६-७. भविष्याबद्दलचं सत्य शिकून घेतल्यामुळे ईवॉनला कसा फायदा झालाय?

ईवॉन नावाच्या एका बहिणीच्या अनुभवाचा विचार करा. ती साक्षीदार कुटुंबातून नव्हती आणि लहानपणी तिला मृत्यूची भीती वाटायची. एकदा तिने कुठेतरी वाचलं, की “असा एक दिवस येईल जेव्हा सगळं काही संपून जाईल.” ते शब्द तिच्या मनात घोळत राहिले. ती म्हणते, “कधीकधी रात्री मला ते शब्द आठवायचे आणि मग मला झोपच लागायची नाही. मी विचार करायचे की आपलं आयुष्य इतकं कमी का आहे? आपण का जगतो हे मला कळायचं नाही पण मला मरायचं नव्हतं!”

पुढे ईवॉन चौदा-पंधरा वर्षांची झाल्यावर तिची भेट यहोवाच्या साक्षीदारांशी झाली. ती सांगते, “मला कळलं की आपल्याला पृथ्वीवर एका नंदनवनात कायम जगायची आशा आहे. आणि माझा त्या गोष्टीवर विश्‍वास बसला.” मग सत्य शिकल्यामुळे आपल्या या बहिणीला कसा फायदा झालाय? ती पुढे म्हणते: “आता मला रात्री शांत झोप लागते. मला मृत्यूची भीती किंवा भविष्याची काळजी वाटत नाही.” खरंच, आज ईवॉनसाठी सत्य खूप मौल्यवान आहे. आणि भविष्याच्या आशेबद्दल इतरांना सांगायलाही तिला खूप आवडतं.​—१ तीम. ४:१६.

बायबलचं सत्य . . . खजिन्यासारखं आहे

आज आणि भविष्यात देवाच्या राज्यात कायम त्याची सेवा करायचा बहुमान, हा एका खजिन्यासारखा आहे. आणि त्यासाठी कोणताही त्याग करावा लागला तरी तो कमीच आहे (परिच्छेद ८-११ पाहा)

८-९. (क) येशूने दिलेल्या उदाहरणात एका माणसाला सापडलेला खजिना त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे हे त्याने कसं दाखवलं? (ख) तुमच्यासाठी सत्य किती मौल्यवान आहे?

बायबलमधून आपण देवाच्या राज्याबद्दलचं सत्यही शिकलो आहोत. येशूने या सत्याची तुलना लपवून ठेवलेल्या एका खजिन्याशी केली. मत्तय १३:४४ मध्ये आपण त्याबद्दल वाचतो. येशू म्हणाला, “स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या अशा खजिन्यासारखं आहे, जो एका माणसाला सापडला आणि त्याने तो लपवून ठेवला. त्याला इतका आनंद झाला, की त्याने जाऊन आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकलं आणि ते शेत विकत घेतलं.” इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की तो माणूस खजिना शोधत नव्हता. पण जेव्हा त्याला तो सापडला तेव्हा तो मिळवण्यासाठी त्याने आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकून टाकलं. त्याने असं का केलं? कारण त्या खजिन्याचं मोल त्याने ओळखलं होतं. आणि त्याला माहीत होतं की त्याला जे काही गमवावं लागलं त्याच्या कितीतरी जास्त पटींनी मौल्यवान तो खजिना होता.

तुम्हालाही सत्य तितकंच मौल्यवान वाटतं का? नक्कीच वाटत असेल! आज यहोवाच्या सेवेतून आपल्याला जो आनंद मिळतो, आणि भविष्यात त्याच्या राज्यात कायमचं जीवन जगायची जी आशा आपल्याला आहे, ती खरंच खूप मौल्यवान आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीची तुलना याच्याशी होऊ शकत नाही. यहोवासोबत एक जवळचं नातं असणं हा इतका मोठा बहुमान आहे, की त्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत. यहोवाचं मन आनंदित करण्यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट आपल्यासाठी जास्त महत्त्वाची नाही.​—कलस्सै. १:१०.

१०-११. मायकल आपल्या जीवनात मोठमोठे बदल कशामुळे करू शकला?

१० यहोवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी मोठमोठे त्याग केले आहेत. जगात चांगलं करियर करायची संधी असूनही काही जणांनी त्याकडे पाठ फिरवली. काहींनी धनसंपत्तीच्या मागे धावायचं सोडून दिलं. तर काहींनी यहोवाबद्दल शिकून घेतल्यावर आपली जीवन जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलली. मायकल नावाच्या एका भावानेही असंच केलं. तो सत्यात लहानाचा मोठा झाला नव्हता. तरुण असताना तो कराटे शिकायचा. तो म्हणतो, “तंदुरुस्त राहणं, फिट राहणं हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. कधीकधी तर मला वाटायचं की मला कोणीच हरवू शकत नाही.” पण जेव्हा मायकलने बायबल अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा हिंसेबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे त्याला कळलं. (स्तो. ११:५) त्याच्यासोबत ज्यांनी बायबल अभ्यास केला होता, त्या जोडप्याबद्दल मायकल म्हणतो, “कराटे सोडून दे असं त्यांनी मला कधीच सांगितलं नाही. ते फक्‍त मला बायबलमधलं सत्य शिकवत राहिले.”

११ मायकल जसजसं यहोवाबद्दल शिकत गेला तसतसं त्याच्यावरचं त्याचं प्रेम वाढत गेलं. खासकरून यहोवाचं त्याच्या उपासकांवर किती प्रेम आहे, त्यांची त्याला किती काळजी आहे ही गोष्ट त्याच्या मनाला भिडली. काही काळाने मायकलला जाणवलं, की त्याला जीवनात एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो म्हणतो, “मला माहीत होतं की कराटे सोडून देणं माझ्यासाठी सोपं नसणारए. पण मला हेही माहीत होतं की माझ्या या निर्णयामुळे यहोवाला आनंद होईल. आणि त्याची सेवा करण्यासाठी मी काहीही सोडायला तयार होतो.” मायकलने त्याला मिळालेल्या सत्याचं मोल ओळखलं होतं. आणि त्यामुळेच तो जीवनात मोठमोठे बदल करू शकला.​—याको. १:२५.

बायबलचं सत्य . . . दिव्यासारखं आहे

प्रकाश देणारा दिवा आपल्याला अंधारात मार्ग दाखवतो. त्याचप्रमाणे देवाचं वचन आपल्याला सैतानाच्या या अंधाऱ्‍या जगात योग्य मार्ग शोधायला मदत करतं (परिच्छेद १२-१३ पाहा)

१२-१३. बायबलमधल्या सत्याच्या प्रकाशामुळे मायलीला कसा फायदा झाला?

१२ सत्याचं मोल काय आहे हे दाखवण्यासाठी बायबल त्याची तुलना अंधारात प्रकाश देणाऱ्‍या दिव्याशी करतं. (स्तो. ११९:१०५; इफिस. ५:८) आझरबाइजानमध्ये राहणाऱ्‍या मायलीला देवाच्या वचनातून जी मदत मिळाली त्याबद्दल तिला खूप कदर वाटते. तिचे वडील मुस्लिम तर तिची आई यहूदी होती. ती म्हणते, “देव आहे की नाही याबद्दल मला शंका नव्हती. पण बऱ्‍याच गोष्टींबद्दल माझ्या मनात गोंधळ होता. मी विचार करायचे की ‘देवाने माणसाला का बनवलं असेल? एखाद्याला आयुष्यभर दुःख सहन करावं लागतं आणि मग पुन्हा नरकात कायमसाठी यातना भोगाव्या लागतात. मग यात काय अर्थए?’ मी बऱ्‍याच लोकांच्या तोंडून ऐकलं होतं की जे काही होतं ते देवाच्या इच्छेनेच होतं. म्हणून मी विचार करायचे, की ‘आपण काय देवाच्या हातातल्या कटपुतळ्या आहोत का? आणि तो वर बसून फक्‍त तमाशा बघतोय का?’”

१३ मायली तिच्या या प्रश्‍नांची उत्तरं शोधत होती. काही काळाने ती बायबल अभ्यास करू लागली आणि मग सत्यात आली. ती म्हणते: “बायबलमधून शिकलेल्या गोष्टी इतक्या पटण्यासारख्या होत्या की त्यामुळे माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. माझ्या मनातल्या शंका आणि गोंधळ दूर झाला. देवाच्या वचनातून मिळालेली उत्तरं मला पटली. आणि यामुळे मला मनाची शांती मिळाली.” मायलीसारखंच आपण सगळे यहोवाची स्तुती करतो, कारण त्याने आपल्याला “अंधारातून [त्याच्या] अद्‌भुत प्रकाशात आणलं.”​—१ पेत्र २:९.

१४. सत्याबद्दलची आपली कदर आपल्याला कशी वाढवता येईल? (“ सत्य आणखी कशासारखं आहे” ही चौकटसुद्धा पाहा.)

१४ सत्य किती मौल्यवान आहे, हे दाखवणारी फक्‍त काही उदाहरणं आपण पाहिली. अशीच इतर उदाहरणंही तुम्हाला नक्कीच आठवली असतील. आपण सत्याची कदर का केली पाहिजे, याची इतर कारणंही तुम्ही आपल्या वैयक्‍तिक अभ्यासात शोधायचा प्रयत्न करू शकता. कारण आपल्याला सत्याची जितकी जास्त कदर असेल तितकंच आपल्याला ते जीवनात वेगवेगळ्या मार्गांनी दाखवून देता येईल.

आपण सत्याबद्दल कदर कशी दाखवू शकतो?

१५. आपल्याला सत्याची कदर आहे, हे दाखवायचा एक मार्ग कोणता आहे?

१५ आपण बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचा नियमित अभ्यास करण्याद्वारे दाखवू शकतो, की आपल्याला सत्याची कदर आहे. कारण सत्यात येऊन आपल्याला कितीही वर्षं झालेली असली तरीही आपण नवनवीन गोष्टी शिकत राहू शकतो. या मासिकाच्या पहिल्याच अंकात असं म्हटलं होतं: “आज या जगात खोट्या गोष्टी जंगली झाडाझुडपांसारख्या पसरलेल्या आहेत. पण सत्य हे त्या जंगली झाडाझुडपांमध्ये उगवणाऱ्‍या एका लहानश्‍या फुलासारखं आहे. शोधल्याशिवाय तुम्हाला ते सापडणार नाही. आणि जर ते तुम्हाला हवं असेल तर ते घेण्यासाठी तुम्हाला खाली वाकावं लागेल. पण सत्याचं एक फुल मिळाल्यावर समाधान मानू नका, तर आणखी फुलं शोधत राहा.” हे खरं आहे, की अभ्यासासाठी मेहनत घ्यावी लागते पण त्याचे फायदे खूप आहेत.

१६. तुम्हाला अभ्यासाची कोणती पद्धत आवडते? (नीतिवचनं २:४-६)

१६ सगळ्यांनाच वाचायला आणि अभ्यास करायला आवडत नाही. पण सत्याची सखोल समज मिळण्यासाठी यहोवा आपल्याला ‘शोध घेत राहायचं’ प्रोत्साहन देतो. (नीतिवचनं २:४-६ वाचा.) जर आपण अशी मेहनत घेतली, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. कॉरी नावाचा एक भाऊ सांगतो, की तो बायबल वाचताना एका वेळी एकाच वचनावर लक्ष देतो. तो सांगतो: “मी त्या वचनातली प्रत्येक फुटनोट वाचतो. मी संदर्भ वचनं उघडून पाहतो आणि थोडा रिसर्चही करतो. अशा पद्धतीने अभ्यास केल्यामुळे मला प्रत्येक वचनातून बरंच काही शिकायला मिळतं.” कदाचित आपली अभ्यास करायची पद्धत वेगळी असेल. पण आपण कोणत्याही पद्धतीने अभ्यास केला, तरीसुद्धा जेव्हा आपण त्यासाठी वेळ काढतो आणि मेहनत घेतो, तेव्हा सत्याबद्दल आपल्याला कदर आहे, हे आपण दाखवत असतो.​—स्तो. १:१-३.

१७. सत्याप्रमाणे जीवन जगायचा काय अर्थ होतो? (याकोब १:२५)

१७ आपल्याला माहीत आहे, की फक्‍त अभ्यास करणं पुरेसं नाही. सत्याचा पूर्ण फायदा होण्यासाठी आपण शिकलेल्या गोष्टींप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. असं केलं तरच आपल्याला सत्यामुळे खरा आनंद मिळू शकतो. (याकोब १:२५ वाचा.) पण आपण सत्याप्रमाणे जीवन जगत आहोत की नाही, हे आपल्याला कसं कळेल? एका भावाने असं सांगितलं, की यासाठी आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. म्हणजेच आपण कोणत्या बाबतीत चांगलं करत आहोत आणि कोणत्या बाबतीत आणखी सुधारणा करायची गरज आहे, हे ओळखायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रेषित पौलने याबद्दल असं म्हटलं: “आत्तापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.”​—फिलिप्पै. ३:१६.

१८. आपण ‘सत्याच्या मार्गावर चालत राहायचा’ मनापासून प्रयत्न का करतो?

१८ ‘सत्याच्या मार्गावर चालत राहिल्यामुळे’ खरंच आपल्याला किती फायदे होतात! यामुळे आपलं स्वतःचं जीवन तर सुधारतंच, पण यहोवाला आणि आपल्या भाऊबहिणींनाही खूप आनंद होतो. (नीति. २७:११; ३ योहा. ४) सत्याची कदर करण्याची आणि सत्याप्रमाणे जीवन जगायची यापेक्षा आणखी मोठी कारणं कोणती असू शकतात?

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

^ बायबलमधल्या शिकवणींना आपण सहसा “सत्य” असं म्हणतो आणि जेव्हा एखादी व्यक्‍ती या शिकवणींप्रमाणे जगू लागते तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्‍तीने “सत्य स्वीकारलं.” आपण सत्यात नवीन असलो किंवा लहानपणापासून त्यात असलो, तरी हे सत्य आपल्याला इतकं मौल्यवान का वाटतं याबद्दल विचार केल्यामुळे आपल्याला नक्कीच खूप फायदा होऊ शकतो. कारण यामुळे यहोवाचं मन आनंदित करायचा आपला निश्‍चय अजून पक्का होईल.